Monday, 22 February 2021

सुशीलाबाई महाराव : प्रेरणादायी शिक्षिका


कर्मवीर भाऊराव पाटील आणि साने गुरुजी यांच्या शिष्या, मुंबईतील ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापिका सुशीलाबाई महाराव यांचे काल ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. अखेरपर्यंत कार्यरत होत्या. चित्रलेखाचे संपादक, सत्यशोधक वक्ते व नाटककार ज्ञानेश महाराव यांच्या त्या आई. 

माझी गोष्ट नावाचे त्यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. प्रख्यात साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते. अलंकृत भाषा आणि निखळ जीवनानुभव हे त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. बाई मोठ्या निर्धारी होत्या. मुलांना शिकवलं, मोठं केलं. चिकित्सक आणि विवेकी दृष्टिकोन दिला. अखेर पर्यंत स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगल्या. 

मुंबई महापालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. शिक्षिका असताना अर्ध मागधी भाषा शिकल्या. जैन संस्कृतीचा अभ्यास केला. भारतातील अवैदिक संस्कृतीचा संस्कार त्यातूनच त्यांनी घेतला असावा. त्यांचे अनेक विद्यार्थी नावारुपाला आले. त्याकाळी महापालिका शाळांमध्ये गर्दी असायची. सुशीलाबाई महाराव यांच्यासारख्या शिक्षकांनी तो विश्वास निर्माण केला होता. 

त्यांचं वाचनही अफाट होतं. संगीत आणि नाटकाची आवड होती. अभिनयाचीही. नुसती आवड नव्हे जाण होती. तो वारसा त्यांनी आपल्या मुलांकडे दिला. रंगमंचावरचा ज्ञानेश महारावांचा बहुढंगी अविष्कार पाहिला की त्यांच्या आईने दिलेल्या देणग्या लक्षात येतात. 

सुशीलाबाईंचे वडील साई बाबांचे मित्र होते. भक्त नव्हते. साई बाबांना चमत्कार नंतर जोडले गेले. श्रद्धा, सबुरी आणि सर्व धर्म समभावाचा संदेश त्या संत फकिराने आपल्या आयुष्यात लोकांना दिला. त्यांच्या आठवणी साध्या, सरळ शब्दात त्यांनी लिहिल्या आहेत. 

सुशीला बाई त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही साध्या, सरळ जगल्या. निढळ हाताने मदत केली. हात पसरले नाहीत. ज्ञानेश महाराव यांच्यातला सत्यशोधक आणि चिकित्सक संपादक ही सुशीलाबाई महाराव यांचीच देणगी आहे. 

सुशीलाबाई महाराव यांना विनम्र श्रद्धांजली!

- कपिल पाटील 

Saturday, 12 December 2020

शरद पवारांवर शरद पवारांनीच अन्याय केला


वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या जिवंतपणी त्यांचा पुतळा उभारला गेला. मायावतींनी कांशीराम पार्कमध्ये स्वतःचाही पुतळा उभारला. नाईकांचं तसं झालं नव्हतं. वसंतराव नाईक महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रवर्तक मानले जातात. पण म्हणून त्यांचा पुतळा उभारला गेला नाही. नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्तांना ओळख मिळाली. प्रतिष्ठा मिळाली. नाईक साहेब जणू त्यांच्या अस्मितेचे प्रतिक बनले होते. पुतळा म्हणून उभारला गेला. 

असंच काहीसं शरद पवार यांच्याबाबत घडलं आहे. शरद पवारांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांच्या आयुष्याची 8 दशकं आज पूर्ण झाली आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून सत्तेवर आलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी' सरकारने त्यांच्या नावाने 'ग्राम समृद्धी योजना' सुरु केली आहे. पवारांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादीने 80 हजार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्पही केला आहे. त्यांच्या पक्षाने तसा कार्यक्रम करणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्र सरकारची ग्राम समृद्धी योजना ही अधिक औचित्यपूर्ण आणि पवार साहेबांचा सार्थ गौरव करणारी आहे. वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे पवारांचाही त्यांच्या हयातीत असा सन्मान होतो आहे, ही मोठी गोष्ट आहे. 

लोकशाहीत राज्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे करावेत की नाही? पूर्वीच्या राजे रजवाड्यांप्रमाणे आपल्याच वाढदिवसाला योजना जाहीर कराव्यात की नाही? याची चर्चा होऊ शकेल. पण शरद पवार यांच्या नावाने महाराष्ट्राचं सरकार राज्यातल्या खेड्यापांड्याना समृद्ध करण्याची योजना आणत असेल तर त्याला नावं ठेवण्याची गरज नाही. पवारांचे अनुयायी कल्पक आणि प्रगल्भही आहेत. त्यामुळे जिवंतपणी पुतळा उभा करण्यापेक्षा शरद पवारांना ज्यात आनंद वाटेल अशी योजना त्यांनी सुरु केली असावी. 

शरद पवार एक जितीजागती दंतकथा बनले आहेत. मान्यच करावं लागेल ते. कॅन्सरवर मात करून कैक वर्ष उलटली आहेत. पाय जायबंदी होऊनही हा माणूस हातात काठी न घेता चालतो. वयाची, आजारपणाची पर्वा करत नाही. वादळ येवो, अतिवृष्टी होवो, पूर येवो, भूकंप येवो शरद पवार वादळी वाऱ्यासारखे फिरतात. निवडणुकीत साताऱ्याला भर पावसात झालेली त्यांची सभा गाजली. त्याचं कौतुकही झालं. 'वारा खात, गारा खात, बाभूळ झाड उभंच आहे.' पण कौतुक त्याचं नाही. लातूरला भूकंप झाला, कलेक्टर पोचण्याच्या आत मुख्यमंत्री असलेले शरद पवार किल्लारीला जाऊन पहाटे पोचले होते. कोसळलेली घरे त्यांनी वर्षभरात उभी केली. गावं वसवली. दुःख आणि वेदनांवर मात करत लोकांना उभं केलं. बॉम्ब स्फोटात मुंबई हादरली होती. पवारांनी 24 तासांच्या आत मुंबईचं स्टॉक एक्सचेंज पुन्हा चालू केलं. दंगलीच्या काळात पवार साहेब दिल्लीत स्वस्थ बसू शकले नाहीत. ते मुंबईत धावून आले. मराठवाड्यात नामांतराच्या प्रश्नावरून दंगल पेटली. पोलादी हातांनी त्यांनी दंगल शमवली. आपली सत्ता गमावून. पण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही करून दाखवलं. दोन्ही समाजांची मनं जुळवण्यासाठी पुन्हा शरद पवारच उभे राहिले. 

80 व्या वर्षी त्यांना कुणी सांगितलंय फिरायला? पण ते ऐकायला तयार नसतात. कोकणात वादळ आलं, शरद पवार धावून गेले. अतिवृष्टीत खेड्यापाड्यातली पिकं झोपून गेली, शरद पवार बांधांवर पोचले. सत्तेवर असोत, नसोत पवार ठिकाणावर गेले नाहीत असं झालेलं नाही. ते विरोधी पक्ष नेते असताना मी पाहिलंय.  उरणच्या शेतकऱ्यांवर सरकारचा गोळीबार सुरु असताना धावून जाणारे शरद पवारच होते. शरद पवार हा माणसांचा माणूस आहे. फक्त नेता नाही. नेते खूप असतात. पण माणसात माणूस म्हणून राहणारे, माणूस माणूस समजून घेणारे शरद पवार एकच असतात. जात, पात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून माणुसकीच्या बांधावर ते उभे असतात. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना त्यांचा वाटा देणारे शरद पवार, मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवार, मुस्लिम ओबीसींना सवलती देणारे शरद पवार, भटक्या विमुक्तांच्या पाठीशी उभे राहणारे शरद पवार, शेल्टी हत्याकांडानंतर आदिवासींच्या पाड्यावर जाणारे शरद पवार, आदिवासी हितांच्या बाबत यत्किंचितही तडजोड न करणारे शरद पवार. असे शरद पवार आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना केवळ ग्रेट मराठा लीडर का म्हटलं जातं कळत नाही. शरद पवारांच्या विकासाच्या मॉडेलबाबत अनेकदा टीका झाली आहे. राजकारणातील त्यांच्या घटापटाच्या डावांबद्दलही लिहलं गेलं आहे. त्यांनी दिलेले शह, काट शह देशभरात चर्चेत राहिले आहेत. पत्रकारितेत असताना मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर अनेकदा कठोर टीका केली आहे. पण हे कबुल केलं पाहिजे की, या सगळ्यातून उरतात ते शरद पवार ज्यांच्यात एक कमालीचा माणूस प्रेमी राजकीय नेता फक्त दिसतो. विचाराने ते पक्के सत्यशोधक आहेत. इहवादी आहेत. कर्मकांडांपासून कोसो दूर राहतात. राजकारणातल्या माणसाला या गोष्टी सहज जमणं शक्य नसतं. हमीद दलवाईंना त्यांच्या उपचारासाठी आपल्या घरात ठेवणारे शरद पवार, फारुख अब्दुलांच्या मुलाचं उमरचं आपल्या घरात मुलासारखं संगोपन करणारे शरद पवार, पहिल्याच  मुलीनंतर  विचारपूर्वक कुटुंब नियोजन करणारे शरद पवार, मोतीराज राठोड, लक्ष्मण माने यांना प्रतिष्ठा देणारे शरद पवार, दलित, मुस्लिम, ओबीसी प्रश्नांकडे आणि नेतृत्वाकडे समन्यायाने पाहणारे शरद पवार, प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी राजगृहावर जाणारे शरद पवार, मृणाल गोरेंच्या आजारपणात त्यांची विचारपूस करायला जाणारे शरद पवार, दिल्लीत हरवलेल्या महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी रात्रभर जागणारे शरद पवार, किती गोष्टी सांगता येतील. 

विरोधी पक्षांशी सन्मानाने वागणं. त्यांचं काम प्राधान्याने करणं. ही महाराष्ट्राची एक खासियत आहे. संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांची ती देणगी आहे. बॅ. ए. आर. अंतुलेंपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती परंपरा पाळली आहे. अगदी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अपवाद नाहीत. पण या परंपरेचं मूर्तिमंत प्रतिक म्हणून जर कुणाला पाहायचं असेल तर ते शरद पवारांनाच पाहावं लागेल. शरद पवारांच्या भांडवली विकासाचं मॉडेल कदाचित मान्य होणार नाही. पण ग्राम विकासाला आणि सहकाराला काळाप्रमाणे बदलण्याची ताकद फक्त शरद पवारांकडेच होती आणि आहे. कोकणात फुललेल्या फळबागा आणि सोलापूरच्या पर्जन्य छायेखालील प्रदेशात फुललेल्या सीताफळाच्या बागा ही शरद पवारांचीच देणगी आहे. म्हणून असेल कदाचित शरद पवारांच्या नावाने ग्राम समृद्धीची योजना सरकारने ठरवली असेल. 

80 वर्षांचं आयुष्य आणि 60 वर्षांचं राजकारण. भाजप, काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी हा तसा लहान पक्ष. तुलनाच करायची तर सेनेपेक्षाही कमी आमदार. एका राज्याची त्याला मर्यादा आहे. पण शरद पवारांना ती नाही. श्रीनगरपासून चैन्नईपर्यंत आणि अहमदाबादपासून कलकत्यापर्यंत शरद पवारांचा राजकीय दबदबा मोठा आहे. 6 दशकांच्या राजकारणात तो अबाधीत राहिलेला आहे. देशातल्या उद्योगपतींना आणि खेड्यातल्या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोघांनाही शरद पवार आपला माणूस वाटतात. ही पवारांची खासियत आहे. 

युपीएचं चेअरमन पद मिळण्याची चर्चा आज काल वर्तमानपत्रात आहे. त्यात तथ्य किती ते माहित नाही. पण शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील असं महाराष्ट्रातील अनेकांचं स्वप्न आहे. ते आधीच व्हायला हवे होते. ती संधीही होती. शरद पवार जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी देशातल्या तमाम डाव्या, पुरोगामी आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती. त्या सगळ्या पक्षांचे तेच नेते होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. ते परतले नसते तर देवेगौडा आणि गुजराल यांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. पवारांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा यशवंतराव चव्हाणांपासून ते महाराष्ट्रातल्या त्यांना मानणाऱ्या नेत्यांच्या दडपणाचा तो भाग होता. महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी चळवळ आणि ग्रामीण नेतृत्व या प्रत्येकाचं प्रेशर होतं शरद पवारांवर. त्यामुळे शरद पवारांनी स्वतंत्रपणे पुढे जाण्याऐवजी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आणि तीच मोठी चूक ठरली. अन्यथा ते देशाचे अनेक वर्ष नेतृत्व करताना दिसले असते. शरद पवार अगदी तरुणपणात मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसमुळे नव्हे, तर एस. एम. जोशींमुळे. जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे. जनता पक्षातल्या संघीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र जाऊ नये म्हणून एस. एम. जोशींनी शरद पवारांना सोबत घेतलं आणि नेतृत्व दिलं. शरद पवारांना तेव्हा समाजवादाचं आकर्षण होतं. राष्ट्र सेवा दलामुळे असेल. एस. एम. जोशींना त्यामुळे पवारांबद्दल कायम ममत्व वाटलं. शरद पवारांनीही आयुष्यभर एस. एम. जोशींबद्दल कृतज्ञता बाळगली. तीच वाट त्यांना पुढे पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. पण तसं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांचा पुन्हा तो प्रवास सुरु झाला आहे. 

पण पवारांवर मोठाच अन्याय झाला. केवळ पंतप्रधान पदाच्या स्वप्नापुरतं हे मी म्हणत नाही. शरद पवारांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला, असं खेदाने म्हणावसं वाटतं. कारणं काहीही असोत. शरद पवारांवर झालेला हा अन्याय त्याला महाराष्ट्राचं राजकारण जितकं कारण आहे, महाराष्ट्रातील माध्यमं आणि बुद्धिजीवी वर्ग जितका कारण आहे, तितकंच कारण शरद पवार स्वतःही आहेत. शरद पवारांमधल्या राजकारण्याने ज्यांना महाराष्ट्र पुरुष म्हणता येईल अशा एकमेव शरद पवार नावाच्या नेत्यावर अन्याय केला आहे. 

