Saturday 30 October 2021

स्वातंत्र्य, समता आणि मानवतेसाठी निनादणारा आवाज काळाच्या पडद्याआड....कवी वसंत बापटांच्या 'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...' या प्रार्थनेतली 'मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना' ही ओळ गावी ती लीलाधर हेगडे यांनीच. भुपेन हजारिका यांचा आवाज तुम्ही ऐकलाय का? मी तुलना बिलकुल करत नाही. पण त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यातली घन आर्तता तुम्हाला अनुभवता येईल जेव्हा लीलाधर हेगडे ही ओळ गात होते तेव्हा. लीलाधर हेगडे यांनी साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहात वसंत बापटांसोबत 'महाराष्ट्र शाहीर' कार्यक्रम महाराष्ट्रभर नेला. आणि राष्ट्र सेवा दल कलापथकाला नवा आवाज मिळाला.

सेवा दलाचे शाहीर आणि कलापथकाचा आवाज एवढीच लीलाधर हेगडे यांची ओळख नाही. महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एका पाठोपाठ एका कलापथकीय कार्यक्रमांमुळे सेवा दलाला देशभर एक नवी ओळख मिळाली. त्या मागचा आवाज अर्थात लीलाधर हेगडे यांचा होता. पण लीलाधर हेगडे यांचं मोठं काम हे की, अस्पृशता निवारण चळवळीत आपलं उमेदीचं आयुष्य त्यांनी झोकून दिलं. भिंगरी लागून गावोगाव फिरले. कैक मंदिरं खुली केली. कधी संघर्ष करावा लागला. कधी नैराश्य आलं. पण डफावरची थाप थांबली नाही.

'तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून
पिकल उद्याचं रान
चल उचल हत्यार
गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण'

अशा शाहीरीतून कितीतरी सेवा पथकांना हेगडेंनी कार्यप्रवण केलं. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहली. अण्णा पवार आज शंभरीत आहेत. सिंध प्रंतात सेवा दलाचं काम पोचवणारे अण्णा नंतरच्या पिढीतील सेवा दलाला माहीत नाहीत. चीन युद्धात हे अण्णा पवार भारतीय सेना दलात होते. चीनी सैनिकांशी त्यांनी घनघोर संघर्ष केला. त्यांची कथाच हेगडे यांनी कादंबरीरूपाने लिहून काढली.

लीलाधर हेगडे राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षही राहिले. तो एका अर्थाने त्यांचा सन्मान होता. लीलाधर हेगडे ठाण्याचे. सेवा दलाच्या पहिल्या शाखेपैकी एक. पालघर जिल्ह्यात आणि कोकणात गावोगावी शाखा उघडण्यात हेगडेंचा मोठा वाटा आहे. सेवा दलाचा इतिहास लिहण्याच्या निमित्ताने त्यांना भेटायला गेलो होतो. शरीर अंथरुणाला खिळलेलं होतं. ९४ वय होतं. त्यांच्या पत्नी सुहासिनी हेगडे आणि मुलगा राजू हेगडे यांनी त्यांना सांगितलं कपिल पाटील आला आहे. मला म्हणाले, 'तुझ्या गावची वरोरची शाखा मी सुरू केली. तुझे वडील हरिश्चंद्र पाटील आणि काका लक्ष्मण पाटील माझ्याच शाखेत होते.' ७० हून अधिक वर्ष झाली असतील. आठवण इतकी लख्ख ताजी. मी विस्मयचकित होऊन पाहतच राहिलो.लीलाधर हेगडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यातील त्यांचं योगदान मोठं होतं. स्वातंत्र्य, समता आणि मानवता या मूल्यांसाठी निनादणारा लीलाधर हेगडे यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईत सांताक्रूझच्या झोपडपट्टीत साने गुरुजींच्या नावाने त्यांनी उभं केलेलं आरोग्य मंदिर आणि शाळा हे हेगडेंच्या स्मृती अमर करणार आहेत. सारं आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं. मृत्यूनंतरही देहदान केलं.

शाहीर लीलाधर हेगडे यांना विनम्र श्रद्धांजली!
- कपिल पाटील


३० ऑक्टोबर २०२१

Friday 15 October 2021

भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीतछगन भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत पोचलं आहे.

सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो. पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी?

या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं आहे.

भुजबळांच्या वाट्याला तर हलाहल अधिक आलं. न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मरणाला हात लावून ते परत आले. ती त्यांची विजिगीषू वृत्ती प्रत्येक संघर्षात दिसते.

सीमावासियांच्या सत्याग्रहात वेषांतर करून कर्नाटकात शिरण्याचं त्यांनी दाखवलेलं धाडस शिवसेनेचा सर्वात फायर ब्रँड नेता म्हणून त्यांना ओळख देऊन गेलं. पण त्याहून मोठं बंड त्यांनी केलं, ते मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी. ज्यांच्यावर श्रद्धा आणि निष्ठा आजही आहे, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ त्यांनी सोडली. ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना त्यांनी पक्ष निष्ठेपेक्षा अधिक महत्त्व दिलं. मंडल आयोगासाठी त्यांनी देशभर संचार केला. संघर्ष केला. राज्याराज्यात ओबीसींचे मेळावे घेतले. आज देशातील ओबीसींचे ते एक सर्वात मोठे नेते बनले आहेत. आणि जातीनिहाय जनगणनेचे पुढारकर्तेही.


मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे शिल्पकार आणि ओबीसींचे सर्वांत आदरणीय नेते शरद यादव यांनीच 'ओबीसींची उद्याची आशा आणि एकमेव उमेद' म्हणून छगन भुजबळांचा नुकताच गौरव केला. देशातील ओबीसी चळवळीच्या नेतृत्वाची धुरा शरद यादव यांनी जणू भुजबळांच्या खांद्यावर टाकली.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यामध्ये भुजबळांचा वाटा मोठा आहे. नामांतरासाठी बहुजन समाजाच्या मनपरिवर्तनात त्यांनी केलेली कामगिरी कुणीही नाकारणार नाही.


भुजबळांबद्दल अनेक अपसमज पसरवले गेले. अपसमजाचे ते अनेकदा शिकार झाले. गांधी विरोधकांना त्यांनी उपरोधाने मारलेला टोला त्यांनाच त्रासदायक ठरला होता. मराठा आरक्षणाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. मात्र ते करताना कटुता येऊ नये आणि मराठा आरक्षणही सफल व्हावं यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांचा गैरअर्थ काढला गेला.


ते स्वतःच काल म्हणाले तसं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होऊ शकले असते. पण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी शरद पवारांनी जी जोखीम उचलली त्याचवेळी भुजबळांनी आपल्या निष्ठा शरद पवारांना वाहिल्या. ज्या मुद्द्यांसाठी त्यांनी सेना सोडली त्यांच मुद्द्यांसाठी त्यांनी शरद पवारांना साथ दिली. आणि त्याच मुद्दयांसाठी मुख्यमंत्री पदाच्या शक्यतेचाही मोह धरला नाही. इतिहासात याची दखल महाराष्ट्राच्या इतिहासाला घ्यावी लागेल. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीलाही त्यांच्या या त्यागाची दखल घ्यावी लागेल.


छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


- आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती

Tuesday 5 October 2021

जागतिक शिक्षक दिन, सरकारला आठवणसारं जग आज (५ ऑक्टोबर) जागतिक शिक्षक दिवस साजरा करत आहे. भारताप्रमाणे अनेक देशात शिक्षक दिन साजरा होतो. प्रत्येकाची तारीख वेगळी असते. भारत आणि महाराष्ट्र सरकार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात. शिक्षक भारती, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले (सहशिक्षिका फातिमा बी) यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस, शिक्षक दिन म्हणून साजरा करते.

शिक्षक दिन आला की सगळ्यांना गुरु ब्रम्हा आठवतो. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात. UNESCO ने ५ ऑक्टोबरचा जागतिक शिक्षक दिवस केवळ शुभेच्छांसाठी ठरवलेला नाही. १९९४ पासून जगभरच्या १०० देशात हा दिवस साजरा होतो, तो केवळ शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी नाही.

UNESCO, ILO, UNICEF आणि Education International यांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे, ''On World Teachers’ Day, we are not only celebrating every teacher. We are calling on countries to invest in them and prioritize them in global education recovery efforts so that every learner has access to a qualified and supported teacher. Let’s stand with our teachers!''

यावर्षीची थीम आहे, 'Teachers at the heart of education recovery.' कोविडच्या अत्यंत कठीण काळात शिक्षकांनी शिक्षण पोचवण्यासाठी जो महाप्रयास केला त्याचं कौतुक करणं आणि त्याला मान्यता देणं, हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांचं वेतन, त्यांचा दर्जा, त्यांची प्रतिष्ठा याकडे यानिमित्ताने लक्ष वेधलं जावं. उच्च अर्हता, क्षमता आणि प्रेरित शिक्षक समाजाला मिळावेत अशी UNESCO ची अपेक्षा आहे.

आपल्याकडे आपत्ती असो, कोविड असो किंवा जनगणना असो. निवडणुका, सर्व प्रकारची सर्वेक्षणं अगदी प्राण्यांची गणना असली तरी शिक्षकांना कामाला जुंपलं जातं. कोविडची ड्युटी करताना किती शिक्षकांनी प्राण आहुती दिली. अजूनही त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही. त्याची किंमत न करता शिक्षक जणू फुकट पगार खातात अशी भाषा केली जाते, तेव्हा दुःख होतं.

शिक्षकांना २०टक्के पगार द्यायचा की ४० टक्के पगार द्यायचा, घोषित करायचं की अघोषित करायचं याचा काथ्याकुट वित्त विभाग करतं तेव्हा दुःख होतं. शिक्षण सेवक, नवीन शिक्षक भरती, जुनी पेन्शन, रात्रशाळा, वेळेवर पगार, अतिरिक्त शिक्षक समायोजन, शिक्षक बदली, अर्धवेळ शिक्षक, आयटी शिक्षक, अंगणवाडी ताई यातल्या शोषणावर सरकार बोलायला तयार नाही. आता भरीस भर केंद्र सरकारचं नवीन शिक्षण धोरण येतंय.

आपल्या बजेटमध्ये पूर्वी आरोग्यावर जीडीपीच्या अर्धा टक्के खर्च होत असे आणि शिक्षणावर अडीच टक्के. कोविडमुळे आरोग्य सुधारणा होऊ लागल्या आहेत. पण आरोग्य सेवकांचं शोषण मात्र थांबलेलं नाही. तीच स्थिती शिक्षणाची आणि शिक्षकांची. त्यात सुधारणा व्हावी हीच या जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्त अपेक्षा. आणि शिक्षकांना शुभेच्छा!


- कपिल पाटील

सेव्हन हिल्स हॉस्पिटल, मुंबई
दि. ०५ ऑक्टोबर २०२१