Saturday 30 September 2017

त्या २२ घरात ...


आजच्या सणाच्या शुभेच्छा देताना कालच्या दुर्घटनेची आठवण गळ्याशी दाटून आली आहे. त्या २२ जणांच्या घरात आज सण नसेल. काय दोष होता त्यांचा? कुणाचा कमावता मुलगा गेला होता. कुणा लहानग्यांची आई.

माझे मित्र आणि विधान परिषदेतील पूर्वीचे ज्येष्ठ सहकारी, आताचे खासदार अरविंद सावंत यांनी त्या परळ-एलफिस्टन पुलाबद्दल खुद्द रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांना रेल्वे मंत्र्यांनी उत्तर काय दिलं? पैसे नाहीत म्हणून.

सहा फुटी फूट ओव्हर ब्रीजसाठी भारत सरकारकडे पैसे नाहीत पण बुलेट ट्रेन आणायला पैसे आहेत. मेल्यानंतर काय लागतं? सहा फुटांचा खड्डा नाहीतर सहा फुटांचं सरण. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून या २२ जणांचे जीव गेले. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला ३० हजार कोटी द्यायचे आहेत. महाराष्ट्र शासन देणार आहे. 

मुुंबई बँक सरकारला २ हजार कोटी रुपये देणार आहे. म्हणून बुडणाऱ्या बँकेत मुंबईतल्या माझ्या शिक्षकांचे पगार ढकलण्यात आले. 

काळया पैशाचा नायनाट करायला नोटबंदी केली. ब्लॅकमनीवाले कमिशन देऊन सुटले. भारताची अर्थव्यवस्था मात्र कोसळायला लागली आहे. भाजपचेच माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे. मनमोहन सिंग सांगत होते की, दोन टक्क्यांनी जीडीपी खाली जाईल. गेलीच.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली खरी पण त्यासाठी ३ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. दोन वर्ष शेतकरी रस्त्यावर होता सरकार ऐकायला तयार नव्हतं. 

परळ-एलफिस्टनच्या चेंगराचेंगरीमध्ये काही मिनिटात २२ माणसं मारली गेली. आता सरकार स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. गेल्या वर्षात ३,५०० माणसं मुंबईतल्या ट्रेनखाली मारली गेली. या आठ महिन्यातला आकडा २,००० वर गेला आहे. 

हे सरकार आल्यापासून शेतकरी आणि शिक्षक यांना छळण्याचा कार्यक्रमच हाती घेण्यात आला आहे. रोजगाराचा पत्ता नाही. पण शिक्षणाच्या व्यापारीकरणाला दारं उघडी करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात मागच्यावेळी समाजवादी सरकार होतं. तिथल्या १ लाख ७८ हजार शिक्षा मित्रांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मला बोलावून घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या ८ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कायम कसं केलं? हे विचारण्यासाठी. आता योगींचं सरकार आलं आहे. त्या १ लाख ७८ हजार शिक्षकांना योगी म्हणतात, ३९ हजार पगारावर नाही  तर १० हजार मानधनावर काम करा. 

महाराष्ट्रात ७ हजार शिक्षक आणि शिक्षण सेवकांना काढून टाकण्यात आलं. कोर्टाने वाचवलं. पण अजून पगार सुरु करायला सरकार तयार नाही. रात्रशाळा शिक्षकांना देशोधडीला लावण्यात आलंय आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे. रात्र ज्युनिअर कॉलेजला तर एकही सरप्लस शिक्षक पाठवता येत नाही म्हणून ज्युनिअर नाईटच्या शिक्षकांना परत बोलावण्यात आलं. पण गेल्या ४ महिन्यात १ रुपयाचा पगार देण्यात आलेला नाही. परवा संस्थाचालक मोठ्या अपेक्षेने शिक्षणमंत्र्यांना भेटायला गेले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांना नकार घंटा वाजवून परत पाठवलं.  

बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थीनी रोज आंदोलन करताहेत. पण त्यांना सुरक्षा द्यायला सरकार तयार नाही. कुलगुरु मुलींनाच दोष देताहेत आणि संस्काराचे धडे शिकवताहेत. मुंबई विद्यापीठात म्हाळगी प्रबोधिनीतून तयार झालेले कुलगुरु कसा कारभार करत होते हे दोन वर्ष आपण पाहतो आहोत. निकालांचा बट्टयाबोळ झाला. हजारोंचं पुढचं शिक्षण बोंबललं. पण सरकारला पर्वा नाही. 

विजयादशमीचा सण रावण दहनासाठी प्रसिद्ध आहे. दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करायला शमीच्या झाडावरुन पांडवांनी शस्त्र उतरवली तो हा दिवस. भारताला ज्याच्या राज्यामुळे ओळख मिळाली त्या सम्राट अशोकाच्या विजयाचा हा दिवस. मनुस्मृतीचं अंधार राज्य संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र फिरवलं तोही हाच दिवस. परिवर्तनाचे चक्र फिरवण्यासाठी संकल्प करायला यापेक्षा आणखी कोणता दिवस हवा. 

विजयादशमीच्या शुभेच्छा! 

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील
आमदार, विधान परिषद

शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०१७

(व्यंगचित्र - प्रदीप म्हापसेकर)

Monday 25 September 2017

अरुण साधू यांना विनम्र आदरांजली


अरुण साधू खरंच साधू माणूस होता. एवढा मोठा साहित्यिक. कादंबरीकार. पण मंत्रालयातल्या प्रेस रुममध्ये पत्रकार म्हणून वावरताना त्यांनी कधीही जाणवू दिलं नाही. सामान्य श्रमिक पत्रकारासारखे ते वागत. ते मितभाषी होते. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारतानाही कधी दिसत नसत. पण आम्हा पत्रकारांना जे दिसत नसे, जे ऐकू येत नसे, ते त्यांना दिसत असे, ऐकू येत असे. सिंहासन आणि मुंबई दिनांक या त्यांच्या कादंबऱ्या ज्यांनी वाचल्या असतील त्यांना महाराष्ट्राचा राजकीय पट खडानखडा समजला असेल. राजकारणातल्या रस्त्यावरच्या अंधाऱ्या जागा, त्यातल्या हालचाली, राजकारणामधला माणूस, त्या माणसाचा सामान्य व्यवहार, त्याच्या राजकीय निर्णयामागचा कार्यकारण संबंध इतक्या सहजतेने ते लिहीत जात. त्या कादंबऱ्यांवर पुढे चित्रपट निघाले. त्यांच्या कादंबऱ्या आणि चित्रपटांनी महाराष्ट्रात थोडी खळबळ झाली. लोक चकीतही झाले. पण त्यावेळच्या राजकारण्यांचेही मोठेपण की त्यांनी साधूंच्या कादंबऱ्यांचा आणि चित्रपटांचा आस्वाद घेतला. मग ते यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील की शरद पवार की जॉर्ज फर्नांडीस. अरुण साधू यांच्या राजकीय कादंबऱ्यांमध्ये सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू होता. 

इंग्रजीत ते लिहीत असत. इंग्रजी पत्रकारिकेतला त्यांच्या काळातला तो मोठा माणूस. पण मराठीवर विलक्षण प्रेम. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले. पण कुठेही बडेजाव नाही. प्रेस रुममध्ये त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारायला मिळाल्या. मी शिक्षकांचा आमदार झालो त्याचं कौतुकही त्यांना वाटलं. माझ्या विधान परिषदेतील निवडक भाषणांचा आयुध नावाचा संग्रह प्रकाशित झाला त्यासाठी नुसतं एका फोनवर त्यांनी अभिप्राय लिहून पाठवला. आता ते नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र सोबत आहेत. 

अरुण साधू यांना विनम्र आदरांजली. 

- कपिल पाटील, वि.प.स.


Friday 15 September 2017

रोहिंग्या मुस्लिम : प्रकाश आंबेडकर, कपिल पाटील, राजू शेट्टी यांचे आवाहन


रोहिंग्या समूदायाला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

म्यानमार सरकारने रोहिंग्या समुदायावरची दडपशाही थांबवावी, नागरिक म्हणून त्यांचा हक्क प्रदान करावा म्यानमार सरकारला आवाहन

मुंबई, १५ सप्टेंबर २०१७ : 
म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लीम समुदायावर सुरू असलेले अत्याचार अस्वस्थ करणारे आहेत. तेथील लष्कर या समुदायाचा वांशिक नायनाट करण्याच्या हेतूने वंशसंहार घडवून आणत आहे. म्यानमार लष्कराच्या अत्याचारामुळे निर्वासित झालेले तीन लाख रोहिंग्या मुस्लीम बांग्लादेशात आश्रयाला गेलेले आहेत. तर चाळीस हजार निर्वासित भारतात येऊन मदत मागत आहेत. भारतात आश्रयाला आलेल्या रोहिंग्या समुदायाला भारत सरकारने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत. 

भारत सरकारने यापूर्वी विविध देशातल्या छळ झालेल्या, मदत मागणाऱ्या निर्वासितांना नेहमीच मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या देशात आसरा दिला आहे, मदत केली आहे. रोहिंग्या मुस्लीम समुदायालाही तशीच मदत करून म्यानमार सरकारकडे रोहिंग्या समुदायावरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने रदबदली केली पाहिजे. २०१२ नंतर म्यानमारमध्ये अराकन रोहिंग्या सॉल्वेशन आर्मी ही संघटना सक्रिय झाली. त्यानंतर तर रोहिंग्यांवरच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आम्ही म्यानमारमधील दोन्ही बाजूंच्या व्यक्ती, संघटनांना हिंसाचारापासून दूर राहून शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत.     

बांग्लादेशातील शेख हसीना सरकारने रोहिंग्या समुदायाला मदतीसाठी महत्वाचे प्रयत्न करत त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. भारत सरकारनेही बांग्लादेशात मदत पाठवण्याची भूमिका घेऊन या प्रश्नावर शेख हसीना सरकारच्या हातात हात घालून मदत करायची तयारी दर्शवली आहे. भारत सरकारच्या या भूमिकेची आम्ही प्रशंसा करत आहोत. निर्वासित आणि आश्रय मागणाऱ्या परदेशी नागरिकांविषयी भारत सरकारने योग्य कायदा तयार करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. रोहिंग्या मुस्लीम समुदायाची भारतातून हाकालपट्टी करा, असा सूर लावणारे जातीयवादी राजकारण करत आहेत. या विषयावर मानवतेच्या दृष्टीकोनातून उत्तर शोधले पाहिजे. म्यानमारमधील इतर नागरिकांसारखे रोहिंग्या मुस्लीमांनाही रखीने प्रांतात त्यांचे योग्य पुनर्वसन करून नागरिकत्व मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने त्वरीत कार्यवाही म्यानमार सरकारने केली पाहिजे, असे आम्हाला वाटते. रोहिंग्याच्या वंशसंहाराविषयी आंतरराष्ट्रीय समुदायानेही युनायटेड नेशनचे जनरल सेक्रेटरी  यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रश्नाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंड फुटले आहे. दलाई लामा, डेसमन्ड टूटू, पोप फ्रान्सिस आणि इतर अनेक शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या मान्यवरांनीही शांततेचे आवाहन केले आहे. रोहिंग्या मुस्लीमांना सुरक्षितता आणि न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह आंतरराष्ट्रीय स्तरावर धरला आहे. 

रोहिंग्या मुस्लीमांची परवड ही एक मानवी शोकांतिका आहे. दक्षिण आशियामधील सर्व सरकारांनी एकत्र येऊन संवाद करून शांततेच्या मार्गाने या प्रश्नावर न्यायाचा तोडगा काढला पाहिजे, असे आम्हास वाटते. भारतीय जनतेने या प्रश्नाला करूणा भावाने आणि अंतःकरण मोठे करून प्रतिसाद द्यायला हवा. दक्षिण आशियातील सर्व सरकारांना, संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय समूहांना हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आवाहन करूया. 

--

प्रकाश आंबेडकर         
खासदार राजू शेट्टी            
आमदार कपिल पाटील
हसन कमाल                
फिरोज मिठीबोरीवाला         
फारूख शेख

--------------------------------


We appeal to PM Modi to extend all means of Humanitarin support to the Rohingya community

We also call upon the Government of Myanmar to show restraint and accept the Rohingya community as citizens

15th September 2017 (Mumbai) :
We are extremely perturbed by the plight of the Rohingya Muslim community. It is clear that they are being subjected to ethnic cleansing and genocide at the hands of the Myanmar military.  The human tragedy that is unfolding right before our eyes needs to be addressed as now there are more than 3,00,000 refugees in Bangladesh and 40,000 in India, who have fled the violence and mayhem wrecked upon them. 

We appeal to the Government of India to support the Rohingya refugees, just as we have always been an abode of refuge for all other beleaguered communities, who have faced oppression in their nations. We also appreciate the fact that the Government of India has called for "restraint" on the part of the Myanmar Government. The situation is also more complex now with the emergence of the Arakan Rohingya Salvation Army (ARSA) that have emerged in the aftermath of the atrocities since 2012 & we appeal to both sides to desist from any violence. 

We also commend the Government in sending aid to Bangladesh to lend a helping hand to Sheikh Hasina's Government which has undertaken the larger responsibility of providing a safe refuge to the Rohingya.

We also appeal to the Government of India to formulate a clear law on refugees and asylum seekers. All talks of deportation are mere empty rhetoric & pandering to communal politics, as the Rohingya's have nowhere to go. The only humanitarian solution is for the Govt of Myanmar to accept and rehabilitate the Rohingya in the Rakhine state and grant them full citizenship rights, just as they have to all other Myanmarese.

The international community too has spoken out with the UN General Secretary terming it as a genocide.  There have been appeals from the Dalai Lama, Fr. Desmond Tutu, Pope Francis & many other Noble Peace laureates who have all called for peace in the region and for the safety, security and justice for the Rohingya people.

We also call upon the people of India to respond with compassion and a large heart & further appeal to the governments of South Asia to come together and resolve this human tragedy through peace and dialogue.

--

Prakash Ambedkar                        
Raju shetti, MP                    
Kapil Patil, MLC
Hasan Kamal                                  
Firoj Mithiboriwala             
Farukh Shaikh

Monday 11 September 2017

दोष डॉ. मेधा खोलेंचा नाही

ब्राह्मणी धर्माचा आहे


डॉ. मेधा खोले हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या घरी गौरी गणपती येतो. दरवर्षी आई-वडिलांचा श्राद्ध विधी त्या नित्य नेमाने करतात. या दोन्ही प्रसंगी सोवळ्याचा स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी बाई नेमल्या होत्या. दोन वर्षांनंतर गणपतीला आलेल्या भटजींनी स्वयंपाक करणाऱ्या बाई ब्राह्मण नसल्याचे सांगितले. बाईंची जात कळल्याने खोले बाई संतप्त झाल्या. त्यांचे देव बाटले होते. स्वर्गातल्या आई-वडिलांचा श्राद्ध नैवेद्य बाटला होता. आपल्या धार्मिक भावनांना धक्का पोचला, फसवणूक झाली म्हणून त्यांनी त्या महिले विरुद्ध पोलिसात तक्रार केली. 

डॉ. मेधा खोले यांच्या म्हणण्यानुसार त्या स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांना सोवळ्यातली ब्राह्मण बाईच स्वयंपाकाला हवी होती. निर्मलाताई यादव यांची जात कळल्यावर त्यांना धक्का बसला. निर्मलाताई जातीने मराठा आहेत. मराठा बाईने ब्राह्मणाच्या घरात स्वंयपाक केला, त्यामुळे त्यांचं घर, त्यांचा गणपती आणि त्यांचे पितर सगळेच बाटले होते. 

डॉ. खोले बाईंचे तीन आक्षेप आहेत. 
१. त्यांना सोवळ्यातली बाई हवी होती. 
२. त्यांना सुवासिनी (सवाष्ण) बाई हवी होती. (पती हयात असणारी) 
३. त्यांना धर्माने ब्राह्मण बाई हवी होती. 

निर्मला यादव यांनी या तिन्ही गोष्टी मोडल्या. पती हयात नसणारी म्हणजे विधवा बाई. तिचा हातचा स्वयंपाक कसा चालणार? त्यात निर्मलाताई जातीने मराठा. म्हणजे ब्राह्मणी धर्मानुसार शुद्र. (परशुराम आणि कर्णाची गोष्ट आठवत असेल. कर्ण क्षत्रिय म्हणवत होता. पण तो ब्राह्मणी धर्मानुसार शुद्रच. म्हणून परशुराम खवळला होता.) पुन्हा बाई सोवळ्यातली नाही. यावर इथे लिहणंही प्रशस्त नाही. 

ही घटना महात्मा जोतीराव फुले यांच्या काळातली नाही. ब्राह्मण विधवांचं केशवपन थांबवण्यासाठी फुलेंनी महाराष्ट्रातल्या नाभिकांना संपाची हाक दिली, तेव्हाची ही घटना नाही. विधवा ब्राह्मण स्त्रीयांच्या टाकून दिलेल्या मुलांसाठी फुले दांपत्याने देशातलं पहिलं बालगृह उघडलं, त्या काळातली ही घटना नाही. 

ही घटना सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत शिकवायला जात होत्या तेव्हाची नाही. सावित्रीबाईंच्या शाळेत ब्राह्मण, मराठा, माळी, मांग, महार अशा सर्व जातींच्या मुली पहिल्यांदा शिकायला लागल्या होत्या, तेव्हाची ही गोष्ट नाही.

ही घटना वेदोक्त प्रकरण गाजत होतं त्यावेळचीही नाही. शाहू महाराज शुद्र आहेत म्हणून नारायण भटाने वेदोक्त मंत्र म्हणायला नकार दिला. महाराजांना माहीत नव्हतं. पण शाहू महाराजांचे मित्र असलेले प्रख्यात प्रच्य विद्या पंडित राजाराम शास्त्री भागवत यांनी ते ओळखलं. त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा नारायण भटाने कांगावा केला. वेदोक्त प्रकरणात आणि ताई महाराज प्रकरणात खुद्द लोकमान्य टिळक शाहू महाराजांच्या विरोधात उभे राहिले. तेव्हाचा हा प्रसंग नाही. 

ही घटना विश्वविख्यात विद्यापीठांतून शिक्षण घेऊन बडोद्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही काळातली नाही. बाबासाहेबांचा स्पर्शही नको म्हणून त्यांचा सोवळं पाळणारा शिपाई त्यांची फाईल टेबलावर दुरून टाकत होता. हिंदू स्त्रियांना अधिकार देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा आग्रह बाबासाहेब धरत होते, तेव्हाचंही हे प्रकरण नाही. 

ही घटना साने गुरुजी श्यामची आई लिहीत होते त्यावेळचीही नाही. एका पूर्वास्पृश्य म्हाताऱ्या बाईची मोळी तिच्या डोक्यावर चढवून दे, असं छोट्या श्यामला त्याची आई सांगत होती. त्या काळातली ही घटना नाही. पंढरपूरला साने गुरुजी प्रणांतिक उपोषण करत होते. पण बडवे पुरोहित पंढरीच्या विठ्ठलाला विटाळ होईल म्हणून पूर्वास्पृश्यांना प्रवेश द्यायला नाकारत होते. त्या दरम्यानची ही घटना नाही. 

ही घटना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा स्त्रीशी विवाह केला त्या काळातलीही नाही. 

या देशातली अस्पृशता, जातीभेद, शिवाशिव, वर्णभेद, धर्मभेद संपुष्टात आणणारे भारतीय संविधान लागू होऊन ६७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या काळातली ही घटना आहे. 

मंगळ यान मंगळावर पोचलं, त्यानंतरची ही घटना आहे. 

हवामान खात्याचा अंदाज आताशा अचूक निघतो म्हणून खुद्द बारामतीकरांना साखर वाटावी लागली. त्या हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्या घरातला गणपती आणि त्यांचे पितर मराठा बाईच्या स्पर्शाने बाटले होते. शेतकऱ्याने पिकवलेलं अन्नधान्य चालतं. पण कुणब्याच्या घरातल्या बाईने शिजवलेलं अन्न चालत नाही, ही काय भानगड आहे?

