Thursday 26 October 2017

सांझी विरासत बचाओ सम्मेलन


जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय नेते शरद यादव मुंबईत येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात 'सांझी विरासत बचाओ सम्मेलन' पार पडणार आहे.

खासदार आनंद शर्मा, कॉ. सीताराम येचुरी, खासदार तारिक अन्वर, खासदार जयप्रकाश यादव, खासदार बाबुराव मरांडी, खासदार अशोक चव्हाण, खासदार राजू शेट्टी, सुनिल तटकरे, अबू आजमी, जयंत चौधरी, अशोक ढवळे हे सर्व नेते मंडळी येणार आहेत.

तुम्हीही यायला हवं,
जरूर या.

आपला,
आमदार कपिल पाटील
प्रदेश अध्यक्ष, जदयु महाराष्ट्र

Wednesday 25 October 2017

आधी तावडे साहेबांची गुणवत्ता तपासा आणि मग शिक्षकांना निकष लावा - कपिल पाटील

शालेय शिक्षण विभागाचा २३ ऑक्टोबर २०१७ रोजीचा शासन निर्णय.

हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय. राज्याची शिक्षण व्यवस्था मोडून काढण्याचा हा प्रयत्न. गुणवत्तेचा निकष लागला तर तावडेंनाही घालवावं लागेल. आधी तावडे साहेबांची गुणवत्ता तपासा आणि मग शिक्षकांना निकष लावा.
- कपिल पाटील

Thursday 19 October 2017

मुंबई बँक, विनोद तावडे - काय व्यवहार झाला आहे?


मुंबई जिल्हा बँकेत ४१२ कोटींचा घोटाळा 
- विनोद तावडे, विरोधी पक्ष नेता

मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतून  
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री


मुंबई, दि. १९ ऑक्टोबर २०१७ :
शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्ष नेते असताना स्वतः पत्र लिहून मुंबई जिल्हा बँकेची चौकशी करुन संचालकांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. ४१२ कोटींचा घोटाळा सिद्ध झाल्याने कारवाईचा आग्रह धरला होता. त्याच बुडणाऱ्या आणि भ्रष्टाचारी मुंबई जिल्हा बँकेत मुंबईतील शिक्षकांचे १२०० कोटी रुपयांचे पगार का ढकलले जात आहेत? नक्की काय व्यवहार झाला आहे? याची उत्तरं शिक्षणमंत्री देतील का?  असा थेट सवाल आमदार कपिल पाटील यांनी विचारला आहे. 

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कपिल पाटील यांनी विनोद तावडे यांच्या घरी काळा आकाश कंदील लावला. त्याचाच राग आल्याने काल तावडे यांनी प्रेस नोट काढत कपिल पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना कपिल पाटील यांनी हा सवाल केला आहे. 

विरोधी पक्ष नेता ते शिक्षणमंत्री यादरम्यान काय बदल घडले? 

राज्यभर अनेक जिल्हा बँका बुडाल्या आहेत. ठेवीदारांच्या, शिक्षकांच्या ठेवी बुडाल्या आहेत. अजूनही  मिळालेल्या नाहीत. त्यासर्व ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक देण्यात आली आहे. अगदी अलिकडेच नाशिकलाही तावडे साहेबांनी राष्ट्रीयकृत बँकेतून पगार करण्याचे आदेश दिले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात जिल्हा बँक बुडाल्यानंतर राष्ट्रीयकृत युनियन बँकेतून पगार केले जात आहेत. मग मुंबईतच तावडे साहेबांचा जिल्हा बँकेचा आग्रह का आहे? तावडे साहेबांचे नक्की लागेबंध काय आहेत? मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई बँक वेळेवर करेलही नव्हे त्यांना करावेच लागतील. पण उद्या मुंबई बँक बुडाल्यावर शिक्षकांच्या पगार आणि ठेवींची हमी तावडे साहेब घेणार आहेत का? विरोधी पक्ष नेता ते शिक्षणमंत्री यादरम्यान काय बदल घडले? असे अनेक सवाल शिक्षकांच्या मनात आहेत. मी शिक्षकांची भावना मांडत असतो. मी शिक्षक हिताची भूमिका मांडतोय याचा तावडेसाहेबांना त्रास होतोय, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. 

