वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या जिवंतपणी त्यांचा पुतळा उभारला गेला. मायावतींनी कांशीराम पार्कमध्ये स्वतःचाही पुतळा उभारला. नाईकांचं तसं झालं नव्हतं. वसंतराव नाईक महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रवर्तक मानले जातात. पण म्हणून त्यांचा पुतळा उभारला गेला नाही. नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्तांना ओळख मिळाली. प्रतिष्ठा मिळाली. नाईक साहेब जणू त्यांच्या अस्मितेचे प्रतिक बनले होते. पुतळा म्हणून उभारला गेला.
असंच काहीसं शरद पवार यांच्याबाबत घडलं आहे. शरद पवारांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांच्या आयुष्याची 8 दशकं आज पूर्ण झाली आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून सत्तेवर आलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी' सरकारने त्यांच्या नावाने 'ग्राम समृद्धी योजना' सुरु केली आहे. पवारांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादीने 80 हजार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्पही केला आहे. त्यांच्या पक्षाने तसा कार्यक्रम करणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्र सरकारची ग्राम समृद्धी योजना ही अधिक औचित्यपूर्ण आणि पवार साहेबांचा सार्थ गौरव करणारी आहे. वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे पवारांचाही त्यांच्या हयातीत असा सन्मान होतो आहे, ही मोठी गोष्ट आहे.
लोकशाहीत राज्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे करावेत की नाही? पूर्वीच्या राजे रजवाड्यांप्रमाणे आपल्याच वाढदिवसाला योजना जाहीर कराव्यात की नाही? याची चर्चा होऊ शकेल. पण शरद पवार यांच्या नावाने महाराष्ट्राचं सरकार राज्यातल्या खेड्यापांड्याना समृद्ध करण्याची योजना आणत असेल तर त्याला नावं ठेवण्याची गरज नाही. पवारांचे अनुयायी कल्पक आणि प्रगल्भही आहेत. त्यामुळे जिवंतपणी पुतळा उभा करण्यापेक्षा शरद पवारांना ज्यात आनंद वाटेल अशी योजना त्यांनी सुरु केली असावी.
शरद पवार एक जितीजागती दंतकथा बनले आहेत. मान्यच करावं लागेल ते. कॅन्सरवर मात करून कैक वर्ष उलटली आहेत. पाय जायबंदी होऊनही हा माणूस हातात काठी न घेता चालतो. वयाची, आजारपणाची पर्वा करत नाही. वादळ येवो, अतिवृष्टी होवो, पूर येवो, भूकंप येवो शरद पवार वादळी वाऱ्यासारखे फिरतात. निवडणुकीत साताऱ्याला भर पावसात झालेली त्यांची सभा गाजली. त्याचं कौतुकही झालं. 'वारा खात, गारा खात, बाभूळ झाड उभंच आहे.' पण कौतुक त्याचं नाही. लातूरला भूकंप झाला, कलेक्टर पोचण्याच्या आत मुख्यमंत्री असलेले शरद पवार किल्लारीला जाऊन पहाटे पोचले होते. कोसळलेली घरे त्यांनी वर्षभरात उभी केली. गावं वसवली. दुःख आणि वेदनांवर मात करत लोकांना उभं केलं. बॉम्ब स्फोटात मुंबई हादरली होती. पवारांनी 24 तासांच्या आत मुंबईचं स्टॉक एक्सचेंज पुन्हा चालू केलं. दंगलीच्या काळात पवार साहेब दिल्लीत स्वस्थ बसू शकले नाहीत. ते मुंबईत धावून आले. मराठवाड्यात नामांतराच्या प्रश्नावरून दंगल पेटली. पोलादी हातांनी त्यांनी दंगल शमवली. आपली सत्ता गमावून. पण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही करून दाखवलं. दोन्ही समाजांची मनं जुळवण्यासाठी पुन्हा शरद पवारच उभे राहिले.
80 व्या वर्षी त्यांना कुणी सांगितलंय फिरायला? पण ते ऐकायला तयार नसतात. कोकणात वादळ आलं, शरद पवार धावून गेले. अतिवृष्टीत खेड्यापाड्यातली पिकं झोपून गेली, शरद पवार बांधांवर पोचले. सत्तेवर असोत, नसोत पवार ठिकाणावर गेले नाहीत असं झालेलं नाही. ते विरोधी पक्ष नेते असताना मी पाहिलंय. उरणच्या शेतकऱ्यांवर सरकारचा गोळीबार सुरु असताना धावून जाणारे शरद पवारच होते. शरद पवार हा माणसांचा माणूस आहे. फक्त नेता नाही. नेते खूप असतात. पण माणसात माणूस म्हणून राहणारे, माणूस माणूस समजून घेणारे शरद पवार एकच असतात. जात, पात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून माणुसकीच्या बांधावर ते उभे असतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना त्यांचा वाटा देणारे शरद पवार, मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवार, मुस्लिम ओबीसींना सवलती देणारे शरद पवार, भटक्या विमुक्तांच्या पाठीशी उभे राहणारे शरद पवार, शेल्टी हत्याकांडानंतर आदिवासींच्या पाड्यावर जाणारे शरद पवार, आदिवासी हितांच्या बाबत यत्किंचितही तडजोड न करणारे शरद पवार. असे शरद पवार आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना केवळ ग्रेट मराठा लीडर का म्हटलं जातं कळत नाही. शरद पवारांच्या विकासाच्या मॉडेलबाबत अनेकदा टीका झाली आहे. राजकारणातील त्यांच्या घटापटाच्या डावांबद्दलही लिहलं गेलं आहे. त्यांनी दिलेले शह, काट शह देशभरात चर्चेत राहिले आहेत. पत्रकारितेत असताना मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर अनेकदा कठोर टीका केली आहे. पण हे कबुल केलं पाहिजे की, या सगळ्यातून उरतात ते शरद पवार ज्यांच्यात एक कमालीचा माणूस प्रेमी राजकीय नेता फक्त दिसतो. विचाराने ते पक्के सत्यशोधक आहेत. इहवादी आहेत. कर्मकांडांपासून कोसो दूर राहतात. राजकारणातल्या माणसाला या गोष्टी सहज जमणं शक्य नसतं. हमीद दलवाईंना त्यांच्या उपचारासाठी आपल्या घरात ठेवणारे शरद पवार, फारुख अब्दुलांच्या मुलाचं उमरचं आपल्या घरात मुलासारखं संगोपन करणारे शरद पवार, पहिल्याच मुलीनंतर विचारपूर्वक कुटुंब नियोजन करणारे शरद पवार, मोतीराज राठोड, लक्ष्मण माने यांना प्रतिष्ठा देणारे शरद पवार, दलित, मुस्लिम, ओबीसी प्रश्नांकडे आणि नेतृत्वाकडे समन्यायाने पाहणारे शरद पवार, प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी राजगृहावर जाणारे शरद पवार, मृणाल गोरेंच्या आजारपणात त्यांची विचारपूस करायला जाणारे शरद पवार, दिल्लीत हरवलेल्या महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी रात्रभर जागणारे शरद पवार, किती गोष्टी सांगता येतील.
विरोधी पक्षांशी सन्मानाने वागणं. त्यांचं काम प्राधान्याने करणं. ही महाराष्ट्राची एक खासियत आहे. संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांची ती देणगी आहे. बॅ. ए. आर. अंतुलेंपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती परंपरा पाळली आहे. अगदी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अपवाद नाहीत. पण या परंपरेचं मूर्तिमंत प्रतिक म्हणून जर कुणाला पाहायचं असेल तर ते शरद पवारांनाच पाहावं लागेल. शरद पवारांच्या भांडवली विकासाचं मॉडेल कदाचित मान्य होणार नाही. पण ग्राम विकासाला आणि सहकाराला काळाप्रमाणे बदलण्याची ताकद फक्त शरद पवारांकडेच होती आणि आहे. कोकणात फुललेल्या फळबागा आणि सोलापूरच्या पर्जन्य छायेखालील प्रदेशात फुललेल्या सीताफळाच्या बागा ही शरद पवारांचीच देणगी आहे. म्हणून असेल कदाचित शरद पवारांच्या नावाने ग्राम समृद्धीची योजना सरकारने ठरवली असेल.
80 वर्षांचं आयुष्य आणि 60 वर्षांचं राजकारण. भाजप, काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी हा तसा लहान पक्ष. तुलनाच करायची तर सेनेपेक्षाही कमी आमदार. एका राज्याची त्याला मर्यादा आहे. पण शरद पवारांना ती नाही. श्रीनगरपासून चैन्नईपर्यंत आणि अहमदाबादपासून कलकत्यापर्यंत शरद पवारांचा राजकीय दबदबा मोठा आहे. 6 दशकांच्या राजकारणात तो अबाधीत राहिलेला आहे. देशातल्या उद्योगपतींना आणि खेड्यातल्या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोघांनाही शरद पवार आपला माणूस वाटतात. ही पवारांची खासियत आहे.
युपीएचं चेअरमन पद मिळण्याची चर्चा आज काल वर्तमानपत्रात आहे. त्यात तथ्य किती ते माहित नाही. पण शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील असं महाराष्ट्रातील अनेकांचं स्वप्न आहे. ते आधीच व्हायला हवे होते. ती संधीही होती. शरद पवार जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी देशातल्या तमाम डाव्या, पुरोगामी आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती. त्या सगळ्या पक्षांचे तेच नेते होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. ते परतले नसते तर देवेगौडा आणि गुजराल यांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. पवारांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा यशवंतराव चव्हाणांपासून ते महाराष्ट्रातल्या त्यांना मानणाऱ्या नेत्यांच्या दडपणाचा तो भाग होता. महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी चळवळ आणि ग्रामीण नेतृत्व या प्रत्येकाचं प्रेशर होतं शरद पवारांवर. त्यामुळे शरद पवारांनी स्वतंत्रपणे पुढे जाण्याऐवजी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आणि तीच मोठी चूक ठरली. अन्यथा ते देशाचे अनेक वर्ष नेतृत्व करताना दिसले असते. शरद पवार अगदी तरुणपणात मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसमुळे नव्हे, तर एस. एम. जोशींमुळे. जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे. जनता पक्षातल्या संघीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र जाऊ नये म्हणून एस. एम. जोशींनी शरद पवारांना सोबत घेतलं आणि नेतृत्व दिलं. शरद पवारांना तेव्हा समाजवादाचं आकर्षण होतं. राष्ट्र सेवा दलामुळे असेल. एस. एम. जोशींना त्यामुळे पवारांबद्दल कायम ममत्व वाटलं. शरद पवारांनीही आयुष्यभर एस. एम. जोशींबद्दल कृतज्ञता बाळगली. तीच वाट त्यांना पुढे पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. पण तसं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांचा पुन्हा तो प्रवास सुरु झाला आहे.
पण पवारांवर मोठाच अन्याय झाला. केवळ पंतप्रधान पदाच्या स्वप्नापुरतं हे मी म्हणत नाही. शरद पवारांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला, असं खेदाने म्हणावसं वाटतं. कारणं काहीही असोत. शरद पवारांवर झालेला हा अन्याय त्याला महाराष्ट्राचं राजकारण जितकं कारण आहे, महाराष्ट्रातील माध्यमं आणि बुद्धिजीवी वर्ग जितका कारण आहे, तितकंच कारण शरद पवार स्वतःही आहेत. शरद पवारांमधल्या राजकारण्याने ज्यांना महाराष्ट्र पुरुष म्हणता येईल अशा एकमेव शरद पवार नावाच्या नेत्यावर अन्याय केला आहे.
शरद पवारांचं मला भावतं ते त्यांच्यातलं माणूसपण. त्यांच्यातला सत्यशोधक. आणि सामाजिक न्यायाच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा. शरद पवारांकडे हे सारं आलं कुठून? एकच उत्तर आहे, शारदाबाई गोविंदराव पवार. त्यांच्या आई.
देशाच्या इतिहासात महामानवांची चर्चा खूप होते. पराक्रमी पुरुषांच्या गाथा खूप लिहल्या जातात. शिल्पकार सारे देशाचे असोत किंवा राज्याचे असोत किंवा विशिष्ट्य समाजाचे शिल्पकार फक्त पुरुषच ठरवले जातात. पण देशातल्या महामानवींचा इतिहास जिथे लिहला जात नाही, तिथे राज्याराज्यातल्या कर्तबगार स्त्रियांचं चरित्र कोण लिहणार? 'मेकर्स ऑफ इंडिया' या पुस्तकात डॉ. रामचंद्र गुहा यांनी महाराष्ट्रातील ताराबाई शिंदेंचा समावेश केला आहे. अजून काही स्त्रियांचा खरं तर त्यांनी समावेश करायला हवा होता. जगभरच्या स्त्रीयांच्या हक्काचे कायदे बदलायला भाग पाडणाऱ्या डॉ. रखमाबाईंचा उल्लेखही रामचंद्र गुहांनी केलेला नाही. तिथे महाराष्ट्र घडवणाऱ्या स्त्रियांची चर्चा होताना कशी दिसेल? जिजामाता आणि सावित्रीबाई फुले किंवा अहिल्याबाई यांचं आपण नाव घेतो. पण त्या झाल्या महामानवी. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्यात अनेक लखलखत्या स्त्रियांची चरित्र लिहली गेली पाहिजेत. ती सांगितली जात नाहीत. संख्येने भल्या त्या मोजक्या असतील. पण महाराष्ट्र घडवणाऱ्या त्या स्त्रियांच्या यादीत सत्यशोधक शारदाबाई गोविंदराव पवार यांचं नाव आवर्जून सांगावं लागेल. महाराष्ट्र घडवण्याऱ्यांमध्ये शारदाबाईंचाही एक वाटा होता. तसा महाराष्ट्राला शरद पवारांसारखा नेता शारदाबाईंमुळेच मिळाला. केवळ जन्माने नाही. शारदाबाईंनी त्यांना घडवलं. पवार साहेबांचा आज गौरव करताना शारदाबाईंना विसरून चालणार नाही.
- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)