शरद पवारांचं मला भावतं ते त्यांच्यातलं माणूसपण. त्यांच्यातला सत्यशोधक. आणि सामाजिक न्यायाच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा. शरद पवारांकडे हे सारं आलं कुठून? एकच उत्तर आहे, शारदाबाई गोविंदराव पवार. त्यांच्या आई. 

देशाच्या इतिहासात महामानवांची चर्चा खूप होते. पराक्रमी पुरुषांच्या गाथा खूप लिहल्या जातात. शिल्पकार सारे देशाचे असोत किंवा राज्याचे असोत किंवा विशिष्ट्य समाजाचे शिल्पकार फक्त पुरुषच ठरवले जातात. पण देशातल्या महामानवींचा इतिहास जिथे लिहला जात नाही, तिथे राज्याराज्यातल्या कर्तबगार स्त्रियांचं चरित्र कोण लिहणार? 'मेकर्स ऑफ इंडिया' या पुस्तकात डॉ. रामचंद्र गुहा यांनी महाराष्ट्रातील ताराबाई शिंदेंचा समावेश केला आहे. अजून काही स्त्रियांचा खरं तर त्यांनी समावेश करायला हवा होता. जगभरच्या स्त्रीयांच्या हक्काचे कायदे बदलायला भाग पाडणाऱ्या डॉ. रखमाबाईंचा उल्लेखही रामचंद्र गुहांनी केलेला नाही. तिथे महाराष्ट्र घडवणाऱ्या स्त्रियांची चर्चा होताना कशी दिसेल? जिजामाता आणि सावित्रीबाई फुले किंवा अहिल्याबाई यांचं आपण नाव घेतो. पण त्या झाल्या महामानवी. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्यात अनेक लखलखत्या स्त्रियांची चरित्र लिहली गेली पाहिजेत. ती सांगितली जात नाहीत. संख्येने भल्या त्या मोजक्या असतील. पण महाराष्ट्र घडवणाऱ्या त्या स्त्रियांच्या यादीत सत्यशोधक शारदाबाई गोविंदराव पवार यांचं नाव आवर्जून सांगावं लागेल. महाराष्ट्र घडवण्याऱ्यांमध्ये शारदाबाईंचाही एक वाटा होता. तसा महाराष्ट्राला शरद पवारांसारखा नेता शारदाबाईंमुळेच मिळाला. केवळ जन्माने नाही. शारदाबाईंनी त्यांना घडवलं. पवार साहेबांचा आज गौरव करताना शारदाबाईंना विसरून चालणार नाही. 

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)

Friday, 11 December 2020

दिलीपकुमारांच्या त्या एका कॉलने भारत-पाक युद्ध टळलं


दिलीपकुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक.

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीपकुमार यांचा ठसा आहे.

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार.  

गेली 30 ते 40 वर्ष अमिताभ बच्चन भारतीय सिने सृष्टी व्यापून आहेत. त्यांच्या तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री असलेल्या पत्नी खासदार जया बच्चन यांना एकदा विचारलं, भारतीय सिने सृष्टीचा महानायक कोण? अमिताभ बच्चनच ना? त्या म्हणाल्या, 'नाही. दिलीपकुमार. फक्त दिलीपकुमार.' 

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रोत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, पंजाबी आणि मराठी या पाच भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे.

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात.

मला एकदा ते म्हणाले, 'मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही नाही जमत.'

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.'

दिलीपकुमार मला म्हणाले, 'तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.'

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. इथे आलेल्या सगळ्या धर्मांना जाती व्यवस्थेने गिळून टाकलं आहे. जातीचा संबंध नसलेल्या धर्मांना जाती व्यवस्थेची तडजोड करावी लागली. धर्मांतरं झाली पण जात्यंतरं झाली नाहीत. जाती तशाच राहिल्या. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीपकुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला तेव्हा, मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती. शब्बीर अन्सारी, हसन कमाल, जहीर काझी, मी आम्ही सारे त्या चळवळीत होतो. पण दिलीपकुमार पाठीशी नसते तर मुस्लिम ओबीसींना न्याय मिळाला नसता. हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, 'छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. म्हणजे माळीच. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?' शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते. 

दिलीप कुमारांकडे, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून?  मी एकदा विचारलं. तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर.  त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंटमध्ये दिलीपकुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं, 'अरे इतर कुणी का नाही आले?' विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, 'युसुफ भाई मी दलित महार आहे. माझ्या हातचं ते कसं खातील?' तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत - पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीपकुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीपकुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची समाजवादी परंपरा. काझींचे सासरे मोहिद्दीन हॅरिस दिलीप कुमारांचे मित्र. त्यामुळे काझींवर दिलीप कुमारांचा फार भरवसा.

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि पुढचं भयावह युद्ध थांबलं. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे की त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, 'अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू?' मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. त्यांना म्हणाले, 'दिलीपसाब आप को कुछ नही करना है, जिम्मेदारी मेरी है.' विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने मान्य केलं. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदार असलेले हुसेन दलवाई यांनी बरेच प्रयत्न केले होते. पहिल्या पाचात त्यांचा समावेश झालाही. पण तोही एक मोठा किस्सा आहे. सोनिया गांधींनी दिलीपकुमार यांना विचारलं, 'हुसेन दलवाई हे नाव कसं आहे?' दिलीप कुमारांच्या डोक्यात सिनिअर हुसेन दलवाई होते. म्हणजे वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले. दिलीप कुमारांचे ते जुने मित्र. त्यांनी एका क्षणात सोनियाजींना सांगितलं, 'हुसेन दलवाई बिलकुल चांगला माणूस आहे. राष्ट्र सेवा दलात वाढलेला आहे. सज्जन आहे. बिलकुल त्यांना करा.' हुसेन दलवाई हे नाव पक्कं झालं. पण तेव्हा त्याच कुटुंबातले एक ज्युनिअर हुसेन दलवाई हे दिलीप कुमारांना माहित नव्हते. ज्युनिअर हुसेन दलवाई म्हणजे युक्रांदवाले. अलीकडच्या काळात राज्यसभेवरही होते ते हुसेन दलवाई. हमीद दलवाई यांचे भाऊ. त्यावरून काँग्रेसमधल्या काही मुस्लिम नेत्यांनी दिल्लीत आक्षेप घेतला. तेव्हा दिलीपकुमारांनी मला विचारलं, 'अरे माझ्या डोक्यात ते सेवा दलाचे हुसेन दलवाई होते. हे हुसेन दलवाई कोण?' मी म्हटलं, 'हे युक्रांदवाले.' ते म्हणाले, 'हे मला माहित नव्हते. मला वाटलं हे सेवा दल वाले हुसेन दलवाई आहेत. म्हणून मी सोनियाजींना तात्काळ हो म्हटलं.' मी हसलो. आणि म्हटलं, 'तुमची जुन्या हुसेन दलवाईंसोबत कशी दोस्ती?' ते म्हणाले, 'ते हुसेन दलवाई माझे जुने मित्र. जुन्या सेवा दलातल्या बऱ्याच लोकांना मी व्यक्तिगत ओळखतही होतो. त्यामुळे माझ्या  डोळ्यात ते नाव राहिलं.' ते सिनियर हुसेन दलवाई या हुसेन दलवाईंचे काकाच. चिपळूणमधलेच. आणि सेवा दलाच्या पहिल्या पिढीतले. कोकणामधली बहुतेक मुस्लिम मंडळी सेवा दलात सुरवातीपासून होती. आणि त्यांचं आणि सेवा दलाचं योगदान दिलीप कुमारांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रेमाने सोनियाजींना शिफारस केली होती. 


दिलीप कुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लिम-तेली समाजाच्या पुढाकाराने झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लिम - ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमाने बोलले. औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत. 

दिलीपकुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत. सतत त्यांच्या सोबत राहतात. एक क्षणही अंतर देत नाहीत. वय 98 झालंय. फिरणं मुश्किल आहे. Bedridden आहेत. आठवणी पुसल्या जात आहेत. त्यांचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे ताज एंडला झालेल्या रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रिसेप्शनला ते आले होते. मला पाहताच त्यांनी माझा जो हात पकडला ते माय फ्रेंड कपिल, कपिल करत. ते हात सोडायलाही तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी त्यांचा हात हळूच काढून पुन्हा सायराजींच्या हातात दिला. तो प्रसंग मला आठवला की आजही गलबलल्या सारखं होतं. कारण दिलीपकुमार हरवत चालले होते. 

दिलीपकुमार तर सिनेमातला मोठा माणूस आहेच. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. ते विचाराने पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अफाट आहे. हिंदू-मुस्लिम एकीसाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे. 

देशाच्या चित्रपट विश्वातील हा महानायक भारतरत्न किताबाच्या पात्रतेचा आहे. तो किताब मिळेल न मिळेल पण त्यांचं काम त्या तोलामोलाचं आहे हे नक्की. आज 11 डिसेंबर. दिलीप कुमारांचा जन्मदिन. दिलीपकुमार आणि सायरा बानो या दोघांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि सलाम!

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.) 

Friday, 4 December 2020

डिसले गुरुजींनी वेगळं काय केलं?


सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात परितेवाडी आहे. तिथल्या कदम वस्तीवरची वस्तीशाळा. त्या शाळेवर 2009 मध्ये रणजितसिंह डिसले शिक्षक म्हणून आले. इंजिनिअरिंगचा तो Droupout Student होता. वडिलांनी सांगितलं D.Ed कर, शिक्षक हो. रणजित D.Ed झाला आणि शिक्षकही. खेड्यातल्या त्या शिक्षकाने शिक्षण क्षेत्रातलं नोबेल प्राईज मानलं जाणारं 'Global Teacher Prize 2020' जिंकलं आहे. थक्क करणारी विलक्षण ही घटना आहे. असं काय केलं त्यांनी की जगातल्या 140 देशातील 12 हजार शिक्षकांतून त्यांची निवड झाली?


देशभरातले अनेक शिक्षक खेड्यापाड्यात, वडीवस्तीवर असलेल्या शाळांमधून विद्यार्थी घडवताहेत. मेहनतीने, निष्ठेने लोकांनी कितीही नावं ठेवू देत शिक्षक प्रामाणिकपणे काम करताहेत. म्हणूनच देश उभा राहतोय. पण डिसले गुरुजींनी वेगळं काय केलं?

अलीकडेच तंत्रस्नेही शिक्षक हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे. तो तेवढासा बरोबर नाही. शिक्षक हा तंत्रयुक्त पण विद्यार्थी स्नेही असायला हवा. डिसले गुरुजी यांनी तेच केलं. आपल्या खेड्यातल्या मुलांसाठी त्यांनी देशांच्या सीमा खुल्या केल्या. जगभरच्या मुलांशी परितेवाडीची ती मुलं बोलत होती. पण तंत्रज्ञानाचा हा उपयोग त्यांना तिथेच स्वस्थ बसू देईना. हातात असलेल्या मोबाईलचा, लॅपटॉपचा उपयोग मुलांसाठी का करता येणार नाही? शिकवणं म्हणजे पाठ्यपुस्तकातले धडे शिकवणं नाही. तो सगळा धडा जिवंत करता आला तर? ऑडिओ, व्हिडीओमधून नाट्य उभं करता आलं तर? त्या धड्यातले संदर्भ शिक्षकांना सहज उपलब्ध का होऊ नयेत? पुस्तकात धड्याच्या खाली संदर्भ दिलेले जरूर असतात पण खेड्यातले शिक्षक ते शोधून कुठून काढणार? मुलांपर्यंत ते कसे पोचवणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डिसले गुरुजींनी एका Click वर शोधली. बाजारातला QR Code किंवा परीक्षेत वापरला जाणारा BarCode आपल्याला आता काही नवा राहिलेला नाही. गुरुजींनी नवीन एवढंच केलं की अख्खं पाठ्यपुस्तक त्यांनी QR Coded केलं. आपल्या शाळेत पहिल्यांदा प्रयोग केला. मग जिल्हा परिषदेत दाखवला. तेथून गुरुजी थेट बालभारतीत जाऊन पोचले. श्रीमती धन्वंतरी हर्डीकर या बालभारतीतल्या संवेदनशील अधिकारी बाईंनी त्याचं महत्त्व ओळखलं. आणि प्रोत्साहन दिलं. डिसले गुरुजींच्या पाठपुराव्यामुळे बालभारतीने म्हणजे महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये सगळी पुस्तकं QR Coded करायचं ठरवलं. पुढे देशभरातल्या अनेक राज्यांनी तोच कित्ता गिरवला.

त्या एका QR Code ने अख्खा धडा जिवंत होऊ लागला. तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही प्रेरणा विद्यार्थी स्नेहाशिवाय, शिक्षणाबद्दलच्या तळमळीशिवाय आणि अध्यापनाच्या सर्जनशिलतेशिवाय मिळूच शकत नाही. या तिन्ही गोष्टी डिसले गुरुजींकडे होत्या. म्हणून त्यांच्या आग्रहाने QR Code चा वापर देशभरातल्या सगळ्या पाठ्यपुस्तकात सार्वत्रिक झाला. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनासाठी आणि अध्ययनासाठी सुद्धा होऊ शकतो हे त्यांना सुचलं. सुचल्यानंतर प्रयत्नपूर्वक त्यांनी ते अमलात आणलं. आणि आपल्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता देशभरच्या पाठ्यपुस्तकांना त्यांनी एका अर्थाने ग्लोबल केलं.

Internet आणि QR Code या दोन तंत्राच्या आधारावर वाडी, वस्तीवरच्या शाळा आणि तिथली मुलं ग्लोबल होऊ शकली याचं अप्रूप Varkey Foundation आणि UNESCO ला वाटलं. कोविडच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे QR Code चं महत्त्व अधिक अधोरेखित झालं. गेल्या वर्षी लोकमतच्या विजयबाबू आणि राजेंद्र दर्डा यांनी डिसले गुरुजींची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला होता. Microsoft ने सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. आता तर थेट जागतिक स्तरावर त्यांची मुद्रा उमटली.

डिसले गुरुजींचं मोठेपण इथेच थांबत नाही. हा शिक्षक जितका सर्जनशील आहे तितकाच संवेदनशील आहे. आणि विनम्रही. म्हणून पुरस्कार स्वीकारताना ही काही आपल्या एकट्याचीच निर्मिती आहे, असं न मानता त्यांनी आपल्या पुरस्काराची अर्धी रक्कम त्यांचे सहस्पर्धक असलेल्या 9 जणांमध्ये शेअर केली. वाटून टाकली. आणि उरलेली अर्धी रक्कम शिक्षणाच्या Innovative Lab साठी वापराचं ठरवलंय. 7 कोटींचं बक्षिस आहे साहेब. पण घरात नाही नेलं. पुन्हा जे कंकण हाती बांधलेलं आहे, त्याच्याशी जोडलं. या पुरस्काराने गुरुजी मोठे झाले खरे, पण आपली बक्षिसाची रक्कम सहस्पर्धकांमध्ये वाटायची आणि उरलेली रक्कम पुन्हा नव्या शैक्षणिक संशोधनासाठी वापरण्याचा निर्धार करायचा, यातून ते आणखीन मोठे झाले.

डिसले गुरुजींनी केवळ तंत्रज्ञानाला असलेल्या बाजारू मर्यादा नाही तोडल्या, तर आपल्या मुलांना बॉर्डर क्रॉस करून जगभरातल्या मुलांशी जोडलं. त्यांना आधुनिकतेची, नवतेची दारं खुली केली. आणि केवळ परितेवाडीच्या मुलांसाठी नाही देशभरातल्या, प्रत्येक शाळेतल्या, प्रत्येक मुलाच्या ज्याच्या पाठ्यपुस्तकात QR Code आता आहे त्या प्रत्येकाचा दरवाजा त्यांनी खोलला आहे. शिक्षणाला कोणतीच बंधनं नकोत, कोणत्याच सरहद्दी नकोत हे त्यांनी सांगितलं. आपल्या देशात माहोल तर असा आहे की प्रत्येकजण स्वतःलाच एक कुंपण घालून घेत आहे. केशवसूत शिक्षक होते. ते म्हणत, 'मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.' धर्म, जाती, प्रांत भेदाच्या भिंती केवळ आपल्याच देशात घातल्या जात आहेत असं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे हरलेत त्यांना मोठी भिंत बांधायची होती, अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना हरवलं. डिसले गुरुजी शिक्षणाला घातलेल्या भिंतीही तोडू मागत आहेत, याचं आधी कौतुक केलं पाहिजे. ब्रिटिशांनी संस्कृत पाठशाळा सुरू केल्या, तेव्हा राजाराममोहन रॉय यांनी आधुनिक शिक्षणाची मागणी केली होती. डिसले गुरुजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या वस्तीवरच्या मुलांसाठी करून देत आहेत. महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारं सगळ्यांना मोकळी केली त्यालाही 170 वर्ष होऊन गेली. आता कमी पटाच्या शाळा बंद करण्याची तरतूद नवीन शिक्षण धोरणात (NEP 2020) आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठल्या हायफाय शाळेतल्या शिक्षकाचा नाही गौरव झाला. शिक्षणापासून आजही वंचित असलेल्या वर्गातली, गावातली मुलं जिथे शिकतात तिथल्या शिक्षकाचा जागतिक सन्मान झाला ही घटना आपल्या सगळ्यांनाच मोठी बळ देणारी आहे.

रणजितसिंह डिसले गुरुजी, खरंच ग्रेट. तुम्हाला सलाम! आणि तुमच्या सारखेच प्रयत्न करणारे देशातले आणि जगभरचे जे जे शिक्षक आहेत, त्यांनाही सलाम!

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)

Wednesday, 2 December 2020

'हाऊस' हाऊस अरेस्ट करू नका!

प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य


महोदय,
कोविडच्या अभूतपूर्व स्थितीमुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घ्यायला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने मान्यता दिली. मात्र आता मुंबईतलं अधिवेशन अवघ्या 2 दिवसात आटोपण्याचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव असल्याचं वाचून साफ निराशा झाली. 

आपल्या खदखदणाऱ्या प्रश्नांवर विधिमंडळात वाचा फुटेल, काही एक निर्णय लागेल ही जनतेची अपेक्षा असताना विधिमंडळाचं अधिवेशन 2 दिवसात आटोपलं जाणार असेल तर वैधानिक आणि संविधानिक जबाबदारीतून सरकार पळ काढतेय असा त्याचा अर्थ होऊ शकेल. कोविडच्या अत्यंत भयकारी आणि जोखीमभऱ्या स्थितीत गेले 9 महिने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अखंड राबत असताना विधिमंडळाचं कामकाज अत्यावश्यक सेवेत येत नाही काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. 

आपादग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने काही एक तात्पुरती मदत केली असली तरी शेतकऱ्यांवरचं संकट संपलेलं नाही. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर 'रान' पेटलं असताना महाराष्ट्र सरकारची त्याबद्दलची भूमिका काय? हे स्पष्ट झालेलं नाही. कोविडची जोखीम पत्करत काम करणारे BEST कर्मचारी, बिन पगारी सेवा देणारे एसटीचे वाहक - चालक, डॉक्टर, नर्सेस, पोलीस, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी ताई आणि शिक्षक हे कोविड काळात योद्धासारखे अजूनही लढत आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. विनाअनुदानित शिक्षक फसवणूक झाल्याने वैफल्यग्रस्त आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबत आपली घोर फसवणूक झाल्याची भावना शेतकरी समाजात पसरली आहे. मराठा तरुण संतप्त आहे. ओबीसी अस्वस्थ आहे. वीज बिलांचा शॉक आणि शेतकऱ्यांची रात्रपाळी कधी संपणार? रिक्त पदांवरील नोकर भरती आणि प्रवेश प्रक्रिया यातल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पदवीधर, तरुण, पालक त्रस्त आहेत. केंद्र सरकारच्या NEP 2020 विरोधात महाराष्ट्र सरकारने अजून ब्र ही काढलेला नाही. राज्यातील विकासाची कामं ठप्प आहेत. वाढवण बंदराच्या विरोधात डहाणूची खाडी पेटली आहे. इतके ज्वलंत प्रश्न असताना विधिमंडळात त्याची चर्चा व्हायला आपण वेळही देणार नसू तर कसं चालेल?

कोंडीत सापडलेली आणि हातावर पोट असलेली महाराष्ट्रातील जनता हाऊस अरेस्ट रहायला तयार नाही. सरकारनेही आता हाऊस अरेस्ट राहू नये. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना हाऊस म्हटलं जातं. दोन्ही हाऊस सुद्धा हाऊस अरेस्ट करणार काय? हा प्रश्न आहे. 

विधिमंडळ कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठका आज होत आहेत. त्यात आशादायक निर्णय व्हावा, ही अपेक्षा आहे. सगळी काळजी घेऊन आपण 2 दिवसांचं अधिवेशन घेणार असू तर तीच काळजी घेऊन किमान 2 आठवड्यांचं अधिवेशन व्हायला काय हरकत आहे? खात्री आहे, आपण सकारात्मक निर्णय कराल.
धन्यवाद!


आपला स्नेहांकित,


कपिल पाटील
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद

दिनांक : 3 डिसेंबर 2020

Saturday, 28 November 2020

सरकारला एक धक्का : 100 दिवसांत 100 टक्के पगार

 

शिक्षक बंधू आणि भगिनींनो,

पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे.

पुणे विभागातून जी. के. उर्फ गोरनाथ किसन थोरात टीडीएफ आणि शिक्षक भारतीचे संयुक्त उमेदवार आहेत.

अमरावती विभागातून शिक्षक भारती आणि सर्व समविचारी संघटनांचे उमेदवार आहेत, दिलीप आनंदराव निंभोरकर.

लोक भारतीच्या या उमेदवारांना आपलं पहिल्या पसंतीचं 1 नंबरचं मत द्या. प्रचंड मतांनी विजयी करा.

या दोन्ही मतदार संघात सत्ताधारी पक्षाच्या आघाडीने सुद्धा उमेदवार उभे केले आहेत. पण आपण सर्वांनी मिळून सत्ताधारी आघाडीला धक्का द्यायचा आहे. याचं कारण असं आहे की, शिक्षक मतदार संघाची निर्मिती भारतीय संविधान सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली ती एका खास उद्देशाने. सेकंड चेंबरमध्ये समाजासाठी आवश्यक असलेले चांगले प्रतिनिधी निवडले जावेत आणि पहिल्या चेंबरमध्ये घाईगडबडीने झालेल्या निर्णयांचा पुनर्विचार सेकंड चेंबरमध्ये झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका होती. बाबासाहेबांच्या या भूमिकेशी इमान राखत, त्या उद्देशाला न्याय देत शिक्षकांचा प्रतिनिधी निवडण्याची एक मोठी जबाबदारी राज्यातल्या शिक्षकांवर आहे. आणि आजवरची परंपरा राहिलेली आहे, कोणताही सत्ताधारी वर्ग असो आताच किंवा मागचा त्यांचं फारसं काही या मतदार संघात चालत नाही. प्रलोभनं, धमक्या, बदल्या, इतर काही गोष्टी यालाही कोणी दाद देत नाही. याचं कारण ज्या उद्देशाने या मतदार संघाची निर्मिती केली गेली त्याची जाण या राज्यातल्या प्रगल्भ आणि प्रबुद्ध अशा शिक्षक वर्गाला आहे.

महात्मा फुलेंची याद येते आज. कारण आज 28 नोव्हेंबर आहे, महात्मा फुले यांचा स्मृतिदिन. त्यांनी हंटर कमिशन पुढे काही मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी होती, सक्तीचं शिक्षण द्या. दुसरी मागणी होती, मोफत शिक्षण द्या. तिसरी मागणी होती, बहुजन वर्गातून शिक्षक निर्माण होऊ द्या. आणि चौथी मागणी होती, शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन द्या. त्यांच्या पत्नी, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी शिक्षणासाठी दिलेलं योगदान आपल्या सर्वांना माहित आहे. महात्मा फुलेंनी जे मागितलं ते या काळातील सत्ताधारी तरी देत आहेत का?

आम्हाला अपेक्षा होती की या राज्यात परिवर्तन झाल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटेल आणि त्यांचे पगार 100% सुरु होतील. प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. उलट 20% चा जीआर काढताना त्यांनी मागच्या 18 महिन्यांचे पगार हडप केले. हे अनाकलनीय होतं. अशा पद्धतीने शिक्षकांची फसवणूक केली जाते आणि पुन्हा शिक्षकांकडेच मतं मागितली जातात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते?

आम्ही सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. निश्चय केलेला आहे. माझं विनम्र आवाहन आहे, पुणे विभागातल्या शिक्षक बंधू, भगिनींनो जी. के. थोरातांना तुम्ही आमदार करा. अमरावती विभागातील शिक्षक बंधू, भगिनींनो दिलीप निंभोरकरांना तुम्ही आमदार करा. माझ्या सोबत हे दोन आमदार द्या. येत्या 100 दिवसांमध्ये घोषित, अघोषित सर्व विनाअनुदानित शाळा, कॉलेजेसमधील 10 ते 15 वर्ष पगाराची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांना 100 टक्के अनुदान नाही तर 100 टक्के पगार मिळवून देण्याचा निश्चय आम्ही करतो आहोत.

दुसरा निश्चय करतो आहोत तो, पेन्शनच्या प्रश्नांचा. पेन्शन प्रत्येकाला मिळालं पाहिजे. भाजपच्या 2004 सालच्या सरकारने पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला. पेन्शनचा अधिकार हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार आहे. तो तत्कालीन भाजप सरकारने हिरावून घेतला. नंतर आलेल्या युपीए सरकारनेही तो अधिकार आपल्याला दिलेला नाही. 1 नोव्हेंबर 2005 पर्यंतचे सगळे कर्मचारी कुठलेही असोत सरकारी, निमसरकारी किंवा अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक असोत ते सगळे पेन्शनला पात्र ठरतात. त्या सगळ्यांना आम्ही निश्चयपूर्वक सांगतो, सगळेच जण निश्चय करू जे पात्र आहेत त्यांना 100 दिवसात जुने पेन्शन मिळालेलं असेल. त्यामागचा जो मुख्य अडथळा होता तो आपण आता दूर केलेला आहे. मधल्या काळात सरकारने काही जीआर काढले होते. पेन्शन आणि पगाराच्या संदर्भातले सगळे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले होते. आपण ते अडवले. कारण पगार हा कायद्याने मिळतो. पेन्शन हे कायद्याने मिळतं.

घोषित, अघोषित सर्व विनाअनुदानित शाळा, कॉलेजमधील शिक्षकांना माझं हेच सांगणं आहे की , अनुदान नका मागू MEPS Act नुसार अनुसूची क नुसार पगार मिळणं हा आपला अधिकार आहे. आणि तो पगार आपण मिळवला पाहिजे. अनुदान नाही. अनुदान मिळवायचंय त्यांना मिळवू द्या. 20%, 40% आम्हाला बिलकुल मान्य नाही. पुढच्या 100 दिवसात आपण निश्चय करूया, विनाअनुदानित शाळा आणि कॉलेजमधील सगळ्या शिक्षकांना 100 टक्के पगार मिळवून देण्याचा. आपण सगळ्यांनी मिळून निर्धार करूया.

