Tuesday, 26 November 2013

डॉ. बापूसाहेब रेगे यांना आदरांजली.

श्रद्धांजली
केवळ गुणवत्ता यादीतच नाही तर मूल्यशिक्षणात, आधुनिक ज्ञान विज्ञानात आणि जगाच्या स्पर्धेत बालमोहन या नावाने डॉ. बापूसाहेब रेगे शिक्षणाच्या क्षेत्रात एक अमिट मुद्रा सोडून गेले आहेत. The best School throughout India and Europe असा अभिप्राय अमेरिकेतून आलेल्या 25 शिक्षण तज्ज्ञांनी बालमोहनला भेट दिल्यानंतर दिला  होता. दादासाहेब रेगे यांनी लावलेलं हे रोपटं डॉ. बापूसाहेबांनी नावारुपाला आणलं. शाळेच्या दारातच महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचे केवळ त्यांनी पुतळे बसविले असं नाही तर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संस्कार देणारी ही शाळा आहे.

दादर जसं शिवाजी पार्क , चैत्यभूमी यामुळे ओळखलं जातं तसं ते बालमोहन मुळेही ओळखलं जातं.दादरच्या संस्कृतीचं  बालमोहन हे प्रतिक मानलं जाऊ लागलं ते बापूसाहेब रेगे यांच्या असंख्य शैक्षणिक प्रयोगांमुळे सरकारने सुरु करण्याआधीच त्यांनी पहिलीपासून इंग्रजी, कॉम्पुटर  शिक्षण, राष्ट्रीय एकता सफरी, एक सुर एक ताल असे प्रयोग आपल्या शाळेत सुरु केले . मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दादर  हादरलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेतल्या सर्व मुलांना एकाचवेळी धीरोदात्तपणे माणसुकीच्या  शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु... हे समुह गान गायला लावलं होतं.

गेल्या  2 फेब्रुवारीला शिक्षण हक्क वृत्र्ती समितीच्या वतीने मुंबईतल्या सर्व शिक्षकांनी आणि शाळा चालकांनी एकत्र येऊन प्रचंड मोर्चा काढला होता. त्या मोर्च्याची सुरवात बाल मोहनच्या पायरीवरून  झाली होती. त्या मोर्च्याची सुरवात करुन द्यायला  83 वर्षाचे डॉ. बापूसाहेब रेगे प्रकृती ठिक नसतानाही खाली उतरले होते. त्यांना स्वतःला मोर्च्यात चालायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. त्यांच्यावतीने त्यांचे चिंरंजीव गिरीष रेगे मोर्च्यात शेवटपर्यंत अमोल ढमढेरे, प.म.राऊत यांच्या सोबत चालत आले.

बापूसाहेब रेगेंच्या आठवणी दादार आणि शिवाजी पार्कच्या परिसरात कायम दरवळत राहतील.

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Sunday, 17 November 2013

सचिन खेळत होता, तेव्हा अख्खी इंडिया खेळत होती.

अखेर सचिनने मैदानाचा निरोप घेतला. डोळ्यात त्याच्या तेव्हा अश्रू होते. स्टेडियम स्तब्ध होतं. अख्ख्या इंडियाच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं. कारण सचिन खेळतो तेव्हा इंडिया खेळत असते. सचिन आऊट होतो तेव्हा इंडिया आऊट होतो. प्रत्येक भारतवासीयाचं त्याच्यावर प्रेम आहे. म्हणूनच त्याचा हा निरोप चटका लावतो. जणूकाही आपणच आता खेळणार नाही आहोत. खेळायचा आनंद आता घेता येणार नाही. आनंद इतक्या लवकर थोडाच रिटायर करायचा असतो. प्रत्येक भारतीयाचं सचिनशी असलेलं हे विलक्षण नातं जोडलं होतं ते सचिनेच. परवा अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सचिनने 10 रन्स केल्या, 50 केल्या काय किंवा सेंच्यूरी ठोकली काय, ती प्रत्येक रन जणू आपण स्वतः करतो आहोत असं प्रत्येक भारतीयाला वाटतं.

असं नातं आजपर्यंत कुठल्याही खेळाडूचं भारतात निर्माण झालं नव्हतं. प्रत्येकजण त्यात स्वतःला पाहतो. सचिन म्हणून खरा भारतरत्न आहे.

खेळाडू म्हणून तो किती महान आहे, हे सांगण्याची आपली पात्रता नाही. पण तो माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. 200 अनाथ मुलांचा तो सांभाळ करतो, म्हणून हे सांगत नाही. त्यांच्या सासूबाई अनाबेल मेहता यांच्या संस्थेत आणि तसंच अनेकांना तो मत करतो, म्हणून तो केवळ मोठा नाही. क्रिकेटचं  पिच तयार करणार्‍या आणि मैदानाचं रखरखाव ठेवणार्‍या माळ्यांची तो आठवणीने विचारपूस करतो. आऊट होणार्‍या सेहवागवर कोच जॉन राईटने हात उगारला म्हणून सौरभने माफी मागायला सांगितली. तेव्हा वडिलांच्या जागी असणार्‍या राईट सरांकडून माफी मागायला लावणं बरं नाही, हे सचिनच सांगू शकला. शेवटचा सामना बघायला आपल्या आईबरोबर आपल्या गुरुलाही आणण्याची व्यवस्था त्याने केली. पण आचरेकर सरांच्या आजारपणात त्यांची सगळी काळजी आणि व्यवस्था एखाद्या मुलाप्रमाणे सचिननेच केली. अडचणीतल्या अनेक सहकारीक्रिकेटपटूंना व मित्रांना सचिनने मतीचा हात अनेकादा दिला. तोही कोणतीही अपेक्षा न करता.

तो कोणत्याही वादात जात नाही. कुणाशी भांडत नाही. अगी लताबाईंसारखी प्रतिक्रिया देऊन अडचणीतही येत नाही. मी मराठी आहे याचा अभिमान तो बाळगतो. पण सर्व प्रथम भारतीय आहे, असं छातीठोक सांगायलाही तो कचरत नाही. त्याचा एक वेडा चाहता  आहे, सुधीरकुमार चौधरी मुझफ्फर नगर, बिहारचा. त्याच्याही आनंदाला तो आवर्जून साथ देतो. सचिन रमेश तेंडुलकर या माणसाचं हे असं नातं अख्ख्या देशाशी जोडलेलं आहे. पूर्वी गांधी, नेहरु आणि मौलाना आझाद यांच्या सारखे नेते देश जोडण्याचं काम करत. आताचे राजकारणी देश तोडण्याचं काम करतात. आता देश जोडण्याचं काम फक्त एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि सचिन तेंडुलकर सारखे महान खेळाडूच करतात. 

भारत रत्न एकाचवेळी सचिन आणि सी. एन. आर. राव यांना जाहीर व्हावा, याचा म्हणूनच अधिक आनंद आहे. 

आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com



Wednesday, 2 October 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला? आणि खूनी अजून का सापडत नाहीत?





देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवाक्षर सुद्धा कधी काढलं नाही. केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचं काम हा महान सारस्वत करत होता. तरीही त्यांचा खून का झाला? दीड महिना उलटून गेला अजून खूनीही सापडत नाहीत.

डॉ. दाभोलकर हे थेट साने गुरूजी परंपरेतले. सौम्य प्रवृत्तीचे. तरीही सनातन्यांना ते सहन झालं नाही. गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेकडो गावात त्यांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम करायला लावून मंडळामंडळातली व गटागटातली भांडणे मिटवली. गणपती विसर्जन प्रूषणमुक्त व्हावं, नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा यासाठीसुद्धा ते मोहिम चालवत होते. हे  दाभोलकर करू शकत होते कारण श्रद्धांनाही विधायक वळण देता येतं यावर त्यांचा विश्वास होता. सत्य, शिव, सुंराची प्रार्थना म्हणणार्‍या साने गुरुजी परिवारातले ते होते.

ज्या अंधश्रद्धा निर्मूलन बिलाला सनातनीच नव्हे तर राज्यातल्या विरोधी पक्षांनीही जोरदार  विरोध केला, त्या विधेयकात 'श्रद्धा' हा शब्दच नाही. इतकचं कशाला 'अंधश्रद्धा' हा शब्दही त्यात नाही. धर्माचा, कोणत्याच धर्माचा तर मागमूस सुद्धा नाही. तरीही ओरड का होते आहे?

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा हा मूळ ठराव तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होतं त्या काळातला. 18 वर्षांत कायद्याचा मूळ मसुदा पातळ झाला आणि विरोधाची धार मात्र तीव्र. छोट्या निरागस मुलांना पळवून त्यांचा नरबळी द्यायचा. त्यासाठी उद्दुक्त करायचं. मुलींचं आणि स्त्रियांचं लैगिंक शोषण करायचं. म्हणजे फसवून, स्वतः देवपुरूष असल्याचे सांगत थेट बलात्कार करायचा. तंत्र मंत्राच्या नावाखाली अत्यंत विकृत अघोरी प्रथा लादायच्या. हा ज्यांचा धंदा बनला होता, ते कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत नामानिराळे होत राहिले. मानवत खून खटल्यात मारणारे फासावर गेले, मारायला लावणारे कमी शिक्षेने निसटले. हे सारं रोखण्यासाठी कायदा का नको? दाभोलकर फक्त तर एवढंच मागत होते.

तरीही दाभोलकरांचा जीव घेण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली.

साने गुरूजींच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा माणूस अधिक प्रभावी असतो. श्रद्धावानांच्या हृयाला हात घालू शकतो. म्हणून सनातन्यांना तो डेंजरस वाटतो. देव, धर्म आणि श्रद्धा हा ज्यांच्यासाठी धंदा असतो, शोषणाचं साधन असतं, आणि त्याहीपेक्षा राजकारणाचं हत्यार असतं त्यांना दाभोलकर अधिक धोकादायक वाटतात.

तुकाराम त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. ज्ञानेश्वरांचा म्हणून तर छळ झाला. जीवंतपणी विवेकानंद  त्यांना अडचणीचे होते. महात्मा गांधींना मारणार्‍या नथुरामाची परंपरा नवी नाही. धर्माचं दुकान चालवणार्‍यांना खरा धार्मिक अडचणीचा असतो. इहवादी असूनही दाभोलकरांची वाट खर्‍या धार्मिकासारखी होती.

बहुसंख्य हिन्दू समाजाला हे चांगलंच उमजून आहे. तो श्रद्धावान आहे. धर्मपरायण आहे आणि म्हणूनच तो सनातन्यांपासून कायम दूर राहिला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांना छळणार्‍यांची वृत्ती त्यांना माहित आहे. त्यांची नावंही लक्षात राहू नयेत, इतका त्यांना त्याचा तिटकारा आहे. ज्ञानोबा माऊली एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर मात्र वारकर्‍यांच्या हृयात युगानुयुगे सुरु आहे. उदार हिंदू बधत नाही. राजकीय हिंदुत्वाला साथ देत नाही. म्हणून हिंदुंच्या मनात राडा करण्याचा सनातन्यांचा डाव गेल्या दोन अडीच शकांपासून सुरु आहे. बाबरी मशिदिच्या विध्वंसापासून त्याची सुरवात झाली.

नथुराम समर्थनाचं नाटक याच काळातलं आहे, जे अजून सुरु आहे. हे नाटक यासाठी सुरु आहे, की माणसाला मारण्याचं समर्थन करता यावं. खुद्द महात्मा गांधींना मारण्याचं समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगमंचावर गेली अनेक वर्षे होत आहे. केवळ नाटकातूनच नाही अनेक माध्यमातून द्वेषाची होळी पेटवत त्यात उदारता आणि बंधुभावाच्या समिधा टाकल्या जात आहेत. त्यामुळे दाभोलकरांचाही खून पचवता येईल हा त्यामागचा त्यांचा कयास होता.

अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा, दाभोलकरांना गोळ्या लागून मृत्यू आला, ही ईश्वराची कृपाच म्हणायची, असं जयंत आठवले उघडपणे म्हणतात आणि हिंदूंच्या विरोधात विधेयक कशाला अशी ओरड त्यांचं छूपे समर्थन करणारे उजवे पक्ष करतात. वटहुकुम निघाल्यानंतर राज्यात दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत जादुटोणा करणार्‍या बंगाली बाबांना पोलिसांनी अटक केली, ते हिंदू नाहीत. मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असा कायदा करा म्हणणार्‍यांना ही चपराक ठरावी. हे बंगाली बाबा मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात चमत्कार आणि जादूटोण्याला मान्यता नाही. माणसाला चमत्कार करता येत नाही आणि मीही त्यामुळे चमत्कार करु शकत नाही, असं खुद्द मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणार्‍यांना सुनावलं होतं. तरीही बंगाली बाबा जादूटोण्याच्या नावावर लुटालुट करतात, हे काही लपून नाही. कायद्याला धर्म नसतो. पण खोट्या प्रचाराचा धुरळा लोकांच्या डोळ्यात उडवल्याशिवाय खून करता येत नाही. महात्माजींचा खून 55 कोटींसाठी केल्याचा असाच तद्दन खोटा आणि बेशरम प्रचार नथुरामीवादी आजही करतात. विधेयक कोणत्याच धर्माच्या विरोधात नसताना ते हिंदू विरोधी आहे, असा खोटा प्रचार अजूनही सुरु आहे, तो दाभोलकरांचा खून करणार्‍या मारेकर्‍यांच्या समर्थनासाठीच.

तालिबानी असोत किंवा सनातनी दहशतवाद हा दहशतवाद असतो. आणि त्यांची पहिली शिकार ते ज्या धर्मातले असतात त्या धर्मातली माणसंच असतात. सीमेपलिकडच्या दहशतवा़द्द्यानी कश्मिरमध्ये आतंक सुरु केल्यानंतर त्यात जान गेलेले बहुतेक मुस्लिमच होते. शेकडोनी नाही हजारोनी. पाकिस्तानच्या सीमाप्रांतात तालीबान्यांनी गोळ्या घातल्या त्या मलाला युसुफझाईच्या डोक्यात. तीने शाळेत जाऊ नये म्हणून.  महात्माजींना मारणारा नथुराम होता. दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालणारे नथुरामीच आहेत.

नथुरामी प्रवृत्ती केवळ गोळ्या घालण्याचं समर्थनच करत नाही, आसारामच्या बाजूनेही उभी असते. नातवंडांपेक्षा लहान मुलींवर अतिप्रसंग करणार्‍या साधुंमधल्या हैवानाना लपवलं जातं, ते परधर्मीयांच्या द्वेषाआड.

नथुरामी ते आसारामी हे आव्हान परतवून लावायचं कसं?

हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मुलनाचा नाही. ढोंगी बाबांच्या अटकावाचा नाही. ज्ञानेश्वर, कबीरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी या ढोंगी बाबांच्या विरोधात 'जळो त्यांचे तोंड' अशी जबरस्त आघाडी उघडलेली आहे. 'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था उद्धवस्त करावीच लागेल. प्रबोधनाची यात्रा अखंड सुरु ठेवावी लागेल. पण त्यातून नथुरामी ते आसारामी हे आव्हान संपुष्टात येणार नाही. हे आव्हान धार्मिक नाही, राजकीय आहे. त्याला राजकीयच उत्तर द्यावं लागेल. 

नथुरामी आणि आसारामी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आसारामला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आसारामसाठी त्यांनी राम जेठमलानी सारखा नामांकित वकील उभा केला आहे. जेठमलानी काय म्हणाले? त्यांनी दोष त्या निरागस मुलीवरच लावला. तिला म्हणे आजार आहे. Girl has disease which draws her to men. म्हणजे त्या मुलीवर जो अतिप्रसंग झाला त्यात आसारामचा दोष नाही मुलीचाच दोष आहे. इतकं निर्लज्ज विधान राम जेठमलानी कसं करू शकतात? पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी भांडणारे भाजपाचे नेते जेठमलानी यांच्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांचा केक कापतात. आणि दुसऱ्या दिवशी जेठमलानी आसरामाचं वकीलपत्र घेतात. याचा अर्थ काय? 

राज्यातले आणि दिल्लीतीले सत्ताधारी (कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले)  स्वतःला सेक्युलर म्हणवत असले तरी नथुरामी ते आसारामी या पिलावळीला त्यांनीही जागोजागी सांभाळले आहे. सत्तेला धोका येईल, तेव्हाच नथुरामी शक्तींकडे ते बोट दाखवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही फासिस्ट नथुरामी शक्तींच्या अटकावात रस नाही. अन्यथा हेमंत करकरे यांनी सुरु केलेली मोहिम या सत्ताधार्‍यांनी थांबवली नसती. महिना उलटल्यानंतरही खूनी सापडत नाहीत याचं खरं कारण हे आहे.

दाभोलकरांच्या हत्येमुळे राज्यातल्या सगळ्याच विवेकशील, संवेनशील नागरिकांच्या मनात उठाव आहे. नथुरामी फासिस्ट शक्तींच्या विरोधात जे जे डावे पुरोगामी आहेत, फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, उदार वारकरी अन सुफी आहेत. हे सर्वच एकत्र येत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर निर्धार होतो आहे. त्यातून पर्यायी राजकारण उभे राहिले तरच  फासिस्ट शक्ती आणि मतलबी सत्ताधारी यांना उत्तर मिळेल. 


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com

Wednesday, 21 August 2013

हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान!




















समाजवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा निकराने आणि एकजुटीने मुकाबला केला पाहिजे.

नरबळी आणि अघोरी प्रथा-जादुटोणा यांच्या विरोधातलं विधेयक मंजूरकरण्याचं धाडस सरकार दाखवू शकलं नाही. पण समाजसुधारणेसाठी निरलसपणे झुंजणार्‍या विचारवंताला जिवंत राहू देण्याचा हक्क सरकारने दिला नाही. त्यांची सुरक्षा सरकार करु शकलं नाही. ही संतापाची बाब आहे.

सनातन संघटनांवर सरकारने याआधीच बंदी घालणं आवश्यक होतं. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये नाटकाच्यावेळी झालेला बॉम्बस्फोट, मालेगावचा भीषण 
बॉम्बस्फोट आणि अलिकडचं बोधगया या साखळीतलीच ही घटना आहे. सनातन संघटनांनी दाभोळकरांना दुसरा गांधी करु अशी उघड आणि जाहीर धमकी दिली होती त्याची दखल सरकारने घेतली नाही. गरीब शोषितांसाठी संघर्ष करणार्‍या, अन्यायाच्या विरोधात झगडणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावणारं सरकार जातीयवादी फॅसिस्ट शक्तींना मात्र रोखत नाही. हे पुन्हा एका सिद्ध झालं आहे. त्यामुळे फॅसिस्ट शक्तींचा केवळ निषेध करुन भागणार नाही. या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात निकराने लढावं लागेल. राज्यातल्या सगळ्या विवेकशील नागरिकांनी या शक्तींच्या विरोधात एकजुट झालं पाहिजे. तीच नरेंद्र दाभोळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Tuesday, 23 July 2013

मोदी आणि औरंगजेब


                                                                                                                                                                                        Courtesy TOI
शाहजहाँला तुरुंगात टाकल्यावरच औरंगजेबाला सत्ता मिळाली होती. नरेंद्र मोदी यांचा आदर्श औरंगजेबच असावा. पण लालकृष्ण अडवाणी म्हणजे शाहजहाँ नव्हेत. त्यांनी राजीनामा असा फेकला की 'नमोनिया' बुमरँग झालं.


अडवाणी एकटे पडतील. सगळा पक्ष, सगळा देश मोदींच्या पाठी उभा राहिल. ही अटकळ नितीन गडकरी, अरून जेटली, राजनाथ सिंह आणि अशोक सिंघल या चौकडीचीच नव्हती फक्त. मोहन भागवतांचाही तोच कयास होता.

महाभारतातल्या भस्मासुरातली उपमा कोणी नरेंद्र मोदींना दिली. पण नरेंद्र मोदींचा आर्श औरंगजेबच आहे. तीच महत्वाकांक्षा. तोच रस्ता. औरंगजेबाने आपल्या भावांना मारलं. बापाला नाही. नरेंद्र मोदीही औरंगजेबा इतकेच दयाळू आहेत. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जेरबंद केलं की दिल्लीचा दरवाजा आपोआप उघडेल, हा त्यांचा होरा मात्र चुकला. शाहजहाँसारखे अडवाणी दिल्लीचे पातशाह अजून झालेले नाहीत. शाहजहाँची इतर मुलं म्हणजे आपली भावंड औरंगजेबाने मारुन टाकली होती. बादशाह एकटा पडला होता. अडवाणी ना भाजपात एकटे होते ना एनडीएत एकटे आहेत.

मोदी आणि औरंगजेब यांची साम्य स्थळं सांगण्याची फार गरज नाही. दोघांमध्ये एक फरक जरुर आहे. औरंगजेब बादशाह झाला होता आणि मोदी झालेले नाहीत. हा तो फरक नाही. दिल्लीची नाही तर भाजपाची सत्ता मोदींना जरुर मिळू शकेल. रा.स्व. संघाने मोदींना त्यासाठी रस्ता तयार करुन ठेवण्याचं काम सुरु केलं आहे. मात्र भाजपाच्या सत्ताधिशाला देशाची सत्ता मिळतेच असं नाही. जहाल अडवाणींच्या ऐवजी उदार कवीमनाच्या वाजपेयींना देशानं स्विकारलं होतं.

मोदी आणि औरंगजेब यांच्यात फरक आहे, तो राज्यकर्ता म्हणून असलेल्या वृत्तीतला.

हिंदुस्थानचा बादशाह असलेला औरंगजेब आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत कधी हात घालत नव्हता. त्याची कबरही त्याच्या मृत्यूनंतरही तितकीच साधी आणि मातीची राहिली आहे. त्या कबरीवर संगमरवराचा गड कधी चढलेला नाही. त्याचं व्यक्तिगत जीवन त्याने अतिशय साधेपणानं व्यतित वेत्र्लं. असं इतिहास सांगतो. टोप्या विणून तो स्वतःचा खर्च भागवत असे. नरेंद्र मोदी रोज नवं जाकेट घालतात. जाकेट शिवणारा त्यांचा खास टेलर आहे. पॅत्र्शन डिझायनर. आपल्या कपड्यांवर कोणी किती खर्च करायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मायावतींच्या पर्सची आणि जयललितांच्या सॅण्डलस्‌ची चर्चा करायला मिडियाला आवडत असेल तर मोदींच्या जाकेटची का नको. माझा आक्षेप त्यांच्या जाकेटवर किंवा त्यांच्या जीवन शैलीवर नाही. राजकीय व्रत्रैर्याची साम्यस्थळे सांगताना फरकही सांगितला पाहिजे.

म्हातारपणात सत्तेचा हव्यास सुटलेला नाही, अशी अडवाणींवर टिका करणारे अनेक आहेत. परंतु भाजपला 2 वरुन 182 जागांवर नेऊन ठेवणार्‍या त्या पक्षाच्या बापालाच असं एकटं पाडणं भाजपातल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आणि भाजपाशी सुतराम संबंध नसलेल्या करोडो भारतीयांना आवडलेलं नाही. तसं नसतं तर भाजपाचे तमाम नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत अडवाणींच्या पाया जाऊन पडले नसते. मोहन भागवत सरसंघचालक जरुर असतील. पण संघ परिवाराच्या सर्वोच्च चारपाच नेत्यांमध्ये लालवृत्र्ष्ण अडवाणी यांचं स्थान सर्वोच्च आहे, याची कल्पना परिवाराच्या बाहेरच्या फारच थोड्या मंडळींना असेल. अडवाणी वेत्र्वळ संघ परिवाराच्याच सर्वोच्च स्थानी आहेत असं नाही. संघ परिवार देशातला एक प्रवाह जरुर आहे. तो मुख्य प्रवाह नाही. संघाच्या पलिकडचा देश खूप मोठा आहे. विहिरीतल्या बेडकाला बाहेरचं जग माहित नसतं. या बाहेरच्या जगात अडवाणींनी स्वतःचं एक स्थान निर्माण वेत्र्लं आहे. म्हणूनच अडवाणी एकटे पडले नाहीत.

प्रश्न केवळ अडवाणींचा नव्हता. मोदी साहसामुळे आज एनडीएमध्ये पुत्र्ट पडली आहे. अडवाणींना वजा करुन होणार्‍या राजकारणाने एनडीए एक राहू शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ज्या कारणासाठी अडवाणी टोकाचं पाउत्र्ल उचलतात, त्याच कारणावरुन  अन्य सेक्युलर घटकांनी मोदींच्या भाजपाला साथ का द्यावी?  मोदी भाजपाचा उद्या जरुर ताबा घेऊ शकतील. पण देशाचं स्टेअरींग मोदींच्या हाती कधी लागणार नाही. संघ म्हणजे देश नाही. भाजपा म्हणजे देश नाही. मोदी म्हणजे देश तर बिलकुल नाही. हा देश एका जातीचा, एका धर्माचा, एका भाषेचा, एका विचारांचा, एका संस्कृतीचा कधीच नव्हता. हिंदुत्वाच्या, वर्ण वर्चस्वाच्या एका पोषाखात हा देश, त्यांनी किती आटापिटा केला तरी संघ संचलन कधीच करणार नाही. तिथे मोदीचं फासीस्ट नेतृत्व स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही.

मोदींच्या विकास नितीचं या देशातल्या लब्ध प्रतिष्ठीतांमधल्या एका वर्गाला जरुर आकर्षण आहे. मोदी कसे नॉन करप्ट आहेत आणि विकासाचा एक्सप्रेस हायवे फक्त गुजरात मधूनच धावतो अशा कथा रंगवणं कॉर्पोरेट जगताला आणि त्याची बटिक असलेल्या मिडीयाला सोयीचं आहे. पण मोदींचा विकासाचा रस्ता नैसर्गिक संसाधनांच्या विखारी ओरबाडण्यातून, भूमिपुत्रांच्या र्निय विस्थापनातून, शोषितांच्या शोषणातून आणि रक्तरंजित द्वेषातून बांधला गेला आहे.

परवा ते पुण्यात येऊन गेले आणि शिक्षण क्षेत्राचा स्वतःचा तथाकथित अजेंडा त्यांनी जाहीर वेत्र्ला. तेव्हापासून देशातील शैक्षणिक व्रत्रंती जणू गुजरातमध्ये झाली असं चित्र संघ परिवारातला मिडीया रंगवत आहे. पण वस्तुस्थिती अलग आहे. गुजरातचा नंबर महाराष्ट्राच्या खाली आहे. महाराष्ट्र 9व्या नंबरवर आहे. गुजरात 13 व्या नंबरवर आहे. बर्‍याचा कम्युनिस्ट, कधी काँग्रेसच्या ताब्यात राहणार्‍या वेत्र्रळने पहिला नंबर सोडलेला नाही. जीडीपीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. गुजरात खूप मागे आहे. शेती क्षेत्रातलं किमान वेतन महाराष्ट्रात 120 रुपये आहे. बिहारमध्ये 109 ते 114 रुपये आहे. तर गुजरात मध्ये 100 रुपये आहे.

State or

union territory
Crore Rupees 2011-12 nominal GDP
Billions

USD FY11-12 Nov 2012 INR rates
Per capita GDP INR
India
8,353,495
$1,564.96
61,564
Maharashtra
1,248,452
$233.89
101,314
Andhra Pradesh
676,234
$126.61
71,540
Uttar Pradesh
6,76,083
$125.86
30,051
Tamil Nadu
639,024
$119.72
84,496
Gujarat
613,172
$116.14
89,668

गुजरातने सिंचनात आणि उद्योगात महाराष्ट्राच्या पाठोपाठ नक्कीच प्रगती केली आहे. मात्र ही प्रगती केवळ मोदींच्या काळातली नाही. त्यांच्या आधीच्या किमान पाच मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी या विकासाची पायाभरणी केली आहे. त्याचा उल्लेखही मोदी करत नाहीत. जणू त्यांच्या आधी गुजरातमध्ये अंधाराचं राज्य होतं.

नर्मदा सरोवर योजनेचं श्रेय मोदींचे खचित नाही. त्यांच्या काळात ती पूर्णत्वाला जाते आहे इतकंच. पण त्या नावावरही निर्लज्ज खोटेपणाची मोदी कमाल करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला 400 कोटी रुपये किमतीची मोफत वीज मिळू शकत नाही. असा आरोप त्यांनी नुकताच पुण्यातल्या सभेत वेत्र्ला. त्यांच्या आरोपाला नर्मदा बचाव आंदोलनानेच जे उत्तर दिलं आहे, ते लोकसत्तेत प्रसिद्ध झालं आहे. खाली ते दिलं आहे. मोदींचा खोटेपणा सिद्ध करण्यास ते पुरेसं ठरावं.

गुजरात तिसर्‍यादा जिंकल्यानंतर थेट पंतप्रधानकीचं स्वप्न आता मोदी पाहत आहेत. पी.एम. मोदी म्हणून त्यांचं मार्केटींग सुरु आहे. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून 15 हजार माणसं वाचवल्याचा दावा त्यांनी केला. जे काम सैन्याला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मुंबईतलं त्यांचं भाषण आणि त्यांचा अ‍ॅटिट्युड ज्यांनी पाहिला असेल त्यांनी त्यातून झिरपणारा नथुरामी अहंकार जरुर पाहिला असेल. उदारतेची, राम राज्याची झुल त्यांनी किती पांघरु देत, त्यांच्यात दडलेलं हिंस्त्र श्वापद दडून राहत नाही.

सरकार प्रायोजित गुजरात दंगली नंतर मोदींना बदलण्याचा निर्णय त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. मोदींना त्यांनी राजधर्माची आठवण करुन दिली होती. अडवाणी यांनी मात्र त्यावेळी मोदींची बाजू घेतली. त्यांना संरक्षण दिलं. त्याच अडवाणींना बाजूला ढकलत मोदी घोड्यावर स्वार झाले. गोव्यात त्यांनी अडवाणींचं नावं सुद्धा घेतलं नाही.

गोव्यात त्यांनी काय भाषण केलं? मोदी म्हणाले, ''गोवा मेरे लिए लकी है. इसी गोवा मे मुझे गुजरात चलाने का लायसन मिला.''

राज्य म्हणजे काय दुकान आहे? की कसला ठेका आहे? पवित्र मातृभूमीचे स्तोत्र गाणार्‍या संघ पुत्राच्या लेखी मातृ भू म्हणजे दुकान आणि ठेका असेल तर त्याला काय म्हणायचं?

सार्वभौम जनतेचं राज्य चालवणं हा ठेका मानणार्‍या वृत्तीच्या हातात देशच काय ते राज्यही कायम ठेवणं त्या राज्यासाठी, लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अडवाणींना सुद्धा टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल, नितिशकुमार, शरद यादवांना त्यांच्यासोबत राहू नये असं वाटत असेल तर देशाच्या जनतेने काय ठरवायचं?

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोकभारती
kapilhpatil@gmail.com

     _______________________________________________
मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेन
Jul 22, 2013, 03.32PM IST  
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे आर्थिक विकासाचे मॉडेल राबवले ते मला अर्थशास्त्रज्ञ म्हणून अयोग्य वाटते. म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझ्या भारतीय मनाची इच्छा आहे, असे विधान नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले आहे.
सीएनएन-आईबीएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सेन यांनी हे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी मोदींचा हा विकास सर्वसमावेशक नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात.
विकासाला सामाजिक बदलांपासून वेगळे करता येत नाही. फक्त उच्च विकास दर हा गरीबी निर्मुलनाचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक विकास महत्त्वाचा आहे. असे सांगत डॉ. सेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे.http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Amartya-Sen-dont-want-Narendra-Modi-as-PM/articleshow/21243530.cms 
     _______________________________________________