सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी सुवर्ण पदकासाठी विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे आणि भारतीय आचार विचार परंपरा मानणारा असला पाहिजे अशा अटी घातल्या आहेत. हा उघड उघड संघीकरणाचा प्रयत्न आहे. हे विद्यापीठ सनातन संस्थेच्या दावणीला बांधण्याचा हा दुसरा मोठा प्रयत्न आहे. तो हाणून पाडला पाहिजे. काय खायचं आणि कोणते कपडे घालायचे हे ठरवण्याचा अधिकार विद्यापीठाला कुणी दिला? हे विद्यापीठ संविधानिक मूल्यांशी बांधलेले आहे की विषमता मूलक परंपरांशी?
विद्यापीठाचं हे पत्रक म्हणजे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांशी प्रतारणा आहे. संविधानिक अधिकारावरचा हल्ला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघमुक्त आणि सनातन मुक्त करण्यासाठी जोरदार वैचारिक हल्ला करण्याची गरज आहे.
भारत विविध संस्कृती आणि परंपरांनी विनटलेला देश आहे. भारतीय संविधान त्या सांझा संस्कृतीचं (composite culture) प्रतिबिंब आहे. संविधानिक मूल्यांच्या संवर्धनानेच जीवनातले आदर्श निर्माण होऊ शकतील. सर्व संस्कृतींना सामावून घेणारा 'एकमय' मानवी समाज निर्माण करण्याचं स्वप्न महात्मा फुले पहात होते. त्याच्याशी विपरीत पुणे विद्यापीठाचे हे वर्तन आहे. विविध संस्कृती आणि परंपरांचा 'एकमय' भारतीय समाज निर्माण करण्याऐवजी 'एकमेव' वर्ण जात संस्कृती वर्चस्व लादण्याचा प्रयोग संघ शाळेने सुरु केला आहे. विज्ञानाशी आणि वैज्ञानिक मूल्यांशी त्यांचं वैर आहे. म्हणून विज्ञान, विद्या शाखे व्यतिरिक्त सुवर्ण पदक पारितोषिकासाठी मध्य युगातल्या अटी घालण्यात आल्या आहेत.
सनातनी संघीयांचा गांधी, नेहरू, सुभाष, टागोर, भगतसिंग यांच्या परंपरेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला विरोध आहे. संविधानाने निर्माण केलेली आधुनिक भारतीय लोकशाही परंपरा संपवण्याचा त्यांचा नथुरामी प्रयत्न आहे. याच नथुराम प्रवृत्तीने पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गांधीजींवरचा पहिला हल्लाही पुण्यातच झाला होता.
महामानवी सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला दिल्यापासून 'एक' वर्ण जात संस्कृती वर्चस्ववाद्यांचा तिळपापड झाला आहे. म्हणून विद्यापीठांच्या सनातनी आणि संघीकरणाची सुरवात पुणे विद्यापीठापासून करण्यात आली आहे.
पुणे पारतंत्र्यात अनेकदा गेलं. पण पुणेकर शरण कधी गेले नाहीत. पुण्याची जमीन माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी सोन्यासारख्या विचारांनी नांगरली आहे. वीर यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्यावर पेशव्यांशी संघर्ष केला. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या बंडखोर विचारांचा झेंडा याच पुण्यात फडकला होता. पेशव्यांच्या जुलमातून मुक्त करणाऱ्या कोरेगावच्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करत असत.
आता पुन्हा एकदा नथुरामी विचारांच्या विळख्यात सापडलेल्या पुणे विद्यापीठाला मुक्त करण्यासाठी संघर्षाचा झेंडा हाती घ्यावा लागेल.
प्रदेश अध्यक्ष, जनता दल युनायडेट, महाराष्ट्र
(शरद यादव गट)
उत्तम लेख
ReplyDelete