Wednesday 16 May 2018

प्रतिभावान वारली चित्रकार


पद्मश्री जीव्या सोम्या मशे. काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चित्र जगताच्या पडद्यावर वारली चित्रं अमर करून. मशे आमच्या डहाणू तालुक्यातील गंजाड गावचे. सरकारने घर बांधून देईपर्यंत कुडाच्याच घरात राहत होते. आदिवासी पाड्यावरचा हा माणूस महान प्रतिभावान कलावंत आहे, हे भारतीय कला जगताला कुठे ठाऊक होतं? आदिवासी पाड्यांवर जाणारे रस्ते जसे गायब असतात. मशेंची पेंन्टिंग्जही प्रतिष्ठित कलाश्रेष्ठींच्या दृष्टीआड होती. फ्रेंच चित्रकार रिचर्ड लॉन्ग यांच्या भटकंतीत मशे सापडले. थेट फ्रांसला गेले. शेण आणि गेरू मातीच्या रंगवलेल्या कापडावरची ती विलक्षण जिवंत चित्र पाहून जगभरचे चित्रकार स्तब्ध झाले. पुढे त्यांना पद्मश्री मिळाली. शासन आणि देश मान्यता मिळाली. 


डहाणू तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांवरची घरं वारली चित्र कलेने रंगलेली असतात. मूळात वारली स्त्रियांची ही पारंपरिक प्राचीन कला. जीव्या सोम्या मशे यांनी कुंचला हातात घेतला तेव्हा या पारंपरिक चित्रांना जागतिक परिमाण मिळालं. निसर्ग आणि माणूस यांच्या सनातन आणि विलक्षण नात्याचा रसरशीत जिवंत चित्राविष्कार म्हणजे वारली चित्र. आज शासनाच्या कार्यक्रमाचा, रसिक धनिकांच्या भिंतींचा, विमानतळावरच्या सजावटीचा आणि चित्र जगतातल्या दालनांचा वारली चित्रे हा अविभाज्य भाग बनला आहे. पण  जीव्या सोम्या मशे यांची चित्रं असतील तर त्याला तुलनाच नाही. पालघर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर तरुण, कला रसिक अधिकारी अभिजित बांगर मशेंच्या घरी घेऊन गेले होते. ज्येष्ठ आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्यामुळे तो योग जुळून आला. ऐकून, वाचून खूप होतो. म्हातारे झालेले मशे तेव्हा एक नवं चित्र उतरवत होते. जाळ्यात अडकलेल्या माशांचं पेंटिंग होतं ते. चित्र पूर्ण व्हायचं होतं. तरीही पाहणारे आम्ही सगळे त्या जाळ्यात अडकलेल्या माशांसारखे त्या चित्रात अडकून गेलो होतो. प्रतिभेचं हे लेणं, कलेचं वैभव घरापासून अवघ्या काही मैलांवर होतं तरीही आपल्याला इतका उशीर का झाला, याची लाज वाटत होती. 


जीव्या सोम्या मशे यांचं परवा निधन झालं. शासनाने त्यांना सरकारी इतमाम दिला. खूप उचित केलं. 

जीव्या सोम्या मशे यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील 

Monday 14 May 2018

18 जून नंतर निवडणुका होणार.

ब्रेकिंग न्यूज 

मागणी मान्य 
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निडवणुका पुढे ढकलण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केली. 18 जून नंतर निवडणुका होणार. तारीख लवकरच जाहीर होईल.


(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)



(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)


शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला
कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली मागणी

सोमवार, दि. १४ मे २०१८ (प्रतिनिधी) :
ऐन मे महिन्याच्या सुट्टीत ८ जूनला लागलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी आज दिल्लीत भारत निर्वाचन आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना निवेदन देऊन केली. यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सोबत होते. निवडणूक आयुक्तांनी या मागणीबाबत उचित निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.

