Tuesday, 1 November 2016

पळशीकर, नाईक यांना श्रद्धांजली



आचार्य पळशीकर
वसंत पळशीकर यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रसंग क्वचितच आला. भेटले ते एक दोनदा शिबिरातच. खूपदा  समाज प्रबोधन पत्रिकेतून आणि नवभारतमधून. महाराष्ट्रात कार्यकर्ता घडवणार्याा आचार्यांची एक मोठी परंपरा आहे. दादा धर्माधिकारी, विनायकराव कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, डॉ. ना. य. डोळे, बाळासाहेब भारदे, वि. स. पागे. हे सगळे गांधींना मानणारे. पण एकाच पठडीतले नव्हेत. भारदे-पागे काँग्रेसी परंपरेतले. धर्माधिकारी, कुलकर्णी, कुरुंदकर, डोळे हे सारे समाजवादी शिलाचे, गांधी मार्गी कार्यकर्ते घडवणारे. भारदे-पागे यांना मी ऐकलं आहे. पण माझी पिढी त्या स्कूलमधली नाही. दादा धर्माधिकारी, विनायकराव, नरहर कुरुंदकर, ना. य. डोळे यांच्या शिबिरातून आम्ही सारे घडलो. वसंत पळशीकर हे याच आचार्य कुळातले.

पळशीकरांना ऐकणं आणि वाचणं यात वेगळा आनंद असतो. गांधीवादी, समाजवादी किंवा डावे अशा साच्यात पळशीकरांना बसवता येणार नाही. पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रश्नांचं आकलन करताना पळशीकरांची मदत यापैकी कोणत्याही गोटातल्या कार्यकर्त्याला हमखास होऊ शकायची. त्यांची ग्रंथ परंपरा मोठी नाही. तसे ते भाषण परंपरेतले. त्यांची सगळी भाषणं जर ग्रंथीत केली तर मोठा विचारसाठा उपलब्ध होईल. परिवर्तनवादी विचारांना नवचिंतन, नवा दृष्टीकोन आणि सम्यक चिकित्सा देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पळशीकरांनी. विशेषतः धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या या प्रश्नांची उकल करताना पळशीकरांचं चिंतन नेहमी चौकटी बाहेरचं राहिलं आहे. त्यांची शैली अनाक्रमक पण ठाम होती. आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या सहवासात ते राहिले. भूदान आंदोलनात ते चालले. आंनदवनात रमले. मेधाताई पाटकरांच्या समवेत नर्मदा आंदोलनातही त्यांनी झोकून  दिलं. या सर्वांचा स्पर्श त्यांच्या प्रत्येक संवादातून जाणवत असे. ते कधीही एकांगी झाले नाहीत. पण त्यांच्या चिकित्सक मांडणीतली आर्तता कार्यकर्त्यांना नवी उमेद, नवा ओलावा देऊन जात असे. नव भारताचा आणि नव परिवर्तनाचा त्यांना अखंड ध्यास असे. समाज परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी वसंत पळशीकर मोठा आधार होते. त्यांच्या जाण्याने तो आधार गेल्याची हुरहुर जाणवत राहणार आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

-----------------


डॉ. अब्दुल करीम नाईक
डॉ. अब्दुल करीम नाईक यांचा इंतकाल परवा झाला. कोकणातला हा माणूस. शिकला, डॉक्टर झाला. बॉम्बे सायकीएट्रिक सोसायटीचे ते अध्यक्ष होते. पण शिक्षण क्षेत्रात अधिक रस होता. कोकणात आणि मुंबईत शिक्षण संस्था उभ्या करण्यात अनेकांना त्यांनी मदत केली. मुस्लिम ओबीसींच्या चळवळीमुळे त्यांची ओळख झाली होती. आपल्या मुलाच्या इस्लामिक रिसर्च सेंटरच्या लायब्ररीत ते घेऊन गेले होते. डॉक्टर धार्मिक होते, पण उदार परंपरेतले. सर्व धर्मीयांशी संवाद ठेवणारे. विशेषतः कोकणावर प्रेम करणारे. त्यांचा जन्म रत्नागिरीचा. एरव्ही धर्मवादी माणूस मुस्लिम ओबीसींच्या चळवळींशी फटकून वागतो. पण डॉ. ए. के. नाईकांना त्याबद्दल कौतुक होतं. कोकणातल्या मागासवर्गीय मुस्लिमांना विशेषतः मच्छिमार दादलींना पुढे जाण्याचा मार्ग मिळेल याचं त्यांना अप्रूप होतं.

त्यांच्या मुलाचं नाव सर्वांना माहीत आहे. डॉ. झाकीर नाईक. डॉ. झाकीर नाईकांच्या भूमिकेशी सहमत होण्याचं कारण नाही. पण झाकीर नाईकांचे वडील आहेत म्हणून डॉ. अब्दुल करीम नाईक यांची उपेक्षा करुन चालणार नाही. शिक्षण आणि वै़द्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाला सलाम! त्यांना विनम्र श्रद्धांजली.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


No comments:

Post a Comment