पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळी वाजवायला सांगितली. आपण वाजवली. दिवा लावायला सांगितला. दिवाही लावला. दिव्याने कोरोना कसा जाणार? माहीत नाही. पण त्याच्या उत्तरात शरद पवार यांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिल जनजागृतीसाठी, देशवासियांसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी दिवा लावायला सांगितला आहे. मग या दोन आवाहनांमध्ये फरक काय? 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटं दिवे जाळायचे होते. तेव्हा प्रचार असा केला गेला की आकाशातल्या ग्रहमालांचं स्थान आणि दिशा बघून पंतप्रधानांनी म्हणे हा मुहूर्त शोधला आहे. खरं काय? खोटं काय? त्यांनाच ठाऊक. पण भोल्याभाबड्या जनतेला ते खरं वाटलं असल्याची शक्यता आहे.
कोरोनाशी लढायचं कसं?
देवावर भरोसा ठेऊन निश्चितच लढता येणार नाही. देवावरची श्रद्धा भाबड्या मनाला कदाचित ताकद देईल. पण लस (vaccine) शोधू नाही शकणार. जगभरचे शास्त्रज्ञ वायरोलॉजी लॅबमध्ये कामाला लागले आहेत. लस येईल तोवर डॉक्टर, नर्सेस जोखीम पत्करत कोरोनाग्रस्तांवर उपचार करत राहणार आहेत.
11 आणि 14 एप्रिलच का?
11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. एवढंच हे कारण आहे का? तर नाही. संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचं मार्गदर्शक तत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सगळी लढाई दैववादाच्या विरोधात होती. या दैववादाच्या आहरी गेलेल्या भारतात प्लेगची साथ आली तेव्हा 10 लाख लोकांचे बळी गेले होते. एकट्या मुंबई राज्यात लाखावर लोक प्लेग होऊन मेले. 1897 ला महामारीचा कायदा ब्रिटीश सरकारने केला. तोच कायदा आता देशात लागू झाला आहे. संचारबंदीपासून ज्या ज्या अॅक्शनस् केंद्र आणि राज्य सरकारने घेतल्या आहेत, त्या सगळ्या त्या कायद्यानेच.
1897 ला पुण्यात काय घडत होतं?
प्लेग वेगाने पसरला होता. सर्वाधिक फटका पुण्याला बसला होता. कोरोनापेक्षा भयंकर. कोरोनाने अजून लाखाचा आकडा गाठला नाहीय जगात पण केवढा हाहाकार उडालाय. प्लेगने तर 10 लाख बळी घेतले होते देशात. इतकी औषधं, इतकी यंत्रणा नव्हती तेव्हा. पण त्या प्लेगच्या विरोधात नऊवारी साडीतली एक बाई मैदानात उतरली. तिचा मुलगा डॉक्टर होता. पुण्यात मुंडव्यामध्ये त्या महामानवीने कॅम्प उघडला. तिचा डॉक्टर मुलगा आणि त्याची टीम लोकांवर उपचार करत होते. इंजेक्शन देत होते. प्लेगच्या रुग्णांना ती म्हातारी स्वतःच्या खांद्यावर उचलून आणत होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करत होती. एखाद्या निष्णात नर्स सारखं ती स्वतः उपचार करत होती. रुग्णांना वाहता वाहता एक दिवस त्या महामानवीलाच प्लेग झाला. 10 मार्च 1897 ला त्यांनी आपला देह ठेवला. काय नाव तिचं?
सावित्रीबाई फुले.
महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
महात्मा फुले तेव्हा हयात नव्हते. महात्मा फुले यांच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार होता. सावित्रीबाईंनी स्वतः हातात मडकं धरलं होतं. महात्मा फुलेंच्या कामाची, त्यांच्या सत्यशोधक समाजाची सगळी धुरा त्यांनी खांद्यावर घेतली होती. देशातील महिलांना शिकवणारी पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची आपल्याला ओळख आहे. प्लेगच्या साथीत आपल्या डॉक्टर मुलासह प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या आरोग्य सेविका म्हणून आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे?
महात्मा फुलेंना महात्मा गांधी महात्म्यांचे महात्मे म्हणत. सावित्रीबाईंना सावित्रीबाईंच्याच कवितेतला शब्द वापरून महामानवी म्हणायला हवं ते यासाठी.
प्लेगची साथ येऊन गेली तोही काळ नेमका हाच होता. 123 वर्षांपूर्वीचा. आणि 123 वर्षांनंतर कोरोनाचं महासंकट साऱ्या जगावर आहे. प्लेगची साथ सुद्धा तेव्हा चीनमधून आली होती. कोरोनाही आता चीनमधून आला आहे. आजार तिथून आला म्हणून त्या देशाला दोष देण्याचं कारण नाही. अमेरिकेसारखी महासत्ता कोरोनापुढे हतबल झाली आहे. भारताकडे औषध मागते आहे. चीनने कोरोनावर मात केली आहे.
रोग चीनकडून आला म्हणून दोष का द्यायचा?
