Monday, 8 January 2018

छत्तीसगड सरकारने हाकलून दिलेले नंदकुमार महाराष्ट्राच्या माथी नकोत


दिनांक : जानेवारी २०१८
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

महोदय,
८० हजार शाला बंद करण्याचा उद्देश राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी काल पत्रकारांशी बोलताना जाहीर केला. आता घाईघाईने मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खुलासा केला आहे की ही सारी अफवा आहे. राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे बोलतात ते अफवा असेल तर नंदकुमारांना त्या पदावर ठेवता कशाला?

मा. शिक्षणमंत्री यांच्याशी मी आज फोनवर बोललो. ते म्हणाले, नंदकुमार हलकं फुलकं बोलत होते.

पण ८० हजार शाळा बंद करण्याचा विषय हा हलका फुलका असू शकत नाही. शिक्षण सचिव इतकं बेजबाबदार बोलत असतील तर त्यांना तुम्ही हटवलं पाहिजे.

शिक्षणमंत्री म्हणाले, तो माझा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय, २१ जुलै २०१६ पावसाळी अधिवेशनात राज्याचं शिक्षण खातं शिक्षण सचिव नंदकुमार मनमानीपणे चालवत असल्याचा आरोप मी केला होता. आधी रात्रशाळा बंद केल्या, चुकीची संचमान्यता राबवली, शिक्षक सरप्लस, कला-क्रीडा शिक्षक संपवले, शाळा सोडून ऑनलाईन कामांना शिक्षकांना जुंपलं. आता ८० हजार शाळा बंद करण्याची योजना त्यांनी आखली आहे. शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी आता खुलासा केला असता तरी शिक्षण सचिव जे बोलत आहेत ते शासन निर्णयातलंच बोलत आहेत. ३० मार्च २०१६ च्या शाळा सिद्धीच्या शासन निर्णयात शाळांची मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार २५० पेक्षा कमी मुलांची शाळा चालवण्यात सरकारला स्वारस्य नसल्याचं अगदी सुस्पष्टपणे शिक्षण सचिवांनी त्यात स्पष्ट केलं होतं. अर्थात कपिल पाटील राईचा पर्वत करतो, असं आमच्या मित्रवर्यांचं म्हणणं आहे. पण सचिव काल बोलले ते अंमलात यायचं नसेल तर आधी शिक्षण सचिवांना बदला. चांगल्या हाती खातं द्या. महाराष्ट्राचं शिक्षण वाचवा, ही पुन्हा एकदा आर्त हाक.

तुमच्या छत्तीसगड सरकारने हाकलून दिलेले नंदकुमार महाराष्ट्राच्या माथी नकोतधन्यवाद!

आपला स्नेहांकित,
  


--------------------------

काय बोलले नंदकुमार बघा हा व्हिडीओ -


--------------------------

राज्याचं शिक्षण खातं कोण चालवतंय?

आमदार कपिल पाटील यांचे विधान परिषदेत केलेलं भाषण 
पावसाळी अधिवेशन, २१ जुलै २०१६

3 comments: