Friday, 11 June 2021

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ



'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं का म्हणाले होते? राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेशी त्याचा काय संबंध? ४ जून १९४१ या पुस्तकाचा भाग दुसरा - 
......................... 

भाग २

राष्ट्र सेवा दलाची स्थापनाच मुळात झाली होती ती संघाच्या सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात.

हिंदुराष्ट्रवादाचा विरोध कशासाठी? सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवाद म्हणजे काय?

ब्रिटीशांच्या विरोधात लाठ्या, काठ्या खाणारे, तुरुंगात जाणारे, छातीवर गोळ्या झेलणारे, फासावर हसत हसत लटकणारे हे सारे इन्कलाबी देशभक्त हिंदुराष्ट्रवादाच्या मात्र विरोधात होते. कशासाठी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना या सेनेच्या मुखपत्रातच फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली होती. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची ती मुलाखत त्या दोघांच्या शैलीप्रमाणे दणदणीत झाली होती. गाजली होती. भाजप बरोबरची हिंदुत्ववादी साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. चार महिनेही झाले नव्हते त्याला. भाजपने शिवसेनेने हिंदुत्व सोडण्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं, 'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.'

जळकं हिंदुराष्ट्र. हा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी मानल्या गेलेल्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याचा आहे. अर्थातच नेमक्या शब्दात त्यांनी हिंदुराष्ट्रवादाची ओळख करून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय त्यात?

उद्धव ठाकरे त्या मुलाखतीत म्हणतात, 'धर्माचा उपयोग करून, होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही. अजिबात नाही. हिंदुराष्ट्र पाहिजे असं हे रोज म्हणतात, पण हे असं जळणारं, अशांत हिंदुराष्ट्र मला अपेक्षित नाही. हे हिंदुराष्ट्र मी नाही मानणार.'

कैक वर्षांपूर्वीच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचं व्यंगचित्रं प्रकाशित झालं होतं. हिंदुत्व आणि भगव्याचा मुद्दा तेव्हाही होता. बाळासाहेबांनी चित्रात दाखवलं होतं. भगव्याच्या दुपाखी घट्ट हातांमध्ये तिरंगा डौलाने फडकतो आहे. संघाचं आणि सेनेचं हिंदुत्व यातला फरक यापेक्षा वेगळा सांगण्याची गरज नाही.

व्यक्तीला धर्म असू शकतो. राष्ट्राला नाही. दिल्लीच्या निवडणूकीत हिंदुत्वाचा तो भयंकर प्रयोग आपण पाहिला. या जळक्या हिंदुराष्ट्राचा दुसरा भयंकर खेळ पश्चिम बंगालमध्येही पाहिला. नुसतं हिंदु - मुसलमान नाही. केवळ देशभक्ती आणि राष्ट्रद्रोहाचा खेळ नाही. त्याहून भयंकर. अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा जी गरळ ओकत आहेत, त्यातून राम गोपाळ आणि कपिल गुजर जन्माला येत आहेत. शुभेन्दु अधिकारी फुत्कारात आहेत. ते नथुराम नाहीत. नथुरामी पाातळयंत्रातील प्यादी आहेत.

नथुरामी द्वेषाच्या आणि भेदभावाच्या राजकारणाला टागोर आणि नेताजींच्या बंगालने चोख उत्तर दिलंय. पण सत्ता मिळवण्यासाठी धर्माची होळी निवडणुकीच्या राजकारणात पेटवण्याचा खेळ बंद झालेला नाही. 'आपण ब्राह्मण आहोत आणि कालीमातेचे उपासक आहोत.' असं उत्तर जय श्रीरामच्या नाऱ्यांना ममता बनर्जी देतात. 'आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व मला मान्य नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही.' असं उद्धव ठाकरे उत्तर देतात. दोघेही हिंदु धर्माच्या उदार सिंधू तिरावर उभे आहेत, हिंदुराष्ट्रवादाचा मुकाबला करत. झेलमच्या तिरावर सिंकदराशी दोन हात करायला पोरस उभा होता तसे.

हिंदू धर्म आणि राजकीय हिंदुत्व यात फरक आहे. जसा इस्लाम आणि इस्लामी राष्ट्रवादात फरक आहे. नमाजही पढता न येणारे निरीश्वरवादी महमद अली जिना पाकिस्तानचे निर्माते झाले. इस्लामी राष्ट्रवादाचे जनक. जसे निरीश्वरवादी सावरकर हिंदुराष्ट्रवादाचे जनक असतात. खुद्द पवित्र मक्केत जन्म ज्यांचा झाला होता ते मौलाना अबुल कलाम आझाद जामा मशीदीच्या पायरीवरून इस्लामी राष्ट्रवादाचा आणि जिनांच्या पाकिस्तानचा मुकाबला करतात. 'ही जमिन आपली आहे. आपली मुळं याच जमिनीत आहेत. इस्लाम आणि भारतीय संस्कृतीचा वारसा मुसलमानांच्याही धमन्या धमन्यातून वाहतो आहे.' असं मौलाना आझाद सांगत होते. इस्लामी राष्ट्रवादाला विरोध करत खुदाई खिदमतगार सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान स्वातंत्र्यानंतरही पाकिस्तानच्या तुरुंगात वीस वर्ष काढतात. 'आम्हाला लांडग्यांच्या हाती का दिलं?' असा टाहो खुदाई खिदमतगार फोडत होते, तेव्हा हिंदुराष्ट्राच्या लांडग्यांनी  हिंदु धर्माच्या सर्वोच्च वैष्णवाचे, महात्मा गांधींचे गोळ्या झाडून प्राण घेतले.  

हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात उभे आहेत. ही त्यांची भूमिका केवळ  सत्तेसाठी असू शकेल काय? नजीकच्या भविष्यात त्याची उत्तरं मिळतील कदाचित. पण महाराष्ट्रातल्या डाव्यांनी आणि पुरोगाम्यांनीही शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात नेहमीच फरक केला आहे. तसा फरक केला पाहिजे, असं हुसेन दलवाई सांगत असतात. हा फरक सेनेच्या पूर्व इतिहासात शोधता येईल. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेेंचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील. केशव सिताराम ठाकरे, हिंदुराष्ट्रवाद्यांचा किंवा हिंदुधर्मवाद्यांचा किती तरी जहाल शब्दात समाचार घेतात. प्रबोधनकार ठाकरे हिंदुराष्ट्रवाद्यांच्या हिंदुत्वाचा समाचार ज्या शब्दात घेतात ते शब्द या काळात विद्रोही कार्यकर्ते सुद्धा बोलू शकणार नाहीत.

'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या आपल्या पुस्तकात ठाकरे म्हणतात, 
'काळाच्या कुचाळ्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज 'समाज' या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गाैंडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एक बिन बुडाचें पिचके गाडगें या पेक्षा त्यात विशेष असे काहींच नाहीं.

आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे.'

