Thursday 29 November 2018

विनाअनुदानाचं ग्रहण


पगार आणि अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या विनाअनुदानित शाळा व कॉलेजातील माझ्या हजारो शिक्षक बांधवांनो आणि भगिनींनो,

मा. मुख्यमंत्र्यांसोबत काल (28 नोव्हेंबर) बैठक झाल्यानंतर माझा मोबाईल सारखा वाजतो आहे. 250 हून अधिक फोन येऊन गेले असतील. प्रत्येक फोन अटेंड करणं केवळ अशक्य होतं. काहींशी बोललो. प्रतिक्रिया संतापाच्या होत्या. 10 ते 15 वर्षे वाट पाहिल्यानंतर हातात चतकोरही गवसत नसेल तर भावनांचा विकोप होणारच. पण भावांनो आणि बहिणींनो थोडं माझं ऐकाल का?

माझ्यावर विश्वास ठेवा. माझं फक्त थोडं ऐका. तुम्हाला खात्री देतो ही लढाई आपण हरणार नाही. पण लढाई अत्यंत हुशारीने लढावी लागते. रणनीती आखून लढावी लागते. भावनातिरेकाने जिंकता येत नसते. 

वस्तीशाळेचे शिक्षक हे काय माझे मुंबईतील मतदार शिक्षक नव्हते. खेड्यापाड्यातली ती मुलं होती. उशिरा ती संपर्कात आली. पण त्यांनी विश्वास ठेवला. अभेद्य एकजूट केली. व्यवस्थित आखणी करून लढाई केली. मी त्यांना एकच अट घातली होती. कोणालाही वर्गण्या देत बसू नका आणि मंत्रालयात कोणीतरी दलालाला पैसे देऊन आपलं काम होत नसतं. शिक्षकी पेशात आहोत आपण. या पेशाला साजेशी लढाई करायला हवी. महात्मा गांधींनी साध्य आणि साधन यांचा विवेक सांगितला होता. त्याच रस्त्याने वस्तीशाळेच्या माझ्या बांधवांनी संघर्ष केला. ते जिंकले. 

मुंबईतील नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांवरील शिक्षक, मुंबईतील विकास प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांमुळे वाढलेल्या तुकड्या, पट वाढला म्हणून शाळांनी नेमलेले शिक्षक. 650 हून अधिक संख्या होती त्यांची. मुंबईतील शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यावेळच्या सरकारला आम्ही पटवून दिलं. मुंबईच्या त्या शिक्षकांचा अनुदानाच्या चक्रव्यूहात अभिमन्यू होऊ दिला नाही. हे कसं झालं म्हणून चौकश्याचं शुक्लकाष्ठ लावण्यात आलं. छळण्याचा प्रयत्न झाला. पण नियमाने, शासन निर्णयाने त्या शिक्षकांना न्याय मिळाला. 

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक 10 ते 15 वर्षांपासून डोळ्यात पाणी आणून अनुदानाची वाट पाहत आहेत. काहींच्या डोळ्यातलं पाणी आटलं आहे. मागचं सरकार असतानाच नागपूरच्या अधिवेशनात मा. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी त्यांचे आदरणीय पिताश्री शंकररावजी चव्हाण यांचा दाखला देत कायम विनाअनुदान शब्द काढण्याची मागणी केली होती. अशोक चव्हाण यांनी तो मान्य केला. कायम शब्द गेला. राहिला प्रश्न अनुदानाचा. गेली पाच वर्षे सगळेच आशेवर आहेत. घोषित, अघोषित, टप्यावरचे आणि नैसर्गिक वाढीच्या तुकडीवरचे सगळ्यांचाच प्रश्न आहे. पण गट आणि तट पडले आहेत. एकजूट नाही. गेली तीन वर्षे मी पाहतो आहे, आणि मला अधिकच वाईट वाटतं आहे. नुसतं आश्वासन दिलं तर आपण अभिनंदनाचा वर्षाव करतो. मंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात धन्यता मानतो. मी काही विनाअनुदानित कृती समितीचा नेता किंवा पदाधिकारी नाही. ती मंडळी बोलवतही नाहीत. पण माझ्या मनात त्याबाबत राग नाही. मी कधीही मा. शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही. नुसती यादी घोषित झाली, घोषित करतो म्हणून सांगितलं, अनुदान देतो म्हणून सांगितलं, पहिला टप्पा नुसता जाहीर केला एवढ्या साध्या घोषणांवर सरकारचं सगळेच अभिनंदन करतात. मी कधीही अभिनंदन केलं नाही. मी या प्रत्येकवेळेला निषेध केला. आपल्यातल्या काही मंडळींना माझ्या या निषेधाचं आश्चर्य वाटत होतं. कोडं पडत होतं. पण माझी स्वच्छ भूमिका आहे. कवी केशवसुतांच्या शब्दात किंचित बदल करून, 'खादाड नसे माझी भूक, चतकोराने मला न सुख' कारण हा माझा अधिकार आहे. घामाचा मेहनतीचा पैसा आहे जो आजवर मिळत आलेला नाही. 

