Sunday, 12 December 2021

महाराष्ट्र पुरुष शरद पवार



शरद पवार एक जितीजागती दंतकथा बनले आहेत. कॅन्सरवर मात करून कैक वर्ष उलटली आहेत. पाय जायबंदी होऊनही हा माणूस हातात काठी न घेता चालतो. वयाची, आजारपणाची पर्वा करत नाही. वादळ येवो, अतिवृष्टी होवो, पूर येवो, भूकंप येवो शरद पवार वादळी वाऱ्यासारखे फिरतात. निवडणुकीत साताऱ्याला भर पावसात झालेली त्यांची सभा गाजली. वारंच फिरलं. 'वारा खात, गारा खात, बाभूळ झाड उभंच आहे.' कवितेची ही ओळ आता बदलावी लागेल. खेड्यातल्या लोकांना बाभूळ झाड माहित आहे आणि शरद पवारही. शहरातल्या नव्या पिढीला बाभूळ झाड माहित नसेल कदाचित पण शरद पवार नक्की माहित आहेत.

लातूरला भूकंप झाला, कलेक्टर पोचण्याच्या आत मुख्यमंत्री असलेले शरद पवार किल्लारीला जाऊन पहाटे पोचले होते. कोसळलेली घरे त्यांनी वर्षभरात उभी केली. गावं वसवली. दुःख आणि वेदनांवर मात करत लोकांना उभं केलं. बॉम्ब स्फोटात मुंबई हादरली होती. पवारांनी २४ तासांच्या आत मुंबईचं स्टॉक एक्सचेंज पुन्हा चालू केलं. दंगलीच्या काळात पवार साहेब दिल्लीत स्वस्थ बसू शकले नाहीत. ते मुंबईत धावून आले. मराठवाड्यात नामांतराच्या प्रश्नावरून दंगल पेटली. पोलादी हातांनी त्यांनी दंगल शमवली. आपली सत्ता गमावून. पण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही करून दाखवलं. दोन्ही समाजांची मनं जुळवण्यासाठी पुन्हा शरद पवारच उभे राहिले.

८० - ८१ व्या वर्षी त्यांना कुणी सांगितलंय फिरायला? पण ते ऐकायला तयार नसतात. कोकणात वादळ आलं, शरद पवार धावून गेले. अतिवृष्टीत खेड्यापाड्यातली पिकं झोपून गेली, शरद पवार बांधांवर पोचले. सत्तेवर असोत, नसोत पवार ठिकाणावर गेले नाहीत असं झालेलं नाही. ते विरोधी पक्ष नेते असताना मी पाहिलंय. उरणच्या शेतकऱ्यांवर सरकारचा गोळीबार सुरु असताना धावून जाणारे शरद पवारच होते. शरद पवार हा माणसांचा माणूस आहे. फक्त नेता नाही. नेते खूप असतात. पण माणसात माणूस म्हणून राहणारे, माणूस माणूस समजून घेणारे शरद पवार एकच असतात. जात, पात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून माणुसकीच्या बांधावर ते उभे असतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना त्यांचा वाटा देणारे शरद पवार. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवार. मुस्लिम ओबीसींना सवलती देणारे शरद पवार. भटक्या विमुक्तांच्या पाठीशी उभे राहणारे शरद पवार. शेल्टी हत्याकांडानंतर आदिवासींच्या पाड्यावर जाणारे शरद पवार. आदिवासी हितांच्या बाबत यत्किंचितही तडजोड न करणारे शरद पवार. असे शरद पवार आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना केवळ ग्रेट मराठा लीडर का म्हटलं जातं कळत नाही. शरद पवारांच्या विकासाच्या मॉडेलबाबत अनेकदा टीका झाली आहे. राजकारणातील त्यांच्या घटापटाच्या डावांबद्दलही लिहलं गेलं आहे. त्यांनी दिलेले शह, काट शह देशभरात चर्चेत राहिले आहेत. पत्रकारितेत असताना मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर अनेकदा कठोर टीका केली आहे. पण हे कबुल केलं पाहिजे की, या सगळ्यातून उरतात ते शरद पवार ज्यांच्यात एक कमालीचा माणूस प्रेमी राजकीय नेता फक्त दिसतो. विचाराने ते पक्के सत्यशोधक आहेत. इहवादी आहेत. कर्मकांडांपासून कोसो दूर राहतात. राजकारणातल्या माणसाला या गोष्टी सहज जमणं शक्य नसतं. हमीद दलवाईंना त्यांच्या उपचारासाठी आपल्या घरात ठेवणारे शरद पवार. फारुख अब्दुलांच्या मुलाचं उमरचं आपल्या घरात मुलासारखं संगोपन करणारे शरद पवार. पहिल्याच मुलीनंतर विचारपूर्वक कुटुंब नियोजन करणारे शरद पवार. मोतीराज राठोड, लक्ष्मण माने यांना प्रतिष्ठा देणारे शरद पवार. दलित, मुस्लिम, ओबीसी प्रश्नांकडे आणि नेतृत्वाकडे समन्यायाने पाहणारे शरद पवार. प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी राजगृहावर जाणारे शरद पवार. मृणाल गोरेंच्या आजारपणात त्यांची विचारपूस करायला जाणारे शरद पवार. दिल्लीत हरवलेल्या महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी रात्रभर जागणारे शरद पवार. कितीही मतभेद झाले तरी बाळासाहेब ठाकरेंशी असलेली मैत्री घट्ट ठेवणारे शरद पवार. किती गोष्टी सांगता येतील.

विरोधी पक्षांशी सन्मानाने वागणं. त्यांचं काम प्राधान्याने करणं. ही महाराष्ट्राची एक खासियत आहे. संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांची ती देणगी आहे. वसंतराव नाईकांपासून वसंतदादा पाटलांपर्यंत. बॅ. ए. आर. अंतुलेंपासून ते देवेंद्र फडणवीस आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती परंपरा पाळली आहे. पण या परंपरेचं मूर्तिमंत प्रतिक म्हणून जर कुणाला पाहायचं असेल तर ते शरद पवारांनाच पाहावं लागेल. शरद पवारांच्या भांडवली विकासाचं मॉडेल कदाचित मान्य होणार नाही. पण ग्राम विकासाला आणि सहकाराला काळाप्रमाणे बदलण्याची ताकद फक्त शरद पवारांकडेच होती आणि आहे. कोकणात फुललेल्या फळबागा आणि सोलापूरच्या पर्जन्य छायेखालील प्रदेशात फुललेल्या सीताफळाच्या बागा ही शरद पवारांचीच देणगी आहे. म्हणून असेल कदाचित शरद पवारांच्या नावाने ग्राम समृद्धीची योजना सरकारने आघाडी सरकारने सुरु केली आहे.

८१ वर्षांचं आयुष्य आणि ६१ वर्षांचं राजकारण. भाजप, काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी हा तसा लहान पक्ष. तुलनाच करायची तर सेनेपेक्षाही कमी आमदार. एका राज्याची त्याला मर्यादा आहे. पण शरद पवारांना ती नाही. श्रीनगरपासून चैन्नईपर्यंत आणि अहमदाबादपासून कलकत्यापर्यंत शरद पवारांचा राजकीय दबदबा मोठा आहे. ६ दशकांच्या राजकारणात तो अबाधीत राहिलेला आहे. देशातल्या उद्योगपतींना आणि खेड्यातल्या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोघांनाही शरद पवार आपला माणूस वाटतात. ही पवारांची खासियत आहे.

युपीएचं चेअरमन पद मिळण्याची चर्चा आज काल वर्तमानपत्रात आहे. त्यात तथ्य किती ते माहित नाही. त्यात खुद्द पवारांनाही आता स्वारस्य राहिलेले नाही. पण शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील असं महाराष्ट्रातील अनेकांचं स्वप्न आहे. ते आधीच व्हायला हवे होते. ती संधीही होती. शरद पवार जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी देशातल्या तमाम डाव्या, पुरोगामी आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती. त्या सगळ्या पक्षांचे तेच नेते होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. ते परतले नसते तर देवेगौडा आणि गुजराल यांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. पवारांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा यशवंतराव चव्हाणांपासून ते महाराष्ट्रातल्या त्यांना मानणाऱ्या नेत्यांच्या दडपणाचा तो भाग होता. महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी चळवळ आणि ग्रामीण नेतृत्व या प्रत्येकाचं प्रेशर होतं शरद पवारांवर. त्यामुळे शरद पवारांनी स्वतंत्रपणे पुढे जाण्याऐवजी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आणि तीच मोठी चूक ठरली. अन्यथा ते देशाचे अनेक वर्ष नेतृत्व करताना दिसले असते. शरद पवार अगदी तरुणपणात मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसमुळे नव्हे, तर एस. एम. जोशींमुळे. जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे. जनता पक्षातल्या संघीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र जाऊ नये म्हणून एस. एम. जोशींनी शरद पवारांना सोबत घेतलं आणि नेतृत्व दिलं. शरद पवारांना तेव्हा समाजवादाचं आकर्षण होतं. राष्ट्र सेवा दलामुळे असेल. एस. एम. जोशींना त्यामुळे पवारांबद्दल कायम ममत्व वाटलं. शरद पवारांनीही आयुष्यभर एस. एम. जोशींबद्दल कृतज्ञता बाळगली. तीच वाट त्यांना पुढे पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. पण तसं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांचा पुन्हा तो प्रवास सुरु झाला आहे.

पण पवारांवर मोठाच अन्याय झाला. केवळ पंतप्रधान पदाच्या स्वप्नापुरतं हे मी म्हणत नाही. शरद पवारांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला, असं खेदाने म्हणावसं वाटतं. कारणं काहीही असोत. शरद पवारांवर झालेला हा अन्याय त्याला महाराष्ट्राचं राजकारण जितकं कारण आहे, महाराष्ट्रातील माध्यमं आणि बुद्धिजीवी वर्ग जितका कारण आहे, तितकंच कारण शरद पवार स्वतःही आहेत. शरद पवारांमधल्या राजकारण्याने ज्यांना महाराष्ट्र पुरुष म्हणता येईल अशा एकमेव शरद पवार नावाच्या नेत्यावर अन्याय केला आहे.

शरद पवारांचं मला भावतं ते त्यांच्यातलं माणूसपण. त्यांच्यातला सत्यशोधक. सामाजिक न्यायाच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा. त्यांच्या राजकीय निष्ठांबद्दल महाराष्ट्रात आणि देशात अनेकदा चर्चा झाली आहे. राजकीय निष्ठा म्हणजे व्यक्ती निष्ठा हे काँग्रेसमधलं गणित शरद पवारांना कधीच मान्य नव्हतं. म्हणून निष्ठावंतांच्या गर्दीत ते कधीच सामील झाले नाहीत. जेव्हा जेव्हा अपमान झाला तेव्हा तेव्हा ते स्वतंत्रपणे उभे राहिले.

औरंगजेबाच्या दरबारात हजारी सरदारांच्या रांगेत उभं राहायला छत्रपती शिवरायांनी नकार दिला. शिवरायांचा तो स्वाभिमानी बाणा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ऊर्जा बिंदू आहे. शरद पवारांनी त्यांच्या राजकारणात अस्मितेच्या या मुद्द्यावर कधीही तडजोड केली नाही. पण अस्मितेच्या नावावर अलगथलग राजकारण त्यांनी कधी केलं नाही.

छत्रपती शिवरायांनी अठरा पगड मावळे एकत्र केले. जात आणि धर्माचा भेद संपवला. हे सर्वसमावेशक राजकारण यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबर पुनर्स्थापित केलं. यशवंतरावजींनी शरद पवारांना आपला मानसपुत्र आणि राजकीय वारस मानलं. महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या नेत्याने अचूक निवड केली होती. शरद पवारांनी ती सार्थ ठरवली.

यशवंतरावजींनी दिलेली फुले - शाहू - आंबेडकर ही शब्दावली शरद पवारांनी केवळ राजकीय वारा भरलेले शब्दांचे बुडबुडे म्हणून स्वीकारले नाहीत. त्या विचारांवरच त्यांनी राजकारण केलं. काँग्रेसपासून अलग झाले. परंतु गांधी - नेहरूंच्या राजकारणाचा धागा हातातून त्यांनी कधी निसटू दिला नाही.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचाच पुढाकार होता. तो प्रयोग करतानाही त्यांनी महाराष्ट्राची घडी कधी विस्कटू दिली नाही. महाराष्ट्राच्या महावस्त्रात फुले - शाहू - आंबेडकर यांच्यासोबत प्रबोधकर ठाकरेंचाही वाटा आहे. प्रबोधनकार शाहू महाराजांचे समर्थक होते. महात्मा फुलेंना मानणाऱ्या सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे ते अग्रणी होते. नथुरामी संप्रदायापासून गांधीजींचे प्राण प्रबोधनकार ठाकरे यांनीच दोनदा वाचवले होते. प्रबोधनकरांच्या नंतर बाळासाहेब ठाकरेही मराठी अस्मितेचा एक भाग बनले. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व देण्यामागे शरद पवारांनी तोच मोठा विचार केला होता.

शरद पवारांकडे हे सारं आलं कुठून? एकच उत्तर आहे, शारदाबाई गोविंदराव पवार. त्यांच्या आई.

