Saturday, 27 January 2018

शिवलेला महाराष्ट्र कुणी उसवला?भीमा कोरेगावचा हिंसाचार कुणी घडवला? कल्याणला कुणा तेलंगणातल्या नक्षलवाद्यांना सरकारने अटक केली आहे. पण मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अजून हातही लावलेला नाही.

हल्ला कुणी केला? कारस्थान कुणाचं? या प्रश्नांची उत्तरं खुद्द मनोहर भिडेंनीच दिली आहेत.

मनोहर उर्फ संभाजी भिडे. पांढरी दाढी मिशी वाढवलेला वयोवृद्ध माणूस. आखुड धोतरात राहतो. अनवाणी फिरतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची मुलाखत घेताना त्यांच्या प्रती सहानुभूतीचं वलय निर्माण होईल याची बऱ्यापैकी काळजी घेतली. त्यामुळे त्यांनी वापरलेली भाषा ना माध्यमांना आक्षेपार्ह वाटली. ना त्यावर कुणाच्या प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी सुद्धा हे प्रकाश आंबेडकर आणि संभाजी भिडेंचं भांडण आहे, अशी साळसुद भूमिका घेतली. विरोधी पक्षांमधल्या अनेक नेत्यांचा मनोहर भिडेंशी असलेला स्नेहसंबंध सुद्धा कदाचित त्यासाठी कारण असेल.

'ज्यांच्या (मराठ्यांच्या) बुडाखालची सत्ता गेली, त्यांनी हे घडवलं आहे. आपण तर त्या गावात गेलोच नाही', असा उलटा आरोप मनोहर भिडे यांनी केला आहे. बोच्याखालची किंवा बुडाखालची भाषा सभ्य किंवा संसदीय नाही. पण ती चालवून घेतली जाते. सडकेवरचं आंदोलन करण्याची भाषा मात्र आंतकवादी ठरते. मनोहर भिडे यांनी थेट मराठा समाजावर आरोप केला. रामदास आठवलेही त्यांच्या मदतीला धावले. मनोहर भिडेंनी जातीचं नाव नाही घेतलं, आठवलेंनी नाव घेत मराठ्यांवर आरोप केला. की करायला लावला?

मनोहर भिडे आरक्षणावर बोललेत. अॅट्रॉसिटीवरही बोललेत. एका 'जमावा'ला घाण करण्याचा आणि 'लोकशाहीचा मुडदा' पाडण्याचा अधिकार दिल्याची त्यांची भाषा गरळ ओकणे या शब्दातच वर्णन करावी लागेल. दलित समाजाबद्दलची त्यांच्या मनात असलेली घृणा आणि दलितेतर समाजात विष ओकण्याची त्यांची तऱ्हा या मुलाखतीने पुन्हा एकदा समोर आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर त्यांची प्रतिक्रिया अशीच अत्यंत कुत्सित आणि अपमानकारक आहे. 'सगळ्याच ताटात वाढलंय, त्यांच्याही ताटात टाका.' कर्जमाफीवरही त्यांनी आग ओकली आहे. लिंगायत धर्मावर तर थेट हल्ला चढवला आहे. माध्यमांसमोर बोलत असल्यामुळे काळजी घेऊनही ही भाषा. ज्यांनी त्यांची भाषण ऐकली आहेत, त्यांना विचारा. भिडे काय काय बोलतात?

मनोहर भिडेंच्या म्हणण्यानुसार मराठ्यांचं आरक्षण, कर्जमाफी आणि लिंगायत धर्माची मागणी हा सगळा 'देशघातक कावा' आहे आणि 'हिंदू धर्मात तोडफोड' करण्याचं कारस्थान आहे.

भीमा कोरेगावचा हल्ला भिडे, एकबोटे या दोघांनी केला की हल्ला करणाऱ्यांचे ते फक्त समोर केलेले चेहरे आहेत? ओसामा बिन लादेनही वर्ल्ड ट्रेड सेंटरला गेला नव्हता. दंगल पेटवण्यासाठी कुठं जावं लागत नाही. पण आठवलेंना बोलायला लावून या दंगलीची धग कायम राहील, याची व्यवस्थाही कारस्थान्यांनी केलीच आहे. त्यांनी भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रूकच का निवडलं? विद्वेषाची ही आग पेटवण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? त्यासाठी इंधन आणि सरण कुणाचं वापरण्यात आलं? आगीची झळ महाराष्ट्रभर पसरत राहील याची काळजी कुणी घेतली?

मनोहर भिडे यांच्या मुलाखतीनेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.

