Friday 10 October 2014

डोळे नावाचे स्कूल

डिसेंबर 1985. औरंगाबादला कमल किशोर कदमांच्या इंजिनिअरींग काॅलेजच्या आवारात छात्रभारतीचं अधिवेशन भरलं होतं. प्रतापराव बोराडे प्राचार्य होते. ते स्वागताध्यक्ष. स्वतः कमल किशोर कदम आले होते. उदघाटक होते बापूसाहेब काळदाते. तिघांची भाषणं जोरदार टाळ्या घेत झाली. डाॅ. ना. य. डोळे यांचं भाषण झालं, ते आजही लक्षात आहे. डोळे सरांच्या भाषणाने छात्रभारतीचं नुसतं अधिवेशन नाही गाजलं. महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी तरुणांना नवी दृष्टी देऊन गेलं ते भाषणं.

राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले होते. भारतीय काॅम्प्युटर युगाची सुरुवात करणारे पंतप्रधान नव्या शिक्षण धोरणाची घोषणा त्यांनी केली. डोळे सरांचं भाषण नव्या शिक्षण धोरणाच्या मसुदयावरच होतं. वादळ न उठतं तरच नवल.

डोळे सर तेव्हा पाहुणे नव्हते. छात्रभारतीचे सल्लागार होते. अभ्यास मंडळात भाषण करावं, तसंच पण खूपच साध्या शब्दात पण मिश्किलपणे ते बोलत. साने गुरुजींची अल्पाक्षरी भाषा डोळे सरांच्या वाणीला अवगत होती. पण त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. नर्म विनोदाची झालर त्याला होती. त्यामुळे ते अतिशय शांतपणे बोलत. कधीही त्यांचा स्वर टिपेला जात नसे. घणाघाती शब्दांची त्यांना गरज लागत नसे. त्यांची नर्म विनोदी शैली रक्त न सांडता शस्त्रक्रिया करत असे. नुसती चिकित्सा नाही. हा सूर्य हा जयद्रथ. सर पुराव्यानिशी बोलत. सरांकडे दिर्घ दृष्टी होती. खूप पुढचं ते पाहत. सरकारच्या निर्णयांचे परिणाम काय होतील ते अचूक हेरत. सर समाजशास्त्राचे प्राध्यापक. पक्के लोकशाही, समाजवादी. पण बैठक मार्क्सवादी. त्यामुळे भाबडेपणाला जागा नाही.

राजीव गांधींच्या नवीन शिक्षण धोरणावर डोळे सरांचा हल्ला मर्मघाती होता. काहींनी समज करुन घेतला, डोळे सर कम्प्युटरला विरोध करताहेत. डोळे सर जाॅर्ज फर्नांडिसांचे पक्के दोस्त. त्यामुळे सरांचं भाषण, चिकित्सा न एेकता असा समज करुन घेणं स्वाभाविक होतं. पण राजीव गांधींची घोषणा होण्यापूर्वीच सर प्राचार्य असलेल्या उदयगीरी महाविद्यालयात सुसज्ज कम्प्युटर लॅब सरांनी उभी केली होती. उदयगीरी महाविद्यालय पुण्या, मुबईतलं नाही. पुण्या, मुंबईच्या मोठ्या मोठ्या काॅलेजमध्ये तेव्हा अशी लॅब उभी रहायला सुरुवात झाली नव्हती. त्याआधी मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर या दूर खेड्यातल्या काॅलेजचा प्राचार्य कम्प्युटर लॅब उभी करतो हे आश्चर्य होतं. आधुनिक तंत्रविज्ञानाचा स्विकार आणि स्वागत डोळे सर सहजपणे करत होते. पण त्याचवेळी मुठभरांना चांगलं शिक्षण आणि बहुजन वर्गाला दुय्यम शिक्षण हा भेदभाव त्यांना मान्य नव्हता. मुठभरांसाठी नवोदय विद्यालय का ? हा त्यांचा सवाल होता. सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी सरकारची आहे, हा सरांचा आग्रह होता.

