Friday 17 March 2017

जयवंत आणि चंद्रकांत

जयवंत पाटील नुकताच रिटायर झाला. तर चंद्रकांत म्हात्रे चक्क ५० वर्षांचा झाला.


जयवंत पाटील वयाने मोठे आहेत. पण आमची तीस वर्षांची मैत्री आहे. म्हणून एकेरी उल्लेख केला. तसा केल्याशिवाय प्रेम व्यक्त होत नाही. जयवंत सेवा दलातला सहोदर. आता शिक्षक भारतीचा कार्याध्यक्ष. शिक्षक साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष पदाचीही जबाबदारी जयवंतवर आहे. शिक्षक भारतीत अशोक बेलसरे सरांच्या पाठोपाठ जयवंतला मोठा आदर मिळतो. त्याची प्रकृती, घरातलं आई-वडिलांचं आजारपण, रात्रीची शाळा या सगळ्या ओझ्याखाली जयवंतला संघटनेच्या दैनंदिन धावपळीत फार वेळ देता येत नाही. पण तरीही त्याने मिळवलेलं स्थान हे त्याच्या कामामुळे आहे. त्याहीपेक्षा भूमिकांमुळे आहे.

जून २००६ च्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मला रात्रशाळा मुख्याध्यापक संघटनेने उभं करण्याचं ठरवलं तेव्हाची गोष्ट. जयवंत पाटील शिक्षक असल्याचं माहित होतं. मी आणि शरद कदम जयवंतला भेटायला गेलो. जयवंत तोवर त्याच्या जवळचे नातेवाईक बाळासाहेब म्हात्रे यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागला होता. मी उभा राहतोय कळताच एका क्षणाचाही विलंब करता तो म्हणाला, 'उद्यापासून मी तुझं काम करतो. फक्त आधी म्हात्रे सरांना भेटून येतो. त्यांना सांगतो.'

मलाच कसं तरी वाटलं. त्यावर जयवंत म्हणाला, 'निवडणूक विचारांसाठी असते. नातं, जात, गोत सगळं बाजूला. आपण सेवा दलातले आहोत. त्यामुळे रिंगणात तू असेल तर मी तुझ्या बाजूनेच उभं रहायला हवं.'

आपलं नातं, जात, संबंध सगळं बाजूला ठेवून केवळ विचारांच्या निष्ठेसाठी जयवंत पाटलाने माझ्यासाठी झोकून दिलं. जयवंतचे अनेक सहकारी सुद्धा कामाला लागले. शिक्षक मतदार संघात चांगल्या विचारांचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे. शिक्षकांच्या हालअपेष्टात परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी योग्य उमेदवार हवा आणि कपिल तसा आहे, असं जयवंत शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सांगत होता. भांडूपच्या सदाशिव भोईर सरांकडे तो घेऊन गेला. सरही जुने सेवादलातले. भोईर दांपत्याचं विनाअनुदान विरोधी चळवळीपासून तसं नातं होतंच. तेही क्षणात तयार झाले. ते आता नाहीत. पण भोईर मॅडम आवर्जून वेळ  मिळेल तेव्हा कार्यक्रमांना येत राहतात. जयवंत पाटलांचा तो स्टँड सगळ्याच सहकाऱ्यांना भावला.

जयवंत कवी आहे. लेखक आहे. कधी कथाही लिहतो. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी जयवंतची नेमणूक अभ्यास मंडळावर केली होती. चौथीच्या बालभारती मराठीच्या पुस्तकात त्याची 'धाडसी हाली' ही मुलाखत वजा गोष्ट समाविष्ट झाली आहे. जयवंत गातोही छान. स्मृतीगीतं, समरगीतं त्याच्या आवडीची.

रात्रशाळा विद्यार्थ्यांचा पहिला मोर्चा ३० वर्षांपूर्वी निघाला तेव्हापासून जयवंत सक्रीय आहे. रात्रशाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याने घेतलेले परिश्रम, भाषा शिक्षणात केलेले प्रयोग यांची दखल राज्य सरकारने घेतली. राज्य पुरस्कार दिला. शिक्षक भारतीनेही सावित्रीबाई-फतिमा शेख  पुरस्काराने जयवंतला गौरवलं. शिक्षक भारती परिवाराला जयवंतचे हे सगळं माहितं आहे. कवयित्री नीरजा यांच्या नेतृत्वाखाली सहा शिक्षक साहित्य संमेलनं यशस्वी झाली, ती जयवंतमुळेच. कला, साहित्य, कविता, गाणी यात जयवंत अधिक रमत असतो.

पण जयवंतचं सगळ्यात मोठं काम आहे ते अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतल्या सहभागाचं. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि श्याम मानव यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन संघटना तेव्हा स्थापन झालेल्या नव्हत्या. डॉ. अरुण लिमये यांच्या पुढाकाराने बी. प्रेमानंद महाराष्ट्रात आले होते. त्यांची अंधश्रद्धा निर्मुलन यात्रा सेवादलाने संघटीत केली होती. महाराष्ट्रभर तुफान प्रतिसाद मिळाला. त्या टीममध्ये कवी अरुण म्हात्रे, शरद कदम, सुषमा राऊत आणि जयवंत पाटील होते. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीची पेरणी करणाऱ्या पहिल्या टीममध्ये जयवंत पाटील या कार्यकर्त्याचा समावेश होता.

जयवंत पाटील सेवानिवृत्त झाले हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. पण गेल्या ३० वर्षांच्या चळवळीत त्याचं घराकडे दुर्लक्ष झालं. पण वहिनींनी आणि त्याच्या मुलींनी कधी तक्रार केली नाही. फक्त त्यांचा आग्रह असतो की बाबाने आता स्वतःसाठी वेळ द्यावा. त्याच्या सेवापूर्ती कार्यक्रमात त्याच्या मुलीने बाबाला लिहिलेलं पत्र खूपच हृद्य होतं. जयवंत स्वतःला, कुटुंबाला आणि गावच्या घरालाही वेळ देईल. पण चळवळीपासून तो दूर राहील हेही अशक्य आहे. काही नवं शोधेल. काही नवं लिहील. त्यासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा!

...............    चंद्रकांत म्हात्रे हा आपल्याच मस्तीत जगणारा, आनंदाने राहणारा आणि आनंद फुलवणारा कार्यकर्ता आहे. तसा तो कधी सीरियस नसतो. पण काम करताना झोकून काम करतो. शाळा-शाळांमध्ये तो शिक्षकप्रिय आहे. चंद्रकांत सोबत असेल तर महिला शिक्षिकाही निर्धास्त असतात. इतका त्याच्याबद्दल विश्वास आहे. चंद्रकांत हा शिक्षक भारतीत आला तो मधुकर कांबळे सरांमुळे. मधुकर कांबळे सरांनी बरेच कार्यकर्ते शिक्षक भारतीला दिले. शशिकांत उतेकर, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे आणि चंद्रकांत म्हात्रे.

चंद्रकांत क्रीडा शिक्षक. इंग्रजी शाळेत मराठीही शिकवतो. एनसीसी कॅडेट घडवतो. ट्रेकिंगची शिबिरं घेतो. रात्रशाळेत शिकवतो. राष्ट्र सेवा दलाचं काम करतो. मासूममध्ये ऍक्टिव्ह राहतो. शिक्षकांच्या ट्रेनिंगमध्ये हमखास दिसतो. खरं तर चंद्रकांत म्हात्रे सर म्हणायला हवं. पण चंद्रकांतचं वागणं असं आहे की सगळेच त्याला चंद्रकांत म्हणतात. सगळ्यांशीच दोस्ती. दुश्मनी कोणाशीच नाही.

चंद्रकांत तसा एकटा कमावता. पण त्यातही त्याने आपल्या गावासाठी स्वतःच्या बचतीतून ऍम्ब्युलन्स घेऊन दिली. उदघाटनाला मलाच नेलं होतं. गावावर त्याचं फार प्रेम. गावी नेलं की मटण खाऊ घालणार. भरपूर खोबरं घातलेलं खास आगरी स्टाईलचं मटण आणि सोबत तांदळाच्या भाकऱ्या. अर्ध्या भाकरीत पोट भरतं एवढी मोठी भाकरी. मासे आणि सुकट हे त्याच्या आणि माझ्या खास आवडीचे. वुईक पॉईंट.

रात्रशाळांतल्या मुलांवर चंद्रकांतचं फार प्रेम. त्यांच्या सहली आयोजित करणं. क्रीडा स्पर्धा घेणं. एक ना अनेक. काय काय करत असतो चंद्रकांत. त्याची बायको आणि मुलगा दोघंही तितकेच प्रेमळ. चंद्रकांत सारखेच आनंदी राहणारे. चंद्रकांत परवा पन्नास वर्षांचा झाला. आनंदी राहणारा माणूस वयाने एवढा मोठा होतो हेही आश्चर्यच.


आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
संयोजक, जदयू महाराष्ट्र