Thursday, 26 April 2018

लोकतंत्र आणि माणूसपण वाचवण्याचा नवा निर्धार

लोकतांत्रिक जनता दल
सप्रेम नमस्कार, भीषण राजकीय परिस्थितीतून आपण जात आहोत. भारतीय लोकतंत्र संकटात आहे. समाजवाद तर खूप दूर आहे. देशात मनुवादी विचारांचं थैमान आहे. शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय नोकरदार, कामगार, कष्टकरी, शिक्षक, बेरोजगार तरुण, महिला आणि सारी गरीब माणसं हैराण आहेत. सत्ताधारी वर्ग दररोज जाती-जातीत, धर्मा-धर्मात द्वेष भडकवण्याचं राजकारण खेळतोय. सामाजिक परिस्थिती स्फोटक आहे. विरोधकांचा आवाज दडपला जातो आहे. संविधानावर दररोज हल्ले होत आहेत. न्यायाधीशांवर न्याय मागायची वेळ आली आहे. आणीबाणीचा कालखंडही फिका पडावा इतकी वाईट स्थिती आहे. लोकशाहीचे सगळे स्तंभ संकंटात आहेत. जिथे बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने राजकीय मोर्चे निघतात तिथे माणूसपण संकटात सापडलेले असते. ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी लोकतंत्र आणि देशाची सांझी विरासत वाचवण्यासाठी एक होण्याची हाक दिली आहे. लोकतंत्र आणि समाजवादासाठी नवा राजकीय पर्याय सगळ्यांनाच हवा आहे. येत्या १८ मे २०१८ रोजी नवी दिल्लीत ताल कटोरा स्टेडियममध्ये सकाळी ११ वा. 'लोकतांत्रिक जनता दल' या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. लोकशाही समाजवादी चळवळ पुढे नेण्यासाठी हा क्रांतीकारी टप्पा ठरणार आहे. देशभरातले लोकशाहीवादी, समाजवादी, संविधानप्रेमी, संस्था, कार्यकर्ते या सर्वांचा सांझा निर्धार त्या दिवशी प्रकटेल. त्या निर्धारात तुम्ही भागीदार असावं यासाठी हे खास निमंत्रण! आवर्जून या. १८ मे २०१८, सकाळी ११ वा. ताल कटोरा स्टेडियम, नवी दिल्ली आपला, आमदार कपिल पाटील

No comments:

Post a Comment