Saturday, 28 November 2020

सरकारला एक धक्का : 100 दिवसांत 100 टक्के पगार

 

शिक्षक बंधू आणि भगिनींनो,

पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे.

पुणे विभागातून जी. के. उर्फ गोरनाथ किसन थोरात टीडीएफ आणि शिक्षक भारतीचे संयुक्त उमेदवार आहेत.

अमरावती विभागातून शिक्षक भारती आणि सर्व समविचारी संघटनांचे उमेदवार आहेत, दिलीप आनंदराव निंभोरकर.

लोक भारतीच्या या उमेदवारांना आपलं पहिल्या पसंतीचं 1 नंबरचं मत द्या. प्रचंड मतांनी विजयी करा.

या दोन्ही मतदार संघात सत्ताधारी पक्षाच्या आघाडीने सुद्धा उमेदवार उभे केले आहेत. पण आपण सर्वांनी मिळून सत्ताधारी आघाडीला धक्का द्यायचा आहे. याचं कारण असं आहे की, शिक्षक मतदार संघाची निर्मिती भारतीय संविधान सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली ती एका खास उद्देशाने. सेकंड चेंबरमध्ये समाजासाठी आवश्यक असलेले चांगले प्रतिनिधी निवडले जावेत आणि पहिल्या चेंबरमध्ये घाईगडबडीने झालेल्या निर्णयांचा पुनर्विचार सेकंड चेंबरमध्ये झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका होती. बाबासाहेबांच्या या भूमिकेशी इमान राखत, त्या उद्देशाला न्याय देत शिक्षकांचा प्रतिनिधी निवडण्याची एक मोठी जबाबदारी राज्यातल्या शिक्षकांवर आहे. आणि आजवरची परंपरा राहिलेली आहे, कोणताही सत्ताधारी वर्ग असो आताच किंवा मागचा त्यांचं फारसं काही या मतदार संघात चालत नाही. प्रलोभनं, धमक्या, बदल्या, इतर काही गोष्टी यालाही कोणी दाद देत नाही. याचं कारण ज्या उद्देशाने या मतदार संघाची निर्मिती केली गेली त्याची जाण या राज्यातल्या प्रगल्भ आणि प्रबुद्ध अशा शिक्षक वर्गाला आहे.

महात्मा फुलेंची याद येते आज. कारण आज 28 नोव्हेंबर आहे, महात्मा फुले यांचा स्मृतिदिन. त्यांनी हंटर कमिशन पुढे काही मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी होती, सक्तीचं शिक्षण द्या. दुसरी मागणी होती, मोफत शिक्षण द्या. तिसरी मागणी होती, बहुजन वर्गातून शिक्षक निर्माण होऊ द्या. आणि चौथी मागणी होती, शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन द्या. त्यांच्या पत्नी, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी शिक्षणासाठी दिलेलं योगदान आपल्या सर्वांना माहित आहे. महात्मा फुलेंनी जे मागितलं ते या काळातील सत्ताधारी तरी देत आहेत का?

आम्हाला अपेक्षा होती की या राज्यात परिवर्तन झाल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटेल आणि त्यांचे पगार 100% सुरु होतील. प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. उलट 20% चा जीआर काढताना त्यांनी मागच्या 18 महिन्यांचे पगार हडप केले. हे अनाकलनीय होतं. अशा पद्धतीने शिक्षकांची फसवणूक केली जाते आणि पुन्हा शिक्षकांकडेच मतं मागितली जातात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते?

आम्ही सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. निश्चय केलेला आहे. माझं विनम्र आवाहन आहे, पुणे विभागातल्या शिक्षक बंधू, भगिनींनो जी. के. थोरातांना तुम्ही आमदार करा. अमरावती विभागातील शिक्षक बंधू, भगिनींनो दिलीप निंभोरकरांना तुम्ही आमदार करा. माझ्या सोबत हे दोन आमदार द्या. येत्या 100 दिवसांमध्ये घोषित, अघोषित सर्व विनाअनुदानित शाळा, कॉलेजेसमधील 10 ते 15 वर्ष पगाराची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांना 100 टक्के अनुदान नाही तर 100 टक्के पगार मिळवून देण्याचा निश्चय आम्ही करतो आहोत.

दुसरा निश्चय करतो आहोत तो, पेन्शनच्या प्रश्नांचा. पेन्शन प्रत्येकाला मिळालं पाहिजे. भाजपच्या 2004 सालच्या सरकारने पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला. पेन्शनचा अधिकार हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार आहे. तो तत्कालीन भाजप सरकारने हिरावून घेतला. नंतर आलेल्या युपीए सरकारनेही तो अधिकार आपल्याला दिलेला नाही. 1 नोव्हेंबर 2005 पर्यंतचे सगळे कर्मचारी कुठलेही असोत सरकारी, निमसरकारी किंवा अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक असोत ते सगळे पेन्शनला पात्र ठरतात. त्या सगळ्यांना आम्ही निश्चयपूर्वक सांगतो, सगळेच जण निश्चय करू जे पात्र आहेत त्यांना 100 दिवसात जुने पेन्शन मिळालेलं असेल. त्यामागचा जो मुख्य अडथळा होता तो आपण आता दूर केलेला आहे. मधल्या काळात सरकारने काही जीआर काढले होते. पेन्शन आणि पगाराच्या संदर्भातले सगळे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले होते. आपण ते अडवले. कारण पगार हा कायद्याने मिळतो. पेन्शन हे कायद्याने मिळतं.

घोषित, अघोषित सर्व विनाअनुदानित शाळा, कॉलेजमधील शिक्षकांना माझं हेच सांगणं आहे की , अनुदान नका मागू MEPS Act नुसार अनुसूची क नुसार पगार मिळणं हा आपला अधिकार आहे. आणि तो पगार आपण मिळवला पाहिजे. अनुदान नाही. अनुदान मिळवायचंय त्यांना मिळवू द्या. 20%, 40% आम्हाला बिलकुल मान्य नाही. पुढच्या 100 दिवसात आपण निश्चय करूया, विनाअनुदानित शाळा आणि कॉलेजमधील सगळ्या शिक्षकांना 100 टक्के पगार मिळवून देण्याचा. आपण सगळ्यांनी मिळून निर्धार करूया.

तिसरा निश्चय आहे, कोविडच्या काळात शिक्षकांनी डबल डबल ड्युटी केली, काही शिक्षकांचे बळी गेले पण त्यासाठी केलेल्या उपचाराचा खर्च सुद्धा मिळाला नाही. इतका खर्च झाला की प्रतिपूर्तीमध्ये अडचणी आल्या आहेत. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने आपण एक आरोग्य योजना सुरु करतो आहोत. पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षकांना, राज्यातल्या सर्व शिक्षकांना माझं आवाहन आहे हे दोन आमदार निवडून येऊ द्या. आपण सगळे मिळून सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख शिक्षक कुटूंब कॅशलेस आरोग्य योजना राबवूया. खिशात एक रुपया नसला तरी चालेल कॅशलेस कार्डवर आपल्या कुटुंबातील सगळ्यांचे उपचार झाले पाहिजेत, अशी योजना राबवूया.

चौथा निश्चय म्हणजे स्कॉलरशिपचे पैसे मिळण्याचा. एस.सी., एस. टी., ओबीसी, व्हीजेएनटी, एस. सी. बी. सी. आणि मायनॉरिटी या सगळ्यांच्या स्कॉलरशीपचे पैसे थकलेले आहेत. त्यामुळे संस्था अडचणीत आहेत, शिक्षकही अडचणीत आहेत, मुलांवरही अन्याय होतोय. ही थकबाकी मिळवून देण्यासाठी या सरकारला धक्का द्यावा लागेल. आपण सरकारचं ऐकत बसलो, सरकारचा अनुनय करत राहिलो तर काही होणार नाही. मागच्या 5 वर्षामध्ये आपण मागच्या सरकारचं अनुनय करत राहिलो. काय मिळालं हातात?काही मिळालं नाही. आणि आता या सरकारचं आपण ऐकत बसलो तर काही मिळणार नाही. त्यासाठी धक्का दिला पाहिजे.

सगळ्यात मोठं संकट आहे ते NEP 2020 चं. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाचं. हे नवीन शिक्षण धोरण जर अमलात आलं तर या देशातल्या 1 लाख शाळा बंद होणार आहेत. 35 हजार महाविद्यालयं बंद होणार आहेत. खाजगीकरण आणि व्यापारीकरणाला मुक्त परवाना NEP 2020 देतं. या NEP 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पानोपानावर सनातनी, प्राचीन मूल्यांचा गौरव आहे. आधुनिक आणि संविधानिक मूल्यांचा साधा उल्लेखही नाही. एकदाही प्राचीन, सनातनी मूल्यं आली की काय होईल? बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार जाईल.

बहुजनांचं आणि गरिबांचं शिक्षण धोक्यात असताना मी आघाडी सरकारला पुन्हा पुन्हा सांगतोय, शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. राज्याला स्वतंत्र निर्णय करता येतो. तुम्ही ही पॉलिसी रद्द करा. फेटाळून लावा आणि सांगा फुले, शाहू, आंबेडकरांचं हे राज्य आहे. गांधी, नेहरूंचं राज्य आहे. प्रबोधनकार, साने गुरुजींचं राज्य आहे. त्या विचाराने हे राज्य चालेल. ते तसं चालणार असेल तर NEP 2020 रद्द करा. पण सरकारने अजूनही NEP 2020 रद्द केलेलं नाही. म्हणून या सरकारशी सुद्धा दोन हात करावे लागतील. कारण NEP 2020 आलं तर आपल्या सगळ्या सर्व सामान्य माणसाचं शिक्षण दुरापास्त होईल. आपल्या मुलांना जी नवी स्वप्न पाहायची आहेत ती स्वप्न पाहता येणार नाहीत. यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागेल. त्याची सुरवात या निडवणुकीने होऊद्या. अमरावती विभागातून दिलीप निंभोरकर आणि पुणे विभागातून जी. के. थोरात यांना निवडून द्या. पुणे पदवीधरमध्ये शरद पाटील, औरंगाबाद पदवीधरमध्ये सतीश चव्हाण आणि नागपूर पदवीधरमध्ये अभिजित वंजारी यांना आपण पाठिंबा दिला आहे. मात्र शिक्षक मतदार संघात आपण सत्ताधाऱ्यांचे न ऐकता आपले उमेदवार निवडून दिले पाहिजेत. मला खात्री आहे शिक्षक भारती, टीडीएफ आणि लोक भारतीचे उमेदवार पुणे आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी विजयी होतील.
जिंदाबाद!

आपला,
कपिल पाटील
आमदार, महाराष्ट्र विधान परिषद
अध्यक्ष, लोक भारती 
 
छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा, दसरा चौक, कोल्हापूर येथून केलेलं आवाहन (28 नोव्हेंबर 2020)
 

30 comments:

  1. कपिल पाटील साहेब तुम्ही खुपच छान लेख लिहिला आहे त्यात माहिती भरपूर आहे. धन्यवाद ०००
    लोकभारतीचे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. कपिल पाटील जिंदाबाद ०००

    ReplyDelete
  2. खूपच छान लेख

    ReplyDelete
  3. साहेब मनपा चे शिक्षक अद्याप वेतन आयोगापासून वंचित आहेत.. 6 व्या वेतन आयोगाचा फरक देखील महापालिका देत नाहीत...महापालिका शिक्षकांच्या 100% वेतनासाठी आपण कशा प्रकारे मदत करू शकता... plz... लक्ष द्या आमच्या प्रश्नाकडे...

    ReplyDelete
  4. कपिल पाटील सर 2005 नंतर असलेले शिक्षक पेंसेन साठी पात्र नाहीत काय लेख आवडला पण पेंसेन चा मुद्द्यावर 2005/पूर्वी नंतर असे नको सर्वेना पेंसेन मिळाली पाहिजे सर

    ReplyDelete
  5. Aghoshit vinaanudaanit shikshak 100%anudanachi vat bghatahet.aplyavar purna vishwas ahe mhatlyapramane apan vinaanudaanit madhyamik uchyamadhyamik tukdyana 100%anudan 100divsat milaun dual va vinaanudaanit ghoshit aghoshit tukdyanavar karyarat asalelya shikshakanchi upaasmar thambval. yachi amhi vat bghtoy.

    ReplyDelete
  6. उत्तम विचार आणि सुंदर,रास्त मागणी

    ReplyDelete
  7. मा. आ. कपिल पाटील सर🙏 आपण ब्लॉग वर व्यक्त केलेले विचार प्रगल्भ आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण झटत आहात ह्याचा आम्हाला आम्हाला आनंद आहे. सर्वांना जुनी पेंशन योजना लागू राहावी यासाठी आपण लढा देत आहात. यशस्वी व्हावे यासाठी मनपूर्वक सदिच्छा व भविष्यातील यशासाठी हार्दिक शुभेच्छा... 🌹🌹🌹

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब आपण अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. आपण निश्चिंत रहा पुणे/अमरावतीतील शिक्षक फारच जागरूक आहेत त्यानी अनेकदा कपिलपाटलासारखे आमदार आमच्या मतदारसंघात हवेत असे म्हटले आहे ; या विभागातून आपलेच दोन्ही आमदार निवडून येतील आम्ही सगळे शिक्षक सजग जाणीवेचे आहोत आपला विजय नक्की होईल. डी एस पवार. (कनिष्ठ महाविद्यालय विभाग )

      Delete
  8. खूप छान लेख

    ReplyDelete
  9. खुप छान लेख आहे सर आपल्या हक्कासाठी सर्वांनी संघटीत होऊन वेळेस जागृत झाले पाहिजे.आम्ही आपल्या सोबत आहोत,. धन्यवाद

    ReplyDelete
  10. सर्वांनी या ऊमेदवारांना साथ देऊ आणी 100% पगार घेऊ.

    ReplyDelete
  11. आमचा बुलंद आवाज.... कपिल पाटील साहेब!!

