Thursday, 4 August 2016

नाईटची आर्ची, नाईटचा परश्या




चल गं आर्ची मोर्चाला, रात्रीच्या शाळेत शिकायला,
चल रे परश्या मोर्चाला, रात्रीच्या कॉलेजात शिकायला

अशा घोषणा देत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून निघालेला नाईट स्कूल मुलांचा मोर्चा मरिन ड्राईव्हवर पोलिसांनी अडवला, तेव्हा मुलांच्या हातातल्या बॅटर्‍या क्वीन्स नेकलेसशी स्पर्धा करत होत्या. मोर्चा नाईट स्कूलचा होता म्हणून रात्री निघाला. 

तीस वर्षांपूर्वी आझाद मैदानात असाच मोर्चा निघाला होता. तेव्हा हजारो मुलं आली होती. दीडशे रात्रशाळा बंद करण्याचा एकाएकी निर्णय सरकारने तेव्हा घेतला होता. रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्रभारतीने तेव्हा हाक दिली होती. मोर्च्यातली गर्दी पाहून सरकारी कर्मचार्‍यांचे नेते र. ग. कर्णिक अचंबित झाले होते. तेव्हा मोर्चा थेट मंत्रालयापर्यंत जायचा. मुलं संतापलेली होती. बरीच गडबड झाली. पण पोलीस सोबत होते. इन्स्पेक्टर कदम होते तेव्हा. ते म्हणाले, 'आमचे अर्धे पोलीस नाईट स्कूलवाले आहेत. काळजी करू नको.' त्यांनीच लाऊडस्पीकरची व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांना वायरलेस मेसेज पाठवला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी तात्काळ शिक्षणमंत्री राम मेघेंना पाठवलं. रात्री दहा वाजता मंत्रालयाचे दरवाजे पुन्हा उघडले गेले. शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ मागे घेतला. नंतर विलासराव देशमुख शिक्षणमंत्री झाले. त्यांच्यामुळे रात्रशाळा अधिक सक्षम झाल्या. दिवसभर राबून आपल्या कुटुंबाला मदत करणारी मुलं रात्रशाळेत शिकतात. त्यांच्याबद्दल विलासरावांना अपार सहानुभूती होती. एकदा ते मेळाव्यात आले होते. जाताना स्टेजच्या पायरीवरून किंचित घसरले तर आमची बिलंदर पोरं म्हणाली, 'जाता जाता घसरू नका, आमच्या मागण्या विसरू नका.' विलासरावांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार हसत आणि डोळे मोठे करत त्या घोषणेला दाद दिली. वा! मी 'सॉरी' म्हणालो. तर मला म्हणाले, 'अरे मुलं आहेत ती. असंच असलं पाहिजे.'

परवाचा मोर्चाही मरिन ड्राईव्हवर पोहोचला तेव्हा 'आर्ची'ची घोषणा तावडेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचली होती. खरं तर त्यांनीही दाद द्यायला हवी होती; पण मोर्चात राजकारण असल्याचा आरोप केला. मोर्चा छात्रभारती, शिक्षक भारती आणि रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचा होता. गेली ३० वर्षे रात्रशाळा आंदोलनाशी छात्रभारती आणि मुख्याध्यापक संघाचा जिवंत संबंध आहे. शिक्षक भारतीचा दहा वर्षांचा. रात्रशाळेच्या जीवापोटी अशोक बेलसरे, अरुण खाडीलकर आणि चिकोडीकर सरांनी घेतलेले कष्ट सर्वांना माहीत आहेत. शरद कदम, अरुण लावंड, मेल्विल घोन्सालवीस या माझ्या सहकार्‍यांनी घेतलेली मेहनत कुणाला माहीत नाही. आता सागर भालेराव, दत्ता ढगे, जयभीम शिंदे, दिनेश पानसरे ही नवी टीम तितकीच जोरदार आहे. तीस वर्षे आम्ही साऱ्यानी मिळून रात्रशाळा जपल्या आहेत. तेव्हा राजकारणाचा माझा दुरूनही संबंध नव्हता. रात्रशाळांचे शिक्षक मला जीव लावून आहेत ते त्यामुळेच. 

परवाच्या मोर्चात पंच्च्याहत्तरी उलटलेले देशातली सगळ्यात मोठी रात्रशाळा चालविणारे प. म. राऊत, नरहरी चाफेकर, मारुती म्हात्रे, सदानंद रावराणे चालत होते. मोर्च्या मोठा होणार हे लक्षात येताच शिक्षणमंत्र्यांना जाग आली. घाईघाईत विधानभवनात त्यांनी एक बैठक बोलावली; पण यातल्या कुणालाही न बोलावता. तरीही मी भेटलो त्यांना. पण त्या आधीच दुपारी २ वाजता माझी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली होती. त्यांनी तात्काळ रात्रशाळांच्या मागण्यांबाबत शिक्षण सचिवांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांची तत्परता आणि संवेदनशीलता शिक्षणखात्याने दाखवली असती तर? खुद्द शिक्षण सचिवांनीच शिक्षणाधिकार्‍यांच्या बैठकीत रात्रशाळा टप्प्याटप्याने बंद करा, असा आदेश दिल्यामुळे वातावरण बिघडलं. त्यांना मुक्त शाळा सुरू करायच्या आहेत. रात्रशाळांना पर्याय म्हणून. मुख्यमंत्र्यांनी जो वादग्रस्त मसुदा स्क्रॅप केला त्यात ही कल्पना होती. मुक्त शाळेत शिक्षक असणार नाहीत. पत्राद्वारे शिकायचं. दहावीपर्यंत स्कूलिंगला महत्त्व आहे. ते होऊ द्यायचं नाही, म्हणजे गरिबांच्या आणि बहुजनांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही, हा सरळ त्याचा अर्थ. मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केलेली योजना पुन्हा रेटण्याचा 
अधिकार शिक्षण सचिवांना कुणी दिला?

मोर्चाची दखल मीडियाने थोडी कमी घेतली; पण त्याने काही बिघडत नाही. मुसळधार पाऊस असूनही दहा हजारांहून अधिक मुलं पोहोचली कशी., हीच खरी गंमत होती. 'झोन एक'चे डीसीपी मनोजकुमार शर्मा आणि झोन दोनचे डीसीपी कर्णिक मोर्चाच्या दोन्ही टोकांना हजर होते. त्या दोघांना थोडा त्रास झाला; पण मुलांची काळजी घेताना त्यांच्या वर्दीतला माणूस जागा होता.

रात्रशाळा बंद पडू देणार नाही, असं शिक्षणमंत्री आता म्हणत आहेत. पण त्या रात्रशाळेत पुरेसे शिक्षक हवेत. विषयनिहाय अनुभवी शिक्षक नसतील तर मुलं शिकणार कशी? अर्ध्या शिक्षकांना सरप्लस करून त्यांचे पगारही बंद केले आहेत. त्यांना परत घेतल्याशिवाय रात्रशाळा चालणार कशा? कॉलेजपर्यंतचं शिक्षण मोफत हवं. प्रवासात सवलत हवी. पुस्तकं हवीत. लायब्ररी हवी. सायन्स लॅब हवी. रात्री दहापर्यंत ही शाळा कॉलेजं चालतात. तेव्हा पोटाला आधार हवा. त्यांना वडापाव किंवा चहा बिस्किटं देण्याबाबत विचार करण्याचं आश्‍वासन तावडेसाहेबांनी दिलं आहे. 'मासूम'च्या निकीता केतकर आणि त्यांची टीम ६० शाळांमध्ये गेली काही वर्षे काम करत आहे. खरं तर ही जबाबदारी शासनाची. तावडेंनी मन मोठं करावं, एवढीच नाईटच्या आर्ची आणि परश्याची अपेक्षा आहे.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ३ ऑगस्ट  २०१६



11 comments:

  1. कपिल पाटील साहेब मोर्चा ही धडक होता आणि ब्लॉग ही बे धडक ०००

    ReplyDelete
  2. कपिल पाटील साहेब मोर्चा ही धडक होता आणि ब्लॉग ही बे धडक ०००

    ReplyDelete
  3. रात्रशाळा वाचवण्यासाठी छात्रभारती नेहमी अग्रही राहीली आहे.याही पुढे तेवढ्याच जोमाने,ताकतिने असंख्य कार्यकर्ते रात्रशाळा वाचवण्यासाठी सहभागी होतील .या आंदोलनात एक मात्र प्रकर्षाने जाणवले ३०वर्षांपुरवी जो जोश प.म.राउत सरांमध्ये होता तोच जोश या मोर्चातही दिसुन आला.

    ReplyDelete
  4. Jai Joti! Jai Bheem!! Wish you some day you become Education Minister. Best wishes.

    ReplyDelete
  5. खूप छान साहेब

    ReplyDelete
  6. खूप छान साहेब

    ReplyDelete
  7. पाटील साहेब, सुंदर अशीच धडक 13 जुलै 2016 च्या G R विरोधात मारण्यासाठी आवाहन करा

    ReplyDelete
  8. लेखणीकरिता लढा देणारा लढवय्या आमदार म्हणून आ.कपील पाटील हे एकमेव आहेत . आपल्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत .

    ReplyDelete
  9. लेखणीकरिता लढा देणारा लढवय्या आमदार म्हणून आ.कपील पाटील हे एकमेव आहेत . आपल्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत .

    ReplyDelete
  10. आमदार कपिल पाटील साहेब आपण गोरगरीबांचे कैवारी आहात आमच्या औरंगाबाद चं मा. दाणे सर यांच्या नेतृत्वाखाली याअपल्यासारखंच जोरात काम चालू आहे

    ReplyDelete