Monday, 11 July 2016

अंधारलेल्या रात्रशाळेत ‘प्रकाशा’ची शक्यता



अंधारुन आलं असताना अचानक प्रकाशाचा किरण दिसावा तसं काहीसं परवा (शनिवार, 9 जुलै 2016) घडलं. भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेले प्रकाश जावडेकर मुंबईत आले आणि विमानतळावरुन रात्री थेट दादरच्या गोखले नाईट स्कूलला पोचले. मुलांशी भरभरुन बोलले.

अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीची गोष्ट. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार राज्यभरातील शिक्षणाधिकाऱयांच्या बैठकीत बोलत होते. ‘राज्यात आता रात्रशाळांची गरज नाही. त्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील.’ सचिवांचं हे वक्तव्य म्हणजे अधिकाऱयांसाठी आदेशच असतो. सचिवांच्या त्या वक्तव्याची बातमी आदळली आणि राज्यातल्या दोनशे नाईट स्कूल्स् आणि नाईट ज्युनिअर कॉलेजमधल्या टयुबलाईटस् जणू फुटल्या. नाईट स्कूल मधील मुले अस्वस्थ न होती तरच नवल.

रात्रशाळा सरकारला आता बंद करायच्या आहेत. कष्टकरी मुलांनी ओपन स्कूलमध्ये शिकावं असं सरकारचं म्हणणं आहे. रात्रीच्या शाळेचे ओझं कशाला? एव्हाना अर्धे शिक्षक सरप्लस झालेच आहेत.

रात्रीच्या शाळा बंद होणार या भितीच्या अंधारात असतानाच प्रकाश जावडेकरांची ही भेट सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली.

मी त्यांच्यांशी फोनवर बोललो तेव्हा ते कोच्चीला होते. तिथूनच त्यांनी महापालिकेला कळवलं होतं. महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले, ‘हे प्रकाश जावडेकरांनाच हे सुचू शकतं.’

मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांचे सहाय्यक सुनिल कुलकर्णी यांनी फोनवरुन कळवलं की, साहेब थेट शाळेतच येताहेत. प्रबुद्ध आणि संवेदनशील व्यक्तीच्या हातात शिक्षण खातं आल्याने काय घडतं त्याचा अनुभव मी घेत होतो.

दादर विभागातल्या आणखी दोन रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून घेतलं. महाराष्ट्रातून नाईट स्कूलमध्ये  88टक्के मार्क्स घेऊन पहिला आलेला सुनिल दंगापूरही येऊन पोचला. आजूबाजूच्या रात्रशाळांचे बरेच शिक्षकही येउढन पोचले. जावडेकर साहेब येणार म्हणून विधान परिषदेत त्यांच्यासोबत त्यावेळी काम केलेल्या संजीवनी रायकरही आवर्जून आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त श्रीमती कुंदन, शिक्षण उपायुक्त ढाकणे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, शिवनाथ दराडे आणि महापालिकेचे अधिकारी डॉ. केळुस्कर सगळेच येऊन पोचले होते. शाळेचे मुख्याध्यापक तळेले आणि त्यांच्या सहकाऱयांची धावपळ तो पर्यंत सुरुच होती.

शिक्षणमंत्री आले ते थेट वर्गात शिरले. दिवसभर राबणारी मुलं. कुणी घरकाम करणाऱया मुली. तर कुणी रेस्टॉरंटमध्ये काम करणारा वेटर. कुणी कुरियर बॉय. त्या मुलांना मंत्री पुन्हा पुन्हा विचारत होते, कामावरुन सुटल्यावर शाळेत येईपर्यंत काही खाता का? सर्वांचंच उत्तर होतं, ‘नाही.’ ते ऐकल्यावर जावडेकर स्वतहून मला म्हणाले, या मुलांना रात्रीसाठी मिड डे मिलसारखी काही योजना करावी लागेल. रात्र प्रशाला संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे हे सातत्याने हीच मागणी करत आहेत. सरकारने नाही केलं म्हणून निकिता केतकर यांच्या मासूम या एनजीओमार्फत 50 रात्रशाळांमध्ये खिचडीपासून अनेक योजना रात्रशाळा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीच्या पुढाकाराने राबवल्या जात आहेत.

मासूमचे अंकुश जगदाळे, सतत चार वर्षे 100 टक्के निकाल देणारे आगरकर रात्र विद्यालयाचे ए. डी. पाटील यांनी मंत्र्यांना निवेदन दिलं. रात्रीच्या अल्पोपहारा बरोबरच मोफत पाठ्यपुस्तकांची आणि फी माफीची मागणी निवेदनात होती.

दिवसभर राबूनही तुम्ही रात्री शिकण्याची हिमंत राखता. तुमच्या जिद्दीला सलाम. या शब्दांत जावडेकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. बच्चा बच्चा पढेगा तभी देश बढेगा, अशी नवी घोषणाही त्यांनी दिली. रात्रशाळांसाठी केंद्र सरकार सगळी मदत करील. मोठ्या शहरांमध्ये रात्रशाळा उघडण्यास प्रोत्साहन देईल, असंही त्यांनी सांगितलं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो आहे. त्यामुळे गरीबाघरच्या मुलांची अडचण मला माहित आहे. रात्रशाळा, पालिकेच्या शाळा, जिल्हापरिषदेच्या शाळा यांच्या प्रश्नांबद्दल मी विनोद तावडेंशी बोलणार आहे.

रात्रशाळा पालिकेच्या इमारतीत भरतात. त्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न जावडेकर सरांना सांगितला. त्यांनी तिथेच अतिरिक्त आयुक्त कुंदन मॅडमना आदेश दिले, भाडेवाढ करु नका. आणखी मदत करा.

मला म्हणाले, कपिल मी जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे मुलांशी आणि शिक्षकांशी आवर्जून बोलतो आहे. शिक्षणासाठी काही चांगलं त्यातूनच करता येईल. जावडेकरांच्या बोलण्यातून त्यांची प्रामाणिक तळमळ दिसत होती. जाताना त्यांनी आवर्जून प. म. राऊतांची चौकशी केली. सर्वात मोठी रात्रशाळा व कॉलेज प. म. राऊत चालवतात. सहा हजार विद्यार्थी तिथे शिकताहेत. मारुती म्हात्रे, सदानंद रावराणे आणि गिरीष सामंतही भेटण्यासाठी थांबले होते. गिरीष सामंतांशी बोलताना जावडेकरांनी आवर्जून त्यांचे वडील माजी आमदार प. बा. सामंत यांची आठवण सांगितली.

दहा मिनिटांची भेट तासभराची झाली. पण रात्रशाळांसाठी मोठी आशा त्यांनी पल्लवित केली. स्मृती ईराणी गेल्या आणि प्रकाश जावडेकर आले याचं देशभरात स्वागत झालं. ते का झालं? रात्रशाळेतली त्यांची भेट सारं काही बोलून गेली.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


15 comments:

  1. सुंदर अनुभव.छान मांडणी.👌

    ReplyDelete
  2. पढना अच्छा लगा,दिल खुश हुअा...धन्यवाद

    ReplyDelete
  3. पढना अच्छा लगा,दिल खुश हुअा...धन्यवाद

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Salute to Kapil sir for what he is doing for education

    ReplyDelete
    Replies
    1. कपिल सर , रात्रशाळेची गरज आणि प्रश्न अधोरेखित झाले. जावडेकर हे चांगले बदल घडवून आणतील असा विश्वास वाटतो.

      Delete
    2. कपिल सर , रात्रशाळेची गरज आणि प्रश्न अधोरेखित झाले. जावडेकर हे चांगले बदल घडवून आणतील असा विश्वास वाटतो.

      Delete
  6. बच्चा बच्चा पढेगा तभी देश बढ़ेगा हे आपल्या राज्यातील मंत्रि महोदयांना कधी समजेल ? उत्तम लेख.

    ReplyDelete