तीन दंगली 
महाराष्ट्राने तीन मोठ्या दंगली अनुभवल्या आहेत. पहिली महात्मा गांधींच्या हत्येनंतरची. गांधी हत्येनंतर देशभरच्या दंगली थांबल्या. पण महाराष्ट्रात ज्यांनी पेढे वाटले त्या हिंदुत्ववाद्यांची घरं पेटवण्यात आली. (त्यात अनेक निरपराध ब्राह्मणांचीही घरं जळली.) मराठवाडा विद्यापीठ नामांतरच्या मागणीवर दलितांची घरं पेटवण्यात आली. बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर महाराष्ट्राने हिंदू - मुस्लिम दंगाही पाहिला. त्यांच्या जखमा दिर्घकाळ राहिल्या. भीमा कोरेगावला झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात दंगल नाही पेटली. घरं नाही जळली. पण दोन्ही बाजूची मनं कमालीची करपली आहेत. कलुषित झाली आहेत. या आधीच्या दंगलीत असं घडलं नाहीगेले आठवडाभर जळत्या मनांचा धूर महाराष्ट्र अनुभवतो आहे. सोशल मिडियावर दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया पाहिल्या की धग किती तीव्र आहे, याची जाणीव होते.

उबदार गोधडी 
अठरा पगड जाती धर्माच्या ठिगळांनी शिवलेली महाराष्ट्राची उबदार गोधडी साडेतीनशे वर्षात प्रथमच उसवली गेली आहे. गोधडी महाराष्ट्राचं उबदार वस्त्र. महाराष्ट्रातल्या सलोख्याचं प्रतीक. छत्रपती शिवरायांनी ती पहिल्यांदी शिवली. महार, मांगासह अठरा पगड जातींचे मावळे त्यांच्या सैन्यात सामिल झाले. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, शेख महम्मदजनी आणि बहिणाबाई या संतांच्या धाग्यांनी ही गोधडी शिवली गेली आहे.

रायगडावर शिवरायांची समाधी शोधायला गेलेल्या महात्मा फुलेंनी, पहिलं आरक्षण देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी आणि संविधानाच्या माध्यमातून अवघ्या देशाचं भाग्य लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गोधडीचं महत्व ओळखलं होतं. एकमय समाजाचं स्वप्न महात्मा फुले पाहत होते. यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, साने गुरुजी, एस. एम. जोशी, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण ते थेट शरद पवार या साऱ्यांनी महाराष्ट्राला एकमय ठेवण्याचा प्रयत्न केलाही गोधडी पांघरुनच. 'फुले - शाहू - आंबेडकर' ही शब्दावली रुढ केली ती यशवंतराव चव्हाणांनी. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल कुणाचेही, कितीही मतभेद असोत पण मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी सत्तेची किंमत त्यांनी चुकवली. पण ही गोधडी उसवू दिली नाही.

वढू बुद्रूकच का?
ही गोधडी पहिल्यांदाच उसवली गेली आहे. मोठ्या योजनापूर्वक. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रूक यांची निवड या कारस्थानात मोठ्या हुशारीने करण्यात आली होती. भीमा कोरेगावच का? वढू बुद्रूकच का? महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांना किंवा सांप्रदायिक शक्तींना छत्रपती संभाजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत म्हणून? या दोघांनी पुरोहितशाहीच्या विरोधात आणि वर्ण वर्चस्वाच्या विरोधात बंड केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहित आहे. पण त्यांनी बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरही धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असंच म्हणत होते. 