दिल्लीत एका मणिपुरी मुलीवर एक दिल्लीकर चिनी म्हणून थुंकला. नॉर्थ ईस्टचे लोक तसे दिसतात म्हणून आपण त्यांना चिनी म्हणून हेटाळणार का? त्या मुलीवर थुंकणारा तो दिल्लीकर कुणी मरकजवाला नव्हता.
दिल्लीच्या तबलीग मरकजमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम कोरोनाग्रस्त झाले म्हणून आज मुस्लिमांना दोष दिला जातो आहे. त्यांना ह्युमन बॉम्ब म्हणण्यापर्यंत मीडियातल्या काहींची मजल गेली आहे. अस्पृश्यता आपण घालवली कायद्याने. मुस्लिमांच्याबाबत नवी अस्पृश्यता जन्माला घातली जात आहे. धोका तो आहे. महात्मा फुलेंनी अस्पृश्यतेवर पहिला हल्ला चढवला. आता चिनी माणसांसारखे दिसतात म्हणून आपल्या नॉर्थ ईस्टच्या लोकांवर थुंकलं जातंय आणि मरकजमध्ये बळी पडलेल्यांबद्दल सहानभूती बाळगण्याऐवजी सगळ्याच मुसलमानांना दोष दिला जातोय. त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जातंय. हे भयंकर आहे.
प्लेगच्या साथीने जगभर थैमान घातलं होतं. देश, प्रांत, भाषा, धर्म आणि देव कुठलाच फरक प्लेगने केला नव्हता. आता कोरोनाने सगळयाच देशांच्या सीमा ओलांडल्या आहेत. आणि कोण कोणत्या धर्माचं हे पाहिलेलं नाही. संजय राऊत यांचे शब्द वापरून म्हणायचं तर सगळ्यांचे ईश्वर मैदान सोडून पळाले आहेत. लढाई लढताहेत ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले शास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर आणि कर्मचारी. महात्मा फुलेंनी अशा एकमय समाजाची कल्पना पाहिली होती. त्यांच्या धर्मपत्नीने जात, धर्म आणि लिंग यांचा भेद न करता शिक्षण दिलं आणि आरोग्य सेविका म्हणून सर्वांवर उपचार केले. म्हणून त्या महामानवी आहेत. ही प्रेरणा त्यांना ज्यांनी दिली ते देशाचे पितामह महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या दिवशी ती प्रेरणा घेण्यासाठी आपणही ज्ञानाचा, विचारांचा, चिकित्सेचा, विवेकाचा, प्रेमाचा, बंधुतेचा दिवा लावूया. 14 एप्रिलपर्यंत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत. कारण कोरोनानंतर जे भीषण संकट येणार आहे, जे आर्थिक अरिष्ट येणार आहे, जे सामाजिक संबंध बिघडणार आहेत त्याच्याशी लढण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान कामाला येणार आहे.
- कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
मुद्देसूद लेख!
ReplyDeleteसमाजासाठी उपयुक्त आहे
ReplyDeleteमहत्वाची माहिती आहे.
ReplyDeleteआदरणीय आमदार कपिल पाटील साहेब खूप छान आणि प्रबोधनात्मक लेख आहे .
ReplyDeleteहोय
मी दिवा लावणार 11 ते 14 एप्रिलपर्यंत
मी दिवे लावणारच , साहेब आपले मन:पूर्वक धन्यवाद.
ReplyDeleteजय जोतीराव जय भीम
ReplyDeleteजय जोती जय भीम
ReplyDeleteक्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .क्रांती सूर्याच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांचं वांङ्ममय वाचन करतोय
ReplyDeleteआदरणीय आमदार कपिल पाटील साहेब,
ReplyDeleteखूप महत्त्वाची आणि समाजाला उपयुक्त अशी माहीती आहे.
त्यासाठी आपले मनःपुर्वक धन्यवाद!
11th April 14th April.. Yes ��
ReplyDeleteखुप छान माहिती साहेब.
ReplyDeleteआपले मन:पुर्वक धन्यवाद!
छान माहिती
ReplyDeleteजय जोती ,जय भीम.
ReplyDeleteमि दिवे लावणार
सर मी दिवा लावणारच
ReplyDeleteवस्तुनिष्ठ आणि उद्बोधनपर माहिती. धन्यवाद
ReplyDeleteखूप महत्त्वाची माहिती.
ReplyDeleteहोय मी सुद्धा 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत रोज दिवे लावून आज कोरोना महामारित आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र काम करत आहे देश व सविधन याचे रक्षण करत आहे म्हणुन मी त्यांच्या साठी दिवा लावणार.
ReplyDeleteअसे विचार म्हणजे भारतीय संविधानाचे यश म्हणावे लागेल.संकट जेंव्हा चारी बाजूनी घेरते तेंव्हा अशी विचारसरणी पुढे येणे याला गाढा अभ्यासच लागतो.खरोखरच आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख आहे.ज्या महामानवाचा आपण उल्लेख केलात त्यांच्या विचारांचा दिवा मी कायम मनात पेटता ठेवणार.जय हिंद!
ReplyDeleteहोय मी सुद्धा म.फुले.सावित्रिमाई फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दिवा लावणार आणि तेवत ठेवणार .
ReplyDelete