Thursday, 8 December 2016

आर्य चाणक्य कोण होते?


एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे आर्य चाणक्य पुरस्कार जाहीर झाले तेव्हा अभिनंदन करणाऱ्या एका मित्राने विचारलं, ... पण आर्य चाणक्य?

प्रश्न स्वाभाविक होता. प्रश्न चाणक्य नीतीबद्दलचा नव्हता. चाणक्य नावाची जी प्रतिमा रुजली आहे. त्यातून आलेला तो प्रश्न होता. काहींच्या डोक्यात चाणक्य मनुवादी, म्हणून ठसलेला. नंदराजाने केलेल्या अपमानानंतर चाणक्याने शेंडी सोडली आणि घोर प्रतिज्ञा केली. ती सोडलेली शेंडी तेवढी लक्षात राहिली आहे. बाकी त्याचं अर्थशास्त्र किती जणांनी वाचलं, हा प्रश्न अलाहिदा. प्रश्न शेंडीवाल्याचा पुरस्कार मी स्वीकारला कसा, हा होता.

पुरस्कार होता माईर्स एमआयटीचा. त्यांच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा. विश्वनाथ कराड हे शिक्षण क्षेत्रातलं मोठं नाव. खाजगी क्षेत्रातल्या बाजारात गुणवत्ता आणि प्रतिष्ठा ज्यांनी टिकवून धरली आहे असं हे नाव आहे. कराड जुने परिचित आणि स्नेही. पण त्यांच्या मुलाने राहुल कराड यांनी अनेक अभिनव कल्पना राबवत संस्थेला वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. राहुल तरुण आहेत. दमदार वक्ते आहेत. जगभर फिरले आहेत. त्यामुळे दृष्टीही तितकीच व्यापक आहे. विश्वनाथ कराड यांनी विश्वशांतीची कल्पना राबवत देहू, आळंदीला थेट जागतिक स्तरावरच्या तत्त्वज्ञान परिषदांमध्ये स्थान मिळवून दिलं. तर राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसद स्थापन केली. दरवर्षी दहा हजाराहून अधिक विद्यार्थी एकत्र येतात. लोकशाही मूल्यांचा गजर करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते, मुत्सद्दी, विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि आध्यात्मिक नेतेही या परिषदेला हजेरी लावतात. आर्य चाणक्य राज्य पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच. निवड समितीवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, जब्बार पटेल, राज्यपाल श्रीनिवास पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यासारखे विविध क्षेत्रातले नामवंत आहेत. या वर्षी माध्यम क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या देवकिसन सारडा, गांधी अन् साने गुरुजींना मानणारे ज्येष्ठ आयएएस अधिकारी डॉ.नितीन करीर, न्याय क्षेत्रातले ख्यातनाम वकील अॅड.उज्ज्वल निकम, प्रख्यात उद्योगपती आयआयटीयन डॉ.प्रमोद चौधरी यांची निवड या समितीने केली होती. त्यांच्या सोबतीने विधान परिषदेचे आमचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळत असताना नकार कसा देणार आणि तोही आर्य चाणक्य या नावाने. मी स्वत: नास्तिक परंपरेतला असल्याने आर्य चाणक्य पुरस्कार स्वीकारताना होणारा आनंद स्वाभाविक होता.

आचार्य चाणक्य विष्णू गुप्त कौटील्य नास्तिक परंपरेचे शिरोमणी होते. त्यांची चाणक्य नीती नास्तिक परंपरा पाळणारी होती. त्यांनी स्वत:च जाहीरपणे म्हटलं आहे, लोकायत, सांख्य, योग आणि अर्थशास्त्र नास्तिक परंपरा मानतात. अर्थशास्त्र हा त्यांचा अर्थ - राज्यशास्त्रावरचा अद्वितीय ग्रंथ. त्याच्या पहिल्या पानावर त्या ग्रंथाची अर्पण पत्रिका आहे. चार्वाक लोकायत परंपरेचे आद्य गुरू आचार्य बृहस्पती आणि राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांना आपला ग्रंथ त्यांनी अर्पण केला आहे. चार्वाक लोकायतांची नास्तिक परंपरा या देशात प्राचीन आहे आणि शुक्राचार्य तर खुद्द बळीराजाचे आचार्य. झारीतले शुक्राचार्य असा वाक्प्रचार उलट्या अर्थाने आपण वापरतो. राज्याचं धन अनाठायी कर्मकांडावर खर्च होऊ नये, पुरोहितांनी लुटून नेऊ नये म्हणून शुक्राचार्य झारीच्या दानाला विरोध करायचे. 

नास्तिक परंपरा म्हणजे निरीश्वर वाद नव्हे. जे वेद प्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक, अवैदिक. या जगाचा कुणी एक नियंता आहे आणि तो रिमोट कंट्रोलने हे विश्व चालवतो यावर नास्तिकांचा विश्वास नाही. गंगा स्नानाने पुण्य प्राप्ती, धर्म प्राप्ती होते, असं ते मानत नाहीत. जातीवादाचा दर्प ते बाळगत नाहीत. शरीराला यातना करून पापातून मुक्ती मिळते यावरही ते विश्‍वास ठेवत नाहीत. आत्मा, परलोक, पुनर्जन्म या भाकड कथांवर ते विश्वास ठेवत नाहीत. सातव्या शतकातील धर्म कीर्तीने तर असल्या भाम्रक कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे.

वैदिक, अवैदिकांचा संघर्ष मोठा आहे. मनुस्मृती तर खूप नंतरची. पुश्य मित्र शुंग नावाच्या सेनापतीने सम्राट अशोकाच्या पणतूची, बृहदरथाची कपटाने हत्या करून राज्य मिळवल्यानंतर वैदिक ब्राह्मण धर्माची पुनर्स्थापना केली. तोवर मौर्य साम्राज्यात बौद्ध धम्माला आणि नास्तिक परंपरेला प्रतिष्ठा होती. मनुस्मृतीची रचना त्याच्याच काळातली. मनुस्मृतीचा कारभार सुरू होईपर्यंत मौर्य साम्राज्याचा कारभार कौटिल्यांच्या अर्थशास्त्रानुसारच चालत होता. चाणक्यांचं अर्थशास्त्र एका अर्थाने चंद्रगुप्त ते अशोक, बृहदरथापर्यंत. त्या राज्याचं संविधानच होतं. ते संविधान रिप्लेस करण्यासाठी मनुस्मृतीची रचना करण्यात आली. त्या मनुस्मृतीचं राज्य पुढे दोन हजार वर्षे चाललं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू होईपर्यंत. राज्य घटनेने मनुस्मृती संपुष्टात आली. बाबासाहेबांनी आचार्य सहस्त्रबुद्धे यांच्या हातांनी विषमता, अवहेलना आणि जातीद्वेषाने भरलेल्या मनुस्मृतीला महाडच्या संग्रामात आग लावली. अर्थशास्त्राला मनुस्मृतीने रिप्लेस कसं केलं तो इतिहास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी उलगडून दाखवला आहे. नास्तिक परंपरेचा, लोकायत विचारधारेचा इतिहास देविप्रसाद चटोपाध्याय, दक्षिणारंजन शास्त्री, पाश्चात्य पंडित ट्यूशी या साऱ्यांनी शोधून काढला. स. रा. गाडगीळ, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रदीप गोखले यांनी मराठीत विपुल लेखन केलं आहे. ते मुळातून वाचायला हवं. बळीराजाच्या शुक्राचार्यांना आणि चार्वाक महामुनींना पहिलं नमन घालणारे आर्य चाणक्य कुणाचे, याचं उत्तर त्यातून मिळेल. 

वैदिक परंपरे इतकीच लोकायत परंपरा प्राचीन आहे. त्यात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद नाही. वैदिक ब्राह्मण्याच्या विरोधात लोकायतवादी ब्राह्मण उभे राहिलेले रामायणात आणि महाभारतात दिसतात. जाबाली नावाच्या ब्राह्मणाने प्रभू रामचंद्राला नास्तिक मताचा उपदेश केला होता. तर महाभारतात द्रौपदीच्या पित्याने चार्वाक मताचं अध्यापन करण्यासाठी तज्ज्ञ् ब्राह्मणांची नेमणूक केली होती. आचार्य चाणक्य हे ब्राह्मण होते काय?  तर नव्हते. पण तो प्रश्न महत्वाचा नाही. 


इथल्या प्राचीन लोकायत नास्तिक परंपरेचं पुढे विद्रुपीकरण करण्यात आलं. या विचारधारेतील ज्या लोकनायकांना जनमनातून पुसून टाकणं शक्य नव्हतं. त्यांना शेंदुर फासून देव करण्यात आलं. कर्मकांडाला आणि पुरोहितशाहीला ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच नावाचं कर्मकांड आणि पूजापाठ पुढे सुरू झाला. आर्य चाणक्य ही प्रतिमाही अशीच विद्रुप करण्यात आली आहे. चार्वाकांचे ग्रंथ नष्ट करण्यात आले होते. चार्वाकांच्या टिकेतून त्यांना शोधावं लागलं. अर्थशास्त्रही पुश्य मित्र शुंगाने नष्ट केलं होतं. अनेक प्रक्षेप त्यातही झाले. तरीही ते टिकून आहे. त्यातला प्रक्षेपाचा शेंदूर खरवडून काढला की नास्तिक लोकायतवादी आर्य चाणक्याचं दर्शन घडतं. 

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. ७ डिसेंबर २०१६    

14 comments:

  1. सुंदर लेख साहेब. .

    ReplyDelete
  2. सुंदर लेख साहेब. .

    ReplyDelete
  3. उत्कृष्ठ लेख. बऱ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण समर्थनीय आहे. अभिनंदन!

    ReplyDelete
  4. खुपच छान लेख ०००

    ReplyDelete
  5. खुपच छान लेख ०००

    ReplyDelete
  6. सुंदर लेख आहे, फारच छान! !!!

    ReplyDelete
  7. अप्रतिम सर 👌👌👌

    ReplyDelete
  8. अप्रतिम सर 👌👌👌

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. Nice article sir my grandfather Kishanrao Deshmukh ,Ahemadpur liked it alot.He is a follower of Charvak and Chanakya..

    ReplyDelete
  12. kapili
    hope u remember e.
    we have lon forgotten chanaya, charvak etc.
    some of us use chanaya to abuse brahins without resding his book..
    anyway good u wrote
    regards
    suhas phadke
    9769997304

    ReplyDelete