हा प्रश्न अंधश्रद्धेचा किंवा पारंपारिक समजुतींचा म्हणून सोडून दिला तर मोठी चूक ठरेल. वैदिक ब्राह्मणांना स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे होत असताना पुण्यातल्या या घटनेकडे पाहिले पाहिजे. वैदिक ब्राह्मण धर्म हा प्रचिन आणि स्वतंत्र धर्म आहे यात शंका घेण्याचं काही कारण नाही. म्हणून तर खोले बाईंच्या 'धार्मिक भावना' दुखावल्या. 

भारतात ब्राह्मण आणि श्रमण या दोन स्वतंत्र धर्म परंपरा आहेत. जैन आणि बौद्ध हे धर्म श्रमण परंपरेतूनच उदयाला आले. शैव, शाक्त, लिंगायत या धर्म परंपरा त्याच श्रमण परंपरेतून विकसित झाल्या. भारताला ओळख मिळवून देणाऱ्या सम्राट अशोकाच्या एका शिलालेखावर या देशातील ब्राह्मण आणि श्रमण या दोन स्वतंत्र धर्म परंपरांचा स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. अशोकाने बौद्ध धर्म स्विकारला होता. मात्र त्याचं राज्य धर्मनिरपेक्ष होतं. शिलालेखावरचा त्याचा आदेश म्हणतो, '(अशोकाचं) राज्य ब्राह्मण आणि श्रमण या दोघांनाही समान सन्मान देतं.'

अशोकाचं हे धर्मनिरपेक्ष राज्य त्या वेळच्या पुरोहित वर्गाला मान्य नव्हतं. चाणक्याने निवडलेला चंद्रगुप्त हा ब्राह्मणी धर्मानुसार शुद्र होता. चाणक्य विचाराने आणि निष्ठेने चार्वाक लोकायतवादी होते. त्यांनी त्यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ बळीराजाचे गुरू शुक्राचार्य आणि लोकायतचे प्रवर्तक आचार्य बृहस्पती यांना अर्पण केला होता. आचार्य चाणक्यांचा पुढे काटा काढण्यात आला आणि अशोकाच्या पणतू बृहद्रथ याची हत्या करत पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृतीचं राज्य स्थापन केलं. चाणक्याचं अर्थशास्त्र नावाचं संविधान बदलून मनुस्मृती नावाचं नवं संविधान पुष्यमित्र शुंगाच्या काळात रचलं गेलं. त्याच्या राजवटीत सगळ्या उदार परंपरांवर नांगर फिरवण्यात आला. पुढची अनेक वर्षे तो संघर्ष चालत राहिला. त्या संघर्षात या सगळ्या परंपरा पोटात घेत वैदिक ब्राह्मण धर्माने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हा तो सगळा समाज पुढे हिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला. 

हिंदू ही मुळात भौगोलिक ओळख आहे. तो काही स्वतंत्र धर्म नव्हता. मनुस्मृती हे त्याचं काही धर्मशास्त्र नाही. हिंदू समाजातल्या असंख्य उदार परंपरा मनुस्मृतीला मानत नाहीत. अगदी वेदांनाही नाही. वेदांचा तो अर्थ आम्हासी ठाऊक, असं म्हणणाऱ्या संत तुकारामांपर्यंतच्या सगळया संतांच्या यावरच्या भूमिका अगदी स्पष्ट आहेत. एकनाथांपासून नामदेवांपर्यंत, गोरखनाथांपासून निवृत्तीनाथांपर्यंत, बसवेश्वरांपासून नानक देवजींपर्यंत, संत कबिर असोत की मिरा अन् रवीदास या सर्वांनी आपल्या उदार समतावादी पताका स्वतंत्रपणे फडकत ठेवल्या. मनुस्मृती हे ब्राह्मणी धर्माचं धर्मशास्त्र आहे. सोवळं - ओवळं, भेदाभेद, मंगल - अमंगल, शिवाशिव ही या धर्मशास्त्राची फळं आहेत. जाती घट्ट होत गेल्या तशा या कल्पनाही घट्ट होत गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं, 'ब्राह्मण्यं ही काही ब्राह्मणांचीच मक्तेदारी राहिली नाही. प्रत्येक जात आपल्यापेक्षा दुसऱ्या जातीला खालची मानते किंवा दुसऱ्या पेक्षा स्वतःला वरची किंवा स्वतःला खालची मानते. तेव्हा ते त्या त्या जातीतलं ब्राह्मण्य असतं.' 

ब्राह्मणी धर्माचा संस्कार भारतीय समाजाच्या नेणीवेत किती घट्ट रुजला आहे हे कोणत्याही जातीतल्या माणसाचा दुसऱ्या जातीशी असलेला व्यवहार तपासला की सहज लक्षात येतं. केवळ ब्राह्मण जातीत जन्मलेला म्हणून तो ब्राह्मणी धर्माचा पाईक असा अर्थ काढणं बरोबर नाही. ब्राह्मणी धर्माच्या विरोधात ब्राह्मण जातीत जन्मलेल्या अनेकांनी बंड केलेलं आहे. आचार्य बृहस्पती, शुक्राचार्य यांच्यापासून ते महात्मा बसवेश्वर ते अलिकडच्या काळात राजारामशास्त्री भागवत यांच्यापर्यंत अनेकांनी ब्राह्मणी धर्माच्या विरोधात मानवी धर्माचा उच्चार केलेला आहे. 

दोष डॉ. मेधा खोलेंचा नाही. त्या हवामान शास्त्रज्ञ होत्या की तंत्रज्ञ? विज्ञानाने विकसित केलेलं तंत्रज्ञान त्या जरुर शिकल्या असतील. मंगळ यान प्रक्षेपित करण्यापूर्वी पुजा करणाऱ्या बाकीच्या भारतीय शास्त्रज्ञांप्रमाणे त्यांनीही वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारलेला नाही. त्यांच्या नेणीवेत घट्ट रुजलेल्या ब्राह्मणी धर्माचा संस्कार निर्मला ताईंची जात कळताच स्फोट व्हावा तसा बाहेर पडला. 

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना शुद्र ठरवण्यात आलं. राज्याभिषेक नाकारण्यात आला. त्यांना गागाभट्टांना आणावं लागलं. गागाभट्टांनाही शाप देण्यात आले. म्हणून शौचकुपात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. (की मारण्यात आलं.) शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण मागच्या शतकातलं. शंभर वर्षांनंतरही निर्मलाताई यादव शुद्र ठरल्या. 

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात बरीच सामाजिक धुसपूस सुरु होती. कारणं काहीही असोत पण राज्यकर्त्यांनी समाज गटांमध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न केला होता. मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतं कलुषित करण्याचा प्रयत्न झाला. पण डॉ. खोले बाईंच्या तक्रारी नंतर आपण सगळेच शूद्र असल्याची जाणीव या सर्व समाज गटांना झाली असावी. मराठा - मराठेतर या वादाची जशी गरज नव्हती. तशी खोले बाईंच्या प्रकारणांनंतर ब्राह्मण - ब्राह्मणेतर करण्याचीही गरज नाही. जातीच्या उतरंडीवरील प्रत्येक वरच्या जातीने वर्ण वर्चस्वाचा त्याग करायला हवा आणि उतरंडीत खाली असणाऱ्या प्रत्येकाने अवहेलनाचा न्यूनगंडही झटकायला हवा. ब्राह्मण्य नावाची विषम व्यवस्था संपवण्याची खरी गरज आहे. पण तसं होत नाही. ब्राह्मणांचा, मराठ्यांचा किंवा अन्य कोणत्याही जातीचा द्वेष करणं सोयीचं असतं. जात समूहांच्या नेणिवेत ब्राह्मण्य ठासून भरलेलं असतं. 


डॉ. मेधा खोले यांनी आता आपली तक्रार मागे घेतली आहे. या घटनेची राजकीय किंमत आपल्याला द्यावी लागेल हे चलाख राज्यकर्त्यांनी ओळखलं. त्यांनी बरीच धावपळ केली. 

तक्रार मागे घेतल्याने वादावर पडदा पडेल? पुणे पोलिसातल्या त्या तक्रारीने प्राचीन जखमेवरची खपली निघाली. जखम अजून खोल आहे. तक्रार मागे घेण्याच्या बँडेडने जखम झाकली जाईल? 

आमदार, महाराष्ट्र विधान परिषद
kapilhpatil@gmail.com