Saturday, 4 June 2016

अर्ध्या मुर्ध्या विजयाचा शंखध्वनी



देश कमळमय खरंच झाला काय? दिल्ली आणि बिहारमध्ये करारी हार पत्करुनही भाजप देशाच्या मीडियाला गुमराह करू शकतो. त्याहीपेक्षा इतकी वर्ष सत्तेवर राहिलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला भ्रमित करू शकतो. हे भाजपच्या तंत्राचं खास वैशिष्ट्य. नजरबंदीच्या खेळात संघ-भाजपचा हात कुणी धरू शकणार नाही. पण खरं चित्र काय आहे?

आसाममध्ये 60 जागा जिंकल्या काय, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घोषित केलं की, देश काँग्रेसमुक्त व्हायला सरूवात झाली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियावरच्या प्रतिक्रियांमध्ये खुद्द काँग्रेस नेत्यांनीच हार मानल्यानंतर प्रिंट मीडियाच्या हेडलाईन्सही काँग्रेस मुक्ततेच्याच होत्या. आसाम काँग्रेसच्या हातातून निसटलं हे खरं आहे. पंधरा वर्षे सत्ता होती तिथे. मागच्या विधानसभेत काँग्रेसकडे 78 जागा होत्या आता फक्त 23 राहिल्या आहेत. भाजपला मोठं यश मिळालं आहे. 60 जागा मिळाल्या आहेत. आधीच्या विधानसभेत त्यांच्याकडे फक्त 5 जागा होत्या. आता मुख्यमंत्री भाजपचा आहे. ही मोठी झेप आहे. पण ती एकाकी नाही. काँग्रेसमध्ये पडलेली फूट, आसाम गणपरिषदेची मदत आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या नावाने पेटवलेला मुस्लीमद्वेष यांची बेरीज म्हणजे या 60 जागा आहेत.

आसाम में कमल खिला’, हे खरं पण आसाम बरोबर अन्य राज्यांची हकिगत काय आहे? केरळमध्ये भाजपला फक्त 1 जागा मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त 4. तमिळनाडूत शून्य. पुड्डुचेरी (पाँडेचेरीत) अगदीच शून्य. पाच राज्यात निवडणुका झाल्या. एकूण 822 आमदार निवडून आले. त्यात काँग्रेसचे आहेत 115. भाजपचे 64. म्हणजे भापजच्या दुप्पट जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत. काँग्रेसने 2 राज्ये गमावूनही ही आकडेवारी आहे. बंगालमध्ये तर कम्युनिस्टांची जागा काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसला तिथे 44 जागा मिळाल्या आहेत. तर डाव्या आघाडीला 32. दिल्ली पाठोपाठ पराभवांच्या झटक्यांमुळे काँग्रेस नेतृत्वाला धक्का मिळणं स्वभाविक आहे. पण इतक्या लवकर पराभूत मानसिकतेत काँग्रेसचं नेतृत्व शिरणं हा भाजपचा विजय आहे. काँग्रेसपेक्षा निम्म्या जागा जिंकूनही सगळा देश जिंकल्याची भाषा आणि भारत काँग्रेसमुक्त झाल्याची दर्पोक्ती शहा-मोदींनी केली आहे, मीडिया त्याची री ओढत आहे. त्याचं कारण काँग्रेस नेतृत्वाने स्वीकारलेली पराभूत मानसिकता. केरळ आणि बंगालमध्ये भाजपला 10 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत, ही गोष्ट खरी. पण देश कमळमय खरंच झाला काय? दिल्ली आणि बिहारमध्ये करारी हार पत्करूनही भाजप देशाच्या मीडियाला गुमराह करू शकतोत्याहीपेक्षा इतकी वर्ष सत्तेवर राहिलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला भ्रमित करू शकतो. हे भाजपच्या तंत्राचं खास वैशिष्ट्य. नजरबंदीच्या खेळात संघ-भाजपचा हात कुणी धरू शकणार नाही. पण खरं चित्र काय आहे?





भाजपपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवूनही कॉंग्रेस पिछाडीवर आहे, ही या चित्राची पहिली बाजू. आसाम जिंकूनही भाजपने पाच राज्यं मिळून फक्त 64 जागा मिळवल्या आहेत. जिंकलेल्या आसाममध्ये भाजपला फक्त 29.5 टक्के मतं आहेत. हरलेल्या काँग्रेसला 31 टक्के मतं आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ होता, देशभर घसरण होते आहे. ही या चित्राची दुसरी बाजू आहे. पण ही दोन्ही चित्रं पूर्ण चित्र नाहीत. छापा-काटा या परिभाषेतच भारतीय राजकारणाचं नाणं पाहणाऱयांना भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त तिसरी बाजू कधीच दिसत नाही. पाच राज्यांच्या या निवडणुकीत ना भाजप जिंकला आहे ना काँग्रेस. पाचही राज्यांमधल्या गरिबांनी मतदानातून दिलेला मूक कौल या निवडणुकीच्या निकालाचं चित्र वेगळंच सांगतो. देशातल्या गरिबांचा आकडा मोठा असला तरी त्यांचा आवाज लहान असतो. अनेकदा मूक. ममता, जयललिता आणि केरळात कम्युनिस्ट जिंकूनही आसाममधल्या अर्ध्या मुर्ध्या विजयाचा शंखध्वनी मोठा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी स्पष्टच सांगते की, काँग्रेस, भाजप या दोघांना मिळून मिळाळेली मतं 40 टक्के आहेत. 60 टक्के कौल तिसऱया आवाजाचा आहे. जागांच्या गणितातही तिसऱया आघाडीवरचे प्रादेशिक पक्ष फार पुढे आहेत. काँग्रेसला 115, भाजपला 64 आणि इतर पक्षांना 643. म्हणजे इतर पक्षांचं यश काँग्रेसच्या सहा पट आणि भाजपच्या दस पट आहे. भाजप आणि काँग्रेसचा कार्यक्रम मान्य नसणाऱयांची ही ताकद आहे. आसाममधलं भाजपचं यशही निर्भेळ नाही. हेमंत विश्व शर्मा यांची बंडखोरी काँग्रेसला महागात पडली. भाजपच्या पथ्यावर. आसाम गणपरिषदेशी केलेली युती भाजपला आणखी ताकद देऊन गेली. गेल्या वर्षभरात भाजपने मुस्लीम द्वेषाचे कार्ड इतक्या बेमालूमपणे खेळलं की हिंदू मतांचं धृवीकरण करणं त्यांना सोपं गेलं. दुसऱया बाजूला दहशतवादी कारवायांचा रक्तरंजित इतिहास असलेल्या उच्चवर्णीय बोडो लॅण्डवाद्यांशी भाजपने उघड हातमिळवणी केली. बोडो लॅण्डचं नेतृत्व हिंदू उच्चवर्णीय असल्यामुळे भाजपच्या लेखी ते अतिरेकी, आतंकवादी किंवा देशद्रोही ठरत नाहीत. बोडो लॅण्ड पिपल्स् फ्रंटला 12, आसाम गण परिषदेला 14 आणि भाजपला 60 जागा मिळाल्या. भाजपसाठी हे यश मोठं असलं तरी देशासाठी ते महाग पडणार आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये दुहीचा खेळ आणि द्वेषाचं कार्ड परवडणारं नाही. भाजपला सत्ता मिळाली असली तरी पुढे देशाला किंमत मोजावी लागेल.

देशाच्या निवडणूक पद्धतीत सगळ्यात मोठा दोष आहे तो हा की, एक मताने जिंकलेला जेता असतो. मतांच्या टक्केवारीत त्या त्या सभागृहामध्ये कधीच प्रतिनिधित्व मिळत नाही. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत ज्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत, त्यांचा विजय निर्विवाद मानायला हवा. अशी उदाहरणं आहेत पण कमी आहेत. व्यक्तिगत उमेदवारांच्याबाबत हे सांगता येईल. पण 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून एखादा पक्ष किंवा एखादी आघाडी सत्तेवर आली असं सहसा घडलेलं नाही. आसाममध्ये सर्वाधिक मतं घेणाऱया पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. काँग्रेसला 31 टक्के मतं आहेत. भाजपला काँग्रेसपेक्षा 1.5 टक्के कमी म्हणजे 29.5 टक्के मतं असूनही तो आज सत्तेवर आला आहे. अगदी असंच शिवसेना-भाजप युती 1995 ला महाराष्ट्रात सत्तेत आली होती तेव्हा घडलं होतं. 31 टक्के मतं मिळवूनही शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पराभूत झाली होती. कारण अपक्षांना 23 टक्के मतं मिळाली होती. ते सगळे बंडखोर काँग्रेसी होते. तर शिवसेना-भाजप युतीला फक्त 29 टक्के मतं होती. 73 जागा मिळालेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. 65 जागा मिळालेल्या भाजपचा उपमुख्यमंत्री झाला. त्यावेळी काँग्रेसकडे 80 जागा होत्या तर अपक्ष 45 होते. पण हाच खेळ अनेक राज्यांमध्ये कांग्रेसच्या बाबतीतही झालेला आहे. प्रादेशिक पक्षांवर मात करत केवळ जागांचा खेळ मांडत काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे किंवा टिकवली आहे. आज तोच खेळ भाजप खेळत आहे इतकंच. प्रश्न असा आहे की, मतं जास्त मिळवूनही एखाद्या पक्षाला सत्ता मिळू शकत नाही आणि हरणाऱया पक्षांना त्यांना मिळालेल्या एकंदरीत मतांच्या टक्केवारीत प्रतिनिधित्व मिळत नाही. जो जीता वो सिंकदर. भले मग 1 मताने का असेना. एखाद्या मतदार संघात निवडून आलेला उमेदवार केवळ तो इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक मतं मिळवतो म्हणून निवडून येतो. त्याला पडलेली मतं एकूण मतदानाच्या संख्येत अल्पसंख्य असतात. अपवादात्मक उमेदवारांनीच 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. 30 टक्क्यांहून कमी मतं मिळाली पण उमेदवार निवडून आला हे सार्वत्रिक चित्र आहे. याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवाराच्या विरोधात 70 टक्के मतदार आहेत. केवळ सर्वाधिक मतं आहेत म्हणून अल्पसंख्य मतं मिळवलेला विजयी उमेदवार होतो. विरोधातल्या 70 टक्क्यांचा आवाज सभागृहात पोचत नाही. विभाजित मतदारांना प्रतिनिधित्व नाही. हीच बाब राजकीय पक्षांची आहे. 30 टक्क्यांहून कमी मतं मिळवूनही सत्तेवर पोचता येतं. विरोधातील 70 टक्के मतं विभाजनामुळे सत्तेचा सोपान चढू शकत नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची मतंही 31 टक्के आहेत. मित्रपक्षांसह 39 टक्के. भाजपच्या मित्रांना किमान समान अजेंडा मान्य असेल. संघाचा अजेंडा मान्य आहे, असा त्याचा अर्थ नाही. भाजपचा अजेंडा मान्य नसणारा मतदार वर्ग 60 टक्क्यांहून अधिक आहे. प्रचलित राजकीय भाषेत, सेक्युलर वोट विभाजित आहेत. विभाजनाचं राजकारण सत्ता मिळवून देण्याचं सर्वात सोपं साधन आहे. आपण स्वीकारलेल्या निवडणूक पद्धतीची ती अपरिहार्यता आहे.

आपल्या देशाची संसद आणि राज्यांची विधानमंडळं भारतीय संविधानातून निर्माण झाली असली तरी त्यांच्या निवडणुका मात्र the representation of the people act, 1951 या नुसारच होतात. 1935च्याच ब्रिटिश कायद्याची ती सुधारित पद्धत आहे. त्या कायद्यात आमूलाग्र बदलाची गरज आहे. खरं तर या कायद्यानुसार आपण स्वीकारलेली निवडणूक पद्धत भारतीय संघराज्याच्या मूळ कल्पनेशी फारशी सुसंगत नाही. संविधानाची संघीय रचना आणि सरनाम्यातील उद्देशिका यांच्याशी सुसंगत निवडणूक पद्धत अंगीकारण्याची गरज आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत हाच त्यावरचा उपाय आहे. मतांमधली जितकी भागिदारी तितकी हिस्सेदारी त्या पक्षाला सभागृहात मिळाली पाहिजे. 30 टक्के मतं तर 30 टक्के प्रतिनिधी. अनेक छोटे पक्ष चांगली मतं मिळवूनही सभागृहात आपला प्रतिनिधी पाठवू शकत नाहीत. 5-10 टक्के मतं मिळवणाऱया पक्षांनाही त्यांच्या मतांच्या प्रमाणात सभागृहात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. द्विपक्षीय लोकशाहीचा आग्रह धरणाऱया काही अभिजनांना या छोट्या पक्षांचं, प्रादेशिक पक्षांचं वावडं असतं. पण हा देश इतका बहुवांशिक, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आहे की त्यांचं प्रतिनिधित्वही तितकंच विविध असलं पाहिजे. विविधता हेच भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तमिळनाडूत जयललिता किंवा करुणानिधींचे द्रविड पक्ष असतात. बंगालमध्ये ममता निर्विवाद विजय प्राप्त करू शकतात. आंध्रमध्ये तेलगु देसम सत्तेवर आहे. तेलंगणात टीआरएस सत्तेवर आहे. महाराष्ट्रात शिवसेना आहे. बिहारमध्ये लालू-नितिश आहेत. कश्मीरमध्ये मेहबुबा किंवा उमर अब्दुल्ला असतात. इशान्येकडच्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षही खूप आहेत. हीच कथा दिल्ली, यूपी, हरयाणा, पंजाब या राज्यांची आहे. उत्तरप्रदेशात मायावती तीनदा सत्तेवर आल्या. दलित नेतृत्वाचा पक्षही सत्ता प्राप्त करू शकतो. पण महाराष्ट्राच्या विशिष्ट राजकारणामुळे रिपब्लिकन गटांना सभागृहात पोचण्यासाठी धाप लागते. प्रमाणशीर प्रतिनिधीत्व आलं तर आंबेडकरी जनतेचे किमान 10-12 आमदार सभागृहात पोहचू शकतील.

प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने जातिनिहाय पक्ष वाढतील, ही भीती अनाठायी आहे. उलट राज्यानिहाय विशिष्ट जाती वर्चस्वाचं राजकारण करणाऱया मोठ्या पक्षांना सर्वसमावेशक राजकारणाची कास पकडावी लागेल. जे सर्वसमावेशक राजकारण करणार नाहीत, ते मार्जिनल होतील. लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. ज्यांच्या वर्तुळात आपल्याला स्थान नाही त्या पक्षांना अल्पसंख्य आणि वंचित समूह स्विकारणार नाहीत. ज्यांचा अजेंडा आपल्या वर्गाला न्याय देणार नाही त्यांना दूर करण्याचं सामर्थ्य निर्बल गटांना मिळू शकेल. प्रमाणशीर प्रतिनिधित्व अशा निर्बल, वंचित आणि निराश गटांना विधिमंडळात आणि संसदेत पोचण्याचा मार्ग प्रशस्त करील. हा मार्ग प्रशस्त करण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे.

-------------------------
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्षलोक भारती 
-------------------------

पूर्व प्रसिद्धी लोकमुद्रा मासिक - वर्ष दुसरे, अंक दुसरा, जून 2016

Wednesday, 1 June 2016

शिक्षकांचा अंत किती पाहणार?



मे महिन्याची सुट्टी पडली की, मुंबईतील माझ्या शिक्षकांचे फोन येणं बंद होतं. पण गेले काही दिवस महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांचे फोन येताहेत. फोनची रिंग थांबत नाही आहे. प्रश्न एकच पगार कधी सुरू होणार? राज्यातल्या ६ हजार शाळांच्या सुमारे ५0 हजार शिक्षकांचे पगार गेले १0 ते १५ वर्षे झालेले नाहीत. न थांबणार्‍या फोनबद्दल माझ्या मुलाने विचारलं. माझ्या उत्तरावर त्याचा विश्‍वास बसला नाही. हे कसं शक्य आहे? इतकी वर्षे पगार नाहीत? सरकार देत नाही? पगाराशिवाय शिक्षक काम कसे करतात? हे शोषण नाही का? त्याचे प्रश्न थांबत नव्हते. माझ्याकडे उत्तर नव्हतं. वाचकांचाही कदाचित यावर विश्‍वास बसणार नाही. पण वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांना पगार मिळत नाही. 

आधी विनाअनुदान तत्त्वावरती मान्यता दिलेल्या या शाळा होत्या. तुमचं तुम्ही भागवा, सरकारकडे मागू नका. मोठय़ा शहरांमध्ये विनाअनुदानित मोठय़ा खाजगी शाळांमध्ये पालक फी द्यायला तयार असतात. काही श्रीमंत शाळांची वार्षिक फी ५ ते ७ लाख असते. सामान्यांच्या अनएडेड इंग्रजी शाळांची फीसुद्धा २५ हजारांच्या घरात आहे. जमणार्‍या फीमधून शिक्षकांचे पगार केले जातात. ग्रामीण भागातील अशा शाळांची फी कितीही कमी असली तरी ती भरण्याची कुवत असलेला वर्गच नाही. पालक फी देऊ शकत नाहीत. म्हणून पगार होत नाहीत. सरकारचं अनुदान मिळेल तेव्हा पगार सुरू होईल या आशेवर शिक्षक गेली १0-१५ वर्षे काम करत आहेत. कुणी शिकवणी घेतात. काही मजुरी करतात. काही रिक्षा चालवतात. उद्या उजाडेल या भरवशावर. प्रदीर्घ संघर्षानंतर विनाअनुदान हा शब्द हटला. मग मूल्यांकन सुरू झालं. ४ मुख्यमंत्री झाले. दोन सरकारं झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या शिक्षकांच्या पगारासाठी २0 टक्के तरतूद झाली, असं शिक्षणमंत्री म्हणतात. जून उगवला अजून २0 टक्क्यांचा पगारसुद्धा नाही. 

आता म्हणे ते गुजरात पॅटर्न राबवणार आहेत की आणखी काही. कुणी म्हणतं व्हाऊचर सिस्टीम येणार. कसलाच पत्ता नाही. शिक्षक आणि कर्मचारी अस्वस्थ आहेत. मराठवाड्यात दुष्काळाची जितकी भयान स्थिती आहे, तितकीच या शिक्षकांच्या घरात. आंदोलनाला येणार्‍या शिक्षकांचे चेहरे पाहिले, त्यांच्या अंगावरचे कपडे पाहिले की गलबलायला होतं. कसे दिवस काढत असतील हे सगळे? 

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या प्रत्येकी २ हजार अशा एकंदर सुमारे ६ हजार शाळा आहेत. शासनाच्या कठोर निकषावर उतरलेल्या घोषित शाळांची संख्या १२४३ आहे. तर अघोषित शाळांची संख्या ६00 आहे. घोषित शाळांमधल्या शिक्षकांची संख्या १२ हजार आहे. तर अघोषित शाळांमधल्या शिक्षकांची संख्या साधारण ६ हजार आहे. घोषित शाळेतील शिक्षकांचा फोन आला तर त्यांचा प्रश्न असतो, सर आता हे पगार कधी चालू करणार? अघोषित शाळेतील शिक्षकांचा प्रश्न असतो, सर आमची शाळा घोषित कधी करणार? 

मंत्रालयात कुजबूज अशी आहे, खरं-खोटं तावडे साहेबांना माहीत. पण या शाळांसाठी गुजरात पॅटर्न लावायचं सरकार ठरवतंय म्हणे. तसे व्हॉट्सअ?ॅप मेसेज फिरताहेत. काहींनी अस्वस्थपणे विचारलं, सर ते या शाळांसाठी व्हाऊचर सिस्टीम आणताहेत? शोषण आणि फसवणुकीची ही परिसीमा आहे. मायबाप सरकारच करत आहे. आधीच्या सरकारने इतके वर्षे थकवलं. शिक्षकांना लढत ठेवलं. नवं सरकार आशा लावून गायब झालं आहे. आमचं सरकार आल्याबरोबर १00 टक्के पगार देऊ, असं म्हणणारे आता बोलायला तयार नाहीत. मूल्यांकन चौकशीचं शुक्लकाष्ट मात्र त्यांनी लावून दिलं आहे. 

गुजरातमध्ये शिक्षकांना शिक्षा कर्मी म्हणतात. शिक्षकांचं शिक्षकपण संपवणं, त्यांचा सन्मान काढून घेणं हा गुजरात पॅटर्न आहे. शिक्षकांना कर्मी म्हणणं काय, मित्र म्हणणं किंवा सेवक म्हणणं काय हा अपमान आहे. स्वत:ला गुरुकुल परंपरेतले म्हणवणारे शिक्षकांना गुरू म्हणायला तयार नाहीत. व्हाऊचर सिस्टीम त्याहून वाईट आहे. प्रत्येक मुलामागे सरकार एक व्हाऊचर देणार. शाळेत जितकी मुलं तितकी व्हाऊचर्स. गुजरातमध्ये संख्या आणि रिझल्ट या दोघांशी प्रोत्साहन आर्थिक सहाय्य जोडण्यात आलं आहे. त्यातून शिक्षकांचं कसं भागणार? खरं काय ते तावडे साहेबांनी एकदा सांगून टाकावं. 

आहेत त्या शाळा बंद करायला सरकार निघालं आहे. सरकारची नियत काय आहे? नियत असेल तर या सर्व शिक्षकांना १00 टक्के पगार विनाविलंब सुरू केला पाहिजे. सरकार ऐकणार नसेल, तर प्रचंड स्फोटाला सरकारला तोंड द्यावं लागेल. सरकारने ठरवायचंय, पानं पुसायची की १00 टक्के पगार देऊन शिक्षकांना सन्मानित करायचं. या शिक्षकांचा आणखी अंत सरकारने पाहू नये इतकंच.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १ जून  २०१६


Thursday, 26 May 2016

तुरुंगाच्या अंधार कोठडीत डोकावून पहा




२९ सप्टेंबर २00६. ही तारीख वाहीदसर कधी विसरणार नाहीत. नंतरची पुढची ९ वर्षे, त्यातला प्रत्येक दिवस काळरात्रीसारखा होता. रेल्वे बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. आधी काही दिवस त्यांना चौकशीला बोलवत होते. चौकशी करणार्‍या पोलिसांना खात्री पटली होती, सरांचा काही दोष नाही. पण त्या दिवशी एटीसीप्रमुख रघुवंशी पोलिसांवर डाफरले. नाईलाजाने पोलिसांनी वाहीदसरांना बेड्या ठोकल्या. आरोप बॉम्बस्फोटाचा होता. निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा होता. कोण कशाला ऐकून घेईल. शाळेनेही तडकाफडकी काढून टाकलं. 

पहिले काही दिवस रोज मारहाण होत होती. खुद्द रघुवंशींनी अमानुष मारहाण केली. 'कबूल कर'. 

'संबंध नाही तर कबूल कसं करू? मी शिक्षक आहे'. वाहीदचं ऐकणार कोण होतं? 

९ वर्षे गेली. अखेर कोर्टाने बाईज्जत निर्दोष मुक्त केलं. गेल्या आठवड्यात त्यांची दर्दभरी कहाणी चॅनेलवाले दाखवत होते. शिक्षक असल्यामुळे त्यांना भेटायला बोलावलं. शाळेने पुन्हा सन्मानाने घेतलं आहे. सरकाराचा पगार अजून सुरू व्हायचा आहे. अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनीच वाहीदसरांची हकिकत सांगितली. अंजुमन इस्लाम म्हणजे काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष बद्रुद्दीन तैयबजी यांनी स्थापन केलेली संस्था. शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली. स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक लढाया तिथे आखल्या गेल्या. डॉ. झहीर काझींचं घर स्वातंत्र्य चळवळीतलं. सासरेसुद्धा स्वातंत्र्यसेनानी. रिद्वान हॅरिस, मोईद्दीन हॅरिस. अत्यंत प्रागतिक विचारांचं नेतृत्व अंजुमनला मिळत आलं आहे. त्यांच्या शिक्षकाला खोट्या आरोपाखाली ९ वर्षे सडावं लागलं. 

वाहीदसर एकटेच नाहीत. मालेगावलाही परवा मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या डॉ. अन्सारी आणि इतर सातजणांचा सत्कार झाला. मालेगाव हे कौमी सौहार्दासाठी, जातीय सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी वसवलेले हे गाव. मालेगाव शहराचे नेतृत्वही निहाल अहमद यांच्यासारख्या प्रागतिक समाजवादी नेत्याने अनेक वर्षे केले. सप्टेंबर २00६ आणि सप्टेंबर २00८ असे दोनदा बॉम्बस्फोट झाले. मालेगावच्या तरुण मुलांना उचलण्यात आले. पण एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी बॉम्बस्फोटामागची 'सनातनी' सूत्र खणून काढली. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा भारती यांना गजाआड केले. भगव्या आंतकाचा चेहरा प्रथमच त्यांनी टराटरा फाडला तोपर्यंत आंतकाचा रंग केवळ हिरवा होता. 

दहशतवादाला रंग आणि धर्म आपण जोडतो. दहशतवादाचा उगम धर्मातून नाही, धर्मद्वेषाच्या राजकारणातून होतो. हेमंत करकरे यांनी हिंमत दाखवली नसती तर आपल्यातच दडून राहिलेल्या या भयंकर पाताळ यंत्राचा बुरखा कधीच फाटला नसता. मालेगावातले ते तरुणही १0 वर्षांनंतर निर्दोष सुटले. आता ते तरुण राहिलेले नाहीत. अकाली वार्धक्य आले आहे. ऐन तारुण्याची वर्षे हिरावून घेतली गेली, तरी त्यांच्या मनात राग नाही. मनाच्या तळाशी असलेला गाभारा दु:खाने भरलेला आहे. पण डोक्यात सूडाची भावना नाही. उलट भारतातील न्यायसंस्था जीवंत आहे, न्याय पक्षपाती नाही. याचे समाधान ते व्यक्त करतात. हेमंत करकरे यांच्यासारखे सेक्युलर अधिकारी पोलीस दलात होते, त्यामुळे निरपराधांच्या सुटकेची आशाही होती. वाहीदसर आणि मालेगावचे डॉक्टर म्हणून तर बाहेर आले आहेत. 

महाराष्ट्राच्या आणि देशातल्या तुरुंगात असंख्य निरपराध अजून प्रलंबित खटल्यांच्या निकालाची वाट बघत आहेत. त्यातल्या अनेकांवर साधं आरोपपत्रसुद्धा नाही. किरकोळ गुन्ह्याखाली अटकेत असलेले लोक जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून तुरुंगाबाहेरचा मोकळा श्‍वास घेऊ शकत नाहीत. जे खरोखर गुन्हेगार आहेत, देशाचे शत्रू आहेत त्यांना कायद्यातली कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, पण निरपराध्यांना मरणयातना का द्यायच्या? ९ हजार कोटी बुडवणार्‍या विजय मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्याचा रस्ता खुला करून द्यायचा. त्याचा राजीनामाही स्वीकारायचा. जणू काही सगळं ठरवून, पण सामान्य माणसाला तो न्याय नाही. तुरुंगात खितपत पडलेल्या त्या तरुणांमध्ये कोण आहेत? प्रामुख्याने मुस्लिम, दलित आणि भटक्या विमुक्त जमाती. आर्थिक, सामाजिक लोकशाहीचा स्पर्श अजून ज्या समुहांना झालेला नाही, त्या समुहातले हे लोक आहेत. 

कायद्यापुढे सारे समान असतात, पण काही कायद्यापुढे अधिक समान असतात. त्यांना सर्व सूट आहे. ज्यांना वकील देण्याची ऐपत नाही, जामिनाचे पैसे भरण्याची क्षमता नाही, आपल्यावरचे आरोप कशासाठी याचे उत्तर फक्त तकदीर का लिखा हुआ एवढंच ते सांगू शकतात, ते तुरुंगातली अंधार कोठडी भेदू शकत नाहीत. देशातल्या विषमतेचे, जाती धर्मद्वेषाच्या राजकारणाचे बळी पाहायचेत? तुरुंगातल्या अंधार कोठडीत डोकावून पहा.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २५ मे २०१६


Wednesday, 18 May 2016

पुढच्या 'नीट'चं काय?



राज्यांची सीईटी अमान्य करत 'नीट'च्या बाजूनेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. त्याहीपेक्षा हाल झालेत ते मुलांचे आणि पालकांचे. सीईटी होऊनही तिला मान्यता नाही. शिक्षणमंत्र्यांच्या भरवशावर काही लाख मुलांनी परीक्षा दिली, त्या परीक्षेचा उपयोग नाही. जुलैमध्ये नीटची परीक्षा पुन्हा होईल. पण पन्नास दिवसांत अभ्यास कसा होणार? सीबीएसई बोर्डाची पुस्तकं बाजारात नाहीत. पुन्हा ११वी, १२वी या दोन वर्षांचा अभ्यास करायचा. मोठं कठीण काम आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या दुसर्‍याच दिवशी वर्तमानपत्रांमध्ये मोठ मोठय़ा जाहिराती झळकल्या. नीट क्लासेसचे दुकानदार जणू सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाटच पाहत होते. पन्नास दिवसांसाठी पन्नास हजारांची फी. पुन्हा गॅरंटी नाही. मुलं आणि पालक डिप्रेशन खाली गेले आहेत. 

याला जबाबदार कोण? चर्चा करावीच लागेल. पण आधी या वर्षी नीटग्रस्त झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळवून द्यावा लागेल. पाच दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं होतं, त्यांनीच पुढाकार घ्यावा म्हणून. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना साकडं घातलं तर मार्ग नक्की निघेल. सुप्रीम कोर्ट आणि दिल्लीचं 'आप' सरकार सीईटीच्या विरोधात आहे. निर्णय घेणं सोपं नाही. पण पंतप्रधानांकडे आपल्या मुख्यमंत्र्यांचं वजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांना भेटणार आहेत. या वर्षी झालेली सीईटी ग्राह्य धरण्याचा निर्णय ते घडवून आणतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. 

पण हा घोळ झाला कसा? मुलांची फसवणूक केली कुणी? 

देशव्यापी सामाईक प्रवेश परीक्षा होणार याचे संकेत केंद्र सरकारने २0१0 पासूनच दिले होते. बारावीचा अभ्यासक्रम देशभर समान करण्याची प्रक्रिया तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सुरूही केली होती. शिक्षक भारतीच्या पुढाकाराने मुंबईच्या मुख्याध्यापकांनी २00८ मध्ये तीन राज्यांचा अभ्यास करून अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्र सरकारला केंद्रीय मंडळाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची शिफारस केली होती. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्वत: लक्ष घालून अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया सुरूही केली होती. ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञांची अभ्यास मंडळे राज्यात प्रथमच नेमली गेली. नवीन सरकार आल्यानंतर विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी ही सगळी मंडळं बरखास्त करून टाकली आणि नीट, सीईटी प्रकणात केंद्राच्या विपरीत निर्णय घेतले. नीट की सीईटी या टांगत्या तलवारीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय जास्त जबाबदार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे आता प्रचंड धावपळ करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभारच. पण आधी झालेला गोंधळ त्यांनी नीट निस्तरला असता तर आज महाराष्ट्र नीटग्रस्त झाला नसता. 

राज्यातील सीईटी २0१३ आणि २0१४ मध्ये नीटच्या धर्तीवरच घेतल्या गेल्या होत्या. परीक्षेचा पाठय़क्रम व स्वरूप नीट (युजी)च्या परीक्षेप्रमाणेच होतं. ११वी, १२वीचा दोन वर्षांचा एकत्रित अभ्यासक्रम आणि निगेटिव्ह मार्किंग. या पद्धतीत गेल्या वर्षी दोन बदल करण्यात आले. ३ जानेवारी २0१५ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आणि निगेटिव्ह मार्किंगची पद्धत वगळून टाकली. ९ मार्च २0१५ ला दुसरा निर्णय घेतला आणि अकरावीचा अभ्यास वगळून टाकला. फक्त बारावीच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमावर आधारित २0१५-१६ पासूनच्या परीक्षा घेतल्या जातील, असा तो निर्णय होता. हे दोन्ही निर्णय झाले नसते तर एव्हाना मुलांपुढे इतकं मोठं संकट आलं नसतं. महाराष्ट्रातल्या मुलांची फसवणूक शिक्षणखात्यानेच केली आहे. 

आपला अभ्यासक्रमही जवळपास दिल्ली बोर्डाच्या समकक्ष झाला आहे. पण त्यातही आपल्या राज्य बोर्डातल्या अधिकार्‍यांचा जास्तीचा शहाणपणा मुलांना नडला आहे. अभ्यासक्रम बदलताना ८0 टक्के केंद्राप्रमाणे आणि २0 टक्के राज्याप्रमाणे असं स्वत:च ठरवून टाकलं. हा निकष अपेक्षित होता, तो फक्त भाषा आणि समाजशास्त्र विषयांपुरता. विज्ञान आणि गणित राज्यनिहाय बदलण्याचं कारण काय? जागतिक स्पर्धेत आपली मुलं मागे राहू द्यायची नसतील तर आंतरराष्ट्रीय दर्जा समान शिक्षण महाराष्ट्रातील मुलांना मिळायला हवं. 

पण हे झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हा काही अधिकार्‍यांच्या किंवा खातेप्रमुखांच्या इच्छांचा खेळ नाही. लक्षावधी मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा कुणालाच अधिकार नाही. दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था आणि संधी यांची समानता नसेल तर एचएससी बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतील. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातीमुळे ती दुकानदारी लगेच कळते. पण राज्य बोर्डाकडून मध्यमवर्गीयांना आता इतर बोर्डाच्या विनाअनुदानित शाळांकडे पळवण्याचा डाव लगेच लक्षात येत नाही. अनुदानित शिक्षण मोडून टाकण्याचा एक लांब पल्ल्याचा कट या गोंधळात बिनबोभाट पार पडला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी ठरवलं तर यावर्षीच्या सीईटी परीक्षार्थींना नक्कीच दिलासा मिळेल. प्रश्न पुढल्या वर्षापासूनच्या मुलांचा आहे. राज्य बोर्डातल्या अनुदानित शाळांमधल्या मुलांचं शैक्षणिक कुपोषण वाढवणारे शासन निर्णय बदलले जात नाहीत तोवर काही खरं नाही. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १८ मे २०१६

Wednesday, 11 May 2016

राम नाईकांचं मोठेपण




मृणालताई खासदार झाल्या आणि पाठोपाठ राम नाईक आमदार झाले. मी नुकताच दहावी पास झालो होतो. दहिसरच्या कांदरपाड्यात आम्ही राहायचो. मला मताचा अधिकार नव्हता आणि कांदरपाड्यात त्या वेळच्या जनता पक्षाचं कुणी नव्हतं. या दोघांचेही मी तेव्हा काम केलं. राम नाईक नंतर खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले आणि आता देशातल्या सगळय़ात मोठय़ा राज्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. वय वर्षे ८१; पण बाभूळ झाडासारखे ताठ उभे आहेत. दिवसाचे बारा-बारा तास आजही काम करतात. नुकतंच त्यांच्या आठवणींचं पुस्तक प्रकाशित झालं. 'चरैवेति! चरैवेति!!' यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो होतो.

सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे राम नाईक. नोकरीसाठी ते मुंबईत आले. चर्चगेट स्टेशनवरच्या बाथरूममध्ये ते सकाळचे विधी उरकत. नोकरी करत लॉ शिकले. जनसंघाचं काम करताना कधी सत्तेत जाऊ, याचा विचारही त्यांना शिवला नसेल. आणीबाणीच्या विरोधात जन लाट उसळली. राम नाईक जनता पक्षाचे आमदार बनले ते बोरिवलीसारख्या नवख्या मतदारसंघातून. तीनदा आमदार व नंतर पाचदा खासदार. अभिनेता गोविंदाने पराभूत करेपर्यंत त्यांना पराभव माहीत नव्हता. मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर राम नाईकांना राज्यपाल होण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची विलक्षण हातोटी नाईकांच्या हाती आहे. मतदारसंघावर पकड कशी मिळवावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

राम नाईक पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा कोळीवाड्यांमधून त्यांना एकही मत मिळालं नव्हतं. आता गोराईपासून पालघरमधल्या सातपाटी वडराईपर्यंतच्या कोणत्याही कोळीवाड्यात जा. मच्छीमारांच्या दर्यात राम नाईकांची स्वत:ची एक जागा आहे. बोरिवली-डहाणूच्या ट्रेनला लोकांनी 'राम नाईक एक्सप्रेस' असं नाव ठेवलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्याची मागणी खूप जुनी; पण संसदेत आणि केंद्रात सत्तेत गेल्यानंतर बॉम्बेचं मुंबई करून घेण्याचं श्रेय राम नाईक यांचंच आहे. मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव बदलून शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव सुद्धा नाईक साहेबांचाच. खासदारांना खासदार निधी मिळतो, त्यामागे नाईकांचाच पाठपुरावा होता. त्यांच्या कामाचा धडाका जसा अचंबित करणारा, तसाच तो विषय लोकांपर्यंत नेण्याची त्यांची हातोटीही तितकीच विलक्षण.

वीस-बावीस वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांना विळखा घातला होता; पण त्यातून ते सहिसलामत बाहेर पडले. त्यांचा आजचा कामाचा हुरुप आणि या वयातही ताठ चालणं पाहून कुणी विश्‍वास ठेवणार नाही की, ते कधी काळी कॅन्सरग्रस्त होते; पण त्याकाळात कॅन्सरच्या दुखण्यापेक्षा त्यांना त्रास झाला तो वरिष्ठ निवृत्त अधिकार्‍याच्या आरोपांमुळे. दहिसरच्या शेतजमिनीवरच्या तीन शेतमजुरांच्या झोपड्या पालिकेने पाडण्याचा निर्णय घेतला होता. राम नाईक शेतमजुरांच्या बाजूने उभे राहिले. अतिरिक्त आयुक्त राममूर्तींनी शेतमजुरांच्या बाजूने निर्णय दिला; पण मुंबईचे आयुक्त सदाशिव तिनईकर यांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली. निवृत्तीनंतर तिनईकरांनी थेट राम नाईकांवरच आरोप केले. वर्तमानपत्रात अशा बातम्यांना लवकर प्रसिद्धी मिळते. मी तेव्हा आज दिनांक या सायंदैनिकाचा संपादक होतो. मी राम नाईकांची बाजू घेतली. वीस वर्षांनंतर राम नाईकांनी आपल्या आठवणी लिहिताना आवर्जून त्याबद्दल लिहिले आहे.

'...  त्या मन:स्तापाचा तब्येतीवर परिणाम झाला. पुन्हा रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली; परंतु औषधाच्या जोडीने पत्रकार कपिल पाटील यांच्या शोध पत्रकारितेमुळे मला काहीसा आराम पडला. समाजवादी विचारसरणीचे कपिल पाटील. खरं तर माझे वैचारिक विरोधक. त्या वेळी ते आज दिनांक चालवत. ते तसे लोकप्रिय होते; पण माझ्या शुचितेबद्दल विश्‍वास वाटत असेल किंवा शोध पत्रकारितेच्या स्वभावामुळे, कोणलाही न सांगता कपिल पाटील त्या वादग्रस्त जागेवर गेले. राम नाईक कसे बरोबर आहेत, हे सांगणारा छायाचित्रानिशीचा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. परिणामी, सर्व वृत्तपत्रांनी या वादावर पडदा टाकला.' आपल्या वैचारिक विरोधकाची आठवण इतक्या आवर्जून राम नाईकांनी सांगावी, याचंच अप्रुप वाटतं. काही महिन्यांपूर्वी मी लखनौला गेलो होतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी बोलावून घेतलं होतं. तिथल्या जवळपास दोन लाख शिक्षक मित्रांची नोकरी हायकोर्टाच्या निर्णयामुळे गेली होती. मोठी अस्वस्थता होती. महाराष्ट्रातल्या वसतिशाळेतल्या शिक्षकांचा प्रश्न कसा सोडवला, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं. या प्रश्नावर मी राज्यपालांनाही भेटलो. कारण केंद्राची मदत आवश्यक होती. यूपीचं समाजवादी सरकार भाजपच्या राज्यपालांबद्दल थोडेसे साशंक होतं. राम नाईकांनी राजभवनात मोठय़ा प्रेमाने मला बोलावलं. प्रश्न समजून घेतला. मदतही केली. राजकारण मध्ये आणलं नाही. राम नाईकांच्या राजकीय जीवनातलं सगळय़ात मोठ काम कोणतं असेल तर ते कुष्ठरोग्यांना त्यांनी दिलेल्या सन्मानाचं. बोरिवलीतल्या कुष्ठपीडितांचे प्रश्न त्यांनी सोडवलेच; पण एकदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कुष्ठपीडितांचे गार्‍हाणे घेऊन ते मंत्रालयात गेले होते. कुष्ठपीडितांना मंत्रालयात प्रवेश मिळेना. राम नाईकही हटून बसले. मुख्यमंत्र्यांच्या कानी ही गोष्ट गेली. त्यांनी आवर्जून बोलावलं. खरंच वसंतदादाही मोठे. राम नाईकही मोठे.


(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)



पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ११ मे २०१६

Thursday, 5 May 2016

राज्याचं शिक्षण 'नीट' कधी होणार?



राज्याची सीईटी परीक्षा तोंडावर असताना केंद्राची 'नीट' परीक्षा घेण्याचा निर्णय येऊन आदळला. एव्हाना नीट परीक्षाही झाली. महाराष्ट्रातल्या मुलांना पेपर कठीण गेला. आता या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी याचिका आठ राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने कौल दिल्यास एमबीबीएस आणि बीडीएसला जाऊ मागणार्‍या आपल्या मुलांची सुटका होईल. तसं न झाल्यास महाराष्ट्र 'नीट'ग्रस्त होईल. आपली मागणी तूर्त सीईटीची आहे. किमान दोन वर्षाची सूट हवी आहे. ती आवश्यकही आहे. कारण राज्याची सीईटी दहावी, बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. तर केंद्राची नीट परीक्षा सीबीएसई या केंद्रीय मंडळाकडूनच घेण्यात येत आहे. आपल्या आणि केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमात मोठी तफावत आहे. साहजिकच महाराष्ट्रातल्या मुलांचं नुकसान होणार आहे. फार तर दोन वर्षे सूट मिळेल. थोडा दिलासा मिळेल. पण तो शाश्‍वत उपाय नाही. 

केंद्रीय प्रवेश किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र नेहमीच मागे राहतो. आयआयटी जी ब्रेक करणार्‍या आपल्या विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने कमी असते. परवा नीट परीक्षा देऊन बाहेर पडलेली मुंबई, ठाण्यातील मुलं पेपर कठीण गेला म्हणून रडत होती. त्या मुलांचा दोष नाही. हा दोष राज्य सरकारचा आहे. मागच्या अनेक सरकारांचा आहे. आपण बदलायलाच तयार नाही. मागे राहण्यात धन्यता मानणारे राज्यकर्ते आणि अधिकारी असतील तर मुलांना रडावंच लागणार. 

दहा वर्षांपूर्वी शिक्षक आमदार झाल्या झाल्या मी दोन गोष्टींसाठी सतत आग्रही राहिलो होतो. शिक्षकांना सन्मान मिळावा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी. मुंबईतल्या शिक्षकांचा पगार एक तारखेला सुरू झाला. अभ्यासक्रम बदलाची माझी मागणी होती. आपला अभ्यासक्रम फार जुनाट आहे. पुस्तकं निरस आहेत. उत्कृष्टतेचा अभाव आहे. देशातल्या शिक्षणात आपला सतरावा नंबर आहे, असं सभागृहात अनेकदा ओरडून सांगत होतो. आठ वर्षांपूर्वी नागपूरच्या अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी मला उत्तर दिलं, 'देशात आपण सर्वात पुढे आहोत.' मी कपाळावर हात मारला. अधिकारी ब्रीफ करतात. मंत्री उत्तर देतात. तत्कालीन शिक्षण सचिव माझ्या मताशी सहमत होते. पण महाराष्ट्रातले अधिकारी आत्मस्तुतीत मग्न होते. पुढे शिक्षणमंत्री म्हणून राजेंद्र दर्डा आले आणि शिक्षणखात्याने कात टाकली. मी मुंबईचे काही ज्येष्ठ मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांची तीन अभ्यास पथके तयार केली. दिल्ली, पटणा, केरळ येथे पाठवली. त्यांनी दिलेला अहवाल राजेंद्र दर्डा यांनी स्वीकारला. त्यातल्या सूचनांचं स्वागत केलं. सीबीएसई बोर्डाप्रमाणे गणित आणि विज्ञानाचा अभ्यासक्रम एक करावा, ही त्यातली मुख्य सूचना होती. तेव्हा संजयकुमार शिक्षण सचिव होते. त्यांनी स्वत: मार्गदर्शन केलं. अशासकीय प्रयत्नाचं असं स्वागत पहिल्यांदाच झालं. अभ्यासक्रम बदलाला गती आली. आता आपण जवळपास दहावीच्या परीक्षेत समान अभ्यासक्रम स्वीकारला आहे. खरं तर नववी, दहावी, अकरावी आणि बारावी यासाठी सीबीएसई बोर्डाची गणित, विज्ञानाची पुस्तके जशीच्या तशी स्वीकारावीत हा आमचा आग्रह होता. अजूनही वेळ गेलेली नाही. या चार वर्षांचा अभ्यासक्रम सार्‍या देशात एक व्हायला हवा. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी अडीच वर्षांपूर्वी तसं जाहीर केलं होतं. पण महाराष्ट्रात नवं सरकार येऊनही त्या दिशेने पावलं टाकण्याऐवजी शिक्षकांनाच कमी कसं करायचं यासाठी शिक्षण खात्यात उद्योग सुरू आहे. 

गेल्या काही वर्षांत मोठय़ा शहरांमधे इतर बोर्डांच्या शाळा निघू लागल्या आहेत. एसएससी बोर्डाच्या जुन्या अभ्यासक्रमात टाकण्यापेक्षा केंद्रीय बोर्डाच्या किंवा आयबीच्या शाळांम
ध्ये आपली मुलं टाकण्याकडे उच्च मध्यमवर्गीयांचा कल आहे. त्यासाठी हवे तितके पैसे मोजायला तो वर्ग तयार आहे. या सगळयाच शाळांमध्ये त्या दर्जाचा शिक्षकवर्ग आणि उत्तम व्यवस्था आहे, असं नाही. तरीही तिथे रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे शिक्षण खातं बदलाला तयार नाही. गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या मुलाचं मात्र नुकसान होत आहे. मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमात घातल्याने फरक फक्त माध्यमात होतो. अभ्यासक्रमात नाही. अभ्यासक्रम अद्ययावत केला तर मराठी शाळेतली मुलंही नीट परीक्षेत अव्वल येऊ शकतील. यूपीएससी परीक्षेत गर्दी करू शकतील. आयआयटी जी ब्रेक करू शकतील. भूषण गगराणी यांनी वीस वर्षांपूर्वी मराठीत परीक्षा देऊन यूपीएससी परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण केली होती. त्यांचा मार्ग पुढे अनेक तरुणांनी स्वीकारला. 

अभ्यासक्रम वेगाने बदलायला हवा. विषयातले तज्ज्ञ शिक्षक द्यायला हवेत. राज्यसरकार नीटच्या फेरविचारासाठी सर्वोच्च न्यायालयात जातं आणि दुसर्‍या बाजूला तीन भाषांना मिळून एकच शिक्षक तर गणित, विज्ञानाला एकच शिक्षक नेमा म्हणून फतवा काढतं. समाजशास्त्राला स्वतंत्र शिक्षकच नको म्हणतं. हा उफराटा कारभार मुख्यमंत्र्यांनी थांबवायला हवा. सर्वोच्च न्यायालय दोन वर्ष सूट देईलही. पण पुढे काय? महाराष्ट्रातल्या मुलांचं नुकसान करण्याचा अधिकार शिक्षणमंत्र्यांना कुणी दिला?
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ४ मे २०१६