बुलंद इकबालच्या नावामागे मरहूम लिहायची हिंमत होत नाही. इतक्या लवकर जाण्याचा त्याला अधिकारही नव्हता. जेमतेम ३६ वय होतं.
साथी निहाल अहमद यांचा तो मुलगा. त्यांचाच राजकीय वारसा तो चालवत होता. वडिलांच्या निधनानंतरही त्याने समाजवादाचा झेंडा खांदावरून उतरू दिला नाही. त्याच्या नावाप्रमाणे त्याचे इरादे, त्याची भाषणाची पद्धत आणि कामाची पद्धतही बुलंद होती. इकबाल म्हणजे यश. ते मिळण्याच्या आधीच तो निघून गेला. कॅन्सरने त्याचा घास घेतला. तो लहान असल्यापासून त्याला पाहत आलो आहे. तो आणि त्याची बहिण शान ए हिंदोस्ताँ दोघंही निहालभाईंचं बाळकडू प्यायलेले. त्यांच्या आईसारखे दोघंही आक्रमक. दोघंही मालेगाव महानगरपालिकेत नगरसेवक झाले. निहालभाईंची लोकप्रियता अखेरपर्यंत टिकून होती.
नव्या पिढीला निहालभाई माहित नसतील. आमदार होते. मंत्री होते. एवढंच ऐकून असतील. मंत्री होते म्हणजे गडगंज असतील, असा समज होईल. पण सायकलवरून फिरायचे. आमदारांचे पगार वाढवण्याचं बिल एकदा सभागृहात शिवाजीराव देशमुख मंत्री असताना मांडत होते. तेव्हा त्याचं कारण सांगताना निहालभाईंच्या फकीरीचं वर्णन त्यांनी केलं होतं. अशा फकीर आमदारांसाठी तरी ही वेतनवाढ आवश्यक असल्याचे समर्थन त्यांनी दिलं होतं. निहालभाई स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एस. एम. जोशींपासून ते शरद पवारांपर्यंत त्यांनी त्यांच्या सोबतीने तेवढंच योगदान दिलं. गरीबांचा कैवार घेणारे. पिवळं रेशनकार्ड आता गरीबांना मिळतं. पण त्यासाठी पहिली लढाई ज्यांनी केली त्यात निहालभाई अग्रभागी होते. नाशिकला आचार्य नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, एस. एम. जोशी यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना केली. त्यावेळी निहालभाई तरुण नेते म्हणून त्यात सहभागी होते. आणिबाणीत ते तुरुंगात होते. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते.
एवढा मोठा वारसा त्यांचा धाकटा मुलगा बुलंद पुढे चालवत होता. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्याच्या कार्यक्रमांना गेलो आहे. हाकेसरशी प्रचंड गर्दी जमवायचा. बुलंद वक्ता होता तो. स्वभावही तितकाच प्रेमळ. गोड चेहऱ्याचा. पण करारी मताचा. विचारांचा. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात अनेकांची मुलं कशी सैरावैरा पळत आहेत. मुलांच्या मागे ७५ वर्षांचे बाप हतबल होऊन धावत आहेत. राजकारण सत्तेसाठीच असतं आणि सत्ता कशी मिळवायची असते. विचारांची बांधिलकी कशाला? असा स्वार्थाचा बोलबाला असलेल्या काळात बुलंद इकबाल अपवाद होता. आता तो अपवादही काळाने हिरावून घ्यायचं ठरवलं असेल तर काय करायचं?
बुलंद गेला असं म्हणवत नाही. म्हणून त्याला मरहूम म्हणत नाही. फक्त डोळ्यात पाणी आहे. भाभी आणि शान एकट्या पडल्या असतील. मालेगावलाही तेच वाटत असेल.
- कपिल पाटील
सुंदर शब्दांकन
ReplyDeleteबुलंद इकबाल बाबत सविस्तर माहिती सांगितली म्हणून कबालचा इकबाल खुपच बुलंद झाला ०००
ReplyDeleteअत्यंत भावपूर्ण
ReplyDelete
ReplyDeleteअत्यंत भावपूर्ण
भावपूर्ण आदरांजली
ReplyDeleteभावपूर्ण आदरांजली
ReplyDeleteभावपूर्ण आदरांजली
ReplyDeleteअत्यंत वेदनादायी घटना, विनम्र अभिवादन
ReplyDeleteनिहाल अहमद साहेबांच्या कुटूंबा बाबत काहीच माहीती नव्हती . या कुटूंबाबर जो दुःखा चा डोंगर कोसळला आहे ते पेलण्याची ताकत परमेश्वर देवो
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली