Tuesday 2 June 2015

गांधी, गोडसे आणि गुर्जर



गांधी मला 
छत्रपती शिवाजी विडीचे
झुरके घेत फोरासरोडला
580 नंबरच्या कमऱयात
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही
नावाच्या रांडेकडे भेटला

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या गांधी मला भेटलाया कवितेतल्या या ओळी आहेत. या ओळी वाचल्यानंतर प्रथमदर्शनी कुणीही अस्वस्थ होईल. या कवितेत आणखी काही ओळी आहेत. याहून प्रक्षोभक. खरं तर त्या उद्धृत करून या लेखाची सुरूवात करता आली असती. पण प्रकरण अजूनही कोर्टात आहे. सुप्रिम कोर्टानेच ते लातूरच्या कोर्टात चालवायला सांगितले आहे. सुप्रिम कोर्टाने आणखी एक प्रश्न विचारला आहे की, गांधींची प्रतिमा अशा शब्दप्रयोगांसाठी वापरली गेली पाहिजे का? लातूरच्या कोर्टात वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितेत गांधी नावाच्या तोंडी वापरले गेलेले शब्द अश्लिल-असभ्य आहेत किंवा कसे आणि महात्मा गांधी नावाच्या राष्ट्रपुरुषाची प्रतिमा त्यासाठी वापरता येईल का? या मुद्द्यावरच ही केस चालणार आहे. 1984 सालच्या कवितेवरून 1994 मध्ये वाद सुरू झाला. तालुका कोर्टातून हायकोर्ट आणि हायकोर्टातून सुप्रिम कोर्ट असा प्रवास करत पुन्हा लातूरच्या फौजदारी कोर्टात ही केस चालणार आहे.

सुप्रिम कोर्टाच्या निकालाबाबत टीका करता येत नाही, असा एक आपल्याकडे समज आहे. तो चुकीचा आहे. सुप्रिम कोर्टही चुका करू शकतं आणि सुप्रिम कोर्टाच्या निकालावरही योग्य ती प्रतिक्रिया देण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. शाहबानो प्रकरणात सुप्रिम कोर्टाचा निकाल कायद्यानुसार उचित होता. परंतु तो निकाल देताना सरन्यायाधीशांनी केलेल्या भाषणाने त्या निकालावर बोळा फिरवला. त्यामुळं देशाचं राजकारण अत्यंत विघातक दिशेने वळण घेतं झालं. राममंदिराचं टाळं उघडण्यापासून बाबरी मशिदीला शहीद करण्यापर्यंतच्या जात- जमातवादी राजकारणाला आमंत्रण देण्याचं काम त्या भाषणाने केलं.

गांधी मला भेटलाही कविता सुप्रिम कोर्टाच्या परिभाषेत कशी अनुवादित झाली, किती समजली गेली हा वादाचा प्रश्न आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्या न्यायपीठावर आहे तेथूनच त्या स्वातंत्र्यापुढे प्रश्नचिन्ह लावण्याचं काम सुप्रिम कोर्टाच्या या आदेशानं झालं आहे. न्यायव्यवस्थेबद्दल आदर बाळगून विचारलं पाहिजे की, सुप्रिम कोर्टाचा हा आदेश न्याय देण्याच्या बाजूने आहे की त्या आदेशाप्रमाणे आधीच ठरवून निर्णय द्यायचा आहे, याचं उत्तरही मिळायला हवं.

कवी, त्याची कविता आणि त्याचं आविष्काराचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य न्यायसंकटात असतानाही 71 वर्षांचा हा कवी ठामपणे उभा आहे, गांधींच्याच निग्रही सत्याग्रही भूमिकेसारखा. ती पोस्टर कविता सर्वप्रथम प्रकाशित करणारे प्रासचे प्रकाशक ज्येष्ठ साहित्यिक अशोक शहाणे, कविता पुन्हा छापणारे देविदास तुळजापुरकर या सर्वांना सलाम करायला हवा. गुर्जरांना या निमित्ताने फोन केला तेव्हा त्यांनी स्वतहून आठवण दिली की, ही पूर्ण पोस्टर कविता आज दिनांक या सायं दैनिकात मी छापली होती. तेव्हाही काही प्रतिक्रिया आल्या, परंतु बहुसंख्य वाचकांनी ती कविता समजून घेतली. गुर्जरांची भाषा आणि त्यांचे शब्द हे पठडीतले, परंपरेतले नाहीत. सोवळेपणाचं ढोंग त्यांच्या भाषेला नाही. महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसेने केल्यानंतर या देशातील सामाजिक, राजकीय पतनाचं जळजळीत वास्तव तितक्याच जळजळीत शब्दात त्यांनी व्यक्त करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. त्यांची कविता कोर्टात नेली कुणी? गांधीवाद्यांनी नाही. त्यांनी त्यांच्या कवितेचं स्वागत केलंय. मात्र गांधी हत्येचं समर्थन करणाऱया गोडसे गोटातली पतीत पावन संघटना अश्लिलतेच्या आणि प्रतिमा भंजनाच्या आरोपाखाली कोर्टात गेली आहे. गांधी हत्येचं उघड समर्थन करणारं मी नथुराम गोडसे बोलतोयहे नाटक गेली 19 वर्षे प्रायोजित करणाऱया गोटाकडून या कवितेला कोर्टात खेचलं गेलं आहे. त्यामागचं राजकारण उघड आहे.

महात्मा गांधींना नेताजी सुभाषबाबूंनी राष्टपिता म्हटलं. हिंदुत्ववादी तसं म्हणत नाहीत. गांधींना विरोध करण्याचा, त्यांचा विचार आणि त्यांचा मार्ग यावर टीका करण्याचा संविधानिक अधिकार गांधी विरोधकांना आहे. टीका कितीही टोकाची असो, तिचं स्वागत केलं पाहिजे. परंतु याचा अर्थ हत्येचं, गुन्हेगारी कृत्याचं उघड समर्थन करणं आणि भारतीय संविधानिक मूल्यांना सुरुंग लावणं, याचं स्वागत कसं करणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असणारी काही मंडळी आपलं सोवळेपण जपण्यासाठी हत्येच्या कृत्याचं उघड समर्थन करणारं नाटकही चाललं पाहिजे असं म्हणतात, तेव्हा ते नेमके कोणाच्या बाजूने असतात? नथुराम गोडसेला त्याची बाजू मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य न्याय संस्थेने दिलं. ‘गांधी हत्या आणि मीहे गोपाळ गोडसेचं पुस्तकंही छापण्याचं स्वातंत्र्य याच व्यवस्थेनं दिलं. संविधान अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं. दुसऱयाचं अस्तित्व पुसून टाकण्याचं, दुसऱयाचं जीवन संपवण्याचं स्वातंत्र्य देत नाही. दुसऱयाचं स्वातंत्र्य संकटात घालण्याचं स्वातंत्र्य लोकशाही अधिकारात बसत नाही. श्रद्धेचं आणि धर्म चिकित्सेचंही स्वातंत्र्य देतं. पण धर्मश्रद्धांवर घाला घालण्याचं स्वातंत्र्य देत नाही.

जर्मनीमध्ये हिटलरच्या समर्थनावर कायद्याने बंदी आहे. नाझी प्रतीकं आणि घोषणा वापरण्यावरही बंदी आहे. जर्मनीचा क्रिमिनल कोड Strafgestzbuch section 86a इतका स्पष्ट आहे की फॅसिझमला बारिकशी फट द्यायला त्यांचा कायदा तयार नाही. आमच्याकडचे तथाकथित सोवळे अभिव्यक्ती लोकशाही स्वातंत्र्याच्या नावाखाली फॅसिझमच्या स्वागताला आणि समर्थनाला उभे असतात. गोडसे आणि गुर्जर यांना एकाच तागडीत मोजण्याचा हा प्रकार सुद्धा तितकाच भयंकर आहे.

गांधी मला वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
10 बाय 12 च्या खोलीत
6 बाय 2 1/2 च्या बाजल्यावर भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला -
सत्यापासून सौंदर्य वेगळं असूं शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारां मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनि कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे

वसंत दत्तात्रय गुर्जर यांची ही कविता ज्यांनी वाचली असेल तो कधीही या कवितेला गांधी विरोधी म्हणणार नाही. अश्लिल-असभ्य म्हणणार नाही.

कविता पुढे म्हणते -

गांधी मला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या
536.6 किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला -
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास उतरल्यास त्याचा त्याग करा.
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं -
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
6 वाजून 55 मिनिटं ते 7 वाजून 2 मिनिटांपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत...

येथून पुढे गांधीं नंतरच्या भारतातल्या दांभिकतेचा मुखवटा ही कविता टराटरा फाडत नेते. गांधींच्या मूल्यांचा खून निरंतर करत राहणारे अनेक गोडसे कवितेत भेटत राहतात. गांधी नावानेच.

गांधी नावाचा मुखवटा घेत प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर भेटणारा गोडसे वसंत गुर्जरांनी उभा केला आहे. गोडसेचे निर्मम, निर्दय कृत्य फक्त 30 जानेवारी 1948लाच शेवटचे नव्हते. स्वातंत्र्योत्तर समाजातलं भ्रष्ट पतन, घृणास्पद दांभिकता यावर प्रहार करत गुर्जरांचे जळजळीत शब्दप्रयोग एका पाठोपाठ येत राहतात. गांधींचाच मुखवटा घेउढन येणाऱया अशा नथुराम गोडसेवर त्या शब्दांच्या गोळ्या डागत वसंत गुर्जरांची कविता बोलत राहते. कवितेतला असा भन्नाट प्रयोग यापूर्वी कधीही झाला नव्हता. म्हणून भालचंद्र नेमाडेंनांही ही कविता मैलाचा दगड वाटली.

या देशात जात-धर्म-प्रांत द्वेषाची चूड लावत बोलणाऱया राजकीय, धार्मिक नेत्यांना लोकशाही अधिकाराचं स्वातंत्र्य आहे. वसंत दत्तात्रेय गुर्जरांना मात्र देशाचं सर्वोच्च न्यायालय आरोपीच्या पिंजऱयात उभं करतं

कपिल पाटील 
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद 
अध्यक्ष, लोक भारती 

________________________