देशाच्या इतिहासात महामानवांची चर्चा खूप होते. पराक्रमी पुरुषांच्या गाथा खूप लिहल्या जातात. शिल्पकार सारे देशाचे असोत किंवा राज्याचे असोत किंवा विशिष्ट्य समाजाचे शिल्पकार फक्त पुरुषच ठरवले जातात. पण देशातल्या महामानवींचा इतिहास जिथे लिहला जात नाही, तिथे राज्याराज्यातल्या कर्तबगार स्त्रियांचं चरित्र कोण लिहणार? 'मेकर्स ऑफ इंडिया' या पुस्तकात डॉ. रामचंद्र गुहा यांनी महाराष्ट्रातील ताराबाई शिंदेंचा समावेश केला आहे. अजून काही स्त्रियांचा खरं तर त्यांनी समावेश करायला हवा होता. जगभरच्या स्त्रीयांच्या हक्काचे कायदे बदलायला भाग पाडणाऱ्या डॉ. रखमाबाईंचा उल्लेखही रामचंद्र गुहांनी केलेला नाही. तिथे महाराष्ट्र घडवणाऱ्या स्त्रियांची चर्चा होताना कशी दिसेल? जिजामाता आणि सावित्रीबाई फुले किंवा अहिल्याबाई यांचं आपण नाव घेतो. पण त्या झाल्या महामानवी. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्यात अनेक लखलखत्या स्त्रियांची चरित्र लिहली गेली पाहिजेत. ती सांगितली जात नाहीत. संख्येने भल्या त्या मोजक्या असतील. पण महाराष्ट्र घडवणाऱ्या त्या स्त्रियांच्या यादीत सत्यशोधक शारदाबाई गोविंदराव पवार यांचं नाव आवर्जून सांगावं लागेल. महाराष्ट्र घडवण्याऱ्यांमध्ये शारदाबाईंचाही एक वाटा होता. तसा महाराष्ट्राला शरद पवारांसारखा नेता शारदाबाईंमुळेच मिळाला. केवळ जन्माने नाही. शारदाबाईंनी त्यांना घडवलं. पवार साहेबांचा आज गौरव करताना शारदाबाईंना विसरून चालणार नाही.

शरद पवार यांना सहस्रचंद्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)


Saturday, 30 October 2021

स्वातंत्र्य, समता आणि मानवतेसाठी निनादणारा आवाज काळाच्या पडद्याआड....



कवी वसंत बापटांच्या 'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...' या प्रार्थनेतली 'मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना' ही ओळ गावी ती लीलाधर हेगडे यांनीच. भुपेन हजारिका यांचा आवाज तुम्ही ऐकलाय का? मी तुलना बिलकुल करत नाही. पण त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यातली घन आर्तता तुम्हाला अनुभवता येईल जेव्हा लीलाधर हेगडे ही ओळ गात होते तेव्हा. लीलाधर हेगडे यांनी साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहात वसंत बापटांसोबत 'महाराष्ट्र शाहीर' कार्यक्रम महाराष्ट्रभर नेला. आणि राष्ट्र सेवा दल कलापथकाला नवा आवाज मिळाला.

सेवा दलाचे शाहीर आणि कलापथकाचा आवाज एवढीच लीलाधर हेगडे यांची ओळख नाही. महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एका पाठोपाठ एका कलापथकीय कार्यक्रमांमुळे सेवा दलाला देशभर एक नवी ओळख मिळाली. त्या मागचा आवाज अर्थात लीलाधर हेगडे यांचा होता. पण लीलाधर हेगडे यांचं मोठं काम हे की, अस्पृशता निवारण चळवळीत आपलं उमेदीचं आयुष्य त्यांनी झोकून दिलं. भिंगरी लागून गावोगाव फिरले. कैक मंदिरं खुली केली. कधी संघर्ष करावा लागला. कधी नैराश्य आलं. पण डफावरची थाप थांबली नाही.

'तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून
पिकल उद्याचं रान
चल उचल हत्यार
गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण'

अशा शाहीरीतून कितीतरी सेवा पथकांना हेगडेंनी कार्यप्रवण केलं. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहली. अण्णा पवार आज शंभरीत आहेत. सिंध प्रंतात सेवा दलाचं काम पोचवणारे अण्णा नंतरच्या पिढीतील सेवा दलाला माहीत नाहीत. चीन युद्धात हे अण्णा पवार भारतीय सेना दलात होते. चीनी सैनिकांशी त्यांनी घनघोर संघर्ष केला. त्यांची कथाच हेगडे यांनी कादंबरीरूपाने लिहून काढली.

लीलाधर हेगडे राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षही राहिले. तो एका अर्थाने त्यांचा सन्मान होता. लीलाधर हेगडे ठाण्याचे. सेवा दलाच्या पहिल्या शाखेपैकी एक. पालघर जिल्ह्यात आणि कोकणात गावोगावी शाखा उघडण्यात हेगडेंचा मोठा वाटा आहे. सेवा दलाचा इतिहास लिहण्याच्या निमित्ताने त्यांना भेटायला गेलो होतो. शरीर अंथरुणाला खिळलेलं होतं. ९४ वय होतं. त्यांच्या पत्नी सुहासिनी हेगडे आणि मुलगा राजू हेगडे यांनी त्यांना सांगितलं कपिल पाटील आला आहे. मला म्हणाले, 'तुझ्या गावची वरोरची शाखा मी सुरू केली. तुझे वडील हरिश्चंद्र पाटील आणि काका लक्ष्मण पाटील माझ्याच शाखेत होते.' ७० हून अधिक वर्ष झाली असतील. आठवण इतकी लख्ख ताजी. मी विस्मयचकित होऊन पाहतच राहिलो.



लीलाधर हेगडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यातील त्यांचं योगदान मोठं होतं. स्वातंत्र्य, समता आणि मानवता या मूल्यांसाठी निनादणारा लीलाधर हेगडे यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईत सांताक्रूझच्या झोपडपट्टीत साने गुरुजींच्या नावाने त्यांनी उभं केलेलं आरोग्य मंदिर आणि शाळा हे हेगडेंच्या स्मृती अमर करणार आहेत. सारं आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं. मृत्यूनंतरही देहदान केलं.

शाहीर लीलाधर हेगडे यांना विनम्र श्रद्धांजली!
- कपिल पाटील


३० ऑक्टोबर २०२१

Friday, 15 October 2021

भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत



छगन भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत पोचलं आहे.

सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो. पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी?

या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं आहे.

भुजबळांच्या वाट्याला तर हलाहल अधिक आलं. न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मरणाला हात लावून ते परत आले. ती त्यांची विजिगीषू वृत्ती प्रत्येक संघर्षात दिसते.

सीमावासियांच्या सत्याग्रहात वेषांतर करून कर्नाटकात शिरण्याचं त्यांनी दाखवलेलं धाडस शिवसेनेचा सर्वात फायर ब्रँड नेता म्हणून त्यांना ओळख देऊन गेलं. पण त्याहून मोठं बंड त्यांनी केलं, ते मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी. ज्यांच्यावर श्रद्धा आणि निष्ठा आजही आहे, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ त्यांनी सोडली. ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना त्यांनी पक्ष निष्ठेपेक्षा अधिक महत्त्व दिलं. मंडल आयोगासाठी त्यांनी देशभर संचार केला. संघर्ष केला. राज्याराज्यात ओबीसींचे मेळावे घेतले. आज देशातील ओबीसींचे ते एक सर्वात मोठे नेते बनले आहेत. आणि जातीनिहाय जनगणनेचे पुढारकर्तेही.


मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे शिल्पकार आणि ओबीसींचे सर्वांत आदरणीय नेते शरद यादव यांनीच 'ओबीसींची उद्याची आशा आणि एकमेव उमेद' म्हणून छगन भुजबळांचा नुकताच गौरव केला. देशातील ओबीसी चळवळीच्या नेतृत्वाची धुरा शरद यादव यांनी जणू भुजबळांच्या खांद्यावर टाकली.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यामध्ये भुजबळांचा वाटा मोठा आहे. नामांतरासाठी बहुजन समाजाच्या मनपरिवर्तनात त्यांनी केलेली कामगिरी कुणीही नाकारणार नाही.


भुजबळांबद्दल अनेक अपसमज पसरवले गेले. अपसमजाचे ते अनेकदा शिकार झाले. गांधी विरोधकांना त्यांनी उपरोधाने मारलेला टोला त्यांनाच त्रासदायक ठरला होता. मराठा आरक्षणाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. मात्र ते करताना कटुता येऊ नये आणि मराठा आरक्षणही सफल व्हावं यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांचा गैरअर्थ काढला गेला.


ते स्वतःच काल म्हणाले तसं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होऊ शकले असते. पण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी शरद पवारांनी जी जोखीम उचलली त्याचवेळी भुजबळांनी आपल्या निष्ठा शरद पवारांना वाहिल्या. ज्या मुद्द्यांसाठी त्यांनी सेना सोडली त्यांच मुद्द्यांसाठी त्यांनी शरद पवारांना साथ दिली. आणि त्याच मुद्दयांसाठी मुख्यमंत्री पदाच्या शक्यतेचाही मोह धरला नाही. इतिहासात याची दखल महाराष्ट्राच्या इतिहासाला घ्यावी लागेल. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीलाही त्यांच्या या त्यागाची दखल घ्यावी लागेल.


छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


- आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती

Tuesday, 5 October 2021

जागतिक शिक्षक दिन, सरकारला आठवण



सारं जग आज (५ ऑक्टोबर) जागतिक शिक्षक दिवस साजरा करत आहे. भारताप्रमाणे अनेक देशात शिक्षक दिन साजरा होतो. प्रत्येकाची तारीख वेगळी असते. भारत आणि महाराष्ट्र सरकार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात. शिक्षक भारती, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले (सहशिक्षिका फातिमा बी) यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस, शिक्षक दिन म्हणून साजरा करते.

शिक्षक दिन आला की सगळ्यांना गुरु ब्रम्हा आठवतो. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात. UNESCO ने ५ ऑक्टोबरचा जागतिक शिक्षक दिवस केवळ शुभेच्छांसाठी ठरवलेला नाही. १९९४ पासून जगभरच्या १०० देशात हा दिवस साजरा होतो, तो केवळ शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी नाही.

UNESCO, ILO, UNICEF आणि Education International यांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे, ''On World Teachers’ Day, we are not only celebrating every teacher. We are calling on countries to invest in them and prioritize them in global education recovery efforts so that every learner has access to a qualified and supported teacher. Let’s stand with our teachers!''

यावर्षीची थीम आहे, 'Teachers at the heart of education recovery.' कोविडच्या अत्यंत कठीण काळात शिक्षकांनी शिक्षण पोचवण्यासाठी जो महाप्रयास केला त्याचं कौतुक करणं आणि त्याला मान्यता देणं, हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांचं वेतन, त्यांचा दर्जा, त्यांची प्रतिष्ठा याकडे यानिमित्ताने लक्ष वेधलं जावं. उच्च अर्हता, क्षमता आणि प्रेरित शिक्षक समाजाला मिळावेत अशी UNESCO ची अपेक्षा आहे.

आपल्याकडे आपत्ती असो, कोविड असो किंवा जनगणना असो. निवडणुका, सर्व प्रकारची सर्वेक्षणं अगदी प्राण्यांची गणना असली तरी शिक्षकांना कामाला जुंपलं जातं. कोविडची ड्युटी करताना किती शिक्षकांनी प्राण आहुती दिली. अजूनही त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही. त्याची किंमत न करता शिक्षक जणू फुकट पगार खातात अशी भाषा केली जाते, तेव्हा दुःख होतं.

शिक्षकांना २०टक्के पगार द्यायचा की ४० टक्के पगार द्यायचा, घोषित करायचं की अघोषित करायचं याचा काथ्याकुट वित्त विभाग करतं तेव्हा दुःख होतं. शिक्षण सेवक, नवीन शिक्षक भरती, जुनी पेन्शन, रात्रशाळा, वेळेवर पगार, अतिरिक्त शिक्षक समायोजन, शिक्षक बदली, अर्धवेळ शिक्षक, आयटी शिक्षक, अंगणवाडी ताई यातल्या शोषणावर सरकार बोलायला तयार नाही. आता भरीस भर केंद्र सरकारचं नवीन शिक्षण धोरण येतंय.

आपल्या बजेटमध्ये पूर्वी आरोग्यावर जीडीपीच्या अर्धा टक्के खर्च होत असे आणि शिक्षणावर अडीच टक्के. कोविडमुळे आरोग्य सुधारणा होऊ लागल्या आहेत. पण आरोग्य सेवकांचं शोषण मात्र थांबलेलं नाही. तीच स्थिती शिक्षणाची आणि शिक्षकांची. त्यात सुधारणा व्हावी हीच या जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्त अपेक्षा. आणि शिक्षकांना शुभेच्छा!


- कपिल पाटील

सेव्हन हिल्स हॉस्पिटल, मुंबई
दि. ०५ ऑक्टोबर २०२१

Monday, 30 August 2021

कृष्ण प्रेम



आज गोकुळाष्टमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने देशभर कृष्ण जयंती साजरी होते आहे. त्या कृष्णाचं आणि मथुरेचं मनोवेधक वर्णन मौलाना हसरत मोहानी यांनी अत्यंत प्रेमाने केलं आहे. उठसूट हिंदू मुसलमान करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या डोळ्यात अंजन घालील आणि दोघांच्याही हृदयात प्रेम जागवील अशी मूळ उर्दूतली ही नज़्म आहे. प्रख्यात विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते Shamsul Islam यांनी मला ती आवर्जून पाठवली होती. आपल्या सर्वांसाठी मी ती पुन्हा शेअर करतो आहे. 

- कपिल पाटील

------------------------------

ON JANMASHTAMI 

Hindutva and Islamist zealots who believe that India has been a battle ground for Hindus & Muslims must be disappointed by the following poem.

जन्माष्टमी पर

हिन्दू और मुसलमान कट्टरपंथी जो हमारे देश को हिन्दू और मुसलमानों के बीच एक मैदान-ए-जंग मानते हैं उन्हें यह नज़्म पढ़ कर यक़ीनन दुःख होगा! 

Maulana Hasrat Mohani's love for Krishna (original Urdu poem with Hindi & English translation)

Maulana Hasrat Mohani (1875-1951) was a renowned literary figure, politician, freedom fighter and an Islamic scholar. He coined the war-cry of the freedom struggle INQUILAB ZINDABAD (LONG LIVE REVOLUTION) which was popularized by martyrs like Bhagat Singh. He revered Krishna greatly. His one Urdu poem in praise of Krishna is reproduced here.   

मौलाना हसरत मोहानी का कृष्ण प्रेम (मूल उर्दू नज़्म हिंदी और अंग्रेज़ी अनुवाद के साथ)

मौलाना हसरत मोहानी (1875-1951) एक प्रसिद्द मौलवी और स्वतंत्रता सेनानी थे । यह मौलाना हसरत मोहानी ही थे जिन्हों ने आज़ादी की जंग को लोकप्रिय नारा 'इंक़लाब ज़िंदाबाद' दिया जिसे भगत सिंह जैसे महान शहीदों ने लगातार बुलंद करके अमर कर दिया। वे दूसरे धर्म के देवी-देवताओं का भी सम्मान करते थे। कृष्ण के प्रति उनका प्रेम अद्भुत व असीम है। इसी प्रेम का प्रदर्शन उनकी इस लाजवाब नज़्म में मिलता है ।

मूल उर्दू नज़्म:  

:

متھرا کا نگر ہے عاشقی کا

دم بھرتی ہے آرزو اُسی کا

ہر ذرہ سر زمینِ گوکُل

دعویٰ ہے جمالِ دلبری کا

برسانا و نندگاوں میں بھی

دیکھ آئے ہیں جلوہ ہم کسی کا

 
پیغامِ حیاتِ جاوِداں تھا

ہر نغمہ کرشن کی بانسری کا

 
وہ نورِسیاہ تھا کہ حسرت

 سرچشمہ فروغِ آگہی کا

 
हिंदी अनुवाद:

मथुरा का नगर है आशिक़ी का

दम भरती है आरज़ू उसी का

हर ज़र्रा[i] सरज़मीन-ए-गोकुल

दावा है जमाल-ए-दिलबरी[ii] का

बरसाना व नंदगांव में भी

देख आए हैं जलवा हम किसी का

पैग़ाम-ए-हयात-ए-जाविदां[iii] था

हर नग़मा[iv] कृष्ण की बांसुरी का

वह नूर-ए-स्याह[v] था कि हसरत

सरचश्मा फरोग़-ए-आगही[vi] का

[i. ज़र्रा=कण. ii. जमाल-ए-दिलबरी=प्रेमी का सौंदर्य. iii.  पैग़ाम-ए-हयात-ए-जाविदां=जीवन अमर होने का संदेश. iv. नग़मा= गीत. v. नूर-ए-स्याह=कलिमा की ज्योति. vi.सरचश्मा फ़रोग़-ए-आगही का=जानकारी का स्रोत]

English translation:

Mathura--the place of love, Intense desire always dies for, Every particle of Gokul Land, Is a trustee of my land,

In Barsana & Nandgaon, We have seen the spledour of someone,

Every melody of Krishna's flute, Was a message of Eternal Life,

Though he was black light, Was a source of knowledge-rays! 

Translations by SAJJAD HUSAINI.

Monday, 23 August 2021

जाती जनगणना : उद्धवजी दिल्ली चलो...



दिनांक : २३/०८/२०२१


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.


जाती जनगणनेसाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ 
मा. पंतप्रधानांकडे घेऊन जाण्याची विनंती.


महोदय,
जातीनिहाय जनगणनेची मागणी देशात सर्व राज्यातून होऊ लागली आहे. बिहार राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. नितीशकुमार यांच्या पुढाकाराने त्या राज्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि ते आज पंतप्रधानांना भेटले. जातीनिहाय जनगणना, आरक्षणाचा परीघ वाढवणं आणि नवव्या शेड्युल्डचं संरक्षण मिळवून देणं यात दक्षिणेकडची राज्यं खूप आधीच यशस्वी झाली आहेत.

महाराष्ट्रात हा प्रश्न स्फोटक आहे. ओबीसी आरक्षण संकटात आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण इम्पेरिकल डाट्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी जातीनिहाय जनगणना विनाविलंब होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा.  ज्येष्ठ नेते मा. श्री. शरद पवार, मा. श्री. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ही मागणी सातत्याने लावून धरणारे मा. छगन भुजबळ आणि मा. श्री. नाना पटोले, मा. श्री. छत्रपती संभाजी राजे, मा. श्री. प्रकाश आंबेडकर तसेच विधान सभेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. प्रविण दरेकर यांच्यासोबतच या मागणीचे समर्थक असलेले राज्यातील सर्वपक्षीय नेते यांचं संयुक्त शिष्टमंडळ आपण तातडीने पंतप्रधानांच्या भेटीला न्यावे, अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे.

मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी नारायण राणे कमिटी नेमली गेली. त्याचवेळी विधान परिषदेत मी आक्षेप घेतला होता. ओबीसी आरक्षण सुरक्षित करणं आणि मराठा आरक्षण देणं या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. मात्र त्यावर नारायण राणे कमिटी हा उपाय नसून मागासवर्गीय आयोग, जातीनिहाय जनगणना आणि ५० टक्क्याहून अधिक आरक्षणासाठी नवव्या शेड्युल्डचं संरक्षण या पूर्व अटी आहेत. राज्य शासनाने ते करावं यासाठी सभागृहात मी (१८ एप्रिल २०१३) अत्यंत आग्रहाने मागणी केली होती. मी सातत्याने हा मुद्दा मांडला असताना त्याकडे तत्कालीन सरकारने आणि नंतरच्या सरकारनेही सतत दुर्लक्ष केलं. त्याचाच फटका आज ओबीसी, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला मिळाला आहे. हे शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे. या तिन्ही आंदोलनातील नेत्यांनीही ही भूमिका लक्षात घेऊन एकत्र येण्याची गरज आहे.

याबाबत सहमती निर्माण करण्यासाठी आपण तातडीने राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांसह तसेच ओबीसी नेते मा. श्री. छगन भुजबळ, मा. श्री. नाना पटोले, मराठा आंदोलनाचे नेते मा. श्री. छत्रपती संभाजी राजे, वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. श्री. प्रकाश आंबेडकर, मुस्लिम ओबीसीचे मा. श्री. शब्बीर अन्सारी यांच्या समवेतही बैठक घेऊन चर्चा करावी, ही आणखी एक विनंती.

देशव्यापी दबाब निर्माण केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून महाराष्ट्रानेही आता मागे राहू नये इतकंच.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, विपस 

---------------------------

या संदर्भातले इतर ब्लॉग -

मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल काय?

मराठ्यांचा आक्रोश कशासाठी?

ताराबाईंचं वादळ आणि मराठ्यांच्या लेकी

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र


ओबीसींचा 27 टक्का, भांडवलदारांचा का मोडता?


Friday, 9 July 2021

काँग्रेसी हिंदुत्वाची डिग्री आणि नथुरामी कटामागचं कारण


गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागे फाळणीचं कारण नव्हतं, कारण होतं २६ वर्षांपूर्वीचं. 

'४ जून १९४१' या पुस्तकाचा भाग तिसरा -
.........................

भाग ३

धार्मिक राष्ट्रवादाशी दोन हात करणाऱ्या आणि प्राणांचे सर्वोच्च बलिदान करणाऱ्या काँग्रेस पक्षातही हिंदुत्वाची एक धारा प्रबळ राहिली आहे. ती धारा अनेकदा गांधीजींच्या उदारतेशी फारकतही घेते. धार्मिकतेकडे झुकते. वर्णाश्रमी ब्राह्मणी परंपराही जपते. तरीही त्या धारेला हिंदुराष्ट्रवादाच्या व्याख्येत बंदिस्त करता येणार नाही. कारण हिंदुराष्ट्रवादाच्या कल्पनेला काँग्रेसी हिंदुवाद्यांनीही प्रखर विरोध केला आहे. जसा जीनांच्या पाकिस्तानच्या मागणीला काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी प्रखर विरोध केला. मौलाना आझादांनी जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून जीनांच्या द्विराष्ट्रवादाला ललकारलं होतं. अब्दुल कय्यूम अंसारी यांनी पस्मांदा मोमीन अंसारींची फौज उभी करत धर्माधारीत विभाजनाला स्पष्ट नकार दिला होता. खुदाई खिदमतगार बादशहा खान यांनी अखेरपर्यंत इन्साई खिदमततीत खुदाई मानली. ज्या अर्थाने हिंदुत्ववादी काँग्रेस नेत्यांचा उल्लेख आपण करतो, त्या अर्थाने मौलाना आझाद आणि अब्दुल कय्यूम अंसारी यांचा उल्लेख करता नाही येणार. तिघेही धार्मिक होते. मगर कतही धर्मवादी नेते नव्हते. काँग्रेसमधील हिंदुत्ववादी अर्थातच धर्मवादी होते. तितकेच हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधातही होते. त्यांनी गोळवळकरांचे समर्थन कधीही केलं नाही.

पं. मदन मोहन मालवीय असोत की लोकनायक अणे असोत, स्वामी श्रद्धानंद असोत की गोविंद वल्लभ पंत असोत हे सगळे नेते काँग्रेसमधले. प्रखर राष्ट्रवादी. गांधीजींच्या चळवळीत झोकून देणारे. तरीही त्यांच्या वैचारिक धारणेचा झुकाव हिंदू धर्म आणि हिंदुत्वाकडे होता. ते उदार आणि बऱ्याच अंशी सुधारणावादीही होते. पण गांधीजींनी वर्णाश्रमाची चौकट जशी ओलांडली तशी चौकट या नेत्यांना ओलांडता आली नाही. त्यांच्या उदारतेला रुढीवादाच्या मर्यादा होत्या. पुणे कराराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी बोलायाला जाणारे पं. मदन मोहन मालवीय यांच्या मनातलं स्पृश्य, अस्पृश्यतेचं जळमट तेव्हाही संपलेलं नव्हतं. अर्थात पुढे त्यांच्यातही बदल झाला.

भारताचं भाग्यविधान डॉ. आंबेडकरच लिहू शकतात, असा आपला आग्रह गांधीजी पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडून हट्टाने पूर्ण करून घेतात. इतका खुलेपणा त्यांचं अनुयायीत्व किंवा नेतृत्व मानणाऱ्या काँग्रेसमधल्या या हिंदू नेत्यांमध्ये खचितच नव्हता. इस्लामकडे एक कडवट धर्म म्हणून पाहणाऱ्या हिंदू दुष्टीकोनाचा विचार केला तर मौलाना आझाद, अब्दुल कय्यूम अंसारी आणि सरहद्द गांधी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या कसोटीवर अधिक उजवे ठरतात. जीनांच्या द्विराष्ट्रवादाचा मुकाबला या मुस्लिम नेत्यांनी उघड्या छातीने केला. तुलना किंवा डिग्री मोजण्याचं कारण नाही. पण काँग्रेसी नेते जसे हिंदुत्ववादी होते तसे मौलाना आझाद, अंसारी आणि बादशहा खान इस्लामवादी कधीही नव्हते. मात्र तरीही काँग्रेस मधल्या या हिंदुत्ववादी विचार धारेने हिंदुराष्ट्रवादाला मात्र थारा दिला नाही, हे कबुल करावं लागेल.

लोकनायक अणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले वैचारिक गुरू मा. स. गोळवळकर यांच्या 'We or Our Nationhood Defined' या पुस्तकाला प्रदिर्घ  प्रस्तावना दिली आहे. हिंदुंच्या एकूण जनसंख्येच्या संदर्भात 'या देशात हिंदु बहुसंख्यांक आहेत. आणि त्यामुळे भारत एक हिंदुराष्ट्र किंवा हिंदुस्थान ठरतो', अशी धारणा लोकनायक अणे व्यक्त करतात. पण लगेचच गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाला मात्र नकारही देतात. गोळवळकरांच्या सांस्कृतिक हिंदुराष्ट्रवादाचं अंतर लोकनायक अणे नमूद जरूर करतात. गांधीजींच्या हिंदु - मुस्लिम ऐक्याच्या प्रभावात असलेले लोकनायक अणे हिंदु - मुस्लिम समाजाच्या सहअस्तित्वाचं आणि सांस्कृतिक साहचर्याचं महत्त्व अधोरेखित करतात. 'कोणताही आधुनिक कायदेतज्ज्ञ आणि राजनैतिक दार्शनिक किंवा कायद्याचा अभ्यासक गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाच्या प्रस्तावाशी सहमत होणार नाही', असं स्वच्छपणे लोकनायक अणे सांगतात. गोळवळकरांना प्रस्तावना देताना ते म्हणतात, 'या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या इथेच राहताहेत त्यांना या आधुनिक राज्यात कोणत्याही आधारावर विदेशी म्हणता येणार नाही. धर्माच्या आधारावर भेद करता येणार नाही. आणि धर्माच्या आधारावर नागरिकता निश्चित करता येणार नाही.' लोकनायक अणेंनी पुढे हे मान्य केलं आहे की, 'सुरवातीला धर्म हा राष्ट्रीयतेचा आधार जरूर होता. पण राष्ट्रीय जीवनाचं संचलन करण्यात धर्माची शक्ती आता वर्तमानात कमजोर ठरली आहे. आधुनिक देशांमध्ये आता राजधर्म राहिलेला नाही. अमेरिकेची राष्ट्रीयता धर्मापासून पूर्णपणे मुक्त आहे. धार्मिक सहिष्णुतेच्या विस्ताराने धर्माची सद्दी संपली आहे. राष्ट्राचा धर्म असण्यापेक्षा धार्मिक सहिष्णुता जिथे स्थापित झाली आहे, तिथे राष्ट्रीय एकतेचं सर्वोच्च दर्शनही घडते आहे.'