रात्रशाळा बंद करण्याचा डाव
ज्या अर्धनोकरी करणाऱ्या २०० शिक्षकांना पुढे करत शिक्षक परिषद आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १ हजार रात्रशाळा शिक्षकांना अपमानीत करुन घरी पाठवलं, त्या अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना पूर्णवेळ करणं तर दूर राहिलं त्या शिक्षकांनाही गेले सहा महिने पगार देण्यात आलेले नाहीत, असा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे. 

१,१०० शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकताना शिक्षणमंत्र्यांनी त्या शिक्षकांच्या संसाराचा जराही विचार केला नाही. यातील बहुतांश शिक्षक हे २५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा रात्रशाळांचं मानधन १९० रुपये होतं तेव्हा लागलेले आहेत. हे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ विषय शिक्षक मानले जातात. कमी वेळात गोळीबंद शिक्षण देण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यामुळे रात्रशाळांमधून काही इन्स्पेक्टर झाले, अधिकारी झाले, व्यावसायिक झाले आणि दोन मुख्यमंत्री झाले. या शिक्षकांनी निष्ठेने काम करुन उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आता निवृत्तीची दोन-तीन वर्षे राहिली असताना ते अपमानित करुन काढण्यात आलं आहे. काहींच्या मुलींची लग्न निघाली आहेत. अनेकांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. कुणी मेडिकलला आहे, इंजिनिअरींगला आहे. दुबार कामामुळे शिक्षकांनी मुंबईत घरं घेतली. आता त्या घराचा २० ते २५ हजारांचा ईएमआय कुठून भरणार? त्याचा प्रश्न आहे. 

खोट बोलण्यात तावडे यांचा हात कोण धरणार. अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना काढून टाका, अशी मागणी कपिल पाटील करत आहेत असा अत्यंत खोटा आरोप तावडे आता करत आहेत. केवळ रात्रीच्या शाळेत अधर्वळ नोकरी करणाऱ्यांना अर्ध्या पगारात घर चालू शकत नाही, म्हणून त्यांना दिवसाच्या शाळेत रिक्त पदांवर थेट सामावून घ्या, अशी मागणी मी स्वतः आणि शिक्षक भारतीने सातत्याने केली आहे. मात्र मुंबईत १५०० रिक्त जागांवर एकही शिक्षक नेमणूक करायला तावडे तयार नाहीत. उलट ज्या संस्थांनी हायकोर्टाच्या आदेशाने रिक्त जागा भरल्या त्या शिक्षकांनाही तावडे यांनी काढून टाकलं होतं. पण हायकोर्टाने चपराक दिल्यामुळे आता ते आदेश मागे घेण्यात आले आहेत. शिक्षकांमध्येच भांडणं लावण्याचा उद्योग मात्र तावडे करत आहेत. 

स्कील इंडियाला प्रोग्रामला विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून रात्रशाळा सरकारला बंद पाडायच्या आहेत, असा आरोपही कपिल पाटील यांनी केला आहे. 

म्हाळगी प्रबोधीनीतील सहकार्याला वाचवण्यासाठी 
विद्यार्थी आणि शिक्षक दिवाळी आनंदात साजरी करत आहेत असं शिक्षणमंत्री म्हणतात. मुंबई विद्यापीठातल्या हजारो विद्यार्थ्यांचं करिअर बर्बाद होत असताना शिक्षणमंत्री मात्र म्हाळगी प्रबोधीनीतील आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी थंडपणे तारखा देत बसले होते, हे लोक विसरलेले नाहीत. शिक्षण खात्याचा कारभार सुरळीत करण्यापेक्षा म्हाळगी प्रबोधीनीत इतिहासाची पुस्तकं बदलण्यात शिक्षणमंत्र्यांना अधिक रस आहे. 

शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर 
स्टुडन्टस् अपडेटच्या नावाखाली शिक्षकांना शि्ाक्षणबाह्य कामांना जुंपण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची आधार कार्ड, त्यांच्या पालकांची बँक अकाऊंटस् आणि दुनियाभरची माहिती ऑनलाईन करण्याचं काम शिक्षकांना देण्यात आलं आहे. त्यात होणाऱ्या शिक्षकांच्या हालाची शिक्षणमंत्र्यांना पर्वा नाही. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशा गंभीर स्थितीत राज्य आहे. विनाअनुदानित शिक्षकांना पगार नाही. पेन्शनचा पत्ता नाही. बदल्यांचा आणि चौकशांचा ससेमिरा सुरु आहे. वेतनेतर अनुदान बंद आहे. राज्यातले हजारो शिक्षक पगाराविना आहेत. शिक्षण व्यवस्थेत प्रचंड असंतोष आहे. 

१०५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या फाईली कसली वाट पाहत आहेत?
शिक्षण विभागातील १०५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या फाईली शिक्षणमंत्र्यांच्या टेबलावर गेली तीन महिने मंजुरीसाठी पडून आहेत. शिक्षणमंत्री कशाची वाट पाहत आहेत, असा सवालही पाटील यांनी केला आहे. 

आरोपांची राळ उठवून मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करणे ही भाजपची नीती आहे. तोच हातखंडा तावडे साहेब वापरत आहेत. गेली ३ वर्षे शिक्षकांनी याचा अनुभव घेतला आहे. पण आता शिक्षक याला बळी पडणार नाहीत, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे.

--------

तावडे साहेबांचा खोटारडेपणा -
--------

तावडे साहेबांची स्टंटबाजी?Tuesday 17 October 2017

वर्षा बंगल्यावर काळा आकाश कंदील लावताना कपिल पाटील यांना अटक

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०१७ :
शिक्षण आणि शिक्षकांना अंधारात लोटणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर काळा आकाश कंदील लावायला जात असताना अटक करण्यात आली.

त्याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' बंगल्यावर कपिल पाटील यांनी काळा आकाश कंदील लावला.

शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर
रात्रशाळा शिक्षकांना काढून रात्रीचं शिक्षण अंधारात लोटलं आहे. मुंबईतल्या शिक्षकांचे पगार दादागिरीने बुडणाऱ्या मुंबईत बँकेत ढकलले आहेत. पेन्शन नाही, भरती बंद आहे, विनाअनुदानित शिक्षकांचे हाल सुरु आहेत, चौकशांचा आणि बदल्यांचा ससेमिरा लावण्यात आला आहे, वेतनेतर अनुदान नाही, ऐन दिवाळीत राज्यातले हजारो शिक्षक पगाराविना आहेत. हे कमी की काय म्हणून स्टुडन्ट अपडेटच्या नावाखाली ऑनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना जुंपण्यात आलं आहे. राज्यातलं शिक्षण जवळपास बंद पडलं आहे. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशी राज्याची स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
----------------------

रात्रशाळा आणि मुंबईतील शिक्षकांच्या पगाराच्या प्रश्नाबाबत आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना लिहलेले पत्र. दिनांक : १७ ऑक्टोबर २०१७

प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मा. ना. श्री. विनोद तावडे
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

म्हणून काळा आकाश कंदील घेऊन आलो आहे तुमच्या दारी

महोदय,
या दिवाळीच्या आधी रात्रशाळेतील शिक्षकांना परत घ्याल या अपेक्षेत मी होतो. मुंबईतल्या शिक्षकांचे पगार भ्रष्ट मुंबई बँकेत ढकलता पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेतून नियमित कराल ही साधी अपेक्षा होती.

पण दिवाळीचा पहिला दिवस उजाडला तरी या शिक्षकांच्या घरात तुम्ही दिवा लावायला तयार नाही. शिक्षकांची घरं अंधारात लोटून तुम्हाला दिवाळी साजरी करता येणार नाही. तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून निषेध करण्यासाठी काळा आकाश कंदील घेऊन आलो आहे तुमच्या दारी.

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात ढकलणाऱ्या वामनावतराच्या बाजूने आपण आहात की बळीराज्याचा उत्सव साजरा करणाऱ्या सामान्य जनांच्या बाजूने आहात?

रात्रशाळांसाठी गेली दीड वर्षे आपणाशी लढतो आहोत. पण आपणाकडून फसवणूकच झाली. केवळ रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना पुढे करुन, दुबार नोकरी करणाऱ्यांना तुम्ही घरी पाठवलं. आता आपल्याला फूल पगार होणार या आनंदात ते होते. भाजप प्रणित शिक्षक परिषदेच्या माध्यामातून त्यांनी शिक्षणमंत्र्यांचं हार घालून अभिनंदन केलं. आता त्यांना कळतंय, की आपली घोर फसवणूक झाली आहे. सहा महिने झाले त्यांना अर्धा पगारही नाही. दुबार नोकरी करणारे शिक्षक गेले सहा महिने पगारविना आहेत. अनेकांची मुलं मेडिकलला किंवा इंजिनिअरींगला आहेत. त्यांची फी थकली आहे. काहींनी यंदा मुलींची लग्न काढली होती. ते कमालीच्या तणावात आहेत. मुंबईत घर घेतलं होतं, त्याचे हफ्ते गेले सहा महिने चुकताहेत. जेव्हा नाईटला नाममात्र मानधन होतं. तेव्हा रात्रशाळा आणि रात्र ज्युनिअर कॉलेजात हे शिक्षक निष्ठेने शिकवत होते. मानधन बरं झालं तर तेही तुम्ही काढून घेतलं. स्वप्नं आणि आयुष्यं उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?

मुंबई बँकेच्या भ्रष्टाचाराचे पाढे तर खुद्द मा. शिक्षणमंत्र्यांनी वाचले होते. आता ती बँक वाचवण्यासाठी शिक्षकांचे बळी का देता? मुंबई जिल्हा बँक वर्षभर पगार अगदी वेळेवर करील. त्यांना करावेच लागतील. पण राज्यातल्या सहा जिल्हा बँका बुडाल्या तशी ही मुंबई जिल्हा बँक बुडाली तर मुंबईतल्या शिक्षकांच्या ठेवी आणि पगार वाचवण्याचं हमीपत्र तुम्ही देणार आहात का? तुमचे स्वतःची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची अकाऊंटस् राष्ट्रीयकृत बँकेत. नागपूरातील शिक्षकांची अकाऊंटस् युनियन बँकेत. मग मुंबईच्या शिक्षकांचा छळ कशासाठी?

या दिवाळीत तरी ईडा पीडा टळो आणि शिक्षकांच्या घरातील दिवाळीचे दिवे उजळो.
धन्यवाद.    

आपला स्नेहांकितमुंबईकरांच्या जीवाशी सरकारला खेळता येणार नाही - कपिल पाटील


जिल्हा नियोजन बैठकीत कपिल पाटील यांचा बुलेट ट्रेनला विरोध.

Tap to Watch - 

Saturday 7 October 2017

अन्यथा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या दारी दिवाळीत काळा आकाश कंदील लावणार - कपिल पाटील


दिनांक : ०७ ऑक्टोबर २०१७

प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मा. ना. श्री. विनोद तावडे
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

