Thursday, 13 October 2016

खाडिलकर सरांच्या डोळ्यातलं पाणी



मागच्या आठवड्यात खाडिलकर सरांना भेटायला गेलो होतो. कोकणात. गणपतीत ते गावी गेले होते. अचानक पॅरेलेसिसचा अॅटॅक आला. ब्रेन हॅम्रेज झालं. कोकणातच सुट्टीवर गेलेल्या इनामदार सरांना ही बातमी कळली. त्यांनी फोन केला. खाडिलकर सरांना शोधायचं कसं हाच प्रश्न होता. अविवाहित. नातेवाईक कुणी ते माहीत नव्हतं. मसुरे त्यांचं गाव एवढंच माहीत होतं. 

खाडिलकर सर म्हणजे अरुण खाडिलकर. छबिलदासचे. ठाण्याच्या मो. ह. विद्यालयाचे निवृत्त उपमुख्याध्यापक. पण सरांची खरी ओळख रात्रशाळा आहे. रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत. राज्यात १७५ रात्रशाळा आहेत. त्यापैकी १५० रात्रशाळा मुंबईत आहेत.  दिवसभर कष्ट करणारी मुलं 
रात्रशाळेत शिकण्याचा प्रयत्न करतात. घरात कुणीच कमावतं नसतं. ही मुलंच कमावती. रात्रशाळेतल्या या मुला-मुलींशी बोला. मग कळेल. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. ज्या वयात दिवसा शाळेत शिकावं आणि संध्याकाळी खेळावं, टीव्ही पहावा त्या वयात परिस्थितीने नकार दिलेली ही मुलं. कुणी भांडी घासतं. कुणी रेस्टॉरंटमध्ये वेटर आहे. कुणी फॅक्टरीत आहे. कुणी कुरिअर बॉय आहे. त्यांची वयं थोडी मोठी आहेत. शिकण्याचं वय करपून गेल्यानंतरही शिकण्याची हिंमत ही मुलं-मुली करतात. त्याबद्दल त्यांना सलाम करायला हवा. या रात्रशाळांना वाहून घेतलेले व्ही. व्ही. चिकोडीकर, अरुण खाडिलकर, अशोक बेलसरे हे तिघे रात्रीच्या शिक्षण विश्‍वास सगळ्यांना माहीत आहेत. सय्यद सर, चाफेकर सर, देशपांडे सर, कांबळे सर, पवार सर, त्रिवेदी सर, मीनाताई कुरुडे, शहाणेबाई अशी कितीतरी नावं सांगता येतील. निवृत्त झाले तरी रात्रशाळांची चिंता त्यांची संपत नाही. चिकोडीकर नव्वदीच्या घरात पोहोचलेत. खाडिलकर सरांनी सत्तरी कधीच पार केली आहे. पण या म्हातार्‍यांचा काम करण्याचा पीळ काही सुटत नाही. छात्रभारतीत काम करत होतो तेव्हापासून या सार्‍यांना ओळखतो आहे. शरद कदम, अरुण लावंड, मेल्विन गोन्सालविस या माझ्या सहकार्‍यांना तेव्हापासून आश्‍चर्य वाटत आलं आहे. या वयात या मंडळींकडे ऊर्जा येते कुठून? 

दीडशे वर्षांच्या रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न १९८८ मध्ये झाला होता. आम्ही बॅटरी मोर्चा काढला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राम मेघे शिक्षणमंत्री. तेव्हा पोलीस लाठय़ा मारत नसत. पोलिसांनी सरळ मोर्च्याची  बाजू घेत सरकारला कळवलं. रात्री दहा वाजता मंत्रालय पुन्हा उघडलं. तेव्हापासून रात्रशाळेवर सरकारने कधी वाईट नजर टाकली नाही. विलासराव देशमुख यांनी शिक्षणमंत्री असताना तर रात्रशाळांना खूपच ताकद दिली. विद्यार्थ्यांना पुस्तकं मोफत द्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री असताना भाडंही माफ करून टाकलं. 

मागच्या काही वर्षात या रात्रशाळांचा दर्जा वाढावा म्हणून निकिता केतकर यांच्या 'मासूम' संस्थेमार्फत 'मुख्याध्यापक संघ' आणि 'शिक्षक भारती'ने अनेक उपक्रम राबवले. साठहून अधिक शाळांमध्ये विशेष वर्ग चालवले जातात. शिक्षकांना खास प्रशिक्षण दिलं जात. फिरती प्रयोगशाळा असते. वह्या-पुस्तकं मोफत दिली जातात. रोज रात्री पौष्टिक आहार दिला जातो. निकिता केतकर यांच्या समवेत रात्रशाळेचे निवृत्त मुख्याध्यापक अंकुश जगदाळे स्वत: 
अॅकॅडेमिक बाजू सांभाळतात. त्यामुळे काही शाळा तर शंभर टक्के निकाल देऊ लागल्या आहेत. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात पहिली आलेली रात्रशाळेची विद्यार्थीनी थेट इंग्लडच्या राणीला भेटून आली. प्रिन्स बरोबर इंग्रजीत बोलून आली. पण या रात्रशाळांवर पुन्हा एकदा वाईट नजर पडली आहे. रात्रशाळांसाठी माध्यमिक शाळा संहितेत खास तरतूद आहे. १९६८ मधील शिक्षण आणि समाजकल्याण विभागाच्या विशेष अहवालानुसार अनेक सुधारणा अंमलात आल्या. १३ फेब्रुवारी १९७८ मध्ये विशेष सवलती देण्यात आल्या. रात्रशाळांसाठी स्वतंत्र संचमान्यतेचे निकष आहेत. ते सगळं गुंडाळून ठेवून रात्रशाळांवर आता बुलडोझर फिरवण्यात येतो आहे. २८ ऑगस्ट २०१५ च्या दिवस शाळांच्या निकषाखाली रात्रशाळाही रगडल्या गेल्या आहेत. तीन भाषांना मिळून एक शिक्षक. विज्ञान आणि गणितालाही एक शिक्षक. आठवी, नववी, दहावी मिळून फक्त तीन शिक्षक. रात्रशाळेतील २५० शिक्षकांना ठरवून काढून टाकण्यात आलं आहे. गणिताला आणि इंग्रजीला शिक्षक नाहीत. कुठे सायन्सला शिक्षक नाही. हिंदी, मराठी कुणी शिकवायचं त्याचा पत्ता नाही. अडीच-तीन तासात गोळीबंद शिकवण्यासाठी असलेली व्यवस्था मोडून काढण्यात आली आहे. 

रात्रशाळा विद्यार्थ्यांनी पुन्हा मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांवर प्रधान सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले. १ ऑगस्टची ती गोष्ट. दोन महिने उलटून गेलेत. शिक्षण विभाग उलटी कार्यवाही करत आहे. अधिकार्‍यांना शाळेत पाठवून दमदाटी करताहेत. विद्यार्थ्यांना सांगताहेत ओपन स्कूलमध्ये 
अॅडमिशन घ्या. १७ नंबरचा फॉर्म भरा. रात्रशाळेत का शिकता? हे काय शिकायचं वय आहे का? जरा दमानं विचारलं तर अधिकारी म्हणतात आम्हांला मंत्रालयातून आदेश आहे. राजापेक्षा राजनिष्ठ. 

खाडिलकर सरांचा डावा हात आणि डावा पाय हलत नव्हता. पण बोलू लागले आहेत. परवा अशोक बेलसरे, जयवंत पाटील, सुभाष मोरे, संजय वेतुरेकर यांच्या समवेत त्यांना भेटलो. तर पहिला प्रश्न त्यांनीच विचारला, 'नाईटचं काय झालं?'

मी म्हणालो, 'मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, होईल काहीतरी. तुम्ही काळजी करू नका.'

मला म्हणाले, 'दोन महिने झाले. शिक्षक नाहीत.' खाडिलकर सरांच्या दोन्ही डोळ्यांत पाणी होतं. 

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १२ ऑक्टोबर २०१६ 


12 comments:

  1. Very sensitive of you Kapil. Many thanks for introducing night schools to us!
    Anand

    ReplyDelete
  2. उलटले महिने दोन,रात्रशाळेत शिक्षक नाही कुणी
    खाडीलकर सरांच्या डोळ्यात टचकन आलय पाणी।।धृ।।

    दिवसभराचे कष्ट करुनी, रात्रशाळेत मुले येती शिकण्या

    कारण एकच तयांचे,घरात कमावणारे नाही कुणी।।1।।

    चिकोडीकर,खाडिलकर अन बेलसरे सर,रात्रशाळांचे शिलेदार

    अजूनही शाळेच्या चिंतेने मनाने,निवृत्ती घेतली नाही कुणी।।2।।

    नाही शिक्षक सायन्सला,नाही शिक्षक गणिताला

    नाही शिक्षक इंग्रजीला,शिकवायचा मराठी कुणी?।।3।।

    शालिनी रोहित मेखा,डोंबिवली

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खाडिलकर सर आणि छबिलदास हे समीकरण न संपणारे आहे ,तेव्हा हा उल्लेख अपेक्षित वाटतो.

    ReplyDelete
  5. खाडिलकर सर आणि छबिलदास हे समीकरण न संपणारे आहे ,तेव्हा हा उल्लेख अपेक्षित वाटतो.

    ReplyDelete
  6. सलाम सर्वांच्या कार्याला धन्यवाद

    ReplyDelete
  7. तुमची ब्लॊगपोस्ट डोळ्यांमध्ये पाणी आणणारी आहे. मुंबईत कोणत्या विभागात रात्रशाळांची किती गरज आहे ह्याविषयी माहिती कोठे मिळू शकेल?

    ReplyDelete
  8. खाडिलकर सर एक रुशितुल्य सेवाभावी व्यक्तिमत्व.त्यांना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना.

    ReplyDelete
  9. खाडिलकर सर एक रुशितुल्य सेवाभावी व्यक्तिमत्व.त्यांना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना.

    ReplyDelete
  10. खाडिलकर सर एक रुशितुल्य सेवाभावी व्यक्तिमत्व.त्यांना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना.
    वाणी.एस.के.vikhroli.

    ReplyDelete
  11. या सरकारचे डोकं ठिकाण्यावर नाही. दिवसभर कष्ट करून रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणाऱ्या या मुलांना शिक्षणापासून वंछीत ठेवायच म्हणजे आई जेवू घालत नाही आणि बाप भिक मागू देत नाही. अशीच अवस्था आहे. शाळा, शिक्षक शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू पाहतात. परंतू शासन दरबारी योग्य प्रशासकीय कार्यवाही न मिळाल्याने काहीच साध्य होणार नाही. यांना समाजात शिक्षीत व अशिक्षीत अशी दुफळी निर्माण करायची आहे. म्हणजे अशिक्षीतांनी कायमची वेठबिगारीचीच कामे करायची. शिक्षण हक्क कायदा काढतात पण उपयोग काय?

    ReplyDelete
  12. रात्रशाला आणि छात्रभारती, कपिल पाटील. हे नात टिकून ठेऊन रात्रशाळे मागे कायम खम्बीरपने सर तुमी उभे आहात सलाम

    ReplyDelete