Wednesday, 20 April 2016

बैंटिक बोले फडणवीस



१३ एप्रिल २0१६. मुंबई विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील समोर बसले होते. जात पंचायतीच्या बिलाचा एक ड्राफ्ट त्यांच्या हाती होता. विधान परिषदेत बिल यायचं होतं. त्याआधी गेले काही दिवस त्या बिलाची चर्चा होती. समज असा झाला होता की, जात पंचायतींवर बंदी येणार आहे. एकदा तर खुद्द जयराज साळगावकरांनी मला फोन करून या बिलाची घाई का होतेय? याची विचारणा केली होती. साळगावकर म्हणजे कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचे ज्येष्ठ चिरंजीव. कालनिर्णयकार धार्मिक-अध्यात्मिक. जयराज नास्तिक अन् निरीश्‍वरवादी. अर्थशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत मोठा व्यासंग. दुसरीकडे वर्षाताई देशपांडे आणि लक्ष्मण मानेंचा फोन. त्यांचे प्रश्न नजरअंदाज करता येणारे नव्हते.

अविनाश माझा छात्रभारतीचा, सेवा दल चळवळीतला मित्र. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची चळवळ पुढे नेणारा जिद्दीचा कार्यकर्ता. त्याच्या समोरच मी लक्ष्मण मानेंना फोन लावला. अविनाश भडकलाच. शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतला कपिल पाटील या बिलाच्या विरोधकांशी का बोलतो आहे, हा प्रश्न त्याला पडला होता. इतक्यात ते बिल विधान परिषदेत चर्चेला येत असल्याची सूचना मिळताच मी सभागृहात धावत गेलो. अविनाश पाटलांच्या प्रश्नाला उत्तर न देता, अविनाशही मग प्रेक्षकांच्या गॅलरीत आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सभागृहात आले होते. मी त्यांना चिठ्ठी पाठवली, जात पंचायतीच्या बिलाची घाई होतेय काय? भटक्या विमुक्तांच्या नेत्यांशी, पारसी, बोहरी यांच्या पंचायतींशी बोलणं झालंय का? त्यांनी त्यावरच उत्तर लिहून पाठवलं, बोलणं झालंय. खुणेने त्यांनी मला त्यांच्या आसनाजवळ बोलावलं. मला म्हणाले, 'उद्या बाबासाहेबांची १२५वी जयंती आहे. आज आपण हे बिल पास करू या. विधेयक फक्त बहिष्काराच्या विरोधात आहे. जात पंचायतीच्या नाही. मी हो म्हटलं. 

जात पंचायतीवरच बंदी येणार, या चर्चेने भटक्या जमातींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. पारसी पंचायत, बोहरी पंचायत, आदिवासींच्या पंचायती या सगळय़ांमध्ये तोच मेसेज होता. जात पंचायत आणि जमातींची पंचायत यात मोठं अंतर आहे. अल्पसंख्य समुदायांची ती एक ओळख आहे. न्याय-निवाडे होतात तिथे. गावकी, भावकीची कामं होतात. सामूहिक निर्णय होतात. म्हटलं तर लोकशाही पद्धत. प्राचीन गणसभांच्या परंपरेतून आलेली. पण गावकी, भावकी आणि न्यायनिवाड्याच्या नावावर अनेक अघोरी प्रथा आणि वाईट चालीरीतीही चालत आल्या आहेत. जातीबाहेर लग्न केलं म्हणून बहिष्कृत करण्याची असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथा. अगदी अलीकडच्या काळात मुंबईशेजारी रायगड जिल्ह्यात अशा अनेक घटना घडलेल्या. जात बहिष्कृत करण्याच्या या प्रथेला कायद्याने पायबंद करण्याचं विधेयक म्हणून सभागृहात आलं. सुनील तटकरे आणि जयंत पाटील या ज्येष्ठ आमदारांनी अर्थातच त्या विधेयकाचं सर्मथन केलं. पण गावकी, भावकीतून होणार्‍या चांगल्या गोष्टींचा उल्लेखही त्यांनी जरूर केला. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीची महार पंचायत नंतर बौद्धजन पंचायत कशी केली, याचा इतिहास भाई गिरकरांनी आवर्जून सांगितला. 

साळगावकर, देशपांडे, माने आणि माझ्याही शंकांना विधेयकाची प्रत समोर आली, तेव्हा पूर्णविराम मिळाला. जातीतून बहिष्कृत करण्याच्या असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथेलाच बहिष्कृत करणारं ते विधेयक होतं. आता ते पास झालं आहे. 

राजा राममोहन रॉय सती प्रथेच्या विरोधात रान उठवत होते. त्यालाही आता २00 वर्षे होतील. रावसाहेब एस. के. बोले यांनी मंदिर प्रवेशाच्या विधेयकाचा याच विधान परिषदेत आग्रह धरला, त्यालाही आता ९४ वर्षे होतील. दलित समाजातला पहिला मॅट्रिक झालेल्या मुलाचा सत्कार याच बोलेंनी केला होता. तो मुलगा म्हणजेच १२५ वर्षांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सती प्रथेच्या विरोधात लॉर्ड विलियम बैंटिकने १८२९ मध्ये कायदा केला आणि ती प्रथा मोडून काढली. ब्रिटिशांनी भारताला १५0 वर्षे गुलामीत ठेवलं, पण एलफिन्स्टन, बैंटिकसारख्या गर्व्हनरांनी सुधारणांचे अनेक कायदे केले. आताचं सरकार आपल्याला आवडो न आवडो, पण त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दुष्ट प्रथेचा अंत करणारं विधेयक विधानमंडळात पास करून घेतलं. 

जाती अंताच्या लढाईत अजूनही कितीतरी मागे असलेल्या आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी एक ऐतिहासिक कायदा त्या दिवशी झाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना शहीद व्हावं लागलं. महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करणारे विधेयक विधिमंडळात डिसेंबर २00६ च्या नागपूर अधिवेशनात चर्चेला आलं होतं, तेव्हा सेना-भाजपानेच जोरदार विरोध केला होता. विधेयकाचं सर्मथन करताना माझ्या दीड तास चाललेल्या भाषणात विरोधकांशी अनेक चकमकी झडल्या होत्या. अन् आता तेच विरोधक सत्तेवर असताना एक पुरोगामी कायदा झाला. त्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावंच लागेल. लॉर्ड बैंटिक, एस. के. बोले यांच्या रांगेत फडणवीस जाऊन बसले आहेत. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य 
आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २० एप्रिल २०१६ 

12 comments:

  1. ऊत्तम व अभ्यासपूर्ण विवेचन !पाटील साहेबांचं विधीमंडळातील योगदान खूपच दर्जेदार असते!!.......पुरुषोत्तम गावंडे

    ReplyDelete
  2. ऊत्तम व अभ्यासपूर्ण विवेचन !पाटील साहेबांचं विधीमंडळातील योगदान खूपच दर्जेदार असते!!.......पुरुषोत्तम गावंडे

    ReplyDelete
  3. सर....अप्रतिम विवेचन.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete