बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया गेले. वय ८१ होतं. आजाराशी ते झुंजत होते. जसे मराठवाड्यातल्या १९७२ च्या दुष्काळाशी ते झुंजले होते. १९७५ च्या आणीबाणीशी झुंजले होते. आणीबाणीत १८ महिने ते तुरुंगात होते. पण कधी हरले नव्हते. दुष्काळावरही त्यांनी मात केली. निसर्गाला नमवलं. पाणी साठवून दाखवलं. मृत्यूशी मात्र ते हरले. प्रत्येकालाच हरावं लागतं. तरीही प्रत्येक मृत्यू अस्वस्थ करतो. बाबूजींचं जाणं तर अधिकच अस्वस्थ करतं. बाबूजी काल रात्री उशिरा गेले. आज दुपारी त्यांच्या अत्यंसंस्काराला इच्छा असूनही पोचता आलं नाही.
मराठवाड्यातले लोक अवघड क्षेत्रात राहतात. त्यात बाबूजींनी बीड मधलं आंबेजोगाई निवडलं. पाण्याची कायम नाराजी असलेला दुष्काळी जिल्हा. ऊसतोडणी कष्टकरी मजुरांचा जिल्हा. बाकी कोणतीही पिकं कापणं सोपं आहे. पण उसाचं पीक कापणं अवघड. प्रवासाची साधनं मराठवाड्यात अजून पोचताहेत. लातूरला ट्रेन तर आता आता पोचली. पाणी अजून पोचलेलं नाही. बाबूजींनी तोच ध्यास घेतला होता. सिंचनाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. यशस्वी केले. पाणी साठवण्याचे व जिरवण्याचे हे प्रयोग बाबूजींच्या आणि मानवलोकच्या नावानेच ओळखले जातात.
बाबूजी केवळ आडनावाने लोहिया नव्हते. खरंच लोहियावादी विचारांचे होते. पक्के समाजवादी. डॉ. राममनोहर लोहियांची त्रिसूत्री होती - मतपेटी, तुरुंग आणि फावडं. डॉ. द्वारकादास लोहियांनी तुरुंग आणि फावडं अधिक पसंत केलं. समाजवादी राजकारणातून ते कधीच दूर गेले नाहीत. पण निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरले नाहीत. सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. गोपीनाथ मुंडेंशी त्यांचा खास दोस्ताना होता. अडचणीत दोघांनी परस्परांना खूप मदत केली. ऊसतोडणी मजूरांचे आणि ओबीसींचे नेते होते मुंडे. त्यात त्यांना बाबूजींच्या मदतीचा हात होता. मुंडेंच्या सहकाराच्या प्रयोगातही बाबूजींनी त्यांना साथ दिली. भाजपशी मात्र दूरुनही दोस्ताना केला नाही. दोस्ती आपल्या अजेंड्यावर त्यांनी ठेवली होती.
मजूरांच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रत्येक लढाईला बाबूजींची साथ होती. मराठवाडा विकास आंदोलनात तरुण लोहिया अग्रेसर होते. भ्रष्टाचार विरोधी मोहिमांमध्ये त्यांचा पुढाकार असे. वंचितांच्या प्रश्नावर तर ते रस्त्यावर उतरुनच संघर्ष करत. बाबूजींचा पिंड रचनात्मक कामाचा अधिक होता. १९७२ च्या दुष्काळ विरोधी आंदोलनात उतरलेले बाबूजी दुष्काळ निवारणाच्या रचनात्मक कामात पुढे अधिक रमले. १ एप्रिल १९८२ ला मानवलोक म्हणजे मराठवाडा नवनिर्माण लोकायत नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, स्त्रीया आणि गरीब हे त्यांचं कार्यक्षेत्रं होतं. संस्था पारदर्शी पद्धतीने चालवली. संस्थेतल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. मोठं केलं. विकासाचे अनेक प्रयोग यशस्वी केले. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि शेतकरी संघटना या प्रत्येकाचं मानवलोकशी नातं आहे. पुरोगामी चळवळीतील अनेक संघटनांची शिबिरं मानवलोकने चालवली. कार्यकर्ते घडवले.
बाबूजींचं आमचं खास नातं आहे. छात्र भारतीच्या संस्थापक उपाध्यक्षा अणि आमच्या मार्गदर्शक डॉ. शैलाताई लोहिया यांचे ते पती. शैलाताई आणि डॉ. लोहिया यांची गाठ राष्ट्र सेवा दलात जमली. सेवा दलाने असंख्य धडपडणारे कार्यकर्ते दिले. लोहिया दांपत्य त्यापैकीच एक. शैलाताई धुळ्याच्या. न्यायमूर्ती प्रकाश परांजपेंच्या भगिनी. महिला चळवळीतील कार्यकर्त्या. मराठवाड्यात गेल्या आणि शेतकरी आणि मागासवर्गीय महिलांच्या दुःखाचा शोध घेत त्यांच्या जीवनात त्या आनंद फुलवत राहिल्या. त्यांची तीन्ही मुलं प्रा. अभिजीत, अनिकेत आणि प्रा. अरुंधती पाटील त्यांच्यासारखी निर्मळ, निरलस आणि निष्ठेने काम करणारी. तिघेही माझे छात्र भारतीतले दोस्त. छात्र भारतीच्या उभारणीत त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. पण कोणताही बडेजाव या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधी केला नाही.
शैलाताई आणि बाबूजी आता दोघंही नाहीत. म्हणून मानवलोकचं काम काही थांबणार नाही. त्यांची मुलं ते पुढे नेतील.
बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया यांना विनम्र अभिवादन!
- कपिल पाटील
भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
ReplyDeleteमा.द्वाराकादास लोहिया ह्यांच्या कार्याचा
ReplyDeleteडॉ.दाभोलकर नेहेमी गौरवपूर्ण उल्लेख करीत असत.'मानवलोक'च्या या महामानवाला सादर अभिवादन.💐
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली
ReplyDelete