४ मार्च १९३९ चा तो दिवस होता. नवी दिल्लीतल्या १३, फिरोजशाह रोड वरच्या आपल्या निवासस्थानी ही प्रस्तावना पूर्ण करताना लोकनायक एम. एस. अणे अल्पसंख्यांकांनाही आवाहन करतात खांद्याला खांदा मिळवून एकत्र येण्याचं. धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक विश्वासाचं स्वातंत्र्य हे हिंदू धर्माचे आवश्यक सिद्धांत आहेत, यावर ते जोर देतात.

लोकनायक एम. एस. अणे आणि सरसंघचालक एम. एस. गोळवळकर यांच्यातलं हिंदुत्व म्हणूनच एक निश्चित नाही. गोळवळकरांचं हिंदुत्व द्वेषावर उभं राहतं. दोघांची राष्ट्रीय परिभाषा वेगळी आहे. गोळवळकर हिंदू हेच राष्ट्र मानतात. आणि जे हिंदू नाहीत ते राष्ट्र विरोधी नसले तरी हिंदुराष्ट्रासाठी ते बाहेरचे आहेत, असं म्हणतात. चार श्रेणीत विभागला गेलेला समाज, ही हिंदू धर्माची ओळख गोळवळकर राष्ट्राचीही ओळख मानतात. त्यांच्यासाठी एका चांगल्या राष्ट्राचं ते लक्षण मानतात. घुमंतू शिकारी (म्हणजे भटके विमुक्त) आणि म्लेंच्छ यांच्यापासून मुक्त असलेल्या राष्ट्राची ते कल्पना करतात. म्लेंच्छ म्हणजे जे हिंदू धर्म आणि संस्कृती यांनी निश्चित केलेल्या सामाजिक नियमांना मानत नाहीत ते सर्व.

खुशवंतसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'इस्लामाचा द्वेष हे गोळवळकरांच्या हिंदुत्वाचं अभिन्न अंग आहे.' गोळवळकरांवर सावरकरांचा प्रभाव होताच. दोघेही फॅसिझमचे समर्थक आहेत. हिटलरने लाखो यहुद्यांचा जनसंहार केला, त्याचं समर्थन सावरकर आणि गोळवळकर दोघंही करतात.

काँग्रेसमधील कथित हिंदुत्ववादी गोळवळकरांच्या हिंदुत्वाशी सहमत होत नाहीत. पण तेच अंतर सावरकरांशी मात्र राखत नाहीत. टिळकांना मानणारा एक मोठा गट पुढे सावरकरांच्या बाजूने गेला. टिळक अनुयायांमध्ये दोन गट पडले. त्यातल्या एका राष्ट्रवादी गटाने गांधीजींना साथ दिली. दुसरा गट हेडगेवार, मुंजे यांच्या वाटेने सावरकरी हिंदुत्वाचा धागा बनला. टिळक अनुयायांमध्ये पडलेलं हे अंतर हिंदु-मुस्लिम प्रश्नांवरुन केवळ पडलं होतं, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. इतिहासाचार्य राजवाडेंसारखा गट गांधीजींच्या अहिंसा, खादी आणि अस्पृश्यता निवारण यांच्या बाजूने उभा राहिला.

डॉ. सदानंद मोरे यांनी 'लोकमान्य ते महात्मा' या त्यांच्या द्विखंडी ग्रंथात टिळक अनुयायांमध्ये पडलेल्या अंतराची चिकित्सा केली आहे. इतिहासकार शेजवलकरांनी सनातनी ब्राह्मणांवर टिकेची झोड उठवली. 'जोतीबा ब्राह्मणद्वेष्टा, विष्णुबोवा वेडापिसा, लोकहितवादी इंग्रजांचा स्तुतिपाठक व स्वाभिमानीशून्य, दयानंद तर पंडितमन्य मूर्ख' ठरवणाऱ्या सनातनी ब्राह्मणांचा शेजवलरांनी समाचार घेतला आहे.

दुसरीकडे डॉ. बी.एस. मुंजेंच्या नेतृत्वाखालच्या नागपूर जिल्हा काँग्रेसने स्वदेशी किंवा अस्पृश्यता निवारण या दोन अटी पैकी कोणतीही एक अगर दोन्ही मान्य नसणाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून नोंद करण्याचा ठराव केला होता. नागपुरी हिंदुत्वाला अर्थातच अस्पृश्यता निवारण मान्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीने गांधी धर्म बुडवायला निघाले होते. गांधींचं आगमन हिंदु - मुस्लिम ऐक्याला आमंत्रण देत होतं. यापेक्षा अतीशूद्रांना हिंदुंच्या विहिरींवर बिनहरकत पाणी भरू देण्याचं आवाहन करत होतं. हे मुंजेंच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या काँग्रेसमधल्याच हिंदुत्ववाद्यांनाही मान्य नव्हतं. सावरकर अस्पृश्यता निवारणाची भूमिका घेतात, पण तो त्यांच्या रणनितीचा भाग होता. मुंजे, हेडगेवार ते नथुरामपर्यंतचा प्रवास हा गांधींनी धर्म बुडवला, ब्राह्मणी वर्चस्व आणि नेतृत्व संपवलं या रागाचा होता. त्याचंच पर्यावसन पुढे गांधींच्या खुनात झालं.

२६ वर्षांपूर्वी १९२१ लाच गांधींनी पुण्यात भाषण केलं होतं. आणि अस्पृश्यतेचं पाप त्यांनी ब्राह्मणांच्या पदरात टाकलं होतं. गदारोळ झाला तेव्हा गांधींनी खुलासा केला. 'मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही. नामदार गोखलेंना मी गुरू मानतो. पण अस्पृश्यतेची चाल ही ब्राह्मण्याची निर्मिती आहे.' गांधींना आर्य समाजी स्वामी श्रद्धानंदांची अस्पृश्यांच्या शुद्धीकरणाची कल्पनाही मान्य नव्हती. गांधी म्हणत, 'अस्पृश्यांच्या नव्हे स्पृश्यांच्या किंवा ब्राह्मणांच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे.' गांधींनी वैदीक परंपरेलाच आत शिरून सुरुंग लावला होता.

गांधींची ही भूमिका पुणेरी - नागपुरी सनातनी ब्राह्मणी परंपरेला मान्य असणं शक्यच नव्हतं. महात्मा फुलेंवर त्यांनी मारेकरी टाकले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना वेडापिसा ठरवलं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना इंग्रजांचं स्तुतीपाठक ठरवलं. महात्मा फुलेंनी ज्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली, ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांना याच परंपरेने मूर्ख ठरवलं. तीच परंपरा पुढे फॅसिस्ट संघटनेत परिवर्तित होते. महात्मा गांधींवर जीवघेणे हल्ले करत राहते. त्यातले पाच हल्ले महाराष्ट्रात झाले. तेव्हा पाकिस्तान किंवा फाळणीचा संदर्भ सुद्धा नव्हता. ना पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्न होता. प्रबोधनकार ठाकरे ते भिलारे गुरुजी ही महाराष्ट्राचीच सत्यशोधक परंपरा जिने गांधींना महाराष्ट्रात मरू दिलं नाही. अखेर नथुराम गोडसेने दिल्लीत जाऊन राष्ट्रपित्याची हत्या केली. हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागचं कारण २६ वर्षांपूर्वीचं होतं.

खुद्द पुण्यात घडलेल्या या वैचारिक संघर्षाच्या तालमीत एस. एम. जोशी, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे घडत होते. त्यांना आरएसएसचा मुस्लिम द्वेष मान्य नव्हता. तितकीच हिंदुत्ववाद्यांची वर्णाश्रमी अस्पृश्यताही मान्य नव्हती. १९२७ च्या डॉ. आंबेडकरांच्या महाडच्या क्रांतीत समाजवादी तरूणांचा सहभाग होता. सुरबानाना टिपणीस, चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे बाबासाहेबांसोबत उभे होते. तर १९२९ च्या पर्वती सत्याग्रहासाठी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये यांचा पुढाकार होता.


काकासाहेब गाडगीळांचा मुलगा खेळायला म्हणून संघाच्या शाखेत गेला, एवढ्या घटनेनेही हे काँग्रेसमधले समाजवादी तरूण अस्वस्थ होत होते.

एस. एम. जोशींच्याच शब्दात, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुराष्ट्राला विरोध करण्यासाठीच राष्ट्र सेवा दलाचा जन्म झाला होता. एका व्यापक संघटनेची गरज होती. जी तरूणांना संस्कार देईल धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष राष्ट्रवादाचं. राष्ट्र सेवा दलाचं काम सुरू झालं आणि राष्ट्र सेवा दलाचे सैनिक रा. स्व. संघाशी दोन हात करू लागले. चकमकी घडू लागल्या.' तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा ब. ना. भिडे यांनी खुद्द एस. एम. जोशींची भेट मागितली. भिडेंचं म्हणणं होतं की, 'संघ आणि सेवा दलात वैमनस्य नको.' एस. एम. जोशीनींच लिहलंय की, 'ब्राह्मणेतर तरूण सेवा दलाकडे आकृष्ट होत होते तर संघाचं नेतृत्व ते कार्यकर्ते प्रमुख्याने ब्राह्मणच होते.' एस. एम. जोशी आणि ब. ना. भिडे यांच्यात झालेला तो संवाद मुळात वाचण्यासारखा आहे. सेवा दलाच्याच पुस्तिकेत एम.एम. नी तो हिंदीत सांगितलाय.

'मैंने उनसे कहा, ''हम हिंदू, मुसलमान, सिक्ख, ईसाई सबका एक भारतीय राष्ट्र मानते हैं। हमारा राष्ट्रवाद, असांप्रदायिक है। और आप तो हिंदूराष्ट्रवाद के समर्थक है।'' इस पर भिडे बोले, ''यह सच है कि हम हिंदूराष्ट्रवाद की शिक्षा देते है।'' मैने कहा कि इसका अर्थ यह है कि ''मुसलमान और अन्य गैर हिंदू समुदाय आपके राष्ट्रवाद मे नही आते।''

आगे मैने पूछा, ''क्या खान अब्दुल गफार खां अराष्ट्रीय है?'' वे बोले, ''हां।'' मैने फिर पूछा, ''और मौलाना अबुल कलाम आजाद?'' उन्होंने कहा, ''हां, वे भी।'' मैंने सवाल किया, ''आप यूसुफ मेहरअली को राष्ट्रवादी मानते है या नही?'' भिडे का उत्तर था, ''नहीं।'' इस पर मैने कहा, ''तब हमारी और आपकी कैसे पटेगी? हमारा और आपका दृष्टिकोण ही मूलतः भिन्न है। जाने दीजीए, हम अन्य विषयों की चर्चा करें।'' मगर भिडे को अन्य विषयों में दिलचस्पी नहीं थी और हमारी मुलाखत खत्म हो गयी।'

'मी एस. एम.' या आत्मकथेत त्यांनी तसाच तो मराठीतही सांगितला आहे. एस. एम. जोशींच्याच शब्दात- 
'याच वेळची आणखी एक घटना नमूद करण्यासारखी आहे. आमचे यशस्वी शिबिर पाहिल्यामुळे संघाच्या पुढाऱ्यांना देखील त्याबाबत कुतुहल निर्माण झाले. संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते ब. ना. भिडे यांनी चितळे आडनावाचे दुसरे एक संघाचे चाहते होते, त्यांच्याकडून मला भेटीला बोलाविले. ही भेट श्रीमती इंदिराबाई मायदेव यांच्यामार्फत घडवून आणली गेली होती.

सेवा दल आणि संघ यामध्ये वितुष्ट येत आहे आणि एक निराळी शक्ती उभी राहत आहे हे त्यांना जाणवले होते. खेड्यातील ब्राह्मणेतर तरूण मंडळी आमच्याकडे आकृष्ट होत आहेत हे विशेष महत्त्वाचे होते. संघ आणि सेवा दल यांच्यामध्ये संघर्ष वाढू नये, वितुष्ट  तर येऊच नये, असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ''आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वांचे मिळून भारतीय राष्ट्र मानतो. आमचा राष्ट्रवाद अजातीय आहे, तुम्ही तर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहात.''

त्यावर भिडे म्हणाले, ''आम्ही हिंदूराष्ट्रवादाचे शिक्षण देतो ही गोष्ट खरी आहे. ''

तेव्हा मी म्हणलो, 'म्हणजे मुसलमान व अन्य बिगर हिंदू तुमच्या राष्ट्रवादात बसत नाही. खान अब्दुल गफार खान अराष्ट्रीय आहेत काय? ''

त्यावर त्यांनी ''होय'' असे उत्तर दिले.

मी पुन्हा विचारले, ''अबुल कलाम आझाद यांचे काय? ''

तेव्हा भिडे यांनी त्या प्रश्नालाही होकारार्थीच उत्तर दिले. मी पुन्हा प्रश्न केला, ''तुम्ही युसुफ मेहेरअलींना तरी राष्ट्रवादी म्हणाल की नाही? '' त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले. त्यावर मी म्हटले, ''असे असेल तर तुमचे आमचे कसे जमायचे? आपले दृष्टिकोन मूलतः भिन्न आहेत, यावर न बोलता दुसऱ्या विषयावर बोलू.''  अर्थात त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पात रस नव्हता. त्यामुळे आमची बैठक संपली.'

क्रमशः

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

-------------------------- 

याच संदर्भातील इतर ब्लॉग - 

४ जून कशासाठी? 

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ 
भाग २