Monday 22 May 2017

तर रात्रशाळा वाहून जातील.

वाचक मित्रांनो,
रात्रशाळा चळवळीतून मी पुढे आलो. रात्रशाळा शिक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. ते आज संकटात आहेत. संकटात टाकले गेले आहे. रात्रशाळांचं अस्तित्व संपवलं जात आहे. रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह सूर्यकांत देशपांडे यांचे हे पत्र.
- आमदार कपिल पाटील 

-------------------


हुशार बिरबलाने एकदा खुद्द बादशहांसाठी सोन्याचा सूळ बनवला होता. सगळया जावयांना सूळावर चढवण्याचा आदेश होता. सोन्याचा सूळ पाहताच अकबराने आदेश मागे घेतला. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने खरोखरच सोन्याचा सूळ बनवला आहे. रात्रशाळांना खरोखरच फाशी देण्यासाठी.

राज्यातील 176 रात्रशाळामधल्या शिक्षकांना दिलासा देत असल्याचा दावा सरकारने 17 मे 2017 च्या शासन निर्णयात केला आहे. माध्यमांची फसवणूक साहजिकच झाली. जीआर मधली भाषाच इतकी बेमालूम आणि हुशारीने वापरली आहे की, रात्रशाळेतल्या शिक्षकांच्या आणि मुलांच्या हितासाठी खूप मोठा निर्णय झाल्याच्या बातम्या आल्या. 

प्रत्यक्षात काय घडलं आहे ? 
रात्रशाळेेतल्या 1010 शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. 28 आॅगस्ट 2015च्या शासन निर्णयाचा फास दिवस शाळांना आधीच लागला आहे. पटसंख्या आणि शिक्षक संचमान्यतेचे नवे निकष इतके विचित्र आहेत की, राज्यातील हजारो शिक्षक सरप्लस झाले आहेत. या जीआरनुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे सर्व भाषा विषय एकाच शिक्षकाने आता शिकवायचे आहेत. गणित आणि विज्ञान एकाच शिक्षकाने शिकवायचे आहे. माध्यमिक शिक्षण उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. तो जीआरही रात्रशाळांना लावण्यात आला आहे. पण 17 मेचा ताजा जीआर तिथेच थांबलेला नाही. दिवस शाळेतील अनुभवी तज्ज्ञ शिक्षक अवघ्या तीन तासात रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना गोळीबंद शिक्षण देतात. दिवसभर राबणाऱ्या कष्टकरी विद्यार्थ्यांना मोठं होण्याची संधी रात्रशाळांमुळेच मिळते. ब्रिटीश काळापासूनची ही पध्दत या नव्या जीआरने बंद केली आहे. या सर्वच्या सर्व 1010 शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. त्याहून आक्षेपार्ह म्हणजे हे शिक्षक लूट करत असल्याची अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली आहे. 

नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि सरकारमधले समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे हे दोघेही रात्रशाळांचे विद्यार्थी. त्यांची प्रतिक्रिया उत्सफूर्त आणि संतप्त होती. दोघंही स्वतःहून म्हणाले कपिल पाटील आम्ही तुझ्या सोबत आहोत. आपण जाऊ. मुख्यमंत्र्यांना भेटू. ते न्याय देतील. कपिल पाटील रात्रशाळा चळवळीतूनच पुढे आलेले. त्यांच्यासह सर्वश्री डाॅ. सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देषपांडे आणि विक्रम काळे हे सर्व शिक्षक आमदार एकत्रितपणे त्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अरूण खाडीलकरांची गोष्ट माहित होती. त्यांनी शब्द दिला आहे. 

रात्रशाळांमधील 300 शिक्षक व कर्मचारी असे आहेत की, जे दिवसाच्या शाळेत नोकरीला नाहीत. त्यांना संरक्षण आणि पूर्णवेळ पगार मिळणार असा तद्दन खोटा पण गोड समज या जीआरने करून दिला आहे. प्रत्यक्षात त्यांना अर्धवेळ पगार मिळणार आहे. कार्यभार पुरेसा नसेल तर त्यांना क्लाॅक अवर बेसीसवर मानधन मिळणार आहे. 28 आॅगस्टच्या जीआर नुसार दिवस शाळांइतकी पटसंख्या जमली नाही तर रात्रशाळाच बंद पडणार आहेत. त्यांचं समायोजन होणार कुठे ? रात्रशाळा मुख्याध्यापक संघ आणि शिक्षक भारतीने अशा अर्धवेळ शिक्षकांना दिवस शाळांच्या रिक्त पदांवर थेट नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. पेन्शन, प्राॅव्हिडंड फंडाची मागणी केली आहे. या मागण्या राहिल्या दूर त्यांना पूर्णवेळ रात्रशाळेतच संरक्षण दिल्याची भाषा करून हातावर अर्धा किंवा तासिकेचा पगार ठेवला जाणार आहे. 

रात्रशाळांतल्या शिक्षकांच्या पगारावर 35 कोटी रूपये खर्च होत असल्याचं सांगून त्या शिक्षकांना कमी करून हा खर्च वाचवणार असल्याचा दावा जीआरने केला आहे. तो तद्दन खोटा आहे. रात्रशाळेतल्या मुलांना शिकवण्यासाठी खर्चाची भाषा सरकारने करू नये, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला. 

विलासराव देशमुख यांनी शिक्षणमंत्री व नंतर मुख्यमंत्री असताना रात्रशाळांना भरघोस मदत केली होती. निकषात सवलत दिली होती. मुलांना पुस्तकं मोफत दिली होती. संचमान्यता व पटसंख्येत सवलत दिली होती. रात्रशाळा शिक्षकांना दिलासा आणि न्याय दिला होता. त्या सगळया सवलती शिक्षण विभागाने आता काढून घेतल्या. जूनचा पावसाळा सुरू होण्या आधीच रात्रशाळा वाहून जाणार आहेत. फक्त मुख्यमंत्री ते थांबवू शकतात.  


सूर्यकांत देशपांडे, 
कार्यवाह, रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