नीलकंठ खाडिलकर म्हणजे केवळ नवाकाळचे संपादक नव्हते. मुंबईतल्या कामगारांची, महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांची ती तळपती तलवार होती. निळूभाऊंची लेखणी, वाणी तलवारीसारखी धारधार होती. तिचा वार अन्यायाच्या विरोधात होत होता. तिचा प्रहार प्रस्थापितांच्या विरोधात होता.
निळूभाऊ थेट मनाला भिडणारं लिहीत होते. त्यांच्या भाषेत कोणताही अलंकार नव्हता. शब्दांचे फुके बुडबुडे नव्हते. वर्तमानपत्र आणि लेखणी ही त्यांच्या हातातली खड्गं होती. त्यांचे पाय पक्के मातीत रुतलेले होते. त्या पायाची पाळं मुळं इथल्या संस्कृतीत रुजलेली होती. संस्कृतीचा त्यांना सार्थ अभिमानही होता पण परंपरेतल्या अंध रूढींवर, कर्मकांडावर आणि वर्णाश्रमावर त्यांचा विश्वास नव्हता. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी सुरू केलेली परंपरा त्यांनी अशी काही पुढे नेली की ते अवघ्या कष्टकऱ्यांचे आवाज बनले. स्वातंत्र्यांच्या चळवळीत नवाकाळचं योगदान जितकं मोठं आहे तितकंच योगदान स्वातंत्र्योत्तर आर्थिक न्यायाच्या चळवळीमध्ये ते राहिलं आहे.
ते सोव्हिएत युनियनला जाऊन आले. मार्क्स, लेनिनच्या प्रेमात पडले. पण कम्युनिस्ट झाले नाहीत. प्रॅक्टिकल सोशलिझमचा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. त्या नव्या सिद्धांताबद्दल डाव्यांकडून टीका जरूर झाली. निळूभाऊंचा सिद्धांत भाबडा असेलही पण कामगारांबद्दलची त्यांची तळमळ प्रामाणिक होती. शोषणाविरुद्धचा त्यांचा राग अंगार होता. अन्याय आणि पिळवणूकीच्या विरोधातली त्यांची लढाई धारधार होती. मुंबईतल्या गिरणी कामगारांना तर निळूभाऊ खाडिलकर म्हणजे मोठाच आधार होता.
एकट्या मुंबईत नवाकाळ, संध्याकाळ लाखा लाखाने खपत होता. सरकारला नवाकाळची आणि संध्याकाळची भीती वाटत होती. खाडिलकरांच्या अग्रलेखाची भीती वाटत होती. अग्रलेखाचा बादशहा असं ते स्वतःला म्हणत. मुंबईच्या रस्त्यावर कॉ. भाई डांगेपासून ते थेट दत्ता सामंतांपर्यंत गिरणी कामगारांसाठी नवाकाळ हे त्यांच्या पायातलं बळ होतं. आणि याचं सर्व श्रेय निळूभाऊंना होतं. निळूभाऊंची शरद पवारांशी मैत्री होती. बाळासाहेब ठाकरेंचे ते परम मित्र होते. भाई डांगे आणि दत्ता सामंतांबद्दलही त्यांना प्रेम होतं. पण निळूभाऊ या किंवा त्या पक्षाच्या छावणीत कधी गेले नाहीत.
नवाकाळची ती परंपरा आजही जयश्री खाडिलकर आणि रोहिणी खाडिलकर पुढे नेत आहेत. दोघी दोन पत्रांच्या संचालिका आहेत. पण निळूभाऊंचा वसा त्यांनी सोडलेला नाही. निळूभाऊंच्या थकलेल्या शरीराला हाच मोठा दिलासा होता. बुद्धीबळाच्या पटावर खाडिलकर भगिनींनी केलेला पराक्रम मोठा आहे. आणि महाराष्ट्रातील श्रमिकांच्या पटावर खाडिलकर भगिनी करत असलेली कामगिरी तेवढीच मोठी आहे.
निळूभाऊंचं व्यक्तिगत प्रेम मला लाभलं. एक संपादक दुसऱ्या संपादकाबद्दल, एका वर्तमानपत्रातले पत्रकार दुसऱ्या पत्रकारांबद्दल फारसे प्रेमाने बोलणार नाहीत. प्रेम असलं तरी परस्परांच्या वर्तमानपत्रातून दाखवणार नाहीत. व्यवसायाची ती मर्यादा आहे. पण निळूभाऊ माझ्याबद्दल तितक्याच कौतुकाने बोलत आणि लिहीत होते. मी आज दिनांकचा संपादक होतो. त्याआधी महानगरचा मुख्य वार्ताहर होतो. दुपारच्या वर्तमानपत्रातल्या माझ्या बातम्या अनेकदा सकाळच्या पेपरातील बातम्यांच्या अगदी विपरीत असत. पण निळूभाऊ मोकळेपणाने सांगत असत कपिलने बातमी दिली म्हणजे ती पक्की खरी मानायची. चक्क अग्रलेखात त्यांनी हे लिहून टाकलं. खरं तर मी किती छोटा होतो त्यांच्यापुढे पण लहान माणसाचं कौतुक करणं ही मोठेपणाची खूण असते. निळूभाऊ माणूस म्हणूनही खूप मोठे होते. आणि त्यांची ती आठवण सदैव मनात राहील.
गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. फक्त चिमण्यांची स्मारकं राहिली आहेत. संघटीत कामगारांचा आता असंघटीत कंत्राटी कामगार झाला आहे. वेतनाची निश्चिती नाही. पगारातली विषमता कमालीची वाढली आहे. आणि नोकऱ्याही संपत चालल्या आहेत. अशा काळात लढण्यासाठी निळूभाऊंची ती तळपती तलवार सतत प्रेरणा देत राहील.
'नवाकाळ'कार नीलकंठ खाडिलकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि अखेरचा लाल सलाम!
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती पक्ष)
No comments:
Post a Comment