Thursday 28 July 2016

कोपर्डीचा प्रश्नकोपर्डीला तिच्या घरी गेलो, तेव्हा तिच्या आईवडिलांचे सुकलेले डोळे शून्यात गेले होते. त्यांच्या लेकीच्या वाट्याला जे आले ते कुणाच्या वाटेला येऊ नये. त्या कोवळय़ा मुलीवर तीन नराधमांनी केलेला अनन्वित अत्याचार शब्दात सांगता येणार नाही. शब्दांनाही लाज वाटेल, असं कोपर्डीत घडलं. 

खैरलांजी कुणाच्या राज्यात घडलं आणि कोपर्डी कुणाच्या? प्रश्न हा नाही.

स्त्रीच्या सनातन वेदनेचा हा प्रश्न आहे. महाभारतात द्रौपदीला पणाला लावलं गेलं. भर दरबारात तिची वस्त्रे फेडली गेली. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. अहिल्येला शिळा होऊन पडावं लागलं.

पण या तिघींच्याही वाटेला न आलेलं दु:स्वप्न कोपर्डीच्या त्या कोवळय़ा लेकीच्या वाटेला आलं. स्त्रीत्वाचं भान ज्या वयात येतं, स्वप्नांमध्ये कळय़ा फुलत असतात, तेव्हा त्या उखडून, कुस्करून टाकाव्यात तसे तिचे लचके तोडण्यात आले.

वासनांध पुरुषी सत्तेच्या विकृतीची परिसीमा कोपर्डीत गाठली गेली. क्रौर्य, निदर्यता, वासनांधता यांचा गँगरेप. अशी दूर्मानवी घटना महाराष्ट्रात घडली नव्हती. रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडणार्‍या शिवरायांचा हा महाराष्ट्र. कल्याणच्या सुभेदाराची सून मातेसमान मानून सन्मानाने तिची पाठवणी करणार्‍या न्यायी शिवबांचा हा महाराष्ट्र. तिथे खैरलांजी घडते आणि कोपर्डीही. महाराष्ट्रात कोपर्डीपर्यंतच्या बलात्कारांचा आकडा आहे २०७२.  मुली अन् महिलांचे खून झालेत ३३१ तर २२ सदोष मनुष्यवधासह तो आकडा आहे ३५३. हे आकडे २०१४ च्या तुलनेत कमी आहेत. पण हे आकडे इथेच थिजले पाहिजेत. 

प्रश्न आहे महाराष्ट्रात ही विकृती ठेचायची कशी? हा दूर्मानवी व्यवहार रोखायचा कसा? या घटनांना दुर्दैवी म्हणू नये. कारण दैवाने घडलं म्हटलं तर नराधमांना सुटका मिळते. म्हणून दूर्मानवीच म्हणायला हवं.

दक्षिण नगर आणि मराठवाड्याच्या लागून असलेल्या भागात अशा घटनांची संख्या मोठी आहे. इथे ३० टक्के लग्नं लहान वयातच होतात. कुणाच्या नजरेची बळी होण्याआधीच आई बाप मुलीला उजवून टाकतात. त्यांची बाळंतपणं पालावरच होतात. कोपर्डी टाळण्यासाठी समाजाने स्वीकारलेला हा मार्ग तितकाच दु:खद आहे. कोपर्डीला न्याय कसा मिळणार? 


केवळ हातपाय तोडून? फाशी देऊन? कोपर्डीच्या त्या मातेने मुख्यमंत्र्यांकडे काय मागितलं. 'माझी मुलगी गेली. दुसर्‍या मुलीच्या वाटेला हे येऊ नये,' या तिच्या आर्त हाकेला समाज उत्तर काय देणार? 

बलात्कार करणार्‍यांची हिंमत एकाकी होत नाही. सुरुवात छेडछाडीपासून होते. आधी काही गुन्हे तो पचवतो. समाज उपेक्षा करतो. पोलीस डोळे बंद करतात. म्हणून त्यांची हिंमत वाढते. तामिळनाडू सरकारने या विंचवांची नांगी आधीच ठेचण्यासाठी कठोर कायदा केला आहे. महाराष्ट्रालाही ते करावं लागेल. स्त्रीला स्वतंत्र आणि बरोबरीच स्थान द्यायला समाज तयार नसतो. म्हणून मुलगी घराबाहेर सुरक्षित नसते आणि घरातही. योनीशुचिता आणि प्रतिष्ठेच्या बुरसटलेल्या मानसिकतेत स्त्रीचं लैंगिक शोषण अटळ असतं. कोपर्डीची लेक त्याची बळी ठरली. पण पोरगी हिंमतवान होती. कबड्डीपटू होती. अत्याचार करणार्‍या तिघांशी ती मरेपर्यंत झुंजत राहिली.

प्रश्न त्या झुंजलेल्या मुलीला न्याय मिळण्यापुरता मर्यादित असता तर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेने खपली धरली असती. कोपर्डीचं दु:ख आणखी मोठं आहे. यंत्रणेला आणि मीडियाला इतक्या उशिरा जाग का आली? नेत्यांनी धाव घ्यायला इतका उशीर का केला? मुलगी मराठा समाजातली आहे आणि अत्याचार करणारे दलित समाजातले, म्हणून उपेक्षा होते आहे काय? हे कोपर्डीचे प्रश्न आहेत. 

दलित अत्याचारांमुळे बदनाम झालेला अहमदनगर जिल्हा कोपर्डीच्या घटनेने उलट्या बाजूने घुसळून निघाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियामध्ये जे मेसेज फिरले त्यातून जातीय तणाव कमालीचा वाढला आहे. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांनाही कोपर्डीत जाण्यापासून रोखण्यात आलं. लोकांचा राग अँट्रॉसिटी कायद्यावर आहे. त्याच्या गैरवापरावर आहे. मी स्वत: संजीव भोर पाटलांशी बोललो. प्रकाश आंबेडकरांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. पण आठवले आणि अन्य गटांच्या स्थानिक तथाकथित नेत्यांवर समाजाचा रोष आहे. ते म्हणाले, कायद्याला विरोध नाही. पण त्याचा गैरवापर रोखणार की नाही? जवखेडा आणि सोनईची दुसरी बाजू समोर आली नाही, याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. 

अँट्रॉसिटी कायदा ही दलितांसाठी कवचकुंडलं आहेत. काही हितसंबंधीय त्याचा वापर शस्त्रासारखा करतात, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. हे हितसंबंधीय दलितांमधले असतात असे नाही. हितशत्रूंचा काटा काढण्यासाठी त्याचा वापर करणारेही काही असतात. कोपर्डीच्या निर्भयाला आधी न्याय द्यायचा की या प्रश्नांची चर्चा आधी करायची? आग पुढे गेली आहे. त्यात वेळीच शहाण्या नेतृत्वाने हस्तक्षेप करायला हवा. 


अँट्रॉसिटी कायद्यामुळे दलितांना संरक्षण मिळतं. त्याचा गैरफायदा घेऊन दलितेतर समाजाला त्रास दिला जातो, अशी तक्रार आहे. या कायद्याच्या आधाराने कोपर्डीचे गुन्हेगारही सुटतील का? अशी भीती त्यांच्या मनात आहे. ही भीती अनाठायी आहे. कारण अत्याचार करणाऱ्यांना ते दलित आहेत म्हणून संरक्षण कदापि मिळत नाही. या मुलीवरचे निर्घृण अत्याचार म्हणजे अँट्रॉसिटीच आहे. या प्रकरणातील गुन्हेगार पूर्वाश्रमीच्या दलित जातींमधले असले तरी ते आता धर्मांतरीत ख्रिश्चन आहेत. प्रश्न कोण कोणत्या जातीचा, धर्माचा आहे हा नाही. अत्याचार करणाऱ्यांना तितकीच कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांची जात पाहिली जाऊ नये. संबंध जाती समूहाला जबाबदार धरलं जाऊ नये. संजीव भोर पाटील यांचा प्रश्न होता, ही अपेक्षा आम्हीही का बाळगू नये?

तणावाची जागा इथेच आहे. दोन समाजांमध्ये कमालीचं अंतर पडलं आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दलित आणि मराठा समाजात सुरू झालेली संवादाची प्रक्रिया कोपर्डीच्या घटनेने थांबली आहे. संवादाची जागा संशय आणि द्वेषाने घेतली तर दोन्ही बाजूंचं नुकसान होणार आहे. जातीअंताची लढाई जाती युद्धाने जिंकता येत नाही. ती संवादाने आणि संयमानेच जिंकावी लागेल. इतकी वाईट घटना घडल्यानंतरही कोपर्डी ग्रामस्थांनी जो संयम राखला तोच खरा मार्ग आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २७  जुलै  २०१६

Thursday 21 July 2016

प्रकाश आंबेडकरांचे सवालमुंबईच्या मुसळधार पावसाला मागे टाकत जिजामाता उद्यानापासून निघालेला मोर्चा तितकाच मुसळधार होता. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेला आंबेडकर अनुयायांचा हा मोर्चा विलक्षण होता. दांभिक आंबेडकरवाद्यांना आव्हान देत, सत्ता पक्षालाही इशारा देत या मोर्चाने जी एकजूट दाखवली, त्याला सलाम करायला हवा.

२५ जून २०१६ रोजीच्या पहाटे दादरच्या आंबेडकर भवनावर बुलडोझर घालण्यात आला. आंबेडकरी चळवळीचा ८० वर्षांचा वारसा पुढच्या काही तासांत उद्ध्वस्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा वर्षानुवर्षे ज्या प्रिटिंग प्रेसने छापला, ती ऐतिहासिक वारसामूल्य असलेली प्रिटिंग प्रेस मातीत गाडण्यात आली. बहिष्कृत भारत आणि अनेक दुर्मिळ प्रकाशने मातीत गाडण्यात आली. कारवाई खाजगी होती, पण बेमालूम धूळ फेकत शासनाची आणि मुंबई प्रशासनाची यंत्रणा कामी लावून हा वारसा उद्ध्वस्त करण्यात आला. त्या प्रशासन यंत्रणेतल्या मंडळींना दोष द्यायचा किती, हा भाग वेगळा. पण बाबासाहेबांनी स्थापन केलेला द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टवर तथाकथित कब्जा असलेल्यांनी हे सारं घडवून आणलं, हे त्याहून अधिक दु:खद होतं आणि आपणच हे घडवलं, असा दावा करणारे रत्नाकर गायकवाड त्या ट्रस्टचे साधे सदस्यसुद्धा नाहीत. एकेकाळी राज्याचे मुख्य सचिव असलेले आणि आता राज्याचे माहिती आयुक्त असलेले रत्नाकर गायकवाड यांनी हे घडवलं, यावर कदाचित कोणाचा विश्‍वास बसला नसता. पण खुद्द त्यांनीच दावा केला आहे. ट्रस्टचे ते स्वघोषित सल्लागार आहेत. 

तुम्ही कोण? तुमचा संबंध काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी निखिल वागळे यांच्या कार्यक्रमात विचारला, तेव्हा गायकवाडांकडे उत्तर नव्हते. पण गुर्मी किती? सत्तेचा माज किती? प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या मार्गाशी ज्यांचे मतभेद आहेत, तेसुद्धा चुकूनही त्यांचे चरित्र आणि चारित्र्य यावर बोट ठेवणार नाहीत. त्यांचे आडनाव आंबेडकर आहे, म्हणून मी हे सांगत नाही. त्यांचं सार्वजनिक आयुष्य आंबेडकरी विचार आणि मूल्यांनी भारलेलं आहे. प्रकाश आंबेडकर तर कधीही सत्तेच्या वळचणीला गेले नाहीत. महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामी विचारांचं तर त्यांनी नेतृत्वच केलं आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ते सतत संघर्ष करत राहिले आहेत. व्यासंगी आहेत. अभ्यासू आहेत. देशाच्या प्रश्नांचं आकलन त्यांना आहे. बाबासाहेबांचे थेट नातू असूनही कमालीचे साधे जीवन ते जगतात. कोणताही दर्प नाही. पण दुसरीकडे रत्नाकर गायकवाडांचं काय? 

वामनराव कर्डकांचे शब्द वापरायचे तर, कोटी कोटी उद्धरली कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! या कोटी कोटी कुळांपैकी रत्नाकर गायकवाड एका कुळातले. बाबासाहेब झाले म्हणून आयुष्य बदललं. पद मिळालं. सत्ता मिळाली. भाग्य बदललं. देशाला संविधान देऊन देशाचे भाग्यविधाते झाले. केवळ दलितांचे नव्हे, येणार्‍या असंख्य भारतीय पिढय़ांचे भाग्य त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबातल्या वारसांची भक्ती करण्याची, त्या वारसांचे अनुयायी होण्याची गरज नाही. पण त्या कुटुंबाबद्दल किमान आदर बाळगण्याचं सौजन्य रत्नाकर गायकवाड यांनी दाखवू नये? आंबेडकर बंधूंना ते थेट गुंड म्हणाले. आंबेडकरी चळवळीच्या केंद्राला गुंडांचा अड्डा म्हणाले. 

दादरचं आंबेडकर भवन हे देशातल्या दलितांसाठी आधार भवन आहे. त्याहीपेक्षा पुरोगामी चळवळीचं स्फूर्ती केंद्र आहे. रिपब्लिकन ऐक्याची चळवळ असेल, नामांतराचं आंदोलन असेल, ओबीसींची मागणी परिषद असेल, मंडलचं अभियान असेल, भटक्या विमुक्तांच्या लढाईचा तांडा असेल, रोहित वेमुलाच्या कुटुंबाचं धर्मांतर असेल दादरचं आंबेडकर भवन हा ऐतिहासिक ठेवा आहे. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, सतीश काळसेकर, तुलसी परब अशा दिग्गज कवींचं संमेलन तिथं भरलं आहे. मराठी साहित्य सारस्वतांच्या चर्चा तिथे रंगल्या आहेत. सारं आयुष्य मंत्रालयाच्या लालफितीच्या कारभारात आणि सर्व सत्तेच्या खुर्चीवर ज्यांनी घालवलं, त्या रत्नाकर गायकवाड यांना हा वारसा कळणार कसा? आपण मुख्य सचिव पदापर्यंत पोचलो ते बाबासाहेबांमुळे. त्याची जाणीव त्यांना नसावी याचे आश्‍चर्य वाटते. प्रकाश आंबेडकरांनी तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात ते महत्त्वाचे आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या भविष्याशी निगडित आहेत. 

१. आंबेडकरी चळवळीचं केंद्र आणि विचारांचा ऐतिहासिक वारसा तथाकथित ट्रस्टींच्या लहरींसाठी उद्ध्वस्त होऊ द्यायचा का?

२. आंबेडकरी चळवळ सामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या सत्ताधारी हितसंबंधीय अधिकार्‍यांच्या हातातलं खेळणं होऊ द्यायची काय?

३. आंबेडकरी विचारांशी ज्यांचा उभा दावा, त्यांच्या कळपात शिरायचं काय? 

आंबेडकरी जनता एकजूट आहे. तिचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. राज्यातल्या पुरोगामी विचारांच्या सर्व प्रवाहांना तिचं आवाहन आहे. आंबेडकर भवन वाचवण्याचा संघर्ष नाकाम ठरणार नाही. विधान परिषदेत कालच त्याबद्दलची लक्षवेधी होऊ घातली होती. मी स्वत: आणि नीलमताई गोर्‍हे, प्रकाश गजभिये, राहुल नार्वेकर, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, ख्वाजा बेग, अनिल भोसले आदींनी ही सूचना दिली आहे. आज-उद्या सरकारी उत्तर येईल. रत्नाकर गायकवाड माहिती आयुक्तांचं कवच घेऊन किती काळ पंगा घेतात, ते पाहू या. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं चळवळींशी ज्यांचं नातं आहे, त्या सर्वांना द्यायचं आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २०  जुलै  २०१६


Thursday 14 July 2016

झाकीर नाईकचं समर्थन कशासाठी करता?बांग्लादेशातल्या बॉम्बस्फोटांनी डॉ. झाकीर नाईक नावाचा धर्मप्रचारक प्रकाशात आला आहे. त्यांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी असते. त्यांच्या सभेत कुणी गरीब, मेहनतकश मुसलमान नसतो. पांढरपेशांचीच गर्दी जास्त असते. स्टेज भव्य दिव्य असतं. वाणी तशीच 'दिव्य'. पारंपरिक मौलवीच्या वेशात हा माणूस कधीच नसतो. अगदी सुटाबुटात. अन् भाषण फडर्य़ा इंग्रजीत. पण शैलीही विलक्षण छाप टाकणारी. फॉलोअर्सही त्याला जगभर आहेत. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणार्‍यांची संख्या सव्वा कोटींहून अधिक आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात त्यांच्या अनेक सभा झाल्या आहेत. एकदा मुद्दाम गेलोही होतो ऐकायला. त्यांच्या वडिलांची ओळख होती. पक्का कोकणी माणूस. तेच एकदा आपल्या डॉक्टर मुलाचे इस्लामिक सेंटर दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा एवढा बोलबाला नव्हता. पण विदेशी मदत खूप मिळत असावी, याचा अंदाज येत होता. डॉक्टरकीची प्रॅक्टीस करण्यापेक्षा हा धंदा बरा. आपल्याकडे बाबा लोकांची काही कमी नाही. हल्ली नव्या बाबांना चमत्कार दाखवावे लागत नाहीत. फक्त वाणीवर आणि भाषेवर प्रभुत्व हवं. डॉ. झाकीरकडे ते प्रभुत्व तर आहेच. पण कमालीची स्मरणशक्ती आणि प्रचंड पाठांतर. कुराणावर बोलता बोलता गीता आणि बायबलचे दाखले मुखोद्गत द्यायचे. हातात कागद नसतो. कुराणातली आयत आणि सुराचा नंबर त्याच्या जीभेवर. पण गीतेचा अध्याय कितवा, ओळ कितवी हे सांगत संस्कृत श्लोक घडाघडा बोलतात. तेव्हा ऐकणारे अचंबित होतात. प्रेषित आणि इस्लाम यांच्या उदयाचं भाकित वेदांमध्ये आधीच सांगितलेलं आहे, असा दाखला या माणसाने दिल्यावर समोरचा शिक्षित माणूस भाबडेपणाने झाकीरचा मुरीद होतो. 

झाकीरच्या पीस टीव्हीवर बांगलादेशने बंदी घातली आहे. बांगलादेशचं हसिना सरकार सेक्युलर आहे. बहुसंख्य मुस्लिम असूनही देश सेक्युलर आहे. देशाची घटना सेक्युलर आहे. मधल्या काळात खलिदा झीयाबाईंचं सरकार आलं आणि त्यांनी इस्लामला राष्ट्र धर्माचा दर्जा दिला. झीयाबाईंचा पराभव करत प्रचंड मतांनी अवामी लिग सरकार आलं. शेख हसिना बांगलादेशचे निर्माते बंग बंधू शेख मुजीबर रेहमान यांच्या कन्या. अवामी लिगचं आणि बांगलादेशाचं नेतृत्व करतात. धार्मिक कट्टरवादामुळे त्या परेशान आहेत. गेले दोन वर्षे बांगलादेश अंतर्गत हिंसाचार आणि आतंकवादाने बेजार आहे. सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ आता बॉम्बस्फोट घडू लागले आहेत. ढाक्यातल्या स्फोटानंतर प्रथमच ही बाब समोर आली की, अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती, ती डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून.

डॉ. झाकीर नाईक मुंबईतच राहतात. भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. किंवा संशयाने त्यांच्यावर पाळतही ठेवलेली नाही. डॉ. अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज यांना जशी गर्दी होते तशी डॉ. झाकीरच्या भाषणांना गर्दी होत असावी, असंच पोलीस आणि गुप्तचरही मानत होते. त्यामुळे आतंकवादाशी त्यांचा संबंध जोडला गेला नसेल. संबंध नसेलही कदाचित. पण त्यांच्या भाषणातून ढाक्यातल्या अतिरेक्यांना प्रेरणा (चिथावणी) मिळाली. त्याचं काय?

डॉ. झाकीर नाईकला मौलवी किंवा मुफ्ती इस्लामचे खरे प्रचारक मानत नाहीत. उलेमांची मान्यता तर कधीच नव्हती. आता काही सर्मथनार्थ पुढे आले आहेत. फॉलोअर्सनी केलेल्या कृत्याबद्दल डॉक्टरला कसं जबाबदार धरता येईल? असा त्यांचा सवाल आहे. डॉक्टर फक्त कुराणाचा अर्थ सांगतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ओसाबा बिन लादेनचंही अप्रत्यक्ष सर्मथन करणार्‍या झाकीर नाईकने ढाक्यातल्या बॉम्बस्फोटाचा आधी निषेध केला नव्हता. बांगलादेश सरकारने आक्षेप घेताच वादळ उठलं आणि डॉ. नाईक जागे झाले. निरपराध माणसाची हत्या म्हणजे मानवतेची हत्या. पवित्र कुराणाला मानवतेची हत्या मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आता दिली आहे. 

झाकीर नाईक त्यांच्या प्रवचनात त्यांच्या भाषणात जो इस्लाम सांगतात तो इस्लामचा खरा अर्थच नसल्याचं अनेक मुफ्तींचं म्हणणं आहे. इस्लाम शांतीचा आणि मानवतेचा संदेश देतो. द्वेष शिकवत नाही. नाईक यांच्या भाषणातून अन्य धर्मियांबद्दल द्वेषाचं विष पेरलं जातं, ते या मुफ्तींना मान्य नाही. योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची किंवा प्रज्ञा ठाकूर हिंदू धर्माच्या नावाने बरळतात त्यात आणि झाकीर नाईक यांच्या बरळण्यात अक्षराचाही फरक नाही. जयंत आठवले सनातन धर्म म्हणून जे सांगतात त्यातला हिंदू शब्द काढून मुस्लिम शब्द टाकला की त्याच वाक्याच्या पुढे डॉ. झाकीर नाईक हे नाव सहज लिहिता येईल. इतकं दोघांमध्ये बेमालुम साम्य आहे. डॉ. झाकीर कुराणाचा आधार घेतात आणि जयंत आठवले गीतेचा आधार घेतात. गीतेचा अर्थ सांगताना ज्ञानेश्‍वरांनी पसायदान मागितलं. लोकमान्यांनी गीता रहस्य सांगत स्वातंत्र्य आंदोलनाला नेतृत्व दिलं. महात्मा गांधींनी गीतेचाच आधार घेत अंहिसेचं आणि सत्याग्रहचं शस्त्र परजलं. त्याच गीतेचा आधार घेत जयंत आठवले द्वेष आणि हिसेंचा विखारी प्रचार करतात. राजा चेरिमनने समतेचा संदेश देणार्‍या इस्लामला १४00 वर्षांपूर्वी भारतात आणलं. इस्लामच्या शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारं सुफीयान निजामुद्दीन अवलीया आणि गरीब नवाज मोहिद्दिन चिस्ती यांनी भारतात फुलवलं. मकदुम अली माहिमी याच प्रेमाचा संदेश देत कोकण-कुतूब झाले. 

डॉ. झाकीर नाईक याच्या प्रवचनातल्या शाब्दिक कसरतीत प्रेम, करुणा नाही. द्वेष आणि विखारच असतो.जयंत आठवलेच्या सनातनी शिष्यानी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचा बळी घेतला. डॉ. झाकीर नाईकचं वाचून बांग्लादेशातल्या त्या तरुणांनी बॉम्बस्फोटात निष्पापांचे बळी घेतले. डॉ. जयंत आठवले आणि डॉ. झाकीर नाईक यात फरक करता येणार नाही. डॉ. झाकीर नाईकचं समर्थन कुणीही करू नये. बांग्लादेशीयांची तेवढीच अपेक्षा आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३  जुलै  २०१६

Monday 11 July 2016

अंधारलेल्या रात्रशाळेत ‘प्रकाशा’ची शक्यताअंधारुन आलं असताना अचानक प्रकाशाचा किरण दिसावा तसं काहीसं परवा (शनिवार, 9 जुलै 2016) घडलं. भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेले प्रकाश जावडेकर मुंबईत आले आणि विमानतळावरुन रात्री थेट दादरच्या गोखले नाईट स्कूलला पोचले. मुलांशी भरभरुन बोलले.

अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीची गोष्ट. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार राज्यभरातील शिक्षणाधिकाऱयांच्या बैठकीत बोलत होते. ‘राज्यात आता रात्रशाळांची गरज नाही. त्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील.’ सचिवांचं हे वक्तव्य म्हणजे अधिकाऱयांसाठी आदेशच असतो. सचिवांच्या त्या वक्तव्याची बातमी आदळली आणि राज्यातल्या दोनशे नाईट स्कूल्स् आणि नाईट ज्युनिअर कॉलेजमधल्या टयुबलाईटस् जणू फुटल्या. नाईट स्कूल मधील मुले अस्वस्थ न होती तरच नवल.

रात्रशाळा सरकारला आता बंद करायच्या आहेत. कष्टकरी मुलांनी ओपन स्कूलमध्ये शिकावं असं सरकारचं म्हणणं आहे. रात्रीच्या शाळेचे ओझं कशाला? एव्हाना अर्धे शिक्षक सरप्लस झालेच आहेत.

रात्रीच्या शाळा बंद होणार या भितीच्या अंधारात असतानाच प्रकाश जावडेकरांची ही भेट सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली.

मी त्यांच्यांशी फोनवर बोललो तेव्हा ते कोच्चीला होते. तिथूनच त्यांनी महापालिकेला कळवलं होतं. महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले, ‘हे प्रकाश जावडेकरांनाच हे सुचू शकतं.’

मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांचे सहाय्यक सुनिल कुलकर्णी यांनी फोनवरुन कळवलं की, साहेब थेट शाळेतच येताहेत. प्रबुद्ध आणि संवेदनशील व्यक्तीच्या हातात शिक्षण खातं आल्याने काय घडतं त्याचा अनुभव मी घेत होतो.

दादर विभागातल्या आणखी दोन रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून घेतलं. महाराष्ट्रातून नाईट स्कूलमध्ये  88टक्के मार्क्स घेऊन पहिला आलेला सुनिल दंगापूरही येऊन पोचला. आजूबाजूच्या रात्रशाळांचे बरेच शिक्षकही येउढन पोचले. जावडेकर साहेब येणार म्हणून विधान परिषदेत त्यांच्यासोबत त्यावेळी काम केलेल्या संजीवनी रायकरही आवर्जून आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त श्रीमती कुंदन, शिक्षण उपायुक्त ढाकणे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, शिवनाथ दराडे आणि महापालिकेचे अधिकारी डॉ. केळुस्कर सगळेच येऊन पोचले होते. शाळेचे मुख्याध्यापक तळेले आणि त्यांच्या सहकाऱयांची धावपळ तो पर्यंत सुरुच होती.

शिक्षणमंत्री आले ते थेट वर्गात शिरले. दिवसभर राबणारी मुलं. कुणी घरकाम करणाऱया मुली. तर कुणी रेस्टॉरंटमध्ये काम करणारा वेटर. कुणी कुरियर बॉय. त्या मुलांना मंत्री पुन्हा पुन्हा विचारत होते, कामावरुन सुटल्यावर शाळेत येईपर्यंत काही खाता का? सर्वांचंच उत्तर होतं, ‘नाही.’ ते ऐकल्यावर जावडेकर स्वतहून मला म्हणाले, या मुलांना रात्रीसाठी मिड डे मिलसारखी काही योजना करावी लागेल. रात्र प्रशाला संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे हे सातत्याने हीच मागणी करत आहेत. सरकारने नाही केलं म्हणून निकिता केतकर यांच्या मासूम या एनजीओमार्फत 50 रात्रशाळांमध्ये खिचडीपासून अनेक योजना रात्रशाळा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीच्या पुढाकाराने राबवल्या जात आहेत.

मासूमचे अंकुश जगदाळे, सतत चार वर्षे 100 टक्के निकाल देणारे आगरकर रात्र विद्यालयाचे ए. डी. पाटील यांनी मंत्र्यांना निवेदन दिलं. रात्रीच्या अल्पोपहारा बरोबरच मोफत पाठ्यपुस्तकांची आणि फी माफीची मागणी निवेदनात होती.

दिवसभर राबूनही तुम्ही रात्री शिकण्याची हिमंत राखता. तुमच्या जिद्दीला सलाम. या शब्दांत जावडेकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. बच्चा बच्चा पढेगा तभी देश बढेगा, अशी नवी घोषणाही त्यांनी दिली. रात्रशाळांसाठी केंद्र सरकार सगळी मदत करील. मोठ्या शहरांमध्ये रात्रशाळा उघडण्यास प्रोत्साहन देईल, असंही त्यांनी सांगितलं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो आहे. त्यामुळे गरीबाघरच्या मुलांची अडचण मला माहित आहे. रात्रशाळा, पालिकेच्या शाळा, जिल्हापरिषदेच्या शाळा यांच्या प्रश्नांबद्दल मी विनोद तावडेंशी बोलणार आहे.

रात्रशाळा पालिकेच्या इमारतीत भरतात. त्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न जावडेकर सरांना सांगितला. त्यांनी तिथेच अतिरिक्त आयुक्त कुंदन मॅडमना आदेश दिले, भाडेवाढ करु नका. आणखी मदत करा.

मला म्हणाले, कपिल मी जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे मुलांशी आणि शिक्षकांशी आवर्जून बोलतो आहे. शिक्षणासाठी काही चांगलं त्यातूनच करता येईल. जावडेकरांच्या बोलण्यातून त्यांची प्रामाणिक तळमळ दिसत होती. जाताना त्यांनी आवर्जून प. म. राऊतांची चौकशी केली. सर्वात मोठी रात्रशाळा व कॉलेज प. म. राऊत चालवतात. सहा हजार विद्यार्थी तिथे शिकताहेत. मारुती म्हात्रे, सदानंद रावराणे आणि गिरीष सामंतही भेटण्यासाठी थांबले होते. गिरीष सामंतांशी बोलताना जावडेकरांनी आवर्जून त्यांचे वडील माजी आमदार प. बा. सामंत यांची आठवण सांगितली.

दहा मिनिटांची भेट तासभराची झाली. पण रात्रशाळांसाठी मोठी आशा त्यांनी पल्लवित केली. स्मृती ईराणी गेल्या आणि प्रकाश जावडेकर आले याचं देशभरात स्वागत झालं. ते का झालं? रात्रशाळेतली त्यांची भेट सारं काही बोलून गेली.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


Wednesday 6 July 2016

लहानग्यांना बिघडवलेले सहन होणार नाही
शहरातल्या ख्यातनाम शाळेत घडलेल्या दुर्मानवी प्रकाराने यवतमाळ पेटलं आहे. जनक्षोभ इतका होता की थेट मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून लोकांना शांत करावं लागलं. आपल्या लाडक्या मुलीवर शाळेतच असं काही घडावं याची कल्पना कोणता पालक करील? पेटवा-पेटवीत राजकारण असेलही, पण त्या शाळेत पाठवणार्‍या मुलींच्या आई-बापाच्या काळजातला घोर नाकारता कसा येईल? त्या दोन नराधमांना पोलिसांनी गजाआड केलं; पण लोकक्षोभ शांत झाला नाही. तेव्हा थेट संस्थाचालकांवरही कारवाई झाली. एका मोठय़ा घरातल्या मुलीच्या बाबतीतच हे घडल्याने हा प्रकार उघडकीला आला. प्रकार घृणास्पद होता. गुप्तांग सुजले होते. आता मुली बोलू लागल्या आहेत. मुलींच्या स्वच्छतागृहांमध्येही ते दोघं डोकवत असत. विखारलेल्या नजरांनी. 

ही घटना काही पहिलीच आहे काय? फक्त यवतमाळमध्येच पहिल्यांदा घडली काय? मुंबईत दादरच्या शाळेत एका कँटिन बॉयकडून इतकंच वाईट घडलं होतं. मीरा भाईंदरच्या शाळेतही अशा घटनेने आठवडाभर शाळेत आंदोलन चाललं. गेल्या चार-पाच वर्षांत शाळांमधले असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. हे अचानक कसं सरू झालं? घटना आधीही घडत होत्या. पण बाहेर येत नसत. पूर्वी पालकही मुलांना गप्प बसवत. 'बॅड टच', 'गुड टच' म्हणजे काय? हे शाळांमध्ये शिकवायला सुरुवात झाल्यापासून मुलं आता अधिक निर्भयपणे बोलू लागली आहेत. लहान वयातली मुलं सर्वात असुरक्षित असतात. पण फक्त शाळेतच असं नाही. बाहेरही. मैदानात खेळत असतात तेव्हाही. अन् घरात एकटी असतात तेव्हाही. मुलांवरील अत्याचारांचे प्रकार सर्वाधिक घडतात ते घराच्या चार भिंतीच्या आडच. जवळचंच कुणीतरी, नात्यातलं किंवा परिचितांपैकी असा अतिप्रसंग घडवत असतो. लैगिंक विकृतीतून हे घडतं, हे उघड आहे. वैद्यकीय भाषेत 'पर्सनॅलिटी डिसऑर्डर' मानलं जातं त्याला. एरव्ही सामान्य धडधाकट दिसणारे, कुणी संशयही घेणार नाही असे. पण त्यांच्यातल्या लैगिंक विकृतीचे शिकार होतात ती लहान मुलं. म्हणून घराच्या कुंपणाच्या आड असे प्रकार अनेकदा घडतात. बाहेर वाच्यताही होत नाही. कधी कधी शाळेत घडतं. शाळा सार्वजनिक असते. म्हणून चर्चा सार्वजनिक होते. स्फोट मोठा घडतो. प्रकरण दडपून टाकण्याची वृत्ती सर्वत्र असते. आपलं घर बदनाम होईल. शाळा बदनाम होईल. म्हणून प्रकरणं मिटवली जातात. शिकारी नात्यातलाच असतो, उगाच बभ्रा नको म्हणून घरातलेच मिटवून टाकतात. तसं कधी शाळेतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ज्यांच्याकडून हा दुर्मानवी प्रकार घडतो त्यांना अटकाव व्हायलाच हवा. जबर शिक्षा व्हायलाच हवी. बदनामीच्या भितीने असे प्रकार कधीही झाकले जाऊ नयेत. झाकण्याचा प्रयत्न केला तर लोक चिडणारच. का चिडू नये त्यांनी? त्यांच्या कोवळ्या कळ्या कुणी कुस्करून टाकत असेल तर संतापाचा स्फोट होणारच. मग सुक्या बरोबर ओलंही जळतंच. हॉस्पिटलमध्ये उपचाराविना कुणाचा जीव गेला की लोक चिडतात. जबाबदार नसलेल्या डॉक्टरांनाही मारहाण करतात. इस्पितळाची मोडतोड करतात. काही हितसंबंधी त्यात तेलही ओततात. पण परिस्थिती कायद्याने हाताळली नाही तर अपराध्यांना शिक्षा होण्याची शक्यता कमी असते. याचं भानही राखायला हवं. 

या घटना अपवादात्मक असतात. त्या जनरलाईज करून चालणार नाहीत. यवतमाळचे ते दोघे शिक्षक होते. शिक्षकांची अशी अनेक प्रकरणं उघडकीला आली आहेत. पण म्हणून सगळ्या शिक्षक बिरादरीला बदनाम करून चालणार नाही. समाजात विकृती आहे. शिक्षक त्या समाजाचाच भाग असतो. आपल्या महाराष्ट्रात ७ लाख शिक्षक आहेत. ६0-७0 जण चुकीचं वागले म्हणून सरसकट ७ लाख जणांना दोषी कसं मानता येईल? खरं सांगतो, मुलांचा सर्वाधिक विश्‍वास आपल्या आई बापांच्या पाठोपाठ आपल्या शिक्षकांवर असतो. त्या विश्‍वासाला तडा जाऊ देता कामा नये. ही जबाबदारी शिक्षकांची तर आहेच, पण समाजाचीही आहे. 

हा प्रश्न मानसिक आरोग्याचा आहे. फक्त शिक्षकांच्याच नाही, समाजाच्या मानसिक आरोग्याचा आहे. प्रश्न गंभीर आहे. अडचण आहे ती तो प्रश्न गंभीर नाही असं मानण्याची. म्हणजे या घटना अपवादात्मक आहेत. सगळ्यांवर तसा आरोप करण्याची गरज नाही. म्हणून तो प्रकार मोठा नाही असं मानण्याची वृत्ती ही गंभीर गोष्ट आहे. तो आपला दोष आहे. घटना एक असो किंवा काही. अपवादात्मक असल्या तरी त्या वाईट आहेत. विकृत आहेत. घृणास्पद आहेत. निंदास्पद आहेत. दंडनीय आहेत. म्हणून हे अपवादही नकोत. 

यवतमाळच्या किंवा अन्य कुठल्या त्या विकृतीचा समाचार कायदा घेईलच. पण किमान शाळेचं मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यालाही काही करावं लागेल. आपण शैक्षणिक अर्हता तपासतो. 'मेंटल हेल्थ'ही तपासायला हवी. अधिक काळजी घ्यायला हवी. 

महाराष्ट्र साने गुरुजींना मानणारा आहे. मुलांना ईश्‍वराची फुलं मानणारा आहे. रवींद्रनाथांनी ख्रिस्ताची अन पैगंबरांची गोष्ट सांगितली होती. ख्रिस्त म्हणाले होते, 'माझ्या लहानग्यांना बिघडवलेले मला सहन होणार नाही.' पैगंबर रस्त्यातून मुलांना पकडून नेत आणि खेळायला लावत. त्यांना गोष्टी सांगत. साने गुरुजींनी सांगितेल्या गोष्टी पुन्हा उजळण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ६  जुलै  २०१६