    ReplyDelete
  12. आदरणीय सर आपला लेख वाचला तुमची तळमळ जाणतो पण 20 वर्षे कायम विनाअनुदानित शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न अडखळतो आहे हे दुर्देव म्हणावे लागेल संविधानानुसार न्यायालयाने दिलैले निकाल कोण मानत नाही निवडणूका आल्या गेल्या काही फरक पडत नाही प्रश्न जैसे थे आहै भाजप निष्ठूर त्यापेक्षा आघाडी दुबळी आपण काय करू शकतो लढा आंदोलन गेली 20 वर्षे तेच करतोय ..कित्तेक माझे शिक्षक बांधव वाट पाहून देवाघरी गेलेत..एक एक वर्ष वाढेल तसै आम्हि निवृृत्ती होण्याच्या मार्गावर जात आहोत..काही उपयोग होईल असै वाटत नाही ह्या निवडणूकीची मतदानाचा अधिकार मिळालेला सुध्दा बजावण्याची आता इच्छा नाही ..धन्यवाद सर

    ReplyDelete
  13. सर खूपच छान लेख नक्की करू.

    ReplyDelete
  14. Kapil patil saheb aahe badho hum tumhare sath haii

    ReplyDelete
  15. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वसा...

    कपिल दादांच्या कामाचा असाच ठसा.....
    शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षक भारती.... दिपक पाटील (धुळे)

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. मा. आ. कपिल पाटील सर,
    खूप छान लेख आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या हितासाठी झटत आहात .याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे .आम्ही आपल्या सोबत आहोत .
    धन्यवाद - पिंपळ कल्पेश सर

    ReplyDelete
  18. NEP2020 बाबत आपण व्यक्त केलेलं मत वास्तववादी आह NEP क्रांतिज्याती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्रांतीचा अपमान करणारा आहे. NEPचे देशावर, बहुजन समाजावर दुगरगामी विपरीत परिणाम होतील.
    एकंदरीत आपण अधोरेखित केलेले सर्वच मुद्दे शिक्षकांच्या कुटुंबियांच्या उदरभरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. उपस्यापोटी कोणतेही काम होत नाही. शिक्षक समाधानी नसेल तर समाज सुद्धा सुखी समाधानी राहू शकत नाही. आपल्या तळमळीला यश मिळो. आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबात सुखसमाधान येवो. संरचना गक्काची पेंशन मिळो यासाठी सदिच्छा!
    महेंद्र वेरुळकर, जिल्हाध्यक्ष
    महा. राज्य पदवीधर,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा यवतमाळ

    ReplyDelete
  19. Unknown28 November 2020 at 22:24
    NEP2020 बाबत आपण व्यक्त केलेलं मत वास्तववादी आह NEP क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्रांतीचा अपमान करणारा आहे. NEPचे देशावर, बहुजन समाजावर दुरगामी विपरीत परिणाम होतील.
    एकंदरीत आपण अधोरेखित केलेले सर्वच मुद्दे शिक्षकांच्या कुटुंबियांच्या उदरभरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. उपास्यापोटी कोणतेही काम होत नाही. शिक्षक समाधानी नसेल तर समाज सुद्धा सुखी समाधानी राहू शकत नाही. आपल्या तळमळीला यश मिळो. आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबात सुखसमाधान येवो. सर्वाना हक्काची पेंशन मिळो यासाठी सदिच्छा!
    महेंद्र वेरुळकर, जिल्हाध्यक्ष
    महा. राज्य पदवीधर,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा यवतमाळ

    Reply

    ReplyDelete
  20. Bped teachers yancha vichar krava..ani tyana permeant appoint order dya

    ReplyDelete
  21. खूपच छान लेख लिहिलेला आहे सरांचे पुन्हा अभिनंदन

    ReplyDelete
  22. एकीकडं पक्षाचा उमेदवार निवडून देऊ नका म्हणता आणि दुसरीकडे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देता. हे कसले दुट्टपी धोरण!

    ReplyDelete
  23. खूपच छान लेख लिहिलेला आहे सरांचे पुन्हा अभिनंदन

    ReplyDelete
  24. खूप छान निश्चय आहे पण 2005पूर्वी नंतर न करता सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करावी

    ReplyDelete
  25. छान विचार आहे. केंद्रिय आदिवासी आश्रमशाळा राज्यात वर्ग करून त्यांचा प्रश्न सोडवण्याचे पण ध्यानात असू द्या.

    ReplyDelete
  26. सर, आपण आधुनिक शिक्षण महर्षी आहात. विद्यार्थीं व शिक्षकांचे खरे कैवारी.आपले शैक्षणिक कार्य वास्तववादी आहेत. धन्यवाद.

    ReplyDelete