Friday, 14 May 2021

मार्कुस दीपक, अस्वस्थ अरविंद आणि ऑक्सिजन मॅन


मार्कुस रॅशफोर्ड अवघ्या 23 वर्षांचा आहे. फुटबॉलपटू. ब्रिटिश सरकारने करोनाच्या कहरात काटकसरीचे उपाय जाहीर केले. शाळेतल्या मुलांचं मिड डे मिल बंद करून टाकलं. त्या बातमीने मार्कुस अस्वस्थ झाला. त्याला आठवलं त्याचं लहानपण. गोरा रंग नसलेल्या समाजात जन्मलं की कोणतं दारिद्रय अनुभवायला लागतं, ते त्याला आठवत होतं. शाळेत जेवण मिळतं, म्हणून तो शाळेत नियमित जात होता. मार्कुसने थेट प्रधानमंत्र्यांपर्यंत पत्रापत्री केली. मग स्वतःच पुढाकार घेतला. क्राऊड फंडिंग केलं. मागच्या जून महिन्यातच त्याच्याकडे 190 कोटी जमले होते. अन्न वाया घालवण्याच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थेची मदत घेतली. मित्रांची, देणगीदारांची, अनेक संस्थांची. उपाशी राहणाऱ्या मुलांना तो मदत करत होता. जे सरकार लक्ष देत नव्हतं, त्याच सरकारने अखेर त्याला Member of the Order of the British Empire (MBE) या पुरस्काराने राणीच्या हस्ते गौरवलं. शनिवारच्या लोकसत्तेत ही कथा येऊन गेली आहे.   

 

आपल्या देशात प्रधानमंत्र्यांनी लॉकडाऊन अचानक जाहीर केला, त्यानंतर किती ससेहोलपट झाली गरिबांची. स्थलांतरित कामगारांची. लॉकडाऊनमुळे शाळा बंद म्हणून अडचणीत आलेल्या मुलांची संख्याही मोठी आहे. मुंबई छात्र भारतीचा अध्यक्ष रोहित ढाले आणि त्याच्या टीमने पहिल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरीत मजुरांमध्ये धान्याचे किट पोचवले होते. एक, दोन नाही 1 लाख 25 हजार मजुरांपर्यंत.त्याची कथा मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितली होती. 


 

मार्कुस दीपक -

पण मी जिथे राहतो त्या गोरेगावात आणखी एक मार्कुस रॅशफोर्ड राहतो. त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. त्याचं नाव दीपक सोनावणे. दीपक भगतसिंग नगरच्या झोपडपट्टीत राहतो. एकट्या आईने केलेल्या कष्टातून तो बीएसडब्लू झाला. गोरेगावात तो सेवा दलाचं कामही करतो.  

 

पहिल्याच लॉकडाऊनमध्ये भाकर फाउंडेशनच्या मदतीने त्याने घरोघरी रेशन पोचवण्याचा उपक्रम सुरु केला. ज्यांच्या घरी चुल नाही, त्यांना गरमा गरम जेवण देण्याची योजना आखली. भगतसिंग नगर मधील त्याच्या वयाची आरती डोईफोडे, आकाश क्षीरसागर, सरिता पोटे, मयूर जाधव, सिमरन शेख, जमिला शेख, जिनत शेख, सुचिता सोनावणे, सहिल पोटे, करूणा सोनावळे, सुमित कांबळे, अजय भालेराव आणि इतर अशी 27 मुलं त्याच्या मदतीला आली. रोज 700 जणांना तो जेवण देत होता. आता दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ते सगळं चालू आहेच. पण 200 हून अधिक मुलांना तो घरोघरी जाऊन अंडी व केळी पुरवतो आहे. मुलांची आबाळ होऊ नये. त्यांना जीवनसत्व सर्व मिळावीत, म्हणून केळी आणि अंड्यांची आयडिया. या कामात त्याला पार्ले जी, निर्मला निकेतन, टीस, एसार फाउंडेशन, केशव गोरे ट्रस्ट, युआरएफ, ग्रीन कम्युनिटी आणि इतर विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. दीपक आणि त्याची सगळी टीम दिवसभर राबत असते. दीपक सारखे कितीतरी मार्कुस रॅशफोर्ड मुंबईत, राज्यात किंवा देशात असतील. फरक इतकाच की सोनू सूदला जी प्रसिद्धी मिळते ती या मार्कुस दीपकच्या वाट्याला येत नाही.  