देशात शिक्षण खाजगी क्षेत्राच्या हातात जाण्याचा इशारा डोळे सरांनी त्याचवेळी दिला. शिक्षणाचं आणि उच्च शिक्षणाचं खाजगीकरण देशातल्या बहुजन वर्गाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकील असं सरांनी त्यावेळी सांगितलं. नवं शिक्षण धोरण खाजगीकरणाच्या वाटेनं जाणारं आहे. हे सांगणारे ते महाराष्ट्रातले पहिले विचारवंत.

डोळे सरांचे डोळे असे होते. छात्रभारतीतल्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांचे राजकीय डोळे दिले. प्रश्नांकडे, आजुबाजूच्या परिस्थितीकडे पहायला शिकवणारे डोळे त्यांनी दिले. डोळे सर आम्हाला भेटले नसते तर आमचे डोळेही प्रश्नांमागचा, परिस्थितीमागचा कार्यकारण भाव पाहु शकले नसते.

सर पुण्याचे ब्राम्हण. पण डी क्लास किंवा डी कास्ट होता येतं हे डोळे सरांकडूनच शिकावं. एस.एम. जोशींनी त्यांना मराठवाड्यात पाठवलं. आधी नांदेड मग उदगीर. ते कायमचे मराठवाड्याचे झाले. आपलं सारं आयुष्य त्यांनी मराठवाड्यातल्या चळवळींनी दिलं. फक्त उदगीर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनाच त्यांनी नाही घडवलं. मराठवाड्यातलाच नाही तर महाराष्ट्रातला परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता त्यांनी घडवला. खरी कसोटी होती मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाची. मराठवाड्यातील भल्या भल्या विचारवंतांची गोची झाली होती. काही सोयीस्कर माैनात होते. काही थेट विरोधी छावणीत जाऊन बसले होते. पण डाॅ.ना.य. डोळे मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंच पाहिजे यासाठी मैदानात उतरले. विद्यापीठाच्या नामांतराच्या बाजूने उभे राहिले. म्हणून एस.एम. जोशींचं स्वागत काही प्रतिक्रियावादी शक्तींनी चपलांचा हार घालून केलं. एस.एम. जोशी डगमगले नाहीत. त्यांचे पक्के शिष्य असलेले डाॅ. ना. य. डोळेही डगमगले नाहीत.

डोळे सर समाजवाद्यांमधल्या लोहिया गटाचे. त्यामुळे जातीच्या प्रश्नांवर त्यांना क्लॅरिटी होती. प्रत्येक दलित आंदोलनाच्या बाजूने ते उभे राहत. दलित तरुण कार्यकर्त्यांचं काही चुकलं तरी ते त्यांच्या सोबत राहत. राजकीय विचारवंतांची किंवा राजकीय नेतृत्वाची कसोटी अशा अवघड प्रश्नांवरच लागत असते. प्रस्थापितांच्या बाजूने रहायचं की विस्थापितांची कड घ्यायची ? डोळे सरांनी विस्थापित आणि शोषितांच्या बाजूने आपला झेंडा बुलंद ठेवला.

मी मुंबईकर. डोळे सरांच्या काॅलेजमधला नाही. पण डोळे नावाचं एक स्कूल होतं त्यातला मी ही एक विद्यार्थी आहे. माझ्या सारखे असंख्य आहेत. डोळे सर १० ऑक्टोबर २००१ ला गेले. १३ वर्ष झाली. पण डोळे नावाचे स्कूल आजही महाराष्ट्रात जीवंत आहे.


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com

2 comments:

  1. सर, आज अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे महाराष्ट्राला...!

    ReplyDelete
  2. डोळे सर सामान्य कार्यकर्त्या बरोबर समरस झालेला विचारवंत .. विनम्र अभिवादन!!!

    ReplyDelete