Tuesday, 2 June 2015

पिशाच्च्यांची भानगड


जनता परिवाराच्या होऊ घातलेल्या एकत्रीकरणाची दखल मोदींच्या आधी मोदी भक्तांनी घेतली आहे. ‘पिशाच्चापाशी पिशाच्च गेलेअसं वर्णन या एकत्रीकरणाचं ही मंडळी करताहेत. भूतं खरी नसतात ती मनात असतात. जनता परिवाराची भीती मोदी परिवारामध्ये किती आहे याची ही सूचक प्रतिक्रिया आहे. जनता परावारातील यादव मंडळी, देवेगौडा, नितिश कुमार, मोररका आणि चौटाला ही सगळी पिशाच्च असल्याचं वर्णन व्हावं इतकी का भीती असावी? दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अडलेला अश्वमेधाचा घोडा या पिशाच्चांच्या वाटेवरुन कसा धावेल याची ती चिंता आहे

जनता परिवाराचे राज्यसभेतले नेते शरद यादव नुकतेच मुंबईत येऊन गेले. डॉ. जी. जी. पारीख यांच्या सत्काराच्या निमित्ताने. अनेक फाटाफुटी होऊनही डॉ. लोहियांचा सामाजिक न्यायाचा प्रयोग उत्तर भारतात यशस्वी झाला. पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मात्र हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांची समाजवादी पार्टी सत्तेवर आहे. अखिलेश मुख्यमंत्री आहे. बिहारमध्ये नितिशकुमार मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही राज्यातले विरोधी पक्षही सामाजिक न्यायाचं राजकारण करणारे होते किंवा आहेत. लालू प्रसाद यादव विरोधी पक्षात होते. युपी मध्ये मायावती आहेत. डॉ. लोहिया आणि एस.एम.जोशी यांच्या समवेत लोकशाही समाजवादी विचारांचा रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचं स्वप्न पाहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव घेत कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात सत्ता आणली होती. उत्तर भारताच्या राजकीय ध्रुवीकरणात हा परिवार जेव्हा एकत्र असतो तेव्हा भाजप आणि काँग्रेस परिघाच्या बाहेर फेकले जातात हा आजवरचा इतिहास आहे. जनता परिवार नावाच्या पिशाच्चांची भिती मोदी भक्तांना त्यामुळेच वाटते आहे.

शरद यादव म्हणाले ते खरं आहे. लोहियांच्या पाठोपाठ मधु लिमये यांनी उत्तर भारतात समाजवादी पक्ष बहुजन आणि दलित मागास जातींमध्ये रुजवला. वाढवला. जातीग्रस्त सरंजामी व्यवस्थेचे सर्वाधिक चटके भोगणाऱयांना उत्तर भारतात समाजवादी किंवा आंबेडकरी विचारांची गरज जास्त भासणं हे स्वाभाविक आहे, यादव, पासवान, कर्पुरी ठाकूर, नितिश कुमार हा केवळ जाती समुहांच्या नेत्यांचा गोतावळा नाही. लोहीयांच्या सप्तक्रांतीने भारावून उभं राहिलेलं आणि जयप्रकाशजींच्या चळवळीत तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे. युपीए, एनडीए काळातल्या घोटाळ्यांच्या तुलनेत अगदीच किरकोळ असलेल्या चारा घोटाळ्याच्या नावाखाली लालू प्रसाद यादव बदनाम झाले. पण रेल्वे फायद्यात आणणं आणि माळरानात कुरणावर म्हशी वळणाऱया मुलांसाठी शाळा सुरु करणं याचं श्रेय लालूंनाच द्यावं लागेल. लालकृष्ण अडवाणींचा रथ लालूंनी अडवला नसता तर त्यांना बदनामही केलं गेलं नसतं.

सगळे यादव आणि उत्तरेतले समाजवादी एकत्र आले म्हणजे लगेच जादू होईल असं नाही. पण ते जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेव्हा उत्तर भारतातल्या राजकारणात उलथापालथ होत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या चाणक्ष राजकारण्याला ते अचूक कळतं. मुलायमसिंग यांचा पणतू आणि लालू प्रसाद यादव यांची कन्या यांच्या साखरपुड्याला आणि लग्नालाही त्यांनी हजेरी उगाच लावली नाही. पिशाच्चांच्या घरच्या लग्नाला कशाला जा असा विचार त्यांनी केला नाही.

ही पिशाच्चांची भानगड महाराष्ट्राच्या खूप जवळची आहे. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचा वारसा उत्तर भारतात थेट कश्मिरपर्यंत, अटकेपार अगदी दुनियाभर नेण्याचं काम या पिशाच्चांनीच केलं. पैशाची ही पिशाच्चांची भाषा. दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनांच्या दरबारातील महापंडित गुणाढ्याने महाराष्ट्री भाषा आणि संस्कृतीतल्या पंचतंत्रादी बृहद कथा पैशाची भाषेतूनच उत्तरेत नेले. कश्मिरच्या क्षेमेंद्र आणि सोमदेवांनी त्यानंतर सातशे वर्षांनी त्या संस्कृतात आणल्या. आणि त्या आधीच पहेलवी भाषेतून अटकेची सीमा ओलांडून आखातात आणि युरोपात पंचतंत्रही जाउढन पोचलं होतं. विध्यांच्या पलिकडे पैशाची भाषेचा बोलबाला होता तर अलिकडे महाराष्ट्रीचा दबदबा. पिशाच्च आणि पैशाची यांनीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीचा डंका दीड-दोन हजार वर्षापूर्वीच जगभर नेऊन पोचवला. उत्तर भारतात पिशाच्चांची राज्य स्वातंत्र्योत्तर काळात येऊ शकली कारण महाराष्ट्रातले मधु लिमये तिथे जाऊन बसले होते म्हणूनच. या पिशाच्चांनी फुले, शाहू, आंबेडकरांशी आपलं नातं कृतज्ञतेने जपलं आहे. तेव्हा पिशाच्च मंडळी एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे की.

कपिल पाटील 
________________________

No comments:

Post a Comment