Thursday 5 June 2014

आपला वाटणारा मोठा माणूस...

नेते म्हणून गोपीनाथ मुंडे जितके मोठे होते, तितकेच माणूस म्हणूनही. त्यांच्या अशा ह्रदय आठवणीना एका कार्यकर्त्याने दिलेला हा उजळा...

विलासराव देशमुखांच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे गेले. दोघेही अवचित गेले. न सांगता. चटका लावून गेले. जन्माला येणारा माणूस जातोच. पण ज्यांचं वय झालेलं नाही. ज्यांचं जाणं अनपेक्षित आहे. ज्यांची गरज आहे. ज्यांच्याबद्दल विरोधकालाही प्रेम वाटावं. असा नेता जातो, तेव्हा दुःख मोठं असतं. मुंडे यांच्या जाण्याचं दुःख त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला सलत राहील.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे दोन परस्परविरोधी पक्षातले. पण दोघेही पक्के मित्र. विलासरावांची उणीव काँग्रेसजनांना लोकसभेच्या निवडणुकीत खूपच बोचत राहिली. मुंडे नसणं म्हणजे काय हे भाजपला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लक्षात येईल.

गोपीनाथ मुंडे हे काय रसायन होतं. प्रमोद महाजनांमुळे ते भाजपाचे नेते झाले हे खरंच पण महाराष्ट्राचं लोकनेता होण्याचं कर्तृत्व हे फक्त त्यांचं स्वतःचं होतं. ओबीसींच्या चळवळीत छगन भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सत्ता वंचित घटकांना राजकीय नेतृत्व दिलं. राजकीय अडीअडचणी, विरोधी पक्षातला संघर्ष आणि कौटुंबिक दुःखाचे प्रसंग यांच्यावर त्यांनी मात केली. संकटांच्या वादळवाऱ्यात हा माणूस बाभुळझाडासारखा उभा राहिला. महाराष्ट्रात स्वतःचं वादळ पेरत राहिला. सत्ताधारी पक्षावर मुंडे हल्ले चढवत, ते जणू शिवरायांच्या निष्ठावान इब्राहीम खानाच्या तोफखान्यासारखे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला राजकीय टक्कर दिली ती फक्त मुंडे यांनीच. त्याच्या परिणामांची चिंता त्यांनी कधी केली नाही. पंधरा वर्ष सतत विरोधी पक्षात राहून असं लढत राहणं सोपं नाही.

भाजपचा मूळ ब्राह्मणी, मध्यमवर्गीय चेहरा आरपार बदलण्याचं काम केलं ते मुंडे यांनी. मुंडे यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यामागे वसंतराव भागवत आणि महाजनांचा वाटा जरूर असेल. पण बहुजनांमध्ये त्या पक्षाला प्रस्थापित केलं ते मुंडे यांनी. ज्यांना भाजपाबद्दल प्रेम वाटण्याचं कारण नाही, त्यांनाही मुंडे आपला माणूस वाटत होता. मुंडेंची हीच तर खरी जादू होती.

शिवसेना, भाजप महायुतीचा सामाजिक पाया वाढवण्याचं श्रेय केवळ गोपीनाथ मुंडे यांचं. राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे मित्र महायुतीला मिळाले ते केवळ मुंडेंमुळे. रामदास आठवलेंना राज्यसभेवर जाता आलं तेही मुंडे यांच्यामुळेच. पाशा पटेलांना आमदार केलं तेही मुंडे यांनी. महाराष्ट्रातल्या सामाजिक घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असे. आम्ही शिखर शिंगणापूरला घेतलेल्या परिषदेत त्यांनी दोन ओबीसी नेत्यांना हुडकून काढलं. आणि थेट आमदार म्हणून लिफ्ट दिली.

महाराष्ट्रातल्या ओबीसींचा ते चेहरा होते. ओबीसींच्या प्रश्नावर त्यांनी कधी तडजोड केली नाही. केवळ वंजारी समाजच नव्हे तर धनगर, कोळी आणि अन्य भटका विमुक्त समाजही त्यांनी जोडून घेतला. भगवान गडावराच्या या नेत्याने चौंडीशी आपलं नातं जोडलं होतं. आणि महात्मा फुले यांच्या हौदातलं पाणीही चाखलं होतं. संघपरिवार आणि भाजपच्या तत्त्वज्ञानाचे प्रखर विरोधक असलेल्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना म्हणून मुंडेसाहेब आपलेच वाटत.

त्यांच्या व्यक्तिगत स्नेहाचा अनुभव मी अनेकदा घेतला. ८०च्या दशकात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जनार्दन पाटलांच्या सोबत आम्ही आंदोलन करत होतो. सर्वपक्षीय मंडल अंमलबजावणी मागणी परिषद आम्ही १९८९ मध्ये आयोजित केली होती. आम्ही प्रमोद महाजनांकडे गेलो तेव्हा त्यांनी स्वतःऐवजी मुंडेंना पुढे केलं. तेव्हापासून ओबीसीच्या चळवळीत मुंडेंबरोबरची मैत्री घट्ट झाली. आणि आम्हाला मोठी ताकद मिळाली. ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या चळवळीबद्दल त्यांची कमिटमेंट पक्की होती. छगन भुजबळांच्या मागेही ते उभे राहत, ते केवळ राजकीय हेतूपोटी नाही. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. आणि परवा खडर्याला नितीन आगेच्या खून प्रकरणानंतर तेच गोपीनाथ मुंडे पुन्हा धावून गेले.

महाराष्ट्रात युतीचं राज्य होतं. संघपरिवारातल्या मंडळींनी सगळ्या देशात गणपती दूध प्यायला लावलं होतं, तेव्हाची गोष्ट. खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गणपती दूध प्यायल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र आपला गणपती दूध पित नाही असं सांगण्याचं धारिष्ट दाखवलं. मुस्लिम ओबीसींच्या सवलतीचा निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता. पण त्यानंतर लगेच युतीचं राज्य आलं होतं. त्यामुळे आता या सवलती राहणार नाहीत अशी भीती वाटत होती. पण युतीमधला विरोध मोडून मुंडे उभे राहिले आणि त्यांनी या सवलती अबाधित राहतील याची ग्वाही दिली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईच्या राजा शिवाजी विद्यालयात मुंडेंचा भव्य सत्कार आम्ही केला.

मुंडेंची ही जादू होती. बुलंद नेता होता तो. विधान परिषदेवर शिक्षक मतदार संघातून मी पहिल्यांदा निवडून आलो तो, भाजपकडे ३० वर्ष असलेली जागा खेचून. मुंडेसाहेबांनी मला आवर्जून बोलावलं. मोठा बुके दिला. आणि आलिंगन दिलं. म्हणाले, मला खरंच आनंद झाला. चळवळीतला कार्यकर्ता आमदार झाला म्हणून.


मित्र म्हणून, माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. 
. . . 
(पूर्व प्रसिद्धी - म. टा. )


- आमदार कपिल पाटील, 
  अध्यक्ष, लोक भारती 
  kapilhpatil@gmail.com