Wednesday, 7 September 2016

आणखी एका 'आरती'ची मागणी



गणपती हा विद्या आणि कलेचा अधिपती. लोकांचा नायक म्हणून गणनायक. लोकपती. गणपतीचं हे रूप आपल्या भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून चालत आलं आहे. गणेशोत्सव म्हणूनच लोकोत्सव असतो. 

गणपतीपुढे रोज सकाळ-संध्याकाळ आरती होते. आरतीचा अर्थ आहे, आपलं दु:ख मांडणं. आरती म्हणजे व्याकुळ होऊन, आर्ततेने दु:खहर्त्याकडे केलेली मागणी. 

विश्‍वाचे आर्तव माझ्या मनी प्रगटले, असं पसायदान ज्ञानेश्‍वरांनी मागितलं होतं. आरतीचा इतका व्यापक अर्थ असल्यामुळेच मी एक आवाहन करणार आहे. गणपती ज्यांचा नायक आहे त्या जनगणांना ही विनंती आहे. एक आरती शिक्षणासाठी होऊ दे! आपल्या मुला-मुलींसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. कोपर्डीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी होऊ दे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या सन्मानासाठी. विलास शिंदेंसाठी. तुमचं, आमचं संरक्षण करणार्‍या पोलिसांनाही संरक्षण आणि सन्मान मिळावा यासाठी होऊ दे. 

ही आरती कशासाठी? राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडून पडण्याच्या अवस्थेत आहे, सरकारने एका पाठोपाठ एक घेतलेल्या निणर्यांमुळे. आपल्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याची व्यवस्था ज्या शाळांमध्ये असते तिथले शिक्षक सरकार कमी करत आहे. तीन भाषांना मिळून एक शिक्षक, विज्ञान आणि गणितालाही एक शिक्षक. कला, क्रीडा शिक्षक पन्नास रुपये तासावर. हजारो शिक्षक सरप्लस होत आहेत. राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना पगार नाहीत. गणपतीपूर्वी फक्त २० टक्के पगार देण्याचा निर्णय झाला. या २० टक्क्यात कसं भागणार? शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा शिक्षणमंत्री करतात. संस्थांना अनुदान नाकारतात. शाळा कॉलेजना अनुदान देण्यास सरकारकडे पैसे नसतील तर शाळा-कॉलेजेस चालतील कशी? सरकार बदललं तरी शिक्षणासाठी 'अच्छे दिन' नाहीत.

शिक्षणाचं व्यापारीकरण सरकार करत आहे. शिक्षण महाग होत झालंय. तुमच्या मुलीला डॉक्टर व्हायचं असेल तर ६० लाख रुपये हवेत. रेडिओलॉजीची फी दोन कोटी रुपये आहे. खाजगी विद्यापीठ येत आहेत. तिथे कुणाची मुलं शिकणार? 

शिक्षण उद्याची गुंतवणूक आहे. आपल्या मुलां-मुलींचं भविष्य आहे. त्यासाठी अनुदानित शिक्षण मिळालं पाहिजे. तो आपला अधिकार आहे. तोच अधिकार संकटात आहे. त्या संकटाच्या निवारणासाठी एक आरती मागतो आहे. 

एक आरती मागतो आहे, कोपर्डीच्या त्या शाळकरी मुलीसाठी. ती काही एकटी कोपर्डीची नाही. ती तुमच्या आमच्या घरातली आहे. शेजारची आहे. चाळीतली आहे. गावातली आहे. उमलण्याच्या अगोदरच दुर्मानवी, दु:स्वप्नांना तिला सामोरं जावं लागतं. तिच्या मनातला आर्तव, तिच्या मनातली व्याकुळता का कळू नये? समाजमनातील पुरातन पुरुषी अहंकाराच्या, वर्चस्वाच्या, वासनांच्या त्या बळी असतात. करणारे कुणी परके नसतात. ओळखीचेच असतात. म्हणून वाचा फुटत नाही. सीता, अहल्या, द्रौपदी यांना जे भोगावं लागलं नाही ते कोपर्डीच्या, खैरलांजीच्या वाटेला येत राहतं. कोपर्डीच्या निमित्तानं महाराष्ट्र खळबळला आहे. ही खळबळ वाया जाऊ नये. कोपर्डीला न्याय तेव्हाच मिळेल, जेव्हा स्त्री-पुरुषांमधल्या लिंगभेदाला अग्नी मिळेल. माणूस म्हणून स्त्रीला बरोबरीचा सन्मान जोवर समाजात प्रस्थापित होत नाही तोवर मुली असुरक्षितच राहणार. भेदांची ही जळमटं जाळून, पुरून टाकण्याच्या आव्हानासाठी एक आरती व्हावी.

मुंबईच्या एका बहाद्दर, प्रामाणिक पोलीस कर्मचार्‍याच्या हत्येने महाराष्ट्र असाच हादरला आहे. विलास शिंदे यांची हत्या कशासाठी झाली? आपलं कर्तव्य बजावलं म्हणून. लोकांमध्ये एरव्ही पोलिसांबद्दल राग असतो. चीड असते. त्यांच्या वागण्याबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल. पण विलास शिंदेचा मृत्यू चटका लावून गेला. जात, धर्माच्या भिंती ओलांडून अवघ्या महाराष्ट्राची संवेदना विलास शिंदेसाठी जागी झाली. हेल्मेट न घालता भरधाव बाईक चालवणार्‍या मुलांना अडवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न पोलीस अनेकदा करतात. पण कुणी ऐकत नाही. भरधाव गाड्या हाकतात. बाईक चालवताना कसरती करतात. हायवेवर भर ट्रॅफिकमध्ये सायलन्सर नसलेल्या धूम बाईक तुफान आवाज करत सुसाट पळत असतात. पण त्यांना त्याची पर्वा नसते. स्वत:चा जीव तर गमवतात. पण इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्या दिवशी त्या मुलाकडे लायसन्स नव्हतं. अल्पवयीन तर होता. विलास शिंदे यांनी त्याची चावी काढून घेतली. घरच्यांना बोलाव, म्हणून सांगितलं. त्याचा भाऊ आला. त्याने थेट विलास शिंदेंच्या डोक्यावर वार केला. वार इतका खोलवर होता की, मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली. 

विलास शिंदे यांना सरकारने शहीद म्हणून जाहीर केलं आहे. विलास शिंदे यांची शहादत खूप मोठी आहे. तुमच्या आमच्या मुलांसाठी आहे. सुसाट बाईक हाकणार्‍यांच्या डोक्यात वारा शिरलेला असतो. त्या मुलाच्या डोक्यात सैतान शिरलेला होता. कायद्याचा वचक राहिलेला नाही, म्हणून पोलिसांवर आणि गृहखात्यावर टीका करणं सोपं आहे. पण तरुणांच्या डोक्यात शिरलेलं सैतानाचं वारं बाहेर काढणं सोप्पं नाही. ती जबाबदारी एकट्या सरकारची नाही म्हणून विलास शिंदेच्या शहादतीसाठी त्या तरुणांना आवाहन करणारी एक आरती हवी. 

कपिल पाटील
(लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ७ सप्टेंबर  २०१६   


4 comments:

  1. खुपच सकारात्मक , संयमी आणि मार्मिक मांडणी . एकीकडे कोपर्डी प्रकरणात जातीय राजकारणाची पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू असताना , त्याच विषयाची एवढ्या वेगळ्या पद्धतीने मांडणी ही अप्रतिमच .

    ReplyDelete
  2. Khupch vichar karnyasarkh ahe....kharach

    ReplyDelete