Monday, 23 February 2015

तर नथुरामी प्रवृत्ती माणुसकीचा घास घेईल


दिनांक : 23/02/2015

प्रति,
मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
16 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी कोल्हापूरात काॅ. गोविंद पानसरे यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्याच दिवशी रात्री 9 वाजता राज्यातील कम्युनिस्ट नेत्यांच्या शिष्टमंडळासमवेत मी आपणास भेटावयास आलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या संदर्भात काही उलट सुलट बातम्या आणि त्यावरची आपली प्रतिक्रिया मिडीयात आली आहे. त्याबाबत मी आपणाशी बोलण्याचा काल प्रयत्न करत होतो, रात्री 2.15 च्या सुमारास आपल्या कार्यालयातून मिस काॅल आल्याचे मोबाईलवरही दिसत आहे. मात्र बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे हे पत्र.

त्यारात्री आपल्या वर्षा निवासस्थानी आपणाशी झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होती. आणि त्यावेळी मी दिलेल्या माहितीवर मी आजही ठाम आहे. ही माहिती देत असताना मी कुठेही आपल्या किंवा आपल्या सरकारवर ठपका ठेवलेला नव्हता. मात्र मी स्टंटबाजीने काही विधान करत आहे, अशा आशयाचे आपले उद्गार एेकून आश्चर्य वाटले.

मी आपणास दोनदा भेटल्याचेही आपण मान्य केले आहे. एकदा शिक्षकांच्या प्रश्नांवर आणि 16 फेब्रुवारीला काॅ. पानसरेंच्या संदर्भात कम्युनिस्ट नेत्यांच्या शिष्टमंडळासमवेत. त्या शिष्टमंडळाच्या वतीने दिलेल्या संयुक्त निवेदनावर माझी सहमतीची सही आहे. आपण हे स्वतःच सांगितल्यामुळे मी आपला आभारी आहे. अलिकडेच झालेल्या आपल्या दोन नव्हे तीन चार भेटीत आपण चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दलही मी आपला आभारी आहे. टिका टिपणी करण्याचा आपला अधिकार आहे. परंतु ती प्रतिक्रिया एेकून दुःख झाले. आपल्याशी झालेल्या दोन भेटीत मुंबई विद्यापीठातील इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचा प्रश्न, गुरुकृपा सोसायटीवर झालेला अन्याय, गोरेगावच्या म्हाडा वसाहतीतील पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याची चाैकशी याबाबत मी दिलेल्या निवेदनावर आपण तात्काळ कारवाई केली. त्याबद्दल आभार. मात्र पानसरेंच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही असे आपल्या कार्यालयाकडून मिडियाला भासवण्यात येत आहे, ते आश्चर्यकारक आहे.

त्यादिवशी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री म्हणून आपले म्हणणे एेकल्यानंतर समाधानही व्यक्त केले होते. कुणाचीही गय केली जाणार नाही, असे आपण स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी मी म्हणालो, 'डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. परंतु त्यानंतर काही काळातच गृहखात्याकडे ही माहिती आली होती की, या नथुरामी पद्धतीच्या अॅक्टीव्हीटीज कोल्हापूरात वाढल्या आहेत. त्याअर्थाने राज्यात कोल्हापूर अधिक संवेदनशील असल्याची माहिती मला गृहखात्यातल्या वरिष्ठ सोर्सकडून कळली होती. अर्थात ही गोष्ट निवडणुकीपूर्वीची आहे. आपल्या सरकारच्या काळातली नाही. त्या आधीची आहे आणि त्यात काॅ. पानसरेंचा संदर्भ किंवा उल्लेख नव्हता. ती माहिती आपल्या समोर आलेली असण्याची शक्यता नाही. मात्र त्यादिशेने धागेदोरे शोधणे आवश्यक आहे. तसेच काॅ. पानसरे यांना सोशल मिडीयावरुन ज्या धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यांच्या पुस्तकावर ज्या हिंसक काॅमेंट व्यक्त होत होत्या, अशा या दोन्ही अॅंगलने पोलिस तपास व्हायला हवा.'

आपण हे एेकल्यानंतर तात्काळ फोन लावून (बहुधा कोल्हापूर एस.पी.) या दोन्ही अॅंगलने तपास करण्याचे आदेश दिले. आपल्या या तत्पर प्रतिसादामुळे शिष्टमंडळालाही बरे वाटले.

मी स्वतः प्रेसकडे कुठेही याबाबत गेल्या आठवड्याभरात कधीही वक्तव्य केलेले नाही. अशी चर्चा बाहेर जाण्याने तपासावर परिणाम होऊ शकतो असे माझे मत आहे. मात्र आपल्या त्या चर्चेबाबत इलेक्ट्राॅनिक मिडियात उलट सुलट बातम्या आल्यामुळे काल त्याबाबत मला मिडीयापुढे खुलासा करावा लागला. मात्र त्यानंतर आपण प्रतिक्रियेत सांगितले की, पोलिसांना अशा प्रकारची कोणतीही माहिती नव्हती. प्रत्यक्ष काॅ. पानसरे यांच्याबद्दलचा अलर्ट आलेला नसला तरी नथुरामी शक्तींच्या हालचालींबाबत दिलेली ही माहिती पोलिसांना नसेल किंवा त्यांचे पृःथ्थकरण किंवा विश्लेषण करुन योग्य दिशेने दक्षता घेणे शक्य झाले नसेल तर ते पोलिसांचे अपयश आहे.

आपणाकडून अपेक्षा आहे की, पोलिसांच्या या अपयशाबाबतही योग्य ती चाैकशी झाली पाहिजे आणि सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांमध्ये त्यादिशेने योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत. अन्यथा राज्यात वाढत असलेली नथुरामी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा, सामाजिक सलोख्याचा आणि माणुसकीचा घास घेईल.

डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि काॅ. गोविंद पानसरे यांचे बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा.
धन्यवाद!

आपला स्नेहांकीत,
कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती

कॉ गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात डाव्या संघटनांचे प्रतिनिधी १६ फेब्रुवारीला रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटले तेव्हा, लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, माकप नेते कॉं. महेंद्रसिंग, कॉ. सुकुमार दामले, बँक कर्मचारी यांचे नेते विश्वास उटगी.

एबीपी माझाकडे दिलेली प्रतिक्रिया

Daily Mail ने घेतली दखल …
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2964248/Maharashtra-Police-warned-Kolhapur-attack-killed-Govind-Pansare.html

Saturday, 21 February 2015

कॉ. गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम.


ज्यांना विचारांची लढाई विचाराने लढता येत नाही तेच हिंसा करतात, द्वेष करतात आणि माणसाना गोळ्यांनी संपवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे विचार मरत नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधीना मारणारा नथुराम महाराष्ट्रातला होता, याचं दु:ख साने गुरुजींना सहन झालं नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचाही बळी याच नथुरामवादी शक्तींनी घेतला आहे. गांधी हत्येनंतर छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात सत्यशोधकी संतापाचं दर्शन घडलं होतं, त्याच कोल्हापुरात शाहू विचारांच्या वयोवृद्ध आणि निशस्त्र कॉ. पानसरे यांचा त्याच नथुरामी शक्तींनी निर्दयी खून केला. एक महाराष्ट्रीयन म्हणून याचं दु:ख, वेदना आणि शल्य कायम भळभळत राहील.

शोषणरहित समाजव्यवस्थेसाठी आयुष्यभर कष्टकर्यांची लढाई लढणारे कॉ. पानसरे जातीयता आणि धर्माधतेच्या विरोधात वयाच्या ८२व्या वर्षी रणांगणात उभे होते. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा खरा विचार खेड्यापाड्यात आणि लाखो तरुणांपर्यंत पोचवण्याच काम कॉ. पानसरे यांनी केलं. त्यांच्यावरचा हल्ला हा शिवरायांच्या सर्वधर्मभावावरचा हल्ला आहे. माणूसकीवरचा हल्ला आहे.

झुठ (खोटेपणा) आणि नफरत (द्वेष) या विषयावरच उभी राहणारी सनातनी नथुरामी विषवल्ली महाराष्ट्रातून आणि देशातून मुळापासून उपटून टाकण्यासाठी यापुढे अव्याहतपणे लढलं पाहिजे. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी तर अजून सापडले नाहीत पण या मारेकर्याचा मेंदू महाराष्ट्रात कार्यरत आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. त्यांना बेड्या ठोकण ही सरकारची जबाबदारी आहे आणि हा दृष्ट विखारी विचार पराभूत करणं सर्वच विचारशील, विवेकशील नागरिकांची जबाबदारी आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम. 


कपिल पाटील, वि. प. स. 
अध्यक्ष, लोक भारती 


Wednesday, 18 February 2015

राजकारणातले गाडगेबाबाफार थोडी माणसं असतात ज्यांच्या जाण्यामुळे चटका लागतो. राजकारणात अशी माणसं खुपच कमी. आर. आर. पाटील गेले तेव्हा ते सत्तेवर नव्हते, मंत्री नव्हते, साधे आमदार होते. तरी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळला. त्यांचं निहायत साधेपण. निगर्वी स्वभाव. निष्कलंक चारित्र्य. अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आणि सामान्य माणसाशी नातं. कालपासून प्रत्येकजण त्यांची आठवण काढतोय.

आज सकाळी मुख्याध्यापकांची सभा होती बोरिवलीत. संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सभा सुरु करतानाच आबांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्याध्यापकांच्याच एका सभेत स्वतः आबा आले होते. आमंत्रणाशिवाय. (29 जानेवारी 2010)

विद्यार्थ्यांच्या एकापाठोपाठ एक आत्महत्यांनी महाराष्ट्र हादरला होता. दामोदर हाॅलमध्ये मुंबईचा शिक्षक आमदार असल्यामुळे मुख्याध्यापकांची मी सभा बोलावली होती. मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी या प्रश्नावर मार्गदर्शन करणार होते. वर्तमानपत्रातील बातमी वाचून आबांनी मला फोन केला. कपिल मला या कार्यक्रमाला यायचंय. खाली बसून त्यांनी डाॅ. नाडकर्णींचं भाषण एेकलं. मुख्याध्यापकांशी ते येऊन बोलले. आबांच्या हस्ते तणावमुक्त विद्यार्थी अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दखल राज्याचा गृहमंत्री घेतो. स्वतः येतो हे नवलच होतं. बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली जाते मग विद्यार्थ्यांना शर्यतीत का उतरवता? असा रोकडा सवाल यावेळी आबांनी केला.

  
याच प्रश्नावर विधानपरिषदेत मी चर्चा घडवून आणली होती. तेव्हाही आबा आवर्जून सभागृहात हजर होते. चाईल्ड हेल्पलाईनची घोषणा आर.आर. आबांनी त्या चर्चेला उत्तर देताना केली.

सभागृहात खुद्द आबांशी माझं एक-दोनदा वाजलं होतं. पण सभागृहातल्या वादावादीने त्यांचं प्रेम आणि विश्वास अधिक मिळाला. नक्षलवादाच्या आरोपाखाली छात्रभारतीच्या 3 मुलांना पोलिसांनी पकडलं होतं. सभागृहात त्यादिवशी खूप भांडलो. सरकारचा निषेध करत मी सभात्याग केला. आबांनी त्यांच्या दालनात बोलावून घेतलं. राज्याचे पोलीस महासंचालक आणि नक्षलावादाशी निगडीत वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या दालनात अाधीच हजर होते. आबांनी मला माझं म्हणणं पुन्हा मांडायला सांगितलं. आबांनी तेव्हाच निर्णय घेतला त्या 3 निर्दोष मुलांची सुटका झाली.

आबांनी डांस बार बंद केले. मुंबईचं नाईट लाईफ पुन्हा सुरु करण्याची घोषणा नव्या सरकारने केली आहे. आदल्या दिवशी आबा गेले होते. आबांनी डांस बार बंद केले. हजारो मातांनी आणि त्यांच्या मुलांनी आबांना तेव्हा दुवा दिला. असंख्य आयुष्यं त्यातून सावरली.

आबांनी हातात झा़डू घेतला होता. फोटो काढण्यासाठी नाही. त्यांच्या योजनेतून महाराष्ट्रातील हजारो गावं स्वच्छ झाली. ती योजना राबवताना आबा खरच गाडगेबाबा होऊन गेले. राजकारणातील गाडगेबाबा म्हणून त्यांची अोळख बनली.


सकाळी मुख्याध्यापकांचा कार्यक्रम आटपून विधानभवनात जाण्यासाठी बोरवलीला फास्ट ट्रेन पकडली. डब्यात शिरणं शक्य नव्हतं म्हणून गार्डच्या डब्यात गेलो. डब्यात आणखी 1-2 गार्ड आणि मोटरमन होते. आबांचा विषय निघाला. मधे मोटरमनच्या संपाच्यावेळी आमच्यावर बांका प्रसंग होता. पण आबांमुळे आम्ही वाचलो. मोटरमन पुन्हा पुन्हा सांगत होते. गार्डसाहेब म्हणाले 'तुमच्यासारखे आबा एकदा गार्डच्या केबीनमध्ये आले होते. मला म्हणाले, मी गृहमंत्री आहे. ते एकटेच होते. माझ्यासोबत दादरपर्यंत त्यांनी प्रवास केला. किती साधा माणूस होता हो? असा माणूस होणे नाही.'

कपिल पाटील, वि. प. स. 
अध्यक्ष, लोक भारती