Friday, 27 September 2019

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन



पत्थरांचा मारा सनातन
पाप्यांची नजर विखारी
बडव्यांचा बाजार सभोती
कालवरीच्या जखम जिव्हारी

परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...


फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबादला होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, अन् सनातन पत्थरांचा मारा सुरू झाला. फ्रान्सिस दिब्रिटो फादर आहेत. धर्मगुरू आहेत. त्याही पेक्षा ते ख्रिश्चन आहेत. पत्थरांचा मारा त्यासाठी आहे. दिब्रिटोंची ज्यांनी निवड केली त्यात एकही ख्रिश्चन नव्हता. यु. म. पठाणांची निवड झाली तेव्हा मतदार होते काही, पण साहित्य महामंडळावर एकही मुसलमान नव्हता. शंकरराव खरात अन् दया पवारांची निवड झाली तेव्हा एकही बौद्ध नव्हता. आताच्या निवड समितीवर एकही दिब्रिटोंच्या उपासना धर्माचा नव्हता. पण निवड समितीवरच्या प्रत्येक सदस्याचा समाजधर्म आणि साहित्यधर्म समान होता. त्यांची मातृभाषाही अर्थात समान होती, जशी ती वसईच्या फ्रान्सिस दिब्रिटोंची आहे. मराठी. पण समानतेचा हा धागाच ज्यांना मान्य नाही, त्यांनी धमक्यांचे दगड कौतिकराव ठाले पाटील आणि श्रीपाद जोशींच्या शिरावर मारले.

जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी,
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया


असं मराठीचं रसाळ वर्णन करणाऱ्या फादर स्टिफन्स यांची मातृभाषा मराठी नव्हती. सन १५५९ इंग्लंडमधून आले होते फादर स्टिफन्स भारतात. मराठी शिकले. ख्रिस्तपुराण लिहलं. त्यात केलेलं मराठीचं वर्णन संत ज्ञानेश्वरांशी नातं सांगतं. फादर दिब्रिटो यांची मातृभाषा तर मराठी आहे. त्यांच्या एकट्याची नाही. मुंबईत, कोकणात अन् वसईत राहणाऱ्या तमाम कॅथलिकांची मातृभाषा मराठीच आहे. ते मराठीत बोलतात. मराठीत विचार करतात. मराठी शाळा चालवतात. मराठीत शिकतात. मुंबईतील शाळांमध्ये वसईकर ख्रिस्ती शिक्षक मराठीत शिकवतात. कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी ही मराठी जपली आणि वाढवली.

त्यांचा उपासना धर्म ख्रिस्ती असेल पण त्यांची समाज भाषा मराठी आहे. कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर. रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या वाटेने गेलेल्या अशा महाराष्ट्रातल्या कैक जिल्ह्यातील प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय भूमीपुत्रांची मातृभाषा मराठीच आहे. मराठीचे पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी धर्माने ख्रिस्तीच होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी थोर स्वातंत्र्य सेनानी बॅ. काका बाप्टीस्टा यांची मातृभाषा मराठीच होती. दोघांच्याही कबरी शिवडीच्या ख्रिस्ती स्मशानभूमीत आहेत. तिथल्या अर्ध्या कबरींवरची प्रार्थना मराठीत आहे.

शांती आणि समतेच्या शोधात उपासनेचा धर्म बदलणाऱ्या या मराठीच्या पुत्रांनी आपली मायबोली आणि समाज भाषा बदलली नाही. कारण त्या मराठीचा वारसा ज्ञानेश्वर, तुकारामांचा आहे. करुणा आणि शांतीच्या शोधात त्यांना ख्रिस्त जवळ वाटला. कौतिकराव पाटील आणि श्रीपाद जोशींवर सनातन पत्थरांचा मारा करणाऱ्यांचा धर्म त्यांना जवळचा वाटला नाही. म्हणून तर त्यांनी धर्मांतर केलं. पण ज्ञानोबा, तुकोबांची मायबोली तीच करुणा आणि शांतीची उब देते म्हणून ती भाषा त्यांनी सोडली नाही. फादर दिब्रिटोंनी सुबोध बायबल लिहलं म्हणून आक्षेप आहे. फादर दिब्रिटो त्यांना धर्म प्रचारक वाटतात. पाणी शिंपडून धर्मांतर करणारे वाटतात. फादर दिब्रिटोंनी कोणाचं धर्मांतर केलं असतं तर बातमी आजवर लपून राहिली नसती. मराठीत भावार्थ दिपिका आणि गीतारहस्य यांचं जितकं महत्वं आहे तितकंच दिब्रिटोंच्या सुबोध बायबलचं आहे. तो काही धार्मिक ग्रंथ नाही. ती रसाळ, सुंदर साहित्य कृती आहे. मानवाच्या महान पुत्राची गाथा सांगताना मराठीचा जिव्हाळा आणि कळवळा सुबोध बायबलमध्ये पानोपानी जाणवतो. पानोपानी तुकाराम अणि ज्ञानेश्वरांचा अभंग हटकून येतो. जेरूसलेमचे राजे डेव्हीड आणि देहुचे तुकाराम बुवा यांची ईश्वर परायण मनं जुळणारी आहेत. 
फादर दिब्रिटो सांगतात -
हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी
लुलपते तसा हे देवा
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे

- राजे डेव्हीड

कन्या सासूराशी जाये
मागे परतूनी पाहे
तैसे झाले माझे जीवा
केव्हा भेटसी केशवा

- संत तुकाराम

महाराष्ट्रात मराठीची गोची झाली आहे. तशी अन्य राज्यात तिथल्या भाषांची नाही. इथे मराठी म्हणजे हिंदू अशी ओळख बनली आहे. 'वसईकर परेरा, डाबरे, ब्रिटो ख्रिश्चन असूनही मराठी चांगलं बोलतात.' 'शफाअत खान, अब्दुल कादर मुकादम मुसलमान असूनही किती सुंदर मराठी लिहतात.' असं आपण सहजपणे बोलतो. मनाला वेदना होतात तेव्हा. यात कौतुकापेक्षा मराठी असणं म्हणजे धर्मभेद बाळगणं असं अंतर पडलेलं असतं. अरे त्यांचीही मातृभाषा मराठीच आहे. जशी ब्राह्मण, मराठा, साळी कोळी यांची भाषा मराठी आहे. विदर्भातले आदिवासी पूर्ण महाराष्ट्रीय असले तरी त्यांची मातृभाषा मराठी नाही. ती असते गोंडी, माडिया, कोरकू. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची मातृभाषा गोरमाटी (बंजारा). गुजरात, केरळ, तामिळनाडू इथे असा भेद नाही. तिथे भाषेला धर्म चिकटलेला नाही. केरळी ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान यांची मल्यालमच असते. तीच गोष्ट तामिळींची. गोव्यातले हिंदू आणि ख्रिश्चन कोकणीच बोलतात. गुजरातमधले मुसलमान भाषेने गुजराती असतात. 

दिब्रिटोंचं ललित लेखन विपुल आहे. तितकंच वैचारिक लिखाण. पर्यावरणाच्या त्यांच्या लढाईत त्यांनी जे जे लिहलं त्यात धर्माचा संबंध येतो कुठे? ते माणसांसाठी लिहतात आणि समाजधर्म माणूसकी आहे हेच सांगतात. मी अस्सल भारतीय आहे, हे त्यांना सांगायला लागावं. आपल्या समाजातले नतद्रष्टयांनी त्यांचा खुलासा मागावा यासारखं दुःख काय आहे? धर्माव्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहलं आहे. पण त्यांनी नुसतं सुबोध बायबल लिहलं, तरीही ती मराठीची फार मोठी सेवा ठरते. जगभर बायबलच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात. म. गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले अशा महामानवांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली. त्या बायबयलचा परिचय करून देणं म्हणजे धर्मप्रचार नाही. दिब्रिटोंचा तो ग्रंथ म्हणजे केवळ अनुवाद नाही. ललितरम्य शैलीतला भावानुवाद तर तो आहेच, पण मानवाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या धर्मग्रंथाचा आणि परंपरेचा शोध घेणारा संशोधनपर ग्रंथ आहे. तो सांस्कृतिक सेतू आहे.

फादर दिब्रिटो लिहतात, 'येशूसाठी मुक्ती केवळ अध्यात्मिक जीवनापुरती मर्यादीत नव्हती. तर तिचा ऐहिक जीवनाशी अनन्य संबंध होता. माणूस केवळ आत्मा नाही. त्याला देहही आहे. म्हणजे तो देहात्मा आहे. म्हणूनच मुक्ती म्हणजे माणसाचे संर्वकष कल्याण साधणे होय. हा विचार या शुभवर्तमानातून आलेला आहे.' तिसरं शुभवर्तमान सांगताना संत लुकने येशूची प्रतिमा रंगवली आहे, 'गोरगरीब, वंचित, पीडित, स्त्री, मुले, विधवा, परित्यक्त्या यांचा मित्र.' फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक म्हणून मोठे आहेतच. पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. संत लुक यांनी लिहिलेली तिसऱ्या शुभवर्तमानातली ख्रिस्ताची ती पायवाट दिब्रिटोंनी कधीच सोडली नाही. ख्रिस्त निर्भयपणे क्रुसावर गेला. हरीत वसईचा लढा उभारताना तीच निर्भयता दिब्रिटोंनी महाराष्ट्राला शिकवली. डेव्हीड - गोलिएथच्या कथेसारखी. गांधींच्या सत्याग्रहासारखी. खुद्द दिब्रिटोंनीच गांधींच्या सत्याग्रहाचं नातं डेव्हीड - गोलिएथच्या कथेशी जोडलंय. डेव्हीडने गावकऱ्यांना निर्भय बनवलं होतं. भारतीयांना गांधींनी. वसईतल्या दिब्रिटोंनी वर्तमानाला.