संभाजीची फक्त 'धर्मवीर' ही प्रतिमा त्यांना प्रिय आहे. बुद्धभूषण लिहणारा, अवैदिक शाक्त परंपरा मानणारा संभाजी त्यांना मान्य नाही. शिवरायांचा आणि स्वराज्याचा घात करणाऱ्या अष्टप्रधान मंडळातल्या अण्णाजीपंत दत्तो यांना संभाजी राजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं. मोरोपंत पिंगळेना तुरुंगात टाकलं होतं. त्याचा राग मनात ठेवत औरंगजेबाला फितूर होत संभाजीराजांना पकडून देण्यात आलंदरबारातील पंडितांच्या सल्ल्यानुनसार संभाजी राजांना मनुस्मृतीनुसार शिक्षा देण्यात आली. डोळे काढण्यात आले. देहाचे तुकडे, तुकडे करण्यात आले. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या संगमावर राजांच्या देहाचे तुकडे फेकून देण्यात आले. वढू बुद्रूक त्या संगमावरच आहे. वढु बुद्रूकच्या शिर्के (शिवले) आणि गोविंद महार (गायकवाड) यांनी हिम्मत केली. राजांचा तुकड्या तुकड्यांचा देह गोविंद गायकवाडांनी शिवला. गावच्या पाटलाने विरोध केला. म्हणून गोविंद महाराच्या जमिनीवर महाराष्ट्राच्या छत्रपतीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिर्के पुढे आले, आपल्या राजासाठी महाराला शिवले. म्हणून शिवले झाले. शिवलेंनी पुढे गोविंद गायकवाड यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचीही समाधी राजांच्या जवळ बांधायला पूर्वास्पृश्य बांधवांना मदत केली. गायकवाड आणि शिर्के यांनी केवळ संभाजी राजांचा देह नाही शिवला. निष्ठा, हिम्मत आणि बंधूभावाच्या गोधडीने अवघा महाराष्ट्र जणू शिवला. शिवचरित्रकार वा. सी. बेंद्रे, कमल गोखले आणि प्रच्यविज्ञापंडीत कॉ. शरद पाटील यांनी संभाजीचा इतिहास समोर आणला नसता, तर संभाजीचा तो इतिहास धर्मवीरांनी कधीच गाडून टाकला असता. म्हणून आजवर वढू बुद्रूकच्या ग्रामस्थांनी संभाजी राजांची समाधी राखली तसाच गोविंद महाराबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणारा फलक परवापर्यंत सांभाला होता. त्या शिवले आणि गायकवाडांना २०१८ चं साल सुरू होताना पस्परांच्या विरोधात उभं करण्यात भिडे संप्रदाय यशस्वी झाला आहे. भीमा कोरेगावच्या शौर्य दिनापूर्वी भिडे संप्रदायाने गोविंद गायकवाडांच्या समाधीचा अवमान केला. तणावाला पूरक वातावरण तयार केलं. जानेवारी २०१८ ला लाखो दलितांचा समुदाय जमला होता, तेव्हा थेट त्यांच्यावर हल्ला चढवला.


कोण आहेत हे मनोहर भिडे? 
भिडे संघाचे प्रचारक. त्यांनी स्वतःचं नाव संभाजी भिडे करुन घेतलं. आपण संभाजी भक्त असल्याचा त्यांचा दावा आहे. पण रामदासांप्रमाणे ते संभाजी दास काही झाले नाहीत. बहुजन समाजातल्या तरुणांच्या गडवाऱ्या आयोजित करुन अत्यंत विखारी प्रचार ते गेले अनेक वर्षे करत आहेत. वारकरी संप्रदायाच्या विरोधात त्यांनी धारकरी संप्रदाय निर्माण केला. पारंपारिक वारीला अपशकून करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर, तुकारामांना मानणाऱ्या वारकऱ्यांनी भिडेंना जुमानलं नाही. वढू बुद्रूकला संभाजी राजे आणि गोविंद महाराच्या समाधीवरुन आग लावण्यात भिडे संप्रदाय यशस्वी ठरला. पानिपतकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या एका सभेला मनोहर भिडे हजर होते. वढू बुद्रूकचा इतिहास विश्वास पाटील सांगत होते. गोविंद महाराने केलेल्या हिमतीचं कौतुक करत होते. शिवाजी - संभाजीने सगळ्या जाती जमातींना एकत्र कसं केलं, ते सांगत होते. मागे बसलेल्या संभाजी म्हणवणाऱ्या भिडेंचा पारा त्यामुळे चढत होता. ते तडक उठले आणि निघून गेले.

सांगली, कोल्हापूरच का?
सांगली मिरज दंगलीमागे हात कुणाचा होता? हे लपून राहिलेलं नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा हाच पट्टा त्यांनी का निवडला? गांधी हत्येनंतर हिंदुत्ववाद्यांची घरं लोकांनी जाळली ती याच पट्टयात. सत्यशोधकी विचारांचा प्रभाव असलेले हे तीन जिल्हे. क्रांतीसिंह नाना पाटील यांची पत्री चळवळ आणि भाई माधवराव बागल यांचा सत्यशोधकी संग्राम यांनी हे जिल्हे भारले होते. फुले - आंबेडकरांना साथ देणारी ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. त्यामुळे गांधी हत्येनंतरची सर्वांत तीव्र प्रतिक्रिया याच पट्टयात उमटली. गोडसेवादी सांप्रदायिक शक्तींना त्यांनी अक्षरशः हद्दपार केलं. त्याचा राग इतकी वर्षे मनात दबा धरुन होता. नाव बदलून संभाजी झालेल्या मनोहर भिडेंच्या माध्यमातून सत्यशोधकी तटबंदी भेदण्यामध्ये ते गेल्या काही वर्षात यशस्वी झाले. आर. आर. पाटील गृहखाते सांभाळत होते. त्या काळात गुप्तचर विभागाने या सगळ्या कारवाया रिपोर्ट केल्या होत्या. काँग्रेस - राष्ट्रवादीतल्या नेत्यांची रसद घेत त्यांच्याच 'बुडाखालचं' सिंहासन बाजूला करण्यात भिडे संप्रदाय यशस्वी झाला. जिथे संघाची शाखा दुर्बिणीतून शोधावी लागत होती तिथे आता भाजपचे पाच आमदार आहेत. एक खासदार आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारण्यात आले होते. त्या कोल्हापूर गादीवरचे छत्रपती संभाजी राजे शाहू यांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्यात आलं आहे. राजाराम शास्त्री भागवत शाहू महाराजांच्या पाठी उभे होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यशवंतराव चव्हाणांच्या सोबत होते. वि. . पागे अन् बाळासाहेब भारदे यांनी वसंतदादा आणि शरद पवारांनाही साथ दिली. त्यांची जागा भिडे अन् एकबोटेंनी घेतली. चव्हाण, दादा, पवारांना मानणारे काही नेते भिडे, एकबोटेंना रसद पुरवत होते. म्हणूनच भिडे संप्रदायाला ताकद मिळाली.

सांगली, सातारा, कोल्हापूरच्या प्रयोगानंतर आता भीमा, भामा आणि इंद्रायणीचा संगम हे केंद्र करण्यात आलं आहे. हा संगम महाराष्ट्राच्या आध्यात्मिक एकतेचं केंद्र आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या राजाच्या बलिदानाचं अन् समाधीचं स्थळ आहे. पेशवाईवर विजय मिळवलेल्या दलित अस्मितेचं शौर्यस्थळ आहे. या संगमावर, बलिदानाच्या वेदीवर आणि विजय स्तंभावर हल्ला चढवण्यात आला. हेतूपूर्वक या संगम स्थळाची निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गलित गात्र दलित समाजात शौर्य आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवण्यासाठी भीमा कोरेगावच्या जय स्तंभाला अभिवादन करुन समता विजयाची नवी परंपरा सुरु केली. पेशवाईने ज्यांच्या गळ्यात अस्पृश्यतेचं मडक बांधलं होतं, त्या महार वीरांनी पेशवाई संपवण्यासाठी भीमा कोरेगावच्या महासंग्रमात प्राणांची बाजी लावली. त्यांचं शौर्य निर्विवाद आहे. पण त्या संग्रमात महारांच्या सोबतीने मराठे, राजपूत, शीख, अहिर यादव, माळी  यांच्यासारख्या अनेक ओबीसी जाती, मिणा आदिवासी आणि मुसलमानही पेशवाईच्या विरोधात लढले होते, हे आवर्जून सांगायला हवं. स्थानिक ग्रामस्थ पेशवांच्या बाजूने नाही, ब्रिटीश सैन्याला मदत करत होते. शहीदांमध्ये या सर्वांचा समावेश आहे. ९८ भारतीय पेशव्यांविरुद्ध लढताना मारले गेले. तर १३ ब्रिटीश युरोपीयन. दुसऱ्या बाजीरावाच्या कथा, त्याचा रमणा इतिहासाला ठावूक आहे. पण पेशव्यांच्या काळात खुद्द छत्रपतींचा छळ  होत होता. त्यामुळे  सगळेच मावळे संधीची वाट पाहत होते. ८६५ जवानांच्या तुकडीने पेशवाई संपवली. त्यात ८३० हे सगळे नेटिव्ह होते. जॉन वेलीने हे लिहून ठेवलंय. चंद्रकांत पाटील नावाच्या पत्रकाराने तो सगळा लेखी पुरावा शोधून काढला आहे.


सनातनी खदखद आणि द्वेषाचा विखार 
महार, मराठे, मुसलमान आणि ओबीसी एकजुटीने लढले. म्हणून भीमा कोरेगावचा जय स्तंभ सांप्रदायिकांच्या डोळ्यात सतत खूपत होता. गांधी हत्येनंतर सांगली, कोल्हापूरात जळलेल्या घरांची राख हिंदुत्ववाद्यांच्या मनात जशी धगधगत होती, तसाच हा जयस्तंभ. जे समाज एकत्र लढले त्यांच्यातच भांडण लावून देण्यात आलं. भांडण किती विकोपाला गेलं आहे, ते दोन्ही बाजूच्या व्हॉटस्अपवरचे मेसेज पाहिले की कळून चुकतं. जे एकत्र लढले, ज्यांनी शिवाजी - संभाजी राजांवर प्राणापलिकडे प्रेम केलं, त्या जाती जातीतले तरुण इतिहासातल्या शौर्याचा कैफ बारुदासारखा डोक्यात भरत आहेत आणि परस्परांना डिवचत आहेत. सांप्रदायिक शक्तींनी सनातनी राग मनात ठेवत किती अचूक हल्ला केला आणि किती द्वेषाचा विखार पेरला त्याचं दर्शन भीमा कोरेगाव आणि नंतरच्या घडामोडीतनं स्पष्ट दिसतं.
               
त्यामागे गोडसेवादी शक्ती 
हल्ला पूर्वनियोजित होता. या घटना काही एकाएकी घडत नसतात. कधी नव्हे ती महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाल्यामुळे सांप्रदायिक शक्तींना नवं बळ  मिळालं. पण तयारी खूप आधीपासूनची आहे. डॉ. भांडारकर इन्स्टीट्युटवर हल्ला झाला, पुण्यातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवण्यात आला, राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला, तेव्हाच या हल्ल्याची तयारी सुरु होती. एका व्यापक कटाचा तो भाग होता. जेम्स लेन प्रकरणात जिजामातेच्या बदनामीने मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अत्यंत अश्लाघ्य, बेसलेस, तद्दन खोटी माहिती पेरून शिवरायांची आणि महाराष्ट्र मातेची बदनामी करण्यात आली. डॉ. भांडारकर हे पुरोगामी, सत्यशोधकी विचारांचे. पुढे इन्स्टीट्युचा ताबा भलत्याच लोकांनी घेतला. जेम्स लेनला माहिती देणारे ब्राह्मण होते. ब्राह्मणांची संस्था या समजातून इन्स्टीट्युवरच हल्ला झाला. डॉ. भांडारकर काही ब्राह्मण नव्हेत. सारस्वत. पण ब्राह्मण विरुद्ध मराठा असा अकारण वाद पेटला. हल्ल्यामुळे सारस्वतही नाराज झाले. माध्यमंही विरोधात गेली. या सगळ्याचं प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बळ महाराष्ट्रातील सांप्रदायिक शक्तींना मिळालं. अभिनव भारत, सनातन संस्था, भिडे संप्रदाय, एकबोटींची हिंदू एकता, हिंदू जनजागरण, हिंदू चेतना या आघाड्या गोडसेवादी सांप्रदायिक शक्तींचेच आक्रमक अविष्कार आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या गोडसेवादी शक्तींनीच केल्या. चारही खुनांमधली हत्यारं एक आहेत. मारण्याची पद्धतही एक आहे.

दाभोलकर ते गौरी लंकेश हत्यांमागचं कारण 
दाभोलकरांची हत्या झाली त्यामागे अंधश्रद्धा निर्मुलन हे कारण सांगितलं जातं. हे तितकंस खरं नाही. गोडसेवादी संघटनांना ज्यांच्या कडून बळ मिळत होतं, त्या बुवा महाराजांवर दाभोळकर हल्ला चढवत होते. गोडसेवाद जोपासणाऱ्या सनातन संस्थेलाच ते आव्हान देत होते. दाभोळकर सारस्वत ब्राह्मण. पण म्हणून ते वाचू शकले नाहीत. रामायणात एका ब्राह्मण चार्वाकाची हत्या पुरोहितांनी केल्याचा दाखला आहे. अशीच घटना महाभारतात युधीष्ठीराच्या दरबारातही दिसते. महात्मा बसवेश्वरांचं बंड मध्य युगातलं. ब्राह्मण जातीत त्यांचा जन्म होता. पण ब्राह्मण्यांच्या आणि वर्णवर्चस्वाच्या विरोधात त्यांनी युद्ध पुकारलं. आंतरजातीय विवाह ते घडवून आणतात म्हणून पुरोहितांनी बल्लभ राजाकडे तक्रार करुन, प्रधानमंत्री असलेल्या बसवेश्वरांच्या शिरच्छेदाचा आदेश मिळवला. दाभोळकर नावाच्या आधुनिक चार्वाकालाही म्हणून शहीद व्हावं लागलं. गोविंद पानसरे जातीने मराठा. खरा शिवाजी महाराष्ट्राला ते सांगत होते. गोडेसवादी सनातन्यांच्या मार्गातला ते मोठा अडथळा होते. त्या निशस्त्र म्हाताऱ्या माणसावर गोळ्या चालवण्यात आल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश दोघंही लिंगायत. सनातन वैदिक धर्म आणि हिंदुत्वापेक्षा महात्मा बसवण्णांच्या लिंगायत धर्माची शिकवण वेगळी आहे, हे ते ठासून सांगत होते. लिंगायत धर्माला धर्म म्हणून मान्यता मिळण्याच्या मागणीला व्यापक समर्थन मिळू लागलं, म्हणून या दोघांची हत्या झाली. लिंगायत धर्माची मागणी हिंदुत्ववाद्यांना किती लागली आहे, याचा ताजा पुरावा भिडे गुरुजींनी लिंगायत धर्माविषयी जी गरळ ओकली आहे, त्यातून पुन्हा समोर आला आहे.

