शरद पवार हे एक विलक्षण रसायन आहे. ते 80 वर्षांचे आहेत हे सांगणं त्यांना आवडणार नाही. महाराष्ट्रालाच काय देशालाही पटणार नाही. कोरोनाशी देश झुंजत असताना शरद पवारही स्वस्त बसलेले नाहीत. वयामुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे प्रत्यक्ष बाहेर पडणं त्यांना शक्य नसलं तरी त्यांचा फोन आणि मोबाईल एकतर सतत खणखणतो आहे किंवा पवार साहेब स्वतः जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात संपर्क साधताहेत. शेती आणि शेतकरी हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट असो की भुकंप या सगळ्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यामध्ये शरद पवारांचं योगदान मोठं आहे. पण कोरोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत जाऊ नये म्हणून त्यांनी केलेले प्रयास थक्क करणारे आहेत.
देशातले सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दारात संकट येऊन ठेपलं आहे. पण देश अचंबित आहे तो दोन माणसांच्या विलक्षण कामामुळे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली स्वतःची गाडी स्वतःच चालवत आहेत आणि राज्याची गाडी संकटातून बाहेर काढत आहेत. देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांना मनापासून दाद दिली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांपासून ते ओमर अब्दुलांपर्यंत. असंच अप्रूप देशातल्या नेत्यांना शरद पवारांबद्दल वाटतं आहे. ओमर अब्दुलांना अप्रूप वाटण्याचं कारण नाही. कारण त्यांचं कॉलेज शिक्षण पवार साहेबांच्या घरात राहूनच झालेलं आहे. आपल्या कॉलेजच्या वयापासून त्यांनी आपल्या काकांना पाहिलेलं आहे. पण महाराष्ट्राबाहेर असे अनेक ज्येष्ठ नेते आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क आहे. ते फोनवरून मुंबईची विचारपूस करत असताना पवार साहेबांबद्दल भरभरुन बोलत होते. जे शरद पवार यांच्याबद्दल थोडं अंतर राखून होते आणि उद्धव ठाकरेंकडे संशयाने पाहत होते त्या सगळ्यांचे संशय मिटलेले आहेत.
पण देशाने परवा दाद दिली ती शरद पवारांना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. त्यात हिम्मतवान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यपालांबद्दल तक्रार केली. तेव्हा त्यांच्या मागे शरद पवार ठामपणे उभे राहिले. पवार साहेबांनी त्यांचं बोट पकडून राजकारणात आल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं. सुनावलं म्हणून देशही थक्क आहे. कारण पवार साहेबांनी अत्यंत संयमी शब्दात पंतप्रधान पदाचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी घेत जी कानउघाडणी केली त्यामुळे सगळे चकीत झाले आहेत. पवार साहेबांनी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर स्वतः आपल्या दारात येऊन टाळ्या वाजवल्या होत्या. पंतप्रधानांच्या प्रत्येक विधायक हाकेला पवार साहेबांनी अत्यंत विधायक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तो अधिकार त्यांना पोचतो.
कोरोनाच्या निमित्ताने ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं जातं आहे ते अधिक धोकादायक आहे. आणि हे राजकारण केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून खेळलं जात आहे. कोरोनापेक्षा भयंकर असं धर्मद्वेषाचं राजकारण खेळलं जात आहे. जगात सगळीकडे माणुसकीचा गजर सुरू असताना भारतात हिंदू-मुसलमान करण्याचा प्रयत्न झाला. तिथे इंग्लंडमध्ये हरे राम हरे कृष्ण पंथीयांच्या एका सभेत 500 जणांना कोरोनाची लागण झाली. पण तेवढ्यावरून इंग्लंडच्या लोकांनी हिंदू धर्मियांना शिव्या दिल्या नाहीत. अपघाताने घडलं असेल असं मानून कोरोनाग्रस्त इस्कॉन पंथीयांवर उपचार सुरू झाले. भारतात मात्र एका घटनेवरून शिकार करण्याचा प्रयत्न झाला.
शरद पवारांनी ज्या दहा सूचना केल्या त्यात एक महत्त्वाची सूचना होती, कोणत्याही समाजाला किंवा शहराला किंवा प्रांताला टार्गेट केलं जाऊ नये.
महाराष्ट्राच्या संदर्भात मा. राज्यपाल महोदय जी लुडबुड करत आहेत त्याबद्दल अत्यंत संयमी भाषेत पण घटनात्मक बाबी लक्षात आणून देत पवार साहेबांनी देशाच्या सर्वोच्च नेत्याला ऐकवलं. दोन सत्ताकेंद्र कशी चालवता येतील? देशाच्या संघीय ढाच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा अधीक्षेप करता येणार नाही. केंद्र सरकारने राज्यपालांच्या माध्यमातून असं वेगळं सत्ताकेंद्र निर्माण करता कामा नये, हे त्यांनी सुनावलं.
शरद पवार दूरदृष्टीचे आहेत. लोकशाहीच्या संदर्भात त्यांना पुढचा धोका दिसतो आहे. राज्यपालांची लुडबूड असेल किंवा केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाच्या गटांमधून जो अपप्रचार सूरु आहे, त्यातून जे पुढे वाढून ठेवलं आहे ते त्यांनी ओळखलं आहे. देशातील सामाजिक व सांप्रदायिक भाईचारा, लोकशाहीचा आणि राज्यसंघाचा ढाचा यांना जो संभाव्य धोका आहे याबद्दल त्यांनी मार्मिक शब्दात पंतप्रधानांना इशारा दिला. शरद पवारांनी फक्त सुनावण्याचं काम केलं असं नाही तर संकटातून बाहेर काढण्यासाठी मोलाच्या दहा सूचना केल्या. पूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जेव्हा ते आर्थिक प्रश्नांवर बोलत तेव्हा सारं जग कान लावून त्यांचं ऐकत असे, असं खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणत असत. आज देशातली स्थिती अशी आहे की, शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा सगळा देश कान देऊन ऐकतो. अपेक्षा आहे की पंतप्रधानही त्यास अपवाद नसावेत.
शरद पवारांच्या 10 मागण्या
1. कोरोना ही जागतिक महामारी दीर्घकालीन लढायची आहे. याचे परिणाम जागतिक आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊन शकतात. त्यादृष्टीने उचित पावले उचलण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत आर्थिक व्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आत्तापासूनच विचार सुरु करावा.
2. कोरोनामुळे शेती, उद्योग, व्यावसाय क्षेत्र अडचणीत आलेले आहेत. शेतांमध्ये रब्बीचे पीक तयार आहे. परंतु फळ, फुलं, भाजीपाला यांची साठवणूक – विक्री याबाबत प्रत्येक बाबतीत अडचणी निर्माण झाल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलावीत.
3. केंद्र सरकारने राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढेल याकडे देखील लक्ष पुरवावे. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग करावा.
4.करोना महामारीनंतर आर्थिक संकटे ओढवल्यानंतर काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून प्रसंगी ते लांबवणीवर टाकता येईल का, याचाही विचार करावा.
5. राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकायला मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र, मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाही. समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मला वाटते.
6.स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा.
7. ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ढ नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे.
8. देशात संपूर्ण लॉक डाऊन असल्यामुळे बऱ्याच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार करावा. आरोग्याशी तडजोड न करता लोकांच्या जीविताशी तडजोड न करात काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पहावे.
9. कोरोनाचे गांभीर्य पाहता लोकांनी सहकार्य केलेले आहे. मागे दिल्लीतील निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता जे झाले ते मागे ठेवून रोग प्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे बरोबर नाही.
10. समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी.
- कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
साहेब,आपल्या लेखणीतून सत्य तरी कळतंय आम्हाला.
ReplyDeleteयोग्य गोष्ट योग्य वेळी करण्यात शरद पवार साहेबांचा हात कोणीच धरू शकणार नाही.त्यांनी सुचविलेल्या सर्व सूचनांचा केंद्र सरकारने विचार केलाच पाहिजे.
ReplyDeleteएकाच घटनेचा रेफेरेन्स घेऊन समाजाला टार्गेट करू नका म्हणणारे ही गोष्ट गांधीहत्या व सावरकरांबाबत सोयीस्कर विसरतात
ReplyDeleteबरोब्बर
Deleteदिलेल्या सुचना योग्य आहेत त्या वर केंद्रीय सत्ता अवश्य विचार करेल व महाराष्ट्र राज्यात सामाजिक बांधिलकी रुजल्यशीवय राहणार नाही असा विश्वास दिसुन येतो
ReplyDeleteशरद पवार साहेब कधीही अनावश्यक व निरर्थक सूचना करत नाहीत. महाराष्ट्राची नस अन् नस माहीत असलेले व कोणत्याही समस्येवर लगेचच उपाययोजना सुचवणारे ते जाणते राजेच आहेत. त्यांच्या सूचनांचा मान.पंतप्रधानांनी विचार केल्यास त्याचा हमखास सकारात्मक परिणाम होईल.
ReplyDeleteडाॅ. मारूती नलावडे
,आपलं विवेचन वस्तुनिष्ठ आहे.परवा सोमय्या नावाचे गृहस्थ बिनपुराव्याचं बोलले.वाधवान प्रकरणात पवार साहेबांचं नाव त्यांनी घेतलं.संभाजी भिडेच्या भक्ताला मारहाण झाली म्हणून टाळेबंदी असताना भेटायला निघाले.त्यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते फडणवीस पहिल्यांदा घराबाहेर पडले.लोकांना हा तमाशा अजिबात आवडलेला नाही.त्याविषयी आपण जरूर लिहावे.
ReplyDeleteडॉ.जगदीश कदम, नांदेड