 

अस्वस्थ अरविंद - 

या मालिकेत मी अरविंदच्या कामाबद्दल लिहलं नाही, तर तो मोठा अन्याय ठरेल. आणि मी अपराधी. पहिला लॉकडाऊन झाला तेव्हापासून अरविंद सावला अस्वस्थ होता. एक दिवसही तो घरात थांबत नव्हता. आपला मित्र आशिष पेंडसेला घेऊन तो बाहेर पडायचा आणि अडचणीतल्या लोकांना मदत मिळवून द्यायचा. व्यापाऱ्यांकडून मदत घेऊन कितीतरी मजुरांना त्याने शिधा बांधून गावी पाठवलं. त्यांच्या तिकीटाची सोय केली. उत्तर भारतीय शिक्षकांसाठी शिक्षक भारतीने स्पेशल ट्रेन सोडली, तर व्यवस्थेला आर्वजून अरविंद हजर होता.  

 

अस्वस्थ असणं हा अरविंदचा स्थायी भाव आहे. पुढे पुढे करणं, पद मिरवणं हे त्याच्या स्वभावात नाही. विचाराने लोहियावादी. महमद खडस आणि गोपाळ दुखंडे यांचा प्रिय सहकारी. महमद भाईंबरोबर तो चिपळूणला कितीतरी वेळा गेला असेल. आता कधीकधी समर खडस बरोबर जातो. गोपाळ दुखंडेंची शेवटच्या काळात सेवा अरविंदच करत होता. दुखंडे सावंतवाडीला जाऊन राहिले, तेव्हा त्यांच्या घराची व्यवस्था तोच पाहत होता. अस्वस्थ असण्याचा त्याचा स्वभाव हा दुखंडेंचा परिणाम असेल कदाचित. 2014 ला केंद्रात भाजपचं राज्य आलं आणि अरविंद एकदम अस्वस्थ झाला. तो गुजराती भाषिक, एक छोटा व्यापारी. पण मोदी राज्याचं संकट त्याला स्पष्ट दिसत होतं. राजकारण आणि निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण करणं हा त्याचा आणखी एक छंद. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून अरविंद प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो. तो काही शिक्षक भारतीचा पदाधिकारी नाही. पण शिक्षक भारतीचा कार्यक्रम असो की माझी निवडणूक असो अरविंद 24 तास हजर असतो. सेवा दलातही तो काही पदाधिकारी नाही, पण गोरेगावात 14 ऑगस्ट मध्यरात्रीचं झेंडा वंदन तो कधी चुकवणार नाही. 

 

सेकंड लॉकडाऊनमध्ये अरविंद पुन्हा कामाला लागला. अंधेरीला व्यापारी समाजाची एक इमारत आहे. दोन मोठे हॉल आहेत. अरविंदने त्यांना राजी केलं. 45 खाटांचं कोविड हॉस्पिटल इथे सुरु झालंय. हॉस्पिटलचं काम तो काही वर्क फ्रॉम होम करत नाही. स्वतः रोज जाऊन बसतो. त्याला सांगावं लागतं की, स्वतःची काळजी घे. 


 

ऑक्सिजन मॅन -  

मालाड, मालवणीला खारोडी व्हिलेज आहे. आता व्हिलेज राहिलेलं नाही स्लम उभी राहिली आहे. इथेच छोटी घरं बांधून देण्याचा व्यवसाय करणारा शाहनवाज शेख राहतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आपल्या मित्राच्या बहिणीला ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून झालेली धडपड त्याने पाहिली होती. तेव्हाच त्याने गरजुंना  ऑक्सिजन सिलेंडर पोचवण्याचा निर्णय घेतला. आपले मित्र आणि व्यवसायातल्या सहकाऱ्यांची मदत घेतली. ज्यांना गरज आहे, त्यांना तो ऑक्सिजन सिलेंडर पोचवू लागला. डायरेक्ट हॉस्पिटल किंवा होम डिलिव्हरी. एकदम फुकट. एक रुपयाही चार्ज करत नाही. पैसे कमी पडू लागले तर त्याने कुणाकडे मागितले नाहीत. पठ्ठ्याने आपली गाडी विकून टाकली. दुसरा लॉकडाऊन सुरु झाला, शाहनवाजचं ऑक्सिजन पुरवणं थांबलेलं नाही. आतापर्यत त्याने आणि त्याच्या युनिटी अँड डिग्निटी फाउंडेशनच्या टीमने सहा हजार जिंदगी वाचवल्या. त्याला म्हटलं ऑक्सिजन आणतो कुठून? तो म्हणाला, वसई आणि पालघर एमआयडीसीपर्यंत जातो. लागेल ती किंमत मोजून ऑक्सिजन आणतो. आता एमआयडीसीवालेही त्याला त्याचं काम बघून सवलत देऊ लागले आहेत. रमजान सुरु आहे. कुराण शरीफमध्ये म्हटलंय, तुम्ही एकाचा जीव वाचवाल, तर सगळ्या माणुसकीचा जीव वाचवाल. शाहनवाज ते निष्ठेने करतो आहे. 