पाटील, मोरे यांनी निवेदनात ८ जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीमुळे बाहेरगावी गेलेले मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील, असे आयोगाच्या निदर्शनास आणूस दिले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मागच्या टर्मची (२०१२) निवडणूक २ जुलै २०१२ रोजी झाली होती. त्यापूर्वी २००६ मध्येही असाच प्रकार झाला होता. ८ जून २००६ ला निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यावेळीही शिक्षक भारतीने दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर तारीख बदलून २४ जून २००६ रोजी निवडणूक घेण्यात आली होती. आताही शिक्षकांची हीच अपेक्षा आहे, असे सुभाष मोरे यांनी सांगितले. 

मे महिन्याच्या सुट्टीमुळे शिक्षक आपापल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबासमवेत गेले आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्येही ही स्थिती आहे. बहुतांश लोक मुलांना सुट्टी असल्यामुळे आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जातात. शाळा १५ जून व १८ जून रोजी सुरू होत असून त्याआधी ८ जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाला परत येणे निव्वळ अशक्य आहे. मुंबईला परत येण्याचे आरक्षणही ठरलेले असते, इतक्या लवकर ते बदलणे किंवा तिकीट मिळणे ही बाब शक्य नाही. त्यामुळे निवडणुका शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारती केली आहे.

Saturday 5 May 2018

कार्ल मार्क्स आजही खरा आहे


सोविएत युनियन कोसळलं म्हणून काय झालं? कार्ल मार्क्स आणि मार्क्सवाद अप्रस्तुत ठरत नाही. शोषणाविरुद्धची लढाई आजही लढावीच लागणार आहे. मार्क्स आजही पूर्वी इतकाच प्रस्तुत आहे. संपत्तीची निर्मिती आणि वितरण याचं शास्त्रशुद्ध, प्रभावी विश्लेषण मार्क्सनं पहिल्यांदा केलं. मार्क्सनं इतिहासाकडं बघण्याचा दृष्टीकोनही बदलवला. इतिहास म्हणजे सणावळी किंवा राजे - रजवाड्यांच्या कर्तबगारीचा आलेख नसतो. मानव समाजाचा आजवरचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे, असं मार्क्सनं ठासून सांगितलं. 

आजही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा माणूस आपल्या पगाराची तुलना कंपनीच्या प्रॉफीटशी करतो. अन त्याच्या मनात डाचतं त्यावेळी मार्क्स खरा ठरतो. मध्यमवर्गात मार्क्सवादाबद्दल आज कितीही घृणा असू दे. पण मार्क्सवाद हे या दुनियेतलं शोषण संपवण्याचं तत्वज्ञान आहे. शोषण आहे तोवर तत्वज्ञान कायम राहणार. भाषा समाजवादाची असेल किंवा लोकशाही समाजवादाची मार्क्सला वजा करून या रस्त्यावरून जाताच येणार नाही. 

त्या मार्क्सचा आज २०० वा जन्मदिवस. 
कार्ल मार्क्सला लाल सलाम!

Friday 4 May 2018

पगार सुरळीत झाले, अब परेशानी को सरप्लस करेंगे


मुंबईतील माझे मा. मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर बंधू, भगिनी,

मे महिन्याची सुट्टी तुमच्या सगळ्या कुटुंबियांना आनंदाची जावी, यासाठी आधी शुभेच्छा!

मा. हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर न्याय दिला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन! गेले ९ महिने तुम्ही साऱ्यांनी त्रास भोगला. तुमच्या हिंमतीला सलाम!

युनियन बँकेतून पगार सुरळीत झाले आहेत. एप्रिल महिन्या अखेरीस तीन सुट्टया आणि १ मे चा बँक हॉलिडे असूनही युनियन बँकेने २७/२८ एप्रिललाच पगार केले. ९५ टक्क्यांहून अधिक शाळा पुन्हा युनियन बँकेत परतल्या आहेत. त्यांना हा आनंद मिळाला आहे. उरलेल्या ८० शाळांही पुढील महिन्यापासून युनियन बँकेची बिलं सादर करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र ७ शाळांना काही तांत्रिक कारणांमुळे वेतन मिळू शकलेले नाही. त्यांची नावे अशी आहेत -

दक्षिण मुंबई
१. व्ही. एन. सुळे हायस्कूल, दादर 
२. राजा शिवाजी विद्यालय, दादर

पश्चिम मुंबई (दहिसर)
१. विभूती नारायण 
२. मातृछाया
३. सुभेदार रामजी
४. शक्ती सेवा
५. अवध विद्यालय

या शाळांची बिले बँकेकडे पोचलेली नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ते अडकलेले आहेत, असे बँकेचे म्हणणे आहे. मी याबाबत संबंधित शाळांबाबत शिक्षण निरीक्षकांना कळवले आहे. कृपया संबधित शाळांनी तातडीने शिक्षण निरीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक त्रुटी दूर करून युनियन बँकेच्या बझार गेट या पुल अकाऊंट शाखेत आपली वेतनाची बिले पोचवणे आवश्यक आहे. या शाळांमधील शिक्षकांना कारण नसताना त्रास भोगावा लागला आहे. संबंधित लिपिक आणि वेतनअधिकारी यांनी वेळीच काळजी घेतली तर हा त्रास कधीच होणार नाही. कृपया त्यांनी तातडीने लक्ष घालावे, ही विनंती.

शाळांच्या लिपिकांनी वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार पगाराची बिले उशिरात उशिरा १० तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. महिन्याच्या २० तारखेला ट्रेझरीकडे बिले जाणे आवश्यक आहे. कृपया याबाबत काळजी घ्यावी, ही विनंती.

कोर्टाच्या लढाईतील ९ महिने सोडले तर त्या आधीची सहा वर्षे राष्ट्रीयकृत बँकेतून आपले पगार नियमित होत होते. १ तारखेला पगार व्हावेत यासाठी त्याआधी ४ वर्षे सतत संघर्ष करावा लागला. आपण कुणी कल्पनाही केली नव्हती की सुरळीत असलेले आपले पगार बुडणाऱ्या बँकेत नेले जातील. नाबार्डने जी बँक धोकादायक ठरवली आहे, ती बँक आपल्या डोक्यावर मारली जाईल. नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा आणि नागपूर जिल्हा बँका बुडाल्या आहेत. तिथे शिक्षकांचे पगार तर बुडालेच पण सगळी सेव्हींग्ज्, डिपॉझिटस् सुद्धा बुडाली. आजतागायत एक रुपया परत मिळाला नाही. ४ वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा बँक बुडाली तिथे आता युनियन बँकेतून नियमित पगार होतो. बुडणाऱ्या मुंबई बँकेला टेकू देण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात आलं. सक्ती करण्यात आली. अखेर मा. मुंबई हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर आपल्याला न्याय दिला. कोर्टाच्या आदेशानंतरही बिलं उशिरा पोचवण्यात येत होती. शेवटी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा पुन्हा युनियन बँकेची बिले द्यायला सुरवात झाली. मा. कोर्ट आणि मा. मुख्यमंत्री यांचेही त्याबद्दल आभार. 

या लढाईत तुमची सर्वांची साथ होती. म्हणून हे शक्य झालं. आता पुढची लढाई जुनी पेन्शन, सर्वांना अनुदान, सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी आणि  निवडश्रेणी, सातवा वेतन आयोग, कंत्राटी शिक्षकांना (पूर्वीचं नाव शिक्षण सेवक) किमान २१ हजार रुपये वेतन, कॅशलेस आरोग्य योजना (मेडीक्लेम नव्हे) यासाठी करावयाची आहे. ज्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या, दुषणं दिली, परेशान केलं, सरप्लस केलं त्यांनाच सरप्लस करण्याची वेळ जवळ आली आहे. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा त्रास, जाच, परेशानी यांना आपण सरप्लस करू. तुमच्या निर्धाराचं बळ माझ्या सोबत नेहमीच राहीलं आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सभागृहात जालिंदर देवराम सरोदेही सोबत असेलच. तोपर्यंत पुन्हा एकदा सुट्टीच्या शुभेच्छा!
धन्यवाद!

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील