आज शहीद दिन. शहीद-ए-आज़म भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्याचा दिवस. गांधींची तेव्हा काय भूमिका होती? सावरकर काय करत होते?
‘४ जून १९४१’ या पुस्तकाचा भाग चौथा -
.........................
भाग ४
'कोई दूसरा ऐसा करता तो मैं इसे गद्दारी से कम न मानता...'
भगतसिंगाचे ते शब्द खूपच कठोर होते. ते कठोर शब्द त्याने वडिलांसाठी वापरले होते.
आपल्या मुलाला फाशी होणार आहे, म्हटल्यानंतर कोणता बाप अस्वस्थ होणार नाही? भगतसिंगाचं घराणं काही सामान्य घराणं नव्हतं. वडील सरदार किशन सिंग आणि काका सरदार अजित सिंग दोघंही शेतकऱ्यांचे नेते होते, स्वातंत्र्यसेनानी होते. महाराष्ट्रातील त्यावेळच्या दुष्काळग्रस्तांना केवढा मोठा आधार दिला होता त्यांनी. १८९८ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या अनाथ मुलांना ते पंजाबात घेऊन गेले होते. आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनाथालय काढलं होतं.
आझादीचा ध्यास आणि क्रांतीची पूजा, भगतसिंग त्यांच्याकडूनच तर शिकला होता. पण लाहोर कटात राजगुरू आणि सुखदेव सोबत भगतसिंगांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा बापाचं हृदय पिळवटून निघालं. का नाही होणार तसं? स्वातंत्र्यसेनानी असले तरी तेही एक बाप होते. अवघ्या २३ वर्षांचा होता भगतसिंग तेव्हा. भगतसिंगांच्या वडीलांनी मुलाच्या बचावासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. भगतसिंगाला मात्र ते आवडलं नाही. खरं तर तो भडकलाच. खुद्द आपल्या वडिलांवर.
४ ऑक्टोबर १९३० ला भगतसिंगाने आपल्या पूज्य पिताजींना पत्र लिहलं. 'तुम्ही वडील आहात माझे म्हणून मला भीती वाटते की, तुमच्यावर दोषारोपण करताना, तुमची निंदा करताना मी सभ्यतेच्या सीमा ओलांडून जाऊ नये. माझे शब्द जास्त कठोर होऊ नयेत.'
भगतसिंगांची जयंती २८ सप्टेंबरला येते. २ ऑक्टोबरला गांधी जयंती. या पाच दिवसात हिंदुत्ववाद्यांचा सोशल मीडिया सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडून वाहू लागतो. एरव्ही सावरकर प्रेमाने उतू जाणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना भगतसिंगाचा उमाळा येतो. २३ मार्चची तारीख उजाडली की अंधभक्तांच्या चॅनलवरून भगतसिंगची फाशी गांधीजींनी का वाचवली नाही? नेहरूनी प्रयत्न का केले नाहीत? अशा बिनबुडाच्या सवालांचा धुरळा उडवायला ते लागतात. सावरकरांना किंवा हिंदुत्ववाद्यांना तो हा प्रश्न विचारत नाहीत.
नास्तिक भगतसिंग
भगतसिंग तर कट्टर हिंदुत्व विरोधी होता. त्याचा कोणत्याच धर्मावर विश्वास नव्हता. तो केवळ धर्मनिरपेक्ष वृत्तीचा नव्हता तर निधर्मी होता. तो निरीश्वरवादी होता. त्याहीपेक्षा तो नास्तिक होता. सावरकर निरीश्वरवादी होते, पण नास्तिक नव्हते. (निरीश्वरवादी होते की नाही प्रश्न आहेच. पण तसा त्यांचा दावा होता.) नास्तिक म्हणजे जे वेदांना मानत नाहीत ते. सावरकर हिंदुत्ववादी होते. देवाला मानत नसतील कदाचित ते पण नास्तिक निश्चित नव्हते. हिंदुत्वाचे जनक होते सावरकर. तर भगतसिंग हिंदुत्वाचा घोर विरोधी होता. सावरकर धर्मद्वेषाच्या राजकारणाचेही जनक होते. फॅसिझमचे पुरस्कर्ते होते. भगतसिंगांना धर्मद्वेषाचं राजकारण मान्य नव्हतं. भगतसिंगांची लढाई ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात होती, तशीच फॅसिझमच्या विरोधातही.
गांधीजी एका अर्थाने धार्मिक होते. ईश्वराला मानत होते. पण गांधीजींचं संपूर्ण राजकारण धर्मनिरपेक्ष होतं. किंबहुना भारतीय धर्मनिरपेक्षतेचा दुसरा समान अर्थाचा शब्द इतिहासात शोधायचा असेल तर तो आहे, गांधी. फॅसिझमच्या विरोधातलं उत्तर जग शोधतं तेही 'गांधीं'मध्येच.
गांधींवरती वर्णाश्रमाचा एक आरोप केला जातो. जो बेबुनियाद आहे. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबेंपासून गांधी आंबेडकरी विचारांचे अभ्यासक निशिकांत कोलगेंपर्यंत सर्वांनी ते आता सिद्ध केलं आहे. वेदांना मानत नाही, ती नास्तिक परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. सावरकर नास्तिक परंपरांचा निषेध करतात. बुद्ध - महावीरांचा धिक्कार करतात. सावरकर वेदांचे समर्थक आहेतच. त्याहून मनुस्मृतीचेही कट्टर समर्थक आहेत. वेदांच्यानंतर सर्वोच्च पूजनीय मनुस्मृतीच असल्याचा दावा सावरकर करतात. अस्पृश्यांसाठी वेगळं पतितपावन मंदिर बांधणारे सावरकर, जातिप्रथेमुळे हिंदू वंशाची पवित्रता कायम राहिल्याचा दावा करतात.
ब्राम्हणी मूल्यांच्या विरोधात गांधी
गांधीजी बुद्ध, महावीरांना आपलं मानतात. गांधीजी अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक हिंदू ग्रंथांची निर्भत्सना करतात. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात म्हणजे १९२१ मध्ये गांधीजी प्रथम आले होते. तेव्हा त्यांनी 'अस्पृश्यतेचं पाप हे ब्राम्हणांची निर्मिती' असल्याचं विधान करून वरिष्ठ वर्णींयांचा रोष ओढवून घेतला होता. तिखट प्रतिक्रिया आल्यावर त्यांनी खुलासा केला की, 'मी ब्राम्हणांच्या विरोधात नाही. गोखलेंना गुरु मानतो. (* सदानंद मोरे - लोकमान्य ते महात्मा) पण अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या ब्राह्मणी ''मूल्यां''च्या विरोधात आहे.'
भगतसिंगने वयाच्या २० - २२ व्या वर्षी जातीप्रथेचा धिक्कार करून अस्पृश्यतेच्या विरोधात लिखाण केलं. सेंट्रल असेम्ब्लीत फेकलेल्या बॉम्बपेक्षा त्याची जाती चिकित्सा अधिक विध्वंसक आहे.
फाशीची शिक्षा होणार हे माहित असूनही भगतसिंग स्वतःला वाचवण्यासाठी यत्किंचितही धडपडत नव्हता. त्याची फाशी वाचावी म्हणून गांधीजींनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. त्याचा हिंसक मार्ग गांधींना पसंत नव्हता. पण त्याच्या साहस आणि वीरतेचं त्यांना कौतुक होतं. (सावरकरांच्या विचारांशी मतभेद असूनही, सावरकरांची अंदमानातून सुटका व्हावी यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले तेही गांधीजींनीच.)
गांधी, नेहरूंच्या पुढाकारानेच समाजवादी क्रांतिकारी नेते आणि राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीतील एक प्रेरक शक्ती, अरुणा असफ अलींचे पती असफ अली, भगतसिंगांचं वकीलपत्र घेऊन उभे राहिले होते. पण भगतसिंगाला वकील घेणंही मान्य नव्हतं. त्याला गुन्हा लपवायचा नव्हता. हसत हसत त्याला फासावर जायचं होतं. माफी मागणं हे सत्याग्रही तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहे, हे माहित असूनही गांधीजी दयेचा अर्ज करून भगतसिंगाची शिक्षा वाचवता येईल का? या प्रयत्नातही होते. अर्थात ते भगतसिंगाला मान्य असणं शक्य नव्हतं. असफ अली भगतसिंगाला समजवायला निघालेही होते. तेव्हा भगतसिंगाने त्यांना भेटायला स्पष्ट नकारच दिला.
भगतसिंगने काय सांगितलं?
आपल्या वडिलांना ४ ऑक्टोबर १९३० च्या पत्रात तो लिहतो, 'तुम्हाला वाटतंय की, मी माझा बचाव करावा. पण तुम्हाला हेही माहित आहे की, मला हे मान्य नाही. मैंने कभी भी अपना बचाव करने की इच्छा नहीं जताई और न ही मैंने कभी इस पर संजीदगी से गौर किया है।'
भगतसिंगाचं हे पत्र त्या पार्श्वभूमीवर आहे, जेव्हा त्याच्या फाशीचा खटला सुरु आहे. वडिलांना तो म्हणतो की, 'तुम्ही राष्ट्रभक्त आहात. स्वातंत्र्यसेनानी आहात. पण कसोटीच्या क्षणी आपण कमजोर पडत आहात. तुमचं हे पाऊल मला मान्य नाही.'
भगतसिंग केवळ शहीद नाही झाले. शहीद-ए-आज़म आहेत आजही ते. वडिलांना लिहिलेले त्यांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. एक नुकतीच मिसरूड फुटलेला तरुण ज्या निग्रहाने, शौर्याने, हिंमतीने, दृढ निश्चयाने, अविचलतेने, निर्भयतेने फाशीचा स्वीकार करतो. फाशीच्या वाटेवर वडिलांना असं पत्र लिहतो, ती भाषा, तो निर्धार यांची तुलना फक्त गांधीजींच्या सत्याग्रहाशीच करता येईल. भगतसिंगाची ही भाषा सत्याग्रहापेक्षा वेगळी नाही. सत्याग्रहात गुन्ह्याची कबुली द्यायची असते. कारण तो ठरवून केलेला आहे. शिक्षेची स्वीकृती आणि परिणामांची पर्वा न करण्याचा निश्चय या सत्याग्रहाच्या पूर्वअटी आहेत.
भगतसिंगचे वडील किशन सिंग यांनी पुढे एकदा आपल्या भाषणात म्हटलं होतं, 'भगतसिंह ने मुझसे कहा कि चिंता मत करो l मुझे फाँसी हो जाने दो l लेकिन उसने मुझसे एक जोरदार दरख्वास्त की - आपको अपने जनरल (गाँधी) का समर्थन करना है l आपको सभी कांग्रेसी नेताओं का समर्थन करना चाहिए l तभी आप देश के लिए आज़ादी जीत पाओगे l'
'इन्कलाब बॉम्ब आणि पिस्तुलाच्या गोळीतून येत नाही. क्रांती हिंसेतून फुलत नाही', असं भगतसिंग सांगतो तेव्हा हिंसेच्या मर्यादा आणि अहिंसेच्या महती तो जणू सांगत असतो. १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीत गांधीजी 'Do or Die', 'करो या मरो'चा आखरी संदेश देतात. तेव्हा हिंसा, अहिंसेच्या निरर्थक वादाला त्यांनी मूठमाती दिलेली असते. पुण्यातल्या शेवटच्या तुरुंगवासात गांधीजींकडे तक्रार जाते, समाजवाद्यांच्या हिंसक कारवायांबद्दल. अच्युतराव पटवर्धन, लोहिया, जयप्रकाश, एस. एम., साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिगत, हिंसक क्रांती लढ्याबद्दल बापूंकडे काही लोक तक्रार करतात. गांधीजी, 'समाजवादी नवतरुणांना 'करो'चा खरा अर्थ कळला आहे', असंच सांगतात. सेवा दलाचे अध्वर्यू ग. प्र. प्रधान आणि इतिहासकार सदानंद मोरे यांनी गांधी समर्थनाचा तो प्रसंग लिहून ठेवला आहे.