ते निर्भय फादर दिब्रिटो मी पाहिले आहेत. अनुभवले आहेत. अफवांचं विष कालवलेल्या विहिरीत उतरलो आहे. तळ गाठलेल्या त्या निर्मळ पाण्यात सौहार्द आणि सलोख्याचे मासे मुक्त विहरताना पाहिले आहेत. फादर ब्रिटोंच्या ओंजळीने त्या विहिरीतलं पाणी मी प्यायलो आहे.

९३व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटोंची निवड होणं ही अवघ्या मराठीसाठी सुवार्ता ठरावी.

परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...


हा ख्रिस्त कोणी देवाचा पुत्र नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रेषित नाही. हा ख्रिस्त सनातन वेदनेवर फुंकर घालणारा मानवाचा महापुत्र आहे. माणुसकीच्या चिरंतन प्रवाहातून वाहणारी करुणा आहे. झाकोळलेल्या अलम मराठी दुनियेसाठी, द्वेष अन् भेदाच्या जखमांनी विव्हळणाऱ्या भारतासाठी साहित्य संमेलनाची ही घटना सुवार्ता ठरावी. ख्रिस्त अन् ज्ञानेशाच्या करुणेसारखी.

26 comments:


  1. *फादर फ्रान्सिस दिब्रिटो* या वर्तमानातील आधुनिक संत माणसाची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली हा खऱ्या अर्थाने मराठी भाषेचाच सन्मान आहे.

    'आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा,'
    'ओअ‍ॅसिसच्या शोधात '(प्रवासानुभव ) 'तेजाची पाऊले (ललित)'
    'नाही मी एकला',
    'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास'
    'सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)'
    'सृजनाचा मोहोर'
    'परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)'
    'ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)' इ.
    ही त्यांची विपुल ग्रंथसंपदा, वृत्तपत्रातील प्रेरणादायी लेखन मराठी भाषेच्या वैभवात भर घालतात.

    अहंकार अन गर्वाचा लवलेश नसलेल्या या संत माणसाचा काही काळ सहवास लाभला, खूप प्रेरणा मिळाली.
    हे आमचे भाग्य!

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं आहे. साहित्य, कला यामधे जात, धर्म , पंथ आडवे नको यायला . व्यक्तीमधील माणूसपण पहायला हवं .

      Delete
    2. Mमराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा मराठी भाषेत लिहिणाराअसावा एव्हढ्या अटीची पुर्तता झाली की बस्स ! जाती आणि धर्माची अडचण येतेच कशी ? निवडणुकीच्या तोंडावर समाजात ध्रुवीकरण करण्यासाठी ही संघी-सनातनी फोडणी तर नाही ना !

      Delete
  2. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललात

    ReplyDelete
  3. सर तुमचीच आठवण आली होती जेव्हा हा विषय सुरू झाला तेव्हा. वाटलं होतं तुमच्याकडून समजून घ्यावेआणि आज तुम्हीच लिहिलेत. खूप महत्त्वाचं होत हे लिहिणं.
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. अतिशय मार्मिक👍👍👍👍

    ReplyDelete
  6. नेमके परखड विवेचन!

    ReplyDelete
  7. नेमकं उत्तर
    बरेच हे सर्व माहीत नव्हते अजून हे सर्व आहे

    ReplyDelete
  8. अगदी सत्य...व्यक्ती जाणून घेण्यापेक्षा आम्हाला भाषा वाद, प्रांत वाद करायलाच जास्त आवडतो..

    ReplyDelete
  9. Absolute right No religion is greater than human bcoz we made it not God.Man is the center point and not his religion. Jabardast

    ReplyDelete
  10. दिब्रेटोंच्या भाषिक आणि साहीत्य जाणीवा ज्यांना माहीती नाहीत;तेच अज्ञानी आणी कटटरतावादी विरोधात बोलत आहेत.

    ReplyDelete
  11. आ.कपिल पाटील यांनी समर्पक आणि सडेतोड उत्तर दिलंय

    ReplyDelete
  12. आ.कपिल पाटील यांनी समर्पक आणि सडेतोड उत्तर दिलंय

    ReplyDelete
  13. धन्यवाद आ. पाटील सर. अत्यंत समर्पक लिहिलं.

    ReplyDelete
  14. अतिशय समर्पक व अभ्यासपूर्ण विवेचन

    ReplyDelete
  15. Thoughtful and true! Best explanation.

    ReplyDelete
  16. खूप समर्पक लिहिलंय सर.

    ReplyDelete

  17. Christ ha wihirit asnara beduk nahi.
    Je kristscha tirskar kartil te manav
    Jivnachea marg kadhi prakashit karu shakat nahit.

    ReplyDelete
  18. साहित्य कला यामधे जात,धर्म,पंथ आडवे नको यायला.आणि असे भेदभाव फार. डिब्रिटोनी कधीच केले नाहीत. पाटील साहेब तुम्ही अचूक आणि समर्पक उत्तर दिले आहे.

    ReplyDelete
  19. ईट का जवाब पत्थर से .जोहार जिन्दाबाद साहेब

    ReplyDelete
  20. त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय

    ReplyDelete