Friday, 11 June 2021

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ



'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं का म्हणाले होते? राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेशी त्याचा काय संबंध? ४ जून १९४१ या पुस्तकाचा भाग दुसरा - 
......................... 

भाग २

राष्ट्र सेवा दलाची स्थापनाच मुळात झाली होती ती संघाच्या सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात.

हिंदुराष्ट्रवादाचा विरोध कशासाठी? सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवाद म्हणजे काय?

ब्रिटीशांच्या विरोधात लाठ्या, काठ्या खाणारे, तुरुंगात जाणारे, छातीवर गोळ्या झेलणारे, फासावर हसत हसत लटकणारे हे सारे इन्कलाबी देशभक्त हिंदुराष्ट्रवादाच्या मात्र विरोधात होते. कशासाठी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना या सेनेच्या मुखपत्रातच फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली होती. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची ती मुलाखत त्या दोघांच्या शैलीप्रमाणे दणदणीत झाली होती. गाजली होती. भाजप बरोबरची हिंदुत्ववादी साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. चार महिनेही झाले नव्हते त्याला. भाजपने शिवसेनेने हिंदुत्व सोडण्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं, 'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.'

जळकं हिंदुराष्ट्र. हा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी मानल्या गेलेल्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याचा आहे. अर्थातच नेमक्या शब्दात त्यांनी हिंदुराष्ट्रवादाची ओळख करून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय त्यात?

उद्धव ठाकरे त्या मुलाखतीत म्हणतात, 'धर्माचा उपयोग करून, होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही. अजिबात नाही. हिंदुराष्ट्र पाहिजे असं हे रोज म्हणतात, पण हे असं जळणारं, अशांत हिंदुराष्ट्र मला अपेक्षित नाही. हे हिंदुराष्ट्र मी नाही मानणार.'

कैक वर्षांपूर्वीच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचं व्यंगचित्रं प्रकाशित झालं होतं. हिंदुत्व आणि भगव्याचा मुद्दा तेव्हाही होता. बाळासाहेबांनी चित्रात दाखवलं होतं. भगव्याच्या दुपाखी घट्ट हातांमध्ये तिरंगा डौलाने फडकतो आहे. संघाचं आणि सेनेचं हिंदुत्व यातला फरक यापेक्षा वेगळा सांगण्याची गरज नाही.

व्यक्तीला धर्म असू शकतो. राष्ट्राला नाही. दिल्लीच्या निवडणूकीत हिंदुत्वाचा तो भयंकर प्रयोग आपण पाहिला. या जळक्या हिंदुराष्ट्राचा दुसरा भयंकर खेळ पश्चिम बंगालमध्येही पाहिला. नुसतं हिंदु - मुसलमान नाही. केवळ देशभक्ती आणि राष्ट्रद्रोहाचा खेळ नाही. त्याहून भयंकर. अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा जी गरळ ओकत आहेत, त्यातून राम गोपाळ आणि कपिल गुजर जन्माला येत आहेत. शुभेन्दु अधिकारी फुत्कारात आहेत. ते नथुराम नाहीत. नथुरामी पाातळयंत्रातील प्यादी आहेत.

नथुरामी द्वेषाच्या आणि भेदभावाच्या राजकारणाला टागोर आणि नेताजींच्या बंगालने चोख उत्तर दिलंय. पण सत्ता मिळवण्यासाठी धर्माची होळी निवडणुकीच्या राजकारणात पेटवण्याचा खेळ बंद झालेला नाही. 'आपण ब्राह्मण आहोत आणि कालीमातेचे उपासक आहोत.' असं उत्तर जय श्रीरामच्या नाऱ्यांना ममता बनर्जी देतात. 'आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व मला मान्य नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही.' असं उद्धव ठाकरे उत्तर देतात. दोघेही हिंदु धर्माच्या उदार सिंधू तिरावर उभे आहेत, हिंदुराष्ट्रवादाचा मुकाबला करत. झेलमच्या तिरावर सिंकदराशी दोन हात करायला पोरस उभा होता तसे.

हिंदू धर्म आणि राजकीय हिंदुत्व यात फरक आहे. जसा इस्लाम आणि इस्लामी राष्ट्रवादात फरक आहे. नमाजही पढता न येणारे निरीश्वरवादी महमद अली जिना पाकिस्तानचे निर्माते झाले. इस्लामी राष्ट्रवादाचे जनक. जसे निरीश्वरवादी सावरकर हिंदुराष्ट्रवादाचे जनक असतात. खुद्द पवित्र मक्केत जन्म ज्यांचा झाला होता ते मौलाना अबुल कलाम आझाद जामा मशीदीच्या पायरीवरून इस्लामी राष्ट्रवादाचा आणि जिनांच्या पाकिस्तानचा मुकाबला करतात. 'ही जमिन आपली आहे. आपली मुळं याच जमिनीत आहेत. इस्लाम आणि भारतीय संस्कृतीचा वारसा मुसलमानांच्याही धमन्या धमन्यातून वाहतो आहे.' असं मौलाना आझाद सांगत होते. इस्लामी राष्ट्रवादाला विरोध करत खुदाई खिदमतगार सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान स्वातंत्र्यानंतरही पाकिस्तानच्या तुरुंगात वीस वर्ष काढतात. 'आम्हाला लांडग्यांच्या हाती का दिलं?' असा टाहो खुदाई खिदमतगार फोडत होते, तेव्हा हिंदुराष्ट्राच्या लांडग्यांनी  हिंदु धर्माच्या सर्वोच्च वैष्णवाचे, महात्मा गांधींचे गोळ्या झाडून प्राण घेतले.  

हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात उभे आहेत. ही त्यांची भूमिका केवळ  सत्तेसाठी असू शकेल काय? नजीकच्या भविष्यात त्याची उत्तरं मिळतील कदाचित. पण महाराष्ट्रातल्या डाव्यांनी आणि पुरोगाम्यांनीही शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात नेहमीच फरक केला आहे. तसा फरक केला पाहिजे, असं हुसेन दलवाई सांगत असतात. हा फरक सेनेच्या पूर्व इतिहासात शोधता येईल. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेेंचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील. केशव सिताराम ठाकरे, हिंदुराष्ट्रवाद्यांचा किंवा हिंदुधर्मवाद्यांचा किती तरी जहाल शब्दात समाचार घेतात. प्रबोधनकार ठाकरे हिंदुराष्ट्रवाद्यांच्या हिंदुत्वाचा समाचार ज्या शब्दात घेतात ते शब्द या काळात विद्रोही कार्यकर्ते सुद्धा बोलू शकणार नाहीत.

'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या आपल्या पुस्तकात ठाकरे म्हणतात, 
'काळाच्या कुचाळ्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज 'समाज' या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गाैंडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एक बिन बुडाचें पिचके गाडगें या पेक्षा त्यात विशेष असे काहींच नाहीं.

आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे.'

ठाकरेंंचं हिंदुत्व आणि सावरकरी, गोळवळकरी हिंदुराष्ट्रवाद यात महाराष्ट्रातले पुरोगामी फरक करतात, याचं कारण प्रबोधनकारांच्या भूमिकेत दडलेलं आहे. 'भिक्षुकशाहीचं बंड' या आपल्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे या हिंदुराष्ट्राचा समाचार पुढील शब्दात घेतात - 'बौद्धिक गुलामगिरीनें माणसांसारख्या माणसांना पशूंपेक्षाहि पशू बनविण्याचा व्यापार बिनधोक चालविणाऱ्या भिक्षुकशाहीच्या सामाजिक व धार्मिक अवडंबराचें जोंपर्यंत आमूलाग्र उच्चाटन होणार नाहीं, तोंपर्यंत या हिन्दु राष्ट्रांत स्वातंत्र्याचें बीज कधींच जीव धरणार नाहीं. हिन्दु राष्ट्रातल्या अनेक आत्मघातकी पातकांत (१) अस्पृश्यांवरील सामाजिक व धार्मिक जुलूम आणि (२) स्त्रीवर्गाची गुलामगिरी ही दोन महापातकें प्रमुख होती. राष्ट्राच्या पूर्ण अधःपाताचें मर्म शोधकाला येथेंच सांपडतें. या मर्माचें उच्चाटन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात बराच विचारविनियम व आचारक्रान्ति होत आली. परंतु प्रगतीचें पाऊल मात्र जेथल्या तेथेंच. विशेष आश्चर्याची गोष्ट ही कीं स्वयंनिर्णयाच्या जोरावर लोकशाही स्वराज्याला आम्ही सर्वथैव पात्र आहोंत असे जोराजोरानें ओरडून सांगणाऱ्या हिन्दु राष्ट्रांत लोकशाहीच्या व स्वयंनिर्णयाच्या मूळ तत्वालाच कुपथ्य करणारीं ही दोन राष्ट्रीय महापातकें पूर्वीप्रमाणे होती. तशींच सीलबंद राहिलेली आहेत; व ती तशींच ठेवण्याचे गुप्त प्रयत्न भिक्षुकशाही करीत आहे.'

प्रबोधनकार ठाकरे विचाराने सत्यशोधक, महात्मा फुलेंचे अनुयायी. छत्रपती शाहू महाराजांचे घनिष्ठ मित्र. एक घाव दोन तुकडे, ही ठाकरी परंपरा प्रबोधनकारांची आहे. आणि कधी कधी त्यातून खुद्द छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकारांना प्रिय असलेले महात्मा गांधीही सुटत नसत. न पटलेल्या गोष्टी ते थेट समोर सांगत. बाजू घेतानाही लिहण्यास आडकाठी घेत नसत. पण महाराष्ट्रात हिंदू - मुस्लिम द्वैत उभं करण्याचा अपराध थेट लोकमान्य टिळकांच्या पदरात टाकण्याचं धारिष्ट प्रबोधनकार ठाकरेंकडेच होतं. महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि मोहरमचे ताजीये यातून हिंदु - मुस्लिम तणावाचा जन्म झाल्याची चिकित्सा पुढे प्रा. नलिनी पंडित आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पण ज्या भाषेत प्रबोधनकार समाचार घेतात, तशी शब्दयोजना नलिनी पंडित किंवा डॉ. मुणगेकर करू धजले नाहीत.