 

निसार अली - 

मालवणी हे सेवा दलाचं जुनं केंद्र. विवेक पंडित आणि पूर्णानंद सामंत यांनी तिथे सेवादल सुरु केलं. प्रमोद निगुडकर, सुरेश कांबळे यांनी पुढे काम वाढवलं. मालवणी मिश्र वस्ती. कैक वर्षांपूर्वी इथे स्फोटक तणावाचं वातावरण तयार झालं होतं. पण पूर्णानंद सामंत, सुरेश आणि प्रमोदच्या पुढाकाराने शांतता प्रस्थापित झाली. काही गडबड होऊ दिली नाही. सुरेश कांबळे आणि निसार अली याच वस्तीत काम करतात. सुरेश कांबळे अखंड मदतीसाठी धावत असतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये निसार अलीने गरजुंना धान्य पोचवण्याचा प्रयास केला आणि अजूनही तो करतो आहे. कष्टकरी कामगारांना रेशनची मदत असो, बकरी ईदच्या निमित्तने प्लाझ्मा डोनेशनचा उपक्रम असो, परिसरात सॅनिटायझेशनचं काम असो, रक्तदान शिबीर, लसीकरणासाठी आवाहन निसार अली आणि त्यांची पत्नी वैशाली महाडिक हे दाम्पत्य सतत कार्यरत आहे. कौटुंबिक, आरोग्याच्या अडीअडचणी बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी दिवस रात्र झटत आहेत.     

 

- कपिल पाटील 

Tuesday, 11 May 2021

पालिकेचं कौतुक आणि लसीचा घोळ


सुप्रीम कोर्टाने, नीती आयोगाने आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण मरत असताना, ऑक्सिजन नाही म्हणून मुंबईत एकही रुग्ण दगावला नाही. हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून आपल्याच कारमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये एकही रुग्ण प्रतीक्षा करत बसला नाही. महापालिकेचं असं एकही हॉस्पिटल नाही की, ज्याच्या दारात पेशंट ॲडमिशनसाठी बाहेर पथारी लागून वाट पाहतो आहे. 


आरोग्य सुधारणांसाठी काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या आप सरकारचं कौतुक झालं. म्हणजे आताच्या तुलनेत पूर्वी काय स्थिती असेल याचा अंदाज आता बांधता येईल. मुंबई महापालिकेची हॉस्पिटल्स आहेत. नर्सिंग होम आहेत. प्रसूती गृह आहेत. दवाखाने आहेत. खाजगी रुग्णालयं खूप आहेत, पण पेशंट सिरीयस झाला की त्याला केईएमला पाठवलं जातं. नाहीतर नायरला. कोविड आता आहे, पण सिरीयस पेशंटला वाचवण्याचा सर्वोत्तम दर मुंबई महापालिकेचाच राहिला आहे. आणि त्याचं श्रेय कायम गर्दीत गजबजलेल्या पालिकेच्या हॉस्पिटल्सना आहे. आणि डॉक्टरर्सनाही आहे. केईएमच्या ओपीडीमध्ये एकच डॉक्टर एका वेळेला दोन पेशंटना तपासताना मी पाहिलं आहे. एकदा नाही अनेकदा. 


महापालिकेच्या आणि सरकारी इस्पितळात मी माझे  आणि कुटुंबियांचे उपचार घेतले आहेत. चुकूनही खाजगी हॉस्पिटलला गेलो नाही. ही गोष्ट खरी की, गर्दी जास्त असते. त्यामुळे अस्वच्छता अधिक असते. म्हणजे साफसफाई कमी असते. पण बरं होण्याचा विश्वासही तिथं खूप मोठा भरलेला असतो. 


वर्ष झालं करोना सुरु आहे. दुसऱ्या लाटेने लोक भयभीत आहेत. पण बरं होण्याचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबई महापालिकेने उभारलेली कोविड हॉस्पिटल्स चांगल्या फोर स्टार हॉस्पिटलला शोभणारी आहेत. 


याचं सारं श्रेय अर्थात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि धारावी सारख्या झोपडपट्ट्या करोनाच्या संकटातून वाचवणारे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासारखे अधिकारी यांचं आहे. प्रवीण परदेशी यांनी आयुक्त असताना चांगलं काम केलं होतं. इकबालसिंग चहल अचानक आले. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता. पण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा उल्लेख टायगर म्हणून होतो. 'वाघा'ने म्हणूनच त्यांची नेमणूक केली असावी. इकबालसिंग चहल त्यांच्या नावाप्रमाणे कसोटीला खरे उतरले आहेत. ज्या झपाट्याने त्यांनी तात्पुरती हॉस्पिटल्स उभारली, तिथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याला दाद दिली पाहिजे. मुंबईत ऑक्सिजन कुठे कमी पडत नाही. याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. 


चहल यांच्यासोबतीने अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी अक्षरश: दिवस रात्र काम करत आहेत. प्रत्येक वॉर्डा, वॉर्डातली स्थिती त्यांना तोंडपाठ असते. मी स्वतः काकाणींना शंभरवेळा फोन केला असेल. जास्तच. त्यांना सांगितलं आणि पेशंटला ॲडमिशन मिळालं नाही, असं झालं नाही. पाठवलेला प्रत्येक पेशंट बरा होऊन आला. याचं श्रेय काकाणींना आणि सेव्हनहिलच्या डॉ. अडसुळांना द्यावं लागेल. मुंबईच्या पालिका हॉस्पिटलमधील सगळेच डॉक्टर्स अक्षरश: दिवसरात्र राबत आहेत. जोखीम भरल्या स्थितीत काम करत आहेत. सेव्ह
हिलचे डॉ. भुजंग पै आणि केईएमचे डॉ. प्रवीण बांगर वेळी, अवेळी एका फोनवर मदतीसाठी तत्पर असतात. 

 
महाराष्ट्राची स्थिती तुलनेने वाईट नाही. आणि महाराष्ट्राची स्थिती वाईट नसण्याचं कारण राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राचं नेतृत्व डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे आहे. वैद्यकीय विभागात काम केलेले एक आयएएस अधिकारी म्हणाले, राज्यातली आरोग्य यंत्रणा काम करतेय ही या माणसामुळे. प्रचंड वर्कहोलिक माणूस आहे हा. कधीही थकत नाही. नकार देत नाही. कितीही ताण असो, या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं असतं आणि डॉ. लहाने त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलावं, डोळ्यात दिसावं म्हणून अहोरात्र काम करत असतात. बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया लहानेंनी केली. ही मोठी माणसं कोणत्याही सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये जाऊन आपले डोळे दुरुस्त करू शकली असती. पण लहानेंचा हात लागला की डोळ्यात जान येते म्हणतात. डॉ. लहाने यांनी एकट्यांनी दोन लाखांच्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत. आणि त्यातल्या ९९ टक्के या गरीबांच्या आहेत. खेड्यात जाऊन नेत्र शिबिरं घेणं, आनंदवनात आय कॅम्प चालवणं, लहानेंचा नेम चुकत नाही. महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा कोविडशी चांगला मुकाबला करते आहे, याचं कारण या आरोग्य यंत्रणेचे संचालक डॉ. लहाने आहेत. आणि त्यांचे सगळे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि अर्थात नर्सेस. 


मुंबई आणि महाराष्ट्राचं कौतुक नक्कीच आहे. पण केरळपासून आपण आणखी काही शिकायला हवं, हे सांगितलं पाहिजे. लसीकरणात आपण मागे आहोत. थोडं आधी जागं व्हायला हवं होतं. त्याची कारणं राजकीय की मंत्रालयीन सल्लागारांच्या सल्ल्याची याचा शोध पत्रकार घेतीलच. केरळचं उदाहरण यासाठी दिलं की, केरळला व्हॅक्सिनचे डोस मिळाले, ७३ लाख ३८ हजार ८०६. आणि केरळने डोस किती लोकांना दिले ७४ लाख २६ हजार १६४ जणांना. म्हणजे ८७ हजार ३५८ जास्तीचे डोस दिले गेले. ही जादू कशी केली गेली? देशात कैक लाख डोस वाया गेले म्हणतात. अगदी महाराष्ट्रात आणि मुंबईतही. पण केरळने नियोजन असं केलं की मिळालेल्या व्हॅक्सिनमध्ये ८७ हजाराहून जास्त लोकांचं लसीकरण झालं. डोस अपुरा पडू नये म्हणून प्रत्येक बाटलीत जास्तीचा डोस असतो. बाटली उघडली की ती चार तासात द्यावी लागते. अन्यथा त्यातले डोस वाया जातात. केरळने वेळेचं नियोजन केलंच. पण प्रत्येक बाटलीतली जी अधिकची मात्रा होती, त्यांच्या बेरजेत ८७ हजाराहून अधिक लोकांचं त्यांनी लसीकरण केलं. लस कमी आहे म्हणून, जसं सात भावांनी तीळ वाटून खाल्ला तसं त्यांनी नियोजन केलं. आपणही हे का करू नये?


तिसरी लाट येण्याच्या अगोदर आपलं लसीकरण झालं पाहिजे. मिळेल ती लस मिळवली पाहिजे. सध्या सर्वात परिणामकारक आहे ती, रशियाची स्पुटनिक लस. त्याची पुरेशी मात्रा मिळाली तर २१ दिवसात मुंबई करोना मुक्त झालेली दिसेल. पालिकेचं, सरकारचं केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केलंच पाहिजे. पण लसीकरणामध्ये घातलेला घोळ दुरुस्तही केला पाहिजे. जेव्हा निर्बंध नव्हते तेव्हा लस का घेतली गेली नाही? त्याचं नियोजन का केलं गेलं नाही? कोविडशिल्डची लस पुण्यातच तयार होत होती. उत्पादन सुरु झालं ते दहा महिन्यांपूर्वी. आपण आपली मागणी का नोंदवली नाही? कोण सल्लागार आडवे आले? याचा शोध घेतला पाहिजे. हा घोळ घातला गेला नसता, तर मुंबई आणि महाराष्ट्र करोनामुक्त दिसला असता. ज्यांनी घोळ घातला त्यांना जबाबदार धरायला हवं. कारण माणसांच्या जीवाची किंमत मोठी आहे. त्या दोन अधिकाऱ्यांना सांभाळण्याची नाही. 

- कपिल पाटील     

Friday, 7 May 2021

Friday Flame Against biological & ideological Covid


देशातील जैविक आणि वैचारिक कोविडच्या विरोधात आज  #FridayFlameAgainstCovid प्रज्वलित केली जाणार आहे.

कोविडमध्ये बळी गेलेल्यांसाठी संवेदना, कोविड योद्धयांना समर्थन (Solidarity) आणि कोविडच्या आडूनही द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी घराघरात दिवा लावा, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलं आहे.

आज संध्याकाळी 6 वाजता (Live on fb.com/RSDIndian) होणाऱ्या फ्रायडे फ्लेम कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. मल्लिका साराभाई, कविता लंकेश, कन्हैया कुमार, डॉ. बाबा आढाव, निखिल वागळे, नंदिता दास, आनंद ग्रोव्हर, अश्रफ अली, नंदिनी सुंदर, इंदिरा जयसिंग, शांता सिन्हा, एअर मार्शल मतेश्वरन, डॉ. झहीर काझी, नितीन वैद्य, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, अंजली आंबेडकर असे अनेक मान्यवर सामील होणार आहेत.

फ्रायडे फ्लेम ही केवळ आदरांजली सभा नाही. करोनाची दुसरी लाट ही मानव निर्मित म्हणजे सरकारच्या अपयशाची आपत्ती आहे. आरोग्य सुधारणांकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, लसीकरणाबाबत दाखवलेली कमालीची बेफिकिरी हे त्याचं कारण तर आहेच. दुसऱ्या बाजूला प्रादेशिक शक्ती संपवण्यासाठी निवडणुकांमधला उन्मादी गर्दीचा घाट, कुंभमेळ्याला दिलेली परवानगी, मंदिर उभारणीतून करोनाग्रस्त जनतेला राम भूल देण्याचा झालेला प्रयत्न या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही आपत्ती आहे.

डॉ. गणेश देवी यांनी म्हणूनच Biological आणि Ideological करोनाच्या विरोधात Friday Flame असा शब्दप्रयोग केला आहे. 

डॉ. गणेश देवी हे काही राजकीय नेते नाहीत. भाषांचं काम करणारा, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांमध्ये रमणारा माणूस. पण संसदेत CAA, NRC ची विधेयकं मांडली जाण्याच्या कैक महिने अगोदर धारवाडवरून त्यांनी या  प्रस्तावित विधेयकांच्या विरोधात जागृतीची मोहीम छेडली होती. देशभरातल्या जाणकारांना त्यांनी 14 भाषांमधून या कायद्यांबद्दल आधीच जागरूक केलं होतं. धारवाडला  देशभरातील अनेकांना त्यांनी त्यासाठी मुद्दाम बोलावलं होतं. जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांना त्यांनी पत्र लिहली होती. आणि भिन्न समाज घटकातील नेत्यांनाही.

शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत पेटायचं होतं, त्याआधीच देवींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील APMC ना भेट देऊन याबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणतात, 'आंदोलनाचं नेतृत्व करणं हे माझं काम नाही. लिहण्याचं, बोलण्याचं, सांगण्याचं काम आहे.' ती जागृती, ते आंदोलन सामान्य कार्यकर्त्यांमधून उभं रहावं यासाठी पडद्यामागे राहून कौशल्याने आंदोलनाचा पट विणण्याचं काम देवी करत आहेत.

फ्रायडे फ्लेम ही अशीच उद्याच्या आंदोलनाला प्रेरित करणारी घटना ठरेल, यात शंका नाही. विश्वास हरवलेल्या सर्वसामान्यांना त्यातून किमान दिलासा मिळेल. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याला गती मिळेल. आणि यातूनच पुढची काही आखणी होऊ शकेल.

करोना लसीकरणातून उद्या जाईलही. पण विद्वेष आणि भेदभावाचं राजकारण दूर सारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. फ्रायडे फ्लेम ही त्याची सुरवात ठरावी.

--------------------------

फ्रायडे फ्लेमचा कार्यक्रम -
पुढील पाच शुक्रवारी अशा ऑनलाईन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुढचा शुक्रवार पत्रकारांसाठी आहे. देशातील मान्यवर पत्रकार सहभागी होणार आहेत.  
दि. 14 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
देशभरातील कोरोनात बळी गेलेल्या जवळपास 500 (महाराष्ट्रात 124) पत्रकारांना अभिवादन आणि एकजूट दाखवण्यासाठी.

तिसरा शुक्रवार दि. 21 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
कोरोनात बळी गेलेल्या देशातील फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस, आशाताई, शिक्षक, कामगार यांच्या बलिदानाला अभिवादन आणि त्यांच्या लढाईला पाठिंबा.

चौथा शुक्रवार दि. 28 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
जैविक आणि वैचारिक कोविड विरोधात लढणाऱ्या देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा निर्धार.

पाचवा शुक्रवार, दि. 4 जून,
धैर्य, एकजूट, आशा आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा उपवास.

- आमदार कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल 

Wednesday, 5 May 2021

फ्रायडे फ्लेम कशासाठी?

 
शिक्षक, विद्यार्थी आणि बंधू, भगिनींनो,

साथीनो,
कोविडच्या भयंकर महामारीचा सगळं जग सामना करतं आहे. या संकटात आपले काही सहकारीही आपल्यातून निघून गेले. डॉक्टर, नर्सेस, पत्रकार आणि सामान्य रुग्ण यांची तर गणतीच नाही. कोविड बळींचा आकडा 2 लाख पार गेला आहे. वाईट याचं अधिक वाटतं की, कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षकांच्या कुटुंबियांना अद्यापी विमा कवच मिळालेलं नाही. ज्या कर्मचाऱ्यांना विमा कवच आहे, त्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पगारही उशीरा होत आहेत. कर्जाचे हफ्ते चुकत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची तर वाताहात झाली आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे तर किती हाल असतील. आणि ज्यांनी सर्वस्व गमावलं त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर किती असेल. कल्पनाही करवत नाही.

एक गोष्ट खरी देशाचा कारभार हाकणाऱ्यांनी करोनाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. जगभरचे देश आपल्याच देशात बनलेली लस घेऊन जात असताना आपण लसीची मागणी आता मार्च महिन्यात केली आहे. म्हणजे आठ महिने उशिरा सरकार जागं झालं. दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या, मंदिरे आणि नव्या संसदेचं (सेंट्रल विस्टा) भूमिपूजन झालं. कुंभमेळा झाला आणि दुसरी लाट आली. 

