Wednesday 27 November 2019

त्या तिघांचं सरकार 


संयम, निर्धार आणि चिकाटी दाखवली की काय घडतं ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. भाजपला दूर सारत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात उद्या स्थापन होत आहे. शिवाजी पार्कवर उद्या शपथविधी होईल आणि तिघाचं सरकार महाराष्ट्राला मिळेल. तिघांचं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं नाही. तिघांचं म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांचं. या तिघांशिवाय अन्य कुणालाही या सरकारचं श्रेय देता येणार नाही. काँग्रेसचे गटनेते खुद्द बाळासाहेब थोरात यांनी परवा कबुली दिली की संजय राऊतांशिवाय हे सरकार येणं शक्यच नव्हतं. संजय राऊत यांची एकहाती लढाई होती. किती दडपण असेल त्यांच्यावर. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमधले दोन ब्लॉक त्यांनी काढून घेतले. पण पुढे वाढून ठेवलेले दोन मोठे राजकीय ब्लॉकही दूर करण्यात त्यांना यश मिळालं. ते मिळालं नसतं. तर काय झालं असतं? कल्पना करता येणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कमालीचा विश्वास दाखवला.

शरद पवार यांना सलाम करायला हवा. नुसती बाभूळझाडाची उपमा थिटी पडावी. वारा खात, गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. हे वर्णन अपुरं आहे. महाराष्ट्राच्या विराट राजकीय वृक्षाची कल्पना केली तर ती पवारांना चपखल बसेल. त्यांच्या फांद्यांवरच आघात झाले. प्रतिष्ठा पणाला लागली. प्रश्न विश्वासार्हतेचाही होता. पण पवार साहेब पुरून उरले. राजकीय शिष्टाचार, सभ्यता आणि संस्कृती यांचं दुसरं नाव म्हणजे शरद पवार. त्या शिष्टाचारापोटी ते पंतप्रधान मोदींना भेटले तरी शंकांचा धुराळा उडायचा. अजितदादांच्या 'त्या' निर्णयाने तर शरद पवारांचं राजकीय चरित्र पणाला लागलं होतं. पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हा निर्णय ज्यादिवशी शरद पवारांनी खरा करून दाखवला त्याक्षणी त्यांच्या राजकीय उंचीने देश स्तिमीत झाला.

शिवसेना ही महाराष्ट्रातील सामान्य बहुजनांची संघटना. नाव प्रबोधनकारांनी दिलेलं. पण वाढवलं बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठी मनाचा हुंकार बाळासाहेबांनी जागवला आणि मराठी अस्मितेचा ते स्वतःच एक भाग बनले. पुढे शिवसेना भाजप बरोबर गेली आणि भाजपच मोठा झाला. हिंदुत्वाच्या राजकारणात मराठीचा आणि शिवसेनेचा बळी गेला. त्या शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यात शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या तिघांचाच वाटा आहे. सरकार बनवण्यापेक्षा हे काम खूप मोठं आहे. विमानतळावरून राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार पकडून आणणं, नव्या मित्र पक्षांशी बोलणं, भाजपला निर्धाराने दूर करणं हे झाले घटनाक्रम. पण उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनणारं सरकार हे जाती धर्माच्या आणि द्वेषाच्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढणारं असणार आहे. म्हणून ही घटना मोठी आहे. ऐतिहासिक आहे. म्हणून हे सरकार या तिघांचंच सरकार आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपापुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला, तोच टर्निंग पॉईंट होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला लोक भारतीच्या वतीने म्हणून मी पाठिंबा जाहीर केला. तो करताना प्रबोधनकार ठाकरेचं नाव मी जोडलं. त्याची दखल नेत्यांपासून तिन्ही पक्षांच्या आमदारांनी खचाखच भरलेल्या सभागृहाने घेतली. प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे आजोबा. पण ही झाली उद्धव ठाकरे यांना मानत असलेल्या पिढीला असलेली ओळख. प्रबोधनकार सत्यशोधक होते. फुले, शाहू, आंबेडकर या  विचारधारेतील चौथे सर्वात मोठे नाव आहे. समतावादी आणि डाव्या पुरोगामी चळवळीतही प्रबोधनकारांचा उल्लेख आदराने होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या पाच शिल्पकारांपैकी ते एक होते. शाहू महाराजांचे पाठिराखे होते. ब्राह्मणेतर चळवळीचे लढवय्ये नेते होते. तो मोठा वारसा उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. म्हणूनच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे. आणि उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेही, 'तीस वर्षे ज्यांच्या सोबत होतो त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र तीस वर्षे ज्यांच्याशी सामना केला त्यांना मात्र माझ्या (उद्धव ठाकरे) नेतृत्वावर विश्वास ठेवला.'

