प्राथमिक शिक्षकांच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी सरकारनेच 6 दिवसांची
विशेष रजा दिली काय आणि कोण गदारोळ उठला. शिक्षक ऐरोलीला पोहचेपर्यंत औरंगाबाद हायकोर्टाने
ती विशेष रजाच रद्द करुन टाकली. एका चॅनलवर तर राज्यातल्या तमाम शिक्षकांचा मास्तुऽऽर्डे
म्हणून उद्धार करण्यात आला. शिक्षकांच्या सुट्टीचा बाऊ करु नका, असा सल्ला खुद्द
शरद पवार यांनी दिला. तर हायकोर्टाचा निर्णय त्यांना मान्य नाही काय? म्हणून सवाल
केला गेला.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने राज्यातल्या तमाम गुरुजींना आरोपीच्या
पिंजर्यात उभं केलं आहे. राज्यातल्या 7 लाख व्हॉट्सअॅपवर त्याबद्दलची चर्चा
न्यूजरुममध्ये पोचलेली दिसत नाही. पण दूर डोंगरात, कडे कपारीत, नदीच्या पल्याड,
बॅक वॉटरच्या बेचकीत, घनदाट जंगलात, सुनसान पाड्यावर, भटक्यांच्या तांड्यावर इमाने
इतबारे शिकवणारे शिक्षक मास्तुऽऽर्डे या शिवीने घायाळ झाले आहेत. एसटीची धूळ खात जाणार्या
बाई त्या शिवीने दुखावल्या आहेत. बाईकवरचे आचके खात रोज कपडे मळवत जाणारे मास्तर
कधी नव्हे इतके अपमानित झाले आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेली 55 वर्षे
आणि त्याआधी महात्मा फुलेंनी शाळा सुरु केली त्यातल्या सावित्रीबाईंपासून 168
वर्षे झाली, ज्या शिक्षकांनी हा महाराष्ट्र उभा केला त्यांच्या मनात या शिवीने
खोल जखम केली आहे.
ही जखम का ठणकते आहे?
मिरज पंचायतीच्या एका शिक्षिकेने स्वतःचे 1 लाख रुपये खर्चून शैक्षणिक
साहित्य तयार केलं. शहापूरच्या शिक्षकाने आख्खी शाळा डिजीटल केली. रविंद्र भापकर नावाच्या
शिक्षकाने तयार केलेल्या वेबसाईट आणि अॅपचा उपयोग 1 लाख शिक्षक करतात. भाऊसाहेब चासकर
सारखे प्रयोगशील, अॅक्टीव्ह टिचरांची संख्या 17 हजार आहे. साप चावलेली सुभद्रा बालशी
तर मेलीच असती. तिच्या शाळेतल्या बाईंनी शिकवलं होतं तसं तिने केलं म्हणून ती
वाचली. आदिवासी पाड्यावरची पोर एवढी हुशार कशी? म्हणून डॉक्टरांनी विचारलं तर त्या
मुलीने आपल्या बाईंचं नाव सांगितलं, प्रतिभा कदम-क्षीरसागर.
दांड्या मारणारे, नको ते उ़द्योग करणारे, संध्याकाळी भलतीकडेच दिसणारे
शिक्षक नाहीत असं नाही. पण 7 लाखांमधला त्यांचा टक्का किती? शून्यापेक्षा खाली आहे.
चिखलर्याच्या जंगलात आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषद शाळेत विजय
नकाशे मुख्याध्यापक होते. किती मुलं शिकवून मोठी केली त्यांनी. स्कॉलरशीपमध्ये
आणली. पंचायत राज समिती येणार म्हणून बायकोची बचत मोडून 40 हजार रुपये शाळेच्या रंगरंगोटी
आणि व्यवस्थेवर खर्च केले. पॅकबंद गोणीत 30 किलो तांदुळ कमी पडले म्हणून समितीने
त्यांना निलंबित केलं. विजय नकाशेने शाळेतच फास लावून घेतला.
आचार्य दोंदेपासून सुरु असलेल्या अधिवेशनाला 70-80 हजार शिक्षक गेले
म्हणून शाळा बुडाली अशी ओरड करणारे शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपलं जातं तेव्हा
साधी चर्चाही करत नाहीत. ठाणे जिल्ह्यात तर एकदा गावाबाहेर पहाटे शौचाला बसणार्यांची
संख्या मोजायचं फर्मान निघालं होतं शिक्षकांना. मी कलेक्टरांशी बोललो तेव्हा ते थांबलं.
आमच्या शिक्षकांचा एक गैरसमज झालाय. कुणी मिडियावाल्याने मास्तुऽऽर्डे
शिवी घातल्याचा त्यांचा समज झालाय. मास्तरांना बदनाम करण्याचं काम गेली दहा वर्षे सुरु
आहे. मागता येईना भिक म्हणून मास्तरकी शिक अशी अवमानित करणारी म्हण प्रचलित झाली ती
याच दहा वर्षात. शिक्षक नावाची संस्था बदनाम केल्याशिवाय मोडून काढता येणार नाही, ते
उमगलेल्या नव्या सरकारने आणि त्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी तर गेली वर्षभर एकही संधी
सोडलेली नाही. थेट तुरुंगात टाकण्याची भाषा केल्यानंतर शिक्षक नावाचा आदर समाजातून
संपला तर त्याचं नवल काय? वसंत पुरके यांनी सुरवात केली. आता विनोद तावडे
कडेलोट करत आहेत.
शिक्षक कमी करणं, त्याला बदनाम करणं आणि त्याला परेशान करणं हा आटापिटा
कशासाठी? शिक्षणावरचा वाढता खर्च आता सरकारला नकोसा झाला आहे. अनुदानित मोफत शिक्षणाची
व्यवस्थाच मोडून काढायची हे त्यासाठी ठरलं आहे. शाळेला टाळं ठोकता येत नाही, म्हणून
मास्तराला बदनाम करायचं. शाळा आणि शिक्षक नावाच्या व्यवस्थेवरचा विश्वास उडवून लावला
की खाजगीकरण आणि व्यापारीकरणाचा मार्ग खुला होतो. व्हाऊचर सिस्टीमचं खूळ शिक्षणमंत्र्यांनी
उगाच सोडलेलं नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचा 'शिका' मंत्र पेरत पंजाबराव देशमुख,
कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, बापुजी साळुंखे
यांनी निर्माण केलेली महाराष्ट्रातली व्यवस्था मोडून काढण्याचं ते व्हाऊचर आहे. तीन
वर्षात ते 'अच्छे दिन' येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी ऐरोलीलाच केली. व्हाऊचर
येणार हे नक्की झालंय.
(लेखक विधान परिषद सदस्य आहेत.)
पूर्वप्रसिद्धी : दै. पुण्यनगरी - १० फेब्रुवारी २०१६
No comments:
Post a Comment