Wednesday, 6 July 2016

लहानग्यांना बिघडवलेले सहन होणार नाही




शहरातल्या ख्यातनाम शाळेत घडलेल्या दुर्मानवी प्रकाराने यवतमाळ पेटलं आहे. जनक्षोभ इतका होता की थेट मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून लोकांना शांत करावं लागलं. आपल्या लाडक्या मुलीवर शाळेतच असं काही घडावं याची कल्पना कोणता पालक करील? पेटवा-पेटवीत राजकारण असेलही, पण त्या शाळेत पाठवणार्‍या मुलींच्या आई-बापाच्या काळजातला घोर नाकारता कसा येईल? त्या दोन नराधमांना पोलिसांनी गजाआड केलं; पण लोकक्षोभ शांत झाला नाही. तेव्हा थेट संस्थाचालकांवरही कारवाई झाली. एका मोठय़ा घरातल्या मुलीच्या बाबतीतच हे घडल्याने हा प्रकार उघडकीला आला. प्रकार घृणास्पद होता. गुप्तांग सुजले होते. आता मुली बोलू लागल्या आहेत. मुलींच्या स्वच्छतागृहांमध्येही ते दोघं डोकवत असत. विखारलेल्या नजरांनी. 

ही घटना काही पहिलीच आहे काय? फक्त यवतमाळमध्येच पहिल्यांदा घडली काय? मुंबईत दादरच्या शाळेत एका कँटिन बॉयकडून इतकंच वाईट घडलं होतं. मीरा भाईंदरच्या शाळेतही अशा घटनेने आठवडाभर शाळेत आंदोलन चाललं. गेल्या चार-पाच वर्षांत शाळांमधले असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. हे अचानक कसं सरू झालं? घटना आधीही घडत होत्या. पण बाहेर येत नसत. पूर्वी पालकही मुलांना गप्प बसवत. 'बॅड टच', 'गुड टच' म्हणजे काय? हे शाळांमध्ये शिकवायला सुरुवात झाल्यापासून मुलं आता अधिक निर्भयपणे बोलू लागली आहेत. लहान वयातली मुलं सर्वात असुरक्षित असतात. पण फक्त शाळेतच असं नाही. बाहेरही. मैदानात खेळत असतात तेव्हाही. अन् घरात एकटी असतात तेव्हाही. मुलांवरील अत्याचारांचे प्रकार सर्वाधिक घडतात ते घराच्या चार भिंतीच्या आडच. जवळचंच कुणीतरी, नात्यातलं किंवा परिचितांपैकी असा अतिप्रसंग घडवत असतो. लैगिंक विकृतीतून हे घडतं, हे उघड आहे. वैद्यकीय भाषेत 'पर्सनॅलिटी डिसऑर्डर' मानलं जातं त्याला. एरव्ही सामान्य धडधाकट दिसणारे, कुणी संशयही घेणार नाही असे. पण त्यांच्यातल्या लैगिंक विकृतीचे शिकार होतात ती लहान मुलं. म्हणून घराच्या कुंपणाच्या आड असे प्रकार अनेकदा घडतात. बाहेर वाच्यताही होत नाही. कधी कधी शाळेत घडतं. शाळा सार्वजनिक असते. म्हणून चर्चा सार्वजनिक होते. स्फोट मोठा घडतो. प्रकरण दडपून टाकण्याची वृत्ती सर्वत्र असते. आपलं घर बदनाम होईल. शाळा बदनाम होईल. म्हणून प्रकरणं मिटवली जातात. शिकारी नात्यातलाच असतो, उगाच बभ्रा नको म्हणून घरातलेच मिटवून टाकतात. तसं कधी शाळेतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ज्यांच्याकडून हा दुर्मानवी प्रकार घडतो त्यांना अटकाव व्हायलाच हवा. जबर शिक्षा व्हायलाच हवी. बदनामीच्या भितीने असे प्रकार कधीही झाकले जाऊ नयेत. झाकण्याचा प्रयत्न केला तर लोक चिडणारच. का चिडू नये त्यांनी? त्यांच्या कोवळ्या कळ्या कुणी कुस्करून टाकत असेल तर संतापाचा स्फोट होणारच. मग सुक्या बरोबर ओलंही जळतंच. हॉस्पिटलमध्ये उपचाराविना कुणाचा जीव गेला की लोक चिडतात. जबाबदार नसलेल्या डॉक्टरांनाही मारहाण करतात. इस्पितळाची मोडतोड करतात. काही हितसंबंधी त्यात तेलही ओततात. पण परिस्थिती कायद्याने हाताळली नाही तर अपराध्यांना शिक्षा होण्याची शक्यता कमी असते. याचं भानही राखायला हवं. 

या घटना अपवादात्मक असतात. त्या जनरलाईज करून चालणार नाहीत. यवतमाळचे ते दोघे शिक्षक होते. शिक्षकांची अशी अनेक प्रकरणं उघडकीला आली आहेत. पण म्हणून सगळ्या शिक्षक बिरादरीला बदनाम करून चालणार नाही. समाजात विकृती आहे. शिक्षक त्या समाजाचाच भाग असतो. आपल्या महाराष्ट्रात ७ लाख शिक्षक आहेत. ६0-७0 जण चुकीचं वागले म्हणून सरसकट ७ लाख जणांना दोषी कसं मानता येईल? खरं सांगतो, मुलांचा सर्वाधिक विश्‍वास आपल्या आई बापांच्या पाठोपाठ आपल्या शिक्षकांवर असतो. त्या विश्‍वासाला तडा जाऊ देता कामा नये. ही जबाबदारी शिक्षकांची तर आहेच, पण समाजाचीही आहे. 

हा प्रश्न मानसिक आरोग्याचा आहे. फक्त शिक्षकांच्याच नाही, समाजाच्या मानसिक आरोग्याचा आहे. प्रश्न गंभीर आहे. अडचण आहे ती तो प्रश्न गंभीर नाही असं मानण्याची. म्हणजे या घटना अपवादात्मक आहेत. सगळ्यांवर तसा आरोप करण्याची गरज नाही. म्हणून तो प्रकार मोठा नाही असं मानण्याची वृत्ती ही गंभीर गोष्ट आहे. तो आपला दोष आहे. घटना एक असो किंवा काही. अपवादात्मक असल्या तरी त्या वाईट आहेत. विकृत आहेत. घृणास्पद आहेत. निंदास्पद आहेत. दंडनीय आहेत. म्हणून हे अपवादही नकोत. 

यवतमाळच्या किंवा अन्य कुठल्या त्या विकृतीचा समाचार कायदा घेईलच. पण किमान शाळेचं मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यालाही काही करावं लागेल. आपण शैक्षणिक अर्हता तपासतो. 'मेंटल हेल्थ'ही तपासायला हवी. अधिक काळजी घ्यायला हवी. 

महाराष्ट्र साने गुरुजींना मानणारा आहे. मुलांना ईश्‍वराची फुलं मानणारा आहे. रवींद्रनाथांनी ख्रिस्ताची अन पैगंबरांची गोष्ट सांगितली होती. ख्रिस्त म्हणाले होते, 'माझ्या लहानग्यांना बिघडवलेले मला सहन होणार नाही.' पैगंबर रस्त्यातून मुलांना पकडून नेत आणि खेळायला लावत. त्यांना गोष्टी सांगत. साने गुरुजींनी सांगितेल्या गोष्टी पुन्हा उजळण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ६  जुलै  २०१६


15 comments:

  1. बरोबर आहे. जे शिक्षक असं कृत्य करत आहे त्यांस शिक्षा होणे गरजेचे आहे. शिक्षक गुरु आणि पित्यासमान असतो ही बाब नवीन शिक्षकांच्या मनात बिंबविणे अत्यावश्यक आहे. घटना घडण्यापूर्वी रोखणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  2. बरोबर आहे. जे शिक्षक असं कृत्य करत आहे त्यांस शिक्षा होणे गरजेचे आहे. शिक्षक गुरु आणि पित्यासमान असतो ही बाब नवीन शिक्षकांच्या मनात बिंबविणे अत्यावश्यक आहे. घटना घडण्यापूर्वी रोखणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  3. गंभीरता पुर्वक काळजी घेणयाची व लगेज उपचाराची गरजकर आहे...Take serious action immediately ...

    ReplyDelete
  4. Very nice and real story in society

    ReplyDelete
  5. नाईस गुड लय झ्याक पोस्ट सर

    ReplyDelete
  6. जेव्हा शिक्षकांनी यवतमाळ शाळेत अशी घृणास्पद कृती केली तेव्हा शिक्षकांना खाली मान घालावी लागते. तर अशा शिक्षकांना जबर शिक्षा झाली पाहिजे. नवीन अशी कृती करनार नाही (विजय सोनवणे मुख्या.नुतन माध्यमिक विद्यालय चुंचाळे ता चोपडा जिल्हा जळगाव )

    ReplyDelete
  7. जेव्हा शिक्षकांनी यवतमाळ शाळेत अशी घृणास्पद कृती केली तेव्हा शिक्षकांना खाली मान घालावी लागते. तर अशा शिक्षकांना जबर शिक्षा झाली पाहिजे. नवीन अशी कृती करनार नाही (विजय सोनवणे मुख्या.नुतन माध्यमिक विद्यालय चुंचाळे ता चोपडा जिल्हा जळगाव )

    ReplyDelete
  8. जेव्हा शिक्षकांनी यवतमाळ शाळेत अशी घृणास्पद कृती केली तेव्हा शिक्षकांना खाली मान घालावी लागते. तर अशा शिक्षकांना जबर शिक्षा झाली पाहिजे. नवीन अशी कृती करनार नाही (विजय सोनवणे मुख्या.नुतन माध्यमिक विद्यालय चुंचाळे ता चोपडा जिल्हा जळगाव )

    ReplyDelete
  9. There can be formation of one group headed by one lady teacher which will have close wach on girl students and have interaction with them .

    ReplyDelete
  10. There can be formation of one group headed by one lady teacher which will have close wach on girl students and have interaction with them .

    ReplyDelete
  11. समाज अशा नालायक शिक्षकांमुळे सर्व शिक्षकांना दोष देउुन मोकळा होतो.काही शिक्षक अतिशय वाइट विचारांनी व सवयीने ग्रासलेली आहेत,विशेष म्हणजे अशा शिक्षकांना समाजातील संस्था'आदर्श शिक्षक' पुरस्कार देउन सन्मानित करतात.अशा नराधमाना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    ReplyDelete
  12. abhinandan kautukaspad Katy MANGAL KAMANA

    ReplyDelete