काल मा. मुखमंत्र्यांच्या बैठकीत कोणताही फारसा वाढीव बोजा न येता अनुदान देणं शक्य आहे , 100 टक्के अनुदान देणं शक्य आहे हे मी मांडलं. किमान ज्यांना 10 वर्षे उलटून झाली आहेत त्यांना तरी किमान विनाविलंब 100 टक्के अनुदान द्या. आता कोणताच भेदभाव करू नका. सगळ्या अघोषित याद्या घोषित करून टाका. जे घोषित आहेत त्यांना सूत्रानुसार तरी वेतन द्या. सरकारने जे सूत्र ठरवलं आहे त्याला चिकटून रहावं, ते बदलू नये एवढीच माझी प्रार्थना आहे. 20 टक्के द्यायचे आणि पुढचा आदेश येईपर्यंत फक्त 20 टक्केच देत रहायचं, पुन्हा पुन्हा 20 टक्याचं आश्वासन द्यायचं ही घोर चेष्टा आहे. सरकारच्या अडचणी आहेत हे मान्य केलं तरी शिक्षणाला प्रायॉरिटी मिळायला हवी. उपाशीपोटी लोकांनी जगायचं कसं? शिक्षकांनाही मुलं आहेत. संसार आहे. याचा विचार व्हायला हवा. काल मा. शिक्षणमंत्र्यांनी जे काही जाहीर केलं आहे, ते तुमच्या समोर आहे. ते मला मान्य असतं तर मा. शिक्षणमंत्र्यांच्या सोबत जाऊन माध्यमांच्या समोर मी उभा राहिलो असतो. पण मी ते कधीच करत नाही. अनुदान नाकारणाऱ्या किंवा आश्वासन देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात मला आनंद नाही. मी अन्यायग्रस्त, शोषित, पीडित शिक्षकांच्या सोबत आहे. 

मी आता महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला भेटेन. नंतर आपण एक होऊ आणि लढाईची रणनीती आखू. 10, 20 टक्के नाही 100 टक्के अनुदान मिळवू. तोपर्यंत तुमच्या प्रत्येकाचा फोन उचलणं आणि प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलणं मला शक्य होणार नाही, कृपया त्याबद्दल मला माफ करावं. पण मी तुमच्या सोबत आहे. आपण एकत्रपणे संघर्ष करू. आपण लढूया, जिंकूया!

आपला,

Saturday 24 November 2018

बाबूजींचं जाणं अस्वस्थ करणारं


बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया गेले. वय ८१ होतं. आजाराशी ते झुंजत होते. जसे मराठवाड्यातल्या १९७२ च्या दुष्काळाशी ते झुंजले होते. १९७५ च्या आणीबाणीशी झुंजले होते. आणीबाणीत १८ महिने ते तुरुंगात होते. पण कधी हरले नव्हते. दुष्काळावरही त्यांनी मात केली. निसर्गाला नमवलं. पाणी साठवून दाखवलं. मृत्यूशी मात्र ते हरले. प्रत्येकालाच हरावं लागतं. तरीही प्रत्येक मृत्यू अस्वस्थ करतो. बाबूजींचं जाणं तर अधिकच अस्वस्थ करतं. बाबूजी काल रात्री उशिरा गेले. आज दुपारी त्यांच्या अत्यंसंस्काराला इच्छा असूनही पोचता आलं नाही. 

