Wednesday, 10 June 2020

बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय,
कोविडची महामारी रोखण्यासाठी  देशात लॉकडाऊन करण्यात आलं. माणसं घरात गेली. कारखाने बंद पडले. हाताचं काम गेलं. आणि लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लक्षावधी स्थलांतरित मजूर रस्त्याने चालू लागले. कुणाच्या पायातून रक्त येत होतं. कुणी स्त्री हायवेवरच बाळंत होत होती. कुणी ट्रक उलटून त्यात दबून मरत होतं. पटरीवर मान ठेवून डोळा लागलेल्या मजुरांच्या मानेवरून तर मालवाहू गाडी निघून गेली. अंग मेहनत करणाऱ्या या वर्गाचे हाल पाहून शरद पवारांना कुणाची आठवण आली असेल तर ती बाबा आढावांची. 

डॉ. बाबा आढावांचा 90 वा वाढदिवस 1 जूनला साजरा झाला. बाबांवर शरद पवारांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहली. शरद पवार जितके कसलेले राजकारणी आहेत तितकेच संवेदनशील नेते आहेत. परिवर्तनाच्या चळवळीशी नातं जपणारे राजकारणी आहेत. पवार साहेबांनी लिहलं म्हणून नव्या पिढीला डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल काही कळलं. 

महात्मा फुले जेव्हा होते तेव्हा आपण कुणीच नव्हतो. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ही महाराष्ट्राची ओळख आजही आपण साऱ्यांनी जपली आहे. त्या परंपरेतला एक जीता जागता माणूस आपल्या सोबत आहे हीच महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे. 

बाबा राष्ट्र सेवा दलात घडले. साने गुरुजी हे त्यांचं दैवत. साने गुरुजी हे सेवा दलाची ओळख मानली जाते आणि महाराष्ट्राची माऊली. महाराष्ट्राच्या समतेच्या चळवळीची आजची ओळख एकाच नावात सांगायची असेल तर ते नाव आहे, डॉ. बाबा आढाव.

डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव, एक पाणवठा. बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता. बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा जणू डॉ. अल्बर्ट श्वाईटझर. बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. बाबा म्हणजे जयपूर हायकोर्टासमोर मनुचा पुतळा हटवण्यासाठी लॉंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. बाबा म्हणजे गोर गरिबांना परवडणारी, कष्टाची भाकर देणारा अन्नपूर्णादाता. बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबांचं आयुष्य फुलेमय आहे. पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.

महाराष्ट्राला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि डॉ. बाबा आढाव नव्वदी पार. महाराष्ट्र शासनाने त्यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देणे उचित ठरेल. 

मुख्यमंत्री महोदय, आपण सरकार स्थापन करत असताना शिवरायांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचा महाराष्ट्र असं म्हणाला होतात. ती परंपरा घट्ट करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार शासनाने द्यावा, एवढीच विनंती. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, विपस

दि. 10 जून 2020

No comments:

Post a Comment