Tuesday, 4 June 2019

येईल तो दिवस



राष्ट्र सेवा दलाची पुनर्स्थापना झाली तो हा दिवस. 

ना. सु. हर्डीकरांच्या पुढाकाराने १९२३ मध्ये काकीनाडा काँग्रेसमध्ये हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली. प्रामुख्याने स्वयंसेवकांचं ते दल होतं. म्हणून सेवा दलाचा दल दिन २८ डिसेंबरच असतो. त्याचं पुनर्जीवन राष्ट्र सेवा दल या नावाने शिरूभाऊ लिमये यांनी पुण्यात ४ जून १९४१ रोजी केलं. 

एस. एम. जोशी पहिले दल प्रमुख बनले. पण सेवा दलाला चेहरा आणि आत्मा दिला तो साने गुरुजी यांनी. अवघ्या एका वर्षात सेवा दल महाराष्ट्रभर आणि देशातल्या अनेक भागात पोचलं. अच्युतराव पटवर्धन, युसुफ मेहेरअली, उषा मेहता, मधु लिमये, नानासाहेब गोरे, शहानवाज खान, भाई वैद्य, डॉ. ना. य. डोळे, अनुताई लिमये, मोईद्दीन हॅरीस, निहाल अहमद, बापू काळदाते, मृणालताई गोरे, अभिनेत्री स्मिता पाटील, अभिनेता निळू फुले ही सारी सेवादलाची माणसं. 

महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांच्या हाकेला ओ देत हजारो सेवा दल सैनिक स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले. कितीतरी तरुण आणि कोवळ्या वयातील मुलांनी बलिदान दिलं. शिरीषकुमार, लाल दास, शशीधर केतकर, काशिनाथ पागधरे, भाई कोतवाल, धनसुकलाल वाणी किती नावं सांगायची? 

साने गुरुजींनी तीन मोठे वारसे सेवा दलाला दिले. एक स्वातंत्र्य चळवळीचा. दोन सामाजिक न्यायाचा. पंढरपूरच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने त्यांनी सेवा दलाची चळवळ फुले, शाहू, आंबेडकरांशी जोडली. अस्पृश्यता हटल्याशिवाय स्वराज्य आणि स्वातंत्र्याला काय अर्थ? असं ते विचारत होते. 

तिसरा वारसा आंतरभारतीचा. केशवसुतांच्या भाषेत सांगायचं, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे. हीच साने गुरुजींची वृत्ती होती. अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमधील साहित्य त्यांनी मराठीत आणलं. माझ्या घराच्या खिडक्या आणि दारं उघडी राहू देत. चारी बाजूचे वारे माझ्या घरात येऊ देत. साने गुरुजींना आपल्या घराला कोणतीच कुंपणं मान्य नव्हती. सेवा दलाला सेवावृत्तीचा वारसा दिला तोही साने गुरुजींनीच. तो वारसा एस. एम. जोशी यांनी साने गुरुजी सेवा पथकाच्या नावाने जीवंत ठेवला.

राजा मंगळवेढेकरांनी नदीत अंघोळ करणाऱ्या साने गुरुजींना जानव्याशिवाय पाहिलं आणि विचारलं गुरुजी तुमचं जानवं कुठंय? गुरुजी म्हणाले, जानवं त्री वर्णाचं प्रतीक आहे. शुद्रांना तो अधिकार नाही. म्हणून मी ते फेकून दिलं. बंडखोर होते साने गुरुजी. ज्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाही ते मंदिर व तो देव माझा नाही, अशी कडक भूमिका घेणारे महात्मा गांधी आणि ब्रिटिशांपासून मुक्त होणाऱ्या भारतात माझ्या अस्पृश्य बांधवांच्या स्वातंत्र्याचा काय? असा गांधींना सवाल करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांशी साने गुरुजींचं नातं होतं. आणि या दोन्ही विचारांशी सेवा दलाचं नातं जोडलं ते ही साने गुरुजीनीचं. 

उद्या रमजान ईद आहे म्हणून आठवलं. भारतीय संस्कृती तिची महती सांगणाऱ्या साने गुरुजींनी इस्लामी संस्कृतीची ओळख करून देणारं अप्रतिम पुस्तक लिहलं. माणुसकीचा कैवार घेणाऱ्या पैगंबर महंमद साहेबांची जीवन गाथा लिहिली. राष्ट्र सेवा दलाची स्थापना, सेवा दलाचा वारसा आणि सेवा दलाचं भविष्य यामागे साने गुरुजींचीच प्रेरणा होती, आहे आणि राहणार आहे. साने गुरुजी मुलांमध्ये रमत असत. त्या मुलांना घडवणारं सेवा दल म्हणून त्यांना प्राणप्रिय होतं. 

आपली जीवन यात्रा संपवताना साने गुरुजींनी एकच इच्छा व्यक्त केली होती, देशात लोकशाही समाजवाद फुलू दे. कठीण काळातून आपण आज जात आहोत. उन्मादी राष्ट्रवादाचे हात देशातच नव्हे, जगभर अक्राळ विक्राळ पसरले आहेत. त्याच्याशी लढण्यासाठी साने गुरुजींचं सेवा दल साने गुरुजींचं ते क्रांतीगीत पुन्हा गाईल का, एकदिलाने... ?

उठू दे देश, उठू दे देश
येथून तेथून सारा पेटू दे देश, पेटू दे देश 

कमावता तुम्ही गमावता कसे
सिंह असून तुम्ही बनला रे कसे
तेजे उठा आता पडा ना असे
माणसे बना आता बनु नका मेष 

- कपिल पाटील 

3 comments:

  1. छान लिहलेय उपयुक्त आणि अभिनंदनीय

    ReplyDelete
  2. सेवा दल आणि एकूणच समाजवादी विचारसरणीच्या ताकतीवर देश उभा आहे नाहीतर फॅसिस्ट शक्तीने इथे धार्मिक चातुर्वण्य व्यवस्था आणली असती.तरीदेखील समाजवादी विचारांची शक्ती विखुरल्यामुळे त्यांचे फावले आहे.पण नक्कीच ही विखुरलेली शक्ती लवकरच एकत्र येऊन भारतीय लोकशाहीचा गाडा सामाजिक न्यायाने पुढं नेईल

    ReplyDelete
  3. दादा मस्त,छान लेख आहे

    ReplyDelete