महोदय,
या दिवाळीच्या आधी जर माझ्या रात्रशाळांमधील शिक्षकांना परत घेणार नसाल, मुंबईच्या शिक्षकांचे पगार पूर्ववत करणार नसाल, त्यांना तुम्ही मुंबई बँकेत ढकललं आहे. तर मग आमच्या घरात अंधार ठेवून तुम्हाला दिवाळी नाही साजरी करता येणार.  माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, कृपा करून हे दोन्ही निर्णय मागे घ्या. रात्रशाळांतील शिक्षकांच्या पोटावर पाय ठेवण्याचा आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई बँकेत ढकलण्याचा. तुम्ही हे करणार नसाल, आणि या दिवाळीत तुम्ही आमच्या शिक्षकांना अंधारात लोटणार असाल, तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी मा. मुख्यमंत्री महोदय, मा. शिक्षण मंत्री महोदय मी तुमच्या दारात येईन आणि तुमच्या दारात काळा आकाश कंदील लावीन. आम्हाला शिक्षकांना अंधारात लोटून तुम्हाला दिवाळी साजरी नाही करता येणार. काय व्हायचे ते होईल. तुम्हाला मला अटक करायची, अटक करा. जो त्रास द्यायचा तो त्रास द्या. पण काळा आकाश कंदील तुमच्या दारात मी लावल्याशिवाय थांबणार नाही. मला हे नाही करायचंय. तुम्ही दोन्ही निर्णय मागे घ्या. मी तुमचं अभिनंदन करीन. 

गेली सहा महिने माझे मुंबईतले शिक्षक एका कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. सरकारने अत्यंत निर्ममपणे, निर्दयपणे रात्रशाळांवरती कुऱ्हाड चालवली आहे. त्याविरोधात आम्ही लढतो आहोत. गेले सहा महिने शिक्षकांच्या घरामध्ये रात्रशाळेचा पगार येत नाही. रात्रशाळा ओस पडल्या आहेत. मुलांच्या शिक्षणाची दुर्दशा झालेली आहे. पण सरकार ढुंकूनही पहायला तयार नाही. रात्रशाळा हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रात्रशाळा माझा जीव की प्राण आहे, इतका तो माझ्या सार्वजनिक जीवनातील महत्वाचा विषय आहे. रात्रशाळेतून माझ्या  विद्यार्थी चळवळीला सुरुवात झाली. आज त्या रात्रशाळा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संकटात सापडल्या आहेत. आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो. हायकोर्टाने आमच्या विरोधात निकाल दिल्याचा जो समज आहे तो तितकासा खरा नाही. हायकोर्टाने काय म्हटले आहे आहे? मा. हायकोर्टाचं म्हणणं एवढंच आहे, शासनाला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार आहे आणि त्या धोरणानुसार त्यांनी जो काही जीआर काढलाय तो वैध आहे. प्रश्न असा आहे की सरकारचा जीआर हा Prospective (आजपासून) लागतो की Retrospective (आधीपासून म्हणजे पूर्वलक्षीप्रभावाने) लागतो. जीआर हा ज्या दिवशी येतो त्या दिवसापासून लागू होतो. आधीपासून लागू होत नाही. दहा वर्षा पूर्वीपासून हा जीआर लागू झाला, पाच महिन्यांपासून हा जीआर लागू झाला, असं नाही होत. मग रात्रशाळेतले शिक्षक जे रात्रशाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना काढून टाकण्याचं काहीच कारण नव्हतं. पण सूड बुद्धीने सरकारने ठरवून, शिक्षण विभागाने ठरवून अत्यंत बेदरकारपणे, निर्ममपणे, निर्दयपणे कारवाई केली. रात्रशाळेतील सगळ्या शिक्षकांना त्यांनी बाहेर काढले आणि सांगितले की, दिवसाचे सरप्लस शिक्षक आहेत त्यांना आम्ही येथे आम्ही काम देणार आहोत ते कामाविना आहेत. खरं तर माझ्या मते दिवसाच्या शाळांमध्ये कोणीही सरप्लस नाही. जर शासनाने मागच्या वर्षीचा २८ ऑगस्टचा जीआर मागे घेतला, बदललेले संच मान्यतेचे निकष मागे घेतले, तर कुणीही सरप्लस होणार नाही. आता सरकारने तो निर्णय घेतला त्यातून सरप्लस झाले. सरप्लस झालेले शिक्षक तुम्ही रात्रशाळेत पाठवत आहात. त्यात बहुसंख्य महिला आहेत, त्या महिलांची नक्की अडचण होते. कारण रात्रशाळा रात्री चालतात. ७.३० ला मुलं येतात, १०.३० पर्यंत शाळा सुटते आणि मग १० ते १०.३० ला कधी ट्रेन पकडणार. तिथून मग रात्री ११.३० ते १२.०० पर्यंत घरी पोहोचणार. काय त्यांची अवस्था होत असेल. त्या सरप्लस शिक्षकांची विशेषतः महिला शिक्षकांची वाईट स्थिती आहे. पण त्याहून अधिक वाईट स्थिती रात्रशाळेतल्या माझ्या शिक्षकांची आहे. माझे रात्र शाळांतील शिक्षक एकटे कमावते होते दिवसांच्या शाळांमध्ये. जेव्हा रात्रशाळांमध्ये ५६ रुपये पगार होता, ९० रुपये पगार होता, १९० रुपये पगार होता. त्यावेळेला माझे सर्व शिक्षक लागलेले होते. २५ ते ३० वर्षे सेवा केल्यानंतर आता निवृत्तीच्या जवळ आले असताना त्यांना अत्यंत अपमानास्पद रितीने सरकारने बाहेर काढलेलं आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही गेले वर्षभर भेटतो आहे. आम्ही मोर्चा काढला, निदर्शने केली, आंदोलने केली. मुख्यमंत्री महोदय करतो, करतो म्हणाले पण काहीही करत नाहीत, हे आपल्या समोर आहे. शिक्षणमंत्री काही करत नाहीत. 

आमच्या शिक्षकांवर तुमचा राग का आहे? रात्रशाळांतील कितीतरी मुलं मोठी झालेली आहे. या राज्याला दोन मुख्यमंत्री रात्रशाळेने दिले आहेत. त्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे येऊन सांगितले की, नका असे करू. तरी तुम्ही ऐकत नाही आहात. मग ऐकण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदय मी सगळं करायला तयार आहे. पण यापुढे अंत पाहू नका, दिवाळी जवळ आली आहे. या दिवाळीच्या आधी जर तुम्ही माझ्या रात्रशाळेतील शिक्षकांना परत घेणार नसाल, मुंबईच्या शिक्षकांचे पगार पूर्ववत करणार नसाल, त्यांना तुम्ही मुंबई बँकेत ढकललं आहे. तर मग आमच्या घरात अंधार ठेवून तुम्हाला दिवाळी नाही साजरी करता येणार. 

गेले सहा महिने माझ्या रात्रशाळांतील शिक्षकांना जे अंधारात लोटले आहे, त्यांना तुम्ही परत घ्या. मुंबईतील त्या शिक्षकांचे पगार नियमित राष्ट्रीयकृत बँकेतून करा. कृपा करून एवढे करा. आणखीन काय सांगणार.. 

अत्यंत क्लेशाने आणि वेदनेने मी हे लिहीत आहे. कृपया दखल घ्यावी
धन्यवाद.     

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.Tap to Watch - Friday 6 October 2017

मुंबईतल्या शिक्षकांची ताकद


२ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश शासनाने दिले होते. त्याविरोधात आपण सर्वांनी मिळून दिलेला लढा आणि त्याला मिळालेलं यश यासाठी श्री. आर. जी. हुले यांनी अभिनंदन पत्र दिलं आहे. खरं तर हे माझं एकट्याचं यश नाही मुंबईतल्या माझ्या शिक्षकांच्या ताकदीचा हा परिणाम आहे. 

राष्ट्रीयकृत बँकेतून पगार आणि रात्रशाळा वाचवण्यासाठी असाच निकराचा लढा सुरु आहे. त्यालाही यश मिळो एवढीच सदिच्छा!

लढेंगे, जितेंगे!

आपला, 

Sunday 1 October 2017

RBI Warns Mumbai Bank


Do not harass Teachers
RBI Warns Mumbai Bank

मुंबई बँकेला आरबीआयची तंबी 
शिक्षकांना त्रास देऊ नका