Thursday, 15 December 2016

सायलीच्या पायांसाठी...



सायली ढमढेरे तिचं नाव. दोन्ही पाय गेलेत तिचे. ओतूरच्या संजय ढमढेरे या शिक्षकाची ही लाडकी लेक पुण्यात राहून एमपीएससीची तयारी करत होती. आपल्या आते बहिणी बरोबर ती कल्याणला आली होती. गाडी पकडताना घात झाला. कल्याण स्टेशनवर ट्रेन पकडताना ती पाय घसरून पडली. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला अॅडमिट करेपर्यंत ती शुद्धीवर होती. बोलत होती. तिचा रेल्वे अॅक्सिडेंट झाल्याचा फोन गावी गेला, तेव्हा वडील वेडेपीसे झाले. 'काय झालं असेल आपल्या लेकीला?' या विचाराने त्यांचा मेंदू काम करत नव्हता. शुद्धीवर आलेल्या लेकीचं धैर्य पाहिल्यानंतर सायलीच्या आई वडिलांच्या जीवात जीव आला. 

'तिला समजावून सांगायचं कसं? दोन्ही पाय गेले हे सांगणार कोण?' हे प्रश्न सायलीच्या आई-वडिलानांच नाही तर तिच्या डॉक्टरांनाही पडले होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. मुलीची जात आहे. खचून जाईल. धीर द्यावा लागेल. वेळ लागेल. डॉक्टर तिच्या आई-वडिलांना समजावून सांगत होते. पण शुद्धीवर आल्या आल्या सायलीला कळून चुकलं होतं. आपले दोन्ही पाय उरलेले नाहीत. खूप रडली; पण सावरली. आई-वडिलांनाच ती हिंमत देऊ लागली. 

अपघात असा झाला की, घरचे आणि नातेवाईक धावतातच. मदतही न मागता आली. तिला भेटायला मी आणि अशोक बेलसरे सर गेलो तेव्हा चकीत व्हायची वेळ आमची होती. दोन गोष्टीसाठी. एक म्हणजे तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्‍वास आणि निरागस हास्य. अचंबित होण्याचं दुसरं कारण म्हणजे तिच्या एमपीएससीचे सहाध्यायी मित्र. राहुल सावंत आणि मित्रांनी तिला दिलेल्या महिना-दीड महिन्याची साथ. राहुल तर पहिल्या दिवसापासून तळ ठोकून होता. 

सायलीची बातमी वाचली होती; पण तिची कथा कळली ती पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत जाहिरातीच निघाल्या नाहीत. त्यामुळे दोन दोन वर्षे अभ्यास करूनही करियरची संधी नाही. पुण्यात आणि लातूरला मोठा मोर्चा निघाला. सरकारने त्याची दखल घेतली. म्हणून पीएसआयच्या जागा निघाल्या आहेत, पण त्यातही वयाची अट ३३ ठेवण्यात आली होती. ती ३८ करण्याचं सरकारने मान्य केलं आहे हे खरं. पण तशी दुरुस्ती झालेली नाही. नवीन जाहिरात निघालेली नाही. ओबीसीच्या आणि एनटीच्या जागांसाठी त्यात आरक्षण नाही. सातशेच्या वर जागा निघतात आणि एकही जागा एनटी, ओबीसींसाठी नसावी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नागपूर विधानमंडळातील त्यांच्या दालनात भेटलो. त्यांनी तातडीने मार्ग काढण्याचं आश्‍वासन दिलं आहे. माझ्यासमोरच त्यांनी अधिकार्‍याला बोलावून निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे, इतकं मात्र नक्की.

पुण्याच्या आंदोलनात सायलीही होती. राहुलही होता. महेश, निलेश यांनीच तिच्या अपघाताची बातमी दिली. त्यांनी सांगितलं म्हणूनच सायलीला भेटायला मी आणि बेलसरे सर गेलो. ही मुलं एका बाजूला परीक्षेचा अभ्यास करताहेत. दुसर्‍या बाजूला आपल्या मागण्यांसाठी तामिळनाडूच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा व्हाव्यात म्हणून आंदोलन करताहेत. आणि तिसरीकडे या व्यापातून सायलीसाठी मदत गोळा करतायेत. 

सायलीची आई सांगत होती, 'पुण्याला तिला पाठवताना आम्ही सांगत होतो. सायली, पोरी मुलांपासून दूर रहात जा.' 

गावातलीच कशाला, कुणाही लेकीची आई आपल्या मुलीला त्याच काळजीने हे सांगेल. पण हॉस्पिटलमध्ये सायलीची सेवा करताना तिच्या मित्रांना पाहिल्यानंतर नव्या पिढीच्या मुलांची आणि मैत्री नावाच्या नव्या नात्याची नवीच ओळख तिच्या आईला झाली. तिच्या आईने स्वत:हून सांगितलं. हॉस्पिटलमध्ये तिचे वडील आणि राहुलच जास्त बोलत होते. सायली बोलत होती. आई बोलली ते एवढंच वाक्य. परंपरागत समजुतीचं जळमट निघून गेल्याचं समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. 


सायलीला धीर द्यायला तिथं कोण कोण येऊन गेलं. मोनिका मोरेला कृत्रिम हात देणारे खासदार किरीट सोमय्या. स्वत: मोनिका मोरे. दोन्ही पाय गेलेल्या डॉ. शकीला शेख. तन्वीर शेख, किरण पाठारे, रमेश शुक्ल. ६५ वर्षांचे डोंबिवलीचे विवेक नवरे. ट्रेन, बस पकडून नवरे स्वत:हून येत होते. तिच्याशी, तिच्या आईवडिलांशी बोलत होते. खळखळवून हसवत होते. धीर देत होते. आत्मविश्‍वास जागवत होते. पाय गमावलेले हे सारेजण तिला भेटले. जगण्याची नवी उमेद, अपघातावर नवी मात करण्याची हिंमत आणि पुन्हा पायावर उभं राहण्याचा निर्धार त्यांच्या भेटीतून सायलीला न मिळता तरच नवल. 

किरीट सोमय्यांनी पुढाकार घेतल्यामुळे घाटकोपरच्या मोनिका मोरेला कृत्रिम हात मिळाले. शकीला शेख दोन्ही पायावर उभ्या आहेत. डॉक्टरकी करताहेत. अरुणिमा सिन्हा तर यांनी कृत्रिम पायानीशी हिमायलाची चढाई केली. तन्वीर शेख तर बाईक चालवतात. मग सायलीला दोन्ही पाय का मिळणार नाहीत? मनानं ती उभी राहिली आहे. दोन्ही पायावर तिला उभं राहायचं आहे. एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. तिला मदतीची गरज आहे. उदापूरच्या सरस्वती विद्यालयात तिचे वडील संजय ढमढेरे शिक्षक आहेत. एकटे कमावते आहेत आणि अॅडव्हान्स्ड Protestic Limbs चा खर्च ४० लाखाचा आहे. अशोक बेलसरे सरांनी शिक्षक भारतीच्यावतीने दहा हजाराचा चेक दिला. महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांनी पाचशे, हजार रुपये जरी पाठवले तरी मोठी मदत होईल. एका शिक्षकाची मुलगी आहे ती. अर्थात मदत सर्वांचीच व्हावी. होईलही. 

चेक किंवा आरटीजीएस करा -
संजय ढमढेरे : (संपर्क-९९७०४१००७८)

बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - ओतूर 

Ac/ No. 20204312828

IFSC :  MAHB0000130


(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. १४ डिसेंबर २०१६


3 comments:

  1. आवर्जून मदत करा. तुमचे ५००/१००० सुद्धा फार मोठे काम करू शकतात.

    ReplyDelete
  2. Dear Kapil sir would like to help. Please let me know how

    ReplyDelete
    Replies
    1. जय ढमढेरे : (mobile no-९९७०४१००७८)

      बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - ओतूर

      Ac/ No. 20204312828

      IFSC : MAHB0000130

      Delete