शरद पवार स्वतः सत्यशोधक विचारांचे आहेत. त्यांच्या आई शारदा पवारांकडून आणि यशवंतराव चव्हाणांकडून त्यांना हा वारसा मिळाला. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडीस आणि शरद पवार ही मैत्री सर्वांना माहित आहे. स्वतः पवारांनी त्याचा उल्लेख केला. पण पवार साहेब केवळ मैत्रीतून निर्णय घेत नाहीत. महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि महाराष्ट्राची सामाजिक भूमी यांच्या जाणीवेतून ते निर्णय घेतात. ते सत्यशोधकीय नातं पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्यांनी घेतली असणार हे स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही संधी आहे. त्याहीपेक्षा मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं प्रीअँबल आश्वासक आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणूनच खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा त्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

पण त्याआधी एक आठवण सांगायला हवी. मी आज दिनांकचा संपादक होतो. आज दिनांक दुपारचा पेपर असला तरी तुफान खपत होता. गाजत होता. महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. एक दिवस अचानक स्वतः उद्धव ठाकरेंनी मला फोन केला. आणि विचारलं. तेव्हाच्या दादर लोकसभा (म्हणजे मुंबई उत्तर मध्य) मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार होता का? मी नाही म्हणालो. त्यांनी दुसऱ्यांदा फोन करून पुन्हा विचारलं. मी त्यांना नम्रपणे म्हणालो, 'मी तुमचा आभारी आहे. पण वैचारिक मतभेदांमुळे मला सेनेत कधीच येता येणार नाही.' ते फक्त हसले. म्हणाले, 'त्याने काय फरक पडतो. आमच्याकडे नवलकर, दत्ता नलावडे आहेतच ना.' मी नाही वरती ठाम राहिलो. पण तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या बद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना राहिली आहे. शिवसेनाही भाजपचा हात सोडून नवं काही घडवू मागत आहे. काल ट्रायडेंटमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना ती जपून ठेवलेली कृतज्ञतेची भावना मी व्यक्त केली इतकंच.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना व्यक्त केलेल्या अपेक्षा - 

दिनांक : २६ नोव्हेंबर २०१९
प्रति,
मा. श्री. उद्धवजी ठाकरे
विधिमंडळ नेते, महाराष्ट्र विकास आघाडी

महोदय,
भाजपला सत्तेपासून दूर ठेवत छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आपल्या नेतृत्वात स्थापित होत आहे, या अपेक्षेने आणि विश्वासाने लोक भारती पक्षाच्या वतीने मी महाराष्ट्र विकास आघाडीस समर्थन देत आहे.

महाराष्ट्रातील उद्ध्वस्त शेतकरी, बेरोजगार होणारा कामगार, वैफल्यग्रस्त बेरोजगार तरूण, त्रस्त शिक्षक, वंचित पीडित वर्ग आणि अल्पसंख्यांक समुदायांना न्याय देण्याचं काम आपण कराल याचा विश्वास आहे. महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था गेल्या पाच वर्षात पार कोलमडून पडली आहे. ती दुरूस्त करून शिक्षणातून ज्या भावी पिढ्या घडतात त्यांना आपल्या सरकारकडून दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेतील इतिहास, अस्मिता आणि समतेची वैचारिक बैठक पुन्हा अभ्यासक्रमात पुनर्स्थापित व्हावी ही सुद्धा शिक्षक आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या जैविक नात्यावर घाला घालणारे बुलेट ट्रेन सारखे महाकाय प्रकल्प, आदिवासी-शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे वाढवण व नाणार प्रकल्प आणि 'आरे'त घुसखोरी करणारी मेट्रोची कारशेड आपण रद्द कराल याचीही खात्री आहे.

प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा अधिक घट्ट करत महाराष्ट्राला न्याय व विकास देणारं सक्षम सरकार आपण देणार आहात म्हणून तुम्हाला विधान परिषदेतील लोक भारती पक्षाचा सदस्य या नात्याने मी आज संविधान दिनी विश्वास आणि समर्थन देत आहे. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती


प्रसिद्धी - पुण्यनगरी,  २८ नोव्हेंबर २०१९

Friday 22 November 2019

ते तळपती तलवार होते


नीलकंठ खाडिलकर म्हणजे केवळ नवाकाळचे संपादक नव्हते. मुंबईतल्या कामगारांची, महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांची ती तळपती तलवार होती. निळूभाऊंची लेखणी, वाणी तलवारीसारखी धारधार होती. तिचा वार अन्यायाच्या विरोधात होत होता. तिचा प्रहार प्रस्थापितांच्या विरोधात होता.

निळूभाऊ थेट मनाला भिडणारं लिहीत होते. त्यांच्या भाषेत कोणताही अलंकार नव्हता. शब्दांचे फुके बुडबुडे नव्हते. वर्तमानपत्र आणि लेखणी ही त्यांच्या हातातली खड्गं होती. त्यांचे पाय पक्के मातीत रुतलेले होते. त्या पायाची पाळं मुळं इथल्या संस्कृतीत रुजलेली होती. संस्कृतीचा त्यांना सार्थ अभिमानही होता पण परंपरेतल्या अंध रूढींवर, कर्मकांडावर आणि वर्णाश्रमावर त्यांचा विश्वास नव्हता. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी सुरू केलेली परंपरा त्यांनी अशी काही पुढे नेली की ते अवघ्या कष्टकऱ्यांचे आवाज बनले. स्वातंत्र्यांच्या चळवळीत नवाकाळचं योगदान जितकं मोठं आहे तितकंच योगदान स्वातंत्र्योत्तर आर्थिक न्यायाच्या चळवळीमध्ये ते राहिलं आहे. 

ते सोव्हिएत युनियनला जाऊन आले. मार्क्स, लेनिनच्या प्रेमात पडले. पण कम्युनिस्ट झाले नाहीत. प्रॅक्टिकल सोशलिझमचा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. त्या नव्या सिद्धांताबद्दल डाव्यांकडून टीका जरूर झाली. निळूभाऊंचा सिद्धांत भाबडा असेलही पण कामगारांबद्दलची त्यांची तळमळ प्रामाणिक होती. शोषणाविरुद्धचा त्यांचा राग अंगार होता. अन्याय आणि पिळवणूकीच्या विरोधातली त्यांची लढाई धारधार होती. मुंबईतल्या गिरणी कामगारांना तर निळूभाऊ खाडिलकर म्हणजे मोठाच आधार होता. 

एकट्या मुंबईत नवाकाळ, संध्याकाळ लाखा लाखाने खपत होता. सरकारला नवाकाळची आणि संध्याकाळची भीती वाटत होती. खाडिलकरांच्या अग्रलेखाची भीती वाटत होती. अग्रलेखाचा बादशहा असं ते स्वतःला म्हणत. मुंबईच्या रस्त्यावर कॉ. भाई डांगेपासून ते थेट दत्ता सामंतांपर्यंत गिरणी कामगारांसाठी नवाकाळ हे त्यांच्या पायातलं बळ होतं. आणि याचं सर्व श्रेय निळूभाऊंना होतं. निळूभाऊंची शरद पवारांशी मैत्री होती. बाळासाहेब ठाकरेंचे ते परम मित्र होते. भाई डांगे आणि दत्ता सामंतांबद्दलही त्यांना प्रेम होतं. पण निळूभाऊ या किंवा त्या पक्षाच्या छावणीत कधी गेले नाहीत. 

नवाकाळची ती परंपरा आजही जयश्री खाडिलकर आणि रोहिणी खाडिलकर पुढे नेत आहेत. दोघी दोन पत्रांच्या संचालिका आहेत. पण निळूभाऊंचा वसा त्यांनी सोडलेला नाही. निळूभाऊंच्या थकलेल्या शरीराला हाच मोठा दिलासा होता. बुद्धीबळाच्या पटावर खाडिलकर भगिनींनी केलेला पराक्रम मोठा आहे. आणि महाराष्ट्रातील श्रमिकांच्या पटावर खाडिलकर भगिनी करत असलेली कामगिरी तेवढीच मोठी आहे. 

निळूभाऊंचं व्यक्तिगत प्रेम मला लाभलं. एक संपादक दुसऱ्या संपादकाबद्दल, एका वर्तमानपत्रातले पत्रकार दुसऱ्या पत्रकारांबद्दल फारसे प्रेमाने बोलणार नाहीत. प्रेम असलं तरी परस्परांच्या वर्तमानपत्रातून दाखवणार नाहीत. व्यवसायाची ती मर्यादा आहे. पण निळूभाऊ माझ्याबद्दल तितक्याच कौतुकाने बोलत आणि लिहीत होते. मी आज दिनांकचा संपादक होतो. त्याआधी महानगरचा मुख्य वार्ताहर होतो. दुपारच्या वर्तमानपत्रातल्या माझ्या बातम्या अनेकदा सकाळच्या पेपरातील बातम्यांच्या अगदी विपरीत असत. पण निळूभाऊ मोकळेपणाने सांगत असत कपिलने बातमी दिली म्हणजे ती पक्की खरी मानायची. चक्क अग्रलेखात त्यांनी हे लिहून टाकलं. खरं तर मी किती छोटा होतो त्यांच्यापुढे पण लहान माणसाचं कौतुक करणं ही मोठेपणाची खूण असते. निळूभाऊ माणूस म्हणूनही खूप मोठे होते. आणि त्यांची ती आठवण सदैव मनात राहील.

गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. फक्त चिमण्यांची स्मारकं राहिली आहेत. संघटीत कामगारांचा आता असंघटीत कंत्राटी कामगार झाला आहे. वेतनाची निश्चिती नाही. पगारातली विषमता कमालीची वाढली आहे. आणि नोकऱ्याही संपत चालल्या आहेत. अशा काळात लढण्यासाठी निळूभाऊंची ती तळपती तलवार सतत प्रेरणा देत राहील. 

'नवाकाळ'कार नीलकंठ खाडिलकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि अखेरचा लाल सलाम!

(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती पक्ष)