तरीही निर्धाराने आपल्याला सामना करावाच लागणार आहे. तिसरी  लाट आपल्या घरात येऊ नये, आपल्या मुलांना आणि आपल्या आप्तांना त्याची झळ लागू नये याची काळजी आपणच केली पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक सर्वांचे अनेक प्रश्न आहेत. शाळा यावर्षी तरी सुरू होणार की नाही? हाही मोठा प्रश्न आहे. पण सगळं सुरळीत होण्यासाठी आपण आपल्यातला विश्वास जागवला पाहिजे. करोनावर एकदा मात केली की आपण आपल्या प्रश्नांना सुद्धा हात घालू शकतो. आपले अनेक सहकारी कोविडच्या काळात मदत कार्यात गुंतले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तर भाऊसाहेब चासकर आणि त्यांच्या सगळ्या सहकारी शिक्षक मित्रांनी वर्गणीतून कोविड सेंटर उभं केलं आहे. थक्क करणारी गोष्ट आहे. तिथे विदर्भात, झाडीपट्टी आणि वऱ्हाडात शिक्षकांनी असेच पुढाकार घेतले आहेत.  इतरही अनेकजण या ना त्या स्वरूपात मदत करतच आहेत. आपण कुणा एकाला जेव्हा मदत करतो, दुःखात किंवा अडचणीत धीर देतो ते काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि माणुसकीचं आहे. 

कोविड जात, पात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग काहीच पाहत नाही. मदत करणारे हातही ही सगळी बंधनं पार करत फक्त माणुसकीचं बंधन हाती बांधून आहेत. जीवशास्त्रीय करोनावर मात करता करता भेदभावाच्या करोनावरही आपण मात करतो आहोत.

राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी एक आवाहन केलं आहे. डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ. आदिवासी आणि भटक्या विमुक्तांमध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे. देशातील 700 हून अधिक भाषांना पुनर्प्रतिष्ठा देण्यासाठी ते झगडत आहेत. साने गुरुजींच्या आंतर भारती विचारांचे ते वाहक आहेत. आणि आता सेवा दलाचे नेतृत्व करत आहेत.

पुढचे पाच शुक्रवार (7 मे ते 4 जून दरम्यान येणारे पाच शुक्रवार) या दुःख हरणासाठी, आशा आणि उमेद जागवण्यासाठी, मातृभाव जपण्यासाठी आणि संकटाशी सामना करण्याचा निर्धार करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 6 नंतर आपल्या दारात, प्रत्येक उंबऱ्यावर एक दिवा, एक मेणबत्ती लावण्याचं आवाहन देवी सरांनी केलं आहे. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी झूम आणि फेसबुक लाईव्हद्वारे ऑनलाईन राहूया. प्रत्येक घरात प्रार्थनेची, आशेची आणि निर्धाराची ज्योत 'FRIDAY FLAME' आपण उजळवूया. भीतिमुक्त भारताची आशा पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आपण  घेत असलेल्या 'फ्रायडे फ्लेम' ऑनलाईन कार्यक्रमात भारतातल्या अनेक राज्यातील मान्यवर व्यक्ती, नेते, कलाकार, विचारवंत, क्रीडापट्टू, वार्ताहर सामील होत आहेत. 

आपल्या घरात, मित्र, नातेवाईक, सहकारी प्रत्येकाच्या उंबऱ्यावर एक दिवा लागेल यासाठी आपण आजच कामाला लागूया. शेवटच्या शुक्रवारी एक दिवसाचा सामूहिक उपासही करूया. मनामनात फ्रायडे फ्लेम.

राष्ट्र सेवा दलाशी जोडण्यासाठी आणि अपडेट्ससाठी

फेसबुक पेजला Like करा,

ट्विटरवर Follow करा,

इंस्टाग्रामवर Follow करा,

युट्युब चॅनल Subscribe करा,

फ्रायडे फ्लेमचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर / पोस्ट करताना वरील राष्ट्र सेवा दलाच्या वरील सर्व सोशल मीडिया हँडल्सना Tag करा. #FridayFlameAgainstCovid #RSD हे हॅशटॅग वापरा.
जिंदाबाद!

सस्नेह,
आमदार कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल