Friday 29 April 2022

नास्तिकांवरच्या हल्ल्याचं कारण ...राज ठाकरेंचा भोंगा संजय राऊत म्हणतात तसा भाजप प्रायोजित होता काय? त्यांनी नवी बांग दिली आहे. त्यांची राजकीय पहाट त्यातून उजाडेलही कदाचित. प्रश्न तो नाही. राज ठाकरेंच्या माऱ्याने दोन गोष्टी तात्काळ घडल्या. एक, शरद पवार आस्तिक असल्याचे पुरावे त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिले गेले. दोन, पुण्याचा नास्तिक मेळावा रद्द करायला आघाडी सरकारच्या पोलिसांनी भाग पाडलं.

शरद पवार ईश्वरनिष्ठ आहेत की नाहीत, याची चर्चा करण्याचं कारणही नाही. त्यांनी कधीही त्याचं अवडंबर केलं नाही. सार्वजनिक पूजापाठ केले नाहीत. देव धर्माच्या बाजाराला त्यांनी कधी उत्तेजन दिलं नाही. सुशीलकुमार शिंदे यांच्या घरात गणपती येतो, पण शिंदे असोत किंवा शरद पवार किंवा अजित पवार. मनातल्या आणि घरातल्या देवाला त्यांनी राजकारण्याच्या चव्हाट्यावर उभं केलं नाही. मंत्री, मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देवाच्या नावाने नाही, गांभीर्यपूर्वक त्यांनी शपथ घेतली. त्या शपथेचं कारण एकदा शिंदेंनी सांगितलं होतं. 'राजकारण ईश्वरनिष्ठ किंवा धर्मनिष्ठ नाही, गांभीर्यपूर्वक झालं पाहिजे. संविधाननिष्ठ झालं पाहिजे, अशी शिकवण यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली आहे.'

ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी शरद पवार नास्तिक आहेत, देव धर्मावर त्यांचा विश्वास नाही, असा हल्ला चढवला. दुसऱ्या दिवशी शरद पवारांचे नारळ फोडतानाचे आणि मारुती समोर हात जोडतानाचे फोटो ट्वीट झाले. 'नास्तिक' शरद पवारांना इतकी माघार का घ्यावी लागली? राज ठाकरेंचा हल्ला इतका प्रखर होता की एकूणच बिघडलेल्या वातावरणाची धास्ती अधिक होती? 

धास्ती स्वाभाविक आहे. 'सियांवर रामचंद्र की जय' या घोषणेत आणि 'राम राम' घालत होणाऱ्या भेटीत मर्यादा पुरुषोत्तमाची आश्वासक गळा भेट असते. 'जय श्रीरामा'च्या कर्कश घोषणांमध्ये दंग्यांचं आवतण असतं.

१९५४ च्या 'नास्तिक' चित्रपटात कवी प्रदीप यांच्या गीतातले शब्द आहेत.

राम के भक्त रहीम के बंदे
रचते आज फ़रेब के फंदे
कितने ये मक्कर ये अंधे
देख लिये इनके भी धंधे
इन्हीं की काली करतूतों से
बना ये मुल्क मशान ...

भयाचं माहोलचं असं आहे. सीतामैय्याच जिथे घाबरलेली आहे. तिथे आस्तिकतेचे पुरावे दिले तर नवल काय?

पंढरपूरच्या विठोबाच्या पूजेचे फोटो मात्र कुणीही ट्वीट केले नाहीत. कारण पंढरींचा राजा हा नास्तिकांचा नाथ. नास्तिकांवर हल्ला करणाऱ्यांना ते पुरतं ठाऊक आहे. जिथे धर्म आणि जातीचंही बंधन नाही. उच्च, नीचतेलाही जागा नाही. तो संतांचा विठ्ठल. कबीराचा राम, बसवण्णांचे इष्टलिंग, मीरेचा कृष्ण वैदिकतेचे पाश मोडून उभा राहिलेला असतो. ईश्वरवाद आणि नास्तिकवाद यातलं अंतर आताच्या निरीश्वरवाद्यांना माहित नसेल कदाचित. धर्म हे द्वेषाचं स्फोटक साधन ज्यांच्या हाती आहे, त्या धर्म संसदेतल्या सभासदांना मात्र ते ठाऊक आहे. त्यांचे फरेब के धंदे ३०० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी मात्र ओळखले होते.

उच्च नीच काही नेणे भगवंत l तिष्ठे भावभक्ती देखोनियां l l
चर्म रंगू लगे रोहिदासासंगें l कबीराचे मागें शेले विणी l l
सजन कसाया विकूं लागे मांस l माळ्या सांवत्यास खुरपू लगे l l
नरहरी सोनारा घडूं फुंकू लागे l चोखामाळ्यासंगे ढोरें ओढी l l
नामयाची जनीसवें वेची शेंणीं l धर्मा घरी पाणी वाहे झाडी l l
नाम्यासवें जेंवी नव्हे संकोचित l ज्ञानियाची भींत अंगे ओढी l l
मिराबाईसाठी घेतो विषप्याला l दामाजीचा जाला पाडेगार l l
घडीमाती वाहे गोऱ्याकुंभाराची l हुंडी त्यामे हत्याची अंगे भरी l l
पुंडलीकासाठी अजूनी तिष्ठत l तुका म्हणे मात धन्य त्याची l l

खुद्द तुकोबारायांनी दाखला दिला आहे. सजन कसायासाठी कृष्ण कन्हैया मटणाच्या दुकानात उभा राहतो. तिथे कर्नाटकात मटणाची दुकानं बंद करण्याची फर्मानं सुटली आहेत. महाराष्ट्रात मढीच्या कानिफनाथांच्या जत्रेत भटक्यांनी शिजवलेल्या मटणाची पातेली लाथांनी उलटी केली गेली.

धार्मिक उन्मादाच्या घोषणा. हलाल खायचं, की नाही खायचं याचा वाद. हिजाब घातला म्हणून परीक्षेलाही बसू द्यायचं नाही. असा माहोल देशात आहे. हल्ला फक्त मुसलमानांवर आहे, हा भाबडा समज नास्तिकतेवरच्या हल्ल्याने खोटा ठरवला आहे. नास्तिक चार्वाकालाही हिंदू धर्म परंपरेत मान्यता आहे. जागा आहे. असा डाव्या आणि पुरोगाम्यांचाही समज असतो. चार्वाक होता तेव्हा हिंदू धर्म नावाचा शब्द नव्हता. ती वैदिक ब्राह्मणी परंपरा. त्या परंपरेला ब्राह्मण चार्वाकही जिवंत राहणं मान्य नाही.

अयोध्येला परतलेल्या प्रभू रामाच्या दरबारात एका ब्राह्मण चार्वाकाने रामाला नास्तिकतेचा उपदेश केला. पुरोहितशाहीची निर्भत्सना केली. तेव्हा चिडलेल्या पुरोहित वर्गाने हा चार्वाक म्हणजे ब्राह्मणाचं सोंग घेतलेला राक्षस आहे, असा हल्लाबोल केला. 'थांब चार्वाका आमच्या हुंकारानेच तुझा वध करतो.' रामाच्या दरबारात चार्वाकाचं मॉब लिंचिंग झालं. युधिष्ठिराच्या दरबारातही महाभारतातल्या हिंसाचाराचं पाप धर्मराजाच्या पदरात टाकण्याची हिंमत आणखी एका चार्वाकाने केली होती. त्या चार्वाकाचीही चिडलेल्या वैदिकांनी राक्षस ठरवून तिथेच हत्या केली. नास्तिक दर्शनाच्या बाजूने बोलणाऱ्या पट्टराणी द्रौपदीला धर्मराजाने दरबारातच गप्प केलं. राक्षसांचं निर्दालन 'शास्त्र प्रमाण' आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येपूर्वी 'सनातन'ने त्यांना राक्षस ठरवलं होतं. कलबुर्गींसाठी धारवाडला जाऊन राहिलेल्या डॉ. गणेश देवी यांचीही अलीकडेच दानव म्हणून संभावना केली गेली.

फरक इतकाच की, शरद पवारांना नास्तिक म्हणून जाहीर करणारे सनातनी नाहीत.

नास्तिक परंपरा म्हणजे निरीश्वरवाद नव्हे. जे वेद प्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक, अवैदिक. या जगाचा कुणी एक नियंता आहे आणि तो रिमोट कंट्रोलने हे विश्व चालवतो यावर नास्तिकांचा विश्वास नाही. गंगा स्नानाने पुण्य प्राप्ती, धर्म प्राप्ती होते, असं ते मानत नाहीत. जातीवादाचा दर्प ते बाळगत नाहीत. शरीराला यातना करून पापातून मुक्ती मिळते यावरही ते विश्‍वास ठेवत नाहीत. आत्मा, परलोक, पुनर्जन्म या भाकड कथांवर ते विश्वास ठेवत नाहीत. सातव्या शतकातील 'धर्म कीर्ती'ने असल्या भाम्रक कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे.

निरीश्वरवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, अज्ञेयवादी, नास्तिक, सांख्यवादी यातलं अंतर अनेकांना माहित नसतं. चाणक्य विष्णुगुप्त ईश्वरनिष्ठ होते. पण आपला अर्थशास्त्र हा ग्रंथ नास्तिक असल्याचं ते अर्पण पत्रिकेतच सांगतात. बळीराजाचे गुरु शुक्राचार्य आणि चार्वाकांचे गुरु बृहस्पती यांना आपला ग्रंथ अर्पण करतात. तथागत गौतम बुद्ध ईश्वराच्या चर्चेत जात नाहीत. पण बौद्धमत नास्तिक आहे. महावीरांच्या तत्वज्ञानात ईश्वराला जागाच नाही. जैन धर्म अर्थात नास्तिक मानला जातो. चंद्रगुप्त जैन होता. त्याचा पुत्र बिंदुसार आजीवक होता. देवनामप्रिय प्रियदर्शी अशोक बौद्ध. तिघंही नास्तिक. पण तिघंही ईश्वराला मानत होते. सम्राट हर्षवर्धन, गौतमी पुत्र सातकर्णी निरीश्वरवादी नव्हते. पण नास्तिक मताचे पुरस्कर्ते होते.

महात्मा फुले ईश्वराला निर्मिक म्हणून पाहत होते. पण महात्मा फुलेंचं सारं तत्वज्ञान वेद, मनुस्मृती आणि पुराणांचं भंजन करणारं होतं. त्यांचा सत्यशोधक समाज अर्थातच नास्तिक होता. प्राचीन काळातील नास्तिकांचेही काही विधी असत. सत्यशोधक समाजाचेही काही विधी महात्मा फुलेंनी घालून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांना ईश्वर, वेद आणि मनुस्मृती यांच्यावर आधारलेल्या ब्राह्मणी हिंदू धर्माच्या बेडीतून आपल्या समाजाला मुक्त करायचं होतं. बौद्ध आणि जैन धर्माचेही काही विधी आहेत. पण म्हणून ते रूढार्थाने आस्तिक ठरत नाहीत.

महात्मा गांधी ईश्वरनिष्ठ होते. आणि धर्मनिष्ठ हिंदूही. त्यांच्याशी गोरा गांधी म्हणजे गोपाराजू रामचंद्र राव यांचा देव धर्मावरून वाद झाला. गोरा गांधी गांधीवादी पण कट्टर निरीश्वरवादी होते. 'ईश्वर सत्य आहे' असं सांगणाऱ्या गांधीजींना ते ईश्वर नसल्याची प्रमाणे देत होते. वादाच्या शेवटी गांधी म्हणाले, 'सत्य हाच ईश्वर आहे.' अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक धर्मग्रंथाचा मी धिक्कार करतो, असं गांधीजी स्पष्ट सांगत. तेव्हा ते नास्तिक ठरतात. नथुराम गोडसेने गांधींना १९४४ मध्येच रावण ठरवलं होतं. अग्रणी या त्याच्या वर्तमानपत्रात ते कार्टून प्रसिद्ध झालं होतं. ज्यात गांधी, नेहरू, सुभाष, पटेल यांना रावण ठरवण्यात आलं होतं. आणि रावण वध करण्याऱ्या रामाच्या भूमिकेत होते सावरकर व हेडगेवार. सावरकर बुद्धिप्रामाण्यवादी होते. पण नास्तिक नव्हते. त्यांना वेद आणि मनुस्मृती वंद्य होती.

स. रा. गाडगीळांनी 'लोकायत' या त्यांच्या चार्वाक दर्शनावरील ग्रंथात गाणाऱ्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे. बक दालभ्य (ग्लव मैत्रय) वेदाध्ययनासाठी जाताना ते चमत्कारिक दृश्य पाहिले होते. पांढऱ्या कुत्र्याला जमलेले कुत्रे म्हणत होते, 'हे भगवन् आम्ही भुकेले आहोत. मंत्र गानाने अन्नप्राप्ती करून द्याल काय?' त्या सफेद श्वानाच्या पाठोपाठ जमलेल्या कुत्र्यांनी मंत्र पठणाचा हिंकार स्वर लावला. डॉ. राधाकृष्णन म्हणतात, 'पुरोहितांच्या मंत्रविद्येचं विडंबन करण्यासाठी कुत्र्यांकडून हे विडंबन उदगीथगान करण्याचा उपनिषदकारांचा हेतू असावा.' स. रा. गाडगीळ म्हणतात, 'वर्गवर्णप्रधान यज्ञ प्रस्थापित झाल्यानंतर या नव्या समाज रचनेत वरिष्ठ वर्गीयांनी श्रमजीवी लोकांना अर्थ-कामप्रधान, असुर, लोकायत, चार्वाक, प्राकृतजन या विशेषणांनी उल्लेखावयास प्रारंभ केला.' नास्तिक राक्षसांचं हे वर्णन आहे. राक्षस म्हणजे जे रक्षण करतात ते.

बक दालभ्य यांची गाणारी कुत्री मंत्र पठणाने अन्नप्राप्तीची इच्छा करतात. वैदिक आर्यांचा अन्नब्रह्मवाद यज्ञातल्या अग्नीची प्रार्थना करतो,
''नू नच्श्रित्रं पुरुवाजाभिरूती अग्ने रयिं मधवद्भ्य श्च्व धेहि l
ये राधसा श्रावसा चात्यन्यास् त्सुवीयेंभिच्श्रमि ll १

याचा अर्थ -
हे धनसंपन्न अग्ने, आमच्यावर अन्य कोणाहीपेक्षा अधिक अन्न, धन, संपत्ती आणि पुत्रपौत्र यांचा वर्षाव कर.''

वैदिक आर्य अन्न, धान्य, सुखाची अपेक्षा करताना 'अन्य कोणाहीपेक्षा' फक्त आपल्याला जास्त मिळावं यावर जोर देतात. स्वार्थ प्रार्थना.

श्रवण बेळगोळच्या 'चामुंडराये करविले' या आधीचा आणखी एक मराठी शिलालेख आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग चौल मार्गावर अक्षीजवळ तो सापडला. १०१० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्राच्या या पहिल्या शिलालेखातील प्रार्थना वैदिक आर्यांच्या अगदी विपरीत आहे. ही अवैदिक प्रार्थना म्हणते, 'जगी सुष (सुख) संतु (नांदो).'

विपरीत अर्थ लावणे आणि पाखंडी ठरवणे हे सोपे आहे. पण कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे, सर्व समीक्षेची सुरवात ही धर्माच्या समीक्षेने होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, 'श्रद्धा म्हणजे विशिष्ट विचारांच्या सतत्येची खात्री. हल्ली ज्ञानाचा कमी उपयोग करणाऱ्यांच्या मनातील खात्रीला श्रद्धा म्हणतात. निश्चय म्हणजे श्रद्धा. आता त्याचा अर्थ तर्काचा व बुद्धिवादाचा प्रतियोग झाला आहे... श्रद्धांची तपासणी सुरु झाली की श्रद्धा हादरू लागते. म्हणून नव्या विचारांना पाखंड किंवा नास्तिक म्हणतात.... कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त, महंमद हे धर्मसंस्थापकसुद्धा जुन्या धर्माच्या दृष्टीने महापाखंडीच होते.'

पण वस्तुस्थिती आजही तीच आहे. जगातील अत्यंत धर्मनिष्ठ राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक पहिला लागतो.

- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद.)