तिसरा निश्चय आहे, कोविडच्या काळात शिक्षकांनी डबल डबल ड्युटी केली, काही शिक्षकांचे बळी गेले पण त्यासाठी केलेल्या उपचाराचा खर्च सुद्धा मिळाला नाही. इतका खर्च झाला की प्रतिपूर्तीमध्ये अडचणी आल्या आहेत. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने आपण एक आरोग्य योजना सुरु करतो आहोत. पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षकांना, राज्यातल्या सर्व शिक्षकांना माझं आवाहन आहे हे दोन आमदार निवडून येऊ द्या. आपण सगळे मिळून सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख शिक्षक कुटूंब कॅशलेस आरोग्य योजना राबवूया. खिशात एक रुपया नसला तरी चालेल कॅशलेस कार्डवर आपल्या कुटुंबातील सगळ्यांचे उपचार झाले पाहिजेत, अशी योजना राबवूया.

चौथा निश्चय म्हणजे स्कॉलरशिपचे पैसे मिळण्याचा. एस.सी., एस. टी., ओबीसी, व्हीजेएनटी, एस. सी. बी. सी. आणि मायनॉरिटी या सगळ्यांच्या स्कॉलरशीपचे पैसे थकलेले आहेत. त्यामुळे संस्था अडचणीत आहेत, शिक्षकही अडचणीत आहेत, मुलांवरही अन्याय होतोय. ही थकबाकी मिळवून देण्यासाठी या सरकारला धक्का द्यावा लागेल. आपण सरकारचं ऐकत बसलो, सरकारचा अनुनय करत राहिलो तर काही होणार नाही. मागच्या 5 वर्षामध्ये आपण मागच्या सरकारचं अनुनय करत राहिलो. काय मिळालं हातात?काही मिळालं नाही. आणि आता या सरकारचं आपण ऐकत बसलो तर काही मिळणार नाही. त्यासाठी धक्का दिला पाहिजे.

सगळ्यात मोठं संकट आहे ते NEP 2020 चं. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाचं. हे नवीन शिक्षण धोरण जर अमलात आलं तर या देशातल्या 1 लाख शाळा बंद होणार आहेत. 35 हजार महाविद्यालयं बंद होणार आहेत. खाजगीकरण आणि व्यापारीकरणाला मुक्त परवाना NEP 2020 देतं. या NEP 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पानोपानावर सनातनी, प्राचीन मूल्यांचा गौरव आहे. आधुनिक आणि संविधानिक मूल्यांचा साधा उल्लेखही नाही. एकदाही प्राचीन, सनातनी मूल्यं आली की काय होईल? बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार जाईल.

बहुजनांचं आणि गरिबांचं शिक्षण धोक्यात असताना मी आघाडी सरकारला पुन्हा पुन्हा सांगतोय, शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. राज्याला स्वतंत्र निर्णय करता येतो. तुम्ही ही पॉलिसी रद्द करा. फेटाळून लावा आणि सांगा फुले, शाहू, आंबेडकरांचं हे राज्य आहे. गांधी, नेहरूंचं राज्य आहे. प्रबोधनकार, साने गुरुजींचं राज्य आहे. त्या विचाराने हे राज्य चालेल. ते तसं चालणार असेल तर NEP 2020 रद्द करा. पण सरकारने अजूनही NEP 2020 रद्द केलेलं नाही. म्हणून या सरकारशी सुद्धा दोन हात करावे लागतील. कारण NEP 2020 आलं तर आपल्या सगळ्या सर्व सामान्य माणसाचं शिक्षण दुरापास्त होईल. आपल्या मुलांना जी नवी स्वप्न पाहायची आहेत ती स्वप्न पाहता येणार नाहीत. यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागेल. त्याची सुरवात या निडवणुकीने होऊद्या. अमरावती विभागातून दिलीप निंभोरकर आणि पुणे विभागातून जी. के. थोरात यांना निवडून द्या. पुणे पदवीधरमध्ये शरद पाटील, औरंगाबाद पदवीधरमध्ये सतीश चव्हाण आणि नागपूर पदवीधरमध्ये अभिजित वंजारी यांना आपण पाठिंबा दिला आहे. मात्र शिक्षक मतदार संघात आपण सत्ताधाऱ्यांचे न ऐकता आपले उमेदवार निवडून दिले पाहिजेत. मला खात्री आहे शिक्षक भारती, टीडीएफ आणि लोक भारतीचे उमेदवार पुणे आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी विजयी होतील.
जिंदाबाद!

आपला,
कपिल पाटील
आमदार, महाराष्ट्र विधान परिषद
अध्यक्ष, लोक भारती 
 
छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा, दसरा चौक, कोल्हापूर येथून केलेलं आवाहन (28 नोव्हेंबर 2020)
 

Friday, 13 November 2020

दिवाळीचे दिवे, उजेडाची फुले


दिवाळी
आली की एक व्हॉट्सॲप मेसेज फिरायचा, दिवाळी कुणाची? आपली की त्यांची? ब्राह्मणांची की बहुजनांची? बहुजनांनी अन् बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये? मुस्लिम, ख्रिश्चनांनी करू नये?

आकाश कंदिल खिडकीत लावत असताना या प्रश्नांचा विचार करत होतो. आमचं घर नास्तिक. ना घरात देव्हारा. ना कोणता पूजा-पाठ. पण दिवाळीत भाताचं कणिस लावून दारात तोरण बांधतो. आकाश कंदिल लावतो. घरात फराळ केला जातो. नवे कपडे घालतो. दिवाळीचा आनंद जो घराघरात असतो. तोच आनंद आमच्या घरातही असतो. लहानपणापासून दिवाळीचा हा आनंद मनात साठत आला आहे. माझे ८५ वर्षांचे वडील आजही शेतात राबतात. तेही अधार्मिक. पण आई सश्रद्ध. म्हणून दिवाळीचा आनंद आई वडिलांनी कधी कमी होऊ दिला नाही. मुंबईत तर घरात सगळेच सण जोरात साजरे करतो. बुद्ध पौर्णिमा, ईद आणि ख्रिसमसही. अर्थात शेतकऱ्याचं घर असल्याने दिवाळीचा आनंद काही और असतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी भाताच्या - धानाच्या पेंढय़ा अंगणात रचून उडवं उभं राहिलं की दिवाळीचे वेध लागतात. धान्याच्या राशी अशा अंगणात आल्या की दिवाळी येणारच. तीच धान / धनतेरस.

पहिला दिवा लागतो वसुबारसला. वसू म्हणजे वासुकी राजा. नागवंशी. थेट ब्रह्मदेवाशी लढला. पशुधनाच्या रक्षणासाठी. त्याच्या आठवणीचा हा दिवस.

दुसरा दिवा नरकासुरासाठी. नीतिमान योद्धय़ासाठी.

तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा. पुरोहितांनी त्याचं कर्मकांड केलं. पण ही बाई लढवय्यी. आर्यांशी दोन हात करणारी. त्यांनी पळवून नेलेलं गोधन सोडवून आणणारी. म्हणून धनाला लक्ष्मीचं नाव मिळालं. अशोक राणांनी ती बौद्धानुयायी होती, असं म्हटलंय. 
महालक्ष्मी किंवा गजलक्ष्मी हे सुद्धा गौतम बुद्धांची आई महामाया हिचंच रूप आहे. राजा रविवर्माचं महालक्ष्मीचं चित्र सांची स्तुपावरील महामायेच्या शिल्पावर बेतलेलं आहे. अवैदिकांचं वैदिकीकरण म्हणा किंवा संस्कृती संगम. भारतीयांनी तिची आठवण आजही मनात जपली आहे. समृद्धीची माता म्हणून.

चौथा दिवस बळीराजाचा. दिवाळीचा सणच तर त्याचा. तीन हजार वर्षे काळजाच्या कुपीत जपून ठेवलेली बळीराजाची पणती असंख्य ज्योतींनी उजळते ती ही दिवाळी. वामनाने डोक्यावर पाय ठेवत ढकललं होतं बळीराजाला पाताळात. वामन विष्णूचा अवतार मानला जातो. वामनाचं मंदिर देशात कुठेही सापडत नाही. बळीराजा मात्र आजही हृदयात कायम आहे.

शेतकऱ्याचं दुसरं नाव बळीराजा. काळ्या मातीत राबणारा तो. ऊन, पावसाशी मैत्री करत. ओल्या - सुक्या दुष्काळाशी चार हात करत. सर्जनशीलतेचा फाळ जमिनीत रुजवत नांगरणी करणारा. मढं झाकून पेरा करणारा. असंख्य पोटांची चिंता करणारा. कधी अटळ परिस्थितीशी सामना करणारा. फाळाची तलवार करत लढणारा. पण कधीच दावा करत नाही तो तारणहार म्हणून. मोक्षदाता म्हणून.

त्या बळीराजाच्या स्वागताचा सोहळा म्हणून असते दिवाळी. दक्षिणेत ओणम साजरा होतो, तोही बळीराजाच्या स्वागतासाठीच. केरळात पाऊस आधी येतो. पीकही आधी हाती लागतं. म्हणून ओणमही दिवाळी आधी येतो. जमिनीत पेरलेलं बी, भरलेल्या कणसावाटे तरारून वर येतं. पाताळात ढकललेला बळीराजा पुन्हा भेटायला येतो तो हा असा.

ईडा, पिडा टळो बळीचं राज्य येवो. अशी प्रार्थना प्रत्येक माय त्यादिवशी आपल्या मुलांना ओवाळताना करत असते. अशी प्रार्थना जगात कुठे नसेल. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बळीचं राज्य मागणारी. त्या बळीराजाच्या स्वागताची दिवाळी का नाही साजरी करायची? असंख्य दिव्यांची रोषणाई त्यादिवशी केली जाते. अमावास्या संपून नवा दिवस सुरू होतो तो बळीराजाच्या आठवणीने. प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा तो बळीराजा. त्याच्या बळीवंशाची हकीगत डॉ. आ. ह. साळुंखेंनी सांगितली आहे. ती मुळात वाचायला हवी. दिवाळी साजरी करायची की नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यातून मिळेल.

हा सण असा आहे की तो या देशाशी, त्याच्या निसर्गाशी, शेतीशी आणि शेतकऱ्याशी जोडलेला आहे. अन्नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कर्मकांड करणारे शेंदूर फासत राहणार. पण शेंदराने विदृप केलेला आपला नायक नाकारण्याचं कारण काय? अन् आनंद साजरा करायला धर्माचं बंधन हवं कशाला? अनेक प्रसिद्ध दर्ग्यांमध्ये दिवाळीला दिव्यांची आरास केली जाते. खेड्या पाड्यातले ख्रिस्ती बांधव दिवाळीतही घरात गोडधोड करतात. जैन, बौद्ध, शैव कुणीही असा, बळीराजा त्या प्रत्येकाचा पूर्वज आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद आहे. केरळात ओणमही असाच हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या घरात साजरा होतो.

दिवाळीचा सण सुरू कधी झाला? बौद्ध वाङमयात त्याचं उत्तर सापडतं. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर प्रथमच आपल्या राज्यात म्हणजे कपिल वस्तुला परत आले होते. तो दिवस होता अश्विन अमावस्येचा
. बुद्ध झालेल्या आपल्या पूर्व युवराजाचं स्वागत कपिल वस्तुने दीपोस्तवाने केलं. पहिल्या धानाची खीर बनवली. सम्राट अशोकाने त्या दिवसाला पुढे उत्सवाचं स्वरूप दिलं. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा आणि महात्मा फुलेंनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला तसं. ८४ हजार ठिकाणी स्तुप, विहार, स्तंभ उभे करून दीप दान केलं. पाली - बौद्ध वाङमयात तो दिवस धम्म दीप दान उत्सव म्हणून अधोरेखित आहे. धम्म प्रकाश दिवसो. बौद्ध धर्म जिथे जिथे गेला तिथे तिथे दीप दानाचा उत्सव अश्विन अमावस्येला साजरा केला जातो. भन्ते मोग्गलान यांची हत्या याच दिवशी झाली म्हणून दुःख न करता हजारो धम्माचे दीप उजळा असा संदेश अशोकाने दिला. 

शेवटचे तीर्थंकर महावीरांचं निर्वाण अश्विन अमावास्येलाच झालं. म्हणून जैन दिवाळीत सुतक नाही पाळत. ज्ञानाचा प्रकाश निमाला म्हणून दु:ख नका करू. असंख्य दीप उजळा, असं सांगतात.

'गये से भवुज्जोये, दव्वुज्जोयं करिस्समो'

'ततस्तु: लोक: प्रतिवर्षमादरत् प्रसिद्धदीपलिकयात्र भारते'

दीपावलीचा जैन आणि भारत संदर्भ असा आहे. एक काळ दिगंबर जैन धर्माचा महाराष्ट्रात मोठा प्रभाव होता. तो पुढे ओसरला पण दीपावली मागे ठेऊन.

इतिहास लिहणाऱ्यांचा असतो. 'बळी भारता' ऐवजी वामन अवताराच्या आरत्या लिहिल्या गेल्या. ओणम महाबळीच्या स्वागतासाठी साजरा होतो. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यादिवशी बळीच्या डोक्यावर पाय ठेवणाऱ्या वामनाच्या चित्रासह वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. वामन जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्यांचं आज राज्य आहे. म्हणून बळीराजाला विसरायचं का? अयोध्येत 'रामा'चा पत्ता नाही. सर्वत्र नथुरामाचा प्रयोग सुरू आहे. म्हणून महात्म्याला विसरायचं का? ७० वर्षे होतील आता. कधी हिंमत झाली नव्हती त्यांची. आज वामन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. उद्या नथुराम जयंतीच्या दिल्या जातील. म्हणून घाबरून कसं चालेल. अमावास्येनंतर प्रतिपदा येतेच. बळी प्रतिपदा.

कवी बा. भ. बोरकरांच्या शब्दांत,

नको घाबरू...
पंख आवरू...
अनावरा आकाश खुले
पल्याड आहे प्रकाश तिष्ठत
उजेडाची घेऊन फुले!

कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)

टीप - वरच्या चित्रातली बळीराजाची प्राचीन मूर्ती संग्रहालय शास्त्रज्ञ डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या संग्रहातील. मूळ मुंबईकर कुटुंबांमध्ये बळीप्रतिपदेला (कार्तिक) या मूर्तीची पूजा होते.