जिग्नेश, उमरवर खापर 
कारस्थान कुणाचं हे स्पष्ट असताना भीमा कोरेगावच्या हल्ल्याचं खापर जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिदवर फोडण्यात आलं. हल्ला दलितांवर झाला. केला गोडसेवादी भिडे संप्रदायाने. पण आरोप झाला मराठ्यांवर. चिथावणीचा आरोप झाला जिग्नेश आणि उमरवर. प्रकाश आंबेडकरांच्या सभेत या दोघांची शनिवार वाड्यावर आदल्या रात्री भाषणं झाली. त्या भाषणात एकही शब्द चिथावणीचा नाही. भाषा पूर्ण संविधानिक आहे. संविधानाच्या रक्षणाची आहे. उमरचं भाषण तर पूर्ण वैचारिक आहे. पण तो मुसलमान असल्यामुळे त्याला अतिरेकी ठरवणं सोपं आहे. तो काश्मिरी मुसलमान असल्याचा आणि त्याने देशविरोधी घोषणा दिल्याचे दोन्ही आरोप तद्दन खोटे आहेत. उमर मुळचा आपल्या अमरावतीचा. त्याचे वडील त्यांच्या तरुणपणी सिमी संघटनेत होते. म्हणून उमरला आरोपी कसं करता येईल? तो तर धार्मिकही नाही. विचाराने डावा आहे. मुस्लिम धर्मांधतेच्या विरोधातही त्याची भूमिका ठाम आहे. कन्हैया, उमर किंवा त्यांचे सगळे साथीदार नास्तिक, निरीश्वरवादी, भगतसिंगवाले आहेत. ते देवाचं नाव घेत नाहीत तर इन्शाल्लाहचे नारे कशाला लावतील? भारत तेरे तुकडे होंगे, या घोषणा ज्या पाच जणांच्या टोळक्याने दिल्या त्यातल्या एकालाही मोदी सरकारने अजून पकडलेलं नाहीकसे पकडतीलती सरकारचीच माणसं होती. पेरलेली. जिग्नेशच्या भाषणात काही सापडलं नाही म्हणून जाती अंताची लढाई सडकेवर लढावी लागेल, या त्याच्या वाक्याला धरुन त्याला झोपडण्यात आलं. ज्यांनी हल्ला केला तेच उमर आणि जिग्नेशचं नाव घेत आहेत. प्रकाश आंबेडकरांवर आरोप करण्याची त्यांची हिम्मत नाही. कारण ते थेट आंबेडकर आहेत. उमर, जिग्नेशवरचा आरोप गडद करण्यासाठीच छात्र भारतीच्या मुंबईतील जानेवारीच्या संमेलनावर सरकारने ऐनवेळी बंदी आणली. नंतरच्या आठवडाभरात हिंदू चेतना नावाने संघ, भाजप परिवाराच्या महाराष्ट्रात २५५ सभा बिनदिक्कत झाल्या. त्याची बातमीही होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला. त्यावरही काहींचे आक्षेप आहेत. महाराष्ट्र बंदमुळे भीमा कोरेगावची आग खेड्यापाड्यात पोचली, हा तो आक्षेप आहे. दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांनी बंदची घोषणा केली नसती तर राज्यभर उद्रेक झाला असता. आपल्या शौर्याच्या अस्मितेवर हल्ला झाला आहे, ही ती चीड होती. त्या रागाचा, असंतोषाचा निचरा दुसऱ्या दिवशीच्या बंदमुळे झाला. हल्ला मराठा समाजाने नव्हे तर एकबोटे - भिडे संप्रदयाने केला, असा ठोस मेसेज आंबेडकरांनी दिला. मराठा समाजातल्या सगळ्या संघटनांनी त्या बंदला साथ दिली. कोणतीही विपरीत घटना घडू दिली नाही. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, सकल मराठा, क्रांती मोर्चा यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमीत आणि धीरोदात्त होत्या. जाती विद्वेषाची आग भडकू देण्यासाठी मराठा आणि अन्य दलितेतर समाजाने घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे. बाबासाहेब अणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल या सर्व गटांमध्ये आदराची भावना आहे. मराठा आरक्षण डॉ. आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावरच मिळणार आहे, हे अवघ्या मराठा समाजाला माहित आहे. त्यामुळेच की काय मनोहर उर्फ संभाजी भिडे मीडियासमोर आले. मराठ्यांवर खापर फोडून, लिंगायतांवर आग ओकून मोकळे झाले. दलितांना शत्रू 'जमात' म्हणून अधोरेखित करते झाले. त्यावेळी मनोहर भिडेंची प्रतिमा कुणीतरी वयोवृद्ध महामानव साधू अशी उभी राहिल याची काळजी घेतली जात होती.

मनोहर भिडे त्या मुलाखतीत आणखी एक वाक्य बोलले आहेत. 'लोकशाहीत सोनं बुडतं, लेंडकं तरंगतात'. मनोहर भिडेंची भाषणं युट्युबवर आहेत. त्यांना ऐकणारा जमाव बहुजनच असतो. त्यांना दरडावताना ते एक शब्द वापरतात, ' लेंडक्या'. लेंडकंचा अर्थ इथे देता येणार नाही. भिडेंची भाषा किती 'घाण' आहे, एवढंच सांगितलं पाहिजे. लोकशाहीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या पोरांबद्दल भिडे संप्रदायाच्या मनात घृणा किती ठासून भरली आहे. मागच्या शतकात महाराष्ट्राने ब्राह्मण, ब्राह्मणेतर वाद पाहिला. आता मराठा - मराठेतर, दलित - दलितेतर असे नवे वाद निर्माण करण्यात येत आहेत.

महाप्रयासाने शिवलेला महाराष्ट्र उसवण्याचा किती घोर प्रयत्न सुरु आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.)

पूर्व प्रसिद्धी - साधना साप्ताहिक

20 comments:

 1. महाराष्ट्र हा समतेचा बालेकिल्ला आहे येतील समाज समतेने समतेला समतेसाठी दिलेले आलिंगन कधीच कोणी डाकू चोरू शकणार नाही.

  ReplyDelete
 2. आठवलेंचा संदर्भ वगळता अभ्यास पूर्ण लेख

  ReplyDelete
 3. आदरणीय कपिल पाटील सरांचा ' शिवलेला महाराष्ट्र कुणी उसवला?' हा लेख खूपच अभ्यासपूर्ण, विचारणीय आणि चिंतणीय आहे.
  खरचं सर... आपल्या क्रांतिकारी विचार आणि धारदार लेखणीला क्रांतिकारी सलाम आणि खूप खूप धन्यवाद...!

  ReplyDelete
 4. आदरणीय कपिल पाटील सरांचा ' शिवलेला महाराष्ट्र कुणी उसवला?' हा लेख खूपच अभ्यासपूर्ण, विचारणीय आणि चिंतणीय आहे.
  खरचं सर... आपल्या क्रांतिकारी विचार आणि धारदार लेखणीला क्रांतिकारी सलाम आणि खूप खूप धन्यवाद...!

  ReplyDelete
 5. लेख छानदार उतरला आहे. हिंदूत्ववादी सतत "सांस्कृतिक राष्ट्रवाद" या चाॅकलेटी संकल्पनेचा वापर करून दररोज एकेक घट्ट विणलेला टाका उसवत आहे. आभार. One stitch in time, saves nine!

  ReplyDelete
 6. अप्रतिम
  अभ्यासपूर्ण विवेचन !
  भिडे एकबोटेच्या सडक्या विचाराने प्रेरित होऊन कोवळी मुले (सर्व जातीतील)गडकोट च्या नावावर अतिरेकी कारवाया साठी वापर करण्यात येत आहेत.त्या तरुणांचे भवितव्य काय? आज महार, किंवा इतर समाज हा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात खूप छान प्रगती करीत आहे!
  असे असताना त्याला मराठा व इतर समाज कधीच आपला शत्रू वाटला नाही किंबहुना मराठा आरक्षणाला पाठिंबा होता तो या समाजाचा !
  सरकार भिडे,एकबोटे वर कारवाई करण्यात अपयशी झाले, पण सरकारने, बंद मध्ये सामील झालेल्या 10 हजाराच्या वर तरुणांना पोलिसांनि गंभीर गुन्हे दाखल करत सुपारी घेतल्यासारखं अटक केले!त्यांच्या भविष्याचे काय?
  स्वतंत्र म्हणजे नेमके काय? जे भिडे,एकबोटे करतात तो आतंकवाद नाही का? ते भारताचे हाफिज सईद आहेत हे सिद्ध होत आहे ! म्हणजे भारताचा पाकिस्तान होऊ शकतो हे लक्षात येते आहे???
  प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे, जात प्रिय आहे पण ही प्रियता कुणाच्या मुळावर उठत असेल तर ती अतिरेकी आहे!मुळात संभाजी महाराज यांचा शेवट हा या लोकांच्या फितुरीमुळे, झाला!तोही त्यांच्याच मनुस्मृती नुसार!
  मराठा समाजदेखील आता हुशार झाला असला तरी बेरोजगार,धर्मांध,देवधर्मात अडकवून तरुणांची डोकी भडकावून त्याचा वापर बेगडी राष्ट्रवाद, धर्मवाद असल्या नावाखाली अतिरेकी कारवाया करणे हेच भिडे,एकबोटे यांचे मूळ टार्गेट आहे !

  ReplyDelete
 7. Very nice article, kapil ! Pl translate into Hindi and English, and post it again.....rgds, bye.

  ReplyDelete
 8. फार छान लेख आहे सत्यता आहे सर्वांनी समजुन घेण गरजेच आहे

  ReplyDelete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. एकबोटे,भिडे या सारख्याना बळ येतय ते केवळ पुरोगामी लोकांत असलेल्या
  फुटीमुळे.समतावादी,गांधीवादी,लेनिनवादी,साम्यवादी,जनतावादी,आंबेडकरी,समाजवादी असे कीती तुकडे करायचे आणि मोडायचे म्हणून प्रगतीशील विचारवंतानो तुम्हाला एकच विनंती आहे की बीजेपी आणि काँग्रेस याना वगळून एक व्हा.अन्यथा या सर्व पुरोगामी म्हणून मिरवणार्याचा अंत आता जवळ आला आहे. सावध व्हा लवकरच. ही विनंती

  प्रा राजेश

  ReplyDelete
 11. अप्रतीम मांंङनी सर. वास्तवाचा विस्तव कीती विखारी आहे हे समर्पक मांंङलत. अॅॅङ. वैशाली ङोळस

  ReplyDelete
 12. प्रतिगामी विचार समूह आजपर्यन्त सत्य सहन करू शकला नाही
  वैचारिक लढाई लढू शकला नाही
  म्हणून तर त्या भेकडानी हत्या करने हल्ला करणे या गोष्टीचा आधार खलनायकांची भूमिका पार पाडली आहे
  पाडत आहेत
  तरीही ते नायक आहेत कारण मीडिया आणि लिहिण अजूनही त्यांच्या हातात आपण मात्र वैचारिक मानसिक गुलाम आहोत

  ReplyDelete
 13. सत्यावर प्रकाश टाकणारा लेख आहे...हा लेख सर्व हिंसाचारी व सत्यता न पडाळणार्या समुहापर्यत पोहचवला पाहिजे...पाटील
  सरांचे आभार

  ReplyDelete
 14. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 15. ब्राम्हणवादी विचारसरणी,ती जोपासन्या साठी बनवलेले देव,धर्म आणि त्याच्या अनुसंगाने येनारे व्रत , वैकल्य , सण,उत्सव आदि.नावाची वैदिक हत्यारे टाकुन सांविधान पूर्णतः स्वीकारने व बुद्धा ने दाखवलेल्या मार्गाने चालने अति आवश्यक .

  ReplyDelete
 16. जातीची गोधली कधीच ऊबदार नव्हती सर ! जाति छोड़ो समाज जोड़ों .

  ReplyDelete
 17. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 18. <<< दरबारातील पंडितांच्या सल्ल्यानुनसार संभाजी राजांना मनुस्मृतीनुसार शिक्षा देण्यात आली. डोळे काढण्यात आले. देहाचे तुकडे, तुकडे करण्यात आले. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या संगमावर राजांच्या देहाचे तुकडे फेकून देण्यात आले. वढू बुद्रूक त्या संगमावरच आहे. वढु बुद्रूकच्या शिर्के (शिवले) आणि गोविंद महार (गायकवाड) यांनी हिम्मत केली. राजांचा तुकड्या तुकड्यांचा देह गोविंद गायकवाडांनी शिवला. गावच्या पाटलाने विरोध केला. म्हणून गोविंद महाराच्या जमिनीवर महाराष्ट्राच्या छत्रपतीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिर्के पुढे आले, आपल्या राजासाठी महाराला शिवले. म्हणून शिवले झाले. शिवलेंनी पुढे गोविंद गायकवाड यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचीही समाधी राजांच्या जवळ बांधायला पूर्वास्पृश्य बांधवांना मदत केली. >>> हे एक अस्सल ऐतिहासिक संदर्भांना धरून नसलेले निरीक्षण बाजूला ठेवू. बाकी अत्यंत वास्तवदर्शी अभ्यासपूर्ण आणि रोखठोक संपूर्ण विश्लेषण .

  ReplyDelete
 19. बुधभूषण ला बुद्धभूषण केलं त्यावरूनच समजलं , उमर जिग्नेश हे संत महात्मे आणि मराठे व ब्राह्मण आंतकवादी

  ReplyDelete