हिंसा - अहिंसा
साने गुरुजींनी श्यामच्या पत्रात लिहलं आहे, 'आम्ही हिंसेचे भक्त नसलो तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. आम्ही साधी माणसे. याच घटकेला सारे बदलू दे असे आम्हांला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधुसंतांनी उपदेश केले. परंतु कोणी ऐकले? ख्रिस्ताने सांगितले, ''सुईच्या नेढ्यातून उंट जाईल; परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही.'' कोणी ते ऐकले? कुराण सांगते, ''तू एकट्याने खाऊ नकोस, व्याज घेऊ नकोस.'' परंतु कोण ऐकतो? पठाणही आता सावकार बनले! ''श्रीमंतांनो, तुम्ही ट्रस्टी व्हा'' असे तुम्ही सांगता. कोणता श्रीमंत हे ऐकत आहे? या श्रीमंताविरुध्द आम्ही अहिंसक सत्याग्रह करुन काय होणार? आमच्यावर गोळ्या घातल्या जाणार. आम्ही असे मरायला तयार नाही. उपासमारीने मरण. गोळीबाराने मरण. आमचे रोज मरणच आहे! ज्याच्यामुळे मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभे राहू. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्न नाही. कोटयवधी गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणाऱ्या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे. ती थांबविण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करू. आम्ही रक्तासाठी तहानलेले नाही. परंतु अपरिहार्यच झाले तर रक्त सांडायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हिंसेतून हिंसा निर्माण होते, युद्धातून युद्ध निर्माण होते असे तुम्ही म्हणता. भांडवलशाही समाजरचना आहे, सम्राज्यवाद आहे तोपर्यंतच हे असे चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुसऱ्या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हा जोर करुन त्याचा सूड उगविते. जोपर्यंत अशी ही समाजरचना आहे, तोपर्यंत युद्धे राहणार. शेवटच्या हिंसेने एकदा समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली की स्पर्धा संपेल. साम्राज्ये अस्तगत होतील. मग कोण कोणाशी लढणार? मग हिंसा कोठून दिसेल? हिंसेने हिंसाच निर्माण होईल ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाही.'
आपल्या त्याच पत्रात साने गुरुजींनी गांधीजींना कोट केलंय, 'परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, I see red ruin ahead - पुढे मला रक्तपात दिसत आहे.' सेवा दलातील तरुणांना स्वातंत्र्य युद्धाची हाक देताना साने गुरुजींच्या भाषेत एकाचवेळी गांधी, सुभाष , भगतसिंग येतात. ते त्यात भेद करत नाहीत. गांधींना मानणारे समाजवादी तेव्हा नेताजी सुभाषबाबू आणि शहीद भगतसिंग यांच्यावरही तितकंच प्रेम करत होते. हिंसा, अहिंसेच्या वादात ते पडले नाहीत. क्रांतीत माणसाचं रक्त सांडता कामा नये, ते कमीत कमी सांडेल याची काळजी त्यांनी घेतली. खुद्द भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांनी सेंट्रल असेम्ब्लीत पहिला बॉम्ब टाकला, तेव्हाही त्यांचा कोणाला मारण्याचा उद्देश नव्हता.
हिंसा, अहिंसेच्या नावावर हिंदुत्ववाद्यांनी स्वातंत्र्य लढाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना भगतसिंग, गांधी आणि साने गुरुजी कळत नाही, असं नाही. माहित आहेत. पण त्यांचं हे हिंसेचं तत्वज्ञान ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात कधीच हत्यार बनलं नाही. ते सदैव स्वकीयांचा छळ, शोषण करण्याच्या कामी आलं. भेदभाव आणि धर्मद्वेषाची आग लावण्यासाठी इंधन म्हणून खर्ची पडत आलं. नथुरामी हिंदुत्ववाद्यांनी भारतमातेपेक्षा ब्रिटिशमातेला निष्ठा अधिक वाहिली.
ना माफी, ना बचाव
भगतसिंगांनी ना माफी मागितली, ना वकील केला, ना बचाव केला. स्वतःच्या हाताने पुष्पहाराप्रमाणे फास गळ्यात घातला. 'स्वातंत्र्यवीर' म्हणून ज्यांचा गौरव होतो ते विनायक दामोदर सावरकर यांनी मात्र अंदमानच्या पहिल्या सहा महिन्यातच माफी मागायला सुरवात केली. एक नाही पाच माफीपत्र. अंदमानात जाईपर्यंत सावरकरांच्या क्रांतीकार्याला कितीही मर्यादा असल्या तरी नाकरण्याचं कारण नाही. स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांनी स्वतःच घेतली असली तरी मराठी भाषकांनी त्याच नावाने त्यांचा उल्लेख केला. अंदमानाच्या काळ कोठडीत हजारो भारतीय शहीद झाले. अपरिमित यातना भोगत. महाराष्ट्रातील ४०० जण होते त्यात. परत नाही आले ते. त्यांना कुणी स्वातंत्र्यवीर म्हणत नाहीत. त्यांची ना चिरा ना पणती.
अलीकडेच ज्यांचं निधन झालं ते सेवा दलाचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते मधु अडेलकरांनी त्या अनाम क्रांतीवीरांचा इतिहास शोधून काढला. त्या अनाम वीरांच्या अस्थींचं विसर्जन मुंबईच्या समुद्रात करण्यात आलं. तेव्हा मधु अडेलकर, प्रभाकर कुंटे, प्रकाश मोहाडीकर यांच्यामुळे मलाही त्यात सहभागी होता आलं. त्या अस्थींचं समुद्रात विसर्जन करताना प्रकाश मोहाडीकर, कुंटे या वृद्धांचे हात थरथरत होते. त्या थरथरत्या हातांना स्पर्श करत मी त्या नावेत उभा होतो. तेव्हा समुद्राच्या लाटांबरोबर शहिदांना अनाम ठेवल्याची खंत मनावर आदळत होती.
अनाम वीरांच्याबाबत 'ना चिरा ना पणती' असं म्हटलं जातं. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना डॉ. गणेश देवी यांनी ४०० हून अधिक नावं शोधली. त्या प्रत्येकाच्या गावात जाऊन राष्ट्र सेवा दल 'एक चिरा आणि एक पणती' लावणार आहे. कधी चुकूनही माफी न मागता मरण पत्करलेल्या त्या सर्वांची आठवण स्वातंत्र्यवीर म्हणून करण्याची गरज आहे.
भगतसिंग याचा चौथा सहकारी होता बटुकेश्वर दत्त. सेंट्रल असेम्ब्लीत म्हणजे पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्यात तोही होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अंदमानात काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. त्याने कधीही माफी मागितली नाही. किंवा सुटका करून घेतली नाही. स्वातंत्र्यानंतर भगतसिंगाच्या आईला तो भेटला. आजारपणात त्याचा मृत्यू झाला तोही भगतसिंगाच्या आईच्या मांडीवर. तो फासावर गेला नाही म्हणून भारतीयांच्या विस्मरणात गेला. (कदाचित भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी माफ झाली असती तर? बटुकेश्वर दत्तप्रमाणे त्यांच्याही वाट्याला इतिहासाचं विस्मरण आलं असतं? स्वातंत्र्यसेनानी म्हणून नाव जरूर त्यांचं कदाचित घेतलं गेलं असतं. पण ते शहीद-ए-आज़म ठरले असते?)
भगतसिंग आणि गांधींची भाषा एक
भगतसिंगांच्या त्या पत्राची आठवण गांधी जयंतीला यासाठी काढायला हवी की, हिंदुत्ववादी कितीही प्रचार करोत भगतसिंग आणि गांधीजी यांची सत्याग्रही भाषा एक आहे. ब्रिटिश सत्तेपुढे न झुकण्याचा निर्धार एक आहे. विस्मयचकित करणारी दोघांची निर्भयता एक आहे. कठोरातल्या कठोर शिक्षेची तमा नाही, कारण देशावरची अविचल निष्ठा एक आहे. माफीची, दयेची भीक न मागण्याचा पक्का निर्धार एक आहे.
गांधीजींना 'यंग इंडिया' मधील लिखाणाबद्दल साबरमती आश्रमात १० मार्च १९२२ ला अटक झाली. १८ मार्च १९२२ रोजी त्यांना कोर्टापुढे उभं करण्यात आलं. राजद्रोहाच्या खटल्याखाली. राजद्रोहाचा हा दुसरा खटला होता. त्या कोर्टाचे जज मि. ब्राऊन यांनी स्वतःच त्या खटल्याची तुलना लोकमान्य टिळकांच्या खटल्याशी केली. जज म्हणाले, 'I mean the case against Bal Gangadhar Tilak under the same section. The sentence that was passed upon him as it finally stood was a sentence of simple imprisonment for six years. You will not consider it unreasonable, I think, that you should be classed with Mr. Tilak ... '
गांधीजी म्हणाले, 'I would say one word. Since you have done me the honour of recalling the trial of the late Lokamanya Bal Gangadhar Tilak, I just want to say that I consider it to be the proudest privilege and honour to be associated with his name...'
पण खटल्यातली फक्त हीच वाक्य महत्त्वाची नाहीत. या खटल्यात गांधीजींना गुन्हा नाकारता आला असता. शिक्षेतून सुटका करून घेता आली असती. किमान कमी करून घेता आली असती. गांधीजींनी स्वतःचा बचाव स्वतःच केला. पण बॅरिस्टरी कौशल्य पणाला लावून नाही. बचाव कसला, कबुली जबाब. गांधीजी म्हणाले, '...I do not ask for mercy. I do not plead any extenuating act. I am here, therefore, to invite and cheerfully submit to the highest penalty that can be inflicted upon me for what in law is a deliberate crime and what appears to me to be the highest duty of a citizen. The only course open to you, the judge, is as I am just going to say in my statement, either to resign your post, or inflict on me the severest penalty, if you believe that the system and law you are assisting to administer are good for the people. I do not expect that kind of conversion, but by the time I have finished with my statement, you will perhaps have a glimpse of what is raging within my breast to run this maddest risk which a sane man can run.'
महात्माजींनी कठोरातल्या कठोर शिक्षेचा स्वीकार केला. जजला उलट सुनावलं. कोर्टाला अंगावर घेण्यासारखंच होतं ते. पण त्यांना सुटका करून घ्यायची नव्हती. भगतसिंग आणि गांधीजी यांच्यातलं हे कमालीचं साम्य आहे.
ब्रिटिशांच्या समोर ठीक होत. ते खरोखरीचं शौर्य होतं. पण आजही 'भारत माता की जय' ही घोषणा आपल्या शाब्दिक देशभक्तीची खूण बनली आहे. त्या ऐन स्वातंत्र्य युद्धात कुणी ब्रिटिश मातेचा गौरव केला असता तर? त्याला आजचे अंधभक्त देशद्रोही म्हणाले असते का? खरंच प्रश्न आहे. सावरकरांची माफीपत्र, त्यातली भाषा आणि 'माय'बाप ब्रिटिश सरकारला वाहिलेली निष्ठा त्यांनी वाचली नसेल काय?
सावरकर ब्रिगेड का नाही?
सावरकरांना प्रत्येक क्रांती कार्याचं श्रेय देण्याची जणू स्पर्धा असते. अगदी नेताजी सुभाष बाबूंना आझाद हिंद फौज काढायला सावरकरांनी सांगितलं, इथपर्यंत सांगितलं जातं. भगतसिंगाला सावरकरांनी बॉम्ब मिळवून दिला होता, एवढा शोध लावायचा आता फक्त बाकी आहे. नेताजी सुभाष बाबू सावरकरांना जरूर भेटले होते. पण त्याचवेळी बॅ. महंमद अली जिना यांनाही मुंबईत येऊन भेटले होते. आणि या दोघांकडून निराशा झाल्याचं नेताजींनी भावाला पाठवलेल्या पत्रात लिहून ठेवलं आहे. सावरकरांबद्दल नेताजींनी जे लिहलं आहे, ते वाचल्यानंतर कुणीही सावरकरांना नेताजींचा गुरु मानणार नाही. नेताजी पक्के सेक्युलर होते. साम्राज्यशाहीच्या विरोधात होते. सावरकरांनी प्रेरणा दिली असती तर आझाद हिंद फौजेतली एखादी तुकडी सावरकरांच्याही नावावर असती. तसं झालं नाही. नेताजींच्या आझाद हिंद फौजेत गांधी ब्रिगेड होती. नेहरू ब्रिगेडही होती. राणी लक्ष्मी ब्रिगेड होती. सावरकरांच्या नावाने एकही ब्रिगेड नव्हती. असण्याची शक्यता नव्हती. नेताजींना सावरकर मान्य नव्हते. नेताजी हिटलरला जरूर भेटले, पण सावरकरांना प्रमाणे ते हिटलरप्रेमी यत्किंचितही नव्हते. ब्रिटिश फौजेतील भारतीय जवानांना बाहेर काढत नेताजी जेव्हा आझाद हिंद फौज संघटित करत होते, तेव्हा सावरकर ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचं आवाहन करत होते. अंदमानातून बाहेर पडलेले सावरकर पूर्णपणे ब्रिटिश समर्थक बनले होते. ब्रिटिश सरकार त्यांच्यासाठी मायबाप बनलं होतं. 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' असं अंदमानच्या आधी लिहणारे सावरकर, आता ब्रिटिश मातेच्या सेवेसाठी तळमळत होते.
गांधी, काँग्रेस आणि मुसलमान यांना विरोध करण्याच्या शर्तीच्या करारावरच सावरकर अंदमानातून बाहेर आले होते. सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहलेल्या प्रदीर्घ माफी पत्रात, जे माफी पत्र त्यांनी स्वतःच्या हातांनी Sir Reginald Craddock यांच्या हाती दिलं होतं. सावरकर म्हणतात, 'अनंत उपकार आणि दया दाखवून आपण माझी मुक्तता कराल, तर इंग्रज सरकारच्या प्रति मी निष्ठा राखीन... माझं मत परिवर्तन हे अंतकरणातून झालं आहे. आणि आचरणही पुढे तसंच राहील... जे ताकदवर असतात तेच क्षमाशील असतात. एक बिघडलेला मुलगा परत घरी आला तर तो आईवडिलांच्या दारात नाही येणार तर तो कुणाकडे जाईल...'
इंग्रजांनी दिलेल्या सगळ्या अटी सावरकरांनी स्वीकारल्या आणि त्यांचं पालन अखेरपर्यंत त्यांनी केलं. सावरकरांचं पहिलं माफीपत्र ३० ऑगस्ट १९११ चं आहे. त्यानंतर १९१३. १९१४. १९१८. आणि शेवटचं १९२०. अशा पाच mercy petitions (दयेचे अर्ज) त्यांनी केल्या. ब्रिटिश सरकारच्या प्रति पूर्ण वफादारी आणि समर्थन त्यांनी केल्यानंतरच त्यांची सुटका झाली.
सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर इथून ३० मार्च १९२० ला जो शेवटचा माफीनामा सावरकरांनी पाठवलाय त्यात ते पुन्हा म्हणतात, 'माफी मिळावी म्हणून मी आज हे लिहीत नाहीये. खूप आधीच मी सरकारच्या प्रति निष्ठा आणि समर्पण अर्पण केलं आहे... माझी सुटका माझ्यासाठी नवा जन्म असेल. सरकारची संवेदनशीलता, करुणा माझ्या मनाला आणि भावनांना प्रभावित करील आणि मी व्यक्तीश: सदैव ब्रिटिश सरकारचा होऊन राहीन...'
सावरकरांची सुटका ब्रिटिशांनी अखेर केली. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' या धोरणाला यश मिळायला लागलं होतं. ब्रिटिश योजनेनुसार काँग्रेसच्या लढाईत फूट पाडण्यासाठी हिंदू - मुस्लिम बखेडा उभा करणं आवश्यक होतं. त्यांना हिंदूंचा नेता हवा होता. सावरकर हिंदू महासभेचे नेते झाले. आणि जिना मुसलमानांचे. ब्रिटिश योजनेनुसार सारं काही पार पडलं.
यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातला एक प्रसंग बालाजी जाधव या युट्युबरने नुकताच सप्रमाण सादर केलाय. सावरकर रत्नागिरीला असताना त्यांना भेटायला तरुण यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी गेले होते. भगतसिंगच्या फाशीची बातमी त्यादिवशी देशभर पसरली होती. रत्नागिरीतही लोक दुःख आणि शोक व्यक्त करत असताना सावरकर त्या तरुणांना म्हणाले, 'हा कसला तुमचा हुतात्मा. खरा क्रांतीकारक मी आहे.'
यशवंतराव चव्हाणांची ती सावरकर भेट शेवटची. त्यानंतर त्या वाटेल ते कधी गेले नाहीत.
क्रमशः
- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
--------------------------
याच संदर्भातील इतर ब्लॉग -
४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT
राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १
Tap to read - https://bit.ly/3uKBIfH
जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ
भाग २
Tap to read - https://bit.ly/2RLh41D
काँग्रेसी हिंदुत्वाची डिग्री आणि नथुरामी कटामागचं कारण
भाग ३
Tap to read - https://bit.ly/2UwX43S