ठाकरेंंचं हिंदुत्व आणि सावरकरी, गोळवळकरी हिंदुराष्ट्रवाद यात महाराष्ट्रातले पुरोगामी फरक करतात, याचं कारण प्रबोधनकारांच्या भूमिकेत दडलेलं आहे. 'भिक्षुकशाहीचं बंड' या आपल्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे या हिंदुराष्ट्राचा समाचार पुढील शब्दात घेतात - 'बौद्धिक गुलामगिरीनें माणसांसारख्या माणसांना पशूंपेक्षाहि पशू बनविण्याचा व्यापार बिनधोक चालविणाऱ्या भिक्षुकशाहीच्या सामाजिक व धार्मिक अवडंबराचें जोंपर्यंत आमूलाग्र उच्चाटन होणार नाहीं, तोंपर्यंत या हिन्दु राष्ट्रांत स्वातंत्र्याचें बीज कधींच जीव धरणार नाहीं. हिन्दु राष्ट्रातल्या अनेक आत्मघातकी पातकांत (१) अस्पृश्यांवरील सामाजिक व धार्मिक जुलूम आणि (२) स्त्रीवर्गाची गुलामगिरी ही दोन महापातकें प्रमुख होती. राष्ट्राच्या पूर्ण अधःपाताचें मर्म शोधकाला येथेंच सांपडतें. या मर्माचें उच्चाटन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात बराच विचारविनियम व आचारक्रान्ति होत आली. परंतु प्रगतीचें पाऊल मात्र जेथल्या तेथेंच. विशेष आश्चर्याची गोष्ट ही कीं स्वयंनिर्णयाच्या जोरावर लोकशाही स्वराज्याला आम्ही सर्वथैव पात्र आहोंत असे जोराजोरानें ओरडून सांगणाऱ्या हिन्दु राष्ट्रांत लोकशाहीच्या व स्वयंनिर्णयाच्या मूळ तत्वालाच कुपथ्य करणारीं ही दोन राष्ट्रीय महापातकें पूर्वीप्रमाणे होती. तशींच सीलबंद राहिलेली आहेत; व ती तशींच ठेवण्याचे गुप्त प्रयत्न भिक्षुकशाही करीत आहे.'

प्रबोधनकार ठाकरे विचाराने सत्यशोधक, महात्मा फुलेंचे अनुयायी. छत्रपती शाहू महाराजांचे घनिष्ठ मित्र. एक घाव दोन तुकडे, ही ठाकरी परंपरा प्रबोधनकारांची आहे. आणि कधी कधी त्यातून खुद्द छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकारांना प्रिय असलेले महात्मा गांधीही सुटत नसत. न पटलेल्या गोष्टी ते थेट समोर सांगत. बाजू घेतानाही लिहण्यास आडकाठी घेत नसत. पण महाराष्ट्रात हिंदू - मुस्लिम द्वैत उभं करण्याचा अपराध थेट लोकमान्य टिळकांच्या पदरात टाकण्याचं धारिष्ट प्रबोधनकार ठाकरेंकडेच होतं. महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि मोहरमचे ताजीये यातून हिंदु - मुस्लिम तणावाचा जन्म झाल्याची चिकित्सा पुढे प्रा. नलिनी पंडित आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पण ज्या भाषेत प्रबोधनकार समाचार घेतात, तशी शब्दयोजना नलिनी पंडित किंवा डॉ. मुणगेकर करू धजले नाहीत.

प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'जात्याच अत्यंत महत्वाकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृतिसाम्याचें भान राहिलें नाहीं, आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारींच्या हातवाऱ्यानें त्यांनी हिंदु मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या. मेळ्यांतून व शिवाजीउत्सवांतून मुसलमानांची यथास्थित निर्भत्सना होऊ लागतांच, महाराष्ट्रांतले बरेचसे उनाड कवि व नाटककार एकामागून एक भराभर उदयास येऊं लागले, आणि त्यांच्या इस्लामद्रोही कवितांचा व 'ऐतिहासिक' (?) गद्यपद्य नाटकांचा केसरीकडून जाहीर सन्मान होऊं लागला, महाराष्ट्रांत असा एक काळ होता कीं. मुसलमानांची निर्भत्सना केल्याशिवाय आम्हा हिंदूंचा एकहि 'राष्ट्रीय' उत्सव यथासांग पार पडत नसे.'

पुढे ते म्हणतात, 'त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदूंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेंतूनच काढलें जात असें. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याचीं कडुजहर फळें महाराष्ट्राला अजून भोगावयाची आहेत. महाराष्ट्रातले मुसलमान न हिंदुर्नयवनः असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यांत व हिंदूंत कसलाहि भेद नाही. त्यांची राहणी, आचारविचार, उदरंभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वीं हिंदुप्रमाणेंच एकजिनशी आहेंत.

महाराष्ट्रांतले मुसलमानभाई हिंदूंशी एकजीव असतां, टिळकांच्या गणपति-मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनीं त्यांची मनें हकनाहक दुखविलीं गेली आणि नाइलाज म्हणून ते फटकून वागूं लागले, तर त्यांत दोष कोणाचा?'

छत्रपती शिवरायांची जयंती महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सुरु केली. टिळकांनी त्याचा उत्सव केला. गणपती उत्सवही त्यांचाच. पण पुढे त्या उत्सवाचं विद्रुपीकरण झालं. प्रबोधनकार म्हणतात तसं ती कडुजहर फळे आपण अजूनही भोगतो आहोत. महाविकास आघाडीचा आजचा प्रयोग ते जहर कमी करतो की नाही, हे पुढे कळेलच.

प्रबोधनकार ठाकरे एका पक्षाची बाजू घेत नाहीत. हिंदु - मुस्लिमांचा अंधविश्वास आणि कडवटपणा दोघांनाही ते त्यांच्या धारदार लेखणीने समानतेने तासून काढतात. हिंदु मुस्लिम ऐक्याचा पुरस्कारही करतात. प्रबोधनकार त्यांच्या 'संस्कृतीचा संग्राम' या पुस्तकात म्हणतात, 'हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय उद्धारांत हिंदूंना मुसलामानांच्याहि एकीची आवश्यकता आहे, ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षांत घेतल्याचें दिसत नाहीं. हिंदुस्थानच्या सुदैवानें सत्याग्रही महात्मा गांधींचा उदय होऊन, त्यांच्या तपःसामर्थ्याचा दिव्य तेजानें सर्वत्र अननुभूत प्रबोधनाची दांडगी खळबळ उडाली आणि दुटप्पी टिळक संप्रदायाचा अस्त झाला.'

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सर सय्यद अहमद यांना आधुनिक भारताचा एक शिल्पकार ठरवलं आहे. सर सय्यद अहमद यांनी हिंदु आणि मुस्लिम धर्मीयांसाठी कौम हा शब्द वापरला आहे. कौम याचा अर्थ नेशन किंवा राष्ट्र करण्याचा घोटाळा अनेकांनी केला आहे. पण सर सय्यद अहमद यांनी ठासून सांगितलं आहे की, 'हिंदू आणि मुसलमान हे भारतमातेचे दोन डोळे आहेत.' प्रबोधनकार ठाकरे जवळपास तशीच मांडणी करतात. ते म्हणतात, 'हिंदु आणि मुसलमान हे हिंदुस्थानरुपी विराटपुरुषाचे उजवे डावे हात आहेत. हे दोन अवयव बाह्यतः जरी भिन्न दिसत असले, तरी त्यांच्या दैवाचें बरेवाईट सांधे एकाच धडाला चिकटलेले आहेत. हें हिंदूप्रमाणे मुसलमानांनीहि लक्षात घ्यावे.'

प्रबोधनकार ठाकरे तिथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, 'धर्म वेगळे असले तरी संस्कृती एक आहे. दोघांच्याही अनेक परंपरा आणि आचार सारखेच आहेत.'

'संस्कृतीच्या संग्रामात'च ठाकरे म्हणतात, 'अस्सल मुसलमानी संस्कृतीचा कोरडा दिमाख मिरविणाऱ्यांना इतिहास असे हटकून सांगत आहे कीं दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या १२ बादशहांपैकी ६ बादशहा हिंदू मातांच्या उदरीं जन्मलेले होते, आणि या हिंदु राजमाता आपल्या हिंदुधर्माचे आचार खास व्यवस्थेनें प्रत्यक्ष दिल्लीच्या राजवाड्यांत आमरणान्त आचरीत होत्या.

हिंदु मुसलमानांचे राजकीय व सामाजिक ऐक्य झालेंच पाहिजे या ऐक्याशिवाय स्वदेशांत दोघांचाहि तरणेपाय नाही. दोघेहि इंग्रजी सत्तेचे गुलाम आहेत.'


साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या जीवनगाथेवरून आचार्य अत्रे यांनी 'श्यामची आई' नावाचा चित्रपट निर्मित केला. या चित्रपटात खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी पुराणिकबोवांची भूमिका केली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं साने गुरुजींवर निस्मिम प्रेम होतं. जाती, धर्माच्या पलीकडे जाणारा एक भारत उभा करण्याचं स्वप्न ते दोघंही पाहत होते. साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची विचार प्रेरणा आहेत. हिंदु - मुस्लिम ऐक्य हा साने गुरुजींच्या आणि सेवा दलाच्या जीवननिष्ठेचा भाग आहे.

साने गुरुजी त्यांच्या 'प्रिय सुधाला लिहिलेल्या सुंदर पत्रांमध्ये म्हणतात', 
'तुमचे सेवादल किती अडचणींतून वाढले! केवढी त्याची ध्येयनिष्ठा! सर्व धर्म नि संस्कृतींबद्दल त्याला वाटणारा आदर. आपणास हे राष्ट्र जात - धर्मनिरपेक्ष असे बनवायचे आहे. कोणी क्षुद्र लोक, 'निधर्मी राष्ट्र करणे हे का ध्येय? ही का या राष्ट्राची परंपरा?' असे म्हणत असतात. त्यांना ना कळतो धर्म, ना राष्ट्राची परंपरा. निधर्मी राष्ट्र म्हणजे राष्ट्रात धर्म नसणे. परंतु असा का जात - धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र असावे, याचा अर्थ? कोणत्या एका  विशिष्ट जातीचे, विशिष्ट धर्माचे हे राष्ट्र नाही; ते सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्वांचेच हितकल्याण पाहील, विशिष्ट जात-धर्माचे नाही पाहणार - हा याचा अर्थ, पाकिस्तान फक्त  मुसलमानांचेच हित पाहील, परंतु भारत सर्वांचे  हित पाहील. भारताने आपली पातळी  पाकिस्तानच्याइतकीच नये ठेवू. ते क्षुद्र बनले तर आपण नये बनू. पाकिस्तानी पावलांवर पावले टाकून का तुम्ही जाणार? तुमचे गुरू का जीना, लियाकत अली? ते प्राचीन ऋषी-मुनी, ते 'अवघाचि संसार सुखाचा करीन' म्हणणारे संत - ते ना तुमचे आदर्श? जात-धर्मनिरपेक्ष याचा अर्थ - सर्व जाती-धर्म यांना येथे संरक्षण आहे. समता आहे; धार्मिक समता आहे. हाच खरा धर्म, मानवधर्म. भारताने सर्वांना जवळ घेतले. आपण होऊन कोणी जात असले तर जावोत, परंतु आम्ही माणूसघाणे नाहीत. आमच्या राष्ट्राच्या उद्यानात सर्व धर्मांची, संस्कृतींची फुले फुलोत; ही आमची परंपरा. 'या रे या रे अवघे जण' अशी आमची हाक.

सुधा, राष्ट्र सेवादल यासाठी मला प्राणाहून प्रिय वाटते.'

(सेवादलाच्या दिग्गजांसमवेत त्यांचे वैचारिक सहोदर प्रबोधनकार ठाकरे)

साने गुरुजींना सेवा दल प्राणप्रिय होते. सेवा दल सैनिकांनाही साने गुरुजी. सेवा दलाच्या तारका मंडळात अनेक स्वयं प्रकाशित तारे होते. पण सेवा दलाच्या प्रारंभिक उभारणीत अनेक वैचारिक सहोदरांचंही समर्थन मिळालं. प्रबोधनकार ठाकरे हे त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना मी प्रबोधनकारांचा उल्लेख केला होता. आणि विधान परिषदेत भाषण करताना उद्धव ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा देताना कृतज्ञता व्यक्त केली होती. ती कृतज्ञता प्रबोधनकारांच्या विचारविश्वाशी तर जरूर आहे. पण त्याही पेक्षा प्रबोधनकारांनी गांधीजींचे एकदा नाही दोनदा प्राण वाचवले म्हणून आहे. ती हकीगत खुद्द प्रबोधनकारांनी आणि श्रीकांत ठाकरे यांनी सांगून ठेवलेली आहे.

नथुराम आणि पुण्यातल्या मंडळींचा एक कट प्रबोधनकारांनीच उधळून लावला होता. नथुराम त्याच्या सुरवातीच्या काळात 'अग्रणी' नावाचं एक पत्र चालवत होता. त्याने प्रबोधनकार ठाकरेंकडे लेख मागितला. प्रबोधनकारांच्या लेखात गांधीजींचा उल्लेख महात्माजी असा होता. नथुराम त्यांना म्हणाला, 'गांधींना महात्माजी का म्हणता? तेवढा उल्लेख काढून लेख द्या.' त्यावर संतापलेल्या प्रबोधनकारांनी नथुरामाला हाकलून दिलं.


पुढे अकोल्यात हिंदुराष्ट्रवाद्यांनी महात्माजींच्या सभेवर प्रणघातक हल्ला चढवण्याचं षढयंत्र रचलं होतं. तेव्हा तो डाव उधळवून लावला होता, प्रबोधनकार ठाकरे यांनीच. प्रबोधनकारांनी स्वतः संरक्षण देत गांधीजींना वेगळ्या रस्त्याने नेलं. आणि गांधीजींचे प्राण वाचवले. पुढे आणखी एक हकीगत अशी आहे की, साताऱ्याच्या रस्त्यावरून गांधीजींचा दौरा जात असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांची भेट हवी होती. पण साताऱ्यातल्या काही काँग्रेसींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात गांधीजींचे कान फुंकण्याचा प्रयत्न केला. पण प्रबोधनकार ठाकरे यांनी निरोप देताच, गांधीजी साताऱ्यात आवर्जून थांबले. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना हृदयापासून भेटते झाले. राष्ट्र सेवा दलाच्या सातारच्या पहिल्या मेळाव्याला कर्मवीर भाऊराव पाटलांचं भाषण स्फूर्तीदायक झाल्याचं पहिले दलप्रमुख एस. एम. जोशी यांनी लिहून ठेवलं आहे.  

क्रमशः 

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 

४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १


9 comments:

  1. वाचनीय
    अनुकरणीय..

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर

    ReplyDelete
  3. सर्व धर्म शांततेची आणि दुसऱ्या धर्माच आदर करण्याची शिकवण देत आहेत, राजकारणात धर्माचा वापर करणे चुकीचे आहे.
    आपले लेख सर्व राजकीय पक्षांसाठी प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर व मार्मिक लेख!

    ReplyDelete
  5. "भारत" या उदात्त संकल्पनेचे नेमके विवेचन... "भारतीय राष्ट्रवाद" या अंतर्भावनेचा जयघोष... सलाम या राष्ट्रवादी धुरीणांना नि त्यांच्या विचारांना... आजच्या परिस्थितीत उद्धव साहेबांनी दाखवलेल्या धारिष्ट्यालाही मनापासून सलाम.

    ReplyDelete
  6. भारतातील तमाम हिंदू व इतर धर्माच्या बांधवांनी हा लेख
    आवर्जून वाचावा. जर हा लेख पचनी पडला तर सर्वधर्मसमभावाची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आणखीनच रूजेल. खूप सुंदर प्रेरणादायी लेख.

    ReplyDelete
  7. Very much inspiring article .

    ReplyDelete
  8. वाचनीय लेख आहे हा...

    ReplyDelete
  9. हिंदू-मुस्लिम ऐक्यच भारताला तारण्याचा एकमेव मार्ग आहे हे समस्त भारतीयांना पटवणारा सुंदर लेख. डाॅ.सय्यद पारनेर

    ReplyDelete