Wednesday, 18 May 2016

पुढच्या 'नीट'चं काय?



राज्यांची सीईटी अमान्य करत 'नीट'च्या बाजूनेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. त्याहीपेक्षा हाल झालेत ते मुलांचे आणि पालकांचे. सीईटी होऊनही तिला मान्यता नाही. शिक्षणमंत्र्यांच्या भरवशावर काही लाख मुलांनी परीक्षा दिली, त्या परीक्षेचा उपयोग नाही. जुलैमध्ये नीटची परीक्षा पुन्हा होईल. पण पन्नास दिवसांत अभ्यास कसा होणार? सीबीएसई बोर्डाची पुस्तकं बाजारात नाहीत. पुन्हा ११वी, १२वी या दोन वर्षांचा अभ्यास करायचा. मोठं कठीण काम आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या दुसर्‍याच दिवशी वर्तमानपत्रांमध्ये मोठ मोठय़ा जाहिराती झळकल्या. नीट क्लासेसचे दुकानदार जणू सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाटच पाहत होते. पन्नास दिवसांसाठी पन्नास हजारांची फी. पुन्हा गॅरंटी नाही. मुलं आणि पालक डिप्रेशन खाली गेले आहेत. 

याला जबाबदार कोण? चर्चा करावीच लागेल. पण आधी या वर्षी नीटग्रस्त झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळवून द्यावा लागेल. पाच दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं होतं, त्यांनीच पुढाकार घ्यावा म्हणून. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना साकडं घातलं तर मार्ग नक्की निघेल. सुप्रीम कोर्ट आणि दिल्लीचं 'आप' सरकार सीईटीच्या विरोधात आहे. निर्णय घेणं सोपं नाही. पण पंतप्रधानांकडे आपल्या मुख्यमंत्र्यांचं वजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांना भेटणार आहेत. या वर्षी झालेली सीईटी ग्राह्य धरण्याचा निर्णय ते घडवून आणतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. 

पण हा घोळ झाला कसा? मुलांची फसवणूक केली कुणी? 

देशव्यापी सामाईक प्रवेश परीक्षा होणार याचे संकेत केंद्र सरकारने २0१0 पासूनच दिले होते. बारावीचा अभ्यासक्रम देशभर समान करण्याची प्रक्रिया तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सुरूही केली होती. शिक्षक भारतीच्या पुढाकाराने मुंबईच्या मुख्याध्यापकांनी २00८ मध्ये तीन राज्यांचा अभ्यास करून अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्र सरकारला केंद्रीय मंडळाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची शिफारस केली होती. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्वत: लक्ष घालून अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया सुरूही केली होती. ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञांची अभ्यास मंडळे राज्यात प्रथमच नेमली गेली. नवीन सरकार आल्यानंतर विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी ही सगळी मंडळं बरखास्त करून टाकली आणि नीट, सीईटी प्रकणात केंद्राच्या विपरीत निर्णय घेतले. नीट की सीईटी या टांगत्या तलवारीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय जास्त जबाबदार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे आता प्रचंड धावपळ करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभारच. पण आधी झालेला गोंधळ त्यांनी नीट निस्तरला असता तर आज महाराष्ट्र नीटग्रस्त झाला नसता. 

राज्यातील सीईटी २0१३ आणि २0१४ मध्ये नीटच्या धर्तीवरच घेतल्या गेल्या होत्या. परीक्षेचा पाठय़क्रम व स्वरूप नीट (युजी)च्या परीक्षेप्रमाणेच होतं. ११वी, १२वीचा दोन वर्षांचा एकत्रित अभ्यासक्रम आणि निगेटिव्ह मार्किंग. या पद्धतीत गेल्या वर्षी दोन बदल करण्यात आले. ३ जानेवारी २0१५ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आणि निगेटिव्ह मार्किंगची पद्धत वगळून टाकली. ९ मार्च २0१५ ला दुसरा निर्णय घेतला आणि अकरावीचा अभ्यास वगळून टाकला. फक्त बारावीच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमावर आधारित २0१५-१६ पासूनच्या परीक्षा घेतल्या जातील, असा तो निर्णय होता. हे दोन्ही निर्णय झाले नसते तर एव्हाना मुलांपुढे इतकं मोठं संकट आलं नसतं. महाराष्ट्रातल्या मुलांची फसवणूक शिक्षणखात्यानेच केली आहे. 

आपला अभ्यासक्रमही जवळपास दिल्ली बोर्डाच्या समकक्ष झाला आहे. पण त्यातही आपल्या राज्य बोर्डातल्या अधिकार्‍यांचा जास्तीचा शहाणपणा मुलांना नडला आहे. अभ्यासक्रम बदलताना ८0 टक्के केंद्राप्रमाणे आणि २0 टक्के राज्याप्रमाणे असं स्वत:च ठरवून टाकलं. हा निकष अपेक्षित होता, तो फक्त भाषा आणि समाजशास्त्र विषयांपुरता. विज्ञान आणि गणित राज्यनिहाय बदलण्याचं कारण काय? जागतिक स्पर्धेत आपली मुलं मागे राहू द्यायची नसतील तर आंतरराष्ट्रीय दर्जा समान शिक्षण महाराष्ट्रातील मुलांना मिळायला हवं. 

पण हे झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हा काही अधिकार्‍यांच्या किंवा खातेप्रमुखांच्या इच्छांचा खेळ नाही. लक्षावधी मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा कुणालाच अधिकार नाही. दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था आणि संधी यांची समानता नसेल तर एचएससी बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतील. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातीमुळे ती दुकानदारी लगेच कळते. पण राज्य बोर्डाकडून मध्यमवर्गीयांना आता इतर बोर्डाच्या विनाअनुदानित शाळांकडे पळवण्याचा डाव लगेच लक्षात येत नाही. अनुदानित शिक्षण मोडून टाकण्याचा एक लांब पल्ल्याचा कट या गोंधळात बिनबोभाट पार पडला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी ठरवलं तर यावर्षीच्या सीईटी परीक्षार्थींना नक्कीच दिलासा मिळेल. प्रश्न पुढल्या वर्षापासूनच्या मुलांचा आहे. राज्य बोर्डातल्या अनुदानित शाळांमधल्या मुलांचं शैक्षणिक कुपोषण वाढवणारे शासन निर्णय बदलले जात नाहीत तोवर काही खरं नाही. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १८ मे २०१६

Wednesday, 11 May 2016

राम नाईकांचं मोठेपण




मृणालताई खासदार झाल्या आणि पाठोपाठ राम नाईक आमदार झाले. मी नुकताच दहावी पास झालो होतो. दहिसरच्या कांदरपाड्यात आम्ही राहायचो. मला मताचा अधिकार नव्हता आणि कांदरपाड्यात त्या वेळच्या जनता पक्षाचं कुणी नव्हतं. या दोघांचेही मी तेव्हा काम केलं. राम नाईक नंतर खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले आणि आता देशातल्या सगळय़ात मोठय़ा राज्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. वय वर्षे ८१; पण बाभूळ झाडासारखे ताठ उभे आहेत. दिवसाचे बारा-बारा तास आजही काम करतात. नुकतंच त्यांच्या आठवणींचं पुस्तक प्रकाशित झालं. 'चरैवेति! चरैवेति!!' यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो होतो.

सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे राम नाईक. नोकरीसाठी ते मुंबईत आले. चर्चगेट स्टेशनवरच्या बाथरूममध्ये ते सकाळचे विधी उरकत. नोकरी करत लॉ शिकले. जनसंघाचं काम करताना कधी सत्तेत जाऊ, याचा विचारही त्यांना शिवला नसेल. आणीबाणीच्या विरोधात जन लाट उसळली. राम नाईक जनता पक्षाचे आमदार बनले ते बोरिवलीसारख्या नवख्या मतदारसंघातून. तीनदा आमदार व नंतर पाचदा खासदार. अभिनेता गोविंदाने पराभूत करेपर्यंत त्यांना पराभव माहीत नव्हता. मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर राम नाईकांना राज्यपाल होण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची विलक्षण हातोटी नाईकांच्या हाती आहे. मतदारसंघावर पकड कशी मिळवावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

राम नाईक पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा कोळीवाड्यांमधून त्यांना एकही मत मिळालं नव्हतं. आता गोराईपासून पालघरमधल्या सातपाटी वडराईपर्यंतच्या कोणत्याही कोळीवाड्यात जा. मच्छीमारांच्या दर्यात राम नाईकांची स्वत:ची एक जागा आहे. बोरिवली-डहाणूच्या ट्रेनला लोकांनी 'राम नाईक एक्सप्रेस' असं नाव ठेवलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्याची मागणी खूप जुनी; पण संसदेत आणि केंद्रात सत्तेत गेल्यानंतर बॉम्बेचं मुंबई करून घेण्याचं श्रेय राम नाईक यांचंच आहे. मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव बदलून शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव सुद्धा नाईक साहेबांचाच. खासदारांना खासदार निधी मिळतो, त्यामागे नाईकांचाच पाठपुरावा होता. त्यांच्या कामाचा धडाका जसा अचंबित करणारा, तसाच तो विषय लोकांपर्यंत नेण्याची त्यांची हातोटीही तितकीच विलक्षण.

वीस-बावीस वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांना विळखा घातला होता; पण त्यातून ते सहिसलामत बाहेर पडले. त्यांचा आजचा कामाचा हुरुप आणि या वयातही ताठ चालणं पाहून कुणी विश्‍वास ठेवणार नाही की, ते कधी काळी कॅन्सरग्रस्त होते; पण त्याकाळात कॅन्सरच्या दुखण्यापेक्षा त्यांना त्रास झाला तो वरिष्ठ निवृत्त अधिकार्‍याच्या आरोपांमुळे. दहिसरच्या शेतजमिनीवरच्या तीन शेतमजुरांच्या झोपड्या पालिकेने पाडण्याचा निर्णय घेतला होता. राम नाईक शेतमजुरांच्या बाजूने उभे राहिले. अतिरिक्त आयुक्त राममूर्तींनी शेतमजुरांच्या बाजूने निर्णय दिला; पण मुंबईचे आयुक्त सदाशिव तिनईकर यांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली. निवृत्तीनंतर तिनईकरांनी थेट राम नाईकांवरच आरोप केले. वर्तमानपत्रात अशा बातम्यांना लवकर प्रसिद्धी मिळते. मी तेव्हा आज दिनांक या सायंदैनिकाचा संपादक होतो. मी राम नाईकांची बाजू घेतली. वीस वर्षांनंतर राम नाईकांनी आपल्या आठवणी लिहिताना आवर्जून त्याबद्दल लिहिले आहे.

'...  त्या मन:स्तापाचा तब्येतीवर परिणाम झाला. पुन्हा रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली; परंतु औषधाच्या जोडीने पत्रकार कपिल पाटील यांच्या शोध पत्रकारितेमुळे मला काहीसा आराम पडला. समाजवादी विचारसरणीचे कपिल पाटील. खरं तर माझे वैचारिक विरोधक. त्या वेळी ते आज दिनांक चालवत. ते तसे लोकप्रिय होते; पण माझ्या शुचितेबद्दल विश्‍वास वाटत असेल किंवा शोध पत्रकारितेच्या स्वभावामुळे, कोणलाही न सांगता कपिल पाटील त्या वादग्रस्त जागेवर गेले. राम नाईक कसे बरोबर आहेत, हे सांगणारा छायाचित्रानिशीचा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. परिणामी, सर्व वृत्तपत्रांनी या वादावर पडदा टाकला.' आपल्या वैचारिक विरोधकाची आठवण इतक्या आवर्जून राम नाईकांनी सांगावी, याचंच अप्रुप वाटतं. काही महिन्यांपूर्वी मी लखनौला गेलो होतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी बोलावून घेतलं होतं. तिथल्या जवळपास दोन लाख शिक्षक मित्रांची नोकरी हायकोर्टाच्या निर्णयामुळे गेली होती. मोठी अस्वस्थता होती. महाराष्ट्रातल्या वसतिशाळेतल्या शिक्षकांचा प्रश्न कसा सोडवला, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं. या प्रश्नावर मी राज्यपालांनाही भेटलो. कारण केंद्राची मदत आवश्यक होती. यूपीचं समाजवादी सरकार भाजपच्या राज्यपालांबद्दल थोडेसे साशंक होतं. राम नाईकांनी राजभवनात मोठय़ा प्रेमाने मला बोलावलं. प्रश्न समजून घेतला. मदतही केली. राजकारण मध्ये आणलं नाही. राम नाईकांच्या राजकीय जीवनातलं सगळय़ात मोठ काम कोणतं असेल तर ते कुष्ठरोग्यांना त्यांनी दिलेल्या सन्मानाचं. बोरिवलीतल्या कुष्ठपीडितांचे प्रश्न त्यांनी सोडवलेच; पण एकदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कुष्ठपीडितांचे गार्‍हाणे घेऊन ते मंत्रालयात गेले होते. कुष्ठपीडितांना मंत्रालयात प्रवेश मिळेना. राम नाईकही हटून बसले. मुख्यमंत्र्यांच्या कानी ही गोष्ट गेली. त्यांनी आवर्जून बोलावलं. खरंच वसंतदादाही मोठे. राम नाईकही मोठे.


(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)



पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ११ मे २०१६

Thursday, 5 May 2016

राज्याचं शिक्षण 'नीट' कधी होणार?



राज्याची सीईटी परीक्षा तोंडावर असताना केंद्राची 'नीट' परीक्षा घेण्याचा निर्णय येऊन आदळला. एव्हाना नीट परीक्षाही झाली. महाराष्ट्रातल्या मुलांना पेपर कठीण गेला. आता या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी याचिका आठ राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने कौल दिल्यास एमबीबीएस आणि बीडीएसला जाऊ मागणार्‍या आपल्या मुलांची सुटका होईल. तसं न झाल्यास महाराष्ट्र 'नीट'ग्रस्त होईल. आपली मागणी तूर्त सीईटीची आहे. किमान दोन वर्षाची सूट हवी आहे. ती आवश्यकही आहे. कारण राज्याची सीईटी दहावी, बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. तर केंद्राची नीट परीक्षा सीबीएसई या केंद्रीय मंडळाकडूनच घेण्यात येत आहे. आपल्या आणि केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमात मोठी तफावत आहे. साहजिकच महाराष्ट्रातल्या मुलांचं नुकसान होणार आहे. फार तर दोन वर्षे सूट मिळेल. थोडा दिलासा मिळेल. पण तो शाश्‍वत उपाय नाही. 

केंद्रीय प्रवेश किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र नेहमीच मागे राहतो. आयआयटी जी ब्रेक करणार्‍या आपल्या विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने कमी असते. परवा नीट परीक्षा देऊन बाहेर पडलेली मुंबई, ठाण्यातील मुलं पेपर कठीण गेला म्हणून रडत होती. त्या मुलांचा दोष नाही. हा दोष राज्य सरकारचा आहे. मागच्या अनेक सरकारांचा आहे. आपण बदलायलाच तयार नाही. मागे राहण्यात धन्यता मानणारे राज्यकर्ते आणि अधिकारी असतील तर मुलांना रडावंच लागणार. 

दहा वर्षांपूर्वी शिक्षक आमदार झाल्या झाल्या मी दोन गोष्टींसाठी सतत आग्रही राहिलो होतो. शिक्षकांना सन्मान मिळावा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी. मुंबईतल्या शिक्षकांचा पगार एक तारखेला सुरू झाला. अभ्यासक्रम बदलाची माझी मागणी होती. आपला अभ्यासक्रम फार जुनाट आहे. पुस्तकं निरस आहेत. उत्कृष्टतेचा अभाव आहे. देशातल्या शिक्षणात आपला सतरावा नंबर आहे, असं सभागृहात अनेकदा ओरडून सांगत होतो. आठ वर्षांपूर्वी नागपूरच्या अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी मला उत्तर दिलं, 'देशात आपण सर्वात पुढे आहोत.' मी कपाळावर हात मारला. अधिकारी ब्रीफ करतात. मंत्री उत्तर देतात. तत्कालीन शिक्षण सचिव माझ्या मताशी सहमत होते. पण महाराष्ट्रातले अधिकारी आत्मस्तुतीत मग्न होते. पुढे शिक्षणमंत्री म्हणून राजेंद्र दर्डा आले आणि शिक्षणखात्याने कात टाकली. मी मुंबईचे काही ज्येष्ठ मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांची तीन अभ्यास पथके तयार केली. दिल्ली, पटणा, केरळ येथे पाठवली. त्यांनी दिलेला अहवाल राजेंद्र दर्डा यांनी स्वीकारला. त्यातल्या सूचनांचं स्वागत केलं. सीबीएसई बोर्डाप्रमाणे गणित आणि विज्ञानाचा अभ्यासक्रम एक करावा, ही त्यातली मुख्य सूचना होती. तेव्हा संजयकुमार शिक्षण सचिव होते. त्यांनी स्वत: मार्गदर्शन केलं. अशासकीय प्रयत्नाचं असं स्वागत पहिल्यांदाच झालं. अभ्यासक्रम बदलाला गती आली. आता आपण जवळपास दहावीच्या परीक्षेत समान अभ्यासक्रम स्वीकारला आहे. खरं तर नववी, दहावी, अकरावी आणि बारावी यासाठी सीबीएसई बोर्डाची गणित, विज्ञानाची पुस्तके जशीच्या तशी स्वीकारावीत हा आमचा आग्रह होता. अजूनही वेळ गेलेली नाही. या चार वर्षांचा अभ्यासक्रम सार्‍या देशात एक व्हायला हवा. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी अडीच वर्षांपूर्वी तसं जाहीर केलं होतं. पण महाराष्ट्रात नवं सरकार येऊनही त्या दिशेने पावलं टाकण्याऐवजी शिक्षकांनाच कमी कसं करायचं यासाठी शिक्षण खात्यात उद्योग सुरू आहे. 

गेल्या काही वर्षांत मोठय़ा शहरांमधे इतर बोर्डांच्या शाळा निघू लागल्या आहेत. एसएससी बोर्डाच्या जुन्या अभ्यासक्रमात टाकण्यापेक्षा केंद्रीय बोर्डाच्या किंवा आयबीच्या शाळांम
ध्ये आपली मुलं टाकण्याकडे उच्च मध्यमवर्गीयांचा कल आहे. त्यासाठी हवे तितके पैसे मोजायला तो वर्ग तयार आहे. या सगळयाच शाळांमध्ये त्या दर्जाचा शिक्षकवर्ग आणि उत्तम व्यवस्था आहे, असं नाही. तरीही तिथे रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे शिक्षण खातं बदलाला तयार नाही. गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या मुलाचं मात्र नुकसान होत आहे. मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमात घातल्याने फरक फक्त माध्यमात होतो. अभ्यासक्रमात नाही. अभ्यासक्रम अद्ययावत केला तर मराठी शाळेतली मुलंही नीट परीक्षेत अव्वल येऊ शकतील. यूपीएससी परीक्षेत गर्दी करू शकतील. आयआयटी जी ब्रेक करू शकतील. भूषण गगराणी यांनी वीस वर्षांपूर्वी मराठीत परीक्षा देऊन यूपीएससी परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण केली होती. त्यांचा मार्ग पुढे अनेक तरुणांनी स्वीकारला. 

अभ्यासक्रम वेगाने बदलायला हवा. विषयातले तज्ज्ञ शिक्षक द्यायला हवेत. राज्यसरकार नीटच्या फेरविचारासाठी सर्वोच्च न्यायालयात जातं आणि दुसर्‍या बाजूला तीन भाषांना मिळून एकच शिक्षक तर गणित, विज्ञानाला एकच शिक्षक नेमा म्हणून फतवा काढतं. समाजशास्त्राला स्वतंत्र शिक्षकच नको म्हणतं. हा उफराटा कारभार मुख्यमंत्र्यांनी थांबवायला हवा. सर्वोच्च न्यायालय दोन वर्ष सूट देईलही. पण पुढे काय? महाराष्ट्रातल्या मुलांचं नुकसान करण्याचा अधिकार शिक्षणमंत्र्यांना कुणी दिला?
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ४ मे २०१६

Wednesday, 27 April 2016

कन्हैयाचा गळा कोणी दाबला?



शनिवारी २३ एप्रिलला कन्हैया मुंबईत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी पुण्यातल्या सभेला जाण्यासाठी त्याने विमानात पाय ठेवेपर्यंत एकही अनुचित घटना घडली नव्हती. सकाळी त्याला विमानतळावर सोडून मी परतत होतो. इतक्यात निशांतचा, कन्हैयाच्या जीवलग मित्राचा मोबाईल आला. घाबरलेल्या स्वरात.. 'पाटीलसाहब आप जल्दी आईए. कोई, भैय्या का गला दबा रहा है!' विमानतळावर पोहोचेपर्यंत त्याचे तीन चार फोन आले. मी पहिला फोन पोलीस आयुक्तांना केला. पुढच्या काही मिनिटांतच सहार पोलीस स्टेशनचे एसीपी वेदकसाहेब आणि सीनिअर इन्स्पेक्टर मुखेडकर आत पोहोचले होते. आयुक्तांनी मला कल्पना दिली होती, विमानतळाच्या आत सीआयएसएफ या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा अधिकार चालतो.

अकरा वाजेपर्यंत मा. गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आली, विंडो सीटवरून भांडण झालं म्हणे. पुढे पोलिसांनी सीआयएसएफ माहितीनुसार सांगितलं की, मानस डेकाला हल्ला करायचा नव्हता. तो घसरून पडला. त्याचा हात कन्हैयाच्या गळयावर पडला आणि गळा दाबला गेला. विमानतळातले अधिकारी सांगत होते कॉम्प्रमाईज करा. नंतर अगदी ठरवल्याप्रमाणे डेकाबरोबर कन्हैया आणि त्याच्या सहकार्‍यांना विमानातून उतरवलं गेलं.

कन्हैयाने पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं सीटचं भांडण लोकलमध्ये किंवा जनरल बोगीमध्ये होतं. विमानातली सीट बोर्डींग कार्डावर लिहलेली असते. तरीही गृहराज्यमंत्री ठोकून देत होते की विंडो सीटवरून भांडण झालं. मानस डेका भाजपचा पदाधिकारी होता का? मोदी समर्थक नक्कीच आहे. फेसबुकवरच्या त्याच्या पोस्ट पाहा. तरीही पोलिसांचं खरं मानू. मग नौटंकी कुणाची होती?

कन्हैयाला पुण्यात पोहोचू द्यायचं नाही, म्हणून घातलेला तो खोडा होता. केवळ खोडाच होता काय? मी पोलिसांना म्हणालो, कोणत्याही परिस्थितीत कन्हैयाला पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी माझी. तो बाय रोड जाईल. मुंबई ते पुणे पोलिसांनी झेड प्लस सारखी सुरक्षा व्यवस्था केली. कोणत्याही शक्यतेला जागा ठेवायची नाही, याची काळजी वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत होते. ही काळजी मग का घेण्यात आली?

मुंबई आणि पुणे पोलिसांना सलामच केला पाहिजे. मुंबईत आणि पुण्यात सभा होऊ द्यायची नाही, यासाठी किती प्रयत्न झाले. वरळीची सभा चेंबूरला झाली. आदर्श विद्यालयाने जागा दिली होती. शाळेचे विश्‍वस्त डाव्या विचारांचे. ते ठाम होते. तरीही शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईतली सभासुद्धा होणार नाही असं चित्र होतं. कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. सुकुमार दामले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. रानडे हे सारे शंबुक, सागर भालेराव, प्रणय साळवी या विद्यार्थी नेत्यांसह माझ्याकडे आले, तोपर्यंत ही स्थिती होती. मी पोलीस आयुक्त दत्ता पळसळगीकरांना फोन लावला. त्यांनी तात्काळ परवानगी दिली. अवघ्या तासाभरात सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मला सांगितलं पाहिजे की, आयुक्त, सहआयुक्त देवेन भारती, डीसीपी संग्राम सिंह निशानदार, डॉ. महेश पाटील, विरेंद्र मिश्र यांनी केलेलं काम दाद देण्यासारखं होतं. डीसीपी मनोजकुमार शर्मा, एसीपी सुधीर रणशेवरे तर रात्रभर जागे होते. नागपूरला झालेली गडबड मुंबईत झाली नाही. पुण्यात झाली नाही. डीसीपी श्रीकांत पाठक, एसीपी सुरेश भोसले आणि राजेंद्र जरग हे पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने राबले त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. दडपण आणि तणाव यांची पर्वा त्यांनी केली नाही. एक अधिकारी मला म्हणाले, आम्ही ना डावे ना उजवे आहोत. आम्ही आमच्या वर्दीचे आहोत. संविधानाला आणि कायद्याला फक्त बांधलेले आहोत.

कन्हैया मुंबई, पुण्यात येऊन गेला आणि खूप काही सांगून गेला. २८ वर्षांचा हा तरुण जे बोलतो, त्याला काहीनी नावं जरूर ठेवावीत. पण त्याने विद्यार्थी आणि तरुण मनांची पकड घेतली आहे. त्याचं भान, त्याची समज, परिस्थितीचं आकलन, वैचारिक स्पष्टता.. पण तरीही जमिनीवर पाय. खरंच कौतुक केलं पाहिजे. शशी थरुर सारखा विद्वान मुत्सद्दी त्याला 'आज का भगतसिंग' असं उगाचं म्हणाला नाही. मोदींविरुद्धची लढाई पर्यायी राजकारण उभारण्याची आहे. हे त्याने आवर्जून सांगितलं. फुले, आंबेडकरांसोबत त्याने गांधी आणि लोहियांना जोडलं. 'लाल किले पर लाल निशान', अशी घोषणा देणार्‍यांना त्याने लाल किंवा निळा हा प्रश्न नाही. तिरंगा वाचविण्याची ही लढाई आहे, असं सुनावलं. तो काही नवं सांगत होता का? त्याची भाषा नक्कीच नवी होती.

मुंबईत कॉ. किशोर ठेकेदत्त, पुण्यात प्रकाश आंबेडकर, डॉ. बाबा आढाव असे दिग्गज सभागृहात खाली बसून तरुणांची ही नवी भाषा समजून घेत होते. मुंबईच्या सभेसाठी मी एकाच राजकारणी माणसाला फोन केला होता. नबाब मलिक यांना. स्थानिक म्हणून. त्यांना म्हटलं विद्यार्थ्यांची सभा आहे. मदत करायची आहे. पण आपण कुणीही स्टेजवर नसणार. चालेल ना? नबाब भाईंनी सगळी मदत केली. पण ते फिरकलेही नाहीत. परिवर्तनाचं राजकारण ज्यांना हवं आहे, त्या सर्वांनाच असं सबुरीने वागावं लागेल.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २७ एप्रिल २०१६ 


Wednesday, 20 April 2016

बैंटिक बोले फडणवीस



१३ एप्रिल २0१६. मुंबई विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील समोर बसले होते. जात पंचायतीच्या बिलाचा एक ड्राफ्ट त्यांच्या हाती होता. विधान परिषदेत बिल यायचं होतं. त्याआधी गेले काही दिवस त्या बिलाची चर्चा होती. समज असा झाला होता की, जात पंचायतींवर बंदी येणार आहे. एकदा तर खुद्द जयराज साळगावकरांनी मला फोन करून या बिलाची घाई का होतेय? याची विचारणा केली होती. साळगावकर म्हणजे कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचे ज्येष्ठ चिरंजीव. कालनिर्णयकार धार्मिक-अध्यात्मिक. जयराज नास्तिक अन् निरीश्‍वरवादी. अर्थशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत मोठा व्यासंग. दुसरीकडे वर्षाताई देशपांडे आणि लक्ष्मण मानेंचा फोन. त्यांचे प्रश्न नजरअंदाज करता येणारे नव्हते.

अविनाश माझा छात्रभारतीचा, सेवा दल चळवळीतला मित्र. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची चळवळ पुढे नेणारा जिद्दीचा कार्यकर्ता. त्याच्या समोरच मी लक्ष्मण मानेंना फोन लावला. अविनाश भडकलाच. शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतला कपिल पाटील या बिलाच्या विरोधकांशी का बोलतो आहे, हा प्रश्न त्याला पडला होता. इतक्यात ते बिल विधान परिषदेत चर्चेला येत असल्याची सूचना मिळताच मी सभागृहात धावत गेलो. अविनाश पाटलांच्या प्रश्नाला उत्तर न देता, अविनाशही मग प्रेक्षकांच्या गॅलरीत आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सभागृहात आले होते. मी त्यांना चिठ्ठी पाठवली, जात पंचायतीच्या बिलाची घाई होतेय काय? भटक्या विमुक्तांच्या नेत्यांशी, पारसी, बोहरी यांच्या पंचायतींशी बोलणं झालंय का? त्यांनी त्यावरच उत्तर लिहून पाठवलं, बोलणं झालंय. खुणेने त्यांनी मला त्यांच्या आसनाजवळ बोलावलं. मला म्हणाले, 'उद्या बाबासाहेबांची १२५वी जयंती आहे. आज आपण हे बिल पास करू या. विधेयक फक्त बहिष्काराच्या विरोधात आहे. जात पंचायतीच्या नाही. मी हो म्हटलं. 

जात पंचायतीवरच बंदी येणार, या चर्चेने भटक्या जमातींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. पारसी पंचायत, बोहरी पंचायत, आदिवासींच्या पंचायती या सगळय़ांमध्ये तोच मेसेज होता. जात पंचायत आणि जमातींची पंचायत यात मोठं अंतर आहे. अल्पसंख्य समुदायांची ती एक ओळख आहे. न्याय-निवाडे होतात तिथे. गावकी, भावकीची कामं होतात. सामूहिक निर्णय होतात. म्हटलं तर लोकशाही पद्धत. प्राचीन गणसभांच्या परंपरेतून आलेली. पण गावकी, भावकी आणि न्यायनिवाड्याच्या नावावर अनेक अघोरी प्रथा आणि वाईट चालीरीतीही चालत आल्या आहेत. जातीबाहेर लग्न केलं म्हणून बहिष्कृत करण्याची असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथा. अगदी अलीकडच्या काळात मुंबईशेजारी रायगड जिल्ह्यात अशा अनेक घटना घडलेल्या. जात बहिष्कृत करण्याच्या या प्रथेला कायद्याने पायबंद करण्याचं विधेयक म्हणून सभागृहात आलं. सुनील तटकरे आणि जयंत पाटील या ज्येष्ठ आमदारांनी अर्थातच त्या विधेयकाचं सर्मथन केलं. पण गावकी, भावकीतून होणार्‍या चांगल्या गोष्टींचा उल्लेखही त्यांनी जरूर केला. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीची महार पंचायत नंतर बौद्धजन पंचायत कशी केली, याचा इतिहास भाई गिरकरांनी आवर्जून सांगितला. 

साळगावकर, देशपांडे, माने आणि माझ्याही शंकांना विधेयकाची प्रत समोर आली, तेव्हा पूर्णविराम मिळाला. जातीतून बहिष्कृत करण्याच्या असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथेलाच बहिष्कृत करणारं ते विधेयक होतं. आता ते पास झालं आहे. 

राजा राममोहन रॉय सती प्रथेच्या विरोधात रान उठवत होते. त्यालाही आता २00 वर्षे होतील. रावसाहेब एस. के. बोले यांनी मंदिर प्रवेशाच्या विधेयकाचा याच विधान परिषदेत आग्रह धरला, त्यालाही आता ९४ वर्षे होतील. दलित समाजातला पहिला मॅट्रिक झालेल्या मुलाचा सत्कार याच बोलेंनी केला होता. तो मुलगा म्हणजेच १२५ वर्षांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सती प्रथेच्या विरोधात लॉर्ड विलियम बैंटिकने १८२९ मध्ये कायदा केला आणि ती प्रथा मोडून काढली. ब्रिटिशांनी भारताला १५0 वर्षे गुलामीत ठेवलं, पण एलफिन्स्टन, बैंटिकसारख्या गर्व्हनरांनी सुधारणांचे अनेक कायदे केले. आताचं सरकार आपल्याला आवडो न आवडो, पण त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दुष्ट प्रथेचा अंत करणारं विधेयक विधानमंडळात पास करून घेतलं. 

जाती अंताच्या लढाईत अजूनही कितीतरी मागे असलेल्या आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी एक ऐतिहासिक कायदा त्या दिवशी झाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना शहीद व्हावं लागलं. महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करणारे विधेयक विधिमंडळात डिसेंबर २00६ च्या नागपूर अधिवेशनात चर्चेला आलं होतं, तेव्हा सेना-भाजपानेच जोरदार विरोध केला होता. विधेयकाचं सर्मथन करताना माझ्या दीड तास चाललेल्या भाषणात विरोधकांशी अनेक चकमकी झडल्या होत्या. अन् आता तेच विरोधक सत्तेवर असताना एक पुरोगामी कायदा झाला. त्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावंच लागेल. लॉर्ड बैंटिक, एस. के. बोले यांच्या रांगेत फडणवीस जाऊन बसले आहेत. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य 
आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २० एप्रिल २०१६ 

Wednesday, 13 April 2016

भारत भाग्यविधाते डॉ. आंबेडकर





सूर्यमालेतील शनी ग्रहाला देव मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एकदा त्याला तशी मान्यता दिली गेली असेल तर त्यावर श्रद्धा असणार्‍या स्त्रियांना त्याचं दर्शन घेऊ द्यायचं की नाही? स्त्रिया अपवित्र असतात, त्या जवळ गेल्या तर शनी कोपेल असं धर्ममार्तंड सांगतात. शंकराचार्य त्याही पुढे गेले. स्त्रियांनी शनी पूजा केली तर बलात्कार वाढतील म्हणे. शंकराचार्य तिथेच थांबले नाहीत. गेले वर्षभर ते बरळताहेत, साईबाबांची पूजा करू नका म्हणून. परवा तर ते म्हणाले, साई पूजा महाराष्ट्रात होते म्हणून राज्यात दुष्काळ पडला आहे.
                                         
प्रबोधनकार ठाकरे असते तर शंकराचार्यांची जीभच हासडली असती. तुकाराम महाराजांनी तर सांगूनच ठेवले आहे की जळो त्यांचे तोंड़. देशात नवं सरकार आल्यापासून मंबाजीची तोंडं दहा झाली आहेत. परवापर्यंत ते काय खायचं, काय खाऊ नये हे ठरवू लागले होते. दोन महिन्यापासून देशभक्त कोण हे ठरवण्याचा मक्ता त्यांनी घेतला आहे. आता श्रद्धा कशावर ठेवावी हेही ते सांगू लागले आहेत. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी लपवून ठेवला नव्हता. सत्ता आल्याने त्यांना आता बळ मिळालं आहे. शंकराचार्यांपासून ते रामदेवबाबा, योगी आदित्यनाथ ते साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारखी मंडळी बेभान सुटली आहेत. 

तुकारामांना छळणार्‍या मंबाजीची ही पिलावळ आहे. ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत करणार्‍यांचे ते वारसदार आहेत. सनातन्यांचं ऐकून महात्मा बसवेश्‍वरांना मारण्याचा आदेश देणार्‍या बल्लभाची राजवट कशी असेल, याची आठवण यावी असं देशात वातावरण आहे. संत मीराबाईंना आणि संत रोहिदासांना छळणार्‍या धर्ममार्तंडांची गादी आजही शंकाराचार्य चालवत आहेत. त्यांचं सध्याचं टारगेट साईबाबा आहेत.


आजही ज्यांच्या डोक्यात आणि व्यवहारात मनुस्मृतीचा कायदा कायम आहे, त्यांना सांगायला हवं की, हा देश मनुस्मृतीने नाही भीमस्मृतीने चालतो. बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या देशातल्या सगळ्या स्त्रियांची आणि बहुजनांची स्थिती काय असती याचा विचारही करवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याची पुन:पुन्हा आठवण यावी. उद्या या महामानवाची १२५वी जयंती आहे. उद्याचा दिवस सणासारखा साजरा केला पाहिजे. उद्याचा दिवस माणुसकीचा उत्सव आहे. समता पर्वाचा दिवस आहे. न्यायाची गुढी उभारण्याचा दिवस आहे. 

बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ते हिंदूंवरती मोठे उपकार आहेत, असं सांगण्याची हिंदुत्ववादी परंपरा आहे. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म ईहवादी, विज्ञाननिष्ठ आहे, म्हणून धम्मचक्र फिरवलं. त्यांनी धर्मांतराचा जो प्रचंड धक्का दिला त्यातून हिंदू धर्म आणि समाज अंधश्रद्धा आणि शोषणाच्या कर्दमातून बाहेर पडण्याची वाट मोकळी झाली. माणसाला माणूस म्हणून ओळख मिळाली. 

आज देश एक आहे. या देशाची लोकशाही जिवंत आहे. न्याय मागण्याचा रस्ता मोकळा आहे. राज्य कायद्याने चालण्याची व्यवस्था आहे. या सगळ्याचं कारण या देशाला एक जबरदस्त संविधान आहे. जे संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं आहे याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगला पाहिजे. युगपुरुष, बोधीसत्व, क्रांतीसूर्य आणि भारतरत्न या सार्थ शब्दांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचे वर्णन केलं जातं. पण भारतीय संदर्भात त्यांचं वर्णन आणखी एका विशेषणाने करावं लागेल. भारत भाग्य विधाता! या देशाच्या राष्ट्रगीतातले हे तीन शब्द आहेत. जन गण मन, अधिकनायक जय हे, भारत भाग्य विधाता. भारताच्या निर्मात्यांचं विशिष्ट शब्दांनी सार्थपणे वर्णन केलं जातं. वल्लभभाई पटेलांना गांधीजीनींच सरदार म्हटलं. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव म्हटलं. सुभाषबाबूंना नेताजी म्हटलं. महात्म्यांचे महात्मा असं जोतीराव फुले याचं वर्णन खुद्द महात्मा गांधींनीच केलं. त्या मोहनदास करमचंद गांधी यांना सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आणि नंतर पंडित नेहरू यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधलं. महात्मा गांधी यांचं राष्ट्रपिता म्हणून स्थान अढळ आहे. देशाला स्वातंत्र्य त्यांच्याच नेतृत्वाखाली मिळालं. गांधी आणि आंबेडकर यांच्यातला संघर्ष इतिहासातून पुसून टाकता येणार नाही. पण या देशाचं भविष्य, या देशाचं भाग्यविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातूनच लिहिलं जाईल याचा संकेत खुद्द गांधींच्याच आग्रहात होता. पहिल्या मंत्रिमंडळात आणि घटना समितीत बाबासाहेब हवेत हा गांधींचा आग्रह होता. म्हणून सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांना बाबासाहेबांसाठी आग्रही राहवं लागलं. तिघांचाही डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेवर, द्रष्टेपणावर, देशनिष्ठेवर आणि त्यांच्यातल्या महामानवावर तितकाच विश्‍वास होता. देशाला एकत्र बांधून ठेवू शकेल. मध्ययुगाच्या मानसिकतेतून बाहेर काढू शकेल, आधुनिक विश्‍वाचा नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला उभं करू शकेल, असं संविधान बाबासाहेबच देऊ शकतात हा विश्‍वास होता. आज आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. आपण खरंच भाग्यवान. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठरतात भारत भाग्य विधाते!

- कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३ एप्रिल २०१६ 

Wednesday, 6 April 2016

गुढीपाडवा का साजरा करायचा?


आज गुढीपाडवा. महाराष्ट्रातल्या घराघरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुढय़ा उभारल्या जातात. मीही दरवर्षी उत्साहाने गुढी उभारतो. घरातले आम्ही सगळेच नास्तिक. नास्तिक म्हणजे निरिश्वरवादी नव्हे. अधार्मिक. पण तरीही सर्व सण उत्साहाने साजरा करतो. घरी कसलीच पूजा होत नाही. कर्मकांडही नाही; पण दिवाळी, नाताळ, ईद, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती हे सण आनंदाने साजरे होतात. तसा गुढीपाडवाही. दिवाळी हा तर शेतकर्‍यांचा सण. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. बळीराजाच्या स्वागताचा तो उत्सव असतो. या देशात वामनावताराची कुठेही पूजा होत नाही. ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, असं औक्षण मात्र तमाम आया करतात. तीन हजार वर्षे झाली. बळीराजाची आठवण जराही धूसर झालेली नाही.

गुढीपाडव्याची परंपराही १९३८ वर्षे अभिमानाने साजरी केली जाते. आपल्याकडे लोकदैवतं, लोकपरंपरा आणि लोकउत्सवाचं वैदिकीकरण करण्याची परंपराही जुनी आहे. वैदिकीकरणातून लोक नायकांचे कर्तृत्व पुसण्याचा प्रयत्न बराच झाला आहे. यज्ञयागांच्या विरोधात लढणार्‍या महालक्ष्मीला पुरोहितवर्गाने कसं ताब्यात घेतलं आणि घरातल्या लक्ष्मीलाच लक्ष्मीचा गाभारा बंद केला, हे तर आजही पाहतो आहोत. 

महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून आणि मराठी माणसाला 'महाराष्ट्री' म्हणून पहिली ओळख दिली ती सातवाहनांनी. मूळ जुन्नरचा छीमुक सातवाहन याने हे घराणं स्थापन केलं. सम्राट अशोकाच्या साम्राज्याचे ते भाग होते. पुढे सातवाहनांचं राज्य हुणांच्या आक्रमणात क्षीण झालं. फक्त सातारा- कराड पुरतं उरलं. पण सातारची माती खरंच क्रांतिवीरांची आहे. त्या मातीतून गौतमी पुत्र सातकर्णी याने पुन्हा महाराष्ट्रीयांचं स्वराज्य निर्माण केलं. हुण आक्रमक नहपानाचा पराभव केला. हुणांच्या गुलामीतून राज्य पुन्हा स्वतंत्र केलं. तो दिवस होता चैत्रपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्रभर गुढय़ा उभारल्या गेल्या. घराघरात गोडधोड केलं गेलं. सातवाहनांनी चारशे वर्षे राज्यं केलं. पहिल्या मराठी - महाराष्ट्रीय साहित्याची निर्मिती सातवाहनांच्या काळातच झाली. गाथा सप्तशती, कथा सरित्सागर, लिलावई या सारखी महाकाव्ये रचिली गेली. वररुचीचा 'प्राकृत प्रकाश' हा महाराष्ट्रीय भाषेचा व्याकरण ग्रंथ सातवाहनांच्या काळातलाच. उद्या मराठीला अभिजात दर्जा मिळालाच तर त्याचं कारण सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या साहित्य निर्मितीलाच असणार आहे. सातवाहनांनी देश विदेशी व्यापार वाढवला. महाराष्ट्राला समृद्ध केलं. सातवाहनांनी महाराष्ट्रात अनेक बौद्ध लेण्या कोरल्या. बौद्ध, जैन, ब्राह्मण सर्वच धर्मांना त्यांचा आश्रय होता. सर्व पंथ धर्मियांना समान वागणूक दिली. साहित्य, कला, संस्कृतीला वाव दिला. अनेक किल्ले बांधून काढले. महाराष्ट्रात आजही उभे असलेले अनेक किल्ले हे त्यांच्याच काळातले. अगदी शिवरायांचा रायगडही. 

देशीयांना महारट्ट, आजच्या भाषेत मराठे अशी नवी ओळख मिळाली, सातवाहनांच्या काळात. त्यांच्या कारभारात मुलकी सेवेत जे होते ते महारट्ट. तर त्यांच्या पोलीस सेवेत होते ते महारख्ख. एकाच घरातला एक भाऊ महारट्ट होत असे तर दुसरा महारख्ख. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत पुढे त्यांच्या जाती झाल्या.

महाराष्ट्राचे कॅलेंडर शालीवाहन शकानुसारच चालतं. खरं तर शालीवाहन हा शब्दही चुकीचा आहे. ते संस्कृत रूप आहे. मूळ शब्द सालाहान आहे. ज्या साली शकांचे हनन केले तो सालाहान शक. त्या शकाभोवती खोट्या कथा गुंफत इतिहास पुसला गेला. पण कल्याण जुन्नरच्या प्राचीन राजमार्गावर नाणेघाटात कोरलेला पहिला मराठी लेख वैदिकांना पुसता आला नाही. शक, हूण आणि कुशाण अशा आक्रमकांना गौतमी पुत्राने आपल्या पराक्रमाच्या जोरावर नर्मदेच्या अलीकडे येऊ दिलं नाही. नाणेघाटातल्या शेवटच्या लढाईत नहपानाला यमसदनी पाठविल्यानंतर शीलालेखावर गौतमी पुत्राने अभिमानाने कोरून ठेवलं आहे, 'खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस' शकांची ४६ वर्षांची राजवट उलथवून मिळालेल्या स्वराज्याचा आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्री ही ओळख देणार्‍या गौतमी पुत्र सातकर्णीची याद गेले १९३८ वर्षे महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. डॉ. अजय मित्रशास्त्री आणि संजय सोनवणी यांनी हा सगळा इतिहास अलीकडे उलगडला. 

बहुजनांच्या लोकनायकांना एकतर विस्मृतीच्या पाताळात गाडायचं. न जमल्यास त्या लोकनायकांचं वैदिकीकरण करून पुरोहितांच्या कब्जात देव म्हणून बंदिस्त करायचं. परंपरांचं कर्मकांड करून सगळा इतिहास पुसून काढायचा. रामकृष्णाचा वैदिकांनी अवतार केला. फक्त तथागत गौतम बुद्धांना नववा अवतार करण्यात त्यांना यश आलं नाही. विवेकानंदांना पळविण्यात ते यशस्वी झाले. भगतसिंग मात्र त्यांना झेपला नाही. 'इन्क्लाब झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' या घोषणांशी त्यांचा कधीच संबंध नव्हता, पण आता 'भारत माता की जय' पळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. राष्ट्रगीतालाच आव्हान देत आहेत. 

लोक दैवतांना शेंदूर फासून त्यांच्या पराक्रमांचा इतिहास पुसून टाकण्याची पद्धत जुनी आहे आणि आजही ती सांप्रदायिकरणातून जारी आहे, पण म्हणून आपल्या नायकांचा इतिहास विसरण्याचं कारण काय? सांप्रदायिक शेंदूर खरवडला की सत्य बाहेर येईल. जे आपलं आहे. पाडवा म्हणून साजरा करायचा.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ६ एप्रिल २०१६