मराठवाड्यातले लोक अवघड क्षेत्रात राहतात. त्यात बाबूजींनी बीड मधलं आंबेजोगाई निवडलं. पाण्याची कायम नाराजी असलेला दुष्काळी जिल्हा. ऊसतोडणी कष्टकरी मजुरांचा जिल्हा. बाकी कोणतीही पिकं कापणं सोपं आहे. पण उसाचं पीक कापणं अवघड. प्रवासाची साधनं मराठवाड्यात अजून पोचताहेत. लातूरला ट्रेन तर आता आता पोचली. पाणी अजून पोचलेलं नाही. बाबूजींनी तोच ध्यास घेतला होता. सिंचनाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. यशस्वी केले. पाणी साठवण्याचे व जिरवण्याचे हे प्रयोग बाबूजींच्या आणि मानवलोकच्या नावानेच ओळखले जातात. 

बाबूजी केवळ आडनावाने लोहिया नव्हते. खरंच लोहियावादी विचारांचे होते. पक्के समाजवादी. डॉ. राममनोहर लोहियांची त्रिसूत्री होती - मतपेटी, तुरुंग आणि फावडं. डॉ. द्वारकादास लोहियांनी तुरुंग आणि फावडं अधिक पसंत केलं. समाजवादी राजकारणातून ते कधीच दूर गेले नाहीत. पण निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरले नाहीत. सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. गोपीनाथ मुंडेंशी त्यांचा खास दोस्ताना होता. अडचणीत दोघांनी परस्परांना खूप मदत केली. ऊसतोडणी मजूरांचे आणि ओबीसींचे नेते होते मुंडे. त्यात त्यांना बाबूजींच्या मदतीचा हात होता. मुंडेंच्या सहकाराच्या प्रयोगातही बाबूजींनी त्यांना साथ दिली. भाजपशी मात्र दूरुनही दोस्ताना केला नाही. दोस्ती आपल्या अजेंड्यावर त्यांनी ठेवली होती. 

मजूरांच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रत्येक लढाईला बाबूजींची साथ होती. मराठवाडा विकास आंदोलनात तरुण लोहिया अग्रेसर होते. भ्रष्टाचार विरोधी मोहिमांमध्ये त्यांचा पुढाकार असे. वंचितांच्या प्रश्नावर तर ते रस्त्यावर उतरुनच संघर्ष करत. बाबूजींचा पिंड रचनात्मक कामाचा अधिक होता. १९७२ च्या दुष्काळ विरोधी आंदोलनात उतरलेले बाबूजी दुष्काळ निवारणाच्या रचनात्मक कामात पुढे अधिक रमले. १ एप्रिल १९८२ ला मानवलोक म्हणजे मराठवाडा नवनिर्माण लोकायत नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, स्त्रीया आणि गरीब हे त्यांचं कार्यक्षेत्रं होतं. संस्था पारदर्शी पद्धतीने चालवली. संस्थेतल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. मोठं केलं. विकासाचे अनेक प्रयोग यशस्वी केले. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि शेतकरी संघटना या प्रत्येकाचं मानवलोकशी नातं आहे. पुरोगामी चळवळीतील अनेक संघटनांची शिबिरं मानवलोकने चालवली. कार्यकर्ते घडवले. 

बाबूजींचं आमचं खास नातं आहे. छात्र भारतीच्या संस्थापक उपाध्यक्षा अणि आमच्या मार्गदर्शक डॉ. शैलाताई लोहिया यांचे ते पती. शैलाताई आणि डॉ. लोहिया यांची गाठ राष्ट्र सेवा दलात जमली. सेवा दलाने असंख्य धडपडणारे कार्यकर्ते दिले. लोहिया दांपत्य त्यापैकीच एक. शैलाताई धुळ्याच्या. न्यायमूर्ती प्रकाश परांजपेंच्या भगिनी. महिला चळवळीतील कार्यकर्त्या. मराठवाड्यात गेल्या आणि शेतकरी आणि मागासवर्गीय महिलांच्या दुःखाचा शोध घेत त्यांच्या जीवनात त्या आनंद फुलवत राहिल्या. त्यांची तीन्ही मुलं प्रा. अभिजीत, अनिकेत आणि प्रा. अरुंधती पाटील त्यांच्यासारखी निर्मळ, निरलस आणि निष्ठेने काम करणारी. तिघेही माझे छात्र भारतीतले दोस्त. छात्र भारतीच्या उभारणीत त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. पण कोणताही बडेजाव या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधी केला नाही. 

शैलाताई आणि बाबूजी आता दोघंही नाहीत. म्हणून मानवलोकचं काम काही थांबणार नाही. त्यांची मुलं ते पुढे नेतील.

बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील

Friday 16 November 2018

संयुक्त कृतीची हाक



सप्रेम नमस्कार,
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी कार्यालयात आपण निवेदन देणार आहोत. महाराष्ट्रभर दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत. ही मोठी घटना आहे. म्हणून तुमचं अभिनंदन! तुम्हाला सलाम!

यापुढे सगळेच प्रश्न सुटे सुटे न लढता अशीच संयुक्त कृती करावी लागणार आहे. वस्तीशाळा शिक्षकांची संघटना ८ वर्षांपूर्वी माझ्याकडे आली तेव्हा त्यांना दीड हजार रुपये वेतन मिळत होतं. आज ते सन्मानाने कायम झाले आहेत. त्यांनी एकजुटीने लढाई केली. माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून हे शक्य झालं. 

आता अंगणवाडी ताईंना शिक्षकाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. डी.एड.बी.एड. बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं आहे. अतिथी निदेशकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. कला, क्रीडा शिक्षकांना पुनर्स्थापित करायचं आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे शोषण थांबवायचे आहे. जुन्या पेन्शनची लढाई आणखी बुलंद करायची आहे. या आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात / प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांना आणि कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे - संघटना, झेंडे वेगळे असूदेत. काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांचं दुःख सारखं आहे. तेव्हा लढाई संयुक्तपणे करुया. 

एमपीएससीची परीक्षा देत लाखो विद्यार्थी नोकरीसाठी झगडत आहेत. पण नोकर भरती सुरु झालेली नाही. नोकरकपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण यामुळे नोकऱ्याच बंद झाल्या आहेत. तेव्हा तरुणांनाही सोबत घेऊन एकत्रित कृती करावी लागेल. 

खाजगी क्षेत्र उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी बनलं आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी असोत की दलित, ओबीसी, भटके विमुक्त. आदिवासी असोत की मुस्लिम. मराठा असोत की लिंगायत या सर्वांना खाजगी क्षेत्राचे दरवाजे बंद आहेत. खाजगी क्षेत्राचे दरवाजे उघडण्यासाठी अॅफर्मेटिव्ह अॅक्शनची आपली मागणी आहे. 

आपापल्या जिल्ह्यात संयुक्त कृती समिती स्थापन करा. लोकतांत्रिक जनता दलाचा प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षकांचा आमदार या दोन्ही नात्याने या लढाईत मी तुमच्या सोबत आहे. सर्वांना बरोबर घ्या आपण एकजुटीने ही लढाई यशस्वी करुया. 

या अनुषंगाने विविध मागण्यांच्या संदर्भात संयुक्त मागणी परिषद रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सांयकाळी ४ वा. परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संयुक्त आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आपणही आपल्या सहकाऱ्यांसह अवश्य या, हे आग्रहाचे आमंत्रण. 

आपला,
आमदार कपिल पाटील