प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'जात्याच अत्यंत महत्वाकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृतिसाम्याचें भान राहिलें नाहीं, आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारींच्या हातवाऱ्यानें त्यांनी हिंदु मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या. मेळ्यांतून व शिवाजीउत्सवांतून मुसलमानांची यथास्थित निर्भत्सना होऊ लागतांच, महाराष्ट्रांतले बरेचसे उनाड कवि व नाटककार एकामागून एक भराभर उदयास येऊं लागले, आणि त्यांच्या इस्लामद्रोही कवितांचा व 'ऐतिहासिक' (?) गद्यपद्य नाटकांचा केसरीकडून जाहीर सन्मान होऊं लागला, महाराष्ट्रांत असा एक काळ होता कीं. मुसलमानांची निर्भत्सना केल्याशिवाय आम्हा हिंदूंचा एकहि 'राष्ट्रीय' उत्सव यथासांग पार पडत नसे.'

पुढे ते म्हणतात, 'त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदूंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेंतूनच काढलें जात असें. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याचीं कडुजहर फळें महाराष्ट्राला अजून भोगावयाची आहेत. महाराष्ट्रातले मुसलमान न हिंदुर्नयवनः असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यांत व हिंदूंत कसलाहि भेद नाही. त्यांची राहणी, आचारविचार, उदरंभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वीं हिंदुप्रमाणेंच एकजिनशी आहेंत.

महाराष्ट्रांतले मुसलमानभाई हिंदूंशी एकजीव असतां, टिळकांच्या गणपति-मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनीं त्यांची मनें हकनाहक दुखविलीं गेली आणि नाइलाज म्हणून ते फटकून वागूं लागले, तर त्यांत दोष कोणाचा?'

छत्रपती शिवरायांची जयंती महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सुरु केली. टिळकांनी त्याचा उत्सव केला. गणपती उत्सवही त्यांचाच. पण पुढे त्या उत्सवाचं विद्रुपीकरण झालं. प्रबोधनकार म्हणतात तसं ती कडुजहर फळे आपण अजूनही भोगतो आहोत. महाविकास आघाडीचा आजचा प्रयोग ते जहर कमी करतो की नाही, हे पुढे कळेलच.

प्रबोधनकार ठाकरे एका पक्षाची बाजू घेत नाहीत. हिंदु - मुस्लिमांचा अंधविश्वास आणि कडवटपणा दोघांनाही ते त्यांच्या धारदार लेखणीने समानतेने तासून काढतात. हिंदु मुस्लिम ऐक्याचा पुरस्कारही करतात. प्रबोधनकार त्यांच्या 'संस्कृतीचा संग्राम' या पुस्तकात म्हणतात, 'हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय उद्धारांत हिंदूंना मुसलामानांच्याहि एकीची आवश्यकता आहे, ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षांत घेतल्याचें दिसत नाहीं. हिंदुस्थानच्या सुदैवानें सत्याग्रही महात्मा गांधींचा उदय होऊन, त्यांच्या तपःसामर्थ्याचा दिव्य तेजानें सर्वत्र अननुभूत प्रबोधनाची दांडगी खळबळ उडाली आणि दुटप्पी टिळक संप्रदायाचा अस्त झाला.'

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सर सय्यद अहमद यांना आधुनिक भारताचा एक शिल्पकार ठरवलं आहे. सर सय्यद अहमद यांनी हिंदु आणि मुस्लिम धर्मीयांसाठी कौम हा शब्द वापरला आहे. कौम याचा अर्थ नेशन किंवा राष्ट्र करण्याचा घोटाळा अनेकांनी केला आहे. पण सर सय्यद अहमद यांनी ठासून सांगितलं आहे की, 'हिंदू आणि मुसलमान हे भारतमातेचे दोन डोळे आहेत.' प्रबोधनकार ठाकरे जवळपास तशीच मांडणी करतात. ते म्हणतात, 'हिंदु आणि मुसलमान हे हिंदुस्थानरुपी विराटपुरुषाचे उजवे डावे हात आहेत. हे दोन अवयव बाह्यतः जरी भिन्न दिसत असले, तरी त्यांच्या दैवाचें बरेवाईट सांधे एकाच धडाला चिकटलेले आहेत. हें हिंदूप्रमाणे मुसलमानांनीहि लक्षात घ्यावे.'

प्रबोधनकार ठाकरे तिथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, 'धर्म वेगळे असले तरी संस्कृती एक आहे. दोघांच्याही अनेक परंपरा आणि आचार सारखेच आहेत.'

'संस्कृतीच्या संग्रामात'च ठाकरे म्हणतात, 'अस्सल मुसलमानी संस्कृतीचा कोरडा दिमाख मिरविणाऱ्यांना इतिहास असे हटकून सांगत आहे कीं दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या १२ बादशहांपैकी ६ बादशहा हिंदू मातांच्या उदरीं जन्मलेले होते, आणि या हिंदु राजमाता आपल्या हिंदुधर्माचे आचार खास व्यवस्थेनें प्रत्यक्ष दिल्लीच्या राजवाड्यांत आमरणान्त आचरीत होत्या.

हिंदु मुसलमानांचे राजकीय व सामाजिक ऐक्य झालेंच पाहिजे या ऐक्याशिवाय स्वदेशांत दोघांचाहि तरणेपाय नाही. दोघेहि इंग्रजी सत्तेचे गुलाम आहेत.'


साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या जीवनगाथेवरून आचार्य अत्रे यांनी 'श्यामची आई' नावाचा चित्रपट निर्मित केला. या चित्रपटात खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी पुराणिकबोवांची भूमिका केली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं साने गुरुजींवर निस्मिम प्रेम होतं. जाती, धर्माच्या पलीकडे जाणारा एक भारत उभा करण्याचं स्वप्न ते दोघंही पाहत होते. साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची विचार प्रेरणा आहेत. हिंदु - मुस्लिम ऐक्य हा साने गुरुजींच्या आणि सेवा दलाच्या जीवननिष्ठेचा भाग आहे.

साने गुरुजी त्यांच्या 'प्रिय सुधाला लिहिलेल्या सुंदर पत्रांमध्ये म्हणतात', 
'तुमचे सेवादल किती अडचणींतून वाढले! केवढी त्याची ध्येयनिष्ठा! सर्व धर्म नि संस्कृतींबद्दल त्याला वाटणारा आदर. आपणास हे राष्ट्र जात - धर्मनिरपेक्ष असे बनवायचे आहे. कोणी क्षुद्र लोक, 'निधर्मी राष्ट्र करणे हे का ध्येय? ही का या राष्ट्राची परंपरा?' असे म्हणत असतात. त्यांना ना कळतो धर्म, ना राष्ट्राची परंपरा. निधर्मी राष्ट्र म्हणजे राष्ट्रात धर्म नसणे. परंतु असा का जात - धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र असावे, याचा अर्थ? कोणत्या एका  विशिष्ट जातीचे, विशिष्ट धर्माचे हे राष्ट्र नाही; ते सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्वांचेच हितकल्याण पाहील, विशिष्ट जात-धर्माचे नाही पाहणार - हा याचा अर्थ, पाकिस्तान फक्त  मुसलमानांचेच हित पाहील, परंतु भारत सर्वांचे  हित पाहील. भारताने आपली पातळी  पाकिस्तानच्याइतकीच नये ठेवू. ते क्षुद्र बनले तर आपण नये बनू. पाकिस्तानी पावलांवर पावले टाकून का तुम्ही जाणार? तुमचे गुरू का जीना, लियाकत अली? ते प्राचीन ऋषी-मुनी, ते 'अवघाचि संसार सुखाचा करीन' म्हणणारे संत - ते ना तुमचे आदर्श? जात-धर्मनिरपेक्ष याचा अर्थ - सर्व जाती-धर्म यांना येथे संरक्षण आहे. समता आहे; धार्मिक समता आहे. हाच खरा धर्म, मानवधर्म. भारताने सर्वांना जवळ घेतले. आपण होऊन कोणी जात असले तर जावोत, परंतु आम्ही माणूसघाणे नाहीत. आमच्या राष्ट्राच्या उद्यानात सर्व धर्मांची, संस्कृतींची फुले फुलोत; ही आमची परंपरा. 'या रे या रे अवघे जण' अशी आमची हाक.

सुधा, राष्ट्र सेवादल यासाठी मला प्राणाहून प्रिय वाटते.'

(सेवादलाच्या दिग्गजांसमवेत त्यांचे वैचारिक सहोदर प्रबोधनकार ठाकरे)

साने गुरुजींना सेवा दल प्राणप्रिय होते. सेवा दल सैनिकांनाही साने गुरुजी. सेवा दलाच्या तारका मंडळात अनेक स्वयं प्रकाशित तारे होते. पण सेवा दलाच्या प्रारंभिक उभारणीत अनेक वैचारिक सहोदरांचंही समर्थन मिळालं. प्रबोधनकार ठाकरे हे त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना मी प्रबोधनकारांचा उल्लेख केला होता. आणि विधान परिषदेत भाषण करताना उद्धव ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा देताना कृतज्ञता व्यक्त केली होती. ती कृतज्ञता प्रबोधनकारांच्या विचारविश्वाशी तर जरूर आहे. पण त्याही पेक्षा प्रबोधनकारांनी गांधीजींचे एकदा नाही दोनदा प्राण वाचवले म्हणून आहे. ती हकीगत खुद्द प्रबोधनकारांनी आणि श्रीकांत ठाकरे यांनी सांगून ठेवलेली आहे.

नथुराम आणि पुण्यातल्या मंडळींचा एक कट प्रबोधनकारांनीच उधळून लावला होता. नथुराम त्याच्या सुरवातीच्या काळात 'अग्रणी' नावाचं एक पत्र चालवत होता. त्याने प्रबोधनकार ठाकरेंकडे लेख मागितला. प्रबोधनकारांच्या लेखात गांधीजींचा उल्लेख महात्माजी असा होता. नथुराम त्यांना म्हणाला, 'गांधींना महात्माजी का म्हणता? तेवढा उल्लेख काढून लेख द्या.' त्यावर संतापलेल्या प्रबोधनकारांनी नथुरामाला हाकलून दिलं.


पुढे अकोल्यात हिंदुराष्ट्रवाद्यांनी महात्माजींच्या सभेवर प्रणघातक हल्ला चढवण्याचं षढयंत्र रचलं होतं. तेव्हा तो डाव उधळवून लावला होता, प्रबोधनकार ठाकरे यांनीच. प्रबोधनकारांनी स्वतः संरक्षण देत गांधीजींना वेगळ्या रस्त्याने नेलं. आणि गांधीजींचे प्राण वाचवले. पुढे आणखी एक हकीगत अशी आहे की, साताऱ्याच्या रस्त्यावरून गांधीजींचा दौरा जात असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांची भेट हवी होती. पण साताऱ्यातल्या काही काँग्रेसींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात गांधीजींचे कान फुंकण्याचा प्रयत्न केला. पण प्रबोधनकार ठाकरे यांनी निरोप देताच, गांधीजी साताऱ्यात आवर्जून थांबले. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना हृदयापासून भेटते झाले. राष्ट्र सेवा दलाच्या सातारच्या पहिल्या मेळाव्याला कर्मवीर भाऊराव पाटलांचं भाषण स्फूर्तीदायक झाल्याचं पहिले दलप्रमुख एस. एम. जोशी यांनी लिहून ठेवलं आहे.  

क्रमशः 

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 

४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १


Friday, 4 June 2021

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात ...



भाग १

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात मिळालेल्या त्या स्त्रीच्या सांगाड्याने नवं वादळ  उभं केलं आहे. इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वीचा तो सांगाडा आहे. कोण होती ती बाई? बायोलॉजिकल तितक्याच आयडॉलॉजिकल करोनाने भयभीत झालेल्या देशात आज साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या सांगाड्याची चर्चा कशासाठी?

माणसं करोनाने नाही, बायोलॉजिकल करोनाचं संकट ज्या आयडॉलॉजिकल करोनाने निर्माण झालं आहे, त्यातून अधिक मरताहेत. हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल असेल तर ऑक्सिजन नाही. लसीचा पत्ता नाही, लस असेल तर लस समानतेचा जिकर नाही. मेलेल्या माणसांना जाळायला लाकडं नाहीत, म्हणून गंगेत काही हजार प्रेतं सोडली गेली. त्या करोनाला धर्म लावण्यात सत्ताधाऱ्यांचा डाव या घडीला तरी यशस्वी झाला आहे. 'हॉस्पिटलमधल्या शंभरच्या स्टाफमध्ये पंधरा मुसलमान कशाला? हा काय मदरसा आहे?' असा प्रश्न भाजपचा तरूण खासदार तेजस्वी सूर्या  किंचाळत विचारतो आहे. मुंबईच्या बडा कब्रस्थानमधल्या सात मुस्लिम तरूणांनी शेकडो हिंदूंचे अंतिम संस्कार, हिंदू पद्धतीने केले. तर उत्तरेतला भाजपचा नेता म्हणतो, 'हिंदूच्या प्रेताला मुसलमान हात कसा लावतो?'

केंद्रातल्या मोदींच्या सत्तेच्या विरोधात व्यवस्थेतली माणसं ब्र काढायला तयार नव्हती. कालपरवापर्यंत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच सरकारला दोष दिला आहे. लॅसेंटच्या अहवालाने भारतातलं मृत्यचं तांडव हे आयडॉलॉजिकल करोनाच्या संकटाची उत्पत्ती आहे, हे अधोरेखित झालं आहे.
'Please 
Please 
Please I can't breathe 
Please man 
Please somebody 
Please man 
I can't breathe 
I can't breathe'

रंग काळा होता म्हणून जॉर्ज फ्लॉईड गोऱ्या सार्जंटच्या गुडघ्याखाली दबून मेला. अमेरिकेत. इथे भारतात श्वासाश्वासाला जात असते आणि थांबलेल्या श्वासालाही धर्म असतो.

राखीगढीच्या साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या 'मानवी'च्या सांगाड्याची जात काय? जात नव्हती तेव्हा. पण या देशाचा इतिहास फक्त आर्यांचा आहे हे तद्दन खोटं ठसवण्यासाठी, बारा हजार वर्षांचा इतिहास पुनर्लिखत करण्याचा डाव मांडला आहे सत्ताधारी संघीय फॅसिस्टांनी. पण त्यांना तिचा डीएनए आता बदलता येणार नाही. दिल्लीपासून जवळपास १४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या राखीगढीतल्या त्या बाईचा डीएनए आर्यांचा नाही, हे निश्चित झालं आहे. R1a1 नाही. R1a1 हा आर्यांचा डीएनए मानला जातो. लोकमान्य टिळक म्हणत, 'आर्य उत्तर ध्रुवावरून आले.' संघाचे सरगुरु सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवळकर यांनी त्याच्यावरही उपाय काढला. ते म्हणतात, 'उत्तर ध्रुव तेव्हा भारतात होता.' उत्तर ध्रुव सरकवण्याची ज्यांची हिंमत आहे, त्यांनी इतिहासाची केलेली अदलाबदल ही काही नवलाईची गोष्ट नाही. पण राखीगढीतल्या त्या बाईचा सांगाडा सांगतो आहे की, 'माझा डीएनए R1a1 नाही. मी आर्य स्त्री नाही. मी अंदमानी आहे. मी द्रविड आहे. वेद इथे 'अवतरण्याच्या' आधी मी इथे राहत होती. वेदाआधीही भारत होता.'

आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, भारत भूमिका यस्य। पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृतः।।

भारताला पुण्यभू आणि पितृभू (मातृभू नव्हे. Father Land) मानणाऱ्यांनी वेदांच्या आधीही वाहणाऱ्या गंगेला वेदगंगा ठरवलं. शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. मातृसत्ता संपवण्यासाठी. पितृभ म्हणजे Father Land  या शब्दाची आयात सावरकरांनी इटीलीतून केली. फॅसिस्ट मुसोलिनीकडून. पाप, पुण्य आणि कर्म विपाकाचे पुरुषसत्ताक वैदिक हिंदुत्व (Hinduism नव्हे. Hinduism आणि हिंदुत्व हे पूर्ण वेगळे शब्द आहेत.) मानणाऱ्या हिंदुराष्ट्रवाद्यांनी आता माँ गंगेला 'शववाहिनी गंगा' बनवली आहे. 

आर्य येण्याच्या आधी, वेद अवतरण्याच्याही आधी या देशात गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी, सिंधु आणि सरस्वतीही? वाहत होत्या. ब्रह्मपुत्रा नदही वाहत होता. गंगा जमुनी तहजीब म्हणत तिला. या नद्यांच्या काठावर सातासमुद्राच्या पलिकडून कितीतरी वशांचे लोक आले, राहिले. इथलेच होऊन गेले. ते येण्याच्या आधी इथे निषाद राहत होते. डोंगरदऱ्यातले आदिवासी आधी इथेच राहत होते. हा देश एक रंगी, एक वंशी, एक धर्मी कधीच नव्हता. David Reich यांनी प्राचीन डीएनएचा शोध घेताना त्यांच्या 'Who We Are and How We Got Here' या पुस्तकात ठासून सांगितलं आहे, 'No group in India can claim genetic purity.' ते म्हणतात, 'The great Himalayas were formed around ten million years ago by the collision of the Indian continental plate, moving northward through the Indian Ocean, with Eurasia. India today is also the product of collisions of cultures and people.' दोन खंडांच्या टकरीतून हा देश बनला. आणि अनेक दिशांतून आलेल्या वंश, रंगांच्या टकरीतून, संमिलनातून आणि सहअस्तित्वातून इथली संस्कृती फुलली. ज्याला आज सेक्युलिरिझम म्हणतात.

सम्राट अशोकाचा शिलालेख सांगतो, 'सर्वांचा आदर करा. ब्राह्मणांचा आणि श्रमणांचाही.' समतेच्या अन् शांतीच्या त्या दुताने आपला धर्म लादला नाही. त्याच्या चौथ्या स्तंभ लेखात स्पष्ट दुजोरा आहे, 'माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला संधी असेल, मग तो कुठल्याही पंथाचा असो.' अशोकाच्या व्यवहारात समता होती. त्याच्या दंडात पक्षपात नव्हता. (सातवा स्तंभ) हजार वर्षानंतर सातव्या शतकात राजा हर्षाने Hsüan Tsang यांच्या स्वागतासाठी कनौजला धर्म परिषद बोलावली होती, हर्षाने त्या आधीच बौद्ध धर्म स्विकाराला होता. तरीही धर्म परिषदेत त्याने धम्म विरोधकांना, धर्म न मानणाऱ्यांना आणि ब्राह्मण धर्मियांनाही सन्मानाने, समतेने आणि प्रेमाने बोलावलं होतं. राजा हर्षाला त्याच परिषदेत मनोऱ्याला आग लावून जाळून खाक करण्याचं कटकारस्थान रचलं गेलं होतं. सगळी धर्म परिषद सांगत होती, त्यांना फासावर लटकवा. राजाने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या ५०० ब्राह्मणांना फक्त हद्दपार केलं. माफ केलं. परस्त्रीलाही आईसमान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या डोळ्यांनी ज्यांनी ज्यांनी राज्यकारभार पाहिला त्या सर्वांची नावे इतिहासाच्या लेण्यांवर कोरली गेली आहेत.

ही कोरीव लेणी विद्रुप करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. फॅसिस्ट हिंदुत्ववादी सांगतात की, इस्लामच्या आक्रमणानंतर इथली ६० हजार देवळं मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केली. पण प्राध्यापक डी. एन. झा यांनी त्यांच्या 'Against the Grain: Notes on Identity, Intolerance and History' या पुस्तकात सिद्ध केलंय की, आक्रमक मोगलांनी नष्ट केलेल्या हिंदू देवस्थानांची संख्या ८० हून जास्त नाही. प्रा. झा Hsüan Tsang आणि Fa-hsien या दोघांचा लिखित हवाला देऊन पुढे स्पष्ट करतात, बुद्धाच्या अनुयायांनी खोदलेली लेणी, अशोकाने बांधलेले ८४ हजार स्तुप, विहार, महावीरांच्या जैन अनुयायांनी बांधलेली सुुंदर मंदिरं यांच्यावरचं आक्रमण इस्लामी आक्रमक येण्याच्या पूर्वीच झालं होतं. पुष्यमित्र शूंग आणि शशांक या दोन ब्राह्मण राज्यकर्त्यांनी ती लेणी विद्रुप केली, उद्ध्वस्त केली किंवा काबीज केली. शशांकने तर बोधगयेचा बोधी वृक्ष उखडून फेकून दिला. बाबरी मशिद उद्ध्वस्त करून आता राम मंदिराचा पाया खणला जातो आहे. त्यात अवशेष सापडताहेत, ते बुद्धाच्या साकेत नगरीचे.  

इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा शिरस्ता आजचा नाही. इंग्रज आले नसते तर जमिनीत गडप केलेला बुद्ध भारताचा इतिहास कधीच समोर आला नसता. आर्यावर्ताच्या आधीही भारत होता. पहिले जैन तिर्थंकर ऋषभ देवांचा चिरंजीव राजा भरताच्या नावाने हा देश ओळखला जातो. ही ओळख काळाच्या इतिहासात दडपली गेली असती. अमर्त्य सेन आणि नितीशकुमारांच्या पुढाकारामुळे ज्या प्राचीन नालंदा विद्यापीठाचं पुनर्जीवन झालं, तिथल्या लक्ष ग्रथांचा खजिना लाक्षागृहासारखा अल्लाऊद्दीन खिलजीने जाळून टाकला, हे इतिहासात आपल्याला शिकवलं गेलं. खिलजी तर तिथे गेलाही नव्हता. डी. एन. झा म्हणतात, नालंदाला लावलेली आग ही सनातन्यांची करतूत होती.  

गंगा जमुनी संस्कृती ज्यांना पुसायची आहे, गंगा, यमुनेच्या प्रवाहात ज्यांना विद्वेषाचं विष कालवायचंय. '... हस्ती मिटती नहीं हमारी' ही संस्कृती ज्यांना बदलायचीय. आजचं संकट ही त्यांचीच निष्पत्ती आहे. देशात माणसं फक्त करोनाने मेलेली नाहीत आयडॉलॉजिकल करोनातून बायोलॉजिकल करोनाचं संकट गहीरं झालं आहे. गंगेत प्रेतांच्या राशी त्यामुळे पडताहेत.

हे संकट आजचं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांना या संकटाची कल्पना तेव्हाच आली होती. रविंद्रनाथ टागोरांनी १९१७ साली त्या राष्ट्रवादाचं संकट ओळखलं होतं. ते म्हणाले होते, 'Nationalism is a great menace. It is the particular thing that for years has been at the bottom of India’s troubles.' फासावर चढणाऱ्या भगतसिंगाने त्या विरोधातच इन्कलाब पुकारला होता. सामान्य देशवासियांना लढण्याचं बळ देणाऱ्या महात्मा गांधींनी त्या हिंस्त्र राष्ट्रवादाच्या विरोधात आपलं बलिदान दिलं. राष्ट्रपित्याचा खून ज्या विचारातून झाला तो विचार महाराष्ट्रातून निपजला होता, यामुळे घायाळ झालेल्या साने गुरुजींनी २१ दिवसांचा उपवास केला होता. भारताचं भाग्यविधान लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंस्त्र, पुरुषसत्ताक, वर्णवर्चस्ववादी, धर्मद्वेषी राष्ट्रवादाला संविधानात यत्किंचितही जागा ठेवली नाही.

ज्याला सावरकरी, गोळवळकरी आणि नथुरामी राष्ट्रवाद म्हणतात, राष्ट्र सेवा दलाचा जन्म त्या विरोधात लढण्यासाठी झाला. ती तारीख होती ४ जून १९४१.  

क्रमशः

- कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

--------------------------

आज शुक्रवार, दि. ४ जून, रात्री ८ वा. 
Facebook Live Link - http://fb.com/RSDIndian


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 


४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

Wednesday, 2 June 2021

४ जून कशासाठी?


राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. गणेश देवी निव्वळ भाषाशास्त्रज्ञ नाहीत. इतिहासाचे अभ्यासकही आहेत. आदिवासी आणि भटक्यांच्या संस्कृतीचे केवळ संशोधक नाहीत. राजकीय भाष्यकारही आहेत. साने गुरुजी आणि गुरुदेव टागोरांच्या आंतर भारतीचे वर्तमानातील सर्वात मोठे वाहक आहेत. बायोलॉजिकल करोना येण्याच्या आधीच धर्मद्वेषाच्या विषाक्त कोविड संकटात होरपळत असलेल्या देशाला साने गुरुजींच्या आंतरभारतीचा विचार सांगणारं, एस. एम. जोशींच्या समन्वयाच्या वाटेने चालणारं राष्ट्र सेवा दल सांस्कृतिक राष्ट्रवादाला पर्यायी नॅरेटिव्ह उभं करू शकेल या मोठ्या अपेक्षेने त्यांनी सेवा दलाचं नेतृत्व स्वीकारलं. 

४ जूनला ८० वर्ष होतील, राष्ट्र सेवा दल गठीत झालं त्याला. राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेला पहिले दल प्रमुख एस. एम. जोशी यांनी पुनर्घटना असा शब्द वापरला. त्या पुनर्घटने मागील पूर्वघटनांचा आणि वैचारिक प्रेरणांचा शोध घेणारं पुस्तक लिहण्याचा आग्रह डॉ. देवींनी धरला. मी ना अभ्यासक आहे, ना संशोधक. देव मानत नसलो तरी देवींना मानतो. त्यामुळे नकार देऊ शकलो नाही.


पहिले दल प्रमुख साथी एस. एम. जोशी यांचा व्यक्तिगत सहवास लाभलेले ८ ट्रस्टी राष्ट्र सेवा दलाच्या विद्यमान विश्वस्त मंडळात आहेत. त्यातले मी आणि नितीन वैद्य यांच्या घरात सेवा दल असलं तरी मोठा वारसा नव्हता कधी. इतरांना कौटुंबिक आणि वैचारिक वारसाही मिळाला. ज्यांना मी माझा वैचारिक पिता मानत आलो ते माझे काका अ‍ॅड. लक्ष्मण पाटील यांच्यामुळे मी सेवा दलात आलो. लीलाधर हेगडे यांनी वरोरला सेवा दलाची शाखा सुरु केली होती, माझे काका लक्ष्मण पाटील, विवेक पंडितचे वडील रघुनाथ पंडित आणि माझे वडील हरिश्चंद्र पाटील हे त्या शाखेतले. लक्ष्मण पाटील यांचा एस. एम. अण्णांशी जवळचा संबंध होता. माझा संबंध नंतर आला. नितीन वैद्यचे वडील रॉयिस्ट होते. तर आई पक्की समाजवादी. थेट कौटुंबिक वारसा नव्हता तरीही एस. एम. जोशी यांच्या प्रेमाचे वाटेकरी होण्याची संधी मला आणि नितीनला मिळाली. तसा वारसा नसल्यामुळे जेव्हा बाकीचे, मला जवळचे किंवा स्पृश्य मानत नव्हते (नाहीत) तेव्हा एस. एम. यांनी प्रेम, विश्वास, विचार आणि प्रेरणा दिली. 

निखिल वागळे आणि सुरेखा दळवी यांनी राष्ट्र सेवा दलाचा विद्यार्थी विभाग सुरु केला नसता तर कदाचित मी आणि नितीन कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेकडे ओढले गेलो असतो. पुढे याच विद्यार्थी विभागाचं छात्र भारतीत रूपांतर झालं. आणि त्यालाही कारण ठरलं एस. एम. जोशी यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद. एस. एम. आणि अरुण लिमये यांच्या आग्रहामुळे सेवा दल मंडळात छात्र भारतीचा ठराव करण्यात आला. आणि स्वायत्त विद्यार्थी संघटना जन्माला घालण्यात आली.  मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते मंडल आयोगाच्या ओबीसी आंदोलनापर्यंत एस. एम. यांची ही वैचारिक साथ आणि दिशा मिळाली. 

मी आणि नितीन वैद्य आम्ही दोघंही मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीचे सचिव होतो. दलित पँथरच्या सोबतीने प्रत्यक्ष लढाईत उतरलो होतो. पुढे तसेच मंडलच्या आंदोलनातही. आम आदमीचे राजकारण करण्याचा दावा करणारे तेव्हा युथ फॉर ईक्वालिटीच्या नावावर आरक्षण विरोधी आंदोलन अक्षरश: पेटवत होते. लोकांना जाळून घ्यायला भाग पाडत होते. त्यावेळी ओबीसी आंदोलनाची ज्योत पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये माझी आणि नितीन वैद्य यांची भागीदारी होती. जनार्दन पाटील आणि दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोद्दार कॉलेजमध्ये पहिली राज्यव्यापी ओबीसींची मंडल आयोग परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचं उद्घाटन एस. एम. जोशी यांनीच केलं होतं आणि डॉ. बाबा आढाव आवर्जून उपस्थित होते. एस. एम. जोशी यांना त्याबद्दल आम्हा दोघांचं खूप कौतुकही होतं. आमच्या तिघांचा एक फोटो प्रख्यात छायाचित्रकार मोहन बने यांनी काढला होता. कदाचित तो नितीनकडे असू शकेल.      

एस. एम. हा खरा डीकास्ट झालेला समाजवादी नेता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणूनच त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता. म्हणून ४ जून १९४१ हे पुस्तक  एस. एम. जोशी यांना समर्पित आहे. राष्ट्र सेवा दलाच्या पुनर्घटनेमागील वैचारिक प्रेरणांचा शोध घेण्याचा त्यात प्रामाणिक प्रयत्न आहे.   

साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची ओळख आहेत. पण सेवा दलाची ही वैचारिक बांधणी करण्यामध्ये एस. एम. यांचा वाटा सर्वात मोठा आहे. त्या दोघांच्या चरित्रात, आंदोलनात आणि साहित्यात राष्ट्र सेवा दलाच्या वैचारिक प्रेरणांचा शोध घेता येतो. तोच प्रयत्न या पुस्तकामागे आहे.   

कोविडमुळे प्रिंटीग प्रेस अजूनही बंद आहेत. पुस्तक प्रकाशित व्हायला वेळ लागेल. तोवर थांबायचं कशाला म्हणून ४ जूनपासून ते सर्वांसाठी ते डिजिटली खुलं करत आहोत. दर दोन दिवसा आड एक भाग प्रसिद्ध करण्याचा इरादा आहे. kapilpatilmumbai.blogspot.com इथे नियमित वाचता येईल. वाचणाऱ्यांनी त्यात जरूर भर टाकावी. त्यांचं स्वागत राहील. 



ता. क. 

अतिशय महत्त्वाच्या आणि बिलकुल चुकवता येणार नाही, अशा एका कार्यक्रमाची मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन आणि महात्माजींचे नातू व ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजमोहन गांधी यांना ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या आमंत्रणावरून हे दोघं प्रथमच सेवा दलाच्या व्यासपीठावर येत आहेत. करोनाच्या काळात देशाशी बोलणार आहेत. 

शुक्रवारी ४ जून रोजी रात्री ८ वाजता. राष्ट्र सेवा दलाच्या फेसबुक पेजवर Facebok Live Link - https://www.facebook.com/RSDIndian तुम्ही आवर्जून त्यांना ऐकायला या. बायोलॉजिकल आणि आयडॉलॉजीकल करोनाशी कसं लढायचं याचा नवा विचार ते आपल्याला देतील. 

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल