Wednesday, 10 August 2016

मोदींच्या मौन भंगाचं स्वागत


तथाकथित गोरक्षकांना खुद्द पंतप्रधानांनीच सुनावलं, हे बरं झालं. दलितांवर अत्याचार करणार्‍यांना इशारा देताना ते आणखी भावूक झाले. हवं तर माझ्यावर गोळ्या झाडा, असं मोदींनी सांगितलं. 

देशाचे पंतप्रधान या प्रश्नांवर दोन वर्षे मौन पाळून होते. अचानक त्यांनी मौन सोडलं. त्याचं स्वागत करायचं की हे मगरीचे अश्रू मानायचे?

मोदींचा गुजरातमधला इतिहास, त्यांचं हिंदुत्ववादी स्कूल, संघाच्या अजेंड्याशी असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांची महत्त्वाकांक्षा या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे हे उद्गार अचंबित करणारे न वाटले तरच नवल. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मगरमच्छ के आँसू म्हणून केलेली संभावना अनेकांना आवडलेली नाही. पण महम्मद अखलाकला फ्रीजमध्ये गोमांस असल्याच्या खोट्या आरोपाखाली ठेचून मारण्यात आलं, तो इतिहासही खूप जुना नाही. अखलाकचा मुलगा तर भारतीय सेनेत देशासाठी शीर तळहातावर घेऊ उभा आहे. तरीही त्याच्या वडिलांना सरकार वाचवू शकलं नाही. इतिहास काही असो, त्यांचं स्कूल, त्यांचा अजेंडा काही असो, तथाकथित धर्म रक्षकांनी मांडलेल्या उच्छादाला प्रधानमंत्री वेसण घालू मागत असतील तर त्याला नावं का ठेवायची? हा प्रश्न नाकारण्याचं कारण नाही. पण उत्तरप्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका समोर ठेवून पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं काय?

गाय वाचवण्यासाठी माणसं मेली तरी चालतील, असं तत्त्वज्ञान सांगणार्‍यांचे पूर्वज यज्ञात गायीचा बळी देत होते. ऋवेदात तर गायीचं मांस कसं शिजवायचं याचं रसभरीत वर्णन आहे. बुद्ध, महावीरांमुळे शेतकर्‍यांच्या कळपातल्या गायी लुटून नेणार्‍या आणि खाणार्‍यांच्या तोंडून वाचल्या. लक्ष्मी नावाची शेतकर्‍याची एक माय गायी लुटून नेणार्‍यांशी दोन हात करायची. गोधन सोडवून आणायची. दिवाळीत आजही तिची लक्ष्मीपूजा होते. पुढे खाणारेच शाकाहारी झाले. गोधनाची गोमाता झाली. गायीला जे माता मानतात त्यांची ती श्रद्धा आहे. ही श्रद्धा भारतातल्या अनेक मोगल बादशहांनी जपली. गो हत्येला बंदी करणारा बाबर हा पहिला बादशहा. गो ब्राह्मण प्रतिपालनाची परंपरा त्याच्यापासून सुरू होते.

गाय ज्यांची श्रद्धा आहे तिचा आदर जरूर करू. पण गो वंशातलं एकही जनावर मारायचं नाही अशी भाषा करत माणसं ठेचून मारायला आणि जाळायला जे तयार होतात ते माणसाच्या वंशातले मानायचे का? भारतातला बहुसंख्य गरीब समाज आजही मोठय़ा जनावरांचं मांस खातो. बैल, रेड्याचं मांस बकर्‍याच्या मटणापेक्षा स्वस्त मिळतं. त्यात भरपूर प्रथिनं असतात. महागलेल्या तुरीच्या डाळीपेक्षा किती तरी स्वस्तात गरीबांच्या मुलांना मोठय़ा जनावरांच्या मटणातून ही प्रथिनं मिळतात. निरुपयोगी झालेले बैल शेतकरी विकतो. त्यातून त्याला बैलाची नवी जोडी घेता येते. अडचणीत आधार मिळतो. देशातलं पशुधन इतकं पुरेसं आहे की, निरुपयोगी ठरलेले बैल, रेडे कत्तलखान्यात जाणं अधिक फायदेशीर ठरतं. काम नसताना त्यांना पोसणं शेतकर्‍यांना दुष्काळात तेरावा महिना ठरतो. हा तेरावा महिना गेली दोन वर्षे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी अनुभवला आहे. शिवसेना- भाजपाचं राज्य येताच गोवंश हत्याबंदीचा बासनात गेलेला युतीच्या काळातला कायदा राष्ट्रपतींच्या सहीनिशी पुन्हा जिवंत झाला.

उत्तरेतल्या दादरी आणि सोनपेठ प्रकरणाचा फटका बिहारमध्ये भाजपाला बसूनही फार फरक पडला नव्हता. गुजरातमध्ये ऊना गावात मेलेल्या जनावरांचं कातडं सोलणार्‍या दलित समाजातल्या तरुणांना कपडे उतरवून बर्बरतेने, निर्ममतेने मारण्यात आलं, तेव्हा मात्र पंतप्रधान जागे झाले. भरपावसात हजारोंच्या संख्येने दलित एकजुटीने रस्त्यावर उतरले, तेव्हा त्याची राजकीय किंमत आता मोजावी लागणार याचं भान त्यांना आलं. वाल्मिकी जयंतीच्या भजनात एकेकाळी रमणारा गुजरातमधला दलित आंबेडकरी अस्मितेने पहिल्यांदाच पेटून उठला. अखेर पटेल आंदोलनाला दाद न देणार्‍या शहा आणि मोदींनी आनंदीबेन पटेलांना घालवलं.

आधी मुस्लिम, नंतर पटेल अन् आता दलित. गुजरातच्या रणातली वाळू मोदींच्या मुठीतून निसटू लागली आहे. सत्ताधार्‍यांना राजकीय भाषा लवकर कळते. आनंदीबेन जाऊन विजय रुपानी आल्याने ती मूठ किती पक्की राहील? प्रश्न फक्त बिहारचा नाही. बिहारच्या पाठोपाठ गुजरातलाच आपल्या होम ग्राउंडवर धक्का बसला तर मोदींच्या सर्वंकष सत्तेला तो मोठा सुरुंग ठरेल. ते भान त्यांना आलं आहे. म्हणून माझ्यावर गोळ्या झाडा, दलितांवर अत्याचार करू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. तरीही त्यांचं स्वागत करायला हवं, कारण संघ परिवारातली नथुरामी पिलावळ शांत बसलेली नाही. शंकराचार्यांपासून विश्‍व हिंदू परिषदेच्या अतिरेकी नेतृत्वाने थेट मोदींवर हल्ला चढवला आहे. संघ परिवारातल्या उदार गटापुढे पहिल्यांदाच मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

भगव्या परिवारात मुंजे, गोळवळकर ते नथुरामापर्यंत अनेक रंगाचे पदर आहेत. दुसरीकडे दीनदयाळ, देवरसांचं उदार स्कूलही आहे. अटलबिहारी वाजपेयी, भैरोसिंह शेखावत, प्रमोद महाजन हे या दीनदयाळी किंवा महाराष्ट्रातल्या भागवती स्कूलातले. भाजपामध्ये आधुनिक उदार विचारांची कास धरणारं नेतृत्वही मोठं आहे. गडकरी, फडणवीस, जेटली, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान, जावडेकर हे या उदार परंपरेतले आहेत. नवा विचार करणारे आहेत. या दोन गटातली फारकत जेवढी वाढेल, तेवढा भाजपातला अंतर्गत संघर्ष वाढेल. हा संघर्ष वाढणं देशाच्या फायद्याचं आहे. भाजपा हा देशातला एक मोठा पक्ष आहे. भारतीय राजकारणातली ती एक अपरिहार्यता आहे. तेव्हा या संघर्षाला आमंत्रण देणार्‍या मोदींच्या मौन भंगाचं स्वागत करायला हवं.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १० ऑगस्ट  २०१६     

2 comments:

  1. AGDI BAROBAR AHE SIR KHAYACHE TAT ANI DAKHAWAYACHE DAT ASA PRAKAR AHE. BOLNYAPEKSHA KRUTI HONE ANI KAYDYANCHE RAJYA YENE GARJECHE AHE

    ReplyDelete