Tuesday 26 November 2013

डॉ. बापूसाहेब रेगे यांना आदरांजली.

श्रद्धांजली
केवळ गुणवत्ता यादीतच नाही तर मूल्यशिक्षणात, आधुनिक ज्ञान विज्ञानात आणि जगाच्या स्पर्धेत बालमोहन या नावाने डॉ. बापूसाहेब रेगे शिक्षणाच्या क्षेत्रात एक अमिट मुद्रा सोडून गेले आहेत. The best School throughout India and Europe असा अभिप्राय अमेरिकेतून आलेल्या 25 शिक्षण तज्ज्ञांनी बालमोहनला भेट दिल्यानंतर दिला  होता. दादासाहेब रेगे यांनी लावलेलं हे रोपटं डॉ. बापूसाहेबांनी नावारुपाला आणलं. शाळेच्या दारातच महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचे केवळ त्यांनी पुतळे बसविले असं नाही तर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संस्कार देणारी ही शाळा आहे.

दादर जसं शिवाजी पार्क , चैत्यभूमी यामुळे ओळखलं जातं तसं ते बालमोहन मुळेही ओळखलं जातं.दादरच्या संस्कृतीचं  बालमोहन हे प्रतिक मानलं जाऊ लागलं ते बापूसाहेब रेगे यांच्या असंख्य शैक्षणिक प्रयोगांमुळे सरकारने सुरु करण्याआधीच त्यांनी पहिलीपासून इंग्रजी, कॉम्पुटर  शिक्षण, राष्ट्रीय एकता सफरी, एक सुर एक ताल असे प्रयोग आपल्या शाळेत सुरु केले . मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दादर  हादरलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेतल्या सर्व मुलांना एकाचवेळी धीरोदात्तपणे माणसुकीच्या  शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु... हे समुह गान गायला लावलं होतं.

गेल्या  2 फेब्रुवारीला शिक्षण हक्क वृत्र्ती समितीच्या वतीने मुंबईतल्या सर्व शिक्षकांनी आणि शाळा चालकांनी एकत्र येऊन प्रचंड मोर्चा काढला होता. त्या मोर्च्याची सुरवात बाल मोहनच्या पायरीवरून  झाली होती. त्या मोर्च्याची सुरवात करुन द्यायला  83 वर्षाचे डॉ. बापूसाहेब रेगे प्रकृती ठिक नसतानाही खाली उतरले होते. त्यांना स्वतःला मोर्च्यात चालायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. त्यांच्यावतीने त्यांचे चिंरंजीव गिरीष रेगे मोर्च्यात शेवटपर्यंत अमोल ढमढेरे, प.म.राऊत यांच्या सोबत चालत आले.

बापूसाहेब रेगेंच्या आठवणी दादार आणि शिवाजी पार्कच्या परिसरात कायम दरवळत राहतील.

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Sunday 17 November 2013

सचिन खेळत होता, तेव्हा अख्खी इंडिया खेळत होती.

अखेर सचिनने मैदानाचा निरोप घेतला. डोळ्यात त्याच्या तेव्हा अश्रू होते. स्टेडियम स्तब्ध होतं. अख्ख्या इंडियाच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं. कारण सचिन खेळतो तेव्हा इंडिया खेळत असते. सचिन आऊट होतो तेव्हा इंडिया आऊट होतो. प्रत्येक भारतवासीयाचं त्याच्यावर प्रेम आहे. म्हणूनच त्याचा हा निरोप चटका लावतो. जणूकाही आपणच आता खेळणार नाही आहोत. खेळायचा आनंद आता घेता येणार नाही. आनंद इतक्या लवकर थोडाच रिटायर करायचा असतो. प्रत्येक भारतीयाचं सचिनशी असलेलं हे विलक्षण नातं जोडलं होतं ते सचिनेच. परवा अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सचिनने 10 रन्स केल्या, 50 केल्या काय किंवा सेंच्यूरी ठोकली काय, ती प्रत्येक रन जणू आपण स्वतः करतो आहोत असं प्रत्येक भारतीयाला वाटतं.

असं नातं आजपर्यंत कुठल्याही खेळाडूचं भारतात निर्माण झालं नव्हतं. प्रत्येकजण त्यात स्वतःला पाहतो. सचिन म्हणून खरा भारतरत्न आहे.

खेळाडू म्हणून तो किती महान आहे, हे सांगण्याची आपली पात्रता नाही. पण तो माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. 200 अनाथ मुलांचा तो सांभाळ करतो, म्हणून हे सांगत नाही. त्यांच्या सासूबाई अनाबेल मेहता यांच्या संस्थेत आणि तसंच अनेकांना तो मत करतो, म्हणून तो केवळ मोठा नाही. क्रिकेटचं  पिच तयार करणार्‍या आणि मैदानाचं रखरखाव ठेवणार्‍या माळ्यांची तो आठवणीने विचारपूस करतो. आऊट होणार्‍या सेहवागवर कोच जॉन राईटने हात उगारला म्हणून सौरभने माफी मागायला सांगितली. तेव्हा वडिलांच्या जागी असणार्‍या राईट सरांकडून माफी मागायला लावणं बरं नाही, हे सचिनच सांगू शकला. शेवटचा सामना बघायला आपल्या आईबरोबर आपल्या गुरुलाही आणण्याची व्यवस्था त्याने केली. पण आचरेकर सरांच्या आजारपणात त्यांची सगळी काळजी आणि व्यवस्था एखाद्या मुलाप्रमाणे सचिननेच केली. अडचणीतल्या अनेक सहकारीक्रिकेटपटूंना व मित्रांना सचिनने मतीचा हात अनेकादा दिला. तोही कोणतीही अपेक्षा न करता.

तो कोणत्याही वादात जात नाही. कुणाशी भांडत नाही. अगी लताबाईंसारखी प्रतिक्रिया देऊन अडचणीतही येत नाही. मी मराठी आहे याचा अभिमान तो बाळगतो. पण सर्व प्रथम भारतीय आहे, असं छातीठोक सांगायलाही तो कचरत नाही. त्याचा एक वेडा चाहता  आहे, सुधीरकुमार चौधरी मुझफ्फर नगर, बिहारचा. त्याच्याही आनंदाला तो आवर्जून साथ देतो. सचिन रमेश तेंडुलकर या माणसाचं हे असं नातं अख्ख्या देशाशी जोडलेलं आहे. पूर्वी गांधी, नेहरु आणि मौलाना आझाद यांच्या सारखे नेते देश जोडण्याचं काम करत. आताचे राजकारणी देश तोडण्याचं काम करतात. आता देश जोडण्याचं काम फक्त एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि सचिन तेंडुलकर सारखे महान खेळाडूच करतात. 

भारत रत्न एकाचवेळी सचिन आणि सी. एन. आर. राव यांना जाहीर व्हावा, याचा म्हणूनच अधिक आनंद आहे. 

आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com



Wednesday 2 October 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला? आणि खूनी अजून का सापडत नाहीत?





देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवाक्षर सुद्धा कधी काढलं नाही. केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचं काम हा महान सारस्वत करत होता. तरीही त्यांचा खून का झाला? दीड महिना उलटून गेला अजून खूनीही सापडत नाहीत.

डॉ. दाभोलकर हे थेट साने गुरूजी परंपरेतले. सौम्य प्रवृत्तीचे. तरीही सनातन्यांना ते सहन झालं नाही. गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेकडो गावात त्यांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम करायला लावून मंडळामंडळातली व गटागटातली भांडणे मिटवली. गणपती विसर्जन प्रूषणमुक्त व्हावं, नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा यासाठीसुद्धा ते मोहिम चालवत होते. हे  दाभोलकर करू शकत होते कारण श्रद्धांनाही विधायक वळण देता येतं यावर त्यांचा विश्वास होता. सत्य, शिव, सुंराची प्रार्थना म्हणणार्‍या साने गुरुजी परिवारातले ते होते.

ज्या अंधश्रद्धा निर्मूलन बिलाला सनातनीच नव्हे तर राज्यातल्या विरोधी पक्षांनीही जोरदार  विरोध केला, त्या विधेयकात 'श्रद्धा' हा शब्दच नाही. इतकचं कशाला 'अंधश्रद्धा' हा शब्दही त्यात नाही. धर्माचा, कोणत्याच धर्माचा तर मागमूस सुद्धा नाही. तरीही ओरड का होते आहे?

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा हा मूळ ठराव तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होतं त्या काळातला. 18 वर्षांत कायद्याचा मूळ मसुदा पातळ झाला आणि विरोधाची धार मात्र तीव्र. छोट्या निरागस मुलांना पळवून त्यांचा नरबळी द्यायचा. त्यासाठी उद्दुक्त करायचं. मुलींचं आणि स्त्रियांचं लैगिंक शोषण करायचं. म्हणजे फसवून, स्वतः देवपुरूष असल्याचे सांगत थेट बलात्कार करायचा. तंत्र मंत्राच्या नावाखाली अत्यंत विकृत अघोरी प्रथा लादायच्या. हा ज्यांचा धंदा बनला होता, ते कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत नामानिराळे होत राहिले. मानवत खून खटल्यात मारणारे फासावर गेले, मारायला लावणारे कमी शिक्षेने निसटले. हे सारं रोखण्यासाठी कायदा का नको? दाभोलकर फक्त तर एवढंच मागत होते.

तरीही दाभोलकरांचा जीव घेण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली.

साने गुरूजींच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा माणूस अधिक प्रभावी असतो. श्रद्धावानांच्या हृयाला हात घालू शकतो. म्हणून सनातन्यांना तो डेंजरस वाटतो. देव, धर्म आणि श्रद्धा हा ज्यांच्यासाठी धंदा असतो, शोषणाचं साधन असतं, आणि त्याहीपेक्षा राजकारणाचं हत्यार असतं त्यांना दाभोलकर अधिक धोकादायक वाटतात.

तुकाराम त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. ज्ञानेश्वरांचा म्हणून तर छळ झाला. जीवंतपणी विवेकानंद  त्यांना अडचणीचे होते. महात्मा गांधींना मारणार्‍या नथुरामाची परंपरा नवी नाही. धर्माचं दुकान चालवणार्‍यांना खरा धार्मिक अडचणीचा असतो. इहवादी असूनही दाभोलकरांची वाट खर्‍या धार्मिकासारखी होती.

बहुसंख्य हिन्दू समाजाला हे चांगलंच उमजून आहे. तो श्रद्धावान आहे. धर्मपरायण आहे आणि म्हणूनच तो सनातन्यांपासून कायम दूर राहिला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांना छळणार्‍यांची वृत्ती त्यांना माहित आहे. त्यांची नावंही लक्षात राहू नयेत, इतका त्यांना त्याचा तिटकारा आहे. ज्ञानोबा माऊली एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर मात्र वारकर्‍यांच्या हृयात युगानुयुगे सुरु आहे. उदार हिंदू बधत नाही. राजकीय हिंदुत्वाला साथ देत नाही. म्हणून हिंदुंच्या मनात राडा करण्याचा सनातन्यांचा डाव गेल्या दोन अडीच शकांपासून सुरु आहे. बाबरी मशिदिच्या विध्वंसापासून त्याची सुरवात झाली.

नथुराम समर्थनाचं नाटक याच काळातलं आहे, जे अजून सुरु आहे. हे नाटक यासाठी सुरु आहे, की माणसाला मारण्याचं समर्थन करता यावं. खुद्द महात्मा गांधींना मारण्याचं समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगमंचावर गेली अनेक वर्षे होत आहे. केवळ नाटकातूनच नाही अनेक माध्यमातून द्वेषाची होळी पेटवत त्यात उदारता आणि बंधुभावाच्या समिधा टाकल्या जात आहेत. त्यामुळे दाभोलकरांचाही खून पचवता येईल हा त्यामागचा त्यांचा कयास होता.

अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा, दाभोलकरांना गोळ्या लागून मृत्यू आला, ही ईश्वराची कृपाच म्हणायची, असं जयंत आठवले उघडपणे म्हणतात आणि हिंदूंच्या विरोधात विधेयक कशाला अशी ओरड त्यांचं छूपे समर्थन करणारे उजवे पक्ष करतात. वटहुकुम निघाल्यानंतर राज्यात दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत जादुटोणा करणार्‍या बंगाली बाबांना पोलिसांनी अटक केली, ते हिंदू नाहीत. मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असा कायदा करा म्हणणार्‍यांना ही चपराक ठरावी. हे बंगाली बाबा मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात चमत्कार आणि जादूटोण्याला मान्यता नाही. माणसाला चमत्कार करता येत नाही आणि मीही त्यामुळे चमत्कार करु शकत नाही, असं खुद्द मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणार्‍यांना सुनावलं होतं. तरीही बंगाली बाबा जादूटोण्याच्या नावावर लुटालुट करतात, हे काही लपून नाही. कायद्याला धर्म नसतो. पण खोट्या प्रचाराचा धुरळा लोकांच्या डोळ्यात उडवल्याशिवाय खून करता येत नाही. महात्माजींचा खून 55 कोटींसाठी केल्याचा असाच तद्दन खोटा आणि बेशरम प्रचार नथुरामीवादी आजही करतात. विधेयक कोणत्याच धर्माच्या विरोधात नसताना ते हिंदू विरोधी आहे, असा खोटा प्रचार अजूनही सुरु आहे, तो दाभोलकरांचा खून करणार्‍या मारेकर्‍यांच्या समर्थनासाठीच.

तालिबानी असोत किंवा सनातनी दहशतवाद हा दहशतवाद असतो. आणि त्यांची पहिली शिकार ते ज्या धर्मातले असतात त्या धर्मातली माणसंच असतात. सीमेपलिकडच्या दहशतवा़द्द्यानी कश्मिरमध्ये आतंक सुरु केल्यानंतर त्यात जान गेलेले बहुतेक मुस्लिमच होते. शेकडोनी नाही हजारोनी. पाकिस्तानच्या सीमाप्रांतात तालीबान्यांनी गोळ्या घातल्या त्या मलाला युसुफझाईच्या डोक्यात. तीने शाळेत जाऊ नये म्हणून.  महात्माजींना मारणारा नथुराम होता. दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालणारे नथुरामीच आहेत.

नथुरामी प्रवृत्ती केवळ गोळ्या घालण्याचं समर्थनच करत नाही, आसारामच्या बाजूनेही उभी असते. नातवंडांपेक्षा लहान मुलींवर अतिप्रसंग करणार्‍या साधुंमधल्या हैवानाना लपवलं जातं, ते परधर्मीयांच्या द्वेषाआड.

नथुरामी ते आसारामी हे आव्हान परतवून लावायचं कसं?

हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मुलनाचा नाही. ढोंगी बाबांच्या अटकावाचा नाही. ज्ञानेश्वर, कबीरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी या ढोंगी बाबांच्या विरोधात 'जळो त्यांचे तोंड' अशी जबरस्त आघाडी उघडलेली आहे. 'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था उद्धवस्त करावीच लागेल. प्रबोधनाची यात्रा अखंड सुरु ठेवावी लागेल. पण त्यातून नथुरामी ते आसारामी हे आव्हान संपुष्टात येणार नाही. हे आव्हान धार्मिक नाही, राजकीय आहे. त्याला राजकीयच उत्तर द्यावं लागेल. 

नथुरामी आणि आसारामी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आसारामला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आसारामसाठी त्यांनी राम जेठमलानी सारखा नामांकित वकील उभा केला आहे. जेठमलानी काय म्हणाले? त्यांनी दोष त्या निरागस मुलीवरच लावला. तिला म्हणे आजार आहे. Girl has disease which draws her to men. म्हणजे त्या मुलीवर जो अतिप्रसंग झाला त्यात आसारामचा दोष नाही मुलीचाच दोष आहे. इतकं निर्लज्ज विधान राम जेठमलानी कसं करू शकतात? पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी भांडणारे भाजपाचे नेते जेठमलानी यांच्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांचा केक कापतात. आणि दुसऱ्या दिवशी जेठमलानी आसरामाचं वकीलपत्र घेतात. याचा अर्थ काय? 

राज्यातले आणि दिल्लीतीले सत्ताधारी (कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले)  स्वतःला सेक्युलर म्हणवत असले तरी नथुरामी ते आसारामी या पिलावळीला त्यांनीही जागोजागी सांभाळले आहे. सत्तेला धोका येईल, तेव्हाच नथुरामी शक्तींकडे ते बोट दाखवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही फासिस्ट नथुरामी शक्तींच्या अटकावात रस नाही. अन्यथा हेमंत करकरे यांनी सुरु केलेली मोहिम या सत्ताधार्‍यांनी थांबवली नसती. महिना उलटल्यानंतरही खूनी सापडत नाहीत याचं खरं कारण हे आहे.

दाभोलकरांच्या हत्येमुळे राज्यातल्या सगळ्याच विवेकशील, संवेनशील नागरिकांच्या मनात उठाव आहे. नथुरामी फासिस्ट शक्तींच्या विरोधात जे जे डावे पुरोगामी आहेत, फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, उदार वारकरी अन सुफी आहेत. हे सर्वच एकत्र येत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर निर्धार होतो आहे. त्यातून पर्यायी राजकारण उभे राहिले तरच  फासिस्ट शक्ती आणि मतलबी सत्ताधारी यांना उत्तर मिळेल. 


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com

Wednesday 21 August 2013

हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान!




















समाजवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा निकराने आणि एकजुटीने मुकाबला केला पाहिजे.

नरबळी आणि अघोरी प्रथा-जादुटोणा यांच्या विरोधातलं विधेयक मंजूरकरण्याचं धाडस सरकार दाखवू शकलं नाही. पण समाजसुधारणेसाठी निरलसपणे झुंजणार्‍या विचारवंताला जिवंत राहू देण्याचा हक्क सरकारने दिला नाही. त्यांची सुरक्षा सरकार करु शकलं नाही. ही संतापाची बाब आहे.

सनातन संघटनांवर सरकारने याआधीच बंदी घालणं आवश्यक होतं. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये नाटकाच्यावेळी झालेला बॉम्बस्फोट, मालेगावचा भीषण 
बॉम्बस्फोट आणि अलिकडचं बोधगया या साखळीतलीच ही घटना आहे. सनातन संघटनांनी दाभोळकरांना दुसरा गांधी करु अशी उघड आणि जाहीर धमकी दिली होती त्याची दखल सरकारने घेतली नाही. गरीब शोषितांसाठी संघर्ष करणार्‍या, अन्यायाच्या विरोधात झगडणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावणारं सरकार जातीयवादी फॅसिस्ट शक्तींना मात्र रोखत नाही. हे पुन्हा एका सिद्ध झालं आहे. त्यामुळे फॅसिस्ट शक्तींचा केवळ निषेध करुन भागणार नाही. या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात निकराने लढावं लागेल. राज्यातल्या सगळ्या विवेकशील नागरिकांनी या शक्तींच्या विरोधात एकजुट झालं पाहिजे. तीच नरेंद्र दाभोळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Tuesday 23 July 2013

मोदी आणि औरंगजेब


                                                                                                                                                                                        Courtesy TOI
शाहजहाँला तुरुंगात टाकल्यावरच औरंगजेबाला सत्ता मिळाली होती. नरेंद्र मोदी यांचा आदर्श औरंगजेबच असावा. पण लालकृष्ण अडवाणी म्हणजे शाहजहाँ नव्हेत. त्यांनी राजीनामा असा फेकला की 'नमोनिया' बुमरँग झालं.


अडवाणी एकटे पडतील. सगळा पक्ष, सगळा देश मोदींच्या पाठी उभा राहिल. ही अटकळ नितीन गडकरी, अरून जेटली, राजनाथ सिंह आणि अशोक सिंघल या चौकडीचीच नव्हती फक्त. मोहन भागवतांचाही तोच कयास होता.

महाभारतातल्या भस्मासुरातली उपमा कोणी नरेंद्र मोदींना दिली. पण नरेंद्र मोदींचा आर्श औरंगजेबच आहे. तीच महत्वाकांक्षा. तोच रस्ता. औरंगजेबाने आपल्या भावांना मारलं. बापाला नाही. नरेंद्र मोदीही औरंगजेबा इतकेच दयाळू आहेत. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जेरबंद केलं की दिल्लीचा दरवाजा आपोआप उघडेल, हा त्यांचा होरा मात्र चुकला. शाहजहाँसारखे अडवाणी दिल्लीचे पातशाह अजून झालेले नाहीत. शाहजहाँची इतर मुलं म्हणजे आपली भावंड औरंगजेबाने मारुन टाकली होती. बादशाह एकटा पडला होता. अडवाणी ना भाजपात एकटे होते ना एनडीएत एकटे आहेत.

मोदी आणि औरंगजेब यांची साम्य स्थळं सांगण्याची फार गरज नाही. दोघांमध्ये एक फरक जरुर आहे. औरंगजेब बादशाह झाला होता आणि मोदी झालेले नाहीत. हा तो फरक नाही. दिल्लीची नाही तर भाजपाची सत्ता मोदींना जरुर मिळू शकेल. रा.स्व. संघाने मोदींना त्यासाठी रस्ता तयार करुन ठेवण्याचं काम सुरु केलं आहे. मात्र भाजपाच्या सत्ताधिशाला देशाची सत्ता मिळतेच असं नाही. जहाल अडवाणींच्या ऐवजी उदार कवीमनाच्या वाजपेयींना देशानं स्विकारलं होतं.

मोदी आणि औरंगजेब यांच्यात फरक आहे, तो राज्यकर्ता म्हणून असलेल्या वृत्तीतला.

हिंदुस्थानचा बादशाह असलेला औरंगजेब आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत कधी हात घालत नव्हता. त्याची कबरही त्याच्या मृत्यूनंतरही तितकीच साधी आणि मातीची राहिली आहे. त्या कबरीवर संगमरवराचा गड कधी चढलेला नाही. त्याचं व्यक्तिगत जीवन त्याने अतिशय साधेपणानं व्यतित वेत्र्लं. असं इतिहास सांगतो. टोप्या विणून तो स्वतःचा खर्च भागवत असे. नरेंद्र मोदी रोज नवं जाकेट घालतात. जाकेट शिवणारा त्यांचा खास टेलर आहे. पॅत्र्शन डिझायनर. आपल्या कपड्यांवर कोणी किती खर्च करायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मायावतींच्या पर्सची आणि जयललितांच्या सॅण्डलस्‌ची चर्चा करायला मिडियाला आवडत असेल तर मोदींच्या जाकेटची का नको. माझा आक्षेप त्यांच्या जाकेटवर किंवा त्यांच्या जीवन शैलीवर नाही. राजकीय व्रत्रैर्याची साम्यस्थळे सांगताना फरकही सांगितला पाहिजे.

म्हातारपणात सत्तेचा हव्यास सुटलेला नाही, अशी अडवाणींवर टिका करणारे अनेक आहेत. परंतु भाजपला 2 वरुन 182 जागांवर नेऊन ठेवणार्‍या त्या पक्षाच्या बापालाच असं एकटं पाडणं भाजपातल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आणि भाजपाशी सुतराम संबंध नसलेल्या करोडो भारतीयांना आवडलेलं नाही. तसं नसतं तर भाजपाचे तमाम नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत अडवाणींच्या पाया जाऊन पडले नसते. मोहन भागवत सरसंघचालक जरुर असतील. पण संघ परिवाराच्या सर्वोच्च चारपाच नेत्यांमध्ये लालवृत्र्ष्ण अडवाणी यांचं स्थान सर्वोच्च आहे, याची कल्पना परिवाराच्या बाहेरच्या फारच थोड्या मंडळींना असेल. अडवाणी वेत्र्वळ संघ परिवाराच्याच सर्वोच्च स्थानी आहेत असं नाही. संघ परिवार देशातला एक प्रवाह जरुर आहे. तो मुख्य प्रवाह नाही. संघाच्या पलिकडचा देश खूप मोठा आहे. विहिरीतल्या बेडकाला बाहेरचं जग माहित नसतं. या बाहेरच्या जगात अडवाणींनी स्वतःचं एक स्थान निर्माण वेत्र्लं आहे. म्हणूनच अडवाणी एकटे पडले नाहीत.

प्रश्न केवळ अडवाणींचा नव्हता. मोदी साहसामुळे आज एनडीएमध्ये पुत्र्ट पडली आहे. अडवाणींना वजा करुन होणार्‍या राजकारणाने एनडीए एक राहू शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ज्या कारणासाठी अडवाणी टोकाचं पाउत्र्ल उचलतात, त्याच कारणावरुन  अन्य सेक्युलर घटकांनी मोदींच्या भाजपाला साथ का द्यावी?  मोदी भाजपाचा उद्या जरुर ताबा घेऊ शकतील. पण देशाचं स्टेअरींग मोदींच्या हाती कधी लागणार नाही. संघ म्हणजे देश नाही. भाजपा म्हणजे देश नाही. मोदी म्हणजे देश तर बिलकुल नाही. हा देश एका जातीचा, एका धर्माचा, एका भाषेचा, एका विचारांचा, एका संस्कृतीचा कधीच नव्हता. हिंदुत्वाच्या, वर्ण वर्चस्वाच्या एका पोषाखात हा देश, त्यांनी किती आटापिटा केला तरी संघ संचलन कधीच करणार नाही. तिथे मोदीचं फासीस्ट नेतृत्व स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही.

मोदींच्या विकास नितीचं या देशातल्या लब्ध प्रतिष्ठीतांमधल्या एका वर्गाला जरुर आकर्षण आहे. मोदी कसे नॉन करप्ट आहेत आणि विकासाचा एक्सप्रेस हायवे फक्त गुजरात मधूनच धावतो अशा कथा रंगवणं कॉर्पोरेट जगताला आणि त्याची बटिक असलेल्या मिडीयाला सोयीचं आहे. पण मोदींचा विकासाचा रस्ता नैसर्गिक संसाधनांच्या विखारी ओरबाडण्यातून, भूमिपुत्रांच्या र्निय विस्थापनातून, शोषितांच्या शोषणातून आणि रक्तरंजित द्वेषातून बांधला गेला आहे.

परवा ते पुण्यात येऊन गेले आणि शिक्षण क्षेत्राचा स्वतःचा तथाकथित अजेंडा त्यांनी जाहीर वेत्र्ला. तेव्हापासून देशातील शैक्षणिक व्रत्रंती जणू गुजरातमध्ये झाली असं चित्र संघ परिवारातला मिडीया रंगवत आहे. पण वस्तुस्थिती अलग आहे. गुजरातचा नंबर महाराष्ट्राच्या खाली आहे. महाराष्ट्र 9व्या नंबरवर आहे. गुजरात 13 व्या नंबरवर आहे. बर्‍याचा कम्युनिस्ट, कधी काँग्रेसच्या ताब्यात राहणार्‍या वेत्र्रळने पहिला नंबर सोडलेला नाही. जीडीपीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. गुजरात खूप मागे आहे. शेती क्षेत्रातलं किमान वेतन महाराष्ट्रात 120 रुपये आहे. बिहारमध्ये 109 ते 114 रुपये आहे. तर गुजरात मध्ये 100 रुपये आहे.

State or

union territory
Crore Rupees 2011-12 nominal GDP
Billions

USD FY11-12 Nov 2012 INR rates
Per capita GDP INR
India
8,353,495
$1,564.96
61,564
Maharashtra
1,248,452
$233.89
101,314
Andhra Pradesh
676,234
$126.61
71,540
Uttar Pradesh
6,76,083
$125.86
30,051
Tamil Nadu
639,024
$119.72
84,496
Gujarat
613,172
$116.14
89,668

गुजरातने सिंचनात आणि उद्योगात महाराष्ट्राच्या पाठोपाठ नक्कीच प्रगती केली आहे. मात्र ही प्रगती केवळ मोदींच्या काळातली नाही. त्यांच्या आधीच्या किमान पाच मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी या विकासाची पायाभरणी केली आहे. त्याचा उल्लेखही मोदी करत नाहीत. जणू त्यांच्या आधी गुजरातमध्ये अंधाराचं राज्य होतं.

नर्मदा सरोवर योजनेचं श्रेय मोदींचे खचित नाही. त्यांच्या काळात ती पूर्णत्वाला जाते आहे इतकंच. पण त्या नावावरही निर्लज्ज खोटेपणाची मोदी कमाल करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला 400 कोटी रुपये किमतीची मोफत वीज मिळू शकत नाही. असा आरोप त्यांनी नुकताच पुण्यातल्या सभेत वेत्र्ला. त्यांच्या आरोपाला नर्मदा बचाव आंदोलनानेच जे उत्तर दिलं आहे, ते लोकसत्तेत प्रसिद्ध झालं आहे. खाली ते दिलं आहे. मोदींचा खोटेपणा सिद्ध करण्यास ते पुरेसं ठरावं.

गुजरात तिसर्‍यादा जिंकल्यानंतर थेट पंतप्रधानकीचं स्वप्न आता मोदी पाहत आहेत. पी.एम. मोदी म्हणून त्यांचं मार्केटींग सुरु आहे. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून 15 हजार माणसं वाचवल्याचा दावा त्यांनी केला. जे काम सैन्याला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मुंबईतलं त्यांचं भाषण आणि त्यांचा अ‍ॅटिट्युड ज्यांनी पाहिला असेल त्यांनी त्यातून झिरपणारा नथुरामी अहंकार जरुर पाहिला असेल. उदारतेची, राम राज्याची झुल त्यांनी किती पांघरु देत, त्यांच्यात दडलेलं हिंस्त्र श्वापद दडून राहत नाही.

सरकार प्रायोजित गुजरात दंगली नंतर मोदींना बदलण्याचा निर्णय त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. मोदींना त्यांनी राजधर्माची आठवण करुन दिली होती. अडवाणी यांनी मात्र त्यावेळी मोदींची बाजू घेतली. त्यांना संरक्षण दिलं. त्याच अडवाणींना बाजूला ढकलत मोदी घोड्यावर स्वार झाले. गोव्यात त्यांनी अडवाणींचं नावं सुद्धा घेतलं नाही.

गोव्यात त्यांनी काय भाषण केलं? मोदी म्हणाले, ''गोवा मेरे लिए लकी है. इसी गोवा मे मुझे गुजरात चलाने का लायसन मिला.''

राज्य म्हणजे काय दुकान आहे? की कसला ठेका आहे? पवित्र मातृभूमीचे स्तोत्र गाणार्‍या संघ पुत्राच्या लेखी मातृ भू म्हणजे दुकान आणि ठेका असेल तर त्याला काय म्हणायचं?

सार्वभौम जनतेचं राज्य चालवणं हा ठेका मानणार्‍या वृत्तीच्या हातात देशच काय ते राज्यही कायम ठेवणं त्या राज्यासाठी, लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अडवाणींना सुद्धा टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल, नितिशकुमार, शरद यादवांना त्यांच्यासोबत राहू नये असं वाटत असेल तर देशाच्या जनतेने काय ठरवायचं?

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोकभारती
kapilhpatil@gmail.com

     _______________________________________________
मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेन
Jul 22, 2013, 03.32PM IST  
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे आर्थिक विकासाचे मॉडेल राबवले ते मला अर्थशास्त्रज्ञ म्हणून अयोग्य वाटते. म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझ्या भारतीय मनाची इच्छा आहे, असे विधान नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले आहे.
सीएनएन-आईबीएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सेन यांनी हे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी मोदींचा हा विकास सर्वसमावेशक नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात.
विकासाला सामाजिक बदलांपासून वेगळे करता येत नाही. फक्त उच्च विकास दर हा गरीबी निर्मुलनाचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक विकास महत्त्वाचा आहे. असे सांगत डॉ. सेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे.http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Amartya-Sen-dont-want-Narendra-Modi-as-PM/articleshow/21243530.cms 
     _______________________________________________



 

Friday 12 July 2013

शत्रू घरातला असेल तर?








जगात भारताची ओळख आहे ती, बुद्धाचा भारत म्हणून. भारताचा शोध घेण्याऱ्या पंडित नेहरुंनाही बुद्धाचाच भारत प्रिय होता. बोधगयेत घडवलेले साखळी बॉम्बस्फोट हा हल्ला केवळ बुद्ध विहारावर नव्हता. या प्राचीन देशाची जी खरी ओळख आहे. जी सभ्यता आणि संस्कृती आहे. तिच्यावरचा तो हल्ला आहे. 

बॉम्बस्फोट घडवणारे हात कुणाचेही असोत. खरे गुन्हेगार दुसरेच आहेत. ज्या शक्तींनी हे षड्यंत्र रचलं आहे, त्यांचा हेतू स्पष्ट आहे. कारस्थान मोठं आहे. 

शक्यता दोन आहेत. अतिरेकी पाकिस्तानी असू शकतात किंवा अतिरेकी देशांतर्गतही असू शकतात. पाकिस्तानी असतील तर लढाई सोपी आहे. फार तपशिलात जाण्याची गरज लागत नाही. आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा तेवढ्या सक्षम नक्कीच आहेत. बाह्य शक्तींनी कितीही हल्ले केले तरी देश कोसळण्याची किंवा त्यातून अस्थिरता माजण्याची कदापि शक्यता नाही. आपला देश मजबूत आहे. बाहेरच्या शत्रुला चीनची सरहद्द सोडली तर पराभवच पत्करावा लागला आहे. सरहद्दी वरचं आव्हान पेलायला आपलं सैन्य समर्थ आहे.

पण शत्रू घरातला असेल तर?

दिग्विजय सिंग यांच्याबद्दल भाजप परिवारामध्ये राग असणं स्वाभाविक आहे. त्यांची विधानं सर्वसामान्यांनाही कधी कधी टोकाची वाटतात. पण कॉंग्रेस पक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जे सेक्युलर नेते आहेत त्यापैकी दिग्विजय सिंग यांचा नंबर वरचा लागेल. मध्य प्रदेशात ते मुख्यमंत्री होते तेव्हा दलित अजेंडा राबवण्याची त्यांनी हिम्मत केली होती. खाजगी उद्योग क्षेत्रात वंचित, शोषितांना सामाजिक न्याय देण्यासाठी अमेरिकेप्रमाणे affirmative action घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली. 

आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी कधीही न चुकवणारा हा भागवतधर्मी विठ्ठल भक्त राजकारणात तुकोबांचीच रोकठोक भाषा बोलतो. माझी त्यांची भेट आषाढी एकादशीला एकदा झाली होती. फोनवर दोनदा बोलणंही झालं आहे. पण बाकी संपर्क नाही. परवा ते काय म्हणाले?

''अमित शहा अयोध्येला भेट देतात. नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देतात आणि दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट होतो. या घटनांचा काय संबंध, मला माहित नाही.''

दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यावर भाजप परिवारातून संतापाचे फुत्कार बाहेर न पडते तरच नवल. 'अतिरेकी हिंदू असू शकत नाही. सगळेच अतिरेकी मुसलमान कसे?' असे एसएमएस देशभर फिरवणारे असे रागावणे समजू शकतो. पण दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. कारण शत्रू घरातलाच असण्याची शक्यता अधिक आहे. 

नांदेड, परभणी आणि मालेगावचे बॉम्बस्फोट कुणी घडवले हे सांगायला आता नागपूरच्या आरशाची गरज नाही. समझोता एक्प्रेसमध्ये ६९ लोकांचे जीव कोणी घेतले हे जगापुढे कधीचं आलं आहे. शहीद हेमंत करकरे यांनी देशांतर्गत लपलेला शत्रू शोधून काढला नसता तर अतिरेक्यांची ही दुसरी बाजू कधीच समोर आली नसती. देशाबाहेरच्या शत्रूंनी मुंबईवर जो सर्वात मोठा हल्ला केला तो केवळ हल्ला नव्हता ते युद्ध होतं. त्या रणांगणात बाकीचे अधिकारी पळून जात असताना. कामटे, साळसकर, ओंबाळे यांच्या समवेत हेमंत करकरे नावाचा त्यांचा सेनापती शहीद झाला. पण त्याच सकाळी हेमंत करकरे यांच्या कुटुंबावर अत्यंत निलाजरी, जीवघेणी टीकेची झोड उठवण्यात आली होती. घाणेरडे फोन आणि एसएमएस यांनी त्यांच्या कुटुंबाला छळून सोडलं होतं. 

हेमंत करकरे यांनी नथुरामी परंपरेचा तो चेहरा बेनकाब केला. वर्दी सेक्युलर असते. देशभक्त असते. तिला धर्म नसतो हे दाखवून दिलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आणि त्या संविधानाने निर्माण केलेल्या न्याय संस्थेने नथुराम आणि कसाब यांच्यात फरक केलेला नाही. मुंबई अन महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट ही की, या देशाचे संविधानकर्ते अन भाग्यविधाते डॉ. आंबेडकर या भूमिचेच पुत्र. आपल्या प्राणाचे मोल देत आपल्या तुकाराम ओंबळे यांनी कासाबला याच भूमीत गाडण्यासाठी जिवंत पकडलं. नथुराम हा एकच कलंक असेल पण पुण्याच्याच आपल्या काकासाहेब गाडगीळांनी त्याला ओळखलं म्हणून तो फासावर चढू शकला. देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या अशा दोन्ही शत्रुंशी लढत शहीद होणारे हेमंत करकरे या महाराष्ट्राचेच. मला खात्री आहे बिहारमधल्या बॉम्बस्फोटाची पाळमुळं महाराष्ट्राचीच एटीएस खणून काढील. 

दहशतवादी इथले असोत की तिथले. त्यांच्या प्रेरणा समान आहेत. या देशाच्या सांस्कृतिक बहुविधतेला भेद आणि द्वेषात परिवर्तित करण्याचा तो डाव आहे. बिहार आणि महाराष्ट्रातल्या ताज्या राजकारणाचा संदर्भ त्याला आहेच. दिल्ली आक्रमणाच्या तयारीचा तो भाग आहे. जगभरचे सांस्कृतिक संघर्ष तीव्रतर करण्यामागे आणि दहशतवाद्यांच्या निर्मिती आणि पोषणामध्ये जगातल्या तेल साठ्यांवर कब्जा मिळवणाऱ्या जागतिक भांडवलदारांचा सहभाग लपून राहिलेला नाही. दहशतवादी कृत्यांमागच्या या प्रेरणा सामान्य माणसालाही आता कळू लागल्या आहेत. म्हणून या शक्तींचे डाव तो आपल्या भूमीवर खेळू देत नाहीत. 

बोधगयेवरच्या हल्ल्याचा निषेध बौद्ध जनतेने अत्यंत संयमाने केला. तथागत गौतम बुद्धांच्या शांती मार्गाने केला. त्या संयमाला सलाम केला पाहिजे. 

माणसाच्या दुःखाचा, वेदनेचा शोध सर्वप्रथम बुद्धानेच घेतला. माणसाला दुखः आहे. दुःखाला कारण आहे. त्यावर उपाय आहे आणि दुखः दूर करता येतं. अशी चार आर्य सत्ये तथागतांनी जगाला दिली. दहशतवादी आणि अतिरेक्यांना धर्म नसतो. असतो तो फक्त द्वेषाचा धर्म. या द्वेषाला माणसाच्या मनातून हद्दपार करणारं तत्वज्ञान बुद्धाने जगाला दिलं. बोधगयेवरच्या संयमी प्रतिक्रिया अतिरेक्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. 

आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com

Saturday 6 July 2013

इशरतला न्याय मिळेल?



ख्वाजा युनुसला न्याय नाही मिळाला. पण इशरतला मिळण्याची शक्यता आहे. फेक एन्काउंटरने निष्पाप इशरतचा जीव घेणाऱ्या बेगुमान राज्यकर्त्यांना सजा होण्याची शक्यता नाही. पण ती अतिरेकी कधीच नव्हती. यावर शिक्कामोर्तब झालं. तेही काही कमी नाही. किमान तिच्या आईला आपली मुलगी निष्पाप होती हे सिद्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ख्वाजा युनुसच्या मृतदेहाची राखही शिल्लक न ठेवण्याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली होती. ते अधिकारी मराठी आहेत म्हणून देशभक्त असल्याचा दिंडोरा पेटवण्यात काहीना यश आलं. नथुरामलाही देशभक्त ठरवणाऱ्यांची पिलावळ महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे. त्यांचं देशभक्तीच गणित एकदम सोपं आहे. जे हिंदू म्हणून जन्माला येतात, ते देशभक्तच असतात. दुसऱ्या धर्मात जन्म झाला की, तो जन्मताच देशद्रोही ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकर 'स्वातंत्र्यवीर देशभक्त' खरे पण त्यांनीही देशभक्तीची व्याख्या धर्मसंस्कृतीपुरतीच मर्यादित ठेवली आहे. या देशाला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरालाही त्यांनी देशांतर ठरवलं होतं. इशरत प्रकरणात सीबीआयने एन्काउंटर फेक असल्याचे दाखवून देताच अतिरेकी मुसलमानच असतात अशी प्रतिक्रिया देणारेही होते.


अतिरेक्यांना ते मानत असलेला धर्म असतोच असतो. परद्वेषाचा आधार जेव्हा धर्म असतो, तेव्हा धर्मासाठी अतिरेकी पाऊल उचललं जातं हे वास्तव नाकारण्याची गरज नाही. मुस्लिम अतिरेक्यांच्या बातम्या आपण जास्त वाचतो म्हणजे अतिरेकी मुस्लिम असतात हा निष्कर्ष काढणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. आपण ठरवून निवडक बातम्या वाचत असतो. कारण आपल्या डोक्यात ते गणित पक्क असतं. दुसऱ्या अतिरेक्यांच्या बातम्याही डोळ्यासमोरून जात असतात. पण आपली नेणिव ती वाचायला तयार नसते.


या देशातल्या दहशतवादाची, अतिरेकी चळवळीची सुरवात केली ती नथुरामाने. त्याला वैचारिक प्रेरणा आणि समर्थन दिलं ते मुस्लिम द्वेषी, वर्ण वर्चस्ववादी जहाल हिंदुत्ववादाने. भारतात दोन राष्ट्र आहेत. हिंदू आणि मुसलमान, ही संकल्पनाही पहिल्यांदा मांडली ती या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनीच. ही दोन राष्ट्र एकत्र नांदू शकत नाहीत, या त्यांच्या प्रचाराला सर्वप्रथम विरोध केला तो उदार हिंदू नेत्यांनी आणि दोन राष्ट्रांच्या भूमिकेला समर्थन दिलं ते जीनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने.


द्वी राष्ट्रवादाचे जनक कट्टर हिंदुत्ववादीच होते आणि समर्थक कट्टर मुस्लिम लीगवाले होते. मुस्लिम रेनॉसान्सचे जनक सर सय्यद अहमद यांच्यावर हिंदू, मुस्लिम दोन राष्ट्र असल्याचा पुरस्कार केल्याचा आरोप केला जातो. पण तो निखालस खोटा आहे. सर सय्यद अहमद यांनी नेशन किवा राष्ट्र असा शब्ध्प्रयोग कधीही केलेला नाही. हिंदू, मुस्लिम या दोन कौम आहेत असा तो शब्दप्रयोग आहे. या दोन कौम हिंदुस्तानचे दोन डोळे आहेत, असं ते म्हणत. दोघांच्या अश्रूंचा आणि लहुचा रंग एक आहे. वेगळा नाही. ही त्यांची भूमिका होती.


राजकीय हिंदुत्वाचे जनक म्हणून ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहिलं जातं तेही अंदमानात जाईपर्यंत सेक्युलर स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमानातून ते बाहेर पडले आणि हिंदुत्ववादी नेते झाले. ब्रिटीशांनी त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून माफी देत, बाहेर काढताना जी रणनीती आखली होती त्याचा तो भाग होता. विनायक दामोदर सावरकर यांनी माफीनामा देउन अंदमानच्या महाभयंकर शिक्षेतून सुटका करून घेतली. म्हणून देशभक्ती कमी होत नाही. किवा त्यांच्या स्वातंत्र्यवीर किताबाला उणेपणा देण्याचं कारण नाही. त्यांच्या घनघोर त्यागाला आणि संघर्षाला सलामच केला पाहिजे. पण अंदमानच्या आधी अत्यंत विज्ञाननिष्ट, इहवादी आणि सेक्युलर असलेले स्वातंत्र्यवीर अंदमानच्या सुटकेनंतर हिंदुत्ववादी नेते बनतात हा ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या रणनीतीचा भाग होता.


खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातही ती खंत कायम असावी. अन्यथा रत्नागिरीच्या मुक्कामात महात्मा गांधींना त्यांनी आपल्या घरी बोलावून चहा दिला नसता. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला तेव्हा सावरकरांनी आपल्या दादरच्या घरावर भगवा नाही तिरंगा फडकवला होता. खूप खूप आधी त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रध्वजावर चांद ताराही त्यांना प्यारा होता, असं शेषराव मोरेनीच दाखवून दिलं आहे.


भारतातल्या दहशतवादी थैमानाने हिंदूंचे जितके प्राण घेतले त्याच्या कैक पटीने एकट्या काश्मिरमधल्या मुस्लिमांचे प्राण घेतले. दहशवादी कुणा एका धर्माचा असतो, म्हणून त्या त्या धर्माचे सगळे दहशतवादी हा विपर्यास झाला. श्रीलंकेतील तामिळ अतिरेकी कट्टर हिंदू आहेत. ईशान्येकडील राज्यांमधील सशस्त्र मार्गाने लढणारे शेकडो हजारो देशबांधव आणि मध्य भारतात आदिवासींच्या शोषणाविरोधात उभे ठाकलेले नक्षलवादी मुसलमान नाहीत. त्या दोघांचाही मार्ग दहशतवादी आहे. देशाला आणि लोकशाहीला तितकाच घातक आहे. आसाममधील उल्फा बंडखोर उच्चभ्रू वरिष्ठ जातीतील हिंदू आहेत. Bodo Land साठी लढणारे हिंदूच आहेत. त्यांच्या बातम्या रोज असतात. त्यांच्या हिंसाचारात रोज शेकडो माणसं मरतात, पण आपण त्यांना दहशतवादी म्हणत नाही. कारण ते मुसलमान नसतात म्हणूनच ना?


उल्फा दहशतवादी वरिष्ठ जातीचे हिंदू आहेत. म्हणून या देशातल्या सगळ्या वरिष्ठ हिंदू जाती दहशतवादी आहेत, असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. नथूरामने महात्माजींची हत्या केल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राम्हणांची घरं जाळण्यात आली. त्यांना पळवून लावण्यात आलं, हा मूर्खपणा होता. नथुरामवादाच्या  विरोधात भूमिका घेत असंख्य ब्राम्हण स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या चळवळीत उतरले होते. त्यांना नथुराम ठरवणे हा घोर अन्यायच ठरतो. प्रज्ञा भारती आणि कर्नल पुरोहित नथुराम परिवाराचे पाईक आहेत. त्यांच्यावर फुलं उधळणाऱ्याना देशभक्त म्हणता येणार नाही. पण त्यांचे कोणी नातेवाईक आणि जातवाले आहेत त्यांना देशद्रोही ठरवणं तितकंच मूर्खपणाच आणि अन्यायकारक आहे.


या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी मुस्लिमांनी त्याग आणि बलिदान दिलं आहे. अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. फासावर गेलेला अश्फाक उल्ला खान एकटा नव्हता. ब्रिटीशांनी फासावर चढवलेले आणि तोफेच्या तोंडी दिलेले मुसलमान किती याची बेरीज केली तर मुसलमानांना दहशतवादी ठरवताना स्वतःची लाज वाटते. मुंबईच्या आझाद मैदानात दोन तोफांच्या तोंडी मुसलमान सय्यद हुसैन आणि हिंदू मंगल गडिया या दोघांना एकाचवेळी बांधण्यात आलं होतं. हजारो मुंबईकरांनी त्यांच्या चिंधड्या उडताना पहिल्या. प्रेताचा कोणता तुकडा हिंदूचा आणि कोणता मुसलमानाचा असा प्रश्न अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पडला होता.


दोघांच्या देशभक्तीचं रक्त मांस तर एकच होतं.



- कपिल पाटील

  अध्यक्ष, लोक भारती.
  kapilhpatil@gmail.com

Saturday 29 June 2013

जात पडताळणीच्या डेडलाईनमुळे १ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

मा. मुखमंत्री यांनी ३० जूनच्या डेडलाईनला स्थगिती देण्याचे आणि लवकरच याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार कपिल पाटील यांना काल रात्री दिले.



Thursday 30 May 2013

दुष्काळ निर्मूलन परिषद.

लोक भारती
दुष्काळ निर्मूलन परिषद. 
तज्ज्ञ आणि अभ्यासक कार्यकर्ते, पत्रकार व साहित्यिक यांची संयुक्त परिषद.

शनिवार दि. १ जून २०१३, दुपारी ३.३० वा. 
स्थळ : साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, सिंहगड रस्ता, पुणे. 




रेसकोर्सवर घरे बांधा!


Thursday 2 May 2013

सरंजामी सिंहासनाखालचा सुरुंग

असभ्यअर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाही
तो मक्ता  दुसऱ्यांचा होता शिवसेना मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे... 
मात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचीयशवंतराव चव्हाण ते शरद पवार अशी परंपरा 
असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हती. 





















लब्ज एक ऐसी चीज है 
जो इन्सान को 
या तो दिल में उतारती है 
या दिल से उतारती है। 

इंदापूरच्या निंबोडी गावातराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्याने 
असेच काहीसे घडलेत्यांचे ते शब्द असभ्य आणि असंस्कृत होतेयात दुमत नाहीपण ज्या 
परिस्थितीत आणि जे उदाहरण देत त्यांनीते उद्गार काढलेत्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 
डागण्या तर दिल्याचपण साऱ्या महाराष्ट्राला शरम वाटावी असंही काही घडलं

असभ्यअर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाहीतो मक्ता 
दुसऱ्यांचा होताशिवसेना मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत्याला 
प्रतिष्ठा आहे असं नाहीमात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाची यशवंतराव चव्हाण ते 
शरद पवार अशी परंपरा असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हतीनिंबोडीच्या त्यांच्या 
त्या भाषणातच त्यांनी दोन गोष्टी कबूल केल्या आहेतएकधरणात पाणीउरलेलं नाही
दोन लोकांना देण्यासाठी वीज उपलब्ध नाहीराज्यातला दुष्काळ एवढा तीव्र आहे असं स्वतःच 
कबूल करत अंधारात काय XXXX होतं आणि प्यायला काय XX देणार अशी भाषा ते करतात
तेव्हा प्रश्न निर्माण होणारचराज्यकर्तेच अशी भाषा वापरताततेव्हा असंतोषाचा स्फोट 
स्वाभाविक होतो


ज्या राजा विरोधा'तल्या असंतोषातून फ्रेंच राज्यक्रांती जन्माला आली त्या सोळाव्या लुईसच्या 
पत्नीचे उद्गार तुलनेने खूपच सभ्य म्हणायचेदुष्काळाने होरपळेल्या शेतकऱ्यांना पोटाची खळगी 
भरण्यासाठी पावही मिळत नव्हतातो मिळवण्यासाठी दंगली सुरू झाल्यातर राणी मारी-
आन्त्वाने (Marie-Antoinette) म्हणाली, 'पावमिळत नसतीलतर त्यांना केक खायला  
सांगा'. फ्रान्सची राणी असं वाक्य खरोखरंच वदली की नाहीयाबद्दल वाद आहेपण  
जगभरच्या इतिहासात मात्र त्याची नोंद झालीइतिहासात आपली अशी नोंद होणं अजित 
पवारांना खचितच आवडणार नाहीत्यांना उपरती झालीत्यांनी तीनदा जाहीर माफी  
मागितली. कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला साक्ष ठेवून 
 प्रायश्चित्तही घेतलं


अजित पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियाही तशाच 
आहेततितक्याच असमर्थनीयअसभ्यअर्वाच्यअसंस्कृतआणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेची भीडभाड
न बाळगणाऱ्याअजितपवारांच्या प्रतिमेवर शिवसैनिकांनी शिवांबू ओतलंतर दादरला मनसे 
सैनिकांनी लहान मुलाला पवारांच्या फोटोवर सू सू करायला लावलीपोरगं तयार नव्हतंतर 
त्याला टपल्या मारून करायला भाग पाडलंनंतर नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केलीपण नेत्यांची 
भाषा सैनिकांनी रस्त्यावर अमलात आणलीतर दोष त्या सामान्य अजाण सैनिकांना कसा देता 
येईलकालवरीच्या टेकडीवर त्या बाईने पाप केलं म्हणून साऱ्यांनीच हातात दगड उचलले
तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले'ज्यांच्या मनातही कधी पाप आलं नाहीत्यांनी जरूर दगड मारावा.' 
इथे कुणी कुणावर दगड मारावाबेशर्मी नावाचं एक रोपटं असतंते कुठेही उगवतं
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दोन्ही बांधांवरही ते तरारुन उगवलंय


इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या टीआरपीसाठी हल्ली अशी भाषणं रोज लाइव्ह दाखवत असतो
मात्र सगळयांनाच हे भाग्य मिळत नाहीपण माध्यमांकडून अशा वक्तव्यांची दखल मात्र 
पक्षपातीपणे घेतली जात असल्याचा आक्षेप सत्ताधाऱ्यांकडून घेतला गेला आहेत्यात भाग्य 
दुर्भाग्याचा भाग नाहीअजित पवारांविरोधात उफाळेल्या रोषाला भांडारकर संस्था आणि 
दादोजी कोंडदेव यांच्यावरच्या हल्ल्याचाही संदर्भ आहेत्याची दखल पवारांनी किती घेतली 
माहीत नाहीपण महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय भूगर्भात पेटलेला जाती संघर्षाचा लाव्हा 
यानिमित्ताने वर आला नसतातरच नवल

जातधर्म आणि भाषा यांच्या द्वेषाची चूड लावत महाराष्ट्रात अनेकदा राजकारण झालं आहे
राज्यातल्या खऱ्या प्रश्नांवरच्या लढाया चिरडून टाकायच्या आणि द्वेषाची आग भडकवायची
हे दोन्ही बाजूने झालं आहेदोघांनाही तेसोयीचं असतंगिरणी कामगारांचा असंतोष दडपून 
टाकण्यासाठी बाबरी मशिदीचं निमित्त करतहिंदू मुस्लिम दंगल घडवण्यात आलीसेना 
भाजप युतीला १९९५मध्ये याच खेळातून सत्ता मिळालीअर्थात ती फार काळ टिकली नाही
पण तो खेळ काय फक्त त्यांनीच केला होतात्या सत्तांतरापूर्वीच्या पाच वर्षांत काँग्रेस अंतर्गत 
राजकारणात तोच खेळ सुरू होतातो चेंडू अलगद पकडत युती सत्तेवर आलीइतकंचसामान्य 
जनता त्यात होरपळून निघालीराजकारणाच्या कैफात जनतेचं होरपळणं कुणाच्या लेखी आहे
गेल्या पाच सात वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीने तोच खेळ पुन्हा सुरू केला आहे मागच्या 
खेळात आपली सत्ता गेली होतीयाचं भान त्यांना आलेलं नाहीयाच कैफात युतीलाही साडेचार 
वर्षांत गाशा गुंडाळावा लागला होतामहाराष्ट्रातील सलग१३ १४ वर्षांच्या सत्तेचा मद इतका 
आहेबेफिकिरी इतकी आहे की आपल्याच गंजीला आपणच आग लावतो आहोतयाचं भानही 
विद्यमान राज्यकर्त्यांना नाही

सत्तासंपत्तीप्रसिद्धीगर्दी आणि लोकप्रियता यांचा एक माज असतोतो निरंकुश बनतो
मग ज्या सामान्य माणसांच्या मतांवर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला ही सत्ता 
मिळाली आहेत्या लोकशाहीची आणि लोकांची पर्वा राहत नाहीपुरोगामी म्हणवला जाणारा 
महाराष्ट्र अजून सरंजामशाहीतून बाहेर आलेला नाहीसत्ताधारीच नाहीतर विरोधी 
पक्षातल्या नेत्यांचं वागणंही सरंजामदारांपेक्षा कमी नाहीकुठे धरणांशिवाय भ्रष्टाचाराचे पाट 
वाहतातकुठे खंडण्यासेटलमेंट आणि भ्रष्टाचाराचे टोलनाके सुरू होतातपरस्परांवर 
अधुनमधून चिखलफेक करणं हा परस्परांच्या सोयीच्या राजकारणाचा भाग बनलाय 


पण कधीतरी नेम चुकतो आणि थेट सामान्य माणसाच्या अंगावर चिखल उडतोमोहोळ 
तालुक्यात पाणी यावं म्हणून प्रभाकर देशमुख आझाद मैदानातदोन महिने धरणं धरून बसले 
होतेउजनी धरणातलं पाणी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न देता 
बारामतीतील डायनॉमिक्स दूध डेअरीला बेकायदेशीररीत्या दिलं जात आहेअसा त्यांचा आक्षेप 
होतापाटकुळच्या एका सामान्य शेतकऱ्याचं ६० दिवसांचं धरणं अजित पवारांना खुपलं
खरं तर धरणं नाहीतर त्या शेतकऱ्याने उपस्थित केलेला प्रश्न त्यांना खुपला होताप्रभाकर 
देशमुखांचा उद्धार करत अजित पवार बरसलेएका छोट्या गावातविशेष महत्त्वाच्या 
नसलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची दखल कोण घेणारअसं त्यांना वाटलं असेल
पण सामान्य माणसाला डिवचलं की काय होतंत्याची तिथून पुढे घडलेली हकिगत 
आता सर्वांच्या समोर आहेसाध्याच माणसांचा एल्गार सत्ताधाऱ्यांच्या सिंहासनाखाली 
सुरुंग पेरत असतो !

कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती. 
  पूर्व